Monday, 18 June 2018

'डोन्ट मिस द 'मिसिंग'


'डोन्ट मिस 'मिसिंग'


माणूस हा मुळातच सर्जनशील किंवा क्रिएटिव्ह... त्यातच चित्रपटासारखे सशक्त माध्यम त्याच्या हातात पडताच तो सुटलाच ! चित्रपटातील छायाचित्रण, संवाद लेखन, गीतलेखन, संगीत, कथालेखन अशा विविध माध्यमातून तो आपली सर्जनशीलता व्यक्त करू लागला. कथालेखकांचे मला फार आकर्षण आहे. मला कथालेखकांच्या कल्पनाशक्तीचे खूप आश्चर्य वाटते. एखादी दोनपाच ओळीत संपेल अशी कथा, तब्बल दोन अडीच तासात रंगवून सादर करणे, ते ही प्रेक्षकांना कंटाळा येईल अशा पद्धतीने सादर करणे हे वाटते तितके सोपे नाही. कथेची उत्कंठा वाढवत, प्रेक्षकांना कथेत गुंतवून टाकणे हे कर्मकठीण काम कथालेखक आणि दिग्दर्शक मंडळी लीलया करत असतात.  कथालेखन आणि दिग्दर्शन अश्या दोन्हीही पातळ्यांवर कमालीची कामगिरी करत 'मुकुल अभ्यंकर' यांनी 'मिसिंग' हा रहस्यमय थ्रिलर चित्रपट सादर केलाय. मिसिंग ची रहस्यमय कथा प्रेक्षकांना अक्षरशः धक्के देत पुढे सरकते...  
  
*** सुशांत दुबे (मनोज वाजपाई) हा तसा कुटुंबवत्स, मध्यमवर्गीय गृहस्थ. त्याला एक छोटी मुलगी आहे. असं असलं तरी थोडा जास्तच रोमँटिक श्रेणीतील पुरुष. आजूबाजूच्या सुंदर स्त्रिया हा त्याच्या आवडीचा विषय. माफक फ्लर्ट करायला त्याला आवडतं. थोडक्यात हे महाराज 'घरात मॅरीड, बाहेर बॅचलर'. त्यामुळे त्याची पत्नी कामया त्याच्याबाबतीत संशयी बनलेली असते. एकदा कंपनीच्या कामानिमित्त सुशांत मॉरिशस ला जायला निघतो. पतीवर विश्वास नसल्याने कामया मॉरिशसला बरोबर जाण्याचा हट्ट धरते. 'कंपनीचे काम असल्याने कुटुंबियांना बरोबर नेता येणार नाही' असे सुशांत खूप समजावून सांगतो. पण कामया रुसून बसलेली असते. कामयाचा चेहेरा या प्रसंगात दिसत नाही.


***  मध्यरात्री एक च्या सुमारास श्रीमान, श्रीमती दुबे एका मोठ्या प्रवासी बोटीतून मॉरिशस मध्ये उतरतात. एका आलिशान रिसॉर्ट मध्ये त्यांचे बुकिंग केलेले असते. मात्र सकाळी सहा वाजता त्यांच्या असे लक्षात येते कि त्यांची 'तितली' नावाची तीन वर्षाची मुलगी गायब आहे. मग काय सुशांत, रिसॉर्ट मधील व्यवस्थापक, कर्मचारी यांची 'तितली' ला हुडकण्यासाठी धावाधाव सुरु होते. पण ती मिळत नाही. सुशांत ची पत्नि नाईलाजाने आपल्या मुलीची, तितली ची मिसिंग केस मॉरिशस पोलिसांकडे सोपवते.

