सामान्य माणसातल्या घालमेलीची - 'डोंबिवली फास्ट'
'डोंबिवली फास्ट' या चित्रपटाची कथा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाची असून जो भ्रष्ट यंत्रणा, चुकीच्या गोष्टी एकट्याने बदलू शकत नाही. पण वाईट परिस्थिती बदलण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती मात्र ठेवतो. डोंबिवली फास्ट या चित्रपटाचा नायक 'माधव श्रीधर आपटे' (संदीप कुळकर्णी) नीतिमूल्यं जपणारा. जग हे स्वर्गसमान जरी होऊ शकलं नाही तरी त्याचा किमान नरक होऊ नये याच्यासाठी झटणारा असा आहे. एकटा माणूस संपूर्ण भ्रष्ट यंत्रणा जेंव्हा सुधारण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा काय होते त्याची अंगावर शहारे आणणारी कथा आहे. तत्वनिष्ठेने जगणारा माधव आपटे एका बँकेत नोकरी करत असतो. बायको (शिल्पा तुळसकर) आणि दोन मुलांबरोबर त्याचा मध्यमवर्गीय संसार सुरु असतो. कोणताही आपल्यासारखा सामान्य माणूस आणि माधव आपटे यांच्यात एक मूलभूत फरक असतो तो म्हणजे माधव आपटेला भ्रष्टाचार, बेईमानी, खोटेपणा या बद्दल कमालीचा राग असतो. त्यामुळे रोजच्या जीवनातील वाईट अनुभवांमुळे त्याची सतत चिडचिड होत असते. रोजच्या जीवनातील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध माधव आपटे 'हर हर महादेव' म्हणत उतरायचा. मिळेल तशी तलवार फिरवायचा. 'काही झालं तरी चुकीच्या गोष्टींना विरोध हा करायचाच' हा त्याचा बाणा !
माधवला
मुलांच्या शाळा प्रवेशासाठी डोनेशन देणे मान्य नाही. डोनेशन देणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे असे त्याचे म्हणणे. तसेच मुलांना शाळेत शिकवणाऱ्या त्याच विषयाच्या शिक्षकांकडे स्पेशल शिकवणी लावण्याला देखील त्याचा विरोध आहे. 'दहा रुपये एमआरपी असलेल्या शीतपेयाला दोन रुपये जास्त का द्यायचे'? असे खडसावून तो दुकानदाराला जाब विचारतो. दुसरीकडे माधवची बायको 'अलका' मात्र पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. ती परिस्थितीबरोबर जुळवून घेणारी गृहिणी आहे. मग या भ्रष्ट जगाशी एकट्यानेच लढताना माधव आपटे तरी कशी तग धरणार? पण तरी देखील माधव आपटे एकटा लढत राहतो. लढताना त्याच्या हातात चुकून क्रिकेटची बॅट येते, नंतर न कळत चाकू आणि मग शेवटी चक्क रिव्हॉल्व्हर... माधव आपटे सारखी तत्वनिष्ठ, प्रवाहाच्या विरोधात जाणारी माणसं समाजाला तरी कुठे हवी असतात? मग आपली भ्रष्ट यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी माधव आपटेच्या मागे लागते. शेवटी माधव आपटेच्या संघर्षाचं पुढं काय होतं? त्यात तो जिंकतो का? हे पडद्यावर पाहणं हा एक थरारक आणि सुन्न करणारा अनुभव आहे.
![]() |
'शिल्पा तुळसकर' |
माधव आपटेच्या भूमिकेत संदीप कुळकर्णी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बाजी मारून जातात. माधव आपटेची चिडचिड, रागीटपणा, घालमेल, हताशपणा, अगतिकता, घुसमट वगैरे त्यांनी कमालीच्या सफाईने दाखवली आहे. एका प्रसंगात ईश्वराशी संवाद साधताना संदीप कुलकर्ण्यांनी जो अभिनय केलाय त्याला तोड नाही. संदीप कुलकर्ण्यांच्या बरोबरीने तोडीस तोड अभिनयाची दाखल घ्यावीच लागते ती माधव आपटेची पत्नी असलेल्या अलका ची भूमिका करणाऱ्या 'शिल्पा तुळसकर' या चतुरस्त्र अभिनेत्रीची. तत्वनिष्ठ नवऱ्याच्या विक्षिप्त वागणुकीने त्रस्त झालेल्या पत्नीची घुसमट तिने कमालीची सुंदरपणे साकारली आहे. पतीबद्दल वाटणाऱ्या रागाबरोबरच पतीची वाटणारी काळजी देखील तिने समर्थपणे दाखवली आहे. तिच्या संसाराच्या रोजच्या रहाटगाडग्याची लगबग बघताना स्त्री प्रेक्षकवर्ग तिच्याबरोबर न कळत एकरूप होतो.
