Monday, 19 March 2018
Monday, 5 March 2018
'लंडन डायरी'
'लंडन डायरी'
२३ जुलै २०१७.
आज पहाटे ५:२५ वाजता मुंबईहून आमच्या विमानाने कुवेत कडे झेप घेतली. आमच्या विमानाची तिकिटे बुक करणाऱ्या माझ्या मित्राने कुवेत एअरलाईन्स बद्दल फारसे काही चांगले सांगितले नव्हते. त्यामुळे थोडया साशंक मनानेच विमानात बसलो होतो. पण वेळेची तत्परता, मस्त जेवण, आणि सर्वच बाबतीत चांगली सेवा यामुळे आमचा प्रवास सुखाचा झाला.
लंडनच्या 'हीथ्रो' विमानतळावर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी (म्हणजे भारतीय वेळेनुसार साधारणपणे संध्याकाळचे ७ वाजून ३० मिनिटांनी) पोहोचलो. कागदपत्रांची तपासणी, बॅग्स ताब्यात घेऊन आम्ही बाहेर पडलो. हर्षवर्धन आणि अनुजा आम्हाला न्यायला विमानतळावर येणार होते, ते दिसेनात. मी मोबाईल करायचा प्रयत्न केला पण फोन लागेना. वास्तविक मी माझ्या मोबाईलवर 'इंटरनॅशनल रोमिंग ची सुविधा घेतली होती. पण काहीतरी झोल होता. दोघांचाही फोन लागत नव्हता. आम्ही थोडे काळजीत पडलो. आता काय करावे ह्याविचारात असताना दोघेही दिसले आणि जीव भांड्यात पडला. आम्ही निर्धास्त झालो.(असं काही घडल्याशिवाय प्रवासाची मजाही वाढत नाही, नाही का?) असो...
एअर पोर्टच्या लगेचच बाहेर मेट्रो रेल्वेचे स्टेशन आहे. (इकडे मेट्रो ला ट्यूब म्हणतात. लंडनच नव्हे तर संपूर्ण युरोपमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट कमालीचा सोयीचा असतो. लंडनमध्ये जमिनीखालून असणाऱ्या या ट्यूब चे प्रचंड जाळे तयार करण्यात आले आहे. काही भागात हि ट्यूब जमिनीवरूनही धावते.) ट्यूब मधून आम्ही कॅम्डेन या लंडन शहराच्या जवळच असलेल्या उपनगरात असलेल्या हर्षवर्धनच्या घरी गेलो.
वास्तविक हे हर्षवर्धनच्या कॉलेज चे हॉस्टेल आहे. पण खूप छान आहे. एक छोटे खानी फ्लॅट आहे. इथे माध्यम आकाराच्या दोन खोल्या आहेत. हॉस्टेल च्या कॅम्पस मधील एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. स्वयंपाकघर सर्व सोयींनी परिपूर्ण आहे.
संध्याकाळी कॅम्डेन रोड वर फेरफटका मारायला बाहेर पडलो. लंडन च्या नॉर्थवेस्ट ला असलेले कॅम्डेन हे लंडनचे उपनगर म्हणता येईल. लंडन हे मुंबई प्रमाणे अति गर्दीचे महानगर आहे. कॅम्डेन हे तुलनेने खूपच शांत, खूप कमी गर्दीचे उपनगर आहे. कमी रहदारी, प्रशस्त रस्ते, विस्तीर्ण उद्याने, प्राणी संग्रहालये या भागात आहेत. सगळीकडे छोटी बसकी, कौलारू घरे आहेत.
आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे आमच्या भरपूर गप्पा सुरु होत्या. हवेत सुखद गारवा होता. ढगाळ वातावरण होते (जे इथे नेहेमीच असते) घरी आल्यावर अनुजाने केलेल्या मस्त जेवणावर ताव मारला. पुढे महिनाभर लंडन मध्ये काय काय बघायचे, या बद्दल च्या गप्पा मारत आम्ही झोपेच्या अधीन झालो..
लंडन डायरी
२४ जुलै २०१७.
सुप्रभात लंडन: कॅम्डेन लॉक
रात्री उशिरा झोपून देखील पहाटेच जाग आली. (वाढत्या वयाचे लक्षण,दुसरे काय?) मॉर्निंग वॉक साठी कालच अनुजाने जवळचे एक ठिकाण दाखवून ठेवले होते. 'कॅम्डेन लॉक' !
इथे पहाटे पाच वाजल्यापासूनच उजाडते आणि रात्री नऊ वाजता मावळते. वाटेवर सतत ढगाळ असल्याने सूर्याचा अंदाजच येत नाही. सकाळी सात वाजता मी आणि अलका फिरायला बाहेर पडलो. इथले अजून एक वैशिठ्य म्हणजे सतत वाहणारे थंडगार बोचरे वारे! वाऱ्यामुळे इथली थंडी जाम झोंबते. वास्तविक इथे सध्या उन्हाळा चालू आहे. पण तापमान अंदाजे १२ ते १५ डिग्री सेंटीग्रेड. इथे सूर्यदर्शन दुर्मिळच. त्यामुळे ऊन पडले कि लंडनवासीय आनंदाने वेडेपिसे होतात. मग ऊन खायला सगळे बाहेर पडतात. मग सहली, डान्स, म्युझिक, ऑपेरा फेस्टिवल्स ना अगदी ऊत येतो. असो...
घरासमोरून जाणाऱ्या कॅम्डेन रोड वरून चालत चालत जवळच असलेल्या पुलाजवळ असलेल्या पायऱ्या उतरून कॅम्डेन कॅनॉल च्या कडेने जाणाऱ्या रस्त्यावरून चालू लागलो. लंडन आणि उपनगरांमध्ये अशा कालव्यांचे जाळे पूर्वीच्या काळी करण्यात आले होते. पाणी पुरवठ्याबरोबरच सामानाची यातायात करण्यासाठी या कालव्यांचा उपयोग होत असे. जमिनीच्या चढ उताराचा अभ्यास करून कालव्याच्या ठराविक अंतरावर कालव्याचे पाणी अडवण्यासाठी अजस्त्र आकाराचे लाकडी दरवाजे करण्यात आले आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध किंवा प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी या दरवाजांच्या मदतीने पाण्याचा प्रवाह अडवून पाण्याची पातळी वाढवली जाते किंवा कमी केली जाते आणि बोटींची यातायात सहज होते. या अजस्त्र दरवाज्यांना 'लॉक्स' म्हणतात.
या कालव्याच्या दुतर्फा स्वच्छ रस्ते आहे. इथे सकाळचा फेरफटका मारणारे वयस्क, जॉगिंग करणारे तरुण दिसत होते.अर्थात खूप सकाळ असल्याने गर्दी फारशी नव्हतीच. एव्हड्या बोचऱ्या थंडीत व्यायामामुळे तरुण मंडळी घामाघूम होत होती. हे प्रसन्न वातावरण अनुभवत आम्ही तासभर चालत राहिलो. मग परतताना एव्हढाच वेळ लागणार हे लक्षात येऊन आम्ही माघारी फिरलो. सकाळच्या फिरण्याने आणि बंगल्या वातावरणाने मन प्रसन्न झाले. आता रोज सकाळी इकडेच फिरायला जायचे से मनोमन ठरवून आम्ही नऊ वाजता परत घरी आलो. अनुजाचा आजचा प्लॅन तयार होता...
'लंडन डायरी'
२४ जुलै २०१७.
ट्रॅफल्गार स्क्वेअर, 'साऊथ बँक क्वीन्स वॉक' वगैरे...
सकाळी कॅम्डेन लॉक चा मॉर्निग वॉक घेऊन आम्ही घरी आलो तेंव्हा अनुजाने आज कुठं जायचे, काय पाहायचे याची आखणी करूनच ठेवली होती. छोट्या छोट्या चिठ्यांवर ठिकाणे लिहून त्या चिठ्या भिंतीवर चकटवुन ठेवल्या होत्या.
त्यातील आजची चिठ्ठी काढून ती म्हणाली 'आज आपण क्वीन्स वॉक करणार आहोत.' साधारण पाच ते सात किलोमीटर चालायचंय. पण तुम्हाला खूप मजा येईल. या वॉक दरम्यान खूप प्रसिद्ध ठिकाणे तुम्हाला बघता येतील.' या वॉक बद्दल आम्ही ऐकले होतेच. खूप उत्सुकता होती.
सकाळी भरपेट नाश्ता करून आम्ही घराबाहेर पडलो. हर्षवर्धनला कॉलेज होते. तो सकाळीच कॉलेजला गेला होता. मी, अलका आणि अनुजा २९ नं. च्या बसमध्ये चढून (लंडन ची जगप्रसिद्ध डबलडेकर बस) ट्रॅफल्गार स्क्वेअर कडे निघालो. कॅम्डेन नंतर वेस्टएंड भागातून पुढे जाताना ब्लूम्स बेरी या भागातील हर्षवर्धन च्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन वरून आम्ही पुढे गेलो. अर्ध्या तासाने ट्रॅफल्गार या अतिभव्य चौकात आम्ही उतरलो.
ट्रॅफल्गार चौकाची भव्यता शब्दात सांगणे खरंच खूप अवघड आहे. या चौकाचा आकार अति विशाल असून इथे लंडन शहरातुन चारीही दिशेने येणारे प्रमुख रस्ते मिळतात. विस्तीर्ण आणि अतिभव्य अशा या चौकाच्या मध्यभागी प्रचंड उंच असा स्तंभ आहे. या स्तंभावर 'नेल्सन' या सतराव्या शतकातल्या महान दर्यावर्दी चा पुतळा आहे. खरं तर अगदी १८२५ पर्यंत हा चौक अस्तित्वातच नव्हता. पण चौथ्या विल्यम राजानं या महान दर्यासारंग 'नेल्सन च्या स्मरणार्थ स्मारक उभं करायचं ठरवलं आणि या भागाचा जणू कायापालटच झाला. अर्थात विल्यम राजाचं हे स्वप्न पूर्ण व्हायला पुढे जवळजवळ पंचवीस तीस वर्षांचा काळ जायला लागला. व्हिक्टोरिया राणीच्या राजवटीत नेल्सन चा हा पुतळा या चौकात उभा राहिला. अंदाजे २०० फूट उंचीच्या स्तंभावर हा नेल्सन विराजमान झाला आहे. या स्तंभाच्या तळाशी भला मोठा चौकोनी कट्टा असून त्याच्या चारीही कोपऱ्यात विरुद्ध दिशेने तोंड केलेले सिंहाचे अजस्त्र पुतळे आहेत. शिल्पकार लॅन्डसीअर ने घडवलेले हेचार चार सिंहाचे पुतळे जणू नेल्सन साहेबांचे संरक्षणच करत आहेत असा भास होतो. या आधी या नेल्सन चे 'व्हिक्टरी' नावाचे भव्य जहाज च इथे प्रत्यक्ष इथं चौकात बसवण्याचा घाट घालण्यात आला होता. पण ते शक्य न झाल्याने या जहाजावरील दोन अष्टकोनी दिवे मात्र इथं बसवण्यात आले आहेत.
एका बाजूला पायऱ्या चढून गेल्यावर उंचावर ‘नॅशनल गॅलरी’ नावाचे जुन्या पुरातन पेंटिंग्ज चे संग्रहालय आहे. इथे १४व्या, १५व्या शतकातील असंख्य प्रसिद्ध कलाकारांनी काढलेली चित्रे जतन करून ठेवली आहेत. पहिल्या तीनचार खोल्यातली पेंटिग्ज बघून झाल्यावर थोडा तोच तोचपणा आल्याने मी कंटाळलो. हे म्युझियम बघायला वेळही खूप लागतो, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो.
या चौकात पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. इथली दोन मोठी कारंजी वातावरण आल्हाददायी बनवत होती. हि दोनीही कारंजी सत्तर ऐंशी फूट उंच पाणी उडवीत असतात. त्यामुळे चौकाचा बराच मोठा भाग आणि पर्यटक पाण्याच्या तुषारांनी भिजून चिंब होत असतात. या चौकाच्या प्रांगणात शेकडो कबुतरांची थवे बागडताना बघून मन प्रसन्न होत होतं. एका कोपऱ्यात उंच अशा चौथऱ्यावर हाताच्या अंगठ्याचे (थंब्स अप) भव्य शिल्प उभारलेले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही स्ट्रीट परफॉर्मर्स आपली कला सादर करीत होते. कोणी हवेत अधांतरी बसल्याचा आभास करीत होती तर कुणी चार्ली चॅप्लिन, कुणी सुपरमॅन अशा प्रसिद्ध व्यक्तींचा पोशाख घालून पर्यटकांची करमणूक करताना आपला उदरनिर्वाह करत होती. दूरवर उभ्या असलेल्या एका गायक कलाकाराने मला आकर्षित केले. इलेक्ट्रिक गिटार च्या साथीने गात असलेल्या या मनस्वी गायकाने आपल्या गाण्याने संपूर्ण वातावरण भरून टाकले होते. मी बराच वेळ त्याच्या गाण्याचा आस्वाद घेत राहिलो. अशा जादुई वातावरणातून मला अनुजाने जागे केले. आम्ही क्वीन्स वॉक ला निघालो...
क्रमशः...
'लंडन डायरी'
२४ जुलै २०१७.
साऊथ बँक क्वीन्स वॉक:
आम्ही ट्रॅफल्गार स्क्वेअरच्या पुढे असलेल्या 'थेम्स' नदीच्या दिशेने चालू लागलो. नदीवरच्या एका पुलाच्या तोंडाशी असलेल्या पायऱ्यांवरून उतरून नदीच्या दक्षिण किनाऱ्या कडेच्या रस्त्यावरून चालायला सुरवात केली. या रस्त्यावर काही ठराविक अंतरावर प्रसिद्ध ठिकाणच्या जागा, दिशा आणि आपण उभे असलेली जागा दाखवणारे स्तंभ होते. (लंडन मध्ये असे दिशादर्शक स्तंभ सगळीकडेच आहेत.) त्यामुळे कोणालाही काहीही न विचारता आपल्याला योग्य ठिकाणी जाता येते. शिवाय अनुजा दोन वर्षे लंडन मध्ये राहिलेली असल्याने ती आम्हाला सर्व ठिकाणे बारकाव्यांसहित दाखवत होती.
थेम्स नदी लंडनच्या मध्यातून जात असल्याने नदीच्या कडेने जाणाऱ्या रस्त्यावरून भटकणे म्हणजे लंडन शहराचे विहंगम दर्शन घेत मनमुराद भटकणे होय. सुरवातीलाच लंडनमधील पर्यटकांचे आकर्षण आणि आजकालच्या काळात लंडनची ओळख म्हणून समजला जाणारा 'लंडन आय' दृष्टीपथात आला. आपल्या जत्रेत असतो तसा अजस्त्र चक्राकार पाळणा ! २००५ साली आम्ही युरोप ट्रिप च्या वेळी या महाकाय पाळण्यात बसलो होतो.यातून संपूर्ण लंडन शहराचे दर्शन घडते. संथ गतीने हे चक्र फिरत असल्याने लंडन शहराची दृश्ये वरून निवांतपणे बघता येतात. नेहेमीप्रमाणे पर्यटकांच्या यात बसण्यासाठी पर्यटकांच्या तिकिटासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आज 'क्वीन्स वॉक' पूर्ण करायचा असल्याने आम्ही पुढे निघालो. पुढे साऊथ बँक सेंटर या इमारतीत शिरलो. इथे कवितांची चक्क एक लायब्ररी आहे. फक्त कविता..! कवितांची असंख्य पुस्तके इथे कुणालाही कितीही वेळ निवांतपणे आणि मोफत वाचता येतात. कुणीही यावे आणि कवितांच्या रम्य विश्वात रमावे. अगदी फुकट ! इथल्या नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी अशा खूप सोयी प्रशासनाने केलेल्या आहेत. जसे बोर्ड स्केटिंग एरिया ! 'बोर्ड स्केटिंग' हा खेळ युरोपात लोकप्रिय आहे. चाके लावलेल्या एका लाकडी फळीवरून वेगात जाणे हि इथल्या तरुणाईची आवड ! अनेक मुले, मुली रस्त्यावरून स्केटिंग करीत मजेत फिरत असतात. या खेळाची प्रॅक्टिस करण्यासाठी अनेक ठिकाणी काही भाग राखीव ठेवला जातो.
ठिकठिकाणी पर्यटकांना निवांतपणे बसता येईल अशी खास व्यवस्था इथल्या पालिका प्रशासनाने आवर्जून केलेली आहे. नदीच्या कडेला निवांतपणे बसून कॉफीचे किंवा बियर चे घुटके घेत बसणे म्हणजे एक अफाट, अवर्णनीय आनंद असतो. आम्ही या वॉक दरम्यान नॅशनल थिएटर, मिलेनियम ब्रिज, त्या पलीकडेच नदीच्या पलीकडच्या तीरावर दिसणारे सेंट पॉल चर्च, हाऊस ऑफ पार्लमेंट, तसेच बिग बेन चे घड्याळ, लंडन टॉवर ब्रिज इत्यादी इमारती, ठिकाणे पाहत पुढे गेलो. याच रस्त्यावर सुप्रसिद्ध नाटककार शेक्सपियर ची कर्मभूमी असलेली 'शेक्सपिअर्स ग्लोब' हि जुनी लाकडी इमारत बघताना मी थोडा भावुक झालो. कसा असेल हा थोर माणूस? इथेच कुठेतरी बसून त्याने आपले नाटकांचे लिखाण केले असेल का?
आता संध्याकाळ झाली होती. थंड बोचरे वारे अंगाला झोंबत होते. आमचा वॉक जवळपास संपलाच होता. तेव्हड्यात कसलेसे संगीत कानावर पडले.त्या दिशेने पाहतानाच अनुजा म्हणाली 'चला तुम्हाला एक गम्मत दाखवते. तुम्हाला नक्की आवडेल. या ठिकाणाचा नाव आहे 'द स्कुप' ! रस्त्याच्या कडेला थोडे आत एक अँफी थिएटर होते. तिथे लाऊड स्पीकर वरून एक माणूस सर्वांना 'नाचायला या, नाचण्याचा आनंद घ्या' असे आवाहन करीत होता.मोठ्या आवाजात त्याने उडत्या चालीची ठेकेदार गाणी लावली होती. सुरवातीला एखाददुसरी जोडी नाचत होती. वारंवार होत असलेल्या आवाहनामुळे आणि नाचणाऱ्या काही जोड्यांपासून स्फूर्ती घेऊन हळू हळू नाचणाऱ्या जोड्यांची संख्या वाढली. या नृत्योत्सवाला ना ओळखपाळख, ना कुठली बंधने, ना वयाचे बांधा, ना कसले तिकीट ! कुणीही यावे, कितीही नाचावे अगदी बेभानपणे... मुक्तपणे... मी थक्क होऊन हा नृत्योत्सव पाहत होतो. मनात सारखे विचार येत होते 'आपल्याला असे कधी नाचत येईल? मुक्तपणे, बेभान नाचणे आयुष्यात राहूनच गेले...
जवळ जवळ दोन तास आम्ही या 'द स्कुप' मध्ये रंगून गेलो होतो. वेळेचे भानच राहिले नाही. तेव्हड्यात हर्षवर्धनचा फोन आला. तो घरी येऊन बराच वेळ झाला होता. त्याला भूक लागली होती. आम्हालाही घरी जायला हवे होते. खूप रात्र झाली होती...
'लंडन डायरी'
२५ जुलै २०१७.
रोमिंग अराउंड लंडन...
काल मॉर्निंग वॉक आणि क्वीन्स वॉक मुळे खूप चालणे झाल्यामुळे अनुजा म्हणाली 'आज आपण कमी चालूयात.' नाश्ता झाल्यावर आम्ही भटकायला बाहेर पडलो. हर्षवर्धन नेहेमीप्रमाणे त्याच्या अभ्यासात व्यस्त होता. तो कॉलेजला गेला. कॅम्डेन कॅनॉल ला उतरून कॅनॉल च्या कडेकडेने डाव्या बाजूने ग्रॅनरी स्क्वेअर च्या दिशेने निघालो. जाताना कॅम्डेन कॅनॉल च्या एका 'गेट लॉक' मधून बोट जाताना प्रत्यक्ष पाहिली. खूप मजेशीर प्रकार आहे हा.
आज आकाश चक्क निरभ्र होतं. थंडी होतीच पण लखलखीत ऊन ही पडलं होतं. त्यामुळे छान उत्साही वातावरण सगळीकडे पसरलं होतं. अर्धा तास रमत गमत चालल्यानंतर आम्ही ग्रॅनरी चौकात पोहोचलो. आज ऊन असल्याकारणाने अनेक लोक चौकातल्या पायऱ्यावरच्या कृत्रिम हिरवळीवर ऊन खात बसले होते. बाजूलाच एका विस्तीर्ण चौथऱ्यावर छोट्या छोट्या कारंजातून पाणी थुईथुई नाचत होते. अनेक लहान मुले या कारंजाच्या पाण्यात मुक्तपणे खेळत होती. आम्हीही बराच वेळ या कारंजाच्या कडेला मुलांचे खेळणे बघत राहिलो. सोबतीला गप्पा सुरूच होत्या.
हर्षवर्धनचे कॉलेज इथून अगदी जवळ आहे. आज कॉलेज मधील बागेत दुपारचे जेवण घेण्याचे आधीच ठरले होते. सोबत पोळीभाजी, पालक आमटीभात, फळे असे पदार्थ बरोबर घेऊनच आम्ही बाहेर पडलो होतो. कॉलेज चा कॅम्पस खूप मोठा आहे. आतमध्ये अनेक बागा, हिरवळी आहेत. हर्षवर्धन आल्यावर तिथल्याच एका हिरवळीवर बसून आम्ही एकत्र जेवण घेतलं. माझ्या मागच्या एका पुतळ्याकडे माझं लक्ष गेलं. पुतळा आपल्या रवींद्रनाथ टागोरांचा होता. हर्षवर्धन म्हणाला 'पलीकडच्या बागेत महात्मा गांधींचा पुतळा देखील आहे.' मला खूप भारी वाटलं.
कॉलेज पासून जवळच जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण असलेल्या 'ब्रिटिश म्युझियम' कडे आम्ही जाण्याचं ठरवलं. ब्रिटिश म्युझियम मध्ये एशियन, ईजिप्शियन, ग्रीस, आफ्रिकन, रोमन असे विविध विभाग आहेत. जगातून निरनिराळ्या भागातून आणलेले प्राचीन पुतळे, पेंटिंग्ज यांचा प्रचंड संग्रह या म्युझियम मध्ये आहे. बघताना अवाक व्हायला होतं. जवळजवळ तीनचार तास आम्ही ब्रिटिश म्युझियम मध्ये हरवून गेलो होतो. इथे पर्यटकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात असते. म्युझियम मधून बाहेर पडताना अनुजा म्हणाली 'ह्यात काय विशेष? पूर्वी जगभर राज्य करताना जुलमी सत्ता गाजवून इंग्रजांनी ह्या सर्व वस्तू लुटल्या आहेत आणि आता त्याच वस्तूंची संग्रहालये बनवून पुन्हा हे इंग्रज जगभरातल्या पर्यटकांकडून पैसे मिळवतायत.' (अरेच्चा ! खरंच की... हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. असो...)
ब्रिटिश म्युझियम बघून आम्ही पुन्हा बराच वेळ आजूबाजूला भटकत राहिलो. दमल्यामुळे एका बागेत रेंगाळलो. बागेत आजूबाजूला अनेक प्रेमी युगुलं गप्पा मारत होती. कुणी मित्रांबरोबर बियर पीत बसली होती. कुणी एकटेच पुस्तक वाचत बसले होते. तेव्हड्यात अचानक दोन तरुण धोतर, कुडता असा भारतीय पोशाख परिधान करून 'हरे रामा हरे कृष्णा' असे भजन म्हणत, मृदूंग वाजवत, नाचत आले. हे असले विक्षिप्त लोक इथे खूप आहेत.
लंडन मधील व्यावसायिक कार्यालये असलेल्या दोन इमारती मध्ये कंपाउंड नसतेच. दोनही इमारती मधील जागा अतिशय सुशोभित केली असते. लोकांना बसण्यासाठी दगडी चौथरे किंवा खुर्च्या ठेवलेल्या असतात. आजूबाजूला रंगीत फुलांचे ताटवे असतात. आशाच एका ठिकाणी आम्हाला बऱ्याच आरामखुर्च्या ठेवलेल्या दिसल्या. एका बाजूला भव्य स्क्रीनवर गोल्फ ची मॅच चालू होती. आम्हीही गोल्फ चा आनंद घेत थोडी विश्रांती घेतली.
संध्यकाळी उशिरा घरी जाताना एका मॉल मधून आम्ही रोजच्या लागणाऱ्या घरगुती वस्तूंची खरेदी केली. मी माझ्यासाठी चारपाच बियरचे कॅन्स घेतले. रात्रीचे जेवण बियरच्या सोबतीने करून दमलेली पाठ अंथरुणाला टेकली...
'लंडन डायरी'
२६ जुलै २०१७.
मानसीचा चित्रकार तो :
आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. कधी कधी अनपेक्षितपणे काहीतरी गवसतं. खरं तर आजचा दिवस आम्ही लंडन मध्ये काहीच करणार नव्हतो. फक्त घरी आराम, आणि संध्याकाळी अलका च्या भाची कडे जेवायला जाणार होतो. लंडन पासून अंदाजे पन्नास कि.मी. अंतराववर 'मेडनहेड' नावाचे एक टुमदार असे उपनगर आहे. इथे ही आमची भाची (हिचे देखील नांव अनुजा च आहे.), तिचा नवरा रोहित आणि छोटा मुलगा आदित्य राहतात. असा साधा प्रोग्रॅम आजचा होता.
मग जरा उशिरानेच उठलो. आमच्या अनुजाने दुपारच्या जेवणाला मिसळीचा बेत ठरवला होता. सकाळी आम्ही मिसळीसाठी लागणारा मसाला, शेव, चिवडा, फरसाण घेण्यासाठी बाहेर पडलो. जवळच असलेल्या एका भारतीय दुकानात गेलो. इथल्या त्या गल्लीत चक्क भारतीय दुकाने, रेस्टोरंटस होती. गुप्ता स्वीट्स, दिवाना भेळपुरी हाऊस, रावी कबाब वगैरे नावाच्या पाट्या वाचून गम्मत वाटली. लंडन च्या लोकसंख्येच्या जवळजवळ एक पंचमांश भारतीय इथे राहतात म्हणे.
आम्ही 'इंडियन स्पाईस शॉप' नावाच्या दुकानात शिरलो. इथे सर्व प्रकारचे भारतीय मसाले, अगदी पाणीपुरीचे सामान, पूजेचे साहित्य, उदबत्त्या देखील मिळतात. लंडन मधली तुळशीबागच जणू ! शिवाय मालक हिंदी बोलणारा. मग काय त्य्याच्याशी हिंदीत बोलत मिसळीचे सामान खरेदी झाले. लंडन मध्ये मिसळ मिळाल्याने अलका खुश झाली.
'मेडनहेड' अंदाजे पन्नास पंचावन्न कि.मी. अंतरावर आहे. हर्षवर्धन ने रेल्वे, बस हे प्रवासाचे पर्याय मोडीत काढत एक कार भाड्याने घ्यायची ठरवली तेव्हा मी दचकलो. ट्राफिक चे कडक नियम असणाऱ्या, रस्ते माहिती नसताना परक्या देशात उगीच कशाला धोका पत्करायचा ? पण मुलांच्या हट्टापुढे नाईलाजाने होकार दिला. अनुजाच्या मदतीने हर्षवर्धन सराईतपणे ड्रायव्हिंग करत होता. अनुजा मोबाईल वरील रोडमॅप च्या साहाय्याने त्याला रस्त्यांचे मार्गदर्शन करीत हाती. ट्राफिक सिग्नल्स आणि नियमांची आठवण करून देत होती. मला ह्या आजकालच्या मुलांची फार गम्मत वाटते. वाटले पुढची पिढी आपल्याहून खूप सरस आहे. मी मुंबईत देखील कार चालवणे टाळतो. पण हि पोरं बिनदिक्कत लंडन मध्ये ड्रायव्हिंग करत होती. दुपारी सुमारे साडेचार वाजता आम्ही मेडनहेड ला रोहित - अनुजाच्या घरी सुखरूप पोहोचलो. मी हुश्श केले.
लंडन पासून पन्नास साठ किलोमीटर अंतरावरचे मेडनहेड हे उपनगर म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्गच जणू ! मेडनहेड मधील रस्ते अतिशय स्वच्छ, काटकोनात वळणारे, रस्त्यांच्या दुतर्फा हिरव्या रंगाच्या विविध छटा असणारी झाडे, हिरवळी, विविध रंगांचे फुलांचे ताटवे ! घरे चित्रात असतात तशी एकसारखी, बसकी, कौलारू, थोडी जुनी वाटणारी, राखाडी, तपकिरी, विटकरी रंगाची ! वातावरणात निरव शांतता, रहदारी जवळजवळ नाहीच. स्वच्छ ताजी थंड हवा. जणू कोण्या अज्ञात चित्रकाराने रेखाटलेले निसर्गचित्रंच !
रोहित-अनुजाचे घर ही चित्रात असतो तसा खूप छान टुमदार असा छोटा बंगला आहे. खूप वर्षांनी भेटी झाल्यामुळे सर्वांबरोबर खूप गप्पा झाल्या. मग जवळच असलेल्या उद्यानात फिरायला गेलो. गप्पांच्या ओघात तास दीड तासाचा फेरफटका कधी संपला ते कळलंच नाही. जेवणाआधी रोहितच्या ड्रिंकच्या ऑफरमुळे मी खूषच झालो. मग माझ्या आवडत्या बियर च्या साथीने सुरेख चविष्ठ जेवण. लॅम्ब करी, छोले, पालक पनीर ,जिरा राईस, दाल फ्राय, सामोसे. केवळ स्वर्गीय सुख...
रोहित अनुजा दोघेही राहण्याचा खूप आग्रह करत होते. आमचाही पाय निघत नव्हता, पण दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम ठरला असल्यामुळे पुढच्या खेपेला आठ दिवस राहायचे कबूल करत नाईलाजाने निघालो.
घरी परतताना रात्रीच्या लंडन शहराची विहंगम दृश्ये पहात अनुभवत होतो. घरी पोहोचायला रात्रीचे दीड वाजले होते. रम्य मेडनहेड ची दृश्ये आठवत असताना झोप अलगद डोळ्यात उतरली...
'लंडन डायरी'
२९ जुलै २०१७.
शेक्सपियरची जन्मभूमी: 'स्ट्रॅटफोर्ड अपॉन अव्हॉन.'
शेक्सपियर ची कर्मभूमी लंडन आणि जन्मभूमी 'स्ट्रॅटफोर्ड अपॉन अव्हॉन.' ! स्ट्रॅटफोर्ड हे गाव अव्हॉन नावाच्या नदीवर वसलेलं आहे म्हणून गावाचे नाव 'स्ट्रॅटफोर्ड अपॉन अव्हॉन.' ऐतिहासिक महत्वाचे असले तरी तितकेच निसर्गरम्य असल्याने लोकप्रिय आहे. काल अनुजाने सांगितले कि 'उद्या आपण सकाळी लवकर उठून 'स्ट्रॅटफोर्ड अपॉन अव्हॉन' ला जायचं आहे. विकेंड तिकडे साजरा करूयात आपण'.
सकाळी सहालाच घराबाहेर पडून बस ने अर्ध्या तासाच्या अंतरावरील 'मेरिलबोन' रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. अनुजाने आधीच तिकिटे काढून ठेवली होती. प्रवासात 'लॅमिंग्टन स्पा' नावाच्या स्टेशनवर गाडी बदलून सकाळी नऊच्या सुमारास स्ट्रॅटफोर्ट स्टेशन वर पोहोचलो. या टुमदार रेल्वेस्टेशनच्या प्रथमदर्शनीच मी प्रेमात पडलो. स्ट्रॅटफोर्ट हे गाव अतिशय कमी वस्तीचे असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच. रस्त्याच्या दुतर्फा जिकडे तिकडे रंगीत फुलांच्या कुंड्या, फुलांचे ताटवे, हवेत फुलांचा मंद सुवास, ढगाळ वातावरण, निरव शांतता ! गावात छोटीछोटी उपाहारगृहे, भेटवस्तूंची दुकाने होती. एका दुकानात आम्हाला पहिल्या महायुद्धाच्या काळातील मासिके विक्रीसाठी ठेवलेली आढळली. स्ट्रॅटफोर्ट हे गाव अतिशय लहान आहे. अगदी चारपाच कि.मी.च्या परीभागातच हे गाव संपते.
हळू हळू पर्यटकांची गर्दी वाढू लागली. गिफ्ट शॉप्स मध्ये सगळीकडे शेक्सपियरची चित्रे, त्याची नाटकातील गाजलेली वाक्ये छापलेल्या वस्तू दिसत होत्या. पेन्सिली, टी-शर्ट्स, मग्ज, टी कोस्टर्स, अगदी लिप्स्टीक्स, छत्र्या सगळीकडे शेक्सपियर! यत्र, तत्र, सर्वत्र फक्त शेक्सपियरच!
