पहिल्या महायुद्धाचा काळ साधारणपणे 20 व्या शतकाच्या सुरवातीचा म्हणजे 1914 ते 1918 पर्यंतचा होता. या युद्धाच्या आधीपासूनच युरोपीय देशांमध्ये साम्राज्यवाद किंवा वसाहतवादासाठी चढाओढ सुरु होती. वेगाने वाढणाऱ्या औद्योगिकरणामुळे हुकमी बाजारपेठांची या युरोपीय देशांना गरज होती. उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल मिळवण्यासाठी या देशांना स्वतःची वसाहत वाढवणे, नवनवीन प्रदेश पादाक्रांत करणे त्यांच्यासाठी गरजेचे होते. स्वतःच्या मालकीची साम्राज्ये असणे हे प्रतिष्ठेचे होऊन बसले होते. या सत्तास्पर्धेत इंग्लंड, फ्रांस हे देश आघाडीवर होते. जर्मनी, इटली, रशिया वगैरे देश देखील या सत्तास्पर्धेत उतरल्यामुळे युरोपीय देशात कलह वाढत गेला आणि याचे पर्यवसन महायुद्धात झाले. या पहिल्या महायुद्धाची सुरवात एका छोट्या घटनेने झाली. २८ जून १९१४ या दिवशी ऑस्ट्रियाचा युवराज 'ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड' व त्याची पत्नी यांची सर्बियन अज्ञात तरुणांनी हत्या केली. या हत्येतूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. स्वतःचे साम्राज्य वाढविण्यासाठी आधीच टपून बसलेल्या युरोपीय देशांना हे आयतेच कारण मिळाले. २८ जुलै १९१४ या दिवशी ऑस्ट्रिया-हंगेरी या देशांनी सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले. पुढे लगेचच म्हणजे १ ऑगस्ट १९१४ या दिवशी जर्मनी ने रशिया विरुद्ध युद्ध सुरु केले. मग या संधीची आधीपासूनच वाट बघणारे इतरही आजूबाजूचे देश युद्धात सामील झालेच, पण कालांतराने इंग्लंड, अमेरिकेसारखे बलाढ्य देशही युद्धात ओढले गेले. त्यावेळी इंग्लंडची अनेक आफ्रिकी देशांबरोबरच भारतावर देखील सत्ता होती. त्यामुळे या पहिल्या महायुद्धात लाखो भारतीय सैनिकांना देखील या युद्धात जर्मनी विरुद्ध उतरवण्यात आले. या सैन्याला 'ब्रिटिश-भारतीय सेना' असे संबोधण्यात यायचे. या युद्धात जर्मनी चा पराभव झाला आणि जर्मनी ला 'व्हर्साय च्या तहाला सामोरे जावे लागले. या तहामध्ये जर्मनी च्या विरोधात अनेक जाचक अटी होत्या. या तहा दरम्यान जर्मनांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली गेली. पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने केलेल्या या तहाने प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या महायुद्धाचे बीजारोपण केले. या तहातील जाचक अटींमुळे आणि झालेल्या अपमानामुळे जर्मन नागरिकांमध्ये मित्र राष्ट्रांबद्दल तीव्र द्वेष व तिरस्कार निर्माण झाला. या असंतोषाचा फायदा घेऊन पुढे ‘हिटलरने’ जर्मन लोकांच्या भावना भडकावल्या आणि सर्व जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले.
