Saturday, 27 April 2019

लहरी पावसाला हासडलेली शिवी: गाभ्रीचा पाऊस.


लहरी पावसाला हासडलेली शिवी: गाभ्रीचा पाऊस.


आपल्यासारख्या शहरी लोकांच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे एक नयनरम्य हंगाम, उल्हसित करणारा, उन्हाळ्याची दाहकता शीतल करणारा, या सुंदर पावसाळ्यात कवी, शायर मंडळींच्या कवीमनाला धुमारे फुटतात. त्यांना काव्य स्फुरतं. पावसाळा म्हणजे पाचूसारखी हिरवीगार शेतं ल्यालेली धरित्री, पावसाळा म्हणजे आसमंतात भरून जाणारा तो ओल्या मातीचा सुगंध. तापलेल्या उन्हाळ्यानंतर पावसाचा तो सुरेख, सुखद गारवा. डोंगरदऱ्यांमधून ओघळणारे पांढरेशुभ्र पाण्याचे ओघळ. छोटे मोठे धबधबे. ह्या पावसाळ्याचा अनुभव घेण्यासाठी शहरी लोकांसाठी जवळपासच्या रम्य परिसरात सहली काढण्यासाठी पर्वणीच... 

पण कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात असाही काही दुष्काळी भाग आहे, जिथे पाऊस म्हणजे जीवनमरणाचा भाग असतो. फार लांब कशाला पण आपल्या महाराष्ट्रात देखील विदर्भ मराठवाड्यातील भागात अतिशय तीव्र दुष्काळ असतो. या दुष्काळी भागातील शेतकरी मंडळी पावसाकडे डोळे लावून बसलेली असतात. उन्हाळ्यात जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असते. विहिरी कोरड्या पडलेल्या असतात. मग पूर्णपणे रामभरोसे असलेल्या पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर स्वप्ने तरी काय बघायची? बारा महिने तेरा काळ कर्जत बुडालेल्या शेतकऱ्यांवर आणि त्याच्या कुटुंबियांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येते. मग अशा वेळी नैराश्येतून शेतकरी मृत्यूला जवळ करतो. खडतर जीवनापेक्षा मरण अधिक सोपे वाटू लागते. मृत्यू मुळे त्या शेतकऱ्याचे स्वतःचे प्रश्न एकदम सुटतात खरे पण  इतर प्रश्न उभे राहतात. या शेतकऱ्यांचं नशीब थेट वेळी अवेळी पडणाऱ्या किंवा पडणाऱ्या पावसाशी जोडलेलं असतं.  'गाभ्रीचा पाऊस' हा चित्रपट विदर्भातल्या एका छोट्या दुष्काळी खेड्यात राहणाऱ्या कृष्णा नावाच्या दुष्काळपीडित शेतकऱ्याची वास्तव कथा आपल्या पुढे हुबेहूब उभी करतो. दुष्काळपीडित शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांच्या प्रश्नांना गंभीरपणे हात  घालतो. आपल्यासारख्या सुखासीन शहरी प्रेक्षकांना अस्वस्थ करतो, विचार करायला भाग पडतो. 'कधीही पूर्ण होणाऱ्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास' हा या चित्रपटाचा गाभा आहे.
 
कृष्णा च्या भूमिकेत गिरीश कुलकर्णी 
विदर्भातल्या 'जळू' नावाच्या एका छोट्या खेड्यात कृष्णा नावाचा (गिरीश कुलकर्णी) हा शेतकरी आपल्या वयस्क आई, आणि पत्नी अलका (सोनाली कुलकर्णी), आणि मुलासमवेत राहत असतो. घर म्हणजे मातीनं बांधलेलं एक छोटंसं खोपटच. दारिद्र्य आणि कर्ज पाचवीलाच पुजलेलं. चित्रपटाच्या सुरवातीलाच कृष्णाचा एक शेतकरी मित्र भास्कर दुष्काळाला कंटाळून गळ्याला फास लावून आत्महत्या करतो. वर्षानुवर्षे पडणारा दुष्काळ, सलग दोनतीन वर्षे पडलेला पाऊस, सावकाराचं वाढत जाणारं करंज, विजेचा भरता येणारं प्रचंड बिल या गोष्टींचा भास्कर हा बळी आहे. भास्कर सारखीच परिस्थिती कृष्णाची देखील आहे. त्यामुळे कृष्णाच्या म्हाताऱ्या आईला (ज्योती सुभाष), पत्नी अलकाला ' कृष्णा देखील आत्महत्या करेल' अशी भीती वाटू लागते. मग कृष्णाला अश्या परिस्थितीत नैराश्य येऊ नये म्हणून त्या दोघीही प्रयत्न करू लागतात. कृष्णाला जीवनाविषयी उर्मी मिळावी, त्याचा जीवनातला उत्साह टिकून राहावा म्हणून त्या प्रयत्न करतात. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ नयेत म्हणून त्या कृष्णाला एकटे सोडेनाशा होतात. त्याच्यावर त्या लक्ष ठेऊ लागतात. सणवार नसताना त्याला गोडधोड खाऊ घालतात.
 