![]() |
इन्स्पेक्टर ची भूमिका करणारे 'संदेश जाधव' |
या कथेतील पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका करणारे 'संदेश जाधव' भाव खाऊन जातात. त्यांनी साकार केलेला इन्स्पेक्टर सुभाष अनासपुरे आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतो. सुभाष अनासपुरे हा एक संवेदनशील पोलीस अधिकारी असून माधव आपटेची घुसमट, संघर्ष जाणून आहे. पण कर्तव्यापुढे तो मजबूर आहे. हा इन्स्पेक्टर भ्रष्ट समाज व्यवस्थेचा एक भाग आहे आणि एक बळी देखील. संदेश जाधवांनी ही भूमिका साकारताना अक्षरशः आपला जीव ओतला आहे. संदेश जाधवांची ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्वाची आणि श्रेष्ठ भूमिका ठरावी.
![]() |
संवाद: संजय पवार |
संवाद लेखन हा या चित्रपटाचा प्राण आहे. संजय पवारांनी लिहिलेले संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, प्रेक्षकांच्या थेट हृदयाला जाऊन भिडतात. एका सुनसान रात्री ईश्वराशी संवाद साधताना, स्वतःशीच बोलताना माधव आपटे म्हणतो “आम्हाला ना हव्यास जडला. अधिक जास्तीचा हव्यास. अंगण, वावर पुरेना. मग नोकरी, धंदे सुरु झाले. नोकरीत पगार पुरेना. धंद्यात नफा पुरेना. मग तो मिळवणं सुरु झालं. पगारवाढीसाठी संप, दमदाट्या, मोर्चे.. नफा वाढवण्यासाठी खोटेपणा, चिरीमिरी, चोरी... शेवाळं वाढतच गेलं. दलदलीत फसत गेला सगळं. मी छान लिहायचो, चित्र काढायचो. मग पैसे हवेत, स्थिरता हवीये म्हणून बँकेत.. बी.कॉम पर्यंत शिकलो, एव्हढं वाचलं, पण पुढं काय तर, लेजर लिहा, परिपत्रके लिहा... जेव्हडा न्हायलो आधी, तेव्हडाच कोरडा होत गेलो नंतर.. थेंब सुद्धा शिल्लक राहिला नाही ओलाव्याचा... एकाकडून एकीकडे एकटं यायचं, एकटं जायचं, पण मग मध्ये हा जीवघेणा प्रवास. अरे मग हा प्रवास सरळ नको का? मनासारखा नको का? अरे.. ठरवलंय ना सर्वांनी.की नियम करायचे, पाळायचे. मग मोडायची घाई का? सगळ्यांनी मिळून खायचं? का सगळ्यांचं आपणच खायचं?” भयानक वेगानं आपल्यावर येऊन आदळणारे हे माधव आपटेचं स्वगत आपल्याला अस्वस्थ करतं. आपण सुन्न होऊन जातो. एका प्रसंगात माधव म्हणतो "ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्या प्रश्नांवर फुली मारायची आणि पुढं जायचं. जे प्रश्नाचं तेच माणसांचं. मान मोडून जगताना एखाद्यानं मान वर केली तर ती आधी खाली दाबायची आणि तरीही नाही नमला तर मुरगाळूनच टाकायची?"
निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 'मुंबई मेरी जान', 'दृष्यम' यासारखे जबरदस्त यशस्वी हिंदी चित्रपट त्यांच्या खात्यावर जमा आहेत. सामान्य माणसाची भ्रष्ट यंत्रणेविरुद्धची लढाई आजपर्यंत अनेक चित्रपटातून दाखवली गेली आहे. पण अनेक वैषिठ्यपुर्ण मांडणीमुळे, कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे 'डोंबिवली फास्ट' हा चित्रपट वेगळा उठून दिसतो. चित्रपट संपल्यावर बराच काळ अनेक अनुत्तरित प्रश्न आपल्याला भेडसावीत राहतात. आपण अस्वस्थ होत राहतो.
प्राईम
व्हिडीओ वर उपलब्ध असलेला हा चित्रपट 'मस्ट वॉच' या प्रकारातला आहे. बहुतेक जणांनी पहिला असेलच. ज्यांनी पहिला नाही त्यांनी पहावाच.
राजीव जतकर
भ्रष्टाचार नदीला महापूर आलेल्या प्रवाहासारखा आहे आणि त्या महापूर प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे असामान्य कर्तृत्व आहे...
ReplyDelete्खुप सुंदर समिक्षण केले आहे. असेच लिहित रहा. शुभेच्छा.
ReplyDeleteमित्रा, खूपच छान आणि ओघवत्या भाषेत लिहिले आहेस.
ReplyDeleteचित्रपट समीक्षेची नवी वाटचाल सुरू होणार. त्यासाठी तुला शुभेच्छा
उत्तम रसग्रहण!
ReplyDelete