युद्धस्य कथा रम्या: असे म्हणतात ते काही खोटे नाही. इतिहासातील अनेक थरारक युद्धाच्या कहाण्या ऐकताना, वाचताना मनात स्फुरण चढते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लढाया,पेशवेकालीन पानिपत ची लढाई, पृथ्वीराज चौहान, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या लढाईचा इतिहास ऐकताना आपण भूतकाळात जाऊन रमतो. कशा लढल्या गेल्या असतील ह्या लढाया? अगदी अलीकडील काळातील पहिले, दुसरे महायुद्ध, कारगिल ची लढाई वगैरे घटना ऐकून मन सुन्न होते. हजारो लाखो सैनिक मृत्यमुखी पडतात, जखमी होतात. युद्धादरम्यान शेकडो सैनिक शत्रूच्या हाती लागतात. त्यांना अनेक वर्षे शत्रूच्या कैदेत खिचपत पडावे लागते. पूर्वीच्या काळात युद्धात तरुणांनी सक्रिय भाग घ्यावा म्हणून, त्यांचे देशप्रेम जागृत व्हावे म्हणून पोवाडे गायले जायचे. आताच्या काळात देशाचे संरक्षण खाते निरनिराळ्या जाहिराती करून तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी उद्युक्त करत असते. त्यामुळे देशप्रेमाने भारलेले अनेक तरुण सैन्यात भरती होतात, आणि प्रसंगी युद्धात भाग देखील घेतात. 'युद्धकथा ऐकताना अंगावर रोमांच उभारतात, शरीरात वीरश्री संचारते' हे जरी खरं असलं तरी रणांगणात होणारा विनाश पहिला की या तरुण सैनिकांची काय मानसिकता होत असेल? युद्धातील नरसंहार पाहून सम्राट अशोकाला देखील विरक्ती आली होती तिथे सामान्य तरुणांची काय कथा? नेमका हाच धागा पकडून बॉलिवूड दिग्दर्शक 'एडवर्ड बर्जर' यांनी 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' हा पहिल्या महायुद्धावर आधारित अप्रतिम चित्रपट चित्रपटरसिकांना सादर केलाय.
पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट अतिशय वेगळ्या जातकुळीचा आहे. सर्वसाधारणपणे युद्धपटात चित्रपटाचा नायक किंवा मुख्य पात्रे विलक्षण शौर्य गाजवत, धैर्याने विजय मिळवताना दिसतात. पण ह्या चित्रपटातील तरुण नायक 'पॉल बॉमर' व त्याचे चार तरुण मित्र युद्धभूमीवर जातात खरे, पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील वास्तव त्यांचा भ्रमनिरास करते. युद्धातील विध्वंस, मृत्यूचे तांडव, जखमी सैनिकांच्या यातना हे युद्धवास्तव पाहून ते हादरतात. त्यांना युद्ध नकोसे वाटू लागते. सुरवातीला देशभक्तीने भारलेले पॉल आणि त्याचे मित्र युद्धभूमीवरील रक्तामांसाचा चिखल, डोळ्यादेखत पटापट मरणारे सैनिक, त्यांच्या मृतदेहावर घोंगावणाऱ्या माशा, जेवणाचे हाल वगैरे बघून उद्विग्न होतात. त्यांचे अवसान गळून पडते. युद्धभूमी सोडून त्यांना घरी जावेसे वाटू लागते. पण आता ते शक्य नसते. मग ते नाईलाजाने युद्धभूमीवर रडतखडत युद्ध करत राहतात. पुढं काय होतं हे चित्रपटात पहाण्यासारखं, अनुभवण्यासारखं आहे...
खरं तर 'ऑल क्वाएट'... हा पहिल्या महायुध्दावरील मी पाहिलेला पहिलाच चित्रपट. दुसऱ्या महायुध्दावरील अनेक चित्रपट माझ्या पाहण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धाची इत्यंभूत माहिती माझ्या वाचनात आलेली होतीच. दुसऱ्या महायुद्धाची पाळेमुळे पहिल्या महायुद्धात गुंतलेली होती असेही मला माहिती होते. पण पहिल्या महायुद्धाचा तपशील मला फारसा माहिती नव्हता. 'ऑल क्वाएट'... हा चित्रपट पाहिल्यावर मात्र मी पहिले महायुद्ध, त्याची कारणं, तत्कालीन जागतिक राजकारण वगैरे तपशील मी समजावून घेतला आणि मग पुन्हा दुसऱ्यांदा 'ऑल क्वाएट'... हा चित्रपट पहिला. मग तो मला आणखीन वेगळा जाणवला.
