Wednesday, 1 November 2023

ईस्टर ऑइल - ट्रान्सफॉर्मर साठी वरदान.

 

ईस्टर ऑइल - ट्रान्सफॉर्मर साठी वरदान.

आपल्याला सार्वजनिक ठिकाणी दिसणारे वीजवितरण कंपन्यांचे ट्रान्सफॉर्मर्स सर्वसाधारणपणे ऑइल फिल्ड प्रकारातले असतात. यातील ऑइल एक पेट्रोलियम उत्पादन असून ते अतिशय ज्वलनशील असते. बऱ्याच वेळेला योग्य ती देखभाल केल्यामुळे म्हणा किंवा ओव्हरलोडिंग मुळे ट्रान्सफॉर्मरच्या तापमानात प्रमाणाबाहेर वाढ होते आणि ट्रान्सफॉर्मर्स जाळतात, स्फोट होऊन फुटतात. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात असलेले पेटलेले ऑइल इतस्ततः पसरून मोठ्या आगी लागतात. हे ट्रान्सफॉर्मर्स निवासी इमारतीच्या पार्किंग मध्ये किंवा तळघरात असतील तर अपघाताची व्याप्ती वाढते. मोठ्या प्रमाणात प्राणहानी आणि वित्तहानी होते. पुणे शहराचा विचार करायचा झाल्यास सार्वजनिक ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मर्स आणि संबंधित उपकरणे यांची परिस्थिती काळजी करण्याइतकी धोकादायक आहे. अर्थात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीज उपकरणांची काळजी महावितरण त्यांच्यापरीने घेतही असते. उदाहरणार्थ पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पोलवर बसवलेल्या ट्रान्सफॉर्मर्स ना महावितरणने बाहेरून जाड पत्र्याचे पेटीसारखे आवरण बसवलेले आहे. त्यामुळे चुकून काही कारणाने ट्रान्सफॉर्मर ला आग लागली तरी ती दूरवर पसरत नाही आणि प्राणहानी टळते.

 

जून १९९७ मध्ये दिल्ली मधील उपहार चित्रपटगृहाच्या तळघरातल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात लागलेल्या आगीमुळे अशा ट्रान्सफॉर्मर्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या अपघातातील भीषण अग्नीतांडवात तब्बल ५९ निरपराध नागरिकांचा बळी गेला, त्या मृतांमध्ये २३ लहान मुले होती. शेकडो माणसे होरपळली, धुरात गुदमरली, चेंगराचेंगरीत जखमी झाली. या इमारतीचे मालक असलेले अंसल बंधू, दिल्ली विद्युत बोर्ड (डी .व्ही.बी.), फायर डिपार्टमेंट, विद्युत निरीक्षण कार्यालयाचे सुरक्षा विषयक परवानग्या देणारे काही अधिकारी यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येऊन त्यांना शिक्षा झाल्या. हा खटला तब्बल २१ वर्षे चालला होता. या मोठ्या आणि भयंकर अपघातानंतर केंद्र शासनाने 'कुठल्याही इमारतीमधील पार्किंग किंवा तळघरात ऑइल फिल्ड ट्रान्सफॉर्मर्स बसवण्यास बंदी घातली. आणि त्या ऐवजी ड्राय टाईप (ज्यामध्ये ऑइल नसते) ट्रान्सफॉर्मर्स बसवावेत असा नियम जारी केला. पण हा नियम यायच्या पूर्वी तळघरात बसवलेल्या ऑइलफिल्ड ट्रान्सफॉर्मर्सचे काय करायचे हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.

 

काय असू शकतो यावर उपाय?

 

खूप गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी किंवा इमारतीच्या आत बसवलेल्या ट्रान्सफॉर्मर ना सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाय नक्कीच आहेत... 

) कोणत्याही ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला तर बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरचा वीज पुरवठा आपोआप बंद होण्यासाठीची यंत्रणा असणे गरजेचे असते. बऱ्याच अपघातात अशी व्यवस्था चांगल्या अवस्थेत नसते किंवा अस्तित्वातच नसते. अशी व्यवस्था सर्किट मध्ये असलयास ट्रान्सफॉर्मर चे अपघात टळू शकतात.

