वैभव
जोशी : एक अविस्मरणीय