पुढे चालत चालत आम्ही विल्यम शेक्सपियरच्या जन्मस्थळाकडे गेलो. जगभरातील नाटककाराचे, साहित्यिकांचे स्फूर्तिस्थान या महान नाटककाराचे जन्मस्थान, त्याची शाळा, त्याच्या कुटुंबाचे राहण्याचे ठिकाण बघण्याची आम्हाला उत्सुकता होती. या ग्रेट नाटककाराने जवळजवळ चाळीस नाटके, कविता लिहून इंग्रजी भाषेला समृद्ध केले. तो कवी म्हणूनही ओळखला जायचा. २६ एप्रिल १५६४ साली या गावात त्याने जन्म घेतला. १५८९ ते १६१३ या काळात त्याने त्याची सर्वोत्कृष्ट नाटकांची निर्मिती केली. सुरवातीला तो ऐतिहासिक आणि विनोदी नाटकेही लिहायचा. त्याच्या 'हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लेअर, मॅकबेथ या कलाकृती अजरामर झाल्या. तो नाटकातून अभिनय देखील करीत असे. साडेचारशे वर्षांपूर्वी त्याने लिहिलेल्या ह्या कलाकृती अजूनही जगभरातल्या नाटककारांना, साहित्यिकांना संमोहित करतात. या महान नाटककाराचे गाव बघून आम्ही धन्य झालो.
इथल्या आर.एस,सी म्हणजे रॉयल शेक्सपियर कंपनीच्या गोलाकार नाट्यगृहात शेक्सपियरच्या विविध नाटकांचे प्रयोग सतत चालू असतात. नाटकाचे तिकीट मात्र फार महाग असते. वास्तविक आम्हाला नाटक पाहायचे होते, पण तिकीट सत्तर पौंड म्हणजे जवळपास ६००० रुपये एव्हडे असल्याने आम्ही दचकलो. मी थोडा हिरमुसलो. पण माझ्यासारख्या गरीब पर्यटकांसाठी हौशी, नाटकवेडी काही मंडळी उघड्या हिरवळीवर नाटकाचे प्रयोग करीत असतात. दुपारी तीन वाजता असाच एक प्रयोग आहे असे समजल्याने आम्ही त्याबाजूला गेलो. 'द टेम्पेस्ट' या नाटकातील काही भाग या प्रयोगात सादर करण्यात आला. अशा नाटकांचे प्रयोग मोफत असतात. अभिनयाचे वेड, निश्चित मिळणार प्रेक्षकवर्ग, अभिनयाचा सराव यासाठी हे काहीसे नवोदित कलाकार असे प्रयोग आनंदाने, मनापासून करतात. पर्यटकांना देखील शेक्सपियरच्या जन्मभूमीवर त्याचे नाटक चकटफू बघायला मिळते. दिड तासाच्या या नाटकाचा आम्हीही तो आनंद घेतला.
घरूनच आणलेल्या ब्रेड ऑम्लेट, फळे, कॉफीचा समाचार घेऊन आम्ही अव्हॉन नदीवर फिरायला गेलो. बोट भाड्याने घेऊन अर्धा पाऊण तास मस्त बोटिंग केले. नदीच्या स्वच्छ पाण्यात अनेक पांढरेशुभ्र राजहंस स्वच्छंद विहार करत होते. माझ्यातला सुप्त फोटोग्राफर उत्साहाने या नयनरम्य परिसराचे फोटो काढण्यात रमला होता. किती फोटो काढू असं झालं होतं. स्ट्रॅटफोर्ड गावातून प्रत्येक रस्त्यावरून किमान दोनदा आम्ही भटकलो. इथे यायच्या आधी वाटलं होतं की शेक्सपियरचे जन्मस्थळ बघितल्यावर पुढे वेळ कसा घालवायचा? पण संपूर्ण दिवस अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा ठरला. परत लंडन ला येताना रात्री आठची ट्रेन होती. घरी यायला रात्रीचे ११ वाजले. शरीर थकल्याने आम्ही झोपेच्या आधीन झालो.
'लंडन डायरी'
३० जुलै २०१७.
'हिरवे हिरवे गार गालिचे'... अर्थात 'हॅम्पस्टेड हिथ'.
आजचा दिवस थोडा आळसावलेलाच होता. सकाळी ७ वाजताच जाग आली तरी अंथरुणावर लोळत पडलो. कालच्या स्ट्रॅटफोर्ड च्या वीकएंड ट्रिप ने थोडं दमायला झालं होतं. बघता बघता लंडनला येऊन नऊ दिवस झाले. दिवस भराभर जातायंत.
सकाळी चहा घेऊन लगेचच लिहायला बसलो. आज काही ठराविक कार्यक्रम ठरलेला नव्हता. दहा वाजता समोर गरमगरम उप्पीट आल्यावर भानावर आलो. भूकही लागली होती. लिहिताना भानच राहिल नव्हतं. नाष्टा करून पुन्हा लिखाण ! आज कुठंही जायचं नव्हतं आणि लिखाणाचा मोठा बॅकलॉग भरून काढायचा होता. मग जेवणाच्या वेळे पर्यंत लिहीतच बसलो. मग लिहिलेल टाईप करण्यात बऱ्यापैकी वेळ गेला.
कालच पुण्यात आमच्या असोसिएशनची AGM होती. त्या निमित्ताने एक्झिबिशन चे आयोजन कलेले होते. मोठं काम होतं ते. कार्यक्रमाचे भरपूर फोटो व्हाट्स अप वर आले होते. खूप उत्सुकता होती कार्यक्रमाबद्दल. ते फोटो बघत राहिलो. मधेच कधीतरी एक डुलकी काढली. बघता बघता संध्याकाळचे ४ वाजले. मग मात्र बसून बसून कंटाळा आला. तेव्हड्यात अनुजा म्हणाली 'चला.. आज आपण 'हॅम्पस्टेड हिथ' ला फिरायला जाऊ. आज झकास ऊन पडलंय बाहेर. मजा येईल. (या लंडन वासियांना उन्हाचे भारी कौतुक ! आमच्या पुण्याला बघा बदाबदा ऊन.)
लंडन शहराचं आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे इथे असलेली भलीमोठी प्रचंड उद्याने. संपूर्ण लंडनचा एक चतुर्थांश भाग मोकळ्या जागा, हिरवळी, उद्याने ह्यांनी व्यापला आहे. यात 'हॅम्पस्टेड हिथ' हे खूप लोकप्रिय असं ठिकाण आहे. ट्रॅफल्गार स्क्वेअर पासून फक्त सहा कि.मी. अंतरावर आहे हि जागा. जवळ जवळ ३२० हेक्टर (७९० एकर्स) एव्हड्या विशाल जागेवर पसरलेल आहे हे उद्यान. यात तीन भली मोठी स्वच्छ पाण्याची तळी आहेत. छोटे छोटे जलाशय बरेच आहेत. आत सुंदर असे रस्ते आहेत.
आम्ही 'हॅम्पस्टेड हिथ' मध्ये शिरलो तेंव्हा अंदाजे संध्याकाळचे साडेसहा वाजले असावेत. आज खरंच नाशिबाने आकाश निरभ्र होते. सूर्य उतरणीला लागला होता. हवेतला थंडावा आणि सूर्याच्या किरणांचा उबदारपणा वातावरण आल्हाददायी बनवत होता. माणसांची वर्दळ जवळपास नव्हतीच. हिरव्या रंगांच्या विविध छटा असलेली झाडे, हिरवळ डोळ्याचं पारणं फेडीत होती. दूरवर काही मुलं पतंग उडवत होती. मी माझ्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात समोरची दृश्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. जवळजवळ दोन तास आम्ही फिरत होतो. इथून जवळच असलेल्या गजबजलेल्या लंडन शहराचा इथे मागमूसही नव्हता.
शेवटी नाईलाजाने या मस्त वातावरणातून आम्ही बाहेर पडलो. सूर्य मावळला होता. रात्रीचे दहा वाजत आले होते. घरी येऊन लगेचच लिहायला बसलो. 'हॅम्पस्टेड हिथ बरोबरच लंडनच्या 'डबलडेकर बस' बद्दल काहीबाही लिहायला घ्यायचं होतं.
'लंडन डायरी'
३१ जुलै २०१७.
रिजेंट्स पार्क.
आज सकाळपासूनच बाहेर ऊन सावलीचा खेळ चालू होता. अनुजाला कसलेसे ऑफिसचे काम होते. ती कामात बिझी होती. हर्षवर्धन नेहेमीप्रमाणे कॉलेजला गेला. आम्हा दोघांचे नेहेमीप्रमाणे नाश्ता, जेवण रुटीन चालू होते. दुपारी तीन पर्यंत अलका ची घरगुती कामे चालू होती. तेव्हड्यात अनुजा म्हणाली 'तुम्ही एकटेच फिरायला का जाऊन येत नाही? कारण असे सूर्यप्रकाश असलेले दिवस लंडन मध्ये दुर्मिळ. आज छान ऊन पडतंय तर फिरून या. इथे जवळच रिजेंट्स पार्क नावाची मस्त बाग आहे.' मी दचकलो. 'एकटे? शक्यच नाही.' त्यावर ती म्हणाली 'खूप सोपंय आहो सगळं. मी समजावून सांगते, जा बिनधास्त!' माझं मन काही तयार होईना. मग अलका म्हणाली 'बघुयात एकटं फिरून थोडं. अवघड वाटलं तरी एकटा फिरल्याशिवाय सवय कशी होणार? मलाही ते पटलं आणि मनाचा हिय्या करून 'बरं' म्हणालो.
मग मोबाईल वर मॅप कसा बघायचा याचं यथोचित शिक्षण झालं. माझ्या आयडिया च्या नंबर चा काहीतरी झोल झाला होता. त्यावरून इथले लोकल कॉल्स लागत नव्हते. मग अलकाच्या मोबाईल मध्ये मॅट्रिक्स चे प्रीपेड सिम कार्ड टाकले. त्यामुळे अनुजा किंवा हर्ष बरोबर आमचा संपर्क होऊ शकणार होता. मग मी थोडा निर्धास्त झालो. म्हणजे समजा आम्ही चुकलोच तर निदान फोनवर तरी संपर्क करता येईल.
थोडी वामकुक्षी घेऊन आम्ही घेऊन आम्ही पार्क मध्ये फिरायला बाहेर पडलो. गुगल मॅप वरून अंदाज घेत कॅम्डेन कॅनालच्या रस्त्यावरुन चालत राहिलो. मध्ये कॅम्डेन मार्केट लागतं. पण संध्याकाळ झाल्यानं मार्केट बंद होण्याच्या मार्गावर होतं. अलका म्हणाली 'उद्या सकाळी पुन्हा फिरायला जाताना येऊ मार्केटमध्ये.' साधारण दोनतीन कि.मी. च्या चालण्यानंतर आम्ही रिजेंट्स पार्क मध्ये सुखरूप पोहोचलो.
काल पाहिलेल्या हॅम्पस्टेड हिथ पेक्षा थोडं लहान आणि शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे उद्यान खूपच सुंदर आहे. उद्यानाच्या मध्यभागी भव्य असं हिरवळीचे मैदान आहे. इथे लहान, तरुण मुले क्रिकेट, फ़ुटबाँल खेळात असतात. पार्कच्या एका बाजूला सुप्रसिद्ध 'लंडन झू' हे भलेमोठे प्राणिसंग्रहालय आहे. अनेक कारंजी उद्यानाची शोभा वाढवतात. इथली रंगीबेरंगी फुलं बघून तर अलका हरखूनच गेली. इथल्या धिटुकल्या खारी पर्यटकांच्या हातातला खाऊ धिटाईने पुढे येऊन खात होत्या. आम्हाला खूप गंमत वाटली. बागेत ठिकठिकाणी मोठ्या आकाराच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. एके ठिकाणी कॉपर कंडक्टर च्या भल्यामोठ्या वेटोळ्याची प्रतिकृती होती. माझ्या व्यवसायासंबंधित वस्तू असल्याने मी तिथे माझे फोटो काढून घेतले.
जवळ जवळ अडीच तीन तास बागेत भटकल्यावर आम्ही पुन्हा कॅम्डेन कॅनॉल च्या रस्त्याने आठ साडेआठ वाजता घरी परत आलो. आम्ही एकट्याने फिरून आल्यामुळे एखादे युद्धच जिंकल्याचा भास होत होता...
'लंडन डायरी'
१ ऑगस्ट २०१७.
बिग बेन, बकिंगहॅम पॅलेस, कॅम्डेन मार्केट, पुन्हा रिजेंट पार्क वगैरे...
काल आम्ही मुलांच्या मदतीशिवाय रिजेंट पार्क ला फिरून आल्यामुळे थोडा आत्मविश्वास वाढला होता. माझ्यापेक्षा अलका चा थोडा जास्तच वाढला होता. ती सकाळी चहा घेताना म्हणाली 'आज मॉर्निंग वॉकला पुन्हा रिजेंट पार्कात जाऊ, आणि येताना कॅम्डेन मार्केटही बघून येऊ. कालच रस्ता माहिती झाल्याने मी लगेचच तयार झालो. रिजेंट पार्कचा भलामोठा फेरफटका मारला. क्रिकेट ग्राउंड च्या मध्यभागी असलेल्या एका रेस्टोरंट मध्ये कॉफी घेतली. सोबतीला गप्पा चालूच होत्या.
तास दीड तासाचा फेरफटका झाल्यावर आम्ही पुन्हा कॅनॉल रॉड वरून परत येताना काल ठरवल्याप्रमाणे कॅम्डेन मार्केट मध्ये आलो. हे कॅम्डेन मार्केट म्हणजे आपल्या तुळशीबागेसारखी! छोट्या छोट्या भेटवस्तू, कपडे, मुलांची खेळणी, स्वस्तात मिळणारे दागिने अशी गजबजलेली दुकाने बघत आम्ही हिंडत होतो. मार्केटच्याच एका बाजूला खाद्यपदार्थांच्या टपऱ्या होत्या. चायनीज, थाई, इंडोनेशियन, इंडियन अश्या वेगवेगळ्या देशांमधले वैशिष्ठय असलेले फास्ट फूड खाण्यासाठी इथे खूप गर्दी होत होती. ११ वाजेपर्यंत मार्केटमध्ये भटकून आम्ही परत घरी आलो.
दुपारी जेवताना अनुजा म्हणाली 'आता तुम्हाला एकटं हिंडायला जमायला लागलंय. आज दुपारी बसने बिगबेन आणि तिथूनच जवळ असलेल्या बकिंगहॅम पॅलेस ला जाऊन या.' सुरवातीला मी नकारच दिला. जवळच्या बागेत चालत फिरणे वेगळे आणि दूरवर, गर्दीच्या ठिकाणी बसने जाऊन फिरणे वेगळे! कुठल्या नंबरची बस पकडायची?,कोणत्या स्टॉप वर उतरायचे? उतरणे न कळल्याने स्टॉप हुकला तर? गर्दीत हरवलो तर? अशा एक ना अनेक शंका माझ्या मनात येऊ लागल्या. पण अलका धीट आहे. ती म्हणाली 'चला जाऊया, काही होत नाही. प्रत्येक वेळी मुले आपल्याबरोबर कशी असतील. त्यांना त्यांचे अभ्यास, उद्योग आहेत.' हे मात्र मला पटले. मग 'हो' म्हणालो एकदाचे !
थोड्या टेन्शन मधेच आम्ही बाहेर पडलो. घरासमोरच असलेल्या बस स्टॉप वरून २९ नंबरची ट्रॅफल्गार स्क्वेअर ला जाणारी बस पकडली. अर्ध्या तासाच्या बस प्रवासानंतर आम्ही ट्रॅफल्गार चौकात उतरलो. इथे आम्ही चारपाच दिवसांपूर्वीच येऊन गेलो होतो. चौकात थोडे रेंगाळून जवळच असलेल्या बिगबेन चे सुप्रसिद्ध घड्याळ असलेला टॉवर बघितला.
याच टॉवरला लागूनच पार्लमेंट हाऊस ची इमारत आहे. वास्तविक या टॉवर चे नाव एलिझाबेथ टॉवर असे आहे. पण टॉवर च्या वरच्या टोकाला असलेल्या अजस्त्र घड्याळाच्या येणाऱ्या आवाजाने याला बिगबेन असं नांव दिलं गेलं. हे बिगबेन चं घड्याळ १८५८ मधे तयार करण्यात आलं आणि १८५९ मधे प्रत्यक्ष बसवून चालू करण्यात आलं. ११ जुलै १८५९ या दिवशी या घड्याळाची बेल लंडनवासीयांना पहिल्यांदा ऐकायला मिळाली. या अजस्त्र घड्याळाचा लंबकच जवळजवळ दोनशे किलो वजनाचा आहे. अलीकडच्या काळात तो विजेवर चालतो. पण या घड्याळाच्या स्प्रिंग्ज ना पूर्वी आठवड्याला चारपाच तास चावी दयावी लागत असे. सर बेंजामिन हॉल या शरीराने धिप्पाड अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली या भव्य घड्याळाची उभारणी झाली.
या घड्याळाची स्थापना होऊन जवळ जवळ दीडशे वर्ष उलटून गेल्यावरही हे घड्याळ अतिशय वक्तशीरपणे चालते. क्वचित एखाद्या सेकंदाचा फरक पडतो इतकेच! लंडन शहरातून चारही बाजूंनी दिसणाऱ्या आणि जगातल्या सर्वात उंच असणाऱ्या काही घडाळ्यांपैकी एक असणाऱ्या या बिगबेन चे घड्याळ बघितल्या शिवाय कोणताही पर्यटक परत जाऊच शकत नाही. सुदैवाने आम्ही तिथे असतानाच संध्याकाळचे ६ वाजले, आणि बिगबेनच्या घड्याळाचा आवाज आसमंतात भरून गेला.
पार्लमेंट आणि बिगबेन ला लागूनच असलेल्या प्रशस्त चौकात (ज्याला पार्लमेंट चौक असे म्हणतात)अनेक राजकीय नेत्यांचे पुतळे उभे आहेत. अब्राहम लिंकन, विस्टन चर्चिल, जनरल स्मट यांचे वैषिठ्यपुर्ण पुतळे इथे आहेत. चौकाच्या दर्शनी भागातील विस्टन चर्चिल यांचा भव्य पुतळा चौकाची शोभा वाढवतो. त्यांच्या बरोबरीने असलेला महात्मा गांधींचा पुतळा बघून देशाभिमानाने मन भरून आले. या पुतळ्यांच्या आजूबाजूला प्रशस्त, सुंदर हिरवळ, लोकांना बसायला बाक अशाही सोइ इथे आहेत. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळदर्शनाने दमलेले पर्यटक इथं विश्रांती घेताना दिसतात.
पार्लमेंट चौकातून पुढे गुगल मॅप वर बघत बघत आम्ही जवळच असलेल्या बकिंगहॅम पॅलेस कडे निघालो. सेंट जेम्स पार्क च्या कडेने चालत गेल्यावर हा पॅलेस पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. बकिंगहॅम पॅलेस च्या समोरच व्हिक्टोरिया राणीच्या स्मरणार्थ उभारलेला 'व्हिक्टोरिया मेमोरियल' भव्य आणि उंच स्तंभ दिसतो. व्हिक्टोरिया राणीच्या प्रदीर्घ आणि यशस्वी राजवटीला मानवंदना देण्यासाठी हे भव्य शिल्प उभे केले आहे. बारापंधरा फूट उंचीच्या राणीच्या बसलेल्या पुतळ्याच्या तीनही बाजूंना मातृत्व, सत्य आणि न्यायदेवतेचे अर्धनग्न पुतळे आहेत. या चारही पुतळ्यांच्या मधून गेलेल्या उंच स्तंभावर विजयाचे प्रतीक असलेली व पंख असलेली सोनेरी रंगात रंगलेली देवता आहे. हे सर्वच शिल्प अतिशय देखणं आहे. या शिल्पाच्या पायारांवर बसून अनेक पर्यटक आजूबाजूचे विहंगम दृश्य न्याहाळत बसलेले असतात.
या व्हिक्टोरिया मेमोरियल स्मारकामागे बँकिंगहॅम पॅलेस आडवा पसरला आहे. या पॅलेस समोर बरीच मोकळी जागा आहे. बकिंगहॅम पॅलेस म्हणजे लंडनच्या राजघराण्यातील कुटुंबातील व्यक्तींसाठी असलेले निवासस्थान! हा भव्य राजवाडा खूप पूर्वी म्हणजे १७०३ मध्ये बांधला गेला. किंग जॉर्ज (३रा) याने तो १७६१ मध्ये विकत घेऊन कुटुंबासहित इथे राहायला सुरवात केली. ७७००० स्क्वे.मी. एव्हडे प्रचंड क्षेत्रफळ असलेला हा राजवाडा जगातल्या काही मोजक्या राजवाड्यांपैकी एक मानला जातो. पर्यटकांना थोडं अलीकडेच असलेल्या राजवाड्याच्या काळ्या रंगाच्या लोखंडी कंपाउंड पर्यंतच जाता येतं. कंपाउंडचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार अतिशय भव्य आणि नक्षीदार आहे. यातील काही नक्षी सोनेरी रंगानी सजवली आहे.
या प्रवेशद्वारापाशी उभे राहून दुरूनच पॅलेस बघता येतो. पॅलेस च्या मुख दोन दरवाज्या जवळ विशिष्ठ पोशाख घातलेले रक्षक किंवा गार्ड्स पुतळ्या प्रमाणे निश्चल उभे असतात. सोनेरी बटणे लावलेला लाल रंगाचा पोशाख, डोक्यावर अस्वलाच्या कातड्याची काळी, केसाळ, गुबगुबीत, उंच टोपी घातलेले हे गार्ड्स लंडन शहराची ओळख बनून राहिलेले आहेत. या गार्डस ची छबी आपापल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटक भलतीच गर्दी करतात. रोज सकाळी अकरा आणि दुपारी चार वाजता हे गार्ड्स बदलले जातात. हा 'चेंजिंग ऑफ गार्ड्स' चा समारंभ बघण्यासाठी देखील पर्यटकांची झुंबड उडते. हा समारंभ पाहण्यासाठी पर्यटक तास न तास वाट बघत असतात. हा बँकिंगहॅम पॅलेस मात्र आम्हाला फारसा आवडला नाही. त्यापेक्षा आपल्या राजस्थानातील राजवाडे कितीतरी भव्य आणि सुंदर आहेत. या पॅलेस मध्ये कुठे कारंजी नाहीत कि भव्य कमानी, झुंबरे नाहीत. बाहेरून हा एक जणू ठोकळाच.
संध्याकाळचे साडेसात वाजले होते. सूर्य मावळतीकडे झुकला होता. आम्ही परत फिरलो. ट्रॅफल्गार स्क्वेअर पर्यंत चालत येऊन पुन्हा २९ नं बस ने कॅम्डेन टाउन मधल्या आमच्या घरासमोर उतरलो. लंडन मध्ये एकटे हिंडून आल्याबद्दल अनुजाने आम्हाला घरी बनवलेला पिझ्झा खिलवला. मी पिझ्झा बियरचा सोबतीने एन्जॉय केला हे सांगायला नकोच...
'लंडन डायरी'
२ ऑगस्ट २०१७.
व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम (V&A)
कालच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज लंडन मध्ये भरपूर वारा आणि पाऊस पडणार होता. मी विचार केला कि हवामान खात्याचाच अंदाज तो, कितीसा बरोबर असणार? पण इथले अंदाज बऱ्यापैकी बरोबर असतात. सकाळी उठलो तर बाहेर धो धो पाऊस! काळ्या ढगांनी आकाशात दाटून आलं होतं. सोसाट्याचा थंड वारा सुटला होता. गेले तीन चार दिवस लंडन शहरावर कृपादृष्टी ठेवणारा सूर्य आज लुप्त झाला होता. इथे क्षणाक्षणाला वातावरण बदलत असतं. पाऊस कधी येईल त्याचा नेम नाही. त्यामुळे फिरताना कायम छत्र्या बरोबर ठेवायला लागतात.
आज दुपारचं जेवण थोडं लवकरच करून आम्ही दोघं बाहेर पडलो. आज व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, नॅचरल हिस्टरी म्युझियम आणि सायन्स म्युझियम असा 'म्युझियम डे' साजरा करायचा असं ठरवलं होतं. (हर्षवर्धन हसायला लागला. तो म्हणाला एका दिवसात पाहणं शक्यच नाही. प्रत्येक म्युझियमला किमान एक पूर्ण दिवस हवा.) मग कालच्याप्रमाणे मुलांकडून बस नंबर, बस मार्ग याचे प्रशिक्षण! आज वेगळा मार्ग थोडा बदलून जायचे होते, त्यामुळे मला पुन्हा थोडं टेंशन, आणि अलका नेहेमीप्रमाणे बिनधास्त! शिवाय आज एके ठिकाणी बस बदलायची भानगड होती. हे कळल्यावर मात्र मी चक्क एका कागदावर कसे जायचं याची सर्व माहिती लिहून घेतली.
बस साठी ऑयस्टर कार्ड, मोबाईल,थोडे पैसे आणि थोडं खायचे पदार्थ सॅक मध्ये टाकून आम्ही दुपारी बाहेर पडलो. कालच्या प्रमाणे ट्रॅफल्गार स्क्वेअर ची २९ न. ची बस पकडली. मधेच टॉरिंग्टन प्लेस या ठिकाणी बस बदलली. पण इथे थोडा घोळ झाला. सिग्नलसाठी बस थांबली आहे असे समजून आम्ही चुकून बसमधून उतरलोच नाही. पुढे गेलो. घोळ लक्षात आल्यावर पुढच्याच स्टॉप वर उतरलो. तिथून तिथून १४ न. ची ‘पुटनी हिथ’ कडे जाणारी बस पकडून व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम च्या समोरच्या बस स्टॉप वर उतरलो. समोर म्युझियम ची भव्य इमारत दिसल्यावर माझा जीव भांड्यात पडला. बाहेर धो धो पाऊस चालूच होता.
म्युझियम मध्ये शिरताच त्याच्या भव्यतेचा आम्हाला अंदाज आला. 'आज निम्मे बघून झाले तरी खूप झालं' असं वाटायला लागलं. जगभरातल्या जवळ जवळ पंचेचाळीस लाख कलात्मक वस्तूंचे हे संग्रहालय म्हणजे एक आश्चर्यच आहे. प्राचीन काळापासून ते विसाव्या शतकापर्यंत च्या वस्तूंसाठी जवळ जवळ १५० दालने इथे आहेत. येथील कलात्मक आणि दुर्मिळ वस्तू युरोप, उत्तर,दक्षिण अमेरिका, आशिया, पूर्वेकडील जपान, चायना, कोरिया, दक्षिण आशियातील भारत, श्रीलंका यासारख्या सर्व भागातून गोळा केल्या आहेत. (का या इंग्रजांनी लुटून आणल्या आहेत?) यामध्ये चांदीच्या कोरीव काम केलेल्या वस्तू, पेंटिंग्ज, गालिचे, प्राचीन तलवारी, बंदुका यासारखी हत्यारे, काचेच्या वस्तू आकर्षक पद्धतीने मांडून ठेवल्या आहेत. इथे एक ११ मीटर उंचीचे भव्य काचेचे (ब्लोन ग्लास) झुंबर आपले लक्ष वेधून घेते. हे मोठेच्या मोठे झुंबर उंच छताला कसे बसवले असेल याचाच विचार मी करत राहिलो.
हे म्युझियम बघता बघता संध्याकाळचे पाच वाजले, पण दालने काही संपत नव्हती. आमचे आता पाय दुखायला लागले होते. सहा वाजता म्युझियम बंद होत असल्याने आम्ही नाईलाजाने बाहेर पडलो. पाऊस थांबला होता. थोडं पलीकडे चालत जाऊन नॅचरल हिस्ट्री म्युझियम आणि सायन्स म्युझियम बाहेरूनच बघितले. परत कधीतरी बघायचे असे ठरवून परत फिरलो. येताना खिशात लिहून ठेवलेल्या बस मार्गाच्या चिठ्या वाचत परत आलो.
अनुजाने केलेले झकास जेवण आमची वाट बघतच होते. आज जेवणात ब्रेडक्रंब चिकन, मश्रुम मसाला आणि खुसखुस नामक आपल्या कडच्या भगरी सारखा दिसणारा पदार्थ असा बेत होता. नंतर मँगो आईस्क्रीम ने धमाल आणली. चौघेही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारीत बसलो...
'लंडन डायरी'
३ ऑगस्ट २०१७.
भटकंती, शॉपिंग, फुल्लमस्ती !
लंडन मध्ये भटकताना मला सारखं वाटतं की इथे कामात व्यस्त असणारे लोक लगबगीनं कुठंतरी भराभर चालत, आपल्याच तंद्रीत जरी जाताना दिसत असले तरी रिकामटेकड्या लोकांचीही इथे काही कमी नाही. अर्थात या रिकामटेकड्या मंडळीत पर्यटकांची संख्या जास्त. दिवसातल्या कोणत्याही वेळी शहरातल्या रेस्टॉरंट्स मध्ये लोक बियर किंवा कॉफी पीत बसलेली असतात. प्रमुख चौकातल्या कोपऱ्यावरच्या बार मध्ये गर्दी ओसंडून वाहत असते. आतली जागा संपली की बाहेर उभे राहून बियर पिणे सुरूच! बाहेर फुटपाथवर उभे राहून बियरचे भलेमोठे ग्लास हातात घेऊन मोठयाने गप्पा मारत, खिदळणे इथल्या तरुणाईचा आवडता कार्यक्रम.
आज आम्ही कुठल्याही पर्यटन स्थळाला भेट न देता फक्त भटकंती करायची असं ठरवलं. घरापासून जवळच कॅम्डेन मार्केट आहे. तिथे शॉपिंग साठी कुठून कुठून लोक मुद्दाम येतात. अठराव्या शतकात कॅम्डेन हे लंडनच्या जवळ असलेलं छोटं गाव होतं. कॅम्डेन कॅनॉल मुळे जलवाहतुकीसाठी अतिशय सोईस्कर असलेल्या ह्या गावात घोड्यांच्या मोठ्या मोठ्या पागा बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे छोटं गाव पूर्वीच्या काळी वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र बनलं होतं. जिथे घोडे बांधले जात त्या पागांमध्ये आता कॅम्डेन मार्केट विकसित करण्यात आलंय. आपल्या तुळशीबागेत असतात तशी छोटी दुकानं, खरेदी करतानाची घासाघीस वगैरे अगदी तसेच! सर्व मिळत इथं! हे मार्केट इतकं मोठं आहे की तीनचार तास सहज जातात. या मार्केट मध्ये विविध प्रकारचं फास्ट फूड देखील मिळतं. जाणाऱ्या येणार्यांना पदार्थांचे छोटे तुकडे ऑफर करण्यात येतात. म्हणजे पदार्थ आवडला तरच विकत घ्यायचा...
मार्केट मध्ये भटकताना मला एका दुकानदाराने विचारले 'नमस्ते जी, क्या आप टी-शर्ट खरीदना चाहोगे?' मी चमकून त्या विक्रेत्याकडे बघितले. भारतीय तोंडावळा असलेला तो विक्रेता हसून हिंदीत विचारात होता. मी सुखावलो. त्याच्याशी चार हिंदीत गप्पा मारून मी पुढे निघालो. इथं काही भारतीय बनावटीच्या वस्तूंची दुकाने आहेत. त्याच बरोबर आफ्रिकन, चायनीज, थाई, टर्किश, जापनीज दुकाने देखील आहेत. लंडन शहराचं हे वैशिठ्य आहे की या शहरानं अनेक देशातल्या सर्व जातीधर्मातल्या लोकांना सामावून घेतलं आहे. शहरात फिरताना हे सारखं जाणवतं.
कॅम्डेन मार्केट मधून बाहेर पडल्यावर कॅम्डेन हाय स्ट्रीट वरून फिरताना 'पाऊंडलॅंड' नावाचे एक गंमतशीर दुकान दिसलं. या दुकानात कुठलीही वस्तू एक पौंडाला मिळते. (आपल्याकडे जशी ४९ - ९९ नावाची दुकानं पूर्वी दिसायची तशी) असंख्य वस्तू, कोणतीही घ्या किंमत फक्त एक पौंड! हे दुकान मला फार आवडलं.
नंतर आम्ही लंडनच्या मध्यवर्ती भागातल्या 'पिकॅडली' नावाच्या अतिशय गजबजलेल्या चौकात आलो. २००५ साली आम्ही केसरी टूर्स तर्फे इथे आलो होतो. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मग पुढे ऑक्सफर्ड स्ट्रीटवर भटकंती! हा भाग मुंबई सारख्या गर्दीने फुललेला. कधी बस ने, कधी चालत चालली होती आमची ही भटकंती! ऑक्सफर्ड स्ट्रीटवर एका मोठ्या चौकाच्या बाजूला 'मार्बल आर्च' नावाची संगमरवरी इमारत आहे. १८२७ साली बांधण्यात आलेली ही इमारत फारच आकर्षक आहे. या मार्बल आर्च पुढे 'हाईड पार्क' नावाचे मोठे उद्यान लागते. इथेही पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
ऑक्सफर्ड स्ट्रीट वर असलेल्या 'प्रायमार्क' नावाच्या मॉल मध्ये आम्ही शिरलो. स्वस्त कपडे, शूज, मिळणाऱ्या 'प्रायमार्क' साखळीतील हे शॉप म्हणजे शॉपिंग वेड्या लोकांसाठी खरेदीची पर्वणीच असते. ऑक्सफर्ड स्ट्रीटवर फिरताना तुम्हाला असंख्य लोकांच्या हातात प्रायमार्क मधून खरेदी केलेल्या सामानाच्या पिशव्या हमखास दिसतील. अलका हे दुकान बघून जाम खुश झाली. मग अपेक्षेप्रमाणे तिनं माझा खिसा थोडा हलका केलाच!
