Tuesday, 8 March 2016

' एका वेगळ्या लग्नाची गोष्ट '


' एका वेगळ्या लग्नाची गोष्ट '

कॉलेज मध्ये असताना आम्ही काही समविचारी मित्रांनी स्वतःचे लग्न नोंदणी  पद्धतीनेच करायचे असे ठरवले होते. अवास्तव खर्च, श्रीमंतीचा देखावा, मानपान, हुंडाभेटवस्तूंची देवाणघेवाण, अनेक अनावश्यक लग्नविधी, मानापमानाच्या निमित्ताने होणारे रुसवेफुगवे, पाय धुण्यासारख्या विचित्र प्रथा, जेवणावळी, त्यातील अन्नाची नासाडी, लग्नातील मिरवणुकी, मिरवणुकीतील भिभत्स नाचणे अशा अनेक गोष्टी आम्हा मित्रांना अस्वस्थ करीत. अतिशय तीव्रपणे आणि आक्रमक पद्धतीने आम्ही चुकीच्या लग्नपद्धती बद्दल मते मांडीत असायचो. पण प्रत्येकाची जेंव्हा स्वतःचे लग्न करायची वेळ आली तेंव्हा, एक एक करीत सारे ढेपाळले. कुणाला आईवडिलांची आज्ञा पाळायला लागली , तर कुणाला समाज काय म्हणेल याची काळजी वाटू लागली आणि मग एक एक करून सगळ्यांची लग्ने धुमधडाक्यात झाली. मला मात्र माझ्याच विचारांची मुलगी मिळाल्यामुळे माझे लग्न मात्र फक्त पंचवीस जवळच्या नातेवाईकांच्या साक्षीने घराच्या घरी, अतिशय साधेपणाने झाले. आमच्या अशा विचारांमुळे आम्ही शक्यतो लग्नाला जाण्याचे टाळतोच, आणि जर अगदीच जावे लागले तर शक्यतो गर्दीपासुन दूर कुठेतरी मागेच असतो. असो

सध्याच्या तद्दन श्रीमंतीचा देखावा करणाऱ्या लग्नात एका आगळ्या वेगळ्या लग्नाने मात्र आमचे लक्ष चांगलेच वेधले गेले. 'मानव्य' ह्या एच. आय. व्ही. बाधीत मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेचे संचालक माझे अतिशय जवळचे मित्र श्री. शिरीष लवाटे यांनी मला एकदा एका लग्नाचे आमंत्रण पाठवले. लग्न होते मानव्य मधेच लहानाची मोठी झालेल्यासायलीचे’ आणि हडपसर जवळच्या एका छोट्या गावात राहणाऱ्याश्रीकांतचे’ ! श्रीकांतही जन्मापासून एच.आय.व्ही. बाधीतच होता. श्रीकांतचे आई वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे श्रीकांतचा सांभाळ मोठ्या मनाच्या त्याच्या काका काकुनी केला. सायलीची अवस्था काहीशी अशीच होती. ह्या अश्या वेगळ्या लग्नाला जाण्याचे मी आणि अलकाने आवर्जून जायचे असे ठरवले.  कोणत्याही लग्नाला जायचा कंटाळा करणारे आम्ही दोघेही त्या दिवशी मात्र उत्साहाने निघालो. आदल्या दिवशी आम्ही या विशेष नव दाम्पत्यासाठी त्यांच्या संसाराला उपयोगी पडेल अशी छानशी भेटवस्तूही घेतली. पुण्या नजीक भूगांव येथी मानव्य संस्थेत आम्ही उत्सुकता, आश्चर्य, कौतुक अश्या संमिश्र भावनांनी भरलेल्या अवस्थेत दाखल झालो

