‘ग्रहण’ - शोध संपूर्ण सत्याचा.
दोन तीन वर्षांपूर्वी मी 'फ़िराक' नावाच्या एका अप्रतिम चित्रपटाचं परीक्षण म्हणा किंवा रसग्रहण म्हणा लिहिलं होतं. २००२ मधील उसळलेल्या हिंदू मुस्लिम दंगलींवर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाच्या लिखाणात मी अलीकडच्या काळातील भारतीय समाज मनावर आरूढ झालेल्या जातीयवादाच्या भुताबद्दल माझ्या मनातलं काहीबाही लिहिलं होतं. दुर्दैवानं काही महाभागांना मी काय लिहिलंय हे कळलंच नसावं. ही मंडळी हिंदू मुस्लिम वगैरे मधेच अडकून बसलेली होती. कोणत्याही जातीय दंगलींमध्ये दंगलीची झळ कोण्या एका जातीला, धर्माला बसत नाही तर ती सर्वच समाजाला बसते. विशेषतः अल्पसंख्यांक अशा दंगलींमध्ये भरडले जातात. तसेच जातीय दंगली फक्त हिंदू मुस्लिमांमध्येच होतात असेही नाही तर हिंदू मुस्लिमांच्या पोटजातीत देखील होतात. १९८४ सालाची हिंदू शिखांची दंगल (शिखांना मी हिंदू संस्कृतीचाच एक भाग मानतो) हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मणांवर अत्याचार झाले, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांना लक्ष केले गेले, गुजराथ दंगलींमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही लोकांच्या हत्या झाल्या, अत्याचार झाले. कुण्या एका माणसाच्या आततायी कृत्यामुळे, राजकारण्यांच्या फायद्यासाठी संपूर्ण जमातीला त्याचे परिणाम भोगावे लागतात, पण त्या बरोबर पुढील अनेक पिढ्यांच्या मनात जातीय मतभेद, कटुता भरून राहते. मग संपूर्ण समाजच एकमेकांकडे संशयाने बघू लागतो. अनेक वर्षे गुण्या गोविंदाने एकत्र राहणारे लोक एकमेकांकडे तिरस्काराच्या भावनेने बघू लागतात.
हे सर्व सामान्यांना समजत नाही तोपर्यंत अशा दंगली होतच राहणार. सर्वसामान्य समाजमनाला भडकावणारे राजकारणी असोत किंवा तथाकथित कट्टरपंथीय धर्मधुरीण (मग ते कोणत्याही धर्मातले असोत) यांना आपण चार हात लांबच ठेवायला हवे. असो...
अशाच एका जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर आधारित 'ग्रहण' नावाची वेब सिरीज डीस्ने हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्यात आली. फ़िराक हा चित्रपट बघताना मला जशी अस्वस्थता आली होती तशीच किंबहुना थोडी जास्तच अस्वस्थता ग्रहण बघताना मला आली. फ़िराक आणि ग्रहण यांची जातीकुळी एकच ! फक्त हिंदू मुस्लिम ऐवजी हिंदू शीख इतकाच काय तो बदल.
१९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीची पार्श्वभूमी 'ग्रहण' या वेब सीरीजला असून 'ग्रहण' ची कथा हिंदी लेखक 'सत्य व्यास' यांच्या 'चौरासी' या कादंबरी वरून प्रेरणा घेऊन बेतली आहे. अर्थात कादंबरीवरून वेब सिरीज बनवताना निर्मात्यांना, दिग्दर्शकाला कथेत अनेक बदल करावे लागले आहेत. चौरासी कादंबरीमध्ये दंगलीच्या पार्श्वभूमीवर घडलेली एक हळुवार प्रेमकथा आहे. वेबसेरीज बनवताना अर्थातच बऱ्याच नाट्यमय घटना, दंगलीची दाहकता, स्थानिक राजकारण वगैरे आवश्यक गोष्टी बेमालूमपणे मिसळलेल्या आहेत. त्यामुळे ही वेबसेरीज
परिणामकारक तर होतेच, पण त्याच बरोबर करमणूकप्रधान, उत्सुकता वाढवणारी झाली आहे.
