‘सेक्शन ३७५’ - लढाई कायद्यासाठी की न्यायासाठी?
![]() |
'तरुण सलुजा' (अक्षय खन्ना) |
'स्त्रियांचे लैंगिक शोषण' हा भारताबरोबरच संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. स्त्रियांवर होणारे बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या बातम्या आपल्याला रोजच ऐकायला, वाचायला मिळतात. मध्यंतरी अनेक स्त्रियांनी त्यांना आलेले वाईट अनुभव पुरुषांच्या नावानिशी ट्विटर, फेसबुक अशा सोशल माध्यमातून व्यक्त करायला सुरवात केली, आणि जणू "तू असा वाईट अनुभव आलेली एकटी नाहीस, हे माझ्याही बाबतीत घडलंय" असा काहीसा दिलासाच महिलांना मिळाला आणि "मी-सुद्धा" उर्फ मी-टू (Me-Too) ह्या चळवळीची जणू मोठी लाटच आली. २००६ साली 'मी-टू' या शब्दाचा उपयोग सर्वप्रथम 'तराना बुर्क' या अमेरिकास्थित आफ्रिकन सामाजिक कार्यकर्तीने केला. मग जगभरातल्या अनेक स्त्रियांच्या कोंडलेल्या मनाचा जणू बांधच फुटला. या मी-टू च्या लाटेवर हॉलिवूड, बॉलिवूड मधील अनेक तारका स्वार झाल्या. २०१७ हॉलिवूड अभिनेत्री आलिसा मिलानो हिने तिला आलेले लैंगिक छळवणुकीचे अनुभव मी-टू चळवळीच्या माध्यमातून शेअर केले. आपल्या बॉलिवूडच्या तनुश्री दत्ता ह्या अभिनेत्रीने नाना पाटेकरांविरुद्ध आरोप केले.
मी-टू चळवळीमुळे अनेक प्रतिष्ठित पुरुषांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. भारतातही काही पत्रकारितेतील, सिनेसृष्टीतील उच्चपदस्थ स्त्रियांनी मी-टू च्या माध्यमातून आपले मन मोकळे केले. सोशल मीडियावर झालेल्या गदारोळानंतर काहींची चौकशी झाली, अनेकांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला, काहींचे राजकीय अस्तीत्वच धोक्यात आले. तक्रार करणाऱ्या महिलांना सहानुभूती मिळाली. उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. काहींनी पुरुषांना समर्थन दिले. तक्रार करणाऱ्या महिलांच्या हेतू बद्दल शंका घेतली गेली. परदेशामध्ये एका पीएचडी च्या विद्यार्थ्याने मी-टू च्या माध्यमातून त्याच्या एका प्राध्यापिकेबद्दल तक्रार केली. चौकशीअंती ती दोषी ठरून तिला दंडही भरावा लागला होता. त्यामुळे स्त्रिया देखील काही हेतू सध्या करण्याकरिता पुरुषावर अत्याचार करू शकतात, ही दुसरी बाजूही समोर आली. मग प्रश्न पडतो की अश्या परिस्थितीत कायद्याचा रोल काय?
अश्या ह्या अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या विषयावरील 'सेक्शन ३७५' हा उत्कृष्ठ चित्रपट परवा बघण्यात आला. मागच्याच आठवड्यात चित्रपटाचा टिझर ट्रेलर पाहण्यात आला होता, त्यावरून चित्रपटाच्या कथेचा अंदाज आला होता, पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर एक नितांत सुंदर कोर्टरूम ड्रामा बघितल्याचे समाधान मिळाले. मागील काळात अक्षयकुमारचा जॉली एल. एल. बी. नावाचा कोर्ट कचेऱ्याचा विषय असलेला चित्रपटपहिला होता. अर्थात जॉली एल. एल. बी. आणि 'सेक्शन ३७५' या दोन्हीही चित्रपटांची तुलना करणे योग्य होणार नाही. जॉली एल. एल. बी. काहीसा करमणूकप्रधान चित्रपट असून 'सेक्शन ३७५' वास्तवतेकडे झुकणारा आहे.
चित्रपटाची कथा तशी सरळ असली तरी गुंतागुंतीची पण आहे. फिल्म इंडस्ट्रीमधी प्रतिथयश दिग्दर्शक 'रोहन खुराना' (राहुल भट) त्याच्या प्रोडक्शन टीम मधील असिस्टंट कॉस्चुम डिझायनर असलेल्या 'अंजली डांगळे' (मीरा चोप्रा) वर बलात्कार करतो. बलात्कारित अंजली डांगळे पोलिसात तक्रार करते, आणि सुरवात होते ती एका कोर्टातील जबरदस्त नाट्याची. आरोपी रोहन खुराना ची बाजू 'तरुण सलुजा' (अक्षय खन्ना) हा हाय प्रोफाइल वकील मांडत असतो, तर पीडित अंजलीच्या बाजूने 'हिरल गांधी' (रिचा चड्ढा) लढत असते. या दोन्हीही वकिलांची रंगतदार लढत चालू असताना कोर्टात पोलिसांच्या तपासातील हलगर्जीपणा, व्यवस्थेतील ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार वगैरे आपल्या समोर येतो. या प्रकरणात खालच्या कोर्टात रोहन खुरानाला दोषी ठरवण्यात येऊन त्याला दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात येते. नंतर हे प्रकरण अपिलात हायकोर्टात जाते.