कृष्णा आणि त्याची आई 
अर्थातच आत्महत्या वगैरे असलं काहीही डोक्यात नसलेला कृष्णा मात्र सातत्यानं शेतीतील कामं  गुंतलेला. पावसाळा जवळ आलेला असल्यानं नवीन बियाणं आणणं, त्याची पेरणी, खुरपणी वगैरे कामात तो गुंतलेला. एका रात्री वळवाच्या धोधो पडलेल्या पावसात त्याचं शेत, त्यात पेरलेल्या बियाणांसकट पार वाहून जातं. या अवेळी आलेल्या पावसाने सर्व मेहेनतीवर पाणी पडतं. त्या रात्री कृष्णा लहरी पावसाला संतापाने शिवी हासडतो 'गाबडीचा पाऊस'. पावसाबद्दलचा संताप, झालेल्या नुकसानीबद्दलची निराशा अशा संमिश्र भावनांसोबत तो ती रात्र काढतो. पण हा पठ्या डगमगता पुन्हा खटपटी करत दुबार पेरणीची तयारी करतो. बियाणांसाठी बायको अलका त्याला स्वतःच्या अंगावरचे दागिने काढून देते. बँकेतून कर्ज काढून कृष्णा शेतातील खोल गेलेल्या, कोरड्या विहिरीत बोअर खणतो थोडे पाणी मिळवतो. जीवनाच्या ह्या जीवघेण्या संघर्षात कृष्णा त्याचे कुटुंबीय यशस्वी होतात का? या कुटुंबाचे पुढे होते? त्याची शेती पिकते का? यासाठी हा अप्रतिम चित्रपट पडद्यावरच पाहावा लागेल...
 
कृष्णा आणि त्याची पत्नी (सोनाली कुलकर्णी)
अभिनयाच्या आघाडीवर गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष आणि सोनाली कुलकर्णी या तीन जबरदस्त कलाकारांनी अक्षरशः कमाल केली आहे. मागच्याच आठवड्यात प्राईम व्हिडिओवर गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष यांच्या भूमिका असलेला 'वळू' हा चित्रपट पहिला होता आणि आज गाभ्रीचा पाऊस ! निसर्गाच्या अवकृपेमुळे वैतागलेला, निराशेच्या आणि हिमतीच्या मध्ये लंबकाप्रमाणे लोंबकळणाऱ्या कृष्णा ची भूमिका गिरीश कुलकर्ण्यांनी कमालीच्या तन्मयतेने साकारली आहे. अवकाळी पावसानंतर शेतातली माती कुरवाळत मूकपणे अश्रू ढाळणाऱ्या कृष्णाकडे बघताना आपल्या अंगावर अक्षरशः शहारे येतात. कंठ दाटून येतो. गिरीश कुल्कर्ण्यांसारखा अभिनेता मराठी चित्रपट सृष्टीला लाभलाय हे आपलं भाग्यच !  
 
कृष्णच्या आईच्या भूमिकेतील ज्योती सुभाष. 
पूर्वी तीस एकर जमिनीची मालकीण असणारी, पण वर्षानुवर्षाच्या दुष्काळामुळे आता अवघ्या सात एकर राहिलेल्या जमिनीची मालकीण असणाऱ्या म्हाताऱ्या आईची  भूमिका 'ज्योती सुभाष' या बुजुर्ग आणि अनुभवी अभिनेत्रीने कमालीच्या जबाबदारीने सादर केली आहे. प्रायोगिक, हटके मराठी चित्रपट प्रकारातील कलाकृतीत 'ज्योती सुभाष' या गुणी अभिनेत्रीचे नाव आघाडीवर आहे. एका हृदयद्रावक प्रसंगात या अभिनेत्रीने कृष्णाच्या नावाने फोडलेला हंबरडा आपले पिळवटून टाकतो. हा प्रसंग पाहताना प्रत्येक वेळी मला अस्वस्थ व्हायला होते. डोळ्यात अश्रू दाटून येतात



'पती नैराश्याच्या गर्तेत जाऊ नये' म्हणून पतीचा मूड सांभाळणारी कृष्णाच्या पत्नीची भूमिका 'सोनाली कुलकर्णी' यांनी अगदी सहजतेनं केली आहे. बियाणांच्या खरेदीसाठी अंगावरचे दागिने काढून देणारी पत्नी, पतीची काळजी घेणारी, पतीला जगण्यासाठी उर्मी देणारी असे अनेक अभिनयाचे कंगोरे असलेली भूमिका सोनाली कुलकर्णी अतिशय सहजतेनं करतात. या व्यतिरिक्त वीणा जामकर (आत्महत्या केलेल्या भास्कर या शेतकऱ्याची पत्नी) अमानुल अत्तार (कृष्णाचा लहान मुलगा) वगैरे कलाकार त्यांच्या भूमिका अक्षरशः जगले आहेत. कोणतीही भूमिका साकार करताना लागणारी सहजता हे या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं वैशिष्ठ्य आहे.
 
