डॉक्टरजी.
स्त्री रोग तज्ज्ञ की अस्थिरोग तज्ज्ञ?... एक गोंधळलेला डॉक्टर.
![]() |
डॉ. उदय गुप्ता - आयुष्यमान खुराना |
२०१९ मध्ये सहासष्ठाव्या राष्ट्रीय पुरस्कारांची दिल्लीत घोषणा झाली, आणि आयुष्यमान खुराना या माझ्या आवडत्या अभिनेत्याला 'अंदाधुन'
या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. माझ्या या आवडत्या कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या मुळे मी त्या आनंदात आयुष्यमानच्या एकूणच कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा एक लेख लिहिला होता. हा लेख मी फेसबुक वर शेअर केला आणि गंमत म्हणून आयुष्यमान च्या फेसबुक अकाउंट ला टॅग देखील केले. आणि आश्चर्य म्हणजे आयुष्यमानचा मला 'थँक्यु' असा रिप्लाय देखील आला होता. (अर्थात हा रिप्लाय आयुष्यमानच्या फेसबुक हँडलर ने केला असणार. आयुष्यमान ला कुठे माझ्यासारख्या सामान्य माणसाला
रिप्लाय देण्याइतका वेळ असणार?) ते काहीही असो मला फार भारी वाटलं होतं तेंव्हा...
ह्या घटनेची आठवण होण्याचं कारण की आत्ताच नेटफ्लिक्स वर आयुष्यमान चा 'डॉक्टरजी' हा चित्रपट पहिला. हा चित्रपट वेगळ्या विषयावरचा असल्यामुळे तो प्रेक्षकांची करमणूक तर करतोच, शिवाय माझ्यासारख्या आयुष्यमान खुराना प्रेमी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. दिग्दर्शन, अभिनय, सादरीकरण अशा बाबतीत देखील डॉक्टरजी उत्तम आहे. आयुष्यमान च्या आत्तापर्यंतच्या चित्रपटात नावीन्य होतं, ‘डॉक्टरजी’ हा चित्रपट देखील त्याला अपवाद नाही.
![]() |
आयुष्यमान खुराना - रकुल प्रीत सिंग. |
बऱ्याच वेळा आपण शिकताना आपल्या आवडीच्या विषयात करियर करायचं ठरवतो आणि त्या दिशेने आपली वाटचाल करतो. पण प्रत्यक्षात आपलं नशीब आपल्याला वेगळ्याच वाटेनं घेऊन जातं. मग आपण काहीश्या नाईलाजानेच नशिबाने निवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या मार्गावर चालतो. मग नावडत्या वाटेवर चालताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. डॉ. उदय गुप्ता (आयुष्यमान खुराना) चं काहीसं असंच होतं. लांबच्या नातेवाईकांकडून प्रेरित झालेल्या डॉ. उदयला अस्थी रोगतज्ज्ञ व्हायचं असल्यामुळे सरकारी इस्पितळात तेही त्याच्या गावात भोपाळ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो. पण भोपाळमध्ये अस्थीरोग विभागात एकही जागा शिल्लक नसते. आईची काळजी घेण्यासाठी आई बरोबर राहता यावं म्हणून तो नाईलाजाने भोपाळमधील सरकारी इस्पितळात स्त्रीरोग तज्ज्ञ विभागात डॉक्टर म्हणून कामाला सुरवात करतो. या स्त्रीरोग तज्ज्ञ विभागात एखादे वर्ष काढू आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा अस्थिरोग विभागात प्रवेश घेता येईल असा विचार करून तो कामाला लागतो खरा, पण सर्वत्र स्त्रियांचाच वावर असलेल्या ह्या विभागात त्याचं मन रमत नाही.
सुरवातीला त्याच्या महिला सहायक डॉक्टर्स पासून रॅगिंग चा सामना करावा लागतो. त्यातच या विभागाची मुख्य डॉक्टर नंदिनी (शेफाली शाह) ही अतिशय कडक शिस्तप्रिय स्वभावाची असते. पुरुष डॉक्टर ने स्त्री रोग तज्ज्ञ होण्यात काय चुकीचे आहे? त्यात काय कमीपणाचे आहे? ...
असे प्रश्न विचारून डॉ. नंदिनी उदय चे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करतात. डॉ. उदय मध्ये हे मानसिक परिवर्तन होण्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट. डॉक्टर हा डॉक्टर असतो त्याने स्त्री पुरुष भेदभाव बाळगता काम नये हे सांगणारा हा चित्रपट आहे. स्त्री रोग चिकित्सा हा स्त्रियांचाच विषय आहे, या क्षेत्रात पुरुषांचे काय काम? अशी धारणा असणाऱ्या डॉ. उदय चे मतपरिवर्तन व्हायला काही प्रसंग, घटना घडतात, आणि डॉ. उदय चा आपल्या प्रोफेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो तो चित्रपटाचा प्रवास अतिशय मजेशीर आणि रंजक आहे.
![]() |
रकुल प्रीत सिंग - आयुष्यमान खुराना - शेफाली शाह |
डॉ. उदय ची भूमिका आयुष्यमानने नेहेमीच्याच सहज शैलीत केली आहे. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात राहून वेगवेगळ्या विषयातून तो सातत्याने प्रेक्षकांसमोर आलाय. ज्या प्रकारची भूमिका मिळेल त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन हा सशक्त अभिनेता प्रेक्षकांसमोर व्यक्त होत असतो. भूमिका निवडताना त्याचा चोखंदळपणा कौतुकास्पद आहे. नायिका 'रकुल प्रीत सिंग' तिची भूमिका उत्तम प्रकारे निभावते. 'शेफाली शाह' ( हिची दिल्ली क्राईम ही वेब सिरीज बघण्या सारखी आहे.) जबरदस्त. डॉ. उदय च्या आईची भूमिका अनुभवी अभिनेत्री 'शिबा चड्ढा' यांनी साकारली असून ही भुमीका लक्षात राहण्यासारखी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप हिचं आहे. तिचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी मला अनुभूती काश्यपचं नाव 'गँग्ज ऑफ वासेपूर' मधील श्रेयनामावलीत कुठेतरी वाचल्याचं स्मरतंय.
![]() |
शिबा चड्ढा |
हा चित्रपट पाहताना कुठेही कंटाळा येत नाही. थोड्या विनोदी ढंगाने जाणारा, तरी देखील काही गंभीर विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट जरूर पाहण्यासारखा आहे. आणि तुम्ही माझ्यासारखे आयुष्यमानच्या हटके शैलीतील चित्रपटांचे फॅन असाल तर हा चित्रपट आजिबात चुकवू नका.
राजीव जतकर.
१७ डिसेंबर २०२२.