Monday, 16 May 2016

मुलखावेगळे 'भागवत' आजोबा…


मुलखावेगळे  'भागवत' आजोबा

पाहता पाहता माझ्या वयाची पन्नाशी उलटली. वृद्धत्वाची चाहूल लागते आहे. शरीराने थकलेले माझे आई वडील त्यांच्या शेवटच्या जवळ जवळ दहा वर्षाच्या काळात माझ्याकडे राहत असत.  माझ्या वडिलांचे वय सत्याऐंशी तर आईचे ब्याऐंशी आईवडिलांच्या वृधत्वातील अडचणी पाहून मन विषण्ण होत असेजी  जी  म्हणून शक्य होती ती  ती सेवा करून आम्ही त्यांचे म्हातारपण सुखकर व्हावे असा प्रयत्न करायचो. त्यांची  वृद्धावास्थेतली अगतिकता बघून खूप अस्वस्थ व्हायला व्हायचे. आई च्या शेवटच्या वर्षात स्मृतीभ्रंश झाल्यामुळे ती कोणालाही ओळखत  नसे. शरीर खूप कृश झाले होते. तिच्याकडे बघावयाचे नाही. तिची सेवा करताना गहिवरून यायचेदादांना म्हणजे माझ्या वडिलांना  पार्किन्सन झाला होता. त्यांना चालायला यायचे नाही. म्हातारपणात माणसाचे शरीर थकते. शरीर अनेक व्याधींनी ग्रस्त होते. वृद्धावस्थेत माणसाच्या महत्वाकांक्षा संपून गेलेल्या असतात. सर्व तरुण मंडळी आपआपल्या कामात व्यग्र कुणाला बोलायला वेळ नाही. आता आपले अस्तित्वच संपणार तर मग बेत तरी कसले करायचे ? अशा मनस्थितीत माणूस कसा जगात असेल ?

 परंतु अशाही परिस्थितीत, अशाही वयात आपला उपयोग दुसऱ्याला नक्की होऊ शकतो अशी धारणा असलेले खरेच दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे एक मुलाखावेगळे ग्रेट 'भागवत आजोबा'त्याकाळी आमच्याकडे नेहेमी येत असत. या ग्रेट आजोबांचे नाव  ‘श्री बाळकृष्ण अनंत भागवत’.  हे मुलाखावेगळे भागात आजोबा माझ्या वडिलांचे मित्र. वय अवघे ब्याऐंशी वर्षे. शरीर थकलेले पण मन तरुण, कणखर, अतिशय उत्साही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे कार्यकर्ते.  १९४८ साली रा.स्व. संघावर जेंव्हा बंदी घालण्यात आली होती, त्याकाळी झालेल्या सत्याग्रहात त्यांनी तुरुंगवासही पत्करला होता.   १९५० साली बडोद्याहून पदवी घेऊन फलटण शुगर वर्क्स मध्ये नोकरीस प्रारंभ केला. नोकरी करता करता ते शिकत राहिले. पुढे वालचंदनगर साखर कारखान्यात उच्च पदावर काम करताना महाराष्ट्रातील सात आठ साखर कारखान्यांच्या उभारणीत  महत्वाची कामगिरी त्यांनी केली. सतत संशोधनात्मक काम करण्यावर त्यांचा भर असे. आयुष्याच्या या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी संगीत प्रेम ही जोपासले आहे.. ते बासरी, हार्मोनियम  आणि जलतरंग उत्तम रीतीने वाजवतात.


