आशा-निराशेचे सकारात्मक 'रिंगण'.
आषाढातील एकादशीला महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना, कष्टकऱ्यांना पंढरपुरातील विठ्ठलाकडे अनाहूत ओढीने नेणारी वारी आणि त्यातील आकर्षण असलेले रिंगण आपण दरवर्षी अनुभवतो. रोजच्या आयुषयातील कष्टाचे, दुःखाचे आणि त्यामुळे मनात दाटून येणाऱ्या निराशेचे ओझे परमेश्वरावर सोपवून वारकरी पंढरपूरची वारी करतात आणि पुन्हा नव्या आशेने आणि नव्या उमेदीने आपापल्या गावी परत येतात, आणि पुढील आयुष्याला सामोरे जातात. 'दुःखामागून सुख येते' या दुर्दम्य विश्वासावर या सामान्य लोकांचे जीवन आधारलेले असते. किंबहुना असायला हवे असा काहीसा संदेश सांगण्याचा नितांत सुंदर प्रयत्न 'रिंगण' या चित्रपटाच्या सर्व गुणी कलाकारांनी केला आहे. 'वडील आणि मुलगा’ यांचा आपआपल्या आयुष्यातील पडलेल्या प्रश्नांचा शोध' हा या चित्रपटाच्या कथेचा गाभा आहे. दुष्काळ, न पिकणारी शेती, सावकाराच्या कायमच्या कर्जाचे दुष्टचक्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशीही पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे.
रिंगण ची कथा प्रामुख्याने वडील अर्जुन मगर आणि मुलगा अभिमन्यू उर्फ आबडू या दोघांभोवतीच फिरते. अर्जुन मगर ( शशांक शेंडे ) हा दुष्काळग्रस्त, सावकाराच्या कर्जाच्या चक्रात अडकलेला छोटा शेतकरी. आपल्या आईविना पोरक्या असलेल्या आबडू (साहिल जोशी) बरोबर निराशावस्थेत जीवन जगत असतो. 'वर्षभरात कर्जाचे पैसे परत न केल्यास जमीन ताब्यात घेण्याच्या सावकाराच्या धमकीमुळे, पैशांची तजवीज करण्यासाठी अर्जुन घराबाहेर पडतो. आबडू बरोबर असतोच. ओळखीपाळखीचे, नातेवाईक यांच्याकडून नकारघंटा ऐकून अर्जुन नैराश्याच्या अधिकाधिक खोल गर्तेत जात असतो. शेवटी परिस्थितीपुढे अगतिक झालेला अर्जुन पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी आबडू बरोबर पंढरपुरात दाखल होतो. इकडे अर्जुनाचा मुलगा आबडू वेगळ्याच विवंचनेत असतो. त्याला देवाघरी गेलेल्या (म्हणजे त्याच्या भाबड्या समजुतीप्रमाणे पंढरपुरात गेलेल्या) आईचा शोध घ्यायचा असतो. आबडूला त्याची आई देवाघरी गेलेली आई सापडते का? अर्जुनाची सावकाराच्या कर्जाच्या चक्रातून सुटका होते का? ह्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट बघूनच मिळवायला हवीत.
या चित्रपटातील सर्वच अभिनेत्यांचा सहजसुंदर अभिनय मनाला भावतो. थेट प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. अर्जुनच्या प्रमुख भूमिकेतील शशांक शेंडे हे स्वतःच्या अभिनयाने संपूर्ण चित्रपट व्यापून टाकतात. आपल्या मुलाला 'त्याची आई या जगात नाही' हे सांगताना होणारी पित्याची घालमेल ते कमालीच्या ताकदीने दाखवतात. मुख्य म्हणजे सर्वच अभिनेते अभिनय करताना कुठलाही आव आणत नाहीत. (याला छोटा ‘साहिल जोशी’ हाही कलाकार अपवाद नाही) त्यामुळे रिंगण वास्तवतेच्या पातळीवर येतो. वेगवेगळ्या पातळीवरचा गंभीर आशय दिग्दर्शक मकरंद माने अगदी सहजतेने मांडतात. दिग्दर्शन असो, संगीत किंवा पार्श्वसंगीत असो, अथवा छायाचित्रण असो पडद्यामागील अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सर्वच कलाकारांचे कौतुक करण्यासाठी हा चित्रपट प्रत्येक सिनेरसिकाने पहिलाच पाहिजे.
चित्रपट बघताना काही प्रसंग अंतर्मुख करतात. मला प्रकर्षाने भावले ते चित्रपटातील पार्श्वसंगीत ! 'सुखामागून दुःख आणि दुःखामागून पुन्हा सुख येते' हे सोपे तत्वज्ञान पूर्वी पहाटेच्या वेळी धान्य दळताना म्हणाल्या जायच्या ओव्यांमधून सांगितले जायचे.काही प्रसंगात पार्श्वभूमीवर 'जात्या'च्या घरघरीचा आवाज फार कल्पकतेने आणि जाणीवपूर्वक वापरला आहे. या चित्रपटातील प्रसंगांचं आणि पार्श्वसंगीताचं गहिरं असं नातं चित्रपटभर जाणवत राहतं. संगीतकार ‘नागभिडे’ यांचा कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे.
'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटाप्रमाणे या ही चित्रपटाला पंढरपूर चा बॅकड्रॉप लाभला आहे. वास्तविक पंढरपूर हे गाव काही आवर्जून बघावं असं नाही. कायम वारकऱ्यांच्या गर्दीमुळे खूपसे अस्वच्छ, अरुंद बोळ, दाटीवाटीनं आणि जोडूनच असलेली बैठी घरे, खूप सारे भिकारी, आसमंतात गटारीच्या घाणेरड्या वासाच्या सोबतीने कापूर, उदबत्त्या, कुंकू, बुक्का यांचे सुगंध असलेले पंढरपूर मला माझ्या बालपणीच्या वास्तव्याच्या आठवणींमुळे आवडते. माझ्या शालेय जीवनातील तीन चार वर्षाचं वास्तव्य पंढरपुरात गेलं आहे. आपल्या सर्वांनाच बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये रमायला आवडते. कदाचित म्हणूनही 'रिंगण' बघताना मी रमून गेलो.
राजीव जतकर.
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
योगायोगाने या चित्रपटाचे छायाचित्रकार अभिजित अब्दे यांचे आई,बाबा माझ्या शेजारच्याच खुर्चीत बसले होते. अभिजित बद्दलचे कौतुक, समाधान त्यांच्या चेहेऱ्यावरून ओसंडून वाहत होते. मी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. मध्यंतरात चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आम्हा प्रेक्षकांशी संवाद साधला. कलाकारांना प्रत्यक्ष बघून खूप छान वाटले.
छान विश्लेशण.
ReplyDelete