प्रवेशद्वारातच संस्थेतीलच तीन चार मुलांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. संस्थेच्या दारात मुलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. सनई चे मंगलमयी सूर वातावरण प्रसन्न करीत होते. संस्थेतील सर्वच मुले काहीना काही कामात गुंतली होती. संस्थेतील शिक्षकांची सगळीकडे लगबग चालली होती. संस्थेतल्या मुलामुलींनीच काय पण शिक्षकांनी देखील हातावर मेंदी काढलेली दिसत होती. या सर्व गर्दीत चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या एक बाई विशेष धावपळीत दिसल्या. चौकशी केल्यावर असे समजले कि त्या संस्थेतील सर्वात जुन्या शिक्षिका होत्या. या लग्नाच्या तयारी साठी तीन चार दिवसापासून संस्थेत मुक्काम ठोकून होत्या म्हणे ! लग्नासाठी लाडू करणे, मानापमानाच्या साड्या, कपडे आणणे, कुणाला काय हवे नको ते बघणे वगैरे कामे त्या जातीने लक्ष घालून करीत होत्या. लग्नाची गर्दी मी न्याहाळत होतो. लग्नाला अनेक मान्यवर आलेले दिसत होते. गावातील काही पुढारी मंडळीही आलेली दिसत होती. नवऱ्या मुलाचा म्हणजे श्रीकांत चा मित्र परिवार चेष्टा मस्करीत गुंतला होता. तेव्हड्यात माझे लक्ष एका परदेशी तरुणाकडे गेले. अमेरिकेतील 'डेव्हिड यान्सी' हा तरुण आशिया खंडातल्या निरनिराळ्या सामाजिक संस्थाना भेटी देऊन त्यांचे कार्य समजून घेत होता म्हणे ! त्याने हि खास भारतीय पोशाख घातला होता.  या लग्नासाठी त्याने त्याचा पुण्यातील मुक्काम आठ दहा दिवसांनी वाढवला होता.

तेव्हड्यात कुठूनसे शिरीष उज्वला लवाटे पतीपत्नी आले, त्यांनी  स्वागत  केले. 'मानव्य' ह्या एच.आय.व्ही. बाधित मुलांना सांभाळणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका कै. विजयाताई लवाटे यांचे कार्य त्यांचे चिरंजीव श्री. शिरीष त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उज्वला लवाटे यांनी समर्थपणे पेलले आहे. आमच्या गप्पांमधून या विशेष वेगळ्या लग्नाची गोष्ट उलघडत गेली. ते सांगत होते
संस्थेतील मुलांना अशा समारंभांनी, घटनांनी एकप्रकारची 'कौटुंबिक सुरक्षिततेची' जाणीव होते. आपली संस्था लहानपणी आपले संगोपन तर करतेच, पण मोठे झाल्यावर आपल्याला वाऱ्यावर सोडून देत नाही असेही त्यांच्या लक्षात येते. मोठे झाल्यावर मुलांना नोकरी लाऊन देणे, मुला मुलींची लग्नं लाऊन त्यांचा संसार उभाकारून देणे अशी पुढील काळजी देखील संस्थेला घ्यावी लागते. सौ. लवाटे म्हणाल्या "आमची 'सायली' वयाच्या अंदाजे पाचव्या वर्षी मानव्य मध्ये दाखल झाली. ती अर्थातच एच.आय.व्ही. बाधित होती. अनाथही होती. महाराष्ट्र सरकारच्या 'बाल कल्याण समिती मध्ये अशा प्रकारची मुले दाखल होत असतात. हि संस्था या अशा मुलांची प्राथमिक चौकशी करून मानव्य सारख्या संस्थेत रवाना करतात. आज सायली सारखी चाळीस पन्नास मुले आनंदाने राहतात. पण आजचा दिवस खूप आनंदाचा आहे." सौ. लवाटे उत्साहाने पुढे म्हणाल्या "आमची सायली स्वभावाने खूप छान आहे. ती उत्तम स्वैपाक देखील करते. तिला घरकामात अतिशय रस आहे." सौ. लवाटे त्यांच्या या मानस कन्येचे तोंडभरून कौतुक करीत होत्या. जणू आज त्यांच्याच मुलीचे लग्न होते.