आज रात्री आमच्या कडे आमच्याच शेजारी राहणारे साऊथ इंडियन (तामिळी) 'अर्चिता आणि वरुण' हे जेवायला आले होते. इथे दोघेही मास्टर्स करण्यासाठी आले आहेत. दोघेही खूप गप्पिष्ठ आहेत. त्यांच्या बरोबर मस्त जेवण झालं. नंतर वरुण ने आणलेला 'तिकीट टू राईड' नावाचा एक गेम खेळत बसलो आम्ही सगळे! आज खूप धमाल दिवस गेला.
उद्या अनुजाच्या आत्याकडे जेवायला बोलावलंय. तिकडे जायचंय उद्या...
'लंडन डायरी'
४ ऑगस्ट २०१७.
लंडन ट्यूब, हेज अँड हॅर्लिंग्टन आणि विंडसर कॅसल (किल्ला)
लंडन शहर मुंबई प्रमाणेच अतिशय व्यस्त आणि गजबजलेलं शहर आहे. हजारो स्त्रीपुरुष घाईघाईत कुठेतरी जात येत असतात. या लंडनवासियांची प्रवासाची प्रमुख साधने म्हणजे बस आणि लंडन ट्यूब म्हणजे भुयारी रेल्वे! संपूर्ण लंडन शहराच्या खाली खोलवर जमिनीत या ट्यूब चे अक्षरशः जाळे पसरले आहे. दिवसरात्र या भुयारी रेल्वेगाड्या धडधड करीत लंडनवासीयांना कुठे ना कुठे नेत, आणत असतात. लंडन मध्ये भटकायचं असेल तर आणि थोडं लांब जायचं असेल तर लंडन ट्यूब शिवाय दुसरा पर्यायच नाही. संबंध लंडन शहराच्या भूगर्भात लंडन ट्यूब म्हणजे भुयारी रेल्वे एखादया जाळ्याप्रमाणे पसरली आहे. जगातील सर्वात जुनी भुयारी रेल्वे अशी हिची ख्याती आहे. रोज लाखो लंडनवासीयांना ती पोटात सामावून घेते आणि हवं तिथं नेऊन सोडते. सोईस्करतेमुळे लंडनवासीय ट्यूबने प्रवास करण्यासाठी गर्दी करतात. तशी गर्दी आपल्या मुंबईमधील लोकल मध्येही असते. पण लंडनमधल्या ट्यूब मधील गर्दीचा स्वभाव पूर्णपणे वेगळा. इथे आपल्या लोकल सारखी झुंबड नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, भांडणे नाहीत, घुसाघुसी नाही, चिडचिड नाही. ही गर्दी, गर्दी असूनही शांतपणे चालणारी असते. सर्व कसं शांतपणे... भरगच्च भरलेल्या गाडीत गाडीच्या चाकांच्या आवाजाखेरीज कसलाही आवाज नाही. प्रत्यकजण आपआपल्या तंद्रीत, वर्तमानपत्र किंवा एखादे पुस्तक वाचीत बसलेला, किंवा गर्दीत उभा असतो. इथे ट्यूब स्टेशनवर किंवा रेल्वे डब्यात गाणारे भिकारी अथवा कोणी विक्रेतेही नसतात. या ट्यूब मधून प्रवास करणे अगदी नवख्या माणसालाही सहज सोपे असते. कारण प्रत्येक स्टेशनवर, गाड्यांच्या प्रत्येक डब्यात प्लॅटफॉर्मवर जिथे तिथे रेल्वेमार्ग, स्टेशन्स ची माहिती देणारे नकाशे लावलेले असतात. प्रत्येक मार्ग वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्यांची दाखवलेला असतो. हे नकाशे समजायला इतके सोपे असतात की एखाद्या लहान मुलालाही ते समजावेत.
मला या लंडन ट्यूब मध्ये शिरताना सतत खालीवर होणारे, अजस्त्र मोठे सरकते जिने नेहेमी अचंबित करायचे. काही ठिकाणी तर जमिनीच्या खाली सत्तर ऐंशी फूट खोल असलेल्या ट्यूब मध्ये उतरताना या सरकत्या जिन्यांचे खालचे टोकही दिसत नाही. लंडनच्या मध्यभागात ही ट्यूब खूप खोलवर गेलेली आहे. या सरकत्या जिन्यावर उभे राहताना उजव्या बाजूला उभे राहायचे असते. कारण ज्यांना घाई असते असे लोक डाव्या बाजूने पटापट पळत जाऊ शकतात. मी बऱ्याच वेळा न कळत वेंधळ्यासारखा डाव्या बाजूलाच उभा राहायचो. मग हर्षवर्धन मला उजव्या बाजूला ओढून घ्यायचा. ट्यूब प्रमाणेच इथली भूमिगत रेल्वेस्टेशन्स देखील आश्चर्यकारक आहेत. पूर्वीच्या काळी अनेक खाजगी कंपन्या ही भुयारी रेल्वे चालवीत असत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी अतिशय भव्य बांधण्यात आली आहेत. व्हिक्टोरिया, चॅरिग्टन क्रॉस, वॉटर्लू, यूस्टन हि भूमिगत रेल्वे स्टेशन्स आपल्या मुंबईच्या व्ही.टी. स्टेशन पेक्षा कितीतरी मोठी आहेत.
ह्या लंडन ट्यूब ची सुरवात ९ जानेवारी १८६३ मध्ये झाली. पहिल्या ट्यूब साठी खोदाई, बांधकाम आणि महत्वाचं म्हणजे आर्थिक जबाबदारी 'मेट्रोपॉलिटियन रेल्वे' नावाच्या खाजगी कंपनीने उचलली होती. जवळजवळ दीड पावणे दोनशे वर्षात विकसित झालेल्या या ट्यूब चे जाळे अफाट आहे. शहराखाली अकरा मार्गावर धावणाऱ्या रेल्वे च्या मार्गाची लांबी सुमारे ४०० कि.मी. एव्हडी प्रचंड आहे. या ट्यूब च्या जाळ्यात २७० रेल्वेस्टेशन्स आहेत, आणि ही रेल्वे रोज सुमारे ५ लाख प्रवाशांची ने आण करत असते. जवळजवळ ४५ टक्के प्रवासी वाहतूक या जमिनीतल्या ट्यूब मधून होते. अपंग, वयस्क प्रवाशांसाठी या रेल्वेत खास व्यवस्था केलेली असते. जगातील सर्वात जुन्या आणि मोठे नेटवर्क असलेल्या या लंडन ट्यूब मधून प्रवास करणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव असतो. तो अनुभव घेण्याचा आज योग आला.
आज आम्हाला अनुजाच्या 'हेज अँड हॅर्लिंग्टन' येथे राहणाऱ्या अर्चना आत्याने घरी जेवायला बोलावलं होतं. त्यांच्या घरी जाण्यासाठी आम्हाला दोन ट्रेन्स बदलून जायला लागणार होतं, पैकी एक ओव्हर ग्राउंड रेल्वे होती. (इथे ५५ टक्के प्रवासी वाहतूक जमिनीवरून धावणाऱ्या रेल्वेने होते.) जाताना गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती. हेज अँड हॅर्लिंग्टन आणि आसपासच्या भागात पंजाबी लोक खूप मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे काही स्टेशन्स ची नावे पंजाबी लिपीत लिहिलेली दिसली. आम्हाला खूप गम्मत वाटली. तासा दीड तासानंतर आम्ही हेज अँड हॅर्लिंग्टन स्टेशनवर पोहोचलो. अर्चना आत्या आम्हाला न्यायला स्टेशनवर कार घेऊन आल्याच होत्या. त्यांचे घर स्टेशनपासून थोडं लांब होतं. घरी गेल्यावर अर्चना आत्याच्या सोळा वर्षाच्या मुलीनं 'अवनी नं आमचं स्वागत केलं. आम्हा दोघांना अवनी फार आवडते. खूप बडबडी आणि गोड मुलगी आहे. घरी आल्यावर थोड्यावेळ गप्पा मारून आम्ही संध्याकाळी 'विंडसर कॅसल' बघायला बाहेर पडलो. कार ने विंडसर कॅसल येथे पोहोचायला आम्हाला अर्धा तास लागला. त्या दरम्यान अर्चना आत्यांनी आम्हाला कॅसल बद्दल थोडी माहितीही सांगितली.
या किल्ल्यात म्हणे इंग्लंड ची राणी आणि कुटुंबीय थंडीच्या दिवसात किंवा सुट्टीसाठी इथे येऊन राहतात. थोडक्यात राजघराण्यातील मंडळींचे हे विकेंड होम म्हणता येईल. हे खूप प्राचीन म्हणजे ११ व्या शतकात बांधलेले आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सेनानी 'लुफतवाफ' हा इंग्लंड वर तुफानी बॉम्ब वर्षाव करत होता तेंव्हा राजघराण्यातल्या व्यक्तींनी या विंडसर च्या किल्ल्यात आश्रय घेतला होता म्हणे! असो...
जवळजवळ दोनअडीच तास आम्ही या छोट्या गावात फिरत होतो. हे गाव खूप छोटं आणि टुमदार आहे. सुंदर नदीकाठी असलेल्या या गावावर निसर्गाने अगदी कृपावर्षावच केला होता. रेखीव सुंदर रस्ते, सगळीकडे रंगीबेरंगी फुलांची उधळण. सर्वच फार सुंदर होते. तिथून निघायला मन तयार होईना.
आम्ही पुन्हा घरी आलो. रात्रीच्या जेवणासाठी आत्यांनी पालक पनीर, पंजाबी भेंडी मसाला, गरम गरम पोळ्या, चिकन बिर्याणी, शेवटी मस्त शेवयाची खीर असा बेत केला होता. खूप भूक लागली होती. गप्पा मारत मारत झकास जेवण झाले.
रात्री पुन्हा ट्यूब ने घरी परत आलो तेंव्हा साडेबारा वाजले होते. दिवसभराच्या धावपळीने थकलो होतो. अंथरुणावर पाठ टेकताच झोप कधी डोळ्यात शिरली ते कळलंच नाही...
'लंडन डायरी'
५ ऑगस्ट २०१७.
गुलाबांच्या फुलांची 'क्वीन्स गार्डन'
आज काही च काम नव्हते. कुठेही जायचे नव्हते. हर्षवर्धन आणि अनुजाला कुठल्याश्या मिटिंग ला जायचे होते. ते दिवसभर बाहेरच असणार होते. सकाळची वेळ अंघोळी, नाश्ता, जेवण आणि लिहिण्यात गेली. घरी बसून बसून कंटाळा आला होता. मग आज पुन्हा रिजेंट पार्क मध्ये जायचं ठरवलं. रिजेंट पार्क हे लंडनमधील अनेक मनोहारी उद्यानांपैकी एक आणि अतिशय वैशिष्ठ्यपुर्ण उद्यान आहे. तसं हे लंडनच्या मध्यवर्ती भागात नाही तरी देखील लंडनवासीय आणि पर्यटकांचं ते एक आकर्षणाचा ठिकाण बनलंय. तिसरा जॉर्ज राजा म्हातारा झाल्यावर त्याच्या वतीने त्याचा मुलगा प्रिन्स रिजंट राज्यकारभार सांभाळीत असे. त्याच्या कडे जॉन नॅश नावाचा वास्तुशिल्पी होता. त्याने इथल्या अनेक पुरातन कलात्मक इमारतींची आणि या उद्यानाची निर्मिती केली असा इतिहास आहे.
या रिजंट पार्क मध्ये एका मधल्या विस्तीर्ण वर्तुळाकार जागेत 'क्वीन मेरी रोझ गार्डन' आहे. रिजेंट पार्क इतकं मोठं आहे, की एका दिवसात ते बघून होत नाही. आज आम्ही पार्क मधील न पाहिलेल्या भागात फिरायचे ठरवले. अनुजा परवा बोलता बोलता म्हणाली होती कि रिजेंट पार्क मधल्या 'क्वीन्स गार्डन' मध्ये खूप गुलाबाच्या बागा आहेत. फुलं म्हणजे अलकाचा वीक पॉईंट आहे. आम्ही दुपारी तीन वाजताच बाहेर पडलो. आज कॅनाल च्या रस्त्याने न जाता वेगळ्याच रस्त्याने पार्क मध्ये शिरलो.
परवा ज्या भागात फिरलो होतो त्याच्या विरुद्ध दिशेने निघालो. स्वच्छ ऊन पडले होते. तासभर इकडेतिकडे भटकल्यावर भल्या मोठ्या वर्तुळाकार आकार असलेल्या 'क्वीन्स गार्डन' मध्ये शिरलो. या बागेत जिकडे बघावे तिकडे गुलाबाची फुलं दिसतात. लाल, पिवळे, गुलाबी असे गुलाबच गुलाब! प्रत्येक फुल ताजे, टपोरे दिसत होते. काही गुलाब तर आपल्या तळहाता एव्हडे मोठे! अलका इतकी खुश झाली होती की ती प्रत्येक फुलासमोर जाऊन 'ह्याचा फोटो काढा' असं म्हणायची. मी फोटो काढून काढून अक्षरशः दमलो. या क्वीन्स गार्डन मध्ये सुंदर कृत्रिम पाण्याचे प्रवाह सोडले आहेत. छोटे छोटे धबधबे तयार केलेले आहेत. इथंही बदके, पांढरे शुभ्र राजहंस पक्षी दिसतात. सुंदर कारंजी मनाला थंडावा देतात. बघता बघता साडेपाच वाजले.
तेव्हड्यात अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. सूर्य ढगात गेल्याने वातावरणातला थंडावा आणखीनच वाढला. अचानक पाऊसही सुरु झाला. आम्ही बरोबर छत्र्या नेल्याचं होत्या. आम्ही साधारण वीसपंचवीस मिनिटे पावसात फिरत होतो. पावसात फिरण्याचा एक वेगळाच अनुभव!
इथूनच पुढे एक ओपन एअर थेटर आहे. हे ओपन एअर थिएटर म्हणजे या उद्यानाचा वेगळेपण म्हणावे लागेल. हजार अकराशे प्रेक्षक सहज बसतील असे हे थिएटर १९३२ साली सुरु करण्यात आलं. इथे विशेषतः शेक्सपियरची नाटके अव्याहत सुरु असतात. आत कुठलेसे नाटक चालू होतं. पण पंचवीस प्रत्येकी तीस पौंड भरून नाटक पाहणे आमच्या जीवावर आलं. अलका म्हणाली 'त्यापेक्षा आपण निसर्ग अनुभवू या'! आम्ही पुढे चालत राहिलो. येताना अलका साठी आईस्क्रीम घेतले. आईस्क्रीम खातखात आम्ही नेहेमीच्या कॅनॉल कडेच्या रस्त्यावरून घरी परतलो. तेंव्हा सात वाजले होते.
घरी येऊन पाहतो तर हर्षवर्धन आणि अनुजा अजून घरी आलेले नव्हते. घरी एकटं बसून काय करायचं म्हणून पुन्हा बाहेर पडलो. कॅम्डेन रोड च्या डाव्या बाजूने फिरत फिरत निघालो. डावीकडे स्केटिंग ग्राउंड च्या बाजूने वळून केंटीश टाऊन पर्यंत गेलो. मधून मधून चौकाचौकात असणाऱ्या मॅप वरून अंदाज घेत फिरताना मजा येत होती. मॅप मुळे चुकण्याची शक्यताच नाही.कुणालाही काहीही विचारावे लागत नाही. थोडक्यात आता आम्ही लंडन मधे एकट्याने फिरण्यात तरबेज होऊ लागलो आहोत. हा..हा..
साडे आठ वाजत आले होते. आता थोडा अंधार पडायला सुरवात झाली होती. नऊ वाजेपर्यंत आम्ही घरी परत आलो. मुले पण आली होती. आजचा दिवस गुलाबाच्या बागेमुळे कायम स्मरणात राहील...
'लंडन डायरी'
६ ऑगस्ट २०१७.
'अद्भुत लंडन' आणि उद्या स्कॉटलंड...
दुपारी आम्ही चौघेही लंडनमध्ये भटकायला थोडे लवकरच बाहेर पडलो, कारण आज रात्रीच्या बस ने स्कॉटलंड च्या दौऱ्यावर जायचं होतं. स्कॉटलंड मध्ये आम्ही ग्लासगो,एडिनबर्ग आणि इन्व्हरनेस ही शहरे बघायची ठरवली होती.
सुरवातीला बार्बीकन सेंटर बघायला गेलो. बार्बीकन सेंटर ही इमारत अनेक प्रकारच्या कलांना जसे संगीत, साहित्य, नाट्य, वास्तुकला, शिल्पकला इ. ना उत्तेजन देण्यासाठी बांधलेली इमारत आहे. या इमारतीची मालकी सिटी ऑफ लंडन कॉर्पोरेशन यांच्याकडे असून व्यवस्थापनही त्यांच्याकडेच आहे. वास्तुशास्त्रातील अतिशय वेगळे वेगळे प्रयोग करून बांधलेली ही इमारत म्हणजे वास्तुशिल्पी मंडळींसाठी अतिशय आदर्श इमारत मानली जाते. हर्षवर्धन आणि अनुजा या इमारतीमधील बारकावे आणि इमारतीची वैशिष्टये सांगत होते.
बार्बीकन सेंटरच्या लगेच थोडं पुढे 'म्युझियम ऑफ लंडन' असून इथं लंडन शहराच्या इतिहासाचा, जडणघडणीचा आढावाच घेतला आहे. इथं लंडन शहराबद्दल अनेक प्रकारची मनोरंजक माहिती छान पद्धतीने दाखवली आहे. इसवीसन ५०, ६० सालापासून म्हणजे रोमन संस्कृती ते अगदी अलीकडच्या विसाव्या शतकापर्यंत लंडन शहराच्या जडणघडणीचा, प्रगतीचा मनोरंजक असा आढावा इथे दिसतो. ह्या म्युझियम ची स्थापना १९७५ च्या सुमारास करण्यात आली. या म्युझियमला लागूनच रोमन काळातली लंडन वॉल आहे. एका बाजूला दोन अडीच हजार वर्षापुर्वीची प्राचीन लंडन वॉल आणि दुसऱ्या बाजूला लागूनच वर्तमानातल्या उत्तुंग व्यापारी इमारती, असं मजेशीर चित्र दिसतं इथे! हे म्युझियम म्हणजे जवळजवळ सहा लाख ऐतिहासिक वस्तूंचे जगातलं सर्वात मोठं, अनोखं संग्रहालय आहे. प्रत्येक वर्षी इथं जवळजवळ एक ते दीड लाख पर्यटक भेट देतात.
१६६६ साली लंडन शहरामध्ये लागलेल्या भीषण घटनेच्या इतिहासाची थरारक अनुभूती आणि भीषणता इथे अनुभवता येते. २ सप्टेंबर १६६६ मध्ये जुन्या लंडन मध्ये एका बेकरीला आग लागली. पुढे ५ सप्टेंबर पर्यंत ही आग शहराच्या मोठ्या भागात पसरून धुमसत राहिली. ही आग एव्हडी मोठी होती की जवळ जवळ ८०,००० घरे भस्मसात झाली. ह्या भीषण आगीचा इतिहास इथे छोट्या डॉक्युमेंट्री च्या माध्यमातून पर्यटकांना दाखवला जातो. पर्यटक इथे कधीही येऊन इतिहासात डोकावू शकतात.
लंडन शहराची इथं खूप मनोरंजक माहितीही मिळते. दर वर्षी लोकसंख्येच्या ९ टक्के लोक लंडन मध्ये येतात, आणि ७ टक्के लोक लंडन सोडून जातात. लंडन मध्ये फक्त ४७ टक्के लोक स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात. बाकीचे भाड्याने घर घेऊन राहतात. इथे या शहरात सुमारे १२ टक्के माणसे ७५ वर्षांपुढील वयस्क असून त्यांना एकटेपणा सतावत असतो. प्रत्येक तीन लंडनवासीय नागरिकांपैकी एक इंग्लंड देशाबाहेर जन्मलेला आहे. लंडन मधील नागरिक रोज सरासरी चाळीस मिनिटे चालत असतात. लंडन शहरात एक स्क्वेअर किलोमीटर जागेत सरासरी ५,१९९ लोक राहतात आणि इतर उरलेल्या इंग्लंड च्या भागात हेच प्रमाण एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये सरासरी ३७१ लोक असे आहे, म्हणजे लंडन मधील दाट लोकवस्तीचा अंदाज येईल.
जवळपास आठ लाख लोक रोज लंडन च्या बाहेरून कामासाठी लंडन मध्ये येतात आणि परत घरी जातात. लंडनमध्ये रोज निर्माण होणाऱ्या, वापरलेल्या अशुद्ध ४०० कोटी लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते. हे शुद्ध पाणी पुन्हा थेम्स नदीत सोडले जाते. मध्य लंडनमधील चार चाकी वाहनांचा वेग सरासरी ताशी १३ कि.मी. एव्हडा कमी आहे. लंडन ट्यूब मधील ट्रेन्स तशी ३३ कि.मी. एव्हड्या वेगाने धावतात. लंडनची लोकसंख्या २०३० पर्यंत दहा मिलियन होण्याची शक्यता आहे. लंडन बद्दलची ही आणि अशी अद्भुत माहिती या म्युझियम मध्ये मिळते. सध्याच्या लंडनच्या परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यात लंडन कसे असेल याचा विचार करायला लावणारं असं हे ' म्युझियम ऑफ लंडन' म्हणजे एक अचाट प्रकार आहे.
अगदी नाईलाजानेच आम्ही म्युझियम ऑफ लंडन मधून बाहेर पडलो, कारण आज रात्री आम्हाला स्कॉटलंड च्या सहलीसाठी निघायचं होतं. आवराआवरी करून आम्ही रात्री १० वाजता लंडनच्या मेगॅबस च्या स्टॅन्ड वर आलो. गाडी वेळेवर निघाली. मला रात्री गाडीत झोप लागली नाही. रात्रभर मनात विचार येत होते... म्युझियम ऑफ लंडन च्या धर्तीवर पुण्याच्या इतिहासावर आणि सद्यःपरिस्थितीवर विचार करायला लावणारं असंच एखादं म्युझियम आपल्याकडे होऊ शकेल का? काय केलं म्हणजे पर्यटकांना पुण्यात आकर्षित करता येईल? आपली आणि आपल्या राजकारण्यांची मानसिकता कशी बदलता येईल? विचार करता करता बसमध्ये कधीतरी पहाटे पहाटे डोळा लागला...
'लंडन (स्कॉटलंड) डायरी'
७ ऑगस्ट २०१७.
निसर्गाचं वरदान लाभलेलं स्कॉटलंड - 'ग्लासगो'
लंडनहून रात्री दहा वाजता निघालेली आमची बस सकाळी सहा वाजता लंडनच्या उत्तरेकडील ग्लासगो मध्ये पोहोचली. खूप उत्तरेला आल्यामुळे इकडे सकाळी पाचलाच दिवस उजाडतो आणि रात्री दहा साडेदहाला मावळतो. दिवस खूप मोठे असतात. त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला. माझ्या डोक्यातल्या विचारांबरोबर प्रवासात बस बाहेर रात्रभर पाऊस पडत होता. मी जागाच होतो. मी काळजीत पडलो. 'पावसामुळे ट्रिपचा बेरंग तर नाहीना होणार?' पण सुदैवाने ग्लासगो स्टॅन्ड वर उतरलो तेंव्हा पाऊस थांबला होता. उतारताक्षणी जाणवली ती म्हणजे प्रचंड बोचरी थंडी! थंडीने अक्षरशः कुडकुडत होतो आम्ही सगळे..
बाहेर येऊन टॅक्सी करून आम्ही 'एअर बी एन बी' च्या वेबसाईट वरून बुक केलेल्या घरी पोहोचलो. हे आमचे ग्लासगो मधील घर म्हणजे दोन बेडरूम, किचन, हॉल असा व्यवस्थित फ्लॅटच होता. फ्लॅटचा मालक 'मायकल' याने संपूर्ण घराची माहिती दिली, आणि किल्ल्या देऊन तो निघून गेला. सर्वप्रथम आम्ही या घरातले रुमहीटर्स चालू केले तेंव्हा कुठे आमच्या अंगातली थंडी थोडी कमी झाली.
घर सर्व सोयींनी परिपूर्ण होतं. जसं फ्रिज मधील दुधापासून, भाजीत घालायचे मसाले (अर्थात युरोपियन), स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, इस्त्री, भरपूर पांघरुणे ते बाथरूम मधील साबणे, शाम्पू पर्यंत सगळेकाही! एव्हडेच काय पण मोबाईल चार्जिंगच्या चार्जर आणि अडाप्टर सुद्धा होते. बाहेरून आवश्यक सामान आणून आम्ही इथल्या किचन मध्ये नाश्ता, जेवण बनवू शकत होतो. चौघांचे बाहेरच्या एका वेळच्या जेवणाला पंचवीस ते तीस पौंड लागायचे. घरी स्वयंपाक करून जेवले तर खूपच पैसे वाचतात. मॉल मधून ब्रेड, अंडी, तयार पोळ्या, फळे असं आणून खूप स्वस्तात जेवण व्हायचे आमचे. आम्ही इथे असलेल्या कुकरमध्ये भात देखील करायचो. स्कॉटलंड मधल्या दोन (ग्लासगो आणि एडिनबर्ग) शहरात आम्ही अशीच घरे घेतली आहेत.
दहा वाजेपर्यंत आवरून आम्ही चालतच बाहेर पडलो. सुदैवाने छान ऊन पडलं होतं. त्यामुळे बोचरी थंडी थोडी सुसह्य झाली होती. ग्लासगो शहरातले रस्ते चढ उतारांचे आहेत. आम्ही थोडे शहराच्या बाहेरच्या भागात राहत असल्याने रस्तावर गर्दी कमीच होती. चालत चालत आम्ही 'ग्लासगो युनिव्हर्सिटी' बघायला गेलो. १४५० साली सुरु झालेली हि युनिव्हर्सिटी जगातली सर्वात जुनी शिक्षणसंस्था मानली जाते. सर्व प्रकारचे तांत्रिक शिक्षण, कायदा, वैद्यकीय, नर्सिंग, सामाजिक शास्त्र, पशुवैद्यकीय शास्त्र, या बरोबरच कलेच्या नेक शाखांचे इथे शिक्षण दिले जाते. या युनिव्हर्सिटीत जगातल्या अनेक देशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. युनिव्हर्सिटीतील इमारतीही अतिशय जुन्या, प्रचंड मोठ्या आणि कलाकुसरीचे काम केलेल्या आहेत. इथून पुढे लागूनच ग्लासगो शहरातून वाहणारी 'केल्व्हिन' नावाची सुंदर नदी आहे.
नदी ओलांडून गेल्यावर पुढे आम्ही 'केल्व्हिनग्रोव्ह आर्ट गॅलरी' आणि म्युझियम बघितले. इकडे इंग्लंड किंवा युरोप मध्ये म्युझियम्स भरपूर. इतिहास, कला कशा जपून ठेवाव्यात हे या युरोपियनांकडून शिकायला पाहिजे. इथल्या एका दालनात एका स्त्रीच्या पुतळ्याला साडी नेसवून ठेवली होती. तिथे लिहिले होते 'साडी सारखे कपडे म्हणजे देखील एक कला आहे. एक साधा सरळ कापडाचा लांब तुकडा जेंव्हा तुम्ही स्वतःभोवती गुंडाळता त्या सपाट असलेल्या कापडाचे रूपांतर थ्री डायमेन्शल स्वरूपात बदलते. साडीला नेसताना घातलेल्या निऱ्या (फोल्ड्स) म्हणजे एकप्रकारचा कलाविष्कारच होय.' मी थकलोच! च्यामारी हा असा विचार मी कधी केलाच नव्हता. हर्षवर्धन म्हणाला 'एखाद्या गोष्टीकडे आपण कसे बघतो त्यावर सर्व असते.' मला काही कलाकृतींचा, पेंटीग्जचा अर्थबोध होत नसे. त्यावर हर्षवर्धन मला एकदा म्हणाला ' कलाकार अनेक गोष्टीतून, वेगवेगळ्या पद्धतीने, त्याला वाटणाऱ्या, जाणवणाऱ्या भावना त्याच्या कलेतून व्यक्त करत असतो. बघणाऱ्याची उत्सुकता तो वेगेवेगळ्या आविष्कारातून वाढवत असतो. आपण बघणाऱ्यांनी देखील त्यांच्या कलाकृती समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या कलाविष्कारांचा आनंद घेता येतो.' त्यानंतर मला म्युझियम्स बघताना कधीच कंटाळा आला नाही.
या आर्ट गॅलरी मध्ये रोज दुपारी एक वाजता पर्यटकांसाठी एक कलाकार 'पाईप ऑर्गन' चे वादन करतो. आम्ही सुदैवाने एक वाजताच तिथे होतो. आम्हाला हा कार्यक्रम ऐकायला मिळाला. ह्या ऑर्गन चे धीरगंभीर सूर संपूर्ण म्युझियम चे वातावरण भारून टाकत होते. विशेष म्हणजे हा अफलातून कलाकार ऑर्गन वाजवताना हाताबरोबर पायाचादेखील लीलया वापर करत होता. या आर्टगॅलरीमधून आम्ही अडीचतीन वाजता बाहेर पडलो. सपाटून भूक लागली होती. मग समोरच्याच एका रेस्टोरंट मध्ये चिकन बर्गर, फ्रेंच फ्राईज फस्त केले.
थंडीमुळे दुपारचे ऊन काहीच जाणवत नव्हते. पुढे लांबवर कसल्याश्या संगीताचा आवाज ऐकू आला. हर्षवर्धन म्हणाला 'चला! तुम्हाला स्कॉटलंडच्या पूर्वापार प्रचलित असलेल्या बॅगपायपर नावाच्या वाद्यावर वाजवलं जाणारं लोकसंगीत ऐकवतो. पुढे बहुदा कोणीतरी वाजवतायंत ते वाद्य!' आम्ही उत्सुकतेने पुढे गेलो. एका इमारतीच्या आवारात दहापंधरा वादक 'बॅगपायपर' वर कुठल्याश्या लोकसंगीताची प्रॅक्टिस करत होते. हे लोकसंगीत पाहणे, ऐकणे एक वेगळाच अनुभव होता. इथं आम्ही बराच वेळ रेंगाळलो.
पुढच्याच चौकात असलेल्या ग्लासगो कॅथेड्रल ला आम्ही गेलो. हे दोन मजली कॅथेड्रल वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. संध्याकाळचे पाच वाजत आले होते. कॅथेड्रलच्या मागच्याच बाजूला टेकडीवर 'नेक्रोपोलिस' नावाचं एक ठिकाण आहे. इथे ग्लासगो मधील पूर्वीच्या काळातील महत्वाच्या आणि श्रीमंत व्यक्तींची थडगी आहेत. पाहता पाहता संध्याकाळचे सहा वाजले. इतक्या लवकर घरी जाऊन काय करायचे त्यापेक्षा सिटीसेंटर भागात जाऊन भटकू या असा विचार करून आम्ही ग्लासगो मधील मध्यवर्ती, गर्दी असलेल्या भागात भटकत राहिलो. मोठी शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रेस्टोरंटस, पब्ज असलेल्या भागात भटकताना मजा आली.
'लंडन (स्कॉटलंड) डायरी'
८ ऑगस्ट २०१७.
ग्लासगो - स्वर्गीय सौंदर्य - 'लॉख लोमॉन्ड.'
आज सकाळी बराच वेळ लिहिण्यात घालवला. दिवसभर बाहेर भटकण्यामुळे डायरी लिहायला वेळच मिळत नाही. त्यामुळे लवकरच उठून डायरी लिहीत बसलो. आज आम्ही कार भाड्याने घेऊन 'लॉख लोमोंड' नावाच्या निसर्गरम्य ठिकाणी जाणार होतो. लॉख म्हणजे तळे! इंग्रजीतल्या 'लेक' शी सलगी करणारा हा स्कॉटिश शब्द आहे. ग्लासगो पासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर हे निसर्गरम्य तळ असून इथे दाट जंगल आणि एक नॅशनल पार्क देखील आहे. आम्हाला हे ठिकाण बघायची खूप उत्सुकता होती.
सकाळी दहा वाजता कार भाड्याने घेण्यासाठी गेलो. खरं तर आम्ही स्वस्तातली छोटी साधी कार बुक केली होती. पण काय झालं कोण जाणे छोटी कार उपलब्ध नव्हती. मग नाईलाजानेच त्या कारवाल्याने उपलब्ध असलेली एक कार देऊ केली. ही कार चक्क निळ्या रंगाची मर्सिडीज होती. मग काय धमाल! सुरवातीला गाडीतील सोयी, बटणे समजून घेण्यातच पाचदहा मिनिटे गेली. आता औटघटकेचे का होईना आम्ही मर्सिडीज चे मालक होतो. एका दिवसासाठी कारचे चाळीस पौंड भाडे आणि पंधरा पौंडाचा इन्शुरन्स एव्हडा खर्च होता.