) नियमित देखभाल:

 तळघरातील पूर्वीच बसवलेले ट्रान्सफॉर्मर ची नियमित देखभाल हा एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. अशा ट्रान्सफॉर्मर्स ना पुरेसे व्हेंटिलेशन असण्याची काळजी घ्यावी लागते. ह्या ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल काही ठराविक कालावधीनंतर बदलणे किंवा ऑइल चे फिल्टरेशन करून घेणे महत्वाचे असते. यामुळे ऑइल चे तापमान नियंत्रणात ठेवले जाते.

) ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर बसवणे:

ह्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल चा वापरच केलेला नसतो. त्यामुळे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर बिघडला आणि स्फोट झालाच तर ऑइल पसरून आग वाढत नाही प्राणहानी टळली जाते. त्यामुळे इमारतीच्या पार्किंग मध्ये किंवा तळघरात वापरण्यास हे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर्स पूर्णपणे सुरक्षित असतात. पण हे ट्रान्सफॉर्मर्स आकाराने थोडे मोठे असतात. त्यामुळे इमारतीमधील आधीच कमी असलेल्या जागेत हे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर्स बसवणे अडचणीचे ठरू शकते. पूर्वी हे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर्स खूप महाग होते. पण ऑइल फिल्ड ट्रान्सफॉर्मरमध्ये सुरक्षेचे अनेक नियम अनिवार्य केले गेल्यामुळे ह्या ट्रान्सफॉर्मरच्या उत्पादनाच्या किमती वाढल्या. त्यामुळे ऑइल फिल्ड आणि ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर्स च्या किमती आता जवळपास सारख्याच झाल्या आहेत.

) इस्टर ऑइल चा वापर:

सुरक्षेसाठी ट्रान्सफॉर्मर मध्ये पारंपरिक ऑइल ऐवजी इस्टर ऑइल वापरणे हा एक सुरक्षित, उत्तम पर्याय तर आहेच, शिवाय तुलनेने काहीसा कमी खर्चाचा देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप सोयीचा देखील आहे. ह्या इस्टर ऑइल चा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे हे ऑइल पेटण्यासाठी असणारा फ्लॅश पॉईंट ३०० डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त असतो आणि नेहेमी वापरात येणाऱ्या ऑइलचा फ्लॅश पॉईंट १४० डिग्री सेंटीग्रेड इतका असतो. त्यामुळे नेहेमीच्या वापरातल्या पारंपरिक ऑइल च्या तुलनेत इस्टर ऑइल पेटायला दुप्पट वेळ घेते आणि त्यामुळे सुरक्षा दुपटीने वाढते. हे इस्टर ऑइल वापरलेले ट्रान्सफॉर्मर्स इमारतीच्या तळघरात किंवा पार्किंग मध्ये वापरण्यास तुलनेने खूप सुरक्षित असतात. ईस्टर ऑइल हे ट्रान्सफॉर्मर्सच्या सुरक्षेसाठी एक वरदानच आहे असे म्हणायला हरकत नाही.    

 

मुळात ट्रान्सफॉर्मर्स सारख्या सुरक्षित पायाभूत सुविधा उभ्या करणे आणि त्या सुविधा वर्षानुवर्षे सुस्थितीत ठेवणे हे वीजपारेषण आणि वीज वितरण कंपन्यांची जबाबदारी असते, ती असायला देखील हवीच. काही प्रमाणात ह्या कंपन्या ही जबाबदारी पार देखील पाडत असतात. तथापि या पायाभूत सुविधांची पुरेशी काळजी घेतली जाताना दिसत नाही. त्याची बरीच करणे देखील आहेत. या पायाभूत सुविधा सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि नियमित देखभाल करण्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ आणि पैशांची कमतरता ह्या देखील गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. पण मुळात हवी ती सुरक्षेप्रती लागणारीप्रबळ इच्छाशक्ती’! ती असेल तर सुरक्षेचे बरेच मार्ग उपलब्ध आहेत.  असो...

 

राजीव जतकर.

विद्युत सुरक्षा मंच

पुणे. 

No comments:

Post a Comment