"पण तुम्ही हे लग्न जमवले तरी कसे ? श्रीकांत चे स्थळ तुम्हाला कुठे व कसे मिळाले ?" माझे प्रश्न थांबत नव्हते. यावर शिरीष लवाटे यांनी खूप उद्बोधक माहिती दिली. ते म्हणाले "मानव्य प्रमाणे असे सामाजिक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी आमचा संपर्क असतो. त्यातूनच अशी नाती सापडू शकतात. उदा. एन.पी.पी.+ (नेटवर्क ऑफ पिपल लिव्हिंग वुईथ एच.आय.व्ही.) हि संस्था एच.आय.व्ही. ग्रस्त लोकांसाठी खूप काम करते. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संस्थेचे सर्व पदाधिकारी एच.आय.व्ही. बाधित आहेत. दुसरी ए.आर.आय. म्हणजे अँटी रिट्रो व्हायरल ट्रीटमेंट इंस्टिट्यूट हि संस्था एच.आय.व्ही. बाधित लोकांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या, तपासण्या करते, त्यांच्यावर उपचाराबरोबरच त्यांचे समुपदेशनाचे हि काम करते. अश्या प्रकारच्या अनेक संस्था एकत्र येउन एच.आय.व्ही. बाधितांचे पुनर्वसन करीत असतात. एव्हडेच काय पण एच.आय.व्ही बाधित उपवर मुलामुलींचे वधू वर मेळावेही घेतले जातात." या नवीन मिळालेल्या माहितीमुळे मी थक्क झालो. आम्ही पुढे उत्सुकतेने ऐकू लागलो… 

श्रीकांत ची माहिती आम्हाला ए.आर.आय. या संस्थेत मिळाली. मग आम्ही हडपसर जवळच्या त्याच्या गावात पोहोचलो. श्रीकांत चे आई वडील लहानपणीच वारल्यामुळे श्रीकांत चा सांभाळ त्याच्या मोठ्या मनाच्या काका काकुनी केला. श्रीकांत हा अतिशय प्रगल्भ मनाचा आहे. त्याला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्याचा फुले विक्री चा छोटासा व्यवसाय आहे. श्रीकांत स्वतःच्या पायावर उभा आहे हे समजल्यावर आम्ही निश्चिंत झालो. निवारा या संस्थेत सायलीला दाखवण्याचा कार्यक्रम झाला. आगदी आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या घरी होतो तसाच ! आमची सायली छानच असल्यामुळे ती श्रीकांतला आणि तिच्या घरच्यांना पसंत पडली." तेव्हड्यात  अलकाने (माझ्यापत्नीने) विचारले "मानव्य संस्थेत वाढलेली मुलगी सासरी एका कुटुंबात राहायला जाणार म्हणजे अडचणी नाही का येणार?" सौ. लवाटे यांना कदाचित हा प्रश्न अपेक्षितच असावा. त्या हसून म्हणाल्या "आहो खूप अडचणी येतात आणि येण्याची शक्यता असते. सर्व शक्यतांचा विचार करून चक्क समुपदेशनही करावे लागते. सायलीला तिच्या सासरी कसे वागायचे धडे आम्ही दिलेले आहेत. आमच्या संस्थेतल्या गृहमातांनी ( गृहमाता म्हणजे संस्थेतील मुलांना सांभाळणाऱ्या शिक्षिका ) हि जबाबदारी फार उत्तम रीतीने सांभाळलेली आहे. आहो एव्हडेच काय पण श्रीकांत व त्याच्या कुटुंबियांना देखील अनेक गोष्टी समजून सांगाव्या लागल्या. बायको बरोबर कसे वागायचे याचे जावयाला प्रशिक्षण देणारी मी जगातील पहिलीच सासू असेन कदाचित !" सौ. लवाटे खळखळून हसत सुटल्या.