असे हे भारी भागवत आजोबा आमच्या कडे दादांना भेटायला म्हणून जसा वेळ मिळेल तसे येत असत. आमच्या घरी आल्यावर दादांच्या समोर बसायचे आणि म्हणायचे  " चला  दादा तुमचे पाय पुढे करा”  आमचे दादा संकोचून 'नको नको' म्हणायचे, पण तरीदेखील ते दादांचे पाय स्वतःच्या पुढ्यात घेऊन प्रेमाने दाबत बसायचे.  हे करताना दादांशी भरपूर गप्पा मारायचे. कधी कधी संघाची गाणी म्हणायचे. मग भागवत आजोबा त्यांच्या शबनम मधून बासरी काढायचे आणि बासरीच्या सुरांनी आम्हाला ते मंत्रमुग्ध करून टाकायचे. मग अलका दोघानाही चहा द्यायची. मग आगदी तास दीड तासाने ते म्हणायचे  "चला निघतो, अजून बऱ्याच ठिकाणी जायचंय." मला नेहेमी उत्सुकता असायची कि या वयात एव्हडी कुठली कामे यांना असतात? मी त्याना एकदा विचारलेच  "आजोबा आता कुठे निघालात ?" त्यांचे उत्तर ऐकून मी थक्क झालो. ते म्हणाले  "आता पुढच्या आजोबांच्या कडे" म्हणजे भागवत आजोबा स्वतःचे ८२ वर्षाचे वय असूनदेखील ज्या वयस्कर आजोबांना चालता येत नाही किंवा घराबाहेर पडता येत नाही अशा वृध्द लोकांकडे जाऊन त्यांची सेवा करीत , करमणूक करीत. ते मला म्हणाले  " फार एकटे वाटते हो या वयात. कुणाला वेळ नसतो आमच्याशी बोलायला. मग माझ्या या वृद्ध मित्रांचा वेळ चांगला घालवताना माझाही वेळ छान जातो."  माझ्या मनात विचार आला कि स्वतःच्या वयाकडे, अडचणींकडे दुर्लक्ष करून, दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे भागवत आजोबा कुठे ? आणि आत्मकेंद्रित राहून फक्त पैशांच्या मागे पाळणारे आम्ही तरुण कुठे ?

तेंव्हापासून मी आमच्या आई, दादांसाठी मुद्दाम वेळ काढू लागलो. दादांना एक व्हील चेअर आणलीकधी कधी आई, दादांना कार मधून दूरवर फिरायला घेऊन जाऊ लागलो. दोघांशी आवर्जून गप्पा मारू लागलो.  एव्हडेच काय पण माझ्या ओळखीच्या इतरही आजी आजोबांच्या कडे ही मुद्दाम गप्पा मारायला जाऊ लागलो. प्रत्येक दिवाळीला ओळखीच्या आजी आजोबांना भेटून, त्यांच्या पाया पाडून दिवाळी च्या शुभेच्छा देऊ लागलो.

 भागवत आजोबांच्या कडे बघून माझ्या मनात नेहेमी विचार येत असत कि तरुण असताना किंवा एकूणच आपण गरज नसलेल्या गोष्टी करत असतो, आणि वृद्धांसाठी मात्र आपल्याला वेळ नसतो. आता हेच बघाना अनावश्यक असलेल्या रूढी, परंपरा आपण वेळ काढून पाळतो. केवळ जायला पाहिजे म्हणून आपण अनेक लग्न समारंभाला, किंवा रिसेप्शनला आवर्जून, वेळ काढून जातोखरे तर सातशे आठशे लोकांच्या गर्दीत तुम्ही गेलात काय किंवा गेलात काय काय फरक पडतो. लग्नाला जाण्यास माझा विरोध नाही, पण वृद्धांना वेळ देण्याच्या जबाबदारीचे काय? लग्न समारंभाच्या गर्दीचा अतिरेक टाळून वृद्धाश्रमातल्या एकाकी वयोवृद्ध आजी आजोबांना भेटण्यासाठी आम्ही वेळ काढू का शकतो काय ? इथे भागवत आजोबांसारख्या व्यक्तींचे मुलाखावेगळेपण अधिक अधोरेखित होते.   
ओळखीची व्यक्ती मरण पावल्यावर आपण वेळ काढून अंत्यविधीसाठी स्मशानात जातो. सगळ्यांनी जाणे खरच आवश्यक असते काय? (जाताना जो तो शक्य तो भरल्या पोटीच जातो. म्हणजे उशीर लागला तर हरकत नाही, असा सोयीस्कर विचार.) मग स्मशानात विधी चालू असताना ग्रुप्स पडतात, गप्पांना उधाण येते. आगदी हास्य विनोदही होतात. कारण बरेचसे लोक शिष्टाचार किंवा पद्धत म्हणूनच आलेले असतात. मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मानसिक आधाराची गरज नक्कीच असते. परंतु ती गरज आगदी जवळच्या नातेवाइकांनी ती पूर्ण करायची असते; किंबहुना असे जवळचे नातेवाइकच तो मानसिक आधार देत असतात. केवळ पद्धत म्हणून आलेली माणसे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कदाचित नकोशीच वाटत असतात. आजारी किंवा वृद्ध व्यक्तीला मृत झाल्यावर स्मशानात जाउन गर्दी करण्यापेक्षा जिवंतपणी आधार देणे योग्य नव्हे काय ?
विचार करा किमान विचार करायला काय हरकत आहे? पटले तर हे काम नक्की करा वृद्धांसाठी वेळ काढा
राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com