आरोपी हाय प्रोफाइल असल्यामुळे हायकोर्टातील कोर्टरूम ड्रामा सुरु असतानाच या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात उमटतात. बलात्कार पीडित अंजलीच्या बाजूने अनेक सामाजिक संस्था रस्त्यावर उतरतात. सोशल मीडियावर देखील अंजलीच्या बाजूने सहानुभूतीची लाटच येते. या परिस्थितीचा दबाव न्यायालयावर येतो. कोर्टातील सर्व साक्षी पुराव्यांची मांडणी, दोन्ही पक्षाच्या वकिलांच्या एकमेकांवरील कुरघोड्या चित्रपटात अतिशय वेधक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. यासाठी या चित्रपटाच्या संवाद लेखकाला पूर्ण मार्क्स द्यावेच लागतील. दोन्ही पक्षाचे वकील त्यांची बाजू इतक्या प्रभावीपणे मांडतात की प्रेक्षक पार गोंधळून जातो. आरोपीचा आपल्याला राग येतानाच 'कदाचित बलात्कार झालेली अंजली बलात्काराचा खोटा आरोप तर करत नाहीये ना?' अशी शंका यायला लागते. या चित्रपटाचा शेवट मात्र अनपेक्षित वळण घेतो. शेवटी अंजली डांगळेला न्याय मिळतो का? या लढाईत कोण जिंकतं? हे समजावून घेण्यासाठी आणि चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या अनपेक्षित धक्क्याची मजा अनुभवण्यासाठी 'सेक्शन ३७५' हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघण्यातच गम्मत आहे.
अशाप्रकारच्या कोर्टरूम नाट्यामधे सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे नाट्यमय संवादातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे. प्रेक्षक कथेबरोबर किती जोडले जातात याचं एक आव्हान दिग्दर्शकाबरोबरच संवाद लेखकासमोर असतं. चित्रपटाची सर्वच टीम ह्यात कमालीची यशस्वी झालेली आहे. अर्थात मला खटकलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटातील जवळजवळ सत्तर टक्के संवाद इंग्रजीतून आहेत. कदाचित इंग्रजीतील संवाद हे चित्रपटाची, कथेची अपरिहार्यता असू शकेल. पण त्यामुळे हा चित्रपट, त्यातील आशय समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचू शकणार नाही.
अक्षय खन्ना या गुणी अभिनेत्याने संपूर्ण चित्रपट व्यापला आहे. त्याने कमालीचा संयमित अभिनय केलाय. (दिल चाहता है ह्या चित्रपटात देखील त्याने कमाल केलीये) या चित्रपटात त्याने साकारलेला हायफाय वकील चित्रपट रसिकांच्या मनावर छाप उमटवून जातो. सरकारी वकील झालेली रिचा चड्ढा अक्षय खन्ना पुढे काहीशी झाकोळली गेली आहे. रिचा चड्ढा ने अभिनय व संवादफेक यात थोडी आधी मेहनत घेणे जरुरीचे होते. अर्थात त्यामुळे चित्रपटाच्या मूळ उद्देशाला फारसा धक्का बसत नाही. चित्रपटातील सहकलाकार राहुल भट आणि मीरा चोप्रा यांनी त्यांच्या भूमिका छान पद्धतीने साकारलेल्या आहेत. न्यायाधीशाच्या भूमिकेतील किशोर कदम आणि कृतिका देसाई या अनुभवी कलाकारांनी समाज माध्यमातून येणाऱ्या दबावामुळे आलेला ताण सुंदर अभिनयातून दाखवलाय. या चित्रपटात गाण्याला पूर्णपणे फाटा दिला गेला आहे. कथेला कुठेही भरकटू न देता दिग्दर्शक 'अजय बहल' प्रेक्षकांना कथेत कमालीचा गुंतवून ठेवतो.
मुळात बलात्कार, मग तो पुरुषाने केलेला असो किंवा क्वचित प्रसंगी स्त्रीने पुरुषावर केलेला अत्याचार असो, ह्या गोष्टी त्या स्त्रीपुरुषांच्या खाजगी अवकाशातच घडत असतात. त्यामुळे अश्या गुन्ह्यांना कायद्याच्या कक्षेत आणणे व गुन्हा सिद्ध करणे अतिशय कठीण काम. अशा गोष्टी कायद्याच्या चव्हाट्यावर आल्यास त्याला सामाजिक, राजकीय पदर फुटू लागतात. संमतीने किंवा जबरदस्तीने असलेले स्त्रीपुरुष संबंध कायद्याइतकेच तारतम्य, संवेदनशीलता, प्रगल्भता, नैतिकता, एकमेकांचा सन्मान या पातळीवर विचारात घ्यावे लागतात. असो...
चित्रपट
बघून घरी जाताना शेजारी गाडीत बराच वेळ गप्प बसलेली माझी बायको मला विचारात होती... "मी-टू आंदोलनात आरोप झालेले पुरुष खरंच दोषी असतील का हो?" मी निशब्द होतो. मनात विचारांचे काहूर माजले होते. डोक्यात अनेक प्रश्न मेंदू कुरतडत होते.
हा चित्रपट बघाच.
राजीव जतकर.
दि. १८-०९-२०१९.
No comments:
Post a Comment