'लॉख लोमॉन्ड' हे निसर्गरम्य डोंगरदऱ्या, जंगले असलेलं अतिशय सुंदर ठिकाण आहे. इथूनच ग्लासगो शहराला शुद्ध पाण्याचा अखंड पुरवठा होतो. इथं असलेला तलाव काही किलोमीटर्स लांबच लांब आहे. हा तलाव स्कॉटलंड मधील सर्वात मोठा तलाव आहे. इथल्या निसर्गसौंदर्याला भुलून पर्यटक इथे ट्रॅकिंग, सायकलिंग, स्विमिंग आणि भटकंती करण्यासाठी गर्दी करतात. निसर्गाने आपल्या सौंदर्याची इथं मुक्त उधळण केली आहे. ग्लासगो मधून निघाल्यावर आम्ही आमच्या मर्सिडीज मधून प्रवास करत दीड तासाने लॉख लोमॉन्ड इथं पोहोचलो तेंव्हा छान ऊन पडले होते. पण थोडाच वेळ हा आनंद टिकला. पंधरा वीस मिनिटांनी अचानक वातावरण बदलले. जोराने थंड वारे वाहू लागले. जोरदार पावसाला सुरवात झाली. तिथल्याच एका कॉफीशॉप चा आसरा घ्यावा लागला. अर्ध्या तासाचे तांडव संपल्यावर मात्र पुन्हा ऊन पडले. स्वच्छ हवा, थंडगार वारा, उबदार ऊन असे खूप मस्त वातावरण होतं इथे. तळ्यात छोट्या मोठ्या बोटी जात येत होत्या. इथे आम्ही बराचवेळ भटकलो. परतीचा प्रवासही तळ्याच्या काठाकाठानेच होत होता. मधेच तळ्याच्या काठी आम्ही थांबलो. समुद्र किनाऱ्याप्रमाणे वाळू असलेल्या तळ्याच्या किनाऱ्यावर आम्ही संध्याकाळ घालवली. तळ्याच्या अथांग पाण्यावर चपट्या दगडांच्या भाकऱ्या उडवल्या. भरपूर फोटो काढले.
परत येताना वाटेतल्या लूस, हेलेनबर्ग यासारख्या टुमदार छोट्या छोट्या गावातून फेरफाटाही मारला. आम्ही कार भाड्याने घेऊन इथे आल्यामुळेच हे असं भटकणं शक्य झालं. ग्लासगो मध्ये आल्यावर सायन्स सेंटर आणि रिव्हर साईड म्युझियम च्या आकर्षक इमारती बाहेरूनच पहिल्या. तसही आता म्युझियम्स बघायचा आता थोडा कंटाळाही आला होता. ग्लासगो शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामातील क्षण आठवतच आम्ही झोपी गेलो. उद्या एडिनबर्गला जायचं होतं. (मर्सिडीज खरं तर आजच परत करायची होती, पण ती आलिशान कार परत करवेना. कारवाल्याची परवानगी काढून सकाळी परत करायची ठरवलं. तेव्हडाच मर्सिडीज चा आणखीन थोडा सहवास.. हा..हा..)
'लंडन (स्कॉटलंड) डायरी'
९ ऑगस्ट २०१७.
स्कॉटलंडची राजधानी 'एडिनबर्ग'.
सकाळी लवकर आवरून मर्सिडीज कार परत करण्यासाठी हर्षवर्धन आणि अनुजा गेले तेंव्हा आम्हाला त्यांनी ग्लासगो मधील मध्यवर्ती असलेल्या 'जॉर्ज स्क्वेअर' ला सोडले. जवळजवळ तास दीडतास आम्ही ऊन खात त्या चौकातल्या मोकळ्या जागेत असलेल्या बेंचवर बसून आजूबाजूला असलेली वर्दळ बघत बसलो होतो. कबुतरांचे थवे लोकांनी टाकलेले खाद्यपदार्थ खाण्यासाठी लगबग करीत होते. इथला हा वेळ पुण्याहून आणलेल्या बाकरवड्या आणि गुळाच्या पोळ्या खात कसा गेला ते कळलंच नाही.
बरोब्बर दहा वाजता आमच्या बस ने ग्लासगो सोडले. इथून एडिनबर्ग शहर जवळच आहे. साधारण तासाभरातच आम्ही 'एडिनबर्ग' ला पोहोचलो. एडिनबर्ग शहराच्या मध्यवर्ती भागातच आमचे इथले एअर बी एन बी मध्ये बुक केलेले घर होते. एका मध्यमवयीन बाईच्या घरातल्या पहिल्या मजल्यावरच्या दोन बेडरूम्स आम्हाला मिळाल्या होत्या. मात्र ग्लासगो मधील घराप्रमाणे हे घर मोठे नव्हते. किचन कॉमन होते. ह्या घराची मालकीण खूप बडबडी होती. तिचे स्कॉटिश वळणाचे इंग्रजी आम्हाला कळायला अवघड जायचे.
साडेअकरा वाजेपर्यंत आवरून एडिनबर्ग शहरात भटकायला आम्ही घराच्या बाहेर पडलो. एडिनबर्ग ग्लासगो सारखे टुमदार आहे. स्वच्छ निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर काळसर तपकिरी रंगांची एकसारखी घरे दिसत होती. एडिनबर्ग शहरात प्रवाशांच्या वाहतुकीसाठी सिटीबस बरोबरच विजेवर चालणारी ट्राम देखील आहे. या शहराचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. एक जुने प्राचीन शहर आणि त्याला लागूनच नवीन वसलेलं शहर! आज आम्ही नवीन शहरात फिरायचं ठरवलं होतं कारण दुसऱ्या दिवशी जुनं ऐतिहासिक शहर बघण्यासाठी एक वॉक बुक केला होता.
चालतच आम्ही इथलं 'रॉयल बोटॅनिकल गार्डन' बघण्यासाठी निघालो. स्कॉटलँड मधल्या सर्वच शहरातील रस्ते चढ उताराचे आहेत, तसे इथलेही होते. निसर्गातील विविध वनस्पतींच्या, झाडांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी विकसित केलेलं हे रॉयल बोटॅनिकल गार्डन पर्यटकांचं अतिशय आवडीचं आणि आकर्षणाचं ठिकाण आहे. फार पूर्वी म्हणजे १६७० साली स्थापन झालेलं हे बोटॅनिकल गार्डन जगातील सर्वात मोठे वनस्पती संग्रहालय म्हणून ओळखले जाते. या बोटॅनिकल गार्डन मध्ये सुंदर रस्ते, आणि मोठाल्या हिरवळीची मैदाने, असंख्य जातीची झाडे आहेत. जगातल्या अनेक प्रांतातल्या वैषिठ्यपुर्ण वनस्पती गोळा करून इथे विभागवार लावून ठेवल्या आहेत. उष्णकटिबंधातली झाडे ग्लासहाऊस मध्ये योग्य तापमान राखून वाढवलेली आहेत. इथे भारतीय आणि उपखंडातील वनस्पतींसाठी स्वतंत्र विभाग आहे. हे सर्व अतिशय पाहण्यासारखे आहे. आम्ही इथे अडीचतीन तास भटकत होतो. दुपारचे जेवणही आम्ही इथल्या एका हिरवळीवर बसून केले.
एडिनबर्ग चा उच्चार काहीजण 'एडिनबरो' असाही करतात. एडिनबर्ग ला 'फ्रीन्झ फेस्टिव्हल' साठी पर्यटक गर्दी करतात. उन्हाळ्यात हा उत्सव असतो. ऑगस्ट महिन्यात तीन आठवडे हा उत्सव साजरा केला जातो. सुदैवाने आमच्या इथल्या मुक्कामात हा फेस्टिव्हल चालू होता. रस्त्यावर फिरताना हे उत्सवाचे वातावरण जाणवत होते. या उत्सवात प्रत्येक वर्षी जगभरातील कलाकार आपली कला सादर करतात. यात कॉमेडी, नाट्यकला, नृत्यकला, सर्कस, बालनाट्ये, ऑपेरा, संगीत अश्या नानाविध कला सादर होतात. अश्या काही कार्यक्रमांना तिकिटे असतात. ज्यांना हे तिकीटदर परवडत नाहीत अश्या सामान्यांसाठी रस्त्यावरही हे कलाकार आपल्या कला सादर करतात. अर्थात हे सर्व अनुभवण्यासाठी इथे दोन आठवडे तरी इथं राहायला हवं.
नव्या शहरातून फिरत फिरत आम्ही जुन्या एडिनबर्ग च्या मध्यावर असलेल्या Calton हिल कडे आम्ही गेलो. इथे नॅशनल मॉन्युमेंट, नेल्सन मॉन्युमेंट अशी अनेक प्राचीन मॉन्यूमेन्ट्स आहेत. इथे ओल्ड Calton जेल देखील आहे. रात्रीचे आठ वाजले होते. अजून सूर्य मावळला नव्हता. इथून एडिनबर्ग शहराच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्त फारच सुंदर दिसतो. सूर्यास्तानंतर रमतगमत आम्ही साधारण दहा वाजता घरी आलो. आज आम्ही फ्रोझन पिझ्झा आणला होता. तो ओव्हन मध्ये घालून तयार केला. आज सूप, पिझ्झा, ब्रेड, फळे असं झकास जेवण झालं. घरातील रुमहीटर्स मुळे थंडी कमी झाली होती. गुबगुबीत पांघरुणात गुरफटून गेल्यावर झोप कधी लागली ते कळलंच नाही...
'लंडन (स्कॉटलंड) डायरी'
१० ऑगस्ट २०१७.
एडिनबर्ग - 'फ्रीन्झ फेस्टिव्हल' ची धमाल.
आजचा ब्रेकफास्ट हर्षवर्धनच्या मित्र मैत्रिणींच्या बरोबर एका रेस्टोरंट मध्ये करायचा ठरला होता. हे सर्व मित्र हर्षवर्धन बरोबर पीएचडी करण्यासाठी लंडनला आले होते. ते ही योगायोगाने एडिनबर्ग बघण्यासाठी इथं आले होते. सगळ्यांना भेटून छान वाटलं. त्यांच्या बरोबर ब्रेकफास्ट, कॉफी आणि गप्पा झाल्या. आम्ही आधीच बुक केलेला एडिनबर्ग वॉक मात्र त्यामुळे हुकला. आम्हाला तिथं पोहोचायला जरा उशीर झाला. वेळेचा अंदाज चुकला. त्यामुळं आम्ही थोडे हिरमुसलो. हर्षवर्धन म्हणाला 'काही हरकत नाही, इथं बघायला खूप गोष्टी आहेत. फार अफाट शहर आहे हे. आपण नॅशनल म्युझियम ऑफ स्कॉटलंड बघुयात.'
नॅशनल म्युझियम ऑफ स्कॉटलंड म्हणजे अतिशय आश्चर्यजनक गोष्टींचा संग्रह आहे. स्कॉटलंडच्या संस्कृतीचा, इतिहासाचा अनोखा खजिनाच आहे. जवळजवळ तीन तास आम्ही म्युझियम मध्ये होतो पण दहा तक्के सुद्धा भाग पाहून झाला नाही, इतकं अवाढव्य असं म्युझियम आहे हे. यात एके ठिकाणी एक रोबोट ठेवला होता. त्याच्या आजूबाजूला पडलेल्या अक्षरांच्या ठोकळ्यांची जुळवणी करून हा रोबोट समोरच्या पर्यटकांचे नाव लिहायचा. मग हर्षवर्धनने त्याचे नाव तिथल्या स्क्रीनवर लिहिले, आणि त्या रोबोट ने हर्षवर्धन अशी अक्षरे जुळवली. खूप धमाल वाटली आम्हाला. ज्या भागात फ्रीन्झ फेस्टव्हल असतो त्या भागाकडे आम्ही वळलो.
हा फ्रीन्झ फेस्टव्हल प्रत्यकाने अनुभवायलाच हवा. संपूर्ण एडिनबर्ग शहरच रस्तावर उतरलेलं असतं. लहान, थोर, वयस्क सर्वच या उत्सवात सामील होतात. रस्त्यावरच चौकाचौकात अनेक देशोदेशीचे कलाकार आपापली कला सादर करीत होते. आम्हीही गर्दीत मिसळून गेलो होतो. इथे सकाळपासून मध्यरात्री उशिरा पर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. मात्र ह्या कार्यक्रमांना तिकीट असते. या अशा कार्यक्रमाची जाहिरात करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काहीजण कार्यक्रमांची माहितीपत्रके वाटत असतात. पर्यटक आकृष्ठ करण्यासाठी हि माणसे मजेशीर वेशभूषा करतात. कुठे चारपाच जणांचा ग्रुप नाचत नाचत, कुणी जादूचे प्रयोग करून, तर कुणी सर्कशीत करतात तशी कसरत करून पर्यटकांना तिकिटे घ्यायला प्रवृत्त करतात.
खाद्यपदार्थांची तर इथे रेलचेल असते. सगळीकडे धमाल उत्साही वातावरण होते. फेस्टिव्हलच्या तीन आठवड्यात इतकी गर्दी आणि धमाल असते, पण मात्र उन्हाळा संपला की मात्र पर्यटकांची गर्दी ओसरते. थंडीत तर बर्फवृष्टी, थंड वारे यामुळे एडिनबर्ग मध्ये शुकशुकाट असतो. ह्या गर्दीत आम्हाला कुठलेसे एक चर्च दिसले. आम्ही ते पाहण्यासाठी आत गेलो. आत अतिशय शांतता होती. बाहेरच्या गर्दीचा, गोंगाटाचा मागमूसही नव्हता.
ह्या फ्रीन्झ च्या उत्सवी वातावरणातून आमचा पायच निघत नव्हता. रात्री नऊ वाजता आम्ही घरी निघालो. रात्रीच्या जेवणासाठी सुपरमार्केट मधून चिकन मश्रुम पफ, मेक्सिकन राईस, ब्रेड (आणि माझ्यासाठी मस्त कुठलीशी स्कॉटिश वाईन) घेऊन, घरी येऊन यथेच्छ जेवलो. झोप डोळ्यात उतरण्यासाठी आतुरतेने वाटच बघत होती. ठार झोपी गेलो...
'लंडन (स्कॉटलंड) डायरी'
११ ऑगस्ट २०१७.
इंग्लंड चे उत्तर टोक.. 'इन्व्हरनेस'
युनायटेड किंगडम च्या उत्तर दिशेकडील इन्व्हरनेस हे सर्वात शेवटचे मोठे शहर म्हणता येईल. स्कॉटलंड मधील सर्वात वेगानं वाढणारं, विकसित होणारं असं या शहराचं वैशिठ्य आहे. या निसर्गाचं वरदान लाभलेल्या शहराच्या मध्यातून 'नेस' नावाची अतिशय सुंदर, खळखळणारी नदी वाहते. या शहरानंतर लगेचच पुढे ही नदी उत्तर समुद्राला मिळते. इथल्या मूळ गेलिक (Gaelic) भाषेनुसार इन्व्हरनेस म्हणजे नेस नदीचं तोंड किंवा मुख! हे सुंदर शहर स्कॉटिश हायलँड ची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
नेहेमीप्रमाणे थोडं लवकरच आवरून आम्ही एडिनबर्ग बस स्टँडवर आलो. आमची बस नऊ वाजता निघाली. एडिनबर्ग पासून सुमारे २५० कि.मी. अंतरावर असलेल्या इन्व्हरनेस शहराबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. मी तरी ह्या शहराबद्दल काही ऐकलेले नव्हते. दुपारी दोन च्या सुमारास आम्ही इन्व्हरनेस ला पोहोचलो. इथले राहण्याचे आमचे ठिकाण 'सिटी हॉस्टेल' खूप मजेशीर होते. पर्यटकांसाठी अतिशय स्वस्तात राहण्यासाठी अशाप्रकारची होस्टेल्स असतात. कुठल्यातरी खूप जुन्या, कदाचित ऐतिहासिक असणाऱ्या इमारतीचे रूपांतर हॉस्टेल मध्ये केले आहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातील 'हाय स्ट्रीट' वर हे हॉस्टेल आहे. एकाच खोलीत चार बंकबेड्स होते. एकावर एक अश्या कॉट्स होत्या. गाद्या, उशा, आणि पांघरुणांना घालण्यासाठी अभ्रे किंवा खोळ ताब्यात घेऊन आम्ही आम्ही रूम मध्ये गेलो.
आमची खोली तशी अडचणीचीच होती. पण हा ही एक गंमतशीर अनुभव होता. चार पाच खोल्यांना मिळून एका टॉयलेट ची व्यवस्था होती. आमची खोली तिसऱ्या मजल्यावर होती. पहिल्या मजल्यावर एक भलीमोठी कॉमन रूम होती. कॉमनरूम मध्ये एक मोठा टीव्ही स्क्रीन, गेम्स, पूल टेबल या सारखी करमणुकीची साधने होती. त्याला लागूनच एक मोठे कॉमन किचन होते. किचन देखील सर्व सोयींनी परिपूर्ण होते. सुपरमार्केट मधून दूध, ब्रेड, अंडी, भाज्या, तांदूळ आणून आपआपला स्वयंपाक पर्यटकांनी करायचा, आणि कॉमनरूम मधील डायनिंग टेबलावर बसून जेवायचे असा एकूण इथला प्रकार! एखादा पदार्थ उरला तर एका विशिष्ठ कपाटात (ज्याला 'फ्री कबर्ड' अशी पाटी लावली होती) ठेऊन द्यायचा. हे उरलेले पण चांगले पदार्थ पुढील पर्यटकांना वापरता येतात, आणि पर्यटक हे पदार्थ वापरतात देखील! इथे ट्रेकिंग, सायकलिंग करून स्कॉटलंडच्या दऱ्याखोऱ्यात भटकणाऱ्या तरुण पर्यटकांना अश्या सोयी खूप फायद्याच्या ठरतात.
आम्ही खूप उत्तरेला आलेलो असल्याने इथं थंडी अफाट होती. इकडे बोचरे वारे जरा जास्तच होते. इथे देखील हर्षवर्धनने एक मस्त कार भाड्याने घेतली. आज दुपारी चार ते उद्या संध्याकाळी पाच पर्यंत हि कार आमच्या ताब्यात राहणार होती. आज 'लॉख नेस' म्हणजेच 'नेस' नावाच्या प्रचंड आणि काही कि.मी. लांबट आकाराच्या तळ्याच्या काठाने भटकत इथल्या निसर्गाचा आनंद लुटायचा असं ठरवून आम्ही निघालो. सोबत गुगल मॅप आणि सॅटेलाईट नॅव्हिगेशन सिस्टीम (Sat Nav) होतेच!
इन्व्हरनेस शहरापासून नेस तळ्याच्या काठाने अगदी शेवटी फोर्ट ऑगस्टस पर्यंतचा साधारणपणे ८० ते १०० कि.मी. चा प्रवास म्हणजे एक अफाट अनुभव होता. या नेस तळ्याच्या काठाकाठाने असणाऱ्या रस्त्यावरून जाताना उजव्या बाजूला सतत तळे दिसत राहते तर डाव्या बाजूला हिरवे डोंगर, मोठाल्या हिरवळी ! रस्त्याच्या दुतर्फा सुरुची सारखी उभी, उंच च्या उंच टोकदार झाडे. त्यामागे दूरवर पसरलेली हिरवळ. हिरवळीवर चरणाऱ्या धष्टपुष्ट गायी. मेंढ्या दिसत होत्या. अधून मधून दिसणारे स्वच्छ पाण्याचे खळखळणारे प्रवाह मन प्रसन्न करत होते. त्यापलीकडे दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर ऊन, सावलीचे लपंडाव चालू होते. मी न कळत इथल्या निसर्गाची तुलना आपल्या कोकणातल्या निसर्गाशी करू लागलो. इथले डोंगरदऱ्या सुंदर असल्या तरी सह्याद्रीचा रांगडेपणा इथल्या निसर्गात नाही. आपल्या कोकणातल्या उन्मत्तपणे कोसळणाऱ्या रौद्र पावसाची सर इथल्या पावसाला नाही. इथला निसर्ग शिस्तबद्ध, एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर चितारलेल्या अप्रतिम निसर्गचित्रासारखा!
या रस्त्याने जाताना 'फॉयर फॉल्स' नावाचा प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा लागतो. जंगलातल्या एका आडवाटेवरून जाऊन एका खोल दरीत उतरताना हा फॉयर फॉल दिसतो. हा धबधबा मात्र रौद्र रूपात दिसतो. इथून परताना आम्हाला थोडा पाऊस लागला. तिथल्या कॉफीशॉप मध्ये मग कॉफी घेतली. इथे थंड हवामानात, पावसात कॉफी पिण्याची मजा कुछ और ही है! पुढे जाताना आम्हाला काही बारशिंगी जातीतले हरणांचे काळपही दिसले.
पुढे गेल्यावर काही पर्यटक आपापल्या गाड्या लावून कसलीशी पाटी वाचत होते म्हणून थांबलो. त्या पाटीवर लिहिलेल्या माहितीवरून असे समजले की इथे एक छोटा ट्रेक असून निसर्गाचे विलोभनीय अविष्कार इथे दिसतात. आम्हीही ह्या ट्रेकचा आनंद घ्यायचा ठरवला. रस्त्यावरच गाडी लावून एका छोट्या रानवाटेवरून आम्ही समोरच्या डोंगराची चढण चढायला सुरवात केली. संध्याकाचे सात वाजले होते. इथे मात्र निसर्गाचं रौद्र रूप अनुभवायला मिळालं. बेफाम सोसाट्याचा वारा, कडाक्याची थंडी असल्याने आम्ही पार गारठलो. बरोबर स्वेटर्स, मफलर, असे जे जे म्हणून आणले होते ते ते अंगावर चढवले. दूरवरच्या डोंगरांनी देखील थंडीपासून बचाव करण्यासाठी जणू हिरवा शालुच पांघरला होता. त्या डोंगरावरच्या हिरवळीवर अधूनमधून पडणारे ऊन आम्ही कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करीत होतो. इथल्या भन्नाट वातावरणातून आम्हाला परत जावेसेच वाटत नव्हते. पण नाईलाजाने आम्ही परत निघालो. कार जवळ आल्याक्षणी पुन्हा पावसाला सुरवात झाली. सध्या पाऊस आमच्यावर मेहेरबान झालाय. फॉयर फॉल आणि आताचा ट्रेक दोनीही वेळी छान ऊन होतं. कार मध्ये बसताच पुन्हा पाऊस सुरु !
नेस तळ्याला फोर्ट ऑगस्टस पासून वळसा घालून आम्ही पुन्हा इन्व्हरनेस शहराकडे परतीच्या प्रवासाला लागलो. इन्व्हरनेस खूप उत्तरेकडे उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्याने इथे लंडन पेक्षा ही दिवस मोठा. रात्री १० वाजता सूर्य मावळतो आणि साडेदहा वाजेपर्यंत संधिप्रकाश असतो. रात्री आकारा वाजता इन्व्हरनेस मध्ये येऊन कार पार्क करून आम्ही हॉस्टेल ला परत आलो.जेवण करून झोपायला रात्रीचे बारा वाजले...
'लंडन (स्कॉटलंड) डायरी'
१२ ऑगस्ट २०१७.
'साल्मन' माशांचा आश्चर्यकारक जीवनक्रम आणि ऐतिहासिक 'इन्व्हरनेस'
आज आमच्याकडे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भाड्याने घेतलेल्या कार चा ताबा होता. वेळ भरपूर होता, त्यामुळे थोडे उशिरानेच उठलो. होस्टेलच्या कॉमन रूम मध्ये नाश्ता करून कारपार्किंग मध्ये पार्क करून ठेवलेली गाडी काढली. आज 'राॅगी फॉल' (Rogie) आणि ब्लॅक वॉटर नदी मधील उड्या मारणारे 'साल्मन' मासे बघायला जायचे ठरले होते. इथे आपल्याप्रमाणेच वाहने रस्त्याच्या डावीकडून चालवायचा नियम असल्याने ड्रायव्हिंग तसे सोपे असते, पण गाडी चालवताना वाहतुकीचे नियम खूप काटेकोरपणे पाळावे लागतात. नियम मोडला की दणकून दंड बसतो. त्यापेक्षा सर्वजण वाहतुकीचे नियम निमूटपणे पाळतात. पण आता हर्षवर्धन आणि अनुजा ड्रायव्हिंग आणि वाहतुकीचे नियम यात खूप तरबेज झाले आहेत.
रॉस शायर मधील ब्लॅक वॉटर नदीवरील अनेक धबधब्यांपैकी राॅगी फॉल्स हा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाताना साल्मन मासे उंच उड्या मारताना आपल्याला दिसतात. इन्व्हरनेस शहराच्या पश्चिमोत्तर दिशेला 'कॉन्टिन' नावाच्या एका छोट्या गावाजवळ हा धबधबा आहे. या नदीचे पाणी काळसर रंगाचे आहे. इथल्या झुलत्या पुलावरून हा सुंदर धबधबा आणि त्यात उड्या मारणारे साल्मन मासे दिसतात. मी ह्या साल्मन माशांच्या जीवनावर डिस्कव्हरी चॅनल वर पूर्वी एक फिल्म पहिली होती, त्यामुळे इथे जाण्याची खूप इच्छा होती.
या साल्मन माशांचा जीवनक्रम देखील खूप मनोरंजक आणि आश्चर्यजनक आहे. साल्मन मासे हे समुद्राच्या खाऱ्या आणि नदीच्या गोड्या पाण्यात राहू शकतात. नदीत जन्म घेतलेले हे मासे आपले जीवन व्यतीथ करत समुद्रापर्यंत जातात. समुद्रात काही काळ राहतात. तथापि प्रजनन काळात ते समुद्रापासून ते नदीच्या उगमाकडे प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास करीत जातात. नदीच्या उगमापाशी ते अंडी घालतात. त्यांचा हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारा प्रवास अतिशय खडतर आणि अक्षरशः जीवघेणा असतो. नदीत असलेले छोटेमोठे धबधबे या माशांना उंच उड्या मारीत पार करावे लागतात. या अवघड प्रवासात काही मासे अस्वलांसारख्या जंगली प्राण्यांचे भक्ष ही बनतात. उड्या मारताना काही मासे दगडावर आपटून जखमी होतात तर काही मरतात देखील. तरी पण हे मासे नदीच्या उगमाकडे म्हणजे आपल्या जन्मस्थानी जातच राहतात. वाचलेले असंख्य मासे नदीच्या उगमाजवळ जाऊन अंडी घालतात. अंडी घातल्यावर हे मासे अन्नत्याग करून मरून जातात. पुन्हा सुलट्या प्रवाहात अंड्यातून छोटी पिल्ले जन्म घेतात, आणि पुन्हा हे जीवनचक्र सुरु होतं. हे साल्मन मासे असं का करतात हे निसर्गाचं एक न उलघडलेलं कोडंच आहे.
आम्ही इथल्या झुलत्या पुलावर उभे राहून उड्या मारणारे मासे दिसतात का ते बराच वेळ पाहत होतो. बराच वेळ झाला तरी हे मासे काही दिसेनात. जवळ जवळ अर्ध्या तासाने अचानक चारपाच माशांनी उड्या मारल्या. आम्ही आणि आजूबाजूचे पर्यटक उल्हसित होऊन ओरडलो. आम्ही इथं आल्याचं सार्थक झालं. मग मात्र बराच वेळ हा माशांचा उड्यांचा खेळ आम्ही बघत होतो. खूप धमाल आली.
(ह्या साल्मन माशाच्या अद्भुत जीवनचक्रावर डिस्कव्हरी ने तयार केलेल्या एका फिल्मची लिंक इथं देतोय. जरूर पहा :
https://youtu.be/0NcJ_63z-mA )
हर्षवर्धनला समुद्राचे भारी वेड! नॉर्थ सी च्या आम्ही अगदी जवळ आलो होतोच, तो न बघता आम्ही मागे परत फिरणे शक्यच नव्हते. मग 'नॉर्थकोस्ट ५००' च्या हायवे वरून बॅलींटोर नावाच्या छोट्या गावातल्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ होता. जवळ जवळ निर्मनुष्यच असलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर कुत्र्याला फिरायला घेऊन येणाऱ्या एखाद दुसऱ्या जोडप्या शिवाय कोणीही नव्हते. किनाऱ्यावर यथेच्छ भटकून आम्ही तिथल्या बसण्यासाठी ठेवलेल्या बाकावर बसून हॉस्टेल मधून करून आणलेला पास्ता, सँडविचेस, केक, फळे असे जेवण केले. मोकळ्या वातावरणामुळे जेवणही छान गेले.
काल भाड्याने घेतलेली युरोकार सांध्याकाळी पाच वाजता परत करायची असल्याने आम्ही नाईलाजाने इन्व्हरनेस मध्ये परत आलो. कार परत करून हॉस्टेल मध्ये थोडा आराम केला. संध्याकाळी इन्व्हरनेस मध्ये भटकावे अशा विचाराने बाहेर पडलो. इन्व्हरनेस शहराच्या मुख्य रस्त्याने फिरताना एक युवक हातात 'स्कॉट फ्री टूर्स' असे लिहिलेली फाईल हातात धरून उभा होता. त्याला सहजच विचारले असता तो म्हणाला 'मी तुम्हाला आमच्या शहरातील वैशिष्ठ्यपूर्ण ठिकाणे दाखवू शकतो. त्यासाठी तुम्ही मला पैसे द्यायची आवश्यकता नाही, पुढे तो मिस्किलपणे हसत म्हणाला 'अर्थात स्वखुशीने दिलेत तर छानच! जबरदस्ती नाही' आम्ही त्याला 'हो' म्हणून त्याच्याबरोबर निघालो.
हा युवक खूप बडबडया होताच, शिवाय त्याला त्याच्या त्याच्या शहराचा खूप अभिमान व शहराबद्दल प्रेम होते. त्याच्या बरोबरच्या दोन तासांच्या वॉक मध्ये त्याने इथल्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती मनोरंजक पद्धतीने आणि बारकाईने सांगितली. चालता चालता त्याने आम्हाला अनेक इतिहासातल्या दंतकथा सांगितल्या आणि वर हसून तो म्हणायचा की 'ह्या दंतकथा आहेत बरं का. फार विश्वास ठेवू नका.' हा गाईड युवक आम्हाला फार आवडला. दोन तासांच्या सहवासाने त्याने आम्हाला जिंकले. आम्ही खुश होऊन त्याला दहा पौंड बक्षिशी दिली. ते पैसे घेताना तो नम्रपणे म्हणाला 'ह्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही आमच्या गावात आलात हेच आमचे भाग्य आहे.'
मग रात्री उशिरापर्यंत इन्व्हरनेस शहरात भटकत राहिलो. उद्या लंडन ला परतायचं होतं. स्कॉटलंडच्या ट्रिपचा एक आठवडा कसा गेला ते कळलंच नाही. इन्व्हरनेस ते लंडन चा उद्याचा प्रवास बस ने जवळ जवळ तेरा तासांचा होता. आधीच झोपायला उशीर झाला होता. थंडीने गारठलो होतोच, शिवाय दमल्यामुळे तातडीने बंकबेड मधल्या गुबगुबीत पांघरुणात शिरलो...
'लंडन डायरी'
१४ ऑगस्ट २०१७.
फ्रेंच वाईन, मेथीपराठे, आणि सुख..
अखंड १४ तास बसने प्रवास केल्यावर दुसरे काय होणार? जाम दमायला झालं होतं. आणि नाही म्हणलं तरी मागच्या आठवड्यातील स्कॉटलंड च्या ट्रिप मध्ये थोडी धावपळ, प्रवास झाला होताच. रात्री भरपूर झोप काढली. सकाळी उशिरानेच उठून आवरून लगेचच लिहायला बसलो. एडिनबर्ग आणि इन्व्हरनेस या ठिकाणांची डायरी लिहायची राहिली होती. तसे मी रोज च्या रोज मुद्दे लिहीत होतोच, तरी डायरीतील ती पाने लिहिणे आवश्यक होते. कारण एकदा का लिहिण्यात खंड पडला की मग नंतर लिहिताना सगळंच आठवतं असं नाही. अगदी दुपारी तीन पर्यन्त नाश्ता, जेवण आणि डायरी लिहिणे, बस... दुसरं काही नाही!
मग मात्र कंटाळा आला. अंघोळ करून दुपारी चार वाजता मी आणि अलका बाहेर पडलो. आज रिजेंट पार्क जवळ असलेल्या 'प्रिमरोझ हिल' वर जायचं ठरवलं. रिजेंट पार्कचा रस्ता आम्हाला ओळखीचाच झाला होता. तिथून जवळच प्रिमरोझ हिल ही एक छोटीशी टेकडी आहे. इथे भरपूर हिरवळ असलेल्या भल्यामोठ्या बागेच्या मध्यभागी एक मध्यम उंचीची एक टेकडी आहे. टेकडीवरून दूरवर पसरलेलं लंडन दिसत होतं. दूरवर लंडन आय, शार्ड, स्काय गार्डन, अशी ठिकाणे दिसत होती. यातील बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो असल्याने गम्मत वाटली.
तासभर प्रिमरोझ हिल बागेत भटकल्यावर कॅम्डेन कॅनॉल च्या रस्त्यावरून पुढे असलेल्या 'लिटिल व्हेनिस' हे ठिकाण बघायचं असं आम्ही ठरवलं. पण ते आम्हाला सापडेना. खूप उशीर झाला होता. रात्रीचे आठ वाजत आले होते. परत घराकडे वळलो. आज थंडी अजिबात नव्हती. भरपूर चालल्यामुळे भरपूर घाम आला होता. इथं लंडन ला आल्यापासून पहिल्यांदाच घाम आला होता. बरं वाटलं. हर्षवर्धन आणि अनुजा कुठंतरी बाहेर गेले होते. ते येईपर्यंत पुन्हा लिहीत बसलो. हर्षवर्धन ने माझ्यासाठी कुठलीशी एक मस्त फ्रेंच वाईन आणली होती. अलकाने जेवणासाठी मस्त मेथीपराठे केले होते. मुलं आल्यावर झकास जेवण! अजून काय पाहिजे? केवळ सुख...