Tuesday, 10 May 2016

‘भारत’… खरच माझा देश आहे…?

‘भारत’… खरच माझा देश आहे?


" गेले आठ दिवस मी वीज बिलामध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी हेलपाटे मारतो आहे. तुमचे कर्मचारी मला या टेबलावरून त्या टेबलावर टोलोवतायेत. माझ्या वेळेला काही किंमत आहे कि नाही ? व्हॉट हेल इज गोइंग ऑन ?" एक वयोवृद्ध निवृत्त लष्करी अधिकारी महावितरण च्या एका कार्यालयात संतप्त होऊन जीवाच्या आकांताने ओरडून बोलत होते.  वेळ  होती सकाळी साडे अकरा वाजताची. संपूर्ण कार्यालयात मोजून तीन महिला कर्मचारी होत्या. आरामात कॉफी घेत गप्पा मारत बसलेल्या. कोणतेही वरिष्ठ अधिकारी नव्हते. सर्व अधिकारी मुख्य अभियंत्या बरोबर कसल्याश्या मिटिंग ला गेले होते म्हणे ! मी नवीन मीटर च्या कामासाठी या कार्यालयात आलो होतो. कार्यालयातील शुकशुकाट बघून मी ही थोडा वैतागलेलोच होतो.माझा हेलपाटा बहुदा वायाच जाणार होता. अधिकाऱ्यांची थोडी वाट बघावी या उद्देशाने थांबलो होतो.

या वयोवृद्ध ग्राहकाच्या तोफखान्यामुळे काहीश्या घाबरून गेलेल्या महिला कर्मचार्यांना काय बोलावे हे काळात नव्हते. त्या ह्या सद्गृहस्थांना शांत करायचा प्रयत्न करीत होत्या. तेव्हढ्यात या कार्यालयातील  एक कनिष्ठ अभियंता आले आणि ते आयतेच या चिडलेल्या ग्राहकाच्या कचाट्यात सापडले. बराच वेळ थांबलेले अजून दोन तीन ग्राहक तक्रारी करण्यास पुढे सरसावले. अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर या कनिष्ठ अभियंत्याने काही प्रमाणात या ग्राहकांच्या तक्रारी मार्गी लावल्या. तथापि तो वयोवृद्ध लष्करी अधिकारी शांत होत नव्हता. तो म्हणत होता " ज्या कर्मचार्यांनी मला तर दिला, त्यांना तुम्ही जाब कसा विचारणार? त्यांना काय शिक्षा करणार? ते मला तुम्ही आधी सांगा, त्याशिवाय मी येथून जाणार नाही."