आत्महत्या केलेल्या भास्करची पत्नी: वीणा जामकर 
संगीतकार दत्तप्रसाद रानडे यांची या चित्रपटातील गाणी लोकसंगीताचा बाज असलेली आहेत. 'मंगेश धाकडे' यांचं पार्श्वसंगीत या चित्रपटाची दाहकता, परिणामकारकता वाढवतं. 'दासू' यांनी लिहिलेली गीते 'विठ्ठल उमप', 'अजय गोगावले'(संगीतकार अजय-अतुल मधले), भाग्यश्री अभ्यंकर आणि मधुराणी गोखले-प्रभुलकर (ह्या गातात हे मला माहिती नव्हतं) यांनी अप्रतिम गायली आहेत. छायाचित्रण, संकलन, वेशभूषा अशा आघाड्यांवरील कामगिरी उत्तम आहे. 'प्रशांत पेठे' यांनी या चित्रपटाची निर्मितीची बाजू सांभाळलेली असून 'सतीश मनवर' यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.   
कृष्णाचा मुलगा: अमानुल अत्तार 
हा चित्रपट मला आवडण्याची बरीच कारणे आहेत. माझा जन्म आणि बरंचसं बालपण सोलापूर सारख्या दुष्काळी भागात गेलंआहे . सोलापूर जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या खेड्यातून मी  राहिलेलो आहे, शिकलेलो आहे. चित्रपट बघताना क्षणोक्षणी मला त्यातील बारकावे जाणवत होतेकृष्णाच्या उजाड शेतातून येणारे गरम हवेचे झोत मला वातानुकूलित चित्रपटगृहात देखील जाणवत होते. कृष्णाच्या घरात मला शेणाने सारवलेल्या भिंतींचा सुवास येत राहिला. कृष्णाची पत्नी स्वयपाक करताना चुलीच्या धुराचा आणि भाकरीचा खमंग वास मला चक्क चित्रपट बघताना आलागावातील उजाड रस्त्याने जाणारे शेळ्या मेंढ्यांचे कळप, शेतातील नांगरणी, पेरणी करणारी बैलजोडी, तसेच रात्रीचे ते अंगणात बाजेवरचे उघड्यावर झोपणे, सकाळी अंगणात राखुंडीने दात घासणे, लहानपणी आंब्याच्या कोयी एकमेकांवर आपटत, नेम धरून जिंकणे  हे सर्व मी जगलोय. लहानपणी अनुभवलेल्या जाणिवांचा मला कळत पुनर्प्रत्यय येत होता. त्यामुळेच की काय मी या चित्रपटाच्या अंतरंगात बुडून गेलो, आणखीन आणखीन गुंतत गेलो.     

 


ह्या चित्रपटाच्या नावाचा सुरवातीला काहीच अर्थबोध होत नव्हता. चित्रपट बघताना एकदम लक्षात आले, अरे.. गाभ्रीचा ही तर शिवी आहे. लहानपणी आम्ही एखाद्याला हरामखोर अशा अर्थाने किंवा यावेळी आलेल्या कुणा आगंतुकाला 'गाबड्या' अशी शिवी द्यायचो. खरं तर गाबडीचा (पाऊस) अशा शिवीचं नामांतर गाभ्रीचा (पाऊस) असं निर्माते, लेखक-दिग्दर्शक यांनी का केलं असावं ते कळत नाही. अजूनही विदर्भ-मराठवाड्यातील खेड्यातगाबड्या’ किंवागाबडीच्या’ ही  शिवी प्रचलित आहे.

कुठल्याही झगमगाटाचा लवलेशही नसलेला हा चित्रपट अतिशय वास्तव परिस्थितीचे चित्रण करणारा आहे. ह्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम जिवंत आहे. संपूर्ण चित्रपटात एकप्रकारचा तणाव जाणवत राहतो. शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाईला लागणाऱ्या भीषण विलंबाचं वास्तव दाहकपणे हा चित्रपट दाखवतो. शेतकऱ्यांच्या शेती करताना कराव्या लागणाऱ्या खर्चाचे आणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नाचं अर्थशास्त्र पाहून आपण चक्राऊन जातो.

हा चित्रपट 'प्रत्येकाने बघावाच' असा आहे. प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे. नक्की बघा.

राजीव जतकर.