'लंडन डायरी'
१५ ऑगस्ट २०१७.
म्युझियम्स...हाईड पार्क... असं बरंच काही.
आज सकाळी उशिराने म्हणजे आठ वाजता उठलो. आज आपला स्वातंत्र्य दिवस! व्हाट्स अप उघडले तेंव्हा सगळ्यांना देशभक्तीचा कळवळा आल्याने देशभक्तीपर मेसेजेस चा महापूर आला होता. साधारण पंधरा तेच तेच मेसेजेस ६७० वेळा माझ्या मोबाईलवर आले होते. सर्व अवघ्या पाच मिनिटात उरकले. असो.. जाऊदे...
आज अनुजाने नाश्त्याला व्हेज.पॅटिस करायचे ठरवले होते. अंघोळ करेपर्यंत गरम गरम व्हेज.पॅटिस आणि चॉकलेट पॅटिस असा फक्कड नाश्ता तयार झाला होता. नाश्ता करता करता अलका म्हणाली 'आज आपण कुठेतरी दुसरीकडे वेगळ्या ठिकाणी जाऊयात.' मग सुप्रसिद्ध 'सायन्स म्युझियम', आणि तिथून जवळच असलेलं 'नॅचरल हिस्ट्री म्युझियम' बघायचं ठरलं. हर्षवर्धन म्हणाला 'तिथून लगेचच पुढे हाईड पार्क आहे, तिकडेही जा. मात्र आज थोडं लवकरच घराबाहेर पडा. कारण म्युझियम्स खूप मोठी आहेत. खूप वेळ लागेल तुम्हाला.'
मग आम्ही साडे आकारा वाजता घराच्या बाहेर पडलो. आमचे ऑयस्टर कार्डातले पैसे संपले होते. त्यात पैसे अपलोड केले. बस पकडून व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम च्या स्टॉप वर उतरून जवळच असलेलं 'सायन्स म्युझियम' बघायला गेलो. लंडनच्या प्रमुख लोकप्रिय म्युझियम्स पैकी हे एक म्युझियम असून ते १६० वर्ष जुने आहे. १९०९ मध्ये शास्त्र विषयातील विषयाची मनोरंजक माहितीचे स्वतंत्र म्युझियम म्हणून याची पुनर्रचना करण्यात आली. लहान मुलांसाठी अतिशय सुंदर पद्धतीने वेगेवेगळ्या शास्त्रातील शोधांची माहिती व इतिहास इथे बघायला मिळतो. उदाहरणार्थ वाफेच्या इंजिनाच्या शोधाचा मनोरंजक इतिहास, अंतराळातील मानवाची प्रगती, घड्याळाच्या शोधाचा इतिहास वगैरे!
सायन्स म्युझियम च्या जवळच असलेलं 'नॅचरल हिस्ट्री म्युझियम' देखील असंच भलं मोठं आहे. इथं पृथ्वीतलावर सापडणाऱ्या लाखो जीवजंतू, प्राण्यांची माहिती, त्यांचा जीवनक्रम, त्यांची वैशिष्ठ्ये तपशीलवार माहितीसकट दाखवली आहे. इथल्या 'डायनोसॉर' च्या प्रचंड अशा हाडाच्या सापळ्याला बघायला पर्यटक गर्दी करतात. इथे एका हॉल च्या छताला प्रचंड मोठा व्हेल चा मासा लटकवून ठेवला आहे. अनेक जीवजंतू, प्राण्यांबरोबर मानवाच्या ही जन्माची माहितीही इथं पाहायला मिळते.
इथे वस्तूंचे विषयानुरूप विभाग किंवा झोन्स केले आहेत. जसे 'रेड झोन' मध्ये पृथ्वी, जमिनीचा इतिहास, त्यात कालानुरूप होत गेलेले बदल, दगडांचे प्रकार, खनिज संपत्ती इत्यादी गोष्टी दाखवल्या आहेत. पृथ्वी वरील ज्वालामुखी, भूकंप दाखवताना इथे एका खोलीत पर्यटकांना उभे करून ती अख्खी खोलीच गदागदा हलवली जाते, त्यामुळे भूकंपाचा थरार आपल्याला अनुभवता येतो. ग्रीन झोन मध्ये पक्षांचं जग, तर ब्लु झोन मध्ये मानवी शरीराची वैशिष्ट्यपूर्ण माहिती, सरपटणारे प्राणी, सागरी प्राणिजीवन यांची माहिती मिळते. खरं म्हणजे म्युझियम्स आणि त्यांची आकर्षक मांडणी करावी ती या युरोपियन लोकांनीच! इथली म्युझियम्स इतकी आफाट आणि मोठी असतात की ती शांतपणे, बारकाईनं बघायची ठरवली तर एकेकाला दोन तीन दिवसही कमीच पडतील. नाईलाजानेच आम्ही बाहेर पडलो.
लंडन शहराचं महत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे त्यात असलेली मैलोन्गणीत पसरलेली अनेक उद्यानं ! अगदी मध्य लंडन मधेही गर्दीच्या बरोबरीनं पसरलेली अनेक उद्यानं इथं आहेत. रिजंट पार्क, हाईड पार्क, ग्रीन पार्क, हॅम्पटन पार्क, बुशी पार्क अशी असंख्य उद्यानं लंडन मध्ये आहेत. हि उद्यानं पाहायला, त्यातल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती अभ्यासायला जगभरातून अनेक पर्यटक, वनस्पती शास्त्रज्ञ, अभ्यासक इथं येतात. इथं वनस्पतिशास्त्राची अनेक संशोधन केंद्रं विकसित केली गेली आहेत. लंडन सारख्या थंड हवामानाच्या प्रदेशात देखील आपल्यासारख्या समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंधातल्या वनस्पतींची इथं वाढ केलेली आहे. लंडन शहरात जवळ जवळ पन्नास हजार एकर जमिनीवर असंख्य उद्यानं पसरलेली आहेत. काही उद्यानं बाराव्या तेराव्या शतकापासूनची आहेत. त्याकाळी राजे व त्यांचे कुटुंबीय करमणुकीसाठी, शिकारीच्या हौसेसाठी हि उद्यानं वापरीत असत. सर्वसामान्य प्रजेला वावरण्यास इथं मज्जाव होता. कालांतराने ही उद्यानं नागरिकांसाठी खुली करण्यात आली.
या पैकी हाईड पार्क सुरवातीपासूनच नागरिकांना खुलं असलेलं उद्यान! जवळ जवळ साडेतीनशे एकर जमिनीवर पसरलेलं हे उद्यान मनोरंजनाबरोबरच मोर्चे काढण्यासाठीही उपयोगात येतं. उद्यानात आल्याबरोबरच बाहेरच्या रहदारीचा किंवा गर्दी गोंगाटाचा इथं मागमूसही नसतो. या हाईड पार्क मध्ये बोटिंग, फुटबॉल, घोडदौड, सायकलिंग, जॉगिंग साठी मोठी मैदाने आणि हिरावली उपलब्ध असल्याने व्यायामप्रेमी लंडनवासीयांची इथं कायम वर्दळ असते. दोनशे तीनशे वर्षापूर्वीचे वृक्ष इथं दाटीवाटीने उभे आहेत. या संपूर्ण हाईड पार्कला बाहेरून एक लोखंडी कुंपण आहे. असं म्हणतात की, या कुंपणाच्या एका टोकाला रंग देण्याचं काम सुरु केलं की त्याचा शेवट एक वर्षांनी होतो. तोपर्यंत सुरवातीचा भाग पुन्हा रंगवण्याचा स्थितीत येतो. मग पुन्हा पहिल्यापासून सुरवात. यातील विनोदाचा भाग सोडला तरी या वरून या उद्यानाच्या विशालतेची कल्पना येऊ शकेल.
अलकाला हाईड पार्क मध्ये फेरफटका मारायचा होता. रस्त्यावरील नकाशे पाहत चालत चालत आम्ही हाईड पार्क मध्ये पोहोचलो. हाईड पार्क च्या सुरवातीलाच 'केझिन्ग्टन गार्डन' नावाचं एक छोटं उद्यान (म्हणजे तसं मोठंच) लागतं. हाईड पार्क आणि केझिन्ग्टन गार्डन या मधून एक मोठा रस्ता जातो, त्यामुळे केवळ या भागाला वेगळं नाव, अन्यथा हा हाईड पार्कचाच एक भाग आहे. इथं राणी व्हिक्टोरियानं आपल्या पतीचं म्हणजे प्रिन्स अल्बर्ट चं स्मारक बांधलंय ! वैशिष्ट्य म्हणजे या अल्बर्टच्या पुतळ्याच्या अवतीभवती त्या काळच्या जगभरातल्या ब्रिटिश साम्राज्यातल्या चारीही खंडातली सांकेतिक प्रतीकं उभी केलेली आहेत. चारही कोपऱ्यावर आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील माणसांचे पुतळे आहेत. गम्मत म्हणजे आशिया खंडाच्या कोपऱ्यात राजस्थानी स्त्री आणि हिंदू ब्राह्मण माणसाचा पुतळा आहे.
रिजंट पार्क बघताना ते अतिशय भव्य वाटलं होतं, पण ‘हाईड पार्क’ बघून माझा हा समज पार निघून गेला. या हाईड पार्क मधून 'सर्पेंटाइन नावाची वाहत जाते. पण मधेच ती जमिनीत गुप्त होऊन पुढे थेम्स नदीला मिळते. त्यामुळे हाईड पार्क मध्ये ती एका लांब तळ्यासमान भासते. त्यात बोटिंगची व्यवस्था असल्याने अनेक पर्यटक बोटिंग चा आनंद घेत होते. आज इतकं चालणं झालं होतं की पायाचे अगदी तुकडे पडले होते. भूकही लागली होती. पार्क अधे आम्ही केक आणि कॉफी घेतली. मग २७४ नं ची इजलिंग्टन एंजल्स कडे जाणारी बस पकडून घराजवळच्या कॅम्डेन स्टेशन स्टॉप वर उतरलो. अनुजा आणि हर्षवर्धन अजून घरी आलेले नव्हते. मग अंघोळ करून डायरी लिहायला बसलो. अनुजाने आज जेवणात तंदुरी चिकन केलं होतं. रात्री झोपताना मी अलकाला म्हणालो 'आता रिटायर होतो व्यवसायातून! हे असं आयुष्य जगायला हवं आता! रिकाम्या डोक्यानं देशविदेशात हिंडणे, खाणेपिणे... बास पुरे झालं काम !
'असं आयुष्य नेहेमी जगायला मिळालं तर काय बहार येईल' या स्वप्नवत विचारात कधी झोप लागली ते कळलंच नाही.
'लंडन डायरी'
१६ ऑगस्ट २०१७.
'परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती...'
कविश्रेष्ठ: बा. भ. बोरकर.
आज सकाळीच व्हाट्स अप वर संकेत बोपर्डीकर यांची एक 'सावरकरांच्या लंडन मधल्या राहत्या घरासंबंधी' पोस्ट वाचनात आली. आमच्या लंडन ट्रीपमध्ये 'मस्ट डू' लिस्ट बास्केट मधे ह्या घराला भेट देण्याचा कार्यक्रम दोन दिवसानंतर होताच. पण संकेत बोपर्डीकरांनी त्यांच्या सावरकर वास्तू भेटीचा वृत्तांत इतक्या प्रभावी पद्धतीने लिहिला आहे की मला १८ तारखेपर्यंत धीर धरवेना. मग आजच या पवित्र वास्तूस्मृतीला नमन करून यायचे ठरवले.
अर्ध्यापाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या पॉन्ड स्केअर भागात उतरलो. तिथून गुगल मॅप दाखवत असलेल्या रस्त्यावरून चालत निघालो. (टेक्नॉंलॉजीने किती सोपे करून ठेवलंय ना सगळं?) शहरापासून थोडं दूरच्या भागात असतं तसं इथलं वातावरण आहे. खूप कमी गर्दीचा भाग आहे हा. पंधरा मिनिटांचा उतार असलेला रस्ता संपल्यावर एका मोठ्य्या चौकात आम्ही आलो. चौकातून डाव्या गल्लीत शिरल्यावर लगेचच उजव्या बाजूला काहीसं झाडीत लपलेलं सावरकरांचं घर दिसलं. मला त्याक्षणी काय वाटलं हे शब्दात सांगणं अवघड आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातून अनेक थोर नेते, क्रांतिकारक लंडनमध्ये गेले होते. त्यांच्या वास्तव्याच्या खुणा मिरवणारी काही स्मारकं लंडन मध्ये आहेत, जसे थोर नेते दादाभाई नौरोजी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मध्ये जवळ जवळ दहा वर्षे गुजराथी भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. याच लंडन मध्ये कवी रवींद्रनाथ टागोर इंग्रजी भाषेचा आभ्यास करण्यासाठी १८७८ ते १८८० च्या काळात वास्तव्य करून होते. पं. श्यामजी कृष्णवर्मा यांनी लंडन मधील क्रॉम्वेल ऍव्हेन्यू, हायगेट या उपनगरात एक घर विकत घेऊन भारतीय विद्यार्थ्यांना वसतिगृह म्हणून वापरण्यास उपलब्ध करून दिलं होतं. त्याकाळी लोकमान्य टिळकांच्या शिफारसीवरून सावरकरांना लंडन मधील हे घर आणि शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. देशभक्त मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) मधून १९०६ ते १९०९ या काळात 'सिव्हिल इंजिनियरींग ची पदवी घेतली होती. याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकर ही लंडन मध्ये वास्तव्यास होते. या काळात सावरकरांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका, खलबतं या घरात होत असत.
सध्या या घरात कुणीतरी राहत असावं. पण घर बंद होतं. कंपाउंड च्या आत पाच सात पायऱ्या चढून गेलो. तिथल्या पायरीवर नतमस्तक होऊन त्या थोर स्वातंत्र्यवीराला आदरांजली वाहिली. मनात विचार येत होते... याच पायऱ्यांवरून सावरकर कितीतरी वेळा आले गेले असतील, इथे आतील कुठल्यातरी खोलीत बसून त्यांनी इटालियन स्वातंत्र्य सेनानी 'जोसेफ मॅझिनी'च्या चरित्राचे भाषांतर केले असेल, इथेच त्यांनी ५७ चं स्वातंत्र्यसमर लिहिलं असेल, याच वास्तूमध्ये कदाचित कर्नल वायली च्या वधासाठी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर खलबतं केली असतील. बराच वेळ काही बोलावसं वाटत नव्हतं. त्या थोर स्वातंत्र्यवीराच्या प्रेरणादायी वास्तू समोर मी कितीतरी वेळ निःशब्द उभा होतो. माझ्या लंडन भेटीचे सार्थक झालं होतं.
परत येताना वॉटर लो नावाचं पार्क दिसलं. त्यात शिरलो. तीन छोटी छोटी सुंदर तळी असलेलं हे पार्क अतिशय नेत्रसुखद होतं. आमची संध्याकाळ मस्त गेली. येताना पुन्हा २१४ नंबर ची मुरगेट फिन्सबरी स्क्वेअर कडे जाणारी बस घेऊन घराजवळच्या प्रिन्स ऑफ वेल्स स्टॉप वर उतरलो. रात्रीच्या जेवणात अनुजाने 'फलाफल' कि काय अशाच नावाचा टर्किश पदार्थ केला होता. त्याबरोबर ताबूल नामक कोशिंबीर सदृश पदार्थ होता. अनुजाच्या या अश्या वेगवेगळ्या पदार्थांमुळे रोजच्या जेवणांत मजा येते.
रात्री झोपताना मात्र सावरकरांचेच विचार मनात येत होते...
'लंडन डायरी'
१७ ऑगस्ट २०१७.
मिशन: एक्स्प्लोर लंडन.
आज नाश्ता करताना हर्षवर्धनने आमच्या समोर एक धक्कादायक प्रस्ताव मांडला. तो म्हणाला 'रोज तुम्ही आमच्या सांगण्याप्रमाणेच काय फिरताय लंडन मध्ये? आज तुमचं तुम्हीच ठरावा कुठं जायचं ते. तुम्हीच हुडका बस चे मार्ग! तुमच्या ऑयस्टर कार्डात भरपूर पैसे आहेत. खिशात थोडी कॅश ठेवा. तुमच्या मोबाईल मधल्या गुगल मॅप चा वापर करा, आणि फिरा भरपूर लंडनमध्ये. आज मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. लंडन एक्स्प्लोर करा'. मी दचकून म्हणालो 'अरे, हे अनोळखी शहर, अमाप गर्दी, रस्त्यांची, चौकांची नावे अपरिचित. कसं जमणार? आणि ह्या अफाट लंडन मध्ये आम्ही हरवलो तर? हर्षवर्धन हसून म्हणाला 'तेच तर व्हायला हवंय. हरवून जा लंडनमध्ये. म्हणजे तुम्हाला लंडन एक्स्प्लोर करण्ययात जी धमाल आहे ती कळेल. आणि अगदीच अडचण तर आम्हाला फोन करा.' मी ह्या असल्या फिरण्याला (साहसाला) फारसा उत्सूक नव्हतो. मी म्हणालो 'इथं आम्ही मजा करायला आलो आहोत, टेन्शन घेऊन फिरायला नाही. अलकाला मात्र हि कल्पना आवडली. ती म्हणाली 'जाऊयात हो, हर्षवर्धन म्हणतोय तसे! बघुयात काय होतंय ते.. मी थोड्या नाखुशीनेच तयार झालो लंडन मध्ये हरवायला...
मग आम्ही आमच्या मिशन ची तयारी सुरु केली. सॅक मध्ये खाण्याचे पदार्थ, पाणी, पैसे, छत्र्या वगैरे टाकून निघालो. आम्ही अजून सेंट पॉल कॅथेड्रल पाहिलेलं नव्हतं. कोव्हन्ट गार्डन मार्केट जवळच असलेलं लंडन ट्रान्सपोर्ट म्युझियम बघून पुढे कॅथेड्रल असा प्रोग्रॅम आखला. मग गुगल मॅप वर बस चे मार्ग ठरवले. मी आजपर्यंत या गुगल मॅप कडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. हे इतकं सोयीचं प्रकरण इतक्या दिवसात मी का समजावून घेतलं नाही याचं मला आश्चर्य आणि वाईटही वाटलं.
जाताना कोव्हन्ट गार्डन मार्केट जवळच्या टोटर्नहॅम कोर्ट रोड ह्या स्टॉप वर उतरलो. गुगल मॅपवरच्या कर्सरकडे (निळ्या ठिपक्याकडे) बघत बघत आम्ही कोव्हन्ट मार्केट मध्ये आलो. इथे आपल्या तुळशीबागेप्रमाणे छोटी छोटी दुकाने थाटलेली आहेत. फ्रिज मॅगनेट्स, हाताने बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, मेणबत्या, सौंदर्यप्रसाधने, गिफ्ट आयटम्स, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असं सर्वकाही आहे इथं. गर्दीत फिरता फिरता माझं लक्ष सहज मोबाईलकडे गेल, आणि लक्षात आलं की गुगल मॅप काहीतरी गंडला होता. बंद पडला होता. मी दचकलो. आता सेंट पॉल कडे जायचं कसं? कुठल्या दिशेने जायचं तेच कळेना. आम्ही खरंच हरवलो होतो.
मग थोडा दिशेचा अंदाज घेत चालत राहिलो. आम्हाला वॉटर्लू ब्रिजकडे जायचं होतं. पंधरा मिनिटे भरकटल्यावर आम्हाला वॉटर्लू ब्रिज दिसला आणि जीव भांड्यात पडला. त्याचवेळी योगायोगाने गुगलमॅप चा निळा ठिपकाही हलू लागला.
मग थोडं निर्धास्तपपणे आम्ही वॉटर्लू ब्रिज वरून चालायला लागलो. या ब्रिजवरून थेम्स नदीचं विहंगम दृश्य दिसत होतं. ब्रिजवर आजूबाजूला बघत थोडे रेंगाळलो. खालून काही बोटी पर्यटकांना घेऊन जात येत होत्या. १८८५ साली वॉटर्लू येथील ब्रिटिश आणि डच सैन्यामधील झालेल्या प्रसिद्ध युद्धातील ब्रिटिशांच्या झालेल्या विजयाची आठवण म्हणून या पुलाला 'वॉटर्लू ब्रिज' असं नांव देण्यात आलं आहे. पलीकडेच 'टॉवर ब्रिज' दिसत होता. टॉवर ब्रिज १८९४ साली बांधलेला जुना पूल आहे. या पुलावर दोन मोठे टॉवर्स बांधलेले असून मधला पूल दोन भागांनी बनला आहे. नदीतून मोठ्या उंचीच्या बोटी जाताना हे पुलाचे दोन्हीही भाग वर उचलले जातात. हे उचलण्यासाठी मोठी हायड्रॉलिक यंत्रणा बसवली आहे. या टॉवर ब्रिज चे दोन भाग उचलले जाताना ते बघण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. याच्या जवळच असलेला 'लंडन ब्रिज' सतराव्या शतकात बांधलेल्या प्राचीन पुलाचे नवीन स्वरूप आहे. पलीकडे दिसणारा 'ब्लॅक फायर ब्रिज' फक्त रेल्वे वाहतुकीसाठी आहे. डाव्या बाजूला अजस्त्र 'लंडन आय' डोळ्यात भरतो. बिगबेन चे घड्याळ आणि पार्लमेंट चा टॉवर ही इथून दिसत होता.
वॉटर्लू ब्रिज उतरून आम्ही क्वीन्स वॉक वरून चालायला लागलो. नुकतेच म्हणजे २४ जुलै ला आम्ही इथून फिरलो होतो. त्यामुळे सराईतासारखे मिलेनियम ब्रिज वर चढून आलो. 'मिलेनियम ब्रिज' हा मला आवडलेला आणि फक्त पादचाऱ्यांसाठी बांधलेला पूल आहे. या लोखंडी अरुंद पुलावरून चालताना पूल चक्क झुल्याप्रमाणे हलतो. पुलाच्या पलीकडच्या टोकावर सेंट पॉल कॅथेड्रल दिसू लागले होते. जसे जसे आपण कॅथेड्रल च्या जवळ जातो तसतसे त्याची भव्यता जाणवू लागते.
'सेंट पॉल कॅथेड्रल' हे लंडनमधील पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. सेंट पॉल कॅथेड्रल लंडनच्या अतिशय मध्यवर्ती म्हणजे सिटी विभागात आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या रोमन काळातील राजवटी पासून या जागेवर हे पवित्र पूजास्थान अस्तित्वात आहे. ही महत्वाची इमारत मात्र आजूबाजूच्या उंच इमारतीच्या गराड्यात मात्र दाटीवाटीने बसवल्यासारखी दिसते. या वास्तूचे बांधकाम अर्थातच रोमन शैलीचे ! भल्यामोठ्या अजस्त्र खांबावर पेललेला भव्य घुमत डोळ्यात अक्षरशः मावत नाही.
१६६६ मध्ये लंडन ला लागलेल्या प्रलयंकारी आगीमध्ये थोड्याफार वाचलेल्या या सेंट पॉल कॅथेड्रल ची पुनर्बांधणी 'क्रिस्तोफर रेन' नावाच्या वास्तुशास्त्रज्ञाने केली.या क्रिस्तोफर रेन वर सुप्रसिद्ध रोमन वास्तुशास्त्रज्ञ 'बर्निनी' चा प्रभाव होता. या बर्निनी ने रोम मध्ये बांधलेल्या सेंट पीटर्स या जगप्रसिद्ध इमारती प्रमाणे सेंट पॉल कॅथेड्रल ची रचना रेन ने आखली, आणि ही अद्वितीय इमारत उभारली गेली. तब्बल चाळीस वर्षे या सेंट पॉल चे बांधकाम चालू होते. याचा जवळजवळ ३६५ फूट उंच असलेला घुमट लंडन शहराच्या क्षितिजावर सतत दिसत राहतो. या कॅथेड्रल मध्ये जायला १८ पौंड तिकीट आहे. पण प्रार्थनेच्या काही वेळात लोकांना आत सोडण्यात येते. आमच्या सुदैवाने आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा लोकांना आत सोडत होते. आम्हाला आत जायची संधी मिळाली.
आत पाऊल टाकताच कॅथेड्रल चं उंच आणि विशाल प्रार्थनागृह नजरेस भरतं. आतील वातावरण अतिशय पवित्र, शांत आणि गंभीर होतं. भिरगंभीर चेहेर्याने लोक तिथं घोळक्याने फिरत होते. कुणी भक्तिभावाने खुर्च्यांवर बसून प्रार्थना करीत होते. काही पर्यटक आत असलेले कलाकुसरीचे काम न्याहाळत होते, तर कुणी कुतूहलानं पुतळे, प्राचीन चित्रं पाहत फिरत होते. कॅथेड्रलच्या मध्यभागी गेल्यावर आमची नजर छताकडे गेली. घुमटाची भलीमोठी पोकळी नजरेत मावत नव्हती. समोर असलेल्या क्रुसापर्यंतचे छत आणि भिंती मोझॅक प्रकारच्या सोनेरी तुकड्यांनी सजवलेल्या आहेत. या सजावटी ख्रिस्ताच्या जीवनातल्या प्रसंगाशी निगडित आहेत.
वरच्या मजल्यावर व्हिस्परिंग गॅलरी आहे. इथं उभे राहून केलेली छोटीशी हळू आवाजातील कुजबुजही लांबवर ऐकू येते म्हणे! मला आपल्या विजापूरच्या गोलघुमटाची आठवण झाली. मात्र वर जाण्यासाठी पर्यटकांच्या लांबचलांब रांगा होत्या. त्यामुळं आम्ही तिथं जाण्याचं टाळलं. इथल्या तळघरात अनेक ऐतिहासिक पुरुष चिरविश्रांती घेत आहेत. त्यांची संगमरवरी स्मारकं इथं दिसतात. सेंट पॉलचे बांधकाम चालू असताना बनवलेली लाकडी प्रतिकृती (मॉडेल) इथं पाहायला मिळते. आम्ही आतमध्ये धीरगंभीर प्रार्थनेची आणि तिथल्या पवित्र वातावरणाची, निरव शांततेची अनुभूती घेतली. तिथल्या भारलेल्या आणि भक्तिमय वातावरणात आम्ही पंधरावीस मिनिटे बसून राहिलो...
बाहेर येऊन घड्याळात पाहतो तर संध्याकाळचे साडेसात वाजलेले. डोक्यावर मावळतीचा सूर्य आणि उजेड असल्याने इथे वेळेचा अंदाजच येत नाही. मग नदीच्या उत्तर किनाऱ्यावरून (सेंट पॉल्स वॉक) पुन्हा वाटर्लू ब्रिज कडे आलो. पुलाच्या त्याच बाजूला असलेल्या बस स्टॉप वरून घराजवळच्या कॅम्डेन हाय स्ट्रीट वर उतरलो.
रात्री हर्षवर्धनला उत्साहाने आम्ही केलेल्या 'एक्स्प्लोर लंडन' मिशन चा रिपोर्ट सादर केला. खरंच... एखाद्या अनोळखी आणि त्यातही लंडन सारख्या शहरामध्ये काहीही माहिती नसताना, कोणाचीही मदत न घेता भटकणे आनंददायी तर असतेच पण तितकेच थरारक देखील...
'लंडन डायरी'
१८ ऑगस्ट २०१७.
सर्वांना सामावून घेणारं 'लंडन'.
इंग्लंड ची राजधानी असलेलं लंडन जगातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या, स्थायिक झालेल्या अनेक लोकांची कर्मभूमी आहे. या शहराने जगातल्या अनेक भागातल्या विविध वंशाच्या, विविध भाषेच्या, विविध जातीधर्मातल्या लोकांना सामावून घेतलं आहे. उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील अमेरिकन व्हाईट किंवा गोरे लोक, दक्षिणेकडील आफ्रिकन काळे, दक्षिण पूर्वेकडील चायनीज, जॅपनीज, कोरियन, भारतीय, पाकिस्तानी असं साऱ्या जगातील लोक इथे राहतात. थोडक्यात लंडन शहराला वैश्विक शहर म्हणता येईल. इथे सर्व वंशाचे,धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. लंडन शहरामध्ये चायनीज लोकांचं चायना टाऊन नावाचा एक मोठा एरिया आहे. दोन गल्ल्या फक्त चायनीज वस्तूंची दुकाने, चायनीज रेस्टॉरंट्स, सबकुछ चायनीज! परवा लंडन एक्स्प्लोर करताना एका पाकिस्तानी व्यक्तीची गाठ पडली. त्याने आमची आपुलकीनं चौकशी केली. तो गेली अनेक वर्षे लंडन मध्ये स्थायिक झाला आहे.बोलता बोलता म्हणाला 'हमारे यहा कितना अच्छा माहोल होता है ना?' आमच्याबद्दलची आपुलकी त्याच्या चेहेऱ्यावरून ओसंडून वाहात होती. भारत पाकिस्तानातले कट्टर हाडवैरी इथं एकमेकांना आपलेसे वाटू लागतात.
१९५० च्या दशकात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर हलकीसलकी काम करणाऱ्या कामगारांची कमतरता इथं भासत होतीच. मग जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होतं तिथून मोठया प्रमाणात लोकांना कामासाठी लंडनला आणलं जाऊ लागलं. याच काळात वेस्ट इंडिया मधून हजारो लोक इथं स्थलांतरित झाले. हि वेस्ट इंडियन मंडळी आर्थिक दृष्ट्या गरीब होती. त्यामुळे त्यांना आपल्या मातृभूमीकडे वारंवार जात येत नसे. अंगात मुळातच असलेल्या तालसंगीताची, मातृभूमीतल्या रंगीबेरंगी उत्सवांची अस्वस्थ जाणीव त्यांना सतत व्हायची. मग लंडन मधेच त्यांनी त्यांचा उत्सव साजरा करायला सुरवात केली. या उत्सवादरम्यान हे वेस्ट इंडियन नागरिक लंडन मधील रस्त्यावरून मोठ्या मोठ्या मिरवणूक काढतात. इंग्रजांची शिष्ठ सामाजिक बंधने झुगारून हि मंडळी बेभानपणे नाचतात. लंडनवासीय गोऱ्यांमध्ये हा उत्सव विलक्षण लोकप्रिय झाला आहे. इथली गोरी मंडळी या उत्सवाची आतुरतेनं वाट बघतात.
लंडन च्या एकूण लोकसंख्ये पैकी ६.६ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. मध्य लंडन आणि आजूबाजूला साऊथ हॉल, वेम्ब्ले, हन्स्लो, ब्रेंट, क्रायडॉन, रेडब्रीज, इलिंग, बार्नेट, टुरिंग, हॅरो अशा भागातून भारतीयांचे प्रमाण जाणवण्याइतके आहे. पश्चिम लंडन मधील हीथ्रो विमानतळाजवळील काही भागात मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड चं मनुष्यबळ खूप कमी झालं होतं. कामगारांचाही तुटवडा जाणवत होता. मग इथल्या सरकारने परकीयांना आपल्या देशात बोलवायला सुरवात केली. त्यावेळी भारतातील अनेक प्रांतातुन मध्यम वर्गीय लोक मोठ्या संख्येने स्थालांतरित होऊ लागले. आपआपले छोटे व्यवसाय काढून नशीब आजमावून पाहू लागले. मग कालांतराने लंडनमध्ये भारतीयांच्या प्रांतावर वसाहती तयार होऊ लागल्या. लंडन मधील 'वेम्ब्ली' भागात गुजराथी भारतीयांनी आपला जम बसवला, तर 'इंस्टेंड' भागात बंगाल्यांनी ताल ठोकला. 'साऊथहॉल' मध्ये पंजाबी भारतीय स्थिरावले. साऊथ हॉल (Southall) भागात इतके पंजाबी लोक राहतात की त्यांच्या सोयीसाठी इथल्या रेल्वे स्टेशन आणि काही सार्वजनिक ठिकाणाची नावं इंग्रजी बरोबर पंजाबी भाषेतही लिहिली आहेत. तेथील रस्त्यावरच्या पंजाबी स्टॉल वर एखादा पंजाबी जिलबी तळतानाही दिसतो. इथल्या लोकसंख्येच्या चाळीस टक्के लोक शीख संप्रदायातले आहेत. त्यामुळे अशा भागातून भारतीय वस्तूंची दुकाने, भारतीय चित्रपट देखील बघायला मिळतात.
आज आम्हाला असाच भारतीय माहोल असलेल्या 'हन्स्लो' भागात राहणाऱ्या, आमच्या ओळखीच्या प्रियांका पवार-कीर्तिकर हिने जेवायला बोलावलं होतं. (हि पूर्वाश्रमीची प्रियांका पवार आमची पुण्यातली शेजारीण, आणि लग्नानंतर हन्स्लो भागात स्थायिक झाली आहे.) लंडनच्या किंग क्रॉस स्टेशन वरुन ट्यूबने आम्ही तासाभरातच दुपारी ४ वाजता हन्स्लो स्टेशनवर पोहोचलो. स्टेशन जवळच असलेल्या तिच्या घरी जाऊन लगेचच हन्स्लो चा परिसर बघायला बाहेर पडलो. प्रियांकाचा नवरा 'ऋग्वेद' त्याचे ऑफिस सुटल्यावर भेटणार होता, तोपर्यंत भटकायचं ठरवलं होतं. इथेही फिरताना भारतीय लोक आजूबाजूला मोठ्या संख्येने दिसत होते. प्रियांका सांगत होती की 'हन्स्लो मधे इथल्या लोकसंख्येच्या २० टक्के लोक भारतीय आहेत.'