खरे तर मी बराच वेळ या सर्व गोंधळाकडे स्थितःप्रज्ञा सारखे बघत होतो. माझा या घटनेशी काहीही संबंध नव्हता. महावितरण मधील हेलपाटे, तुच्छ वागणूक, बेफिकिरी, वगै. गोष्टी मला रोजच्याच ! पण मला त्या सद्ग्रहास्थांची चिडचिड, राग, घालमेल बघवेना. मी हि खूप अस्वस्थ झालो. मी पुढे झालो आणि त्या ग्राहस्थांची ओळख करून घेतली. 'रानडे' त्यांचे नाव ! ते एक निवृत्त वैमानिक होते. आयुष्यभर अतिशय शिस्तीत जगलेल्या ह्या या ग्राहस्थांची घालमेल मी समजू शकत होतोमाझ्या मनात विचार येत राहिले खरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या कडे कार्य तत्परता का असू नये ? व्यवस्थित पगार (वर भरपूर वरकमाई देखील) असून देखील कामे वेळेत का होत नाहीत ? सर्वच सरकारी कार्यालयात हा अनुभव येतो. आपल्या देशात एकीकडे प्रचंड बेरोजगारी आहे असे म्हणायचे तर दुसरीकडे नोकरी असूनही काम करण्याची मानसिकता असा प्रचंड विरोधाभास आहे. खरे तर कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता (Work Efficiency) वाढवण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. पण दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. तक्रार घेऊन गेल्यावर वरिष्ठ अधिकारी प्रश्न तात्पुरता सोडवतात. सर्वच एकमेकांना सांभाळून घेतात. खरे तर एखादी संस्था, कंपनी चालते ती जगन्नाथाच्या रथासारखी. प्रत्येकाचा हात या संस्थारूपी रथाला लागला पाहिजे. पण हा रथ कोण ओढतो आहे, हे कोणालाच माहिती नसल्यासारखे आपल्या सरकारी संस्था, कार्यालये चालतात. 'आजचे काम आजच, उद्या नाही' हे सूत्र पाळले गेले तर कोणतेच काम प्रलंबित राहणार नाही.

इकडे रानड्यांचे चिडून बोलणे चालूच होते  " एअरफोर्स मधील माझे आयुष्य खरेच छान होते. प्रत्येक गोष्ट आम्ही वेळेवर करण्याची शिस्त तिथे असते. तिथे चुकीला क्षमा ही नसते. शिस्त हि माझ्या जीवनाचा आता एक भागच झाली आहे. आता निवृत्ती नंतरही मी बेशिस्त वागू शकत नाही आणि इतरही कोणी तसे वागल्यास मी खपवून घेणार नाही. मला त्रास दिलेल्या कर्मचारी संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे." मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होतो. मग मी त्यांना बाहेर घेऊन गेलो एका उपहारगृहात आम्ही चहा घेतला. काही वेळाने थोडे शांत झालेले रानडे म्हणाले " जतकर, तुमच्याशी बोलल्यामुले मला आता खूप हलके वाटते आहे. आपल्याला भेटून खूप बरे वाटले. तुम्ही रोज महावितरण च्या कार्यालयातील कामे शांत डोक्याने कशी काय करता बुवा ? बर मला एक सांगा मी तक्रार केलेल्या कर्मचाऱ्यावर खरच काही कारवाई होईल का हो ?" मी निरुत्तर झालो

माझ्याशी गप्पा मारल्यावर काहीसे शांत झालेले रानडे म्हणाले " जतकर, मी कंटाळलोय या भारत देशाला. मला भारत हा देश माझा वाटतच नाहीये आताशा. मला माझ्या देशाबद्दल प्रेमच वाटेनासे झाले आहे. विचार करतो आहे कि कुठेतरी परदेशात जाऊन स्थाईक व्हावे झाले !" आता मात्र मी दचकलो. गंभीर झालो. थोडा निराशही झालो. मी त्यांना म्हणालो " रानडे साहेब तुम्ही तुमचा प्रश्न तुमच्यापुरता सोडवलात. पण आमच्या सारख्या सामान्य नागरिकांनी कुठे जायचे ? का सर्वानीच देश सोडून जायचे ? आपण आपल्या देशात राहूनच हि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायला नको का?" पण रानडे मात्र त्यांच्या निराश अवस्थेतून बाहेर येत नव्हते.  

दिवसभर माझ्या डोक्यातून हा प्रसंग जात नव्हता. संध्याकाळी कामे आटोपून घरी जाताना नेहेमीप्रमाणे मी हृदयावर हात ठेवून मी " आल इज वेल " असे तीनदा म्हणायला विसरलो नाही. आज या घटनेला वर्षे उलटली.  माझी व्यावसाईक लढाई सुरूच आहे. आणि हो गंमत म्हणजे रानड्यांनी त्यावेळी तक्रार केलेल्या महावितरण च्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही 

राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com