'मॉम' : कलाकारांच्या
कामगिरीमुळे तरलेला चित्रपट
एखादी सामान्य घिसीपिटी सूडकथा त्यात काम करणाऱ्या कलाकारांनी तारून नेली असल्याचे उत्तम उदाहरण म्हणून 'मॉम' ह्या चित्रपटाचे नाव घेता येईल. या चित्रपटाची कथा साधारणपणे दोन पातळ्यांवरून उलघडत जाते. या चित्रपटाला 'आई आणि सावत्र मुलगी यांच्यात न निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या अस्वस्थ नात्याची किनार आहे, तसेच मोठ्या शहरात महिलांवरील सामूहिक बलात्कार आणि स्त्रियांची असुरक्षितता आणि त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न या विषयाची पार्श्वभूमी देखील या कथेला आहे. पण हे जरी असलं कथा टिपिकल 'फिल्मी' आहे.
कथेच्या पूर्वार्धात देवकी (श्रीदेवी), तिचा नवरा (अदनान सिद्दीकी) आणि त्यांच्या दोन मुली यांचे नातेसंबंध दाखवले आहेत. देवकीचे हे दुसरे लग्न असल्याने तिची पौगंडावस्थेतली सावत्र मुलगी आर्या (सजल अली) तिला आई मानायला तयार नसते. त्यातच देवकी आर्याच्याच कॉलेज मध्ये शिकवणारी कडक शिक्षिका आहे. आर्या देवकीला आई असे हाक न मारता अलिप्तपणे मॅडम असे संबोधत असते. (मॉम असे न म्हणता मॅम म्हणत असते.) थोडक्यात आपल्या खऱ्या आईची जागा देवकीला द्यायची तिची तयारी नसते. अशा परिस्थितीत देवकी अतिशय संयमाने आपल्या या सावत्र मुलीशी संवाद साधायचा, तिच्या जवळ जायचा मनापासून प्रयत्न करत असते. आर्याचे तुटक वागणे देवकीला कायम अस्वस्थ करीत असते. हे सधन कुटुंब आनंदात कालक्रमणा करीत असताना अचानक घडलेल्या एका घटनेने वादळ येते.
देवकीचे पती आपल्या काही व्यावसायिक कामानिमित्त परदेशी जायला निघताना आर्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने होणाऱ्या मित्रांच्या पार्टीला जाण्यासाठी हट्ट धरून बसते. देवकी आणि तिचे पती काहीसे नाखुशीनेच आर्याला परवानगी देतात. या पार्टीतून घरी परत येताना आर्यावर तिच्या वर्गातील एक मुलगा, त्याचा भाऊ, मित्र, आणि रखवालदार असे चौघे चालत्या कार मध्ये सामूहिक बलात्कार करतात. आर्या आणि तिचे सर्व कुटुंब उध्वस्त होते.
पुढे रीतसर पोलीस तपस होतो. सर्व पुराव्यानिशी आरोपीही पकडले जातात. पण न्यायव्यवस्थेतील त्रुटींमुळे सर्व आरोपी निर्दोष सुटतात.
देवकी आणि तिचे पती खूप निराश होतात. उच्च न्यायालयात अपील करण्याचे ठरवतात. देवकीचा मात्र न्यायव्यवस्थे वरचा विश्वास उडालेला असतो. मग ती दयाशंकर कपूर उर्फ डी.के (नावासुद्दीन सिद्दीकी) या गुप्तहेराची मदत घेऊन आपल्या पद्धतीने चारही आरोपींना धडा शिकवते. कायदा हातात घेऊन अशा प्रकारे आरोपीना शिक्षा करणे हे चुकीचे असून देखील आपल्याला, म्हणजे प्रेक्षकांना ते भावते. देवकी या आरोपींना कसा धडा शिकवते ते पडद्यावरच पाहणे योग्य ठरेल, कारण ते दाखवताना दिग्दर्शक रवी उदयवार, संगीतकार ए.आर. रहेमान, छायाचित्रकार अनय गोस्वामी
यांची कामगिरी आणि मुख्यतः श्रीदेवी, नवासुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना, अदनान सिद्दीकी या अभिनेत्यांचा प्रामाणिक अभिनय या सर्व गोष्टी या चित्रपटाला करमणूकप्रधान नक्कीच बनवतात.
चित्रपटातल्या अनेक त्रुटी, चुकलेल्या गोष्टी गृहीत धरल्या तरी, माझ्यासारख्या सामान्य चित्रपट रसिकाला हा चित्रपट आवडतो. कारण चित्रपटातील श्रीदेवीचा अभिनय ! हा चित्रपट श्रीदेवीने अक्षरशः व्यापलेला आहे. श्रीदेवीच्या चाहत्यांनी हा चित्रपट चुकवू नयेच. सावत्र मुलीशी जुळवून घेण्याचं मनापासून प्रयत्न करणारी आई आणि मुलीवरील अन्यायाविरुद्ध कणखरपणे उभी राहणारी धाडसी आई श्रीदेवीने मोठ्या सक्षमतेनं उभी केली आहे. या चित्रपटात 'नवासुद्दीन सिद्दीकी' हा गुणी नट एका वेगळ्याच गेटअप मध्ये दिसतो. आर्याच्याच वयाच्या स्वतःच्या मुलीकडे बघताना तो देवकीला मदत करायचे मनोमन ठरवतो. 'सजल अली' आर्याच्या भूमिकेला, तर 'अक्षय खन्ना' पोलीस अधिकारी मॅथ्यूज च्या भूमिकेला योग्य न्याय देतात.
कोणताही चित्रपट बघताना माझं लक्ष नेहेमी पार्श्व संगीताकडं असतं. आर्या वर चालत्या गाडीत होणाऱ्या बलात्काराची दाहकता त्या प्रसंगातल्या पार्श्वसंगीतामुळे अधिकच दाहक होते. एकूणच चित्रपटातील ए.आर. रहेमान यांचे पार्श्वसंगीत परिणामकारक आहे. (पार्श्वसंगीताची अशीच परिणामकारकता नुकत्याच पाहिलेल्या
"रिंगण' मधल्या जात्याच्या घरघरीच्या पार्श्वसंगीतात जाणवली होती)
सस्पेन्स थ्रिलर या प्रकारात मोडणारा हा चित्रपट पाहताना एक मात्र जाणवते ते म्हणजे दिग्दर्शक, कथालेखक हे या कथेतला सस्पेन्स राखू शकत नाहीत. 'आता पुढे काय घडणार?' हे प्रेक्षकांना आधीच कळलेले असल्यामुळे कथेतलं थ्रिल पार निघून जातं. अर्थात त्यामुळे फारसं काही बिघडत नाही. अभिनय, करमणूक या पातळ्यांवर चित्रपट यशस्वी होतोच. माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला अजून काय हवे असते? चित्रपटातील उणीव काढत बसले तर चांगल्या गोष्टींचा आनंदही आपण गमावतो, नाही का?
राजीव जतकर.