Friday, 10 July 2020

नॉस्टॅलजिया - शिकारी (१९६३)


नॉस्टॅलजिया - शिकारी (१९६३)



१९७६/७७ चा काळ असेल तो. मी आणि माझा मोठा भाऊ शरद शिक्षणासाठी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर ते जोगेश्वरी मंदिर दरम्यान असलेल्या एका बोळातील मेहेंदळ्यांच्या वाड्यात भाड्याच्या खोलीत राहत होतो. शरद अभिनव कलामध्ये आर्किटेक्चरला आणि मी .. महाविद्यालयात शिकत होतो. आम्हाला सिनेमा बघायचं भारी वेड होतं. राहुल टॉकीजच्या ७० एम.एम. भव्य पडद्यावर नवे जुने इंग्रजी चित्रपट बघताना आमचे भान हरपायचं. जुने हिंदी चित्रपट बघणं म्हणजे आमचा जीव की प्राण. पण पैशांची जाम तंगी असायची त्या काळात. वडील गावाकडून पैसे पाठवायचे, पण ते पुरत नसत. मग शरद पार्ट टाइम नोकरी करायचा. त्या काळात राईसप्लेट रुपयांना होती. त्यामुळे पूना गेस्ट हाऊस मधून महिन्याभराची प्रत्येकी १२० रुपयांची जेवणाची कुपन्स घेऊन ठेवली की आम्ही निर्धास्त व्हायचो. पण एकूणच पैशांची जाम कडकी असायची. 

एकदा १९६३ साली प्रदर्शित झालेला जुना 'शिकारी' नावाचा चित्रपट आमच्या रूम जवळच असलेल्या रतन टॉकीजला लागला होता. या चित्रपटात अजित आणि रागिणी ही त्या काळातली गाजलेली जोडी होती. आम्हाला माहिती असलेला अजित हा नट खलनायक म्हणून प्रसिद्ध होता. शिकारी मध्ये त्याला नायकाच्या भूमिकेत बघायची आम्हाला उत्सुकता होती. शिवाय या चित्रपटातील गाजलेली सुमधुर गाणी बघण्यासाठी देखील आम्ही हा चित्रपट बघायचा ठरवलं. आमच्याकडे सिनेमा बघण्यासाठी पैसे नव्हते. चित्रपट काहीही करून बघायचाच होता. काय करावे काही कळत नव्हते. एखादे रात्रीचे जेवण स्किप करून वाचवलेल्या पैशातून 'शिकारी' बघायचा असं ठरवलं. मग जेवणाचं कुपन वाया जाऊ नये म्हणून ते पुढच्या महिन्यात वापरण्याची पूना गेस्ट च्या सरपोतदारांची परवानगी घेतली. त्यावेळी सिनेमाचे तिकीट देखील दोनतीन रुपये इतकेच होते.

माझा भाऊ शरद आर्किटेक्चरला असल्याने त्याची ड्रॉइंग्ज, सबमिशन्सची कामे रात्री उशिरापर्यंत चालत. मी देखील त्याला त्याच्या कामात मदत करत असे. एके दिवशी रात्री नऊ साडेनऊ वाजता झोप येऊ नये म्हणून चहा प्यायला आम्ही घरच्याच कपड्यांमध्ये बाहेर पडलो. रतन टॉकीज समोरच्या चहाच्या गाडी वर चहा पिताना समोर 'शिकारी' चित्रपटाचे पोस्टर पहिले आणि आमच्या चित्रपट पाहण्याच्या इच्छेने उचल खाल्ली. तसेच घरच्या कपड्यांमध्ये लुंगी, टीशर्ट मधेच तिकिटे काढून थिएटर मध्ये जाऊन बसलो. चित्रपट तसा यथातथाच देमार पठडीतला होता. पण चित्रपटातली अफाट गाणी आणि नायकाच्या रुपातला अजित बघताना धमाल आली. 

आजकालच्या काळातल्या तरुणांना कदाचित या १९६३ साली प्रदर्शित झालेल्या 'शिकारी' या चित्रपटाविषयी फारशी माहिती नसेल. हॉलिवूड मधील जुन्या किंगकाँग या चित्रपटावर बेतलेला शिकारी हा चित्रपट जवळजवळ सर्वच पातळ्यांवर तसा सामान्यच होता. पण हा चित्रपट त्या काळी गाजण्याचे महत्वाचे कारण होते ते म्हणजे या चित्रपटातील असलेली अतिशय सुमधुर आणि मेलोडियस गाणी ! 'जी. एस. कोहली' नामक संगीतकाराने या चित्रपटातील सर्वच गाण्यांना अतिशय सुरेख चाली लावून गाणी अजरामर केली आहेत. त्याकाळी यातील गाणी पाहण्यासाठी बॉक्स ऑफिसवर चित्ररसिकांची गर्दी उसळायची. यातील गाणी म्हणजे डोळ्यांना आणि कानांना जणू मेजवानीच असायची. यातील 'चमन के फूल'.., अगर मैं पुच्छू'.., 'तुमको पिया, दिल दिया कितने नाज से'.. ही गाणी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा पुन्हा गर्दी करायचे. 'फारूक कैसर' या गीतकाराने लिहिलेली ही रोमँटिक गाणी 'जी. एस. कोहलींनी लावलेल्या गोड चालींमुळे चित्ररसिकांच्या मनात घर करून बसली.