तेव्हड्यात लवाटे पतिपत्नींना कुणीतरी बोलावले, त्यामुळे ते दोघेही लगबगीने कुठेतरी गर्दीत निघून गेले. हाँल च्या उजव्या कोपऱ्यात  काहीशी जास्त गर्दी दिसली म्हणून आम्ही उत्सुकतेने तिकडे गेलो. त्य ठिकाणी छानसे रुखवत मांडले होते. नवदाम्पत्याच्या संसारासाठी उपयोगी अशी भांडी, मिक्सर, पंखा, इत्यादी वस्तूंची आकर्षक साजावटीसह तिथे मांडणी केली होती. हाँल च्या मध्यभागी लग्न विधी सुरु झाले होते. आगदी मोजकेच पण आवश्यक असे लाजाहोम, कन्यादान, सप्तपदी असे लग्नविधी पार पडले. कानपिळी हा लग्नातला विधी सुद्धा खूप गमतीशीर व लक्षवेधी होता. श्रीकांत चा कान मानव्य च्या तब्बल पंचेचाळीस मुलांनी पिळला. बिचारा श्रीकांत हव्या हव्याश्या वाटणाऱ्या या कानपिळीला हसून दाद देत होता. कान पिळणाऱ्या प्रत्येकाला श्रीकांतने यथाशक्ती भेटवस्तू हि दिली. प्रत्येक कानपिळीला हाँल मध्ये हास्याचे फवारे उडत होते. जणू काही स्वतःच्याच लेकीचे आपण कन्यादान करत आहोत अशा भावनेने लवाटे पतीपत्नी सर्व लग्नविधी पार पाडीत होते. नवरदेवाकडील प्रत्येक थोरामोठ्यांचे मानपान करीत होते. प्रत्येकाला आहेर करून वाकून पाय देखील पडत होते. नंतर साध्याच पण सुग्रास अशा जेवणाच्या पंगतीत प्रत्येकाला आग्रहाने वाढत होते.

शेवटी सायलीची सासरी पाठवणी करताना मात्र वातावरण काहीसे गंभीर झाले. 'सायालीताई आपल्याला आता सोडून तिच्या घरी सासरी जाणार' या कल्पनेने संस्थेतील इतर मुले मुली कावरीबावरी झाली. काही मुले सायलीच्या गळ्यात पडून रडत होती. गुहमातांचा कंठ दाटून आला होता. प्रत्येकजण सायलीला साश्रू नयनांनी निरोप देत होता. सायलीहि रडत होती. या सर्वांच्या गर्दीमागे दूरवर कुठेतरी लवाटे पतीपत्नी उभे होते. त्यांची काहीतरी चर्चा चाली होती. आम्ही त्यांच्या जवळ गेलो तर लक्षात आले कि सौ. लवाटे गहिवरल्या होत्या. आम्ही येताना पाहून त्या सावरल्या आणि म्हणाल्या "आहो असे रडत बसून कसे चालेल? मला अजून वीस मुली आहेत. त्यांचीही लग्ने, घरे  लाऊन  द्यायची आहेत, अजून बरीच कामे करायची आहेत. चला ! कामाला लागायला हवेमी थक्क होऊन या जोडप्याकडे बघत राहिलो. कै. विजयाताई लवाटे यांचे संस्कार आणि कुठलीशी अज्ञात प्रेरणा हेच या जोडप्याचा उर्जास्त्रोत असणार !  आम्ही उभयता त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो ते अतिशय अस्वस्थ मनाने व एका वेगळ्या लग्नाला उपस्थित राहिल्याच्या समाधानाने… 

राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com


         

1 comment:

  1. वा, छान वाटलं वाचून.
    अतिशय आदर आणि कौतुक वाटतय अश्या संस्था उभारण्यार्यांच आणी यशस्वीपणे चालवतात त्या सर्वांचं

    ReplyDelete