हायस्ट्रीटवर आल्यावर प्रियांका म्हणाली 'हा हायस्ट्रीट म्हणजे आपल्या लक्ष्मी रोड सारखा आहे.' सचिन एक्स्प्रेस, ठाकर्स रेस्टोरंट, श्रीकृष्ण वडापाव यासारखी भारतीय नावाच्या पाट्या दिसत होत्या. पुढे एका मुख्य चौकात 'स्टेट बँक ऑफ इंडिया' ची शाखाही दिसली. आम्हाला खूप मजा वाटत होती. पुढे गम्मत म्हणून आम्ही 'क्वालिटी फूड' नावाच्या एका मोठ्या मॉल मध्ये शिरलो. इथे भारतीयांना लागणाऱ्या सर्व गोष्टी होत्या. पूजेच्या सामाना पासून ते भारतीय मसाले, बेडेकर चितळ्यांचे सर्व प्रॉडक्ट्स, पातंजलीची सर्व उत्पादने, अगदी लक्ष्मीनारायण चिवडा, पाणीपुरीचे सामान सर्वकाही होतं इथे. मॉलच्या एका कोपऱ्यात पाणीपुरी चा स्टॉल देखील होता. सर्वात कहर म्हणजे जवळ आलेल्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तीही इथं विक्रीसाठी उपलब्ध होत्या. प्रियांका सांगत होती कि इथे एक गणपती मंडळ देखील आहे. इथले उत्साही मराठी लोक गणेशोत्सव साजरा करतात, अगदी ढोलताशा सकट! मी थकलोच!
फिरता फिरता साडेसात कधी वाजले ते समजलंच नाही. ऋग्वेद ऑफिस मधून घरी आल्यावर आम्ही सर्वजण श्रीकृष्ण वडापाव या रेस्टोरंट मध्ये गेलो. तिथं पावमिसळ, अलका ला आवडणारी इडलीचटणी, वडापाव, मेथीचे ठेपले असे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांवर ताव मारला. बऱ्याच दिवसांनी अनपेक्षितपणे आणि ते ही लंडनमध्ये चमचमीत मिसळ खाल्यामुळे अस्मादिक तृप्त जाहले. हे भरपेट खाणं झाल्यावर ऋग्वेद म्हणाला 'आता आपण जेवायला जाऊ, मी तुम्हाला खऱ्या अस्सल स्वादाची चिकन बिर्याणी खिलवतो.' पोट भरल्यामुळे आम्ही नकार दिला, पण तरीही त्याने आग्रह करून दोन चिकन बिर्याणीची पार्सल्स आमच्या बरोबर दिलीच. ऋग्वेद, प्रियांकाच्या आदरातिथ्यामुळे आम्ही भारावून गेलो. आजची संध्याकाळ खरंच खूप धमाल मजेत गेली. आज लंडन मधला भारत आम्ही अनुभवला...
'लंडन डायरी'
१९ ऑगस्ट २०१७.
दूर दक्षिणेकडे...ब्रायटन.
सकाळीच अनुजा म्हणाली 'आज शनिवार, आज आपण ब्रायटन ची एक दिवसाची ट्रिप करणार आहोत. मी एक महिन्यापूर्वीच ब्रायटन साठी रेल्वेची तिकिटे काढून ठेवली आहेत. आम्ही तर तयारच होतो. पण मी एक शंका विचारली 'एक महिना आधी का तिकिटं काढावी लागली'? त्यावर ती म्हणाली 'विमानाच्या तिकिटाप्रमाणे इथं रेल्वेची तिकिटांचे दर कमीजास्ती होतात. एका महिन्यापूर्वी मी काढलेल्या पाच पौंडाच्या तिकिटाचा दर, आज पस्तीस चाळीस पौंडापर्यंत झाला असेल. त्यामुळे लवकर तिकिटे आरक्षित करणं स्वस्त पडते. आम्हाला या गोष्टीची गंमत वाटली. कदाचित खाजगीकरणाने असे बदल होत असावेत.
एका दिवसाच्या सुट्टीसाठी किंवा विकेंड ट्रिप म्हणून ब्रायटन हे ठिकाण अतिशय आदर्श असून लंडनवासीय आणि लंडनमध्ये आलेल्या पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. लंडन पासून तासाभरात इथं पोहोचता येतं. आम्ही सकाळी आवरून सात वाजताच लंडनच्या व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. आज ढगाळ हवामानामुळे थंडी थोडी जास्तच होती. पण रेल्वेत उबदार वातावरण होतं. साडे आठ वाजता आम्ही ब्रायटन रेल्वे स्थानकात उतरलो. तसं म्हणाल तर हे टिपिक्कल युरोपियन शहरांसारखं गाव आहे. पण सुंदर समुद्र किनाऱ्यांमुळे या शहराला महत्व आलं आहे. पर्यटकांना आवडणारा समुद्र, शॉपिंग, कॅसिनोज वगैरे सर्व काही इथं असल्याने हे पर्यटकांनी कायम गजबजलेलं असत.
पण आत्ता सकाळी मात्र रस्त्यानं शुकशुकाट होता. सकाळच्या कोवळ्या उन्हानं जरी थोडं उबदार वाटत असलं तरी समुद्रावरून येणारा थंडगार सोसाट्याचा वर अंगाला चांगलाच झोंबत होता. या समुद्रकाठच्या टेकड्यावर वसलेल्या ब्रायटन मधील रस्ते खूप चढ उताराचे आहेत.
स्टेशन समोरच्या मुख्य रस्त्यावरून चालताना समोरच अथांग समुद्र दिसत होता. मग समुद्राच्या वाळूत बसून घरून बनवून आणलेले सँडविचेस खाल्ले. हा दक्षिणेचा समुद्र स्कॉटलंड मध्ये पाहिलेल्या उत्तर समुद्रासारखा शांत नव्हता. काहीश्या गोव्याच्या समुद्राप्रमाणे मोठ्या उंचीच्या लाटा गर्जत किनाऱ्याला येऊन फुटत होत्या. हर्षवर्धन म्हणाला 'इथे समोरच काही मैलावर फ्रांस चा किनारा आहे. आम्ही फ्रांस च्या उत्तर किनाऱ्या जवळ होतो. पुन्हा आठवण झाली ती सावरकरांची! सावरकरांनी याच फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या मार्सेल्स या बंदराजवळ समुद्रात उडी मारली होती. अंगावर शहारे आले. मनात विचार आले.. बोटीवरील शौचालयातल्या छोट्या गोलाकार खिडकीतून अंग बाहेर काढताना त्यांना खरचटलं असेल का? या समुद्रातील गारठलेल्या खारट पाण्याने त्यांच्या शरीराला किती वेदना झाल्या असतील? मार्सेल्स बंदरात त्याना पुन्हा ब्रिटिश पोलिसांनी पकडल्यावर त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील. याच ब्रायटन च्या किनाऱ्यावर सावरकरांना 'सागरा प्राण तळमळला' हे उदात्त काव्य स्फुरलं होतं, या काव्याचा जो मूक साक्षीदार होता त्याच किनाऱ्यावर आम्ही निःशब्द उभे होतो. पुन्हा सावरकरांच्या आठवणी जाग्या झाल्या.
नंतर आम्ही ब्रायटन जवळ असलेल्या सिफोर्ड आणि ईस्टबॉर्न या छोट्या शहरांमध्ये असलेल्या 'सेव्हन सिस्टर्स' नावाचे खडूने ने बनलेले उंच कडे (Chalk Cliffs) बघण्यासाठी निघालो. सुमारे तासाभराच्या बस प्रवासानंतर आम्ही सिफोर्ड गावात पोहोचलो. हा प्रवास पूर्ण समुद्रालगत आणि खूप नयनरम्य होता. उजव्या बाजूला अखंड समुद्र आणि डाव्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या, टुमदार घरे, हिरवे फार्म्स! सिफोर्ड गाव देखील छोटंसं आणि सुंदर होतं. रस्ते निर्मनुष्यच होते.
इथून पुढे आम्हाला एक ट्रेक करायचा होता. सिफोर्ड गाव ते 'सेव्हन सिस्टर्स' हा साधारणपणे तासाभराचा थरारक ट्रेक आहे. समुद्राच्या काठाकाठाने असलेल्या छोट्या टेकड्या पार करत एका पायवाटेने चालत चालत आम्ही 'सेव्हन सिस्टर्स' जवळ पोहोचलो. इथे खडूच्या भुसभुशीत दगडांनी तयार झालेले उंच कडे आहेत. या कड्यांच्या खाली थेट लगेचच समुद्र! पांढऱ्या रंगाने चमकणाऱ्या सात कड्यांची ही माळ 'सेव्हन सिस्टर्स' नावाने प्रसिद्ध आहे. डोंगरांच्या वळकट्यांमुळे हे खडूचे कडे उठून दिसतात. या कड्यांच्या अगदी टोकावरून रानवाटेने चालणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. समुद्रावरून येणाऱ्या थंडगार भणाणत्या वाऱ्यात चालणे अक्षरशः अवघड जाते. वाऱ्याने आपण मागे ढकलले जातो. या वाटेने चालताना अनेक गोल्फ ची विस्तीर्ण मैदाने दिसतात. 'सेव्हन सिस्टर्स' आणि इथंही निसर्गदृश्ये डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत या टेकड्यांवर बराच वेळ भटकत होतो. जेंव्हा परत फिरलो तेंव्हा लांब समुद्राच्या क्षितिजावर पाऊस येताना दिसला. आम्ही लगेचच छत्र्या उघडून तयारीतच एका बाकावर बसलो. सोसाट्याचा वारा आणि धो धो कोसळणाऱ्या पावसात छत्र्या सांभाळता सांभाळता आमच्या नाकी नऊ आले. एका क्षणी छत्र्यांबरोबर आम्हीही उडून जातो की काय असं वाटून गेलं. सिफोर्ड चा समुद्रकिनाराही खूप सुंदर आहे. तिथे थोडा वेळ रेंगाळत आम्ही पुन्हा ब्रायटन च्या परतीच्या बस मध्ये बसलो.
संध्याकाळ चे साडे सहा वाजले होते. ब्रायटनचे रस्ते आता संध्याकाळच्या जादुई वातावरणात पर्यटकांनी फुलू लागले होते. समुद्रात आतपर्यंत गेलेला जुना लाकडी मालधक्का (Brighton Pier) पर्यटकांनी गजबजला होता. या मालधक्क्यावर जत्रेत असतात तसे पाळणे, कॅसिनोज, डॅशिंग कार असे विविध करमणुकीचे खेळ होते. पण 'सेव्हन सिस्टर्स' सारखी मजा नव्हती. इथं आणि काहीवेळ ब्रायटन शहरात भटकून आम्ही लंडन कडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो...
आजचा 'सेव्हन सिस्टर्स' चा थरारक ट्रेक आठवतच रात्री उशिरा झोपलो. झोपताना मनात विचार आला 'भरपूर खर्च करून ‘लंडन आय’ मध्ये बसण्या पेक्षा कितीतरी जास्त आनंद निसर्गाकडून अगदी मुक्त हस्ते आणि फुकटात मिळतो नाही का?'
'लंडन डायरी' - समारोप
लंडनच्या महिन्याभराच्या वास्तव्यात आम्ही भरपूर आणि बेभानपणे भटकलो. आणि महत्वाचे म्हणजे चालत जास्त भटकलो. लंडनमध्ये भटकण्याची अनेक पर्याय आहेत. पैकी टॅक्सी म्हणजे महागच. भुयारातल्या अंधारात ट्यूब ने भटकल्यावर लंडन शहर कसे दिसणार? तसा इथे खाजगी मोटारी भाड्याने घेऊन भटकण्याचा पर्याय आहे पण हा पर्यायही अति महाग. (शिवाय येथील रहदारीचे काटेकोर नियम माहिती असल्याशिवाय ड्रायव्हिंग करणे म्हणजे आपला खिसा आणि ड्रायव्हिंग लायसेन्स दोन्हीही धोक्यात येऊ शकते.) मग दोनच पर्याय उरतात, एक म्हणजे बस आणि पायी चालत लंडन बघणे. या पैकी बस म्हणजे देखील वेगाने लंडन बघणे. मग शहरातील बारकावे सुटून जातात. मग उत्तम आणि स्वस्त मार्ग म्हणजे चालत भटकणे. त्यामुळे लंडन चं अंतरंग समजावून घ्यायला पायउतार व्हायलाच लागतं.
मुंबई प्रमाणेच लंडनच्या रस्त्यावर मोटारींचा, बसेस आणि टॅक्सींचा राबता खूप मोठ्या प्रमाणात असतो. मात्र या गर्दीत पादचाऱ्यांना खूप महत्व दिलेला असतं. इथं माणूस म्हणून माणसाला फार किंमत असते. आपल्या इकडेरहदारीत अपघात होऊन माणसं मरणं हे नित्याचेच. पण इथं तसं नाही. इथली रहदारी अतिशय शिस्तीत चालू असते. काही कारणांनी ट्राफी जॅम झालाच तर सर्व वाहने, मोटारी शांतपणे डावीकडे थांबतात. उजवीकडील रास्ता पुढून येणाऱ्या वाहनांसाठी मोकळा ठेवण्याची शिस्त लंडनवासीयांमध्ये असते. रस्ते ओलांडताना पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग असतात. या झेब्रा क्रॉसिंग च्या दोन्ही टोकांना पोलवरील पिवळ्या रंगाच्या गोल दिव्यांची अहोरात्र उघडझाप चालू असते. या दिव्यांना बिकन्स असे म्हणतात. शिवाय पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना गरजेप्रमाणे बटण दाबून सिग्नल चालू करता येतो. त्यामुळे रस्ता ओलांडताना बटण दाबून वाट बघायची, हिरवा दिवा लागताच रस्ता बिनधास्त ओलांडायचा अशी इथली पद्धत ! इथे सिग्नल आणि रहदारीचे नियम कटाक्षाने पाळावेच लागतात, नाहीतर लगेचच कुठेतरी जवळच असलेला पोलीस मामा येतो, आणि मोठा दंड आकाराला जातो. त्यामुळे वाहनचालक रहदारीचे नियम कटाक्षाने पाळतात. त्यामुळे लहान, थोर, वृद्ध, अंध निर्धास्तपणे रस्ता ओलांडू शकतात. अर्थात याचा अर्थ नियम फक्त मोटारवाल्यानाच आहेत असे नाही तर नागरिकांना, पादचाऱ्यांना देखील नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. आपल्या इकडच्या सारखे कोठूनही रास्ता ओलांडता येत नाही. रस्ता चौकातूनच आणि झेब्रा क्रॉसिंग वरून ओलांडायचा हे लंडनवासियांच्या रक्तातच असते. लहानपणापासूनच इथल्या मुलांकडून रहदारीचे नियम पाठ करून घेतले जातात. चालताना फुटपाथ वरून चालायचे हे इथं कुणाला सांगावे लागत नाही. इथल्या लहान थोरांच्या डोक्यात घट्ट बसलेलं असतं.
डबल डेकर बस
लंडन म्हंटले म्हणजे डोळ्यासमोर बँकिंगहॅम पॅलेस च्या दरवाज्याच्या कडेला विशिष्ठ काळी उंच टोपी घालून निश्चल उभा असलेला गार्ड, बिग बेन चे घड्याळ, थेम्स नदीवरचा टॉवर ब्रिज, रस्तोरस्ती दिसणारा लाल रंगाचा टेलिफोन बूथ आणि लाल रंगाची डबल डेकर बस अशा गोष्टी हमखास डोळ्यासमोर येतात. लाल रंगाच्या डबलडेकर बसच्या वरच्या उघड्य्या मजल्या वरून थंडगार वारा अंगावर घेत लंडन शहराची सफर करणे म्हणजे पर्यटकांच्या सुखाचा परमोच्च बिंदू असतो.
लंडन च्या डबलडेकरचं आम्हालाही आकर्षण होतंच. सध्या रोज बस मधून भटकंती चालूच आहे. इथे कुठेही जायला बस प्रवास फार सोयीचा असतो. आम्ही ऑयस्टर नावाचं एक कार्ड घेतलं आहे. ज्यामध्ये सुमारे चाळीस पौंड (सुमारे ३५०० रुपये) भरले आहेत. (सध्या आम्ही लंडन इतके भटकतोय की गेल्या चार दिवसातच कार्ड संपत आलंय. उद्या रिचार्ज करावे लागेल असं दिसतय) इथे बसमध्ये तिकीट काढायची भानगडच नाही. बस थांबल्यावर ड्रायव्हर बसल्याजागीच बटणे दाबून दरवाजे उघडतो. दरवाज्यापाशीच ड्रॉयव्हर च्या केबिन बाहेर एका छोट्या गोलाकार भागावर आपले कार्ड लावले कि आपोआप बसभाडे तुमच्या कार्डातून कमी होतात. तिथल्याच एका छोट्या स्क्रीनवर तुमच्या कार्डावरील शिल्लक रक्कम ही दाखहवली जाते. कार्डातले पैसे संपले कि पुन्हा कार्ड रिचार्ज करावे लागते. सर्व कॅशलेस!
बसमध्ये सतत पुढच्या स्टॉप चे नांव सांगण्यात येत असते. शिवाय येणाऱ्या स्टॉप ची नावे समोरच्या एलईडी डिस्प्ले वाराही दिसत असतात. प्रत्येक प्रवाशाच्या जवळ समोर एक बटण असते. ते दाबून ड्रायव्हरला बस थांबवण्याची सूचना करता येते. कोणीही बटण दाबून थांबण्याची सूचना केली नाही तर बस तशीच पुढे जाऊ शकते. कंडक्टरची गरजच नाही. कंडक्टर नसून देखील कुठलाही गोंधळ नाही, गडबड नाही.सर्व बसेस वेळेवर, सुरळीत धावत असतात. इथल्या बससेवेची आणखीन एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे कुठल्याही बस मार्गासाठी, कोणत्याही अंतरासाठी एकच तिकीट दर. तुम्ही लगेच पुढच्या स्टॉप वर उतारा किंवा शेवटच्या स्टॉप वर उतरा तिकीट तेव्हडेच ! या बसेस साठी सर्व रस्त्यावर सगळ्यात डावीकडे पांढऱ्या पट्ट्यांनी एक स्वतंत्र लेन अधोरेखित केलेली असते. या लेन मधून फक्त बसेस च जाऊ शकतात. या लाल डबलडेकर बसेस ही लेन ची शिस्त कटाक्षाने पाळतात. संपूर्ण रस्त्यावर कोणीही नसले तरीही लेन सोडून बसेस जात नाहीत. मुळात शिस्त हि लंडनवासियांच्या रक्तातच असते.
१८३० च्य्या सुमारास पॅडिंग्टन ते लंडन या प्रवासी वाहतुकीसाठी बस सुरु करण्यात आली. ही बस घोडे ओढीत असत. तेंव्हापासून ती लाल रंगाची आहे असं म्हणतात. पुढे १८५५ पासून 'लंडन जनरल ओम्नीबस कंपनी' (LGOC) ने पुढाकार घेऊन नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात बस सेवा सुरु केली. जवळजवळ १९०० साला नंतर घोड्यांचा वापर बंद करण्यात येऊन इंधनावर चालणाऱ्या बसेस सुरु झाल्या. पुढेपुढे वाढत्या लोकसंख्येमुळे आणि पर्यटकांच्या अलोट गर्दीमुळे बसेस ची संख्या वाढत जाऊन त्यांच्या मार्गांना नंबर्स देण्यात आले. अतिशय तत्पर सेवेसाठी लंडन बस खूप लोकप्रिय आहे.
इथे भटकताना नवखेही चुकू शकत नाहीत. चौका चौकात दिशादर्शक पाट्या, नकाशे लावलेले असतात. या नकाशासमोर उभे राहून नकाशा पहिला की तुम्ही उभे असलेले ठिकाण दाखवलेले असते. त्या अनुषंगाने रस्ते, प्रसिद्ध ठिकाणे याचे मार्गदर्शन नकाशात सोप्या पद्धतीने दाखवलेले असते. त्यामुळे नकाशे बघत आपण कुठेही आणि कुणालाही न विचारता भटकू शकतो. लंडन मध्ये आम्ही पायी भटकताना आम्हाला एकदाही कुणाला पत्ता विचारावा लागला नाही. रोज सरासरी दहा ते पंधरा किलोमीटरचे आमचे भटकणे आम्हाला कधीही दमवणुक करणारे वाटले नाही, कारण लंडन ची हवा! कायम वाहणारे थंडगार वारे अंगावर घेत भटकताना आम्हाला कधी थकवा म्हणून आला नाही.
राजीव.
लंडन डायरी - 2
6 वर्षानंतर पुन्हा '109, कॅमडन रोड'.
आज सकाळी थोडं उशिरानच उठलो. काल थोडी सर्दी झाल्याने गोळी
घेतली होती त्यामुळे गाढ झोप लागली होती. हर्षवर्धन ला आज ऑफिसला जायचं होतं. अनुजाला देखील बरच काम होतं. आज काय करायचं हे आम्ही
ठरवलं नव्हतं. हर्षवर्धन म्हणाला 'माझ्याबरोबर चला, मी ऑफिसला जातो.. तुम्ही तिकडे
भटका. मी अंदाजे संध्याकाळी चार वाजता मोकळा होईन मग आपण एकत्र घरी येऊ.' पण त्याच्या
कामाच्या वेळेची खात्री नसल्यामुळे 'आम्ही स्वतंत्रपणे कुठेतरी फिरायला जाऊ' असे त्याला
सांगितले. तो 10 वाजता त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला.
अलकाने लंडन सिटीमॅप चे एक अँप डाउनलोड केले होते. अनुजाच्या
मदतीने बस रुट्स, नंबर्स, बसच्या वेळा कशा बघायच्या वगैरे माहिती करून घेतली होती.
त्यामुळे मी निर्धास्त होतो. पण बऱ्याच वेळा मी वेंधळ्यासारखा वागतो, आणि काहीतरी घोळ
घालतो. आज असंच झालं. त्याचं असं झालं की.. 29 नंबरची ट्राफलगार स्क्वेअर ची बस आमच्या
समोर येऊन थांबली. बसला दोन दरवाजे असतात. एक बसमध्ये चढण्यासाठी आणि एक बसमधून उतरण्यासाठी.
बसमध्ये आत जाताना समोरच असलेल्या ड्रायव्हर च्या केबिनला लागून असलेल्या एका बॉक्स
ला प्रवाशांनी आपले ऑयस्टर कार्ड किंवा मोबाईल टेकवून आपले पेमेंट करायचे असते. पण
कसे काय माहिती नाही पण बसचा एक्झिट चा दरवाजा आधी उघडला आणि मी अनावधानाने (आपल्या
पद्धतीने) लगबगीने आत शिरलो. अलका अर्थातच माझ्या मागे आत आली. बस ड्रायव्हरच्या हा
घोळ लक्षात आला. तो तिकडून आमच्यावर ओरडायला लागला. काही क्षणात झालेला घोळ माझ्याही
लक्षात आला. आम्ही लगेचच बस मधून उतरून योग्य दरवाजाने बस मध्ये पुन्हा चढलो. ड्रायव्हरची
माफी मागत आम्ही आपापली कार्डे बॉक्सला टेकवून पेमेंट केले पण तोपर्यंत त्या काळ्या
कभिन्न, धिप्पाड ड्रायव्हर ने आमच्यावर तोंडसुख घेतलेच. मग ओशाळलेल्या चेहेऱ्याने आम्ही
आधीच गर्दी असलेल्या बस मध्ये उभारूनच प्रवास केला.
बरोब्बर 6 वर्षांपूर्वी लंडन मधील 109 कॅमडन रोड पत्त्यावरच्या
हर्षवर्धन-अनुजाच्या घरी आम्ही राहिलो होतो.
त्यामुळे आज जुन्या आठवणी जगावयाच्या ठरवल्या. सहा वर्षांपूर्वी आम्ही रोज कॅमडन कॅनॉल
मार्गाने बऱ्याच वेळा रिजेंट पार्क मध्ये मॉर्निंग वॉकला जायचो. तिथेच जायचं असं ठरवून
आम्ही अंघोळ, सकाळचा नाश्ता उरकून घराबाहेर
पडलो. आधी अर्थातच कोणती, किती नंबरची बस पकडायची? जिथे उतारायचं त्या बस स्टॉपचं नाव
वगैरे माहिती अनुजा कडून घेतली होतीच. मनाशी सर्व नावांची उजळणी करतच बस मध्ये बसलो.
मात्र कॅमडन भागातील सॅंडाल रोड स्टॉप आम्ही चुकून उतरायचं विसरलो. मग पुढच्या स्टॉपवर
उतरलो. थोडा गोंधळ झाला खरा पण लगेचंच घर सापडलं त्यामुळे निर्धास्त झालो. ह्याच्या
पुढे पूर्वी फिरल्यामुळे या भागाची काहीशी माहिती होती. मग काय सुरवात केली भटकायला.. जुन्या आठवणी काढत
काढत.
109, कॅमडन रोड ची पाटी दिसल्यावर मात्र माझ्या जीवात जीव
आला. मला पूर्वीचे आठवायला लागले. अलकाला मात्र फारसे आठवत नव्हते. कॅमडन रोड च्या
एका ब्रिजवरून आम्ही कॅमडन कॅनॉलला खाली उतरलो. कॅनॉलच्या कडेकडेने जाऊ लागलो. कॅमडन
कॅनॉल मध्ये मधून मधून लॉक्स ची व्यवस्था असते. या कॅनॉल मधून पूर्वी (म्हणजे ट्रेन्स
यायच्या आधी) प्रवासी आणि सामानाची यातायात होत असे. या कॅनॉल मधील चढ उताराचे व्यवस्थापन
या लॉक्स द्वारे केले जाते. अजूनही ही लॉक्स अस्तित्वात आहेत. कॅनॉल मधेच एका बाजूला
बोट जाण्यासाठी एक अरुंद कॅनॉल तयार करून, पाणी अडवण्यासाठी अजस्त्र लाकडी दरवाजे लावून
पाण्याची पातळी वर खाली केली जाते. हे बघणे खूप गंमतशीर आहे.
पुढे एकदिड कि.मी. अंतर गेल्यावर पुन्हा वर येऊन रिजेंट पार्क
मध्ये शिरलो. रिजेंट पार्क मध्ये भरपूर भटकल्यानंतर अलकाला थोडे दमायला झाले. मग एका
बाकावर निवांतपणे गप्पा मारत बसलो. पुण्याहुन ऑफिसमधून फोन आल्यामुळे थोड्या व्यवसायिक
कामाचा आढावा घेतला. सोबत आणलेले सटरफटर खाणे चालूच होते.
आता दुपारचे दोन वाजत आले होते. मग पुन्हा कॅमडन कॅनॉल च्या
कडेने परत फिरलो. खूप भूक लागली होती. कॅमडन च्या रस्त्यावर स्ट्रीट फूड मिळण्याचे
एक भारी ठिकाण आहे तिथे थांबलो. एका स्टॉलवर पनीर सागा व्हेज बर्गर आणि फिंगर चिप्स
घेतले. ह्या स्टॉलवरचा माणूस माझ्याकडे बघून म्हणाला 'कहासे हो?' माझ्या भारतीय चेहेऱ्याकडे
बघून त्याने ओळखले असावे. मग त्याने तोडक्यामोडक्या हिंदीत माझ्याशी गप्पा मारल्या.
लंडन मध्ये असा अनुभव बऱ्याच वेळा येतो. तब्बल 1500 रुपायांचा एक व्हेज बर्गर आणि फिंगर
चिप्स खाऊन आम्ही परत फिरलो. घरी यायला दुपारचे चार वाजले होते.
रविवार दि 30 जुलै 2023:
आजकाल खूप पहाटे जाग येते. कारण कदाचित वय? कदाचित फिरायला जाण्यासाठी पहाटे उठायची सवय? किंवा आत्ता नवीन जागा? ते काहीही असो.. आज पहाटे 5 वाजताच नेहेमीप्रमाणे जाग आली. बराच वेळ अंथरुणात लोळलो, पण पुन्हा झोप येईना म्हणून उठलोच. हर्षवर्धन, अनुजा, अलका गाढ झोपलेले. काय करावे समजेना...
मग प्रातर्विधी आटोपून किचन मध्ये गेलो. वेळ जावा म्हणून कालची जेवणाची भांडी, प्लेट्स धुतल्या. मनात आले पुण्यात कधी अशी भांडी धुतली नव्हती, पण इथे धुणे भांड्यासाठी काही आपल्यासारखी मोलकरीण नव्हती. सर्व आपले आपण करायला हवे. चहा घ्यावासा वाटत होता, पण कुठे काय ठेवलंय ते माहित नसल्यामुळे काय करावे असा विचार करत होतो, तेव्हड्यात अलका उठून आली, आणि मी हुश्श केले. मग अलकाने चहा केला. हवेत छान गारवा होता त्यामुळे चहा चे घुटके घेत आम्ही गप्पा मारत निवांत बसलो. तोपर्यंत 6 वाजले. हर्षवर्धन, अनुजा अजून झोपलेले होते...
अलकाला म्हणालो 'चल, फिरायला जाऊ'. पण ती नाही म्हणाली. मग एकटाच घराच्या किल्ल्या आणि छत्री घेऊन घराच्या बाहेर पडलो. म्हटलं बघू तरी एकटे जाऊन. मग कालच जाऊन आलेल्या फिन्सबरी पार्क मध्ये जायचं ठरवलं..
फिन्सबरी पार्क हे लंडन मधील हॅरिंगे भागातलं सार्वजनिक उद्यान आहे. व्हिक्टोरियन काळातील लंडनच्या महान उद्यानांपैकी हे पहिले उद्यान होते. पार्क हॅरिंगे, फिन्सबरी पार्क, स्ट्रॉउड ग्रीन आणि मॅनर हाऊसच्या शेजारच्या सीमांना लागून आहे. युनायटेड किंगडम आणि ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासात, व्हिक्टोरियन युग हा राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीचा काळ होता, 20 जून 1837 ते 22 जानेवारी 1901 रोजी तिचा मृत्यू होईपर्यंत. त्या काळातल्या इमारती/घरे विशिष्ठ शैलीत आणि एकासारखी बांधलेली दिसतात. असो..
सुमारे 100 एकर जागेवर हे पार्क पसरलेलं आहे. खरं तर लंडन मधील सर्वच उद्याने पाहण्यासारखी आहेत. आमच्या आधीच्या लंडन मुक्कामी आम्ही हाईड पार्क, आणि रीजेन्ट पार्क मध्ये भरपूर भटकलो होतोच. आता हे पार्क.. विस्तीर्ण हिरवळीची मैदाने, प्रचंड जुने मोठे वृक्षांनी व्यापलेले हे पार्क आहे. मध्यभागी एक मोठे स्वच्छ
तळे, त्यात बदके, राजहंस फिरत होते. गुबगुबीत पारवे लगबगीने फिरत होते. गुबगुबीत खारी तुरुतरू पळत होत्या. स्वच्छ रस्ते, गार भणाणणारा वारा, अधून मधून व्यायाम करणारे नागरिक, त्यात काहीजणांकडे गोंडस छोटुकली कुत्री वगैरे वातावरण मोहून टाकणारे होते.
मधेच उजव्या हाताला टेनिस कोर्ट, टेबल टेनिस खेळण्यासाठी व्यवस्था होती. थोडं आणखीन पलीकडे ओपन जिम मध्ये तरुण मुले, जाडजूड बायका व्यायाम करत, घामाघूम होत होते. कुणी सायकलिंग करत होते..
मी चालत चालत बराच पुढे गेलो. पार्कचे अगदी पलीकडचे गेट लागले. ह्या भागाला मॅनॉर गेट म्हणतात. पार्कच्या बाहेर पडून उजव्या हाताला फिन्सबरी अंडर ग्राऊंड रेल्वे स्टेशन आहे. याच अंडर ग्राऊंड रेल्वे ने आम्ही परवा हिथ्रो विमानतळावरून संध्याकाळी घरी आलो होतो. एव्हाना 3 किलोमीटर चालणे झाले होते. मग माघारी फिरून त्याच मार्गाने परत आलो..
आज सेंट्रल लंडन मध्ये जाण्याचा विचार चालू आहे असे हर्ष-अनुजा च्या बोलण्यावरून जाणवले. 'कोलंबिया रोड फ्लावर मार्केट' ला जायचा घाट घातला गेला होता. आम्ही रिकामटेकडेच होतो. आम्हाला कुठेही उंडारायला आवडलंच असतं.
ऐतिहासिक जागतिक वारसा स्थळ: 'बाथ स्पा'
आम्ही खरंतर लंडन मधील बरीचशी पर्यटन स्थळे पाहिलेली आहेतच. आम्ही हर्षवर्धनला म्हणालो की कुठेतरी नवीन ठिकाणी जाऊयात. अनुजा ने सुचवलं की 'आपण *'बाथ'* ला जाऊयात. तुम्हाला आवडेल ते ठिकाण.' आज दोघांनाही सुट्टी असल्याने आम्ही सर्वांनी बाथ ला जायचे ठरवले. रेल्वेची ऑनलाईन तिकिटे काढली आणि घरून सकाळी आठ च्या सुमारास निघालो.