![]() |
अंशुमन पुष्कर (ऋषी) आणि वामिका गब्बी (मनू) |
'ग्रहण' ची कथा दोन काळात म्हणजे वर्तमानात आणि भूतकाळातही घडते. अमृता सिंह (जोया हुसेन) या प्रामाणिक,
तडफदार आय.पी.एस. महिला पोलीस अधिकाऱ्यावर १९८४ साली घडलेल्या दंगलींचा तपास करण्याची जबाबदारी सोपोवण्यात आलेली असते. ती आपल्या वयस्क वडिलांबरोबर म्हणजे गुरुसेवक सिंह ( पावन राज मल्होत्रा) यांच्या बरोबर राहत असते. इतक्या जुन्या काळातील घडून गेलेल्या काळातील दंगलीचा तपास त्यावेळच्या म्हणजे काही दशकांपूर्वीच्या गुन्हेगारांना शोधणे हे काम अवघड तर असतेच, पण गुंतागुंतीचेही असते. हा तपास चालू असताना फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करत दिग्दर्शक 'रंजन चंदेल' हे १९८४ मधील बखारो गावातील भूतकाळात घडणारी हळुवार प्रेमकथा आणि पार्श्वभूमीवर घडणाऱ्या दंगलीची दाहकता प्रेक्षकांपर्यंत अतिशय खुबीने पोहोचवतो. या फ्लॅशबॅक मध्ये ऋषी रंजन (अंशुमन पुष्कर) आणि मनू उर्फ मनजीत छाबडा (वामिका गब्बी) यांची प्रेमकथा बहरत असतानाच दंगली उसळतात आणि अनेक शिख कुटुंबाप्रमाणे मनूच्या कुटुंबाची वाताहत होते. इकडे वर्तमानातील अमृता सिंह करत असलेल्या तपासात तिचेच वडील गुरुसेवक सिंह प्रमुख संशयित गुन्हेगार आहेत असे तिच्या लक्षात येते. अमृता सिंह कर्तव्य आणि भावना या द्वंदात सापडते. पुढे काय होते? भूतकाळातील मनू आणि ऋषीचे लग्न होते का? वर्तमानात अमृता सिंह ला तिच्या तपासात यश मिळते का? भूतकाळातील ऋषी रंजन आणि गुरुसेवक सिंह यांचे नेमके काय कनेक्शन असते? या साठी ग्रहण ही वेब सिरीज बघायलाच आणि अनुभवायलाच हवी.
![]() |
जोया हुसेन (अमृता सिंह), अंशुमन पुष्कर (ऋषी) आणि पवन मल्होत्रा (गुरुसेवक सिंह) |
गंमत म्हणजे तब्बल आठ एपिसोड असलेली ही भक्कम दीर्घ कथा बघताना कधीही कंटाळा येत नाही. सुरवातीला कथेतील सगळी पात्रे समजावून घेताना थोडा वेळ जातो. काही प्रसंग थोडे लांबतात. पण नंतर कथा लगेचच आपली पकड घेते. अभिनयाच्या बाबतीत अमृता सिंहची भूमिका करणारी 'जोया हुसेन' हीची कामगिरी अव्वल आहे. तिने कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका समरसून केली आहे. पवन मल्होत्रा या अनुभवी, बुजुर्ग अभिनेत्याने अमृता सिंह हिचे वडील गुरु सेवक सिंह यांची भूमिका अफलातून साकारली आहे. पवन मल्होत्रा हे मुळातच अनुभवी आणि कसलेले अभिनेते आहेत. त्यांच्या साठी सुद्धा ग्रहण बघायला हरकत नाही. अंशुमन पुष्कर आणि वामिका गब्बी व इतरही अनेक अभिनेते मी पहिल्यांदाच पहिले, अनुभवले. अभिनयाच्या बाबतील कोणीच कमी पडत नाही.