या चित्रपटचा नायक 'हमीद अली खान' उर्फ 'अजित' हा देखील चित्रपट बघण्याचे आकर्षण होता. नायकासाठीचे आवश्यक असे देखणेपण, भारदस्त आवाज वगैरे सर्व गुण त्याच्यात होते. अजितच्या कारकिर्दीची सुरवातीची वर्षे अतिशय संघर्षाची होती. सुरवातीच्या काळात त्याने नास्तिक, बडा भाई, मिलन, बारादरी वगैरे चित्रपटातून नायकाची भूमिका केली. त्याने त्याकाळच्या अनेक प्रतिथयश नायिकांबरोबर देखील काम केलं. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या 'टॉवर हाऊस' चित्रपटात त्याने 'शकीला' बरोबर नायकाची भूमिका करून आपली अभिनयाची चुणूक दाखवली. १९६५ सालच्या 'बॉंबे रेसकोर्स' या चित्रपटात त्याकाळात आघाडीवर असलेली नलिनी जयवंत ही अजित ची नायिका होती.  त्याकाळात आलेल्या 'बेकसूर' नावाच्या एका चित्रपटात 'मधुबाला', तसेच 'मोतीमहल' नावाच्या चित्रपटात सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री 'सुरय्या' यांच्या बरोबरच्या नायकाच्या भूमिकेत अजित चमकला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल सायराबानूच्या आई नसीम बानू यांच्याबरोबर देखील अजित ने काम केले आहे.

राजेंद्र कुमारच्या 'सुरज' या चित्रपटापासून अजितची नायकाची ओळख पुसली जाऊन तो खलनायक म्हणून प्रसिद्ध झाला. पुढील काळात जंजीर, यादोंकी बारात, जुगनू, कहानी किस्मत की असे अनेक चित्रपट अजितने खलनायकाच्या भूमिकेत गाजवले. नायकाचा खलनायक होणं किंवा खलनायकाचा नायक होणं असे चमत्कार हिंदी चित्रपसृष्टीत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुरवातीच्या काळात नायक म्हणून प्रसिद्ध झालेला अजित आयुष्याच्या उत्तरार्धात खलनायक म्हणून तेव्हडाच किंबहुना थोडा जास्तच यशस्वी झाला.

शिकारी चित्रपटाची कथा तशी टिपिकल फिल्मी आहे. किंगकाँग ह्या हॉलिवूड च्या चित्रपटावरून कथा बरीचशी कॉपी केलेली आहे. डबघाईला आलेल्या एका सर्कस कंपनीला पुन्हा आर्थिक दृष्ट्या उभारी देण्याच्या उद्देश्याने एका महाकाय गोरिला ला पकडण्यासाठी केलेली धडपड म्हणजे ह्या चित्रपटाची कथा! अजित, रागिणी, के.एन. सिंग, हेलन, मदन पुरी या सारखी त्याकाळातली तगडी स्टारकास्ट या चित्रपटात मजा आणतात, मालदीव, लक्षद्वीप मधील जंगलात झालेले चित्रीकरण, जहाजातील थरारक प्रवास, मारामाऱ्या, सर्व प्रकारचा मालमसाला वगैरे गोष्टी चित्रपट करमणूक प्रधान बनवतात. हा चित्रपट जुन्या काळातील असल्यामुळे 'तांत्रिकदृष्ट्या मर्यादा' असलेला आहे हे लक्षात ठेऊन चित्रपट बघावा लागतो.  रागिणी, हेलन ह्या नट्या मुळात कसलेल्या नृत्यांगनाच असल्याने त्यांची या चित्रपटातील सुंदर नृत्ये डोळ्यांना सुखावतात.

सिनेमा बघून बाहेर पडल्यावर मात्र भुकेची जाणीव झाली. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. मग पुन्हा रूमवर जाऊन कुठेतरी डब्यात, कधीतरी साठवलेले किडूकमिडूक सुट्टे पैसे, नाणी गोळा करून, कोपऱ्यावरच्या गाडीवर दोघात एक भेळ घेऊन खाल्ली. वर भरपूर पाणी पिऊन पोट भरले आणि झोपी गेलो. असे आमचे सिनेमा वेड...

आज अचानक व्हाट्सअप वर कुठूनसे या 'शिकारी' चित्रपटातील एक गाणे माझ्याकडे आले आणि जुन्या आठवणीत मी रमून गेलो. मनात जुन्या आठवणींची हुरहूर दाटून आली. यु ट्यूब वर हा संपूर्ण चित्रपट उपलब्ध आहे. एकदा बघण्यासारखा आहे. खाली लिंक देतोय. बाकी चित्रपट तुम्हाला आवडेलच याची मी खात्री देऊ शकत नाही, पण यातील सुमधुर गाणी, बहारदार नृत्ये तुम्हाला नक्की आनंद देतील.


राजीव जतकर.
१६ जून २०२०.
(लॉक डाऊन )
      

No comments:

Post a Comment