आमच्या घराजवळच्या फिन्सबरी पार्क अंडरग्राउंड मेट्रोने आम्ही किंगक्रॉस स्टेशन पर्यत जाऊन पुन्हा ट्रेन बदलून पेडिंगटन रेल्वे जंक्शन ला गेलो. प्रचंड, भव्य पेडिंगटन स्टेशन अक्षरशः डोळ्यात मावत नाही. वेळेत पोहोचल्यामुळे आमची बाथ स्पा कडे जाणारी ट्रेन उभीच होती. तिकिटे कालच आरक्षित केलेली असल्यामुळे प्रश्नच नव्हता. फारशी गर्दी देखील नव्हती. आज पाऊस नसल्यामुळे लख्ख उन पडले होते. खिडकीतून छोटी छोटी गावे, वस्त्या दिसत होत्या. स्वच्छ हवेमुळे दूरवर डोंगर डोळ्यांना सुखावत होते. आमच्या गप्पा चालूच होत्या. इथल्या रेल्वेत, विमानात असते तशी चहा कॉफी स्नॅक्स ची ट्रॉली फिरत असते. गप्पांबरोबर कॉफ़ीचे गरमगरम घुटके घेत प्रवास कधी संपला ते कळलंच नाही.
ऊबदार रेल्वे मधून बाहेर पडल्यावर थंड वाऱ्यांची जाणीव झाली. स्टेशन मधून बाहेर पडल्यावर लगेच असलेल्या बाथ शहरातून आम्ही भटकू लागलो. रोमन काळातील ऐतिहासिक इमारतींबरोबर नवीन काळातील इमारती, अद्ययावत उपहरगृहे, डबलडेकर बसेस, चमकदार मॉल्स्, दुकाने असे गंमतशीर वातावरण इथे आहे. तसं बाथ हे गाव फार मोठ नाहीये. पण निसर्गाने ह्या गावावर विशेष कृपा केलेली आहे. अतिशय टूमदार अशा गावात भटकण्याचा अनुभव घेतल्याशिवाय इंग्लंडला येणारा प्रत्येक प्रवासी आपल्या मायदेशी परत जात नाही..
बऱ्याच वेळ भटकल्यावर बहुदा माझ्या प्रश्नांना कंटाळून अनुजा म्हणाली की आपण 'हॉप ऑन हॉप ऑफ' बस टुर करूयात म्हणजे गाईड कडून सर्व शहराची माहिती देखील मिळेल आणि पाय देखील दुखणार नाहीत.' अर्थातच ही कल्पना आम्ही उचलून धरली. लगेचच मुख्य चौकातून बस चे बुकिंग केले. (मला सिनियर सिटीझन म्हणून थोडासा डिस्काउंट मिळाला. मी खुश.😉) बस मध्ये प्रत्यकासाठी इयर फोन्स दिले जातात. या बसची अजून एक गंमत म्हणजे एकदा तिकिट काढले की तुम्ही दिवसभर कितीही वेळा फिरू शकता, कंटाळा आला की उतरू शकता. पुन्हा चढू शकता. सीटजवळच्या सॉकेट मध्ये इयर फोन ची पिन घालताच गाईडचे बोलणे ऐकू येऊ लागले...
दक्षिण पश्चिम इंग्लंडमधील 'बाथ स्पा' शहराची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन लोकांनी केली होती ज्यांनी नैसर्गिक गरम पाण्याचे झरे थर्मल स्पा म्हणून वापरले होते. मध्ययुगात लोकर उद्योगासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र बनले परंतु १८व्या शतकात जॉर्ज (तिसरे) यांच्या कारकिर्दीत ते साहित्य आणि कलेमध्ये प्रसिद्ध असलेले एक मोहक स्पा शहर म्हणून विकसित झाले. प्राचीन काळी उच्च श्रीमंत वर्गातील रोमन नागरिक इथे असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान करायला यायचे. ह्या पाण्यात खनिजाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने रुग्णांना विशेषतः त्वचारोगावरील रुग्णांना इथे अंघोळ करण्यासाठी पाठवले जायचे. मग इथे येऊन अंघोळी करणे हा श्रीमंती शौक झाला.
युनोस्को ने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेलं बाथ शहर हे सांस्कृतिक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. रोमन अवशेष, विशेषत: सुलिस मिनर्व्हाचे मंदिर आणि बाथ कॉम्प्लेक्स ह्यासाठी इथे पर्यटक आवर्जून भेट देतात. येथील बाथ ऍबी, ग्रँड पॅराडे, द रॉयल क्रिसेन्ट ही ठिकाणे देखील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे..
आमची बस पुढे जात होती. पुढे एक ऐतिहासिक प्रार्थनास्थळ दृष्टीस पडलं. 'बाथ ऍबी' सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे ख्रिश्चन उपासनेचे ठिकाण (चर्च) आहे. बाथ शहरातील अनेक स्थित्यंतरे ह्या प्रार्थनास्थळाने बघितलेली आहेत. अनेक मोठे संघर्ष, स्थापत्य शास्त्रातील सुधारणा, धार्मिक परिवर्तने ह्या इमारतीने अनुभवलेली आहेत. महत्वाचे म्हणजे दोन महायुद्धातून ही व इथली ऐतिहासिक स्थळे वाचली आहेत. आजही धार्मिक उपासक आणि अभ्यागत यांच्यासाठी 'बाथ ऍबी' एक आवश्यक ठिकाण म्हणून उभे आहे.
आमची बस टुर मजेत पुढे पुढे
चालली होती. अचानक हर्षवर्धन म्हणाला 'इथे पुढे खूप सुंदर बोटानिकल गार्डन आहे. ते पाहुयात का?' मग बस मधून उतरून अर्धा तास आम्ही गार्डनमधे भटकलो. फोटो काढले. दुपारची जेवणाची वेळ झाली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते. मग आम्ही मार्केट मध्ये येऊन एक इंडियन रेस्टॉरंट गाठले. मस्त जेवण केलं. पुन्हा बस मध्ये चढलो. ह्या अश्या बऱ्याच छत नसलेल्या हॉप ऑन बसेस शहर भर फिरत असतात. त्यातल्या कुठल्याही बस मध्ये चढले उतरले तरी चालते..
पुढे 'द रॉयल क्रिसेन्ट' नावाची एक अतीप्रचंड' अर्धवर्तुळाकार इमारत लागली. रॉयल क्रिसेन्ट म्हणजे 30 टेरेस्ड घरांची एक रांग आहे. वास्तुविशारद जॉन वूड यांनी डिझाईन केलेली आणि 1767 आणि 1774 च्या दरम्यान बांधलेली ही इमारत आहे. ही इमारत युके मधील जॉर्जियन आर्किटेक्चरच्या उत्कृष्ठ उदाहरणापैकी एक आहे. गेल्या काही वर्षात आतील भागात काही बदल केले गेले असले तरी जॉर्जियन दगडी दर्शनी भाग तेंव्हा पूर्वी बांधला
तसाच आहे. इथे राहणे म्हणजे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. इथे अनेक प्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती राहतात.
इयर फोन मधल्या गाईड कडून माहिती ऐकत ऐकत आम्ही सावकाशपणे शहरातून पुढे पुढे जात होतो. आता संध्याकाळ होत होती. पुढे एक ब्रिज लागला. शहरातील जॉर्जियन स्थापत्यकलेचे अजून एका उत्तम उदाहरणांपैकी एक आणि जगातील फक्त चार पुलांपैकी एक ज्याच्या दोन्ही बाजूला दुकाने असलेला असा
'पुलटेनी ब्रिज (Pulteney Bridge) लागला. 1769 मध्ये रॉबर्ट अॅडम यांनी तो डिझाइन केला होता. विल्यम जॉनस्टोन पूलटेनी यांच्या पत्नी फ्रान्सिस पुलटेनी यांच्या नावावरून या पुलाचे नाव आहे. विल्यम जॉर्जियन बाथमधील एक महत्त्वाचा माणूस होता, त्याची आजूबाजूच्या परिसरात बरीच जमीन होती. शहराच्या पश्चिमेकडील जॉन वुडच्या शहराला टक्कर देण्यासाठी 'नवीन शहर' निर्माण करण्याची त्याची भव्य योजना होती. त्याच्या या भव्य योजनेसाठी एका नवीन पुलाची गरज होती आणि त्याला जुना सर्वसाधारण दिसणारा पूल नको होता, त्याला एक नेत्रदीपक पूल हवा होता, मग त्याने हा ब्रिज बांधला. हा पूल ४५ मीटर लांब आणि १८ मीटर
रुंद आहे. पादचाऱ्यांसाठी हा पूल बांधण्यासाठी ही योजना आखण्यात आली असली तरी, हा पूल अजूनही बस आणि टॅक्सीद्वारे वापरला जातो. 'एव्होन' नदीवर बांधलेला हा ब्रिज एक जागतिक वारसा स्थळ असून जो जॉर्जियन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
पुलाच्या बांधकामाच्या नंतर बरेच बदल करण्यात आले, ज्यात पुलावर दुकानांचा विस्तार केला गेला आणि दर्शनी भाग बदलला गेला. 18 व्या शतकाच्या अखेरीस, पुरामुळे त्याचे नुकसान झाले होते, परंतु त्याच डिझाइनमध्ये तो पुन्हा बांधला गेला. पुढच्या शतकात दुकानांच्या बदलांमध्ये पुलाच्या उत्तरेकडील बाजूस कॅन्टिलिव्हर्ड विस्तारांचा समावेश होता. 20 व्या शतकात, पुलाचे जतन करण्यासाठी आणि अंशतः त्याचे मूळ स्वरूप परत करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या, ज्यामुळे पर्यटकांचे आकर्षण वाढले..
संध्याकाळ झाल्यामुळे वातावरणातील गारवा वाढला होता. आम्ही पुन्हा बस मधून खाली उतरून ह्या पुलावरून फेरफटका मारला. खाली जाऊन एका बाकावर निवांत बसून राहिलो. नदीच्या पाण्यात सीगल पक्षी जलविहार करत होते. पाण्याचा खळखळ आवाज दिवसभराचा शीण घालवत होता. संध्याकाळ झाल्यामुळे गर्दी थोडी कमी झाली होती. आमची परतीची ट्रेन थोडी उशिराची होती, त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या मार्केट मधील छोट्या रस्त्यावरून निवांतपणे भटकत राहिलो. अजून एक गंमत सांगायची राहिली. संध्याकाळी बाथ च्या रस्त्यावरून फिरताना अनुजाने आम्हाला 'मर्सी इन ऍक्शन' या संस्थेच्या 'चॅरिटी शॉप' नावाच्या दुकानात नेले. हया दुकानात अनेक वापरलेल्या (सेकण्ड हॅन्ड) वस्तू ठेवलेल्या असतात, ज्या लोकांनी दान केलेल्या असतात. ह्या अश्या वस्तूंची पुन्हा विक्री केली जाऊन त्या पैशांचा उपयोग अनेक गरीब, अविकसित देशातील गरजू लोकांसाठी केला जातो. आम्ही तिथे आवर्जून खरेदी केली. आमच्या परतीच्या ट्रेनची वेळ झाली होती. पुन्हा पेडिंगटन, किंगक्रॉस, फिन्सबरी करत परतलो. खूप दमायला झालं होतं.
बाथ शहर इतिहास आणि परंपरेने नटलेले आहे, ऐतिहासिक इमारती आणि स्मारकांपासून ते संग्रहालये आणि गॅलरीपर्यंत एक्सप्लोर करण्यासाठी अतिशय आदर्श ठिकाण आहे. हे थर्मल बाथ, विस्तीर्ण, सुंदर बागा आणि शांत नदीकिनारी चालण्यासाठी, कुटुंबियांसोबत आनंदात वेळ घालवण्यासाठी देखील उत्तम ठिकाण आहे. लंडन पासून केवळ 125 की.मी. अंतरावर असलेलं, केवळ दीड दोन लाख लोकसंख्येचं, आणि एव्होन नदीच्या काठी वसलेलं हे टुमदार गाव बघायलाच हवं...
द ब्रिटिश लायब्ररी, किंग्ज क्रॉस, ढिश्यूम…ढिश्यूम
वगैरे...
काल हर्षवर्धन आणि अनुजा त्यांच्या कामानिमित्त सकाळीच घराबाहेर पडले. दिवस तसा कंटाळवाणा होता. सकाळचा नाश्ता, अंघोळी करून घरात उगाचच बसलो होतो. मग 11 च्या सुमारास मी एकटाच बाहेर पडलो. फिन्सबरी च्या गल्ली बोळातुन भटकट राहिलो. मधेच ऑफिस मधून माझी ऑफिस मधील सहकारी उज्वलाचा फोन आला. चालता चालता ऑफिस मधील अडचणी सोडवल्या. आजच्या
कामाचा आढावा घेतला. तिला व्हाट्सअप व्हिडीओ कॉल करून थोडं आमचं फिन्सबरी पार्क दाखवलं. अंदाजे 5 किमी फिरून झाल्यावर घरी आलो. रमतगमत फिरल्यामुळे छान वेळ गेला. पण आज उन मात्र कडक पडलं होतं. जाम उकडत होतं. दुपारच्या जेवणाला अलकाने मिक्सव्हेज पराठे, पास्ता, आणि राईस असा झकास बेत केला होता. जेवणानंतर वामकुक्षी घेताना हर्षवर्धनचा त्याच्या ऑफिस मधून फोन आला. 'आज संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाऊयात' असं तो म्हणत होता. अनुजा ब्रिटिश लायब्ररीत गेली होती. हर्षवर्धनचं ऑफिस जवळच असलेल्या ला युस्टन (Eustan) भागात होतं. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही घरून सहा वाजता निघून मनोर हाऊस पाशी जाऊन 253 नंबरच्या बसने युस्टनच्या स्टॉपवर उतारा. आपण तिथे भेटू, अनुजला घेऊन त्या भागातच भटकू. रात्रीचे जेवण तिकडेच कुठेतरी घेऊ. आम्ही असेही घरात बसून कंटाळलेलोच होतो. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत युस्टन ला पोहोचलो. आमचे लाईव्ह गुगल लोकेशन हर्षवर्धनला शेअर केलेले असल्याने त्याने आम्हाला लगेचच हुडकून काढले..
मग आम्ही अनुजला घेण्यासाठी ब्रिटिश लायब्ररीत गेलो. दहा पंधरा मिनिटातच आम्ही तिकडे पोहोचलो. ब्रिटिश लायबरी बद्दल मी ऐकून होतो, पण आज प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. अनुजा सांगत होती की 'या ब्रिटिश लायब्ररीत दीड दोनशे दशलक्षाहून अधिक पुस्तके आहेत. सुमारे तेरा दशलक्षाहून अधिक मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातली पुस्तके आहेत. तसेच हजारो नियतकालिके मायक्रोफिल्म्स आहेत. युनायटेड किंगडमच्या या राष्ट्रीय संग्रहालयाद्वारे व्यवसायिक, शैक्षणिक, संशोधनात्मक, वैज्ञानिक समुदयांना माहिती सेवा देण्याचे महत्वाचे काम ही लायब्ररी करते. येथील पुस्तके, हस्तलिखिते, नकाशे, शिक्के, ध्वनी रेकॉर्डिंगज, छायाचित्रे, संगीत व इतर साहित्यप्रकार नवनवीन संशोधन करणाऱ्या संशोधकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. हर्षवर्धन म्हणाला 'माझ्या पीएचडी चा प्रबंध देखील या लायब्रीत सबमिट केला गेलाय बर का, अर्थात इलेक्ट्रॉनिक माध्यमात.' माझ्या मुलाने संशोधन करून लिहिलेला प्रबंध जगातील सर्वश्रेष्ठ अशा ब्रिटिश लायब्ररीत उपलब्ध असून
कायमचा अस्तित्वात राहणार आहे या कल्पनेने माझा उर अभिमानाने भरून आला..
इथे कुणालाही, उपलब्ध असलेल्या कोणत्याही साहित्याचे वाचन करण्यासाठी, एकमेकांना भेटण्यासाठी, अभ्यास करताना कंटाळा आल्यास खाण्यापिण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध असते ती देखील विनामूल्य. एकूण काय तर सगळं थक्क करणारं. ह्या ब्रिटिश लायब्ररीची भव्य इमारत अक्षरशः डोळ्यात मावत नाही. तेथील एक प्रदर्शन पाहताना आम्हाला काही भारतीय ग्रंथ देखील दिसले. पंजाबच्या चंदीगडचा नकाशा, शिखांचा पवित्र गुरुग्रंथ, 16 व्या शतकातले हिंदूंचे भगवत पुराण देखील आहे इथे. हिंदुईझम, बुद्धिझम, मुस्लिम धर्माबद्दल सविस्तर माहिती देखील इथे बघायला मिळते. अनुजा म्हणाली आता बाहेर पडूयात कारण कितीही बाधितलं तरी हे सारं संपणारं नाही..
ब्रिटिश लायब्ररीतून बाहेर पडून आम्ही जवळच असलेल्या किंग्ज क्रॉस स्टेशन कडे गेलो. हे युके मधील लंडनस्थित असलेलं अतिशय महत्वाचे रेल्वेकेंद्र आहे. हा भाग अतिशय व्यस्त असण्याचे कारण प्रमुख रेल्वे स्टेशन हे तर आहेच, पण त्याबरोबरच येथून युरोपात फ्रांस ला जाणारी युरोस्टार रेल्वे सेवा पुरवली जाते. ही वेगवान युरोस्टार फ्रान्सला जाताना समुद्राखालून जाते, त्यामुळे पर्यटक युरोस्टार मधून प्रवास करण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. (आम्ही आमच्या युरोप ट्रिप च्या वेळी 2005 मध्ये या युरोस्टार ने केलेला प्रवास मला आठवला) या भागात उत्तरेला औद्योगिक क्षेत्र आहे. तेथील उद्यान चौक करमणुकीच्या गोष्टींनी भरलेला असतो.
मुलांसाठी अतिशय सुंदर कारंजी, कोल ड्रॉप विविध (कोळशाच्या खाणीतून काढलेला कोळसा शहरात आणून साठवायचा आणि किंगक्रॉस या रेल्वे स्थानकाला पुरवायचा त्याला कोल ड्रॉप सेंटर म्हणतात) विविध खाद्यपदार्थांची उपहरगृहे यामुळे हा भाग अतिशय गजबजलेला असतो. इथल्या एका भव्य चौकात एक शो चालू होता. हा शो पाहण्यासाठी समोर अनेक पर्यटक, कुटुंबाला घेऊन आलेले नागरिक हातात बियर, वाईन चे ग्लास घेऊन बसले होते. स्टेज जवळ तरुणाई संगीताच्या तालावर थिरकत होती, बेभानपणे नाचत होती. एकूणच सगळा आनंदोत्सव चालू होता आणि हा आनंदोत्सवाचा यज्ञ इथे कायम धगधगत असतो..
इथे आम्हाला 'ढिशुम' नावाचे एक इंडियन रेस्टॉरंट दिसले. गंमत म्हणजे तेथील भारतीय पदार्थ चाखाण्यासाठी भलीमोठी लाईन लागलेली होती. गोऱ्या साहेबाच्या देशात भारतीय पदार्थांची असलेली लोकप्रियता बघून मी सुखावलो. आम्ही काही रांगेत उभारलो नाही. त्यापेक्षा काहीतरी वेगळे खावे म्हणून आम्ही 'नांदोस' नावाच्या रेस्टॉरंट मधील ब्राझीलियन पदार्थ खाणे पसंत केले. रात्र झाली होती. घरी परतायला हवे होते...
डॉलस्टन.. हॅकनी विक..स्ट्रॅटफोर्ड..ऑलिम्पिक नगरी वगैरे..
आज कुठेच जायचा प्लॅन नव्हता.
मग सकाळीच नेहेमीच्या फिन्सबरी बागेत फिरायला गेलो. सुमारे 5 किमी चालणे झाल्यावर अलकाचा फोन आला व लंडन मध्ये 'कुठेतरी भटकायला जायचं ठरलंय' असं म्हणाली. मी तातडीने घरी आलो. ब्रेकफास्ट करून लगेचच आम्ही बाहेर पडलो. बसने डॉलस्टन स्टॉप वर उतरलो. बस मध्ये हर्षवर्धनने सांगितले की 'आम्ही पूर्वी राहत असलेल्या घराजवळ आपण आलोय. आमचे जुने घर तुम्हाला दाखवतो.' बसमधून उतरल्यावर बऱ्यापैकी रहदारीच्या रस्त्यावरच्या एका घराच्या दुसऱ्या मजल्यावरच्या दोन खिडक्यांकडे बोट दाखवून तो म्हणाला 'हे आमचे जुने घर. कोव्हिड च्या लॉकडाऊनचा भयंकर काळ आम्ही इथे काढला. हे घर खूपच लहान म्हणजे एका खोलीचेच होते. त्यामुळे लॉक डाऊन मध्ये ह्या घराच्या एका खोलीत आम्ही कसे राहिलो होतो ते आठवून आता मनाचा थरकाप होतो. एका प्रकारची निराशा आली होती. त्यात लंडनची हवा सततची ढगाळ पावसाळी, सर्व मार्केट बंद असल्याने एकप्रकारचे उदास, अनिश्चित असे वातावरण होते. एकच खोली असल्याने घरात देखील फिरायला पुरेशी जागा नव्हती. जाम वैताग आला होता. पण सगळ्या जगाचीच अशी अवस्था असल्याने काही इलाज नव्हता. रोज व्हाट्सअप कॉल करून पुण्यात तुमच्याशी बोलणे हाच त्या काळातला विरंगुळा होता.' हर्षवर्धन आणि अनुजा फिरत फिरत कोव्हिड काळातल्या आठवणी सांगत आमच्या बरोबर फिरत होते..
या घराजवळच्या समोरच्या रस्त्यावर एक स्ट्रीट मार्केट होते. आपल्याकडच्या तुळशीबागेसारखं हे मार्केट आहे. पण इथं फिश मार्केट, मीट मार्केटसहित सर्वच मिळतं.
छोटे छोटे खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळे देखील इथे दिसत होती. इथे आम्ही भटकताना खायला चेरिची गोड, रसदार, टपोरी फळे घेतली. अर्धापाऊण तास विन्डो शॉपिंग करत आम्ही त्या भागातल्या मुख्य रस्त्यावरून म्हणजे मेनस्ट्रीट वरून चालू लागलो. सगळीकडे दिसतात तसेंच मॉल्स, छोटी कॉफी शॉप्स वगैरे दिसत होती. का कुणास ठाऊक पण मला ह्या भागात तरुण मुलंमुली जास्त दिसत होती. आमच्या आताच्या घराच्या भागात म्हणजे फिन्सबरी मध्ये वयस्कर, कुटुंबवत्सल मंडळी जास्त असावीत असं वाटलं. असो...
भटकताना दुपारचे तीन कधी वाजले ते समजलंच नाही. मग मंगल नावाच्या एका टर्किश रेस्टॉरंट मध्ये जेवलो. आपल्या
वरणा सारखे दिसणारे, तडका दिलेले लिंटल सुप, ब्रेड, सालेड, ऑलिव्ह, 'लहमाजून' अशा विक्षिप्त नावाचा पदार्थ (पोळीवर भाज्या पसरेला पदार्थ), पीदे (टर्किश पिझ्झा), आयरन नावाचे मस्त ताक घेतलं. अनुजने शलगम नावाचे कोल्ड्रिंक घेतले.
जेवण वेगळे असले तरी रुचकर होते. रेस्टॉरंटच्या बाहेरच्या बाजूला फुटपाथर असणाऱ्या टेबलावर बसून जेवण्याची एक वेगळीच गंमत असते. संध्याकाळचे चार साडेचार वाजले होते. पुढे आम्ही
डॉलस्टन किंग्जलँड स्टेशन वरून ओव्हर ग्राऊंड रेल्वे ने स्ट्रॅटफोर्ड ला गेलो. तिथे भव्य अश्या मॉल्स् मध्ये उगीचच भटकत राहिलो. अर्थात थोडं शॉपिंग देखील केलं. अनुजाला
शूज घेतले.
हा स्ट्रॅटफोर्डचा भाग देखील खूप गर्दीचा आहे. स्ट्रॅटफोर्ड मधील रस्त्यातून भटकत पुढे आम्ही 'क्वीन एलीझाबेथ ऑलिम्पिक पार्क' कडे निघालो. वाटेत 2012 मध्ये लंडन मध्ये झालेल्या ऑलिम्पिक मधील
वापरलेली स्टेडियम्स दिसली.
पुढे 'ली' नावाची एक सुंदर नदी लागली. या नदीच्या किनाऱ्याने
वसवलेलं अप्रतिम उद्यान (क्वीन एलीझाबेथ ऑलिम्पिक पार्क) लागलं. या ऑलीम्पिक पार्कमध्ये फिरताना एक पोलीस येऊन सांगून गेला की 'इथे मोबाईल चोरणारे येऊ शकतात, तुम्ही काळजी घ्या'. आम्हाला आश्चर्य वाटले. बागेमध्ये बराच वेळ फिरल्यानंतर आम्ही तिथल्या एका हिरवळी वर अनुजाने बरोबर आणलेल्या सतरंजीवर गप्पा मारत बसलो. बागेच्या कडेनेच 'ली' नदी वहात होती. युरोपतील कुठल्याही जलाशयात किंवा नदीत शुभ्र राजहंस आणि बदके असतातच. संध्याकाळच्या वेळचा थंडगार वारा शरीराला सुखावत होता. गप्पा तर चालू होत्याच. जसा अंधार पडू लागला तसे थंड वारे शरीराला बोचू लागले. मग आम्ही परतायचे ठरवले. परत येताना पुन्हा हॅकनी विक स्टेशनावरून व्हिकटॉरिया लाईन पकडून आमच्या फिन्सबरी पार्क ला उतरलो. बरीच रात्र झाली होती...
आज सकाळपासुन मी बराच फिरलो. सगळे मिळून तब्बल 14 किमी चालणे झाले. पण लंडन फिरायचे असेल, अनुभवायचे असेल तर भरपूर चालतच भटकायला हवे.
'ओपनहायमर'
लंडन हे शहर बघायचं किंवा अनुभवायचं असेल तर 7/8 दिवस टुरिस्ट सारखं इथं राहून चालणार नाही. किमान महिनाभर राहून चालत चालत हे शहर एक्सप्लोर करायला हवं. हर्षवर्धन आणि अनुजा इथं राहात असल्यामुळे आम्हाला लंडन निवांतपणे बघायला मिळतंय. मागच्या वेळेला लंडनची लोकप्रिय ठिकाणे आमची तशी बघुन झालीच होती. ह्या ट्रिपमध्ये मागच्या वेळी न बघितलेली ठिकाणे व काहीतरी वेगळं बघायचा आमचा प्रयत्न होता. आज तसं काही ठरवलं नव्हतं म्हणून घरी आरामच केला. संध्याकाळी गप्पा मारताना अचानक सिनेमा बघायचा प्लॅन ठरला. सध्या चर्चेत असलेला 'ओपनहायमर' आणि 'मिशन इंपॉसिबल' असे दोन पर्याय होते. ओपनहायमर चे पारडे जड झाले, आणि अनुजाने सिनेमांची ऑनलाईन तिकिटे काढली.
19 नंबरची इजलिंगटन
कडे जाणारी बस पकडून आम्ही 'व्ह्यु' (VUE) नावाच्या थिएटर ला गेलो.
साधारण 7 पाउंड एव्हडे तिकिट होते. अनुजाने जाताना बरोबर आलूपराठ्यांचे रोल करून घेतले होते. 'व्ह्यु' थिएटर आपल्याकडच्या मल्टी स्क्रिन थिएटर सारखेच होते. थिएटर मध्ये शिरल्यावर लक्षात आले की थिएटर निम्मे देखील भरलेले नव्हते. एवढा बोलबाला असलेल्या चित्रपटाला गर्दी नव्हती ह्याचे आश्चर्य वाटले..
क्रिस्तोफर नोलानचा चित्रपट असल्यामुळे खूप उत्सुकतेने चित्रपट पाहू लागलो. असं म्हणतात की नोलानचे चित्रपट पहिल्यांदा पाहून समजत नाहीत. माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला तो समजणे जरा अवघडच होते. पण विषय माझ्या आवडीचा असल्याने मला पूर्णपणे समजला नसला तरी आवडला. मला हा चित्रपट किमान दोनतीनदा पाहायला लागेल बहुदा. ओपनहायमरमध्ये काही गोष्टी आवर्जून पाहाव्यात त्या म्हणजे कलाकारांचा अभिनय, विशेषतः ओपनहायमरची भूमिका करणारा सिलियन मर्फी, स्ट्रॉसची भूमिका करणारा रॉबर्ट डाऊनी, ओपनहायरच्या पत्नीची भूमिका करणारी एमिली ब्लंट यांच्या भूमिका कमाल आहेत. त्याच्या जोडीला नोलानच्या या चित्रपटातील छायाचित्रण, ग्राफिक्स प्रभावी आहेत. संवाद खूप आहेत जे मला कळायला बऱ्यापैकी अवघड गेले. पार्श्वसंगीत चित्तवेधक आहे. या सगळ्यामुळे ओपनहायमर मोठी ट्रीट म्हणावी अशी कलाकृती आहे. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. काहीतरी वेगळं देणारा हा चित्रपट आहे हे नक्की जाणवलं.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने
ज्या अणुबॉम्बचा वापर करून हिरोशिमा आणि नागासकी ही शहरे उध्वस्त केली त्या अणुबॉम्ब चा जनक रॉबर्ट ओपनहायमर ह्या शास्त्रज्ञाचा हा चित्रपट बायोपिक आहे. रॉबर्ट ओपनहायमर अणुबॉम्ब चा शोध लावतो खरा पण दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब मुळे झालेला हाहाकार बघून तो अस्वस्थ होतो. हिरोशिमा, नागासाकीचा चा नरसंहार आपल्यामुळेच झाला अश्याप्रकारची अपराधी भावना त्याच्यात निर्माण होते. त्याला आपल्या संशोधनाचा पश्चाताप झाल्यावर न्यूक्लियर बॉम्ब वर नियंत्रण ठेवावे लागेल असे मत मांडायला सुरवात केली. मग अमेरिकन ऑटोमिक एनर्जी कमिटीतर्फे त्याची चौकशी केली जाते. ह्या चित्रपटात ओपनहायमर चा अमेरिकन सिस्टीम विरुद्धचा लढा, त्याची चौकशीला सामोरे जाताना झालेली घालमेल, ओपनहायमर यांच्या वैयक्तिक जीवनातील चढउतार, तत्कालीन राजकारण वगैरे गोष्टी दाखवताना फ्लॅशबॅक पद्धतीचा अप्रतिम वापर केला गेला आहे. सुमारे तब्बल साडेतीन तासांचा हा चित्रपट भरमसाठ संवादामुळे कधी अधून मधून कंटाळा आणणारा होता.
यातील संवाद पूर्णपणे समजण्यासाठी मला हा चित्रपट अजून किमान दोनदा तरी पाहावा लागणार आहे. असो...
एकूण काय तर माझा आजचा दिवस हा चित्रपट पाहिल्याने कारणी लागला. शिवाय लंडन मधील थिएटर मध्ये ओपनहायमर पाहणे हा अनुभव माझ्या कायम लक्षात राहील हे मात्र नक्की..
आगाथा ख्रिस्ती आणि लोकप्रिय नाटक 'माउस ट्रॅप'
लंडन मध्ये चार दिवसांसाठी ट्रीपला म्हणून येणे वेगळे आणि मुलाकडे महिनाभरासाठी राहायला म्हणून येणे वेगळे. त्यातही आमचे आत्ता इथे येणे अगदीच निवांतपणे आहे. कारण लंडनमधील बहुतेक सगळी प्रेक्षणिय स्थळे मागच्या वेळीच बघून झालेली होती. अगदी दोन दोन वेळेला आम्ही सगळीकडे भटकलो आहे. अर्थात तरीही मजा येतीये.
परवा हर्षवर्धन आणि अनुजा म्हणाले की आपण एखादं नाटक बघुयात का? मी चक्रवलो. मी म्हणालो 'अरे इंग्रजी भाषेतील पूर्ण लांबीचं नाटक बघायचं म्हणजे झेपेल का?' ह्या गोऱ्या लोकांचे उच्चार मला आधीच कळायला अवघड जातं. त्यात अडीचतीन तास नाटक बघणं कसं जमायचं? पण विचार केला की असंही घरात बसण्यापेक्षा नाटक बघावं हे चांगलं. हर्षवर्धन ने सांगितलं की आपण माऊस ट्रॅप नावाचं नाटक बघुयात, मी बुकिंग करतो. हे 'माउस ट्रॅप' नाटक नेमकं काय आहे ह्याची माहिती घ्यायला मी सुरवात केली. सेंट्रल लंडन मधील वेस्टएन्ड भागातील 'सेंट मार्टिन्स' नावाच्या अतिशय जुन्या नाट्यगृहात हे नाटक लागलं होतं. मुळात 1916 साली सुरु झालेले, 107 वर्षे जुनं नाट्यगृह बघणं म्हणजे एक वेगळा अनुभव होता. त्यातच 'माउस ट्रॅप हे जुनं नाटक तब्बल 70 वर्षे इथं दाखवलं जातंय. ह्या नाट्यगृहात सुप्रसिध्द अगाथा ख्रिस्ती ह्या लेखिकेनं लिहिलेल्या 'माउस ट्रॅप' ह्या रहस्यमय नाटकाचे खेळ रोज होतात.