***  आता मधेच एक फ्लॅशबॅक: वास्तविक सुशांत कामया ला कसेबसे समजावून एकटेच एका मोठ्या प्रवासी बोटीने मॉरिशस ला जायला निघतो. बोटीवरील त्याच्या केबिन मध्ये त्याची अपर्णा (तब्बू) नावाच्या सुंदर महिलेशी गाठ पडते. या अपर्णाला 'तितली' नावाची तीन वर्षाची एक मुलगी असते. ही 'तितली' काहीशी आजारी असल्याने झोपूनच असते. अपर्णाचा नवरा आणि अपर्णा यांच्यात बेबनाव असल्याने अपर्णा घरातून बाहेर पडलेली असते. प्रवासात खूप गप्पा होतात. जवळीक वाढते. सुशांत च्या मनात सुस्वरूप अपर्णा बद्दल निर्माण झालेल्या करुणेबरोबरच प्रेमाची (की वासना) भावना होते. सुशांत अपर्णाला मदतीचा हात पुढे करतो, आणि तो या अनोळखी मायलेकींना आपल्या बरोबर रिसॉर्टमध्ये राहायला येतो. अर्थातच त्याबद्दल या पट्ठ्याने आपल्या बायकोला कामयाला अंधारात ठेवलेले असते.  


*** आता पोलिसांची चौकशी सुरु होते. 'रामखिलवान बुद्दू (अन्नू कपूर) आणि त्याचे सहकारी सुशांत आणि अपर्णाला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतात. सुशांत एक खोटे लपवता लपवता अनेक खोटी उत्तरे पोलिसांना देऊ लागतो. त्याला आपण 'अनोळखी अपर्णा बरोबर' रिसॉर्ट मध्ये राहतो आहोत हे स्वतःच्या बायकोपासून लपवायचे असते. खोटे बोलण्याच्या दलदलीत तो फसत जातो. पोलिसांचा संशय बळावत जातो.  पुढे या रहस्यकथेत अनेक वळणे येतात. अनेक धक्के देत चित्रपट शेवटाकडे जातो. शेवटी 'तितली' पोलिसांना सापडते का? सुशांत खोटेपणाचा दलदलीतून बाहेर येतो का? खरे गुन्हेगार कोण असतात? ते सापडतात का? याची उत्तरे आपल्याला प्रत्यक्ष चित्रपट बघूनच मिळवायला हवीत.

धक्कातंत्र हा 'मिसिंग' या चित्रपटाचा पाया आहे. प्रेक्षकच काय पण कथेतील 'रामखिलवान बुद्दू' हा पोलीस अधिकारी देखील कथेतल्या वळणांनी, धक्क्यांनी सुन्न होतो. या चित्रपटात मनोज वाजपाई, तब्बू, अन्नू कपूर या सारखे मातब्बर, कसलेले कलाकार असल्याने चित्रपट एका वेगळ्याच पातळीवर जातो. काली प्रसाद, नवीन कौशिक, व्ही. एम. बडोला, राजेश जैस वगैरे सहकलाकार आपापली भूमिका समरसून करतात. एम.एम. क्रीम (की करीम?) यांचे पार्श्वसंगीत रहस्यमय कथेला पूरक असंच आहे.


रहस्यमय थ्रिलर या प्रकारातला 'मिसिंग' हा चित्रपट 'दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं' या म्हणीची सतत जाणीव करून देत आपल्याला फसवत राहतो.  हा चित्रपट माझ्याकडून कसा मिस झाला कुणास ठाऊक? पण काल प्राईम व्हिडीओ वर पहिला आणि चित्रपटाबद्दल माझ्या मनातलं लिहायला बसलो. मी काही चित्रपट समीक्षक वगैरे नाही. समीक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर चित्रपटात चिक्कार चुका, उणिवा आहेत. तरीदेखील 'चुकवु नये असं काही' या प्रकारातला हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा  म्हणून हा लेखप्रपंच ! या चित्रपटाच्या कथेतील अनेक उणीवांकडें, चुकांकडे साफ दुर्लक्ष करा. आणि  या चित्रपटाच्या कथेत स्वतःला पूर्णपणे गुंतवून घ्या, आणि चित्रपटाचा आनंद लुटा.

राजीव जतकर.

No comments:

Post a Comment