![]() |
आयपीएस अधिकारी अमृता सिंह (जोया हुसेन) |
या वेबसिरीज चे संगीत तर श्रवणीय तर आहेच, पण यातील पार्श्वसंगीत फार प्रभावी आहे. यातील प्रसंगांची तरलता, भीषणता, दाहकता, उत्सुकता अधिकच खुलते, अधिक भेदक होते. या वेब सिरीज मधील संवाद अतिशय कमाल आहेत. जसे "हमला करनेवाला दंगाई होता है, कोई हिंदू या मुस्लिम नाही.", राजनीतीमे कुछ बदलता नही है, टलता है, माहोल देखकर इतिहास अपने आप दोहोराता है ।", "हम अक्सर
चिजोंको काले और सफेदमें
देखते है, पर सच उसके बीच का रंग होता है !" "राजनीती किसीके तारिकेसे नही चलती, उसकी अपनी चाल होती है."
'ग्रहण' ची कथा आहे एका बापलेकीच्या तरल नात्याची, ही कथा आहे एका भयंकर क्रूर इतिहासाची. ही कथा आहे वर्तमानातली आणि भूतकाळातलीही. कथेची बांधणी सर्वोत्तम आहे. कथेला अनेक धक्कादायक वळणे आहेत. राजकारणी नेत्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी असलेली अपरिहार्यता, आणि या अपरिहार्यतेतून येणारी खुनशी प्रवृत्ती पाहून प्रेक्षकांना अस्वस्थता आल्याशिवाय राहणार नाही. ग्रहण चा शेवट अतिशय अनपेक्षित आहे. माझ्या डोक्याला 'जोर का झटका धीरे से' मारून गेला. माझी अस्वस्थता काही केल्या जाईना. डोक्यातील विचार मेंदू कुरतडत राहिले. शेवटी शेजारच्याच एका गुरुद्वारा मध्ये जाऊन दंगलीतील बाधितांसाठी प्रार्थना करून आलो. गुरुद्वारा मध्ये एका कोपऱ्यात कुणाशीही न बोलता तासभर शांतपणे बसून राहिलो, तेंव्हा कुठे थोडे शांत आणि बरे वाटले...
राजीव जतकर.
'ग्रहण'पाहिल्यावरमाझी देखील मनस्थिती तुझ्यासारखीच झाली होती. धर्मांधता,जातींमधील तेढ हे मानवतेला लागलेलं ग्रहण आहे. एखाद्या जातीच्या,धर्माच्या १-२ माणसांनी गुन्हा केला म्हणजे त्या जाती-धर्माचे सर्वच लोक गुन्हेगार का ठरवले जातात हे खरंच गुढ आहे. असे अनेक चित्रपट यायला पाहिजेत. त्यामुळे कदाचित लोकांची मानसिकता बदलायला थोडीफार मदत होईल.
ReplyDeleteया सारखं चित्रपट येतं राहायला पाहिजे
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि नेमक्या शब्दात....'चहाटळ' आणि थंबी दुराई च्या मार्गांवर आहात.... 👌🏻👌🏻... सिनेमा तर सगळेच बघतात, त्याचे रस ग्रहण करावे ते तुम्हीच 👌🏻...
ReplyDeleteजातीयवाद नावाचा चिखल जेव्हा जेव्हा अंगावर उडला तेव्हा माणूस पण संपले आणि कायम दंगली होत राहिल्या तुमच्या कडून रसग्रहण अतिशय सुंदर आणि मार्मिक असेच होते कायम असे वर्णनात्मक भाषा वाचण्यात यावी अशी मागणी आहे
ReplyDeleteसर, तुमचे समीक्षण खूपच दर्जेदार असते. ग्रहणचे तीन भाग पाहिले. उत्कंठा वाढली आहे. वेळात वेळ काढून तुम्ही हा लेखन प्रपंच करता. त्यायोगे आम्हालाही चांगला सिनेमा, मालिका पाहायला मिळते. तशी धडपड या लिखाणामागे असल्याचे जाणवते. खूप खूप धन्यवाद!!��
ReplyDelete