ह्या नाटकाचे तिकिट मिळणे ही देखील एक अवघड गोष्ट असते. आम्हाला नशिबानेच नाट्यगृहाच्या पहिल्या मजल्यावरची अगदी कोपऱ्यातली तिकिटे मिळाली. या नाटकाचं तिकिट 25 ते 200 पाउंड अशा रेंज मध्ये असतं. आयात्यावेळी ठरवल्यामुळे आम्हाला 25 पाउंड पाउंडाची तिकिटे कशीबशी नशिबानेच मिळाली. (अशीही आम्ही हीच तिकिटे काढली असती, कारण प्रत्येकी 200 पाउंडाची म्हणजे प्रत्येकी 20,000/- रुपयाची तिकिटे काढणे अश्यक्यच) त्यामुळे मात्र आमच्या सीट्स काहीश्या कोपऱ्यात, आजिबात लेगस्पेस नसलेल्या होत्या. पण आम्हाला हा नाटकाचा अनुभव घ्यायचाच होता, त्यासाठी थोडी तडजोड तर करायलाच हवी ना..
बरोबर वेळेला नाटक सुरु झालं. नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. हे नाटक आगाथा ख्रिस्ति या प्रसिध्द लेखिकेच्या एका रहस्यमय कादंबरीवर आधारित
आहे. एका अतिथिगृहात काही प्रवासी पाहुणे राहायला आलेले असतानाच बाहेर वादळी
हिमवर्षाव सुरु होतो आणि या अतिथिगृहात ही पाहुणेमंडळी अडकतात. त्याच सुमारास
त्यातील एका बाईंचा खून होतो. त्या खुनाचा तपास करण्यासाठी डीटेक्टिव्ह कॉप तिथे येतो आणि रहस्याचा गुंता वाढू लागतो. सगळे एकमेकांचा
संशय घेऊ लागतात. प्रेक्षक या रहस्याच्या गुंत्यात पुरते अडकून जातात. अगदी शेवटी धक्कादायक तंत्र वापरून खुनी पकडला जातो अशी काहीशी कथा आहे या नाटकाची.
या नाटकाच्या लेखिकेच्या लोकप्रियतेची तुलना अगदी शेकस्पीयर बरोबर केल्यास वावगे ठरणार नाही. मानवी मनाचे सूक्ष्म धागे हळुवारपणे उलघडणे हे आगाथा ख्रिस्ती यांच्या सर्वच लेखनाचं वैशिष्ठ आहे. मुळात रहस्यकथा, कादंबाऱ्यांना वाचक फारसे गंभीरपणे घेत नाहीत. पण आगाथा क्रिस्ती या लेखिकेने तिच्या लेखनशैलीने हा समज मोडून काढला. रहस्यकथांना साहित्यिक दर्जा ह्या लेखिकेनं मिळवून दिलाय. तिच्या कादंबऱ्यांच्या 200 कोटींच्या वर प्रती जगभर विकल्या गेलेल्या आहेत. जवळ जवळ शंभर भाषांमध्ये तिच्या कादंबऱ्या अनुवादीत झालेल्या आहेत. रेखा देशपांडे या मराठी लेखिकेनं आगाथा ख्रिस्तीच्या 12 कादंबऱ्यांचं मराठीत अनुवाद केला आहे. तिच्या कादंबऱ्या वाचताना एक प्रकारचं झपाटल्यासारखं होतं. असो...
मला नाटकातील संवादाचे आकलन बरचसं जरी होत नसलं तरी मी नाटक पाहताना खुर्चीला खिळून बसलो होतो. नाटकातील नटांच्या अप्रतिम अभिनयात, कथेतील रहस्यात पार गुंतून गेलो. नाटक कधी संपलं ते कळलंच नाही. यावेळच्या लंडन ट्रिप मधील 'माउस ट्रॅप' नाटकाचा अनुभव अविस्मरणीय होता. शिवाय आमच्या बरोबर पुणे-महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार आणि लेखक श्री. श्रीपाद ब्रह्मे आणि कुटुंबीय देखील असल्यामुळे नाटक बघायला विशेष मजा आली. इथं 'हा नाट्यप्रयोग प्रयोग कितवा आहे' हे दर्शवणारा एक लाकडी बोर्ड आहे. तिथं उभे राहून प्रेक्षक कौतुकाने फोटो काढून घेतात. आम्हीही अर्थातच सेल्फी काढला हे सांगायला नकोच. आम्ही पाहिलेला 'माऊस ट्रॅप' नाटकाचा प्रयोग तब्बल 29,261 व्वा होता. 70 वर्षे
सतत चालणाऱ्या ह्या नाटकाच्या प्रयोगात कोव्हिड साथीच्या दरम्यान जो काय
खंड पडला तेव्हडाच काय तो..
लंडनस्थित स्वामी नारायण मंदिर
काल आम्ही लंडन मधील वेम्बली भागातील निस्डेन येथील निस्डेन टेम्पल म्हणून प्रसिध्द असलेल्या 'श्री स्वामी नारायण' मंदिरात गेलो होतो. हे मंदिर भारताबाहेरील सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर पूर्णपणे प्राचीन वैदिक वास्तुशास्त्रीय ग्रंथानुसार बांधले आहे. हे मंदिर आणि त्याला लागूनच असलेली इमारत अडीच तीन वर्षात बांधलेली आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे हे मंदिर पूर्णपणे हिंदू समुदायच्या मदतीने मिळालेल्या निधीतून बांधले गेले आहे. हिंदू डिझाइन आणि उत्कृष्ट कारागिरीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या ह्या भव्य मंदिरासाठी सुमारे 5000 टन इटालियन मार्बल, चुनखडीचा वापर केला गेलाय.
नुकताच तुफान पाऊस पडून गेल्यामुळे हवेत अचानक गारठा निर्माण झाला होता. मंदिराच्या एका बाजूला पावसाचे काळेकुट्ट ढग आणि दुसऱ्या बाजूला निळेशुभ्र स्वच्छ आकाश असा अप्रतिम नजारा होता. मंदिरात अतिशय पवित्र शांत आणि शिस्तबद्ध वातावरण होते. मंदिरातील कलाकूसर थक्क करणारी होती. लंडन मध्ये येणारे हिंदू भाविक
पर्यटक इथे मोठ्या संख्येने दिसत होते. मंदिर व्यवस्थापनाचे स्वयंसेवक भाविकांना नम्रपणे मार्गदर्शन करत होते. अतिशय भारलेले असे वातावरण इथं होतं.
मंदिरातून बाहेर पडल्यावर भुकेची जाणीव झाली. या मंदिराच्या परिसरातच आम्हाला 'शयोना' नावाचे एक रेस्टॉरंट दिसले. तिथे सामोसे, पॅटिस, स्प्रिंग्रोल्स, पुरणपोळी, बटाटेवडे, जिलेबी, गुजराथी फाफडा, ढोकळा यासारखे भारतीय चवीचे पदार्थ होते. आम्ही अर्थातच या पदार्थांवर ताव मारला. एकूणच मजा आली. तिथून जवळच असलेल्या 'आयकिया'
नावाच्या फर्निशिंग मॉल मध्ये शिरलो. हा मॉल इतका मोठा होतं की आम्ही यात सुमारे दोन तास चालत होतो. इथं एका पाटीकडे माझं लक्ष गेलं. त्यावर लिहिलं होतं.. 'स्वप्नं जरूर बघवीत, ती आम्ही इथं फुकट विकतो'. मला गंमत वाटली. किती साधं पण अर्थापूर्ण वाक्य आहे ना?
काही घरातील संसारोपयोगी वस्तू आणि भरपूर स्वप्नं (पुढच्या वेळी काय काय विकत घ्यायचं, याची स्वप्नं) घेऊन आम्ही बाहेर पडलो. बाहेर सूर्यास्त होऊन संधीप्रकाशात आकाश उजळलेले होते. माझे फोटो काढणे सुरूच होते. दमल्यामुळे
येताना बस किंवा ट्यूब ने परतण्याचा उत्साह राहिला नव्हता, मग टॅक्सी करून आम्ही रात्री उशिराने घरी परतलो.
लंडन मधील 'नॉटिंग हिल कार्निव्हल'ची धमाल.
प्रत्येक देशामध्ये काही लोकाप्रिय सण, उत्सव त्यांच्या वैशिष्ठ्यांसह साजरे केले जातात, जसे आपल्याकडे पुण्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. तसे लंडन मध्ये 'नॉटिंग हिल कार्निव्हल' साजरा केला जातो. हा दर वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या विकेंड ला साजरा केला जातो. प्रत्येक उत्सवाचे काहीतरी उदिष्ट असते. आपल्याकडे गणेशउत्सवाला धर्मिक, सामाजिक आधार आहे. तसेच पण थोड्या वेगळ्या कारणांसाठी 'नॉटिंग हिल कार्निव्हल' साजरा केला जातो. हा उत्सव 'कॅरेबियन लोकांच्या स्वातंत्र्य आणि अस्मितेला अभिव्यक्त करण्यासाठी' साजरा केला जातो. कॅरेबियन लोकांच्या संस्कृती, कला आणि वारसा जपण्यासाठी ह्या उत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्निव्हलचे आयोजन आणि नेतृत्व ब्रिटिश कॅरेबियन समुदायातर्फे केले जाते. लंडन मधील केन्सिग्न्टन च्या नॉटिंग हिल भागातील प्रमुख रस्त्यावर हजारो लोक ताल वाद्ये वाजवत बेभानपणे नाचत एकत्रितपणे आनंद व्यक्त करतात. बेधुंद पणे नाचताना काही लोक चिखल किंवा रंग देखील एकमेकांवर उडवतात.
गणेशउत्सवात जशी गणपती मंडळांची मिरवणूक असते तशी ह्या उत्सवात तालवाद्य वाजवणारे ग्रुप्स भाग घेतात. एकापाठोपाठ एक ग्रुपची अशी मिरवणूक असते. तालवाद्यांच्या तालावर नाचत, गात हजारो लंडनवासीय रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीत आनंद घेतात. एकूण दोन दिवसांचा हा उत्सव असतो. पहिल्या दिवशी खास लहान मुलांसाठी आणि दुसऱ्या दिवशी मोठ्यांसाठी मिरवणुका काढल्या जातात. चेहेऱ्यावर रंग, चमक्या लावून किंवा शरीरावर विविध पिसांनी सजवलेल्या पोषाखांमुळे सर्व वातावरण अतिशय हर्षोल्हासाने भरून जाते.
आज घरून निघताना हर्षवर्धनने आम्हाला कार्निव्हल च्या गर्दीत काय काळजी घ्यायची ह्याबद्दल अनेक सूचना दिल्या होत्या. अंडरग्राऊंड ट्यूबची सेंट्रल लाईन पकडून आम्ही नॉटिंग हिल स्टेशनवर उतरलो. रेल्वेतून जातानाच कार्निव्हल साठी जाणाऱ्या तरुणाईची गर्दी आम्हाला जाणवू लागली होती. स्टेशन मधून बाहेर पडताना अनेक तरुण तरुणींची टोळकी पिपाण्या वाजवत, आरडाओरडा करत स्टेशनच्या
बाहेर पडत होती. कार्निव्हल च्या मिरवणूका जिथे चालू होत्या तिथे पोहोचेपर्यंत गर्दीत प्रचंड वाढ झाली होती. गणपती उत्सवातल्या मिरवणूकी प्रमाणेच इथं लोकांची रेटारेटी होती. आम्ही देखील ह्या उत्साहाच्या प्रवाहात सामील झालो आणि वहात राहिलो..
संध्याकाळी घराकडे परत येताना समजले की गर्दीमुळे नॉटिंग हिल स्टेशन बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी बंद केले आहे, त्यामुळे आम्हाला बरेचसे चालत जाऊन पुढच्या एका स्टेशन मधून ट्रेन पकडावी लागली. आज काहीतरी वेगळे लंडन अनुभवल्याच्या आनंदात घरी आलो.
मध्ययुगाच्या खुणा बाळगणारं, मोहक 'राय' (RYE)
लंडन च्या आजूबाजूला ब्रायटन, वॉरविक, बाथ स्पा, ऑक्सफर्ड, स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन, वॉटसवर्ल्ड या सारखी अतिशय निसर्गरम्य, ऐतिहासिक वारसा असलेली आणि वेगवेगळी वैशिष्ठ्ये असलेली छोटी गावे आहेत. ही वर उल्लेख केलेली गावे आम्ही बघितलेली आहेत. इतिहासाचा खजिना उघडायचा असेल आणि आपल्या कुटुंबियांसमवेत एका दिवसाची सुट्टी आनंदात घालवायची असेल तर लंडन जवळच्या अश्या छोट्या गावांना भेटी देणे अपरिहार्य आहे.
काल अशाच 'राय' (RYE) नावाच्या एका अतिशय छोट्या गावात गेलो होतो. (आता RYE या स्पेलिंगचा उच्चार मी माझ्या परीनं, मला जमेल तसा केलाय बरं का..चूकभूल माफी.)
लंडनपासून थोडं लांब जायचं असल्याने सकाळी लवकरच उठलो. अंडरग्राऊंड ने किंग्सक्रॉस स्टेशन वर उतरून लागूनच असलेल्या सेंट पॅनक्रास या नॅशनल आणि इंटरनॅशनल रेल्वे स्टेशन वरून रेल्वेने ऍशफोर्ड ला गाडी बदलून 'राय' (की 'रे' ?) च्या छोट्याश्या रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो. लंडन पासून सुमारे 100 की.मी. अंतरावर असलेलं हे गाव अगदीच छोटं म्हणजे फार फार तर 4/5 किलोमीटर परिघाचं असावं, पण हे इतकं सुरेख, नयनरम्य होतं की मी पहिल्या पाचच मिनिटात या गावाच्या प्रेमातच पडलो. इथं मध्ययुगीन काळापासून जशीच्या तशी देखभाल करून छान ठेवलेली घरे दिसतात. रस्ते चढउतरांचे, लहान आणि जुन्या पद्धतीचे, दगड गोटे वापरून तयार केलेले आहेत. शहरातील जुन्या पद्धतीने सजवलेली दुकाने, रेस्टॉरंट्स शहराच्या सौंदर्यात भरच घालतात. हे शहर समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे आकाशात पांढऱ्या शुभ्र सीगल पक्ष्यांची वर्दळ चालू होती. या पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज आसमंतात भरून राहिला होता. बाकी मात्र सगळीकडे कमालीची शांतता होती. शहराच्या मध्यभागात कोणत्याही प्रकारची वाहने नव्हती. फक्त पर्यटक दिसत होते.
बऱ्याच पर्यटकांबरोबर निरनिराळ्या आकाराची पाळीव कुत्री त्यांच्या मालकांबरोबर तुरुतुरु चालत होती. या कुत्र्यांना देखील इथं परदेशात जाम महत्व असते. रेल्वे मध्ये देखील कुत्र्यांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींसाठी राखीव सीट्स असतात. रेल्वेमधून अशा अर्थाच्या पाट्या दिसतात.
'राय' हे 13 व्या शतकातलं एक महत्वाचं बेट होतं. वर्षानुवर्षे ते मासेमारी, जहाजबांधणी, लाकूड व्यापार, लोकर, वाईन, आणि चैनीच्या वस्तूंच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होतं. इथे तस्करी देखील मोठ्या प्रमाणात व्हायची. 15 व्या शतकाच्या शेवटी शेवटी तर तस्करीचे प्रमाण कमालीचे वाढले होते. अगदी 18 व्या शतका अखेरीपर्यंत तस्करी चालूच होती. आपल्याला या गावातून भटकताना तस्करीचे 'भुतकाळातील बोगदे, गुप्त मार्ग, लपायच्या जागांचे' अवशेष दिसू शकतात. कवी, कलाकार आणि कारागीर यांचे हे आवडते ठिकाण होते आणि आहे. इथे गावाच्या मध्यभागी या गावाचे रक्षण करण्यासाठी 1249 मध्ये बांधलेला किल्ल्यासारखा दिसणारा एक मानोरा (टॉवर) पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. इथे 'मरमेड स्ट्रीट' हा महत्वाचा रस्ता आहे. तिथं एके ठिकाणी धुंद करणारं संगीत कानावर पडलं. आमचे पाय नकळत तिकडे ओढले गेले. तिथे 'RYE International Jazz & Blues
Festival' सुरु होता. वाद्यवृंदा समोर संगीतप्रेमी पर्यटक संगीताचा आस्वाद घेत होती आम्हीही अर्थातच तिथं बराच वेळ रेंगाळलो. ह्या रस्त्यावरून आम्हाला दोन घरांवर 'द हाऊस ऑफ अपोजिट' आणि 'हाउस विथ टू फ्रंट डोअर्स' अशा गंमतीशीर पाट्या दिसल्या. या गावाचे सौंदर्य न्याहाळत फिरताना वेळेचे भान आम्हाला नव्हते, मात्र भुकेची जाणीव झाल्यावर तिथल्याच एका बागेत बसून घरून सोबत आणलेले टोमॅटोचे सुप, आलूपराठे, खिचडी, गरमागरम कॉफी असे जेवण घेतले तोपर्यंत चार वाजले होते.
तिथून जवळच असलेल्या 'कॅमबर सॅन्डस बीच' वर निघालो. इथे दर तासाने डबल डेकर बसेसने समुद्रकिनाऱ्यावर जायची सोय आहे. दोन अडीच तास गप्पांच्या साथीने समुद्रावरील थंड वारे आणि वरून मिळणारे ऊबदार उन अनुभवत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. पुन्हा बस ने 'राय' गावात आलो तोपर्यंत सात वाजले होते. मग दोन मोठे पिझ्झा घेऊन जेवुन घेतलं. मात्र आता लंडन कडे परतणाऱ्या ट्रेन साठी पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढली होती. लंडन ला परत येताना पुन्हा ऍशफोर्ड स्टेशनवर ट्रेन बदलायची होती. आणि आमच्या बरोबर ची गर्दी लंडनलाच जाणार असल्यामुळे ट्रेन बदलताना गर्दीचा गोंधळ उडणार होता. अनुजाने 'ट्रेन बदलायला मध्ये फक्त 3 मिनिटे असून दोन प्लॅटफॉर्म च्या पलीकडील असलेल्या 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरील ट्रेन आपल्याला पकडायची आहे' असे सांगितले. पुढचा होऊ घातलेला गोंधळ आमच्या लक्षात आला. पण इलाज नव्हता. ऍशफोर्ड स्टेशनवर ट्रेन बदलायला मुलांबरोबर आम्ही जीवाच्या आकांताने धावलो. अलकाच्या गुढगेदुखीची आम्हाला जरा काळजी होती. आमच्या बरोबर धावणाऱ्या तरुणाई मध्ये आम्हा वयस्कांची चांगलीच दमछाक झाली. पण कसेबसे धावत पळत आम्ही लंडनला जाणाऱ्या ट्रेन मध्ये घुसलो. बराच वेळ छाती धपापत होती. काहीवेळ उभे राहून प्रवास केल्यावर आमच्या वयाकडे बघून कुणीतरी भल्या तरुणांनी आम्हाला स्वतःची जागा बसायला दिली. (सध्या लंडन मध्ये बस मध्ये, ट्रेन मध्ये फिरताना मला हा अनुभव रोज येतो. गर्दीच्या वेळी उभ्या असलेल्या वयस्कांना तरुण प्रवासी आवर्जून बसायला जागा देतात. मन सुखावतं अशा तरुणाईकडं बघून..) आता पुन्हा गर्दीतून बसचा किंवा ट्यूब ने प्रवास करायचा कंटाळा आला होता. रात्री उशिराने आम्ही टॅक्सी करून घरी आलो.
थोडक्यात लंडनला आल्यावर एखादा दिवस काढून छोट्या सुट्टीसाठी, शांततापूर्ण विश्रांतीसाठी 'राय' हे अतिशय आकर्षक आणि आदर्श ठिकाण आहे.
‘उद्यानांचे शहर 'लंडन'
लंडन शहर एक्सप्लोअर करताना मला कधी कधी असं वाटतं की ह्या शहरात मानवी वस्त्यांपेक्षा मोकळ्या बागा, मैदाने, जंगलेच जास्त आहेत की काय? शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातली हाईड पार्क किंवा रिजेंट पार्क सारख्या प्रचंड उद्याना मधून फिरताना अक्षरशः दिवस पुरत नाहीत. मध्य लंडन मधील हाईड पार्क हे पूर्वी शाही राजे लोकांसाठी
शिकारीचे संरक्षित जंगल होते. ते 17 व्या शतकाच्या सुरुवातीला सामान्य प्रजेसाठी
लोकांसाठी खुले करण्यात आले. हाईड पार्क हे वेस्ट मिनिस्टर, ग्रेटर लंडनमधील 350 एकर जागेवर पसरलेलं आहे. हे एक ऐतिहासिक शहरी उद्यान आहे. रॉयल पार्क, केन्सिंग्टन पॅलेसपासून केन्सिंग्टन गार्डन्स आणि हाईड पार्कमार्गे, हाईड पार्क कॉर्नर आणि ग्रीन पार्क मार्गे, बकिंगहॅम पॅलेसच्या मागे, सेंट जेम्स पार्कपर्यंत एक साखळी तयार करणारे असे हे प्रचंड मोठे उद्यान आहे. या हाईड पार्क मध्ये 'स्पीकर्स कॉर्नर' नावाचे एक मजेशीर जागा आहे. या ठिकाणी 1872 पासून कुणालाही मुक्त भाषण आणि प्रात्यक्षिके करण्यासाठी मुभा असते. कुणीही या आणि कोणत्याही विषयावर भाषण ठोका.. (बाकी श्रोत्यांची व्यवस्था तुमची तुम्हीच बघयाची बर का. 😀)
रिजेंट पार्क तर आमच्या लंडनच्या वास्तव्यातील आवडते ठिकाण. हर्षवर्धन पूर्वी कॅमडन रोड वर राहायचा तेंव्हा आम्ही जवळपास रोज इथं फिरायला जायचो. रिजेंट पार्क च्या सुरवातीलाच सुप्रसिद्ध 'लंडन झू' आहे. निरनिराळे वैशिष्ठ्यपूर्ण दुर्मिळ प्राणी असलेलं हे प्राणी संग्रहलंय पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण आहे. याच रिजेंट पार्क मध्ये 'क्विन्स रोझ गार्डन' असून असंख्य गुलाब फुलांच्या प्रजाती इथं दिसतात. या व्यतरिक्त रिचमंड पार्क, ग्रीनविच पार्क, सेंट जेम्स पार्क, बुशी पार्क आणि केन्सिंग्टन गार्डन्स, हॅमस्टेड हिथ पार्क अशी बरीच उद्यानं इथं आहेत.
आज आम्ही हॅमस्टेड हिथ पार्क ला जायचं ठरवलं. मी हर्षवर्धनला म्हणालो 'पूर्वी आपण हॅमस्टेड हिथ पार्क ला गेलो होतो ना, मग पून्हा कशाला तिथं जायचं?' तो म्हणाला 'पूर्वी आपण हॅमस्टेड हिथ पार्क ला गेलो होतो, पण ते या पार्कच्या अगदी दुसऱ्या विरुद्ध टोकाला. हे पार्क प्रचंड मोठं आहे. आता आपण सेट्रल लंडनच्या ईशान्य दिशेला असलेल्या दुसऱ्या टोकाला जाऊयात. तिथं केनवूड हाऊस बघण्यासारखं आहे, ते बघुयात'.
सुदैवाने आमच्या फिन्सबरी पार्क च्या घराजवळून थेट केनवूड हाऊस ला बस होती. सकाळी साडे अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही हॅमस्टेड हिथ च्या उत्तरेकडील सीमेवरील गेट वर पोहोचलो. इथे गेटपासून लगेचच लंडन मधील एक ऐतिहासिक घर आहे. हे घर कसले, तो एक राजवाडाच होता. हा राजवाडा 17 व्या शतकात बांधला गेला आहे. त्या काळातल्या राजांच्या निवासासाठी बांधला गेलेला हा राजवाडा इंग्रजांनी निगुतीनं जपला आहे. हे 'केनवूड हाऊस' हॅमस्टेड हिथ जंगलाच्या शांत नैसर्गिक वातावरणात बांधलेले आहे. या राजवाड्याचा अंतर्गत भाग बघण्यासाठी पर्यटकांना विनामूल्य ठेवण्यात आला आहे. 17 व्या शतकातील नावाजलेले प्रसिद्ध स्कॉटीश वास्तुविशारद रॉबर्ट ऍडम यांनी या राजवाड्याचा विस्तार केला, तसेच त्यांनी या घराच्या अंतर्भागाची अप्रतिम सजावट देखील केली.
या राजवाड्यातील 'ग्रेट लायब्ररी' हे इथले प्रमुख आकर्षण आहे. या लायब्ररीत असंख्य जुने ग्रंथ, पुस्तके, नोंदवह्या वगैरे व्यवस्थित ठेवल्या आहेत.
1767 ते 1770 या काळात ह्या लायब्ररीचे काम रॉबर्ट ऍडम यांनी पूर्ण केले. या राजवाड्याच्या अनेक खोल्यांमधून त्या काळातल्या कलाकारांनी काढलेली उत्तमोत्तम पेंटिंग्ज लावलेली आहेत. ह्या राजवाड्याचा जिना देखील अप्रतिम आणि कलात्मक प्रतिभेचा अविष्कार आहे.
या केनवूड हाऊस च्या आजूबाजूला भव्य अशी हिरव्यागार गवताची मैदाने आहेत. पर्यटकांसाठी कॉफ़ीशॉप्स, भेटवस्तूंची छोटी दुकाने देखील आहेत. राजवाड्याच्या मागच्या एका ठिकाणावरून दूरवरच्या
सेंट्रल लंडन चा सुरेख नजारा दिसतो. आम्ही हा राजवाडा बघून हॅमस्टेड हिथ चे जंगल बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी निघालो. अतिशय घनदाट असलेल्या या जंगलात भटकताना अलका खुश न होईल तरच नवल. ह्या 800 एकर पसरलेल्या जंगलात नैसर्गिकपणे वाढलेले खूप मोठे, उंच असे वृक्ष आहेत. मधून मधून स्वच्छ पाण्याची तळी व त्यात विहारणारी बदके हे चित्र इथल्या बागांमध्ये असतेच, तसेच इथेही होतेच. मधेच एका तळ्याच्या काठावरील हिरवळीवर बसून आम्ही बरोबर आणलेली सॅन्डविचेस व फळे खाल्ली.
इथल्या प्रशासनाने या जंगलाची व्यवस्था अतिशय छान ठेवली आहे. जंगलात भटकणाऱ्या नागरिकांसाठी नैसर्गिक पाऊलवाटा तयार केलेल्या आहेत. जवळजवळ दोन अडीच तास आम्ही या जंगलातून फिरत होतो..
संध्याकाळ झाली होती. या जंगलातून बाहेर पडण्यासाठी आम्ही वाट शोधत असताना अचानक एक घर दिसले. त्यावर लिहिले होते की '1912 मध्ये महान भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर येथे राहात होते.' (आणि 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले.) आजच्या दिवसातला आम्हाला अचानक मिळालेला हा आश्चर्यकारक बोनसच होता. लंडन एक्सप्लोअर करताना बऱ्याच वेळेला असे आश्चर्यकारक धक्के आपल्याला बसत असतात...
'पार्कलँड वॉक'
एकूणच संपूर्ण युरोपातील गोऱ्यां लोकांना त्यांचा इतिहास सांभाळून ठेवावासा वाटतो. इथे लंडन मध्ये फिरताना कुठल्याही गोष्टीला किमान 100 वर्षांपूर्वीचा संदर्भ आढळतो. 18 व्या शतकातल्या किंवा त्याही पूर्वीच्या
ऐतिहासिक वास्तू इथे सहजतेने दिसतात. विशेष म्हणजे ह्या इमारती, वस्तू इथल्या लोकांनी अतिशय मनापासून, काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत. इथे भटकताना मला सारखे जाणवते की आपल्या भारतीयांमध्ये हा गुण का नसावा. आत्ता आत्ता नुकत्याच घडून गेलेल्या शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांची आपण काय अवस्था करून ठेवली आहे? ही इतिहासाबद्दल कमालीची अनास्था आपल्यात का असावी? असो... ते जाऊ दे!
आता बघा ना.. सोळाव्या शतकात अस्तित्वात असलेला एक रेल्वे मार्ग काय तो. पण त्याचे एका पार्कलँड पार्क मध्ये रूपांतर करून ठेवलं आहे इथल्या सरकारने. एखाद्या पुरातन गोष्टीचे छान जतन करून लोकप्रिय करण्याची कला ह्या गोऱ्या पाश्चात्य लोकांना जमली आहे. आधुनिक काळातील भुयारी रेल्वे, बसेस वगैरे आधुनिक प्रवासी सुधारणांनी कालांतराने या रेल्वे मार्गाचे महत्व कमी झाले, पण ह्या इंग्रजांनी हा ऐतिहासिक रेल्वे मार्गाचे लांबट आकाराच्या बागेमध्ये रूपांतर करून हा रेल्वे मार्ग जतन करून ठेवला आहे. या मार्गांवरील रेल्वेचे रुळ जरी काढलेले किंवा नष्ट झालेले असले तरी व्हिक्टोरियन स्थापत्यकलेचा आणि
आर्किटेक्चरचा चा वापर असलेले जुने रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म्स आहे त्या अवस्थेत ठेवण्याचा या लोकांनी प्रयत्न केला आहे. आम्ही इथं रोज सकाळी फिरायला जातो. आज सकाळी ह्या 'पार्कलँड वॉक' वर फिरायला जायचं ठरवलं. आमच्या घराच्या अगदी शेजारी असलेल्या फिन्सबरी पार्क पासून ह्या रेल्वे मार्गांवर (म्हणजे जंगलातली मोठी पाऊल वाट) आम्ही चालायला सुरवात केली. हा मार्ग फिन्सबरी पार्क पासून अलेक्झांड्रा पॅलेस पर्यंत जातो, म्हणजे पूर्वीच्या एवढ्या ऐतिहासिक रेल्वे ट्रॅकचे 'पार्कलँड वॉक' मध्ये रूपांतर केले आहे. हा 'पार्कलँड वॉक' 1984 मध्ये अधिकृतपणे नागरिकांसाठी उघडण्यात आला. या वॉक चे व्यवस्थापन इस्लिंगटन आणि हॅरिंगे विभागातर्फे किंवा आपल्या भाषेत वॉर्ड ऑफिस तर्फे केले जाते.
हे चालणे तसे फार चढ उताराचे नाहीये. पण '16 व्या शतकात इथे रेल्वे होती आणि त्या ऐतिहासिक मार्गांवरून आपण चालतोय' ही भावना भन्नाट होती. आजूबाजूला दोन्ही बाजूने नैसर्गिक जंगल होते. दुर्मिळ वनस्पती, वन्य प्राणी, कीटक, दुर्मिळ जातींची फुले, पक्षी बघत आम्ही फिरत होतो. हा वॉक फक्त चालणाऱ्यांसाठी आणि सायकलस्वारांसाठी उपलब्ध असल्याने अधूनमधून करणारी, सायकलिंग करणारी मंडळी दिसत होती. इथे भरपूर फुलपाखरे देखील दिसत होती. फुलपाखरांच्या एकूण बावीस प्रजातींची नोंद करण्यात आलेली आहे. इथे कोल्हेही भरपूर दिसतात. (बहुदा इथूनच आमच्या घराच्या बॅकयार्ड मध्ये एक कोल्हा रोज येतो.) या वॉकच्या आजूबाजूच्या घरांच्या घरमालकांकडून अधूनमधून या कोल्ह्यांना खायला मिळते. अलका थोडी दमल्यामुळे आम्ही वाटेत एकेठिकाणी एका बाकावर विश्रांतीसाठी बसलो. तो बाक कुणीतरी डोनेट केलेला होता. ज्या कुटुंबियांनी त्यांची लहान मुले गमावली आहेत त्यांच्या साठी हा बाक डोनेट केला होता. आम्ही बसलेल्या बाका शेजारीच एका झाडावर देखील अशा अकाली गेलेल्या लहान मुलांच्या स्मरणार्थ गोल लाकडी ताईत बांधलेले होते. या जागेच्या थोडेच पुढे एका पुलाच्या कमानी खालून बाहेर आलेला स्प्रिगन राक्षसाचा अक्राळ विक्राळ पुतळा दिसला. (या स्प्रिगन शब्दाचा अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला असता 'कॉर्नीश लोक कलांमध्ये 'मरणासन्न वृद्ध माणसाचा आत्मा' असा अर्थ मिळाला). तो तिथे असण्याचे कारण मात्र कळलं नाही.
'पार्कलँड वॉक' फक्त स्थानिक लोकांमध्येच लोकप्रिय नसून आता तो पर्यटकांमध्ये देखील लोकप्रिय होतो आहे. या वॉक ची लोकप्रियता खूप दूरवर पसरली आहे. पर्यटकांच्या लंडन अनुभवाचा भाग म्हणून इथले पर्यटन खाते विशेष प्रयत्न आणि मार्गदर्शन देखील करत आहे. ह्या वॉक ची लोकप्रियता कोव्हिड च्या महामारीनंतर नाट्यमयरित्या वाढली, त्यामुळे या वॉकला अधिकाधिक गर्दी होत आहे. दोन तीन तास भटकल्यावर
रोज ह्या मार्गांवर फिरायला यायचं ठरवून आम्ही परतलो.