हा चित्रपट प्रेक्षकांना युद्धाची निरर्थकता, प्रत्यक्ष युद्धाची दाहकता याची जाणीव करून देतो. युद्धामुळे मानवी भावभावनांची कशी राखरांगोळी होते हे हा चित्रपट दाखवतो. हा चित्रपट उत्कंठावर्धक तर आहेच शिवाय अनेक थरारक प्रसंगांनी भरला आहे. यातील एका प्रसंगाने मी खूप अस्वस्थ झालो. युद्धाचे घमासान चालू असताना 'पॉल बॉमर' एका खड्ड्यात पडतो. त्याच वेळी शत्रुपक्षाचा एक फ्रेंच सैनिक देखील या खड्ड्यात पडतो. दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. दोघात मोठी झटपट होते. या झटापटीमध्ये पॉल फ्रेंच सैनिकाला चाकूने भोसकतो. पण हा फ्रेंच सैनिक लगेच मरत नाही. त्याला हळू हळू येणारे मरण पाहून पॉल मुळापासून हादरतो. त्या फ्रेंच सैनिकाच्या मरणयातना बघून खूप अस्वस्थ होतो. त्या मरणासन्न सैनिकांची पॉल माफी देखील मागतो. पॉलच्या डोळ्यादेखत तो सैनिक आपले प्राण सोडतो. हा प्रसंग इतक्या प्रभावीपणे चित्रित झालाय की प्रेक्षक देखील अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाहीत. असे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत.
पहिल्या महायुद्धामधील मित्रराष्ट्राकडून झालेल्या दारुण आणि अपमानास्पद पराभवानंतर जर्मन नागरिकांमध्ये मित्रराष्ट्रांबद्दल एकप्रकारची चीड निर्माण झाली. १९२९ मध्ये 'एरिक मारिया रिमार्क' यांनी लिहिलेली 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' ही कादंबरी जर्मनीत वादग्रस्त ठरली. या कादंबरीच्या प्रकाशनानंतर वर्षभरातच २० ते २५ लाख प्रति विकल्या गेल्या. मग या कादंबरीवर बंदी घालण्यात आली. नाझींनी या कादंबरीच्या हजारो प्रति जाळल्या. पुढे ही कादंबरी २२ भाषांमध्ये अनुवादित झाली. या कादंबरीवर 'लुईस माईलस्टोन' यांनी १९३० मध्ये सिनेमा केला. त्याला ऑस्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. आता 'एडवर्ड बर्जर' यांनी पुन्हा याच कादंबरीवर त्याच नावाने चित्रपट केलाय. दिग्दर्शनाबरोबर पटकथा, अभिनय अश्या सर्वच आघाड्यांवर हा चित्रपट इतका उत्तम झालाय की या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ऑस्कर साठी देखील अनेक नामांकने या चित्रपटाला मिळाली आहेत.
युद्धे होतात ती साम्राज्यवादी नेत्यांमुळे. पण युद्धकाळात त्यांचे विलासी आयुष्य नेहेमीप्रमाणे सुरु असते. जेंव्हा युद्धे होतात तेंव्हा त्याची झळ युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकांना बसते. याची जाणीव हा चित्रपत बघताना आपल्याला होते. 'युद्धात कुणाचाच फायदा नसतो' ही जाणीव होण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा. अर्थात 'युद्धे निरर्थक असतात' ही जाणीव झाली तर तो माणूस कसला? महत्वाकांक्षी राजकारणी नेते पुन्हा पुन्हा सामान्यांना युद्धाच्या खाईत लोटतात. पहिल्या महायुद्धानंतर कोणताही धडा न शिकता मानवाने पुन्हा विनाशकारी असे दुसरे महायुद्ध केलेच... आणि आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे.
टीप: हा सुंदर चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.
राजीव जतकर.
११ मार्च २०२३.
एक विलक्षण योगायोग... 11 मार्च 2023 रोजी मी या चित्रपटाबद्दल लिहिलं, आणि दोनच दिवसांनी या चित्रपटाला 'ऑस्कर' पारितोषिक मिळालं.
ReplyDelete"युद्धस्य कथा रम्या:!"
ReplyDeleteअसा सर्वसाधारणपणे आपला समज असतो,पण प्रत्यक्षात मात्र सर्वंच युद्धकथा किंवा चित्रपट हे रम्य असतातच असं नाही! युद्धातील हानीची अपरिहार्यता आपल्याला अंतर्मुख करते!
आपल्या या चित्रपटाच्या प्रशिक्षणातून हेच धि
स्पष्ट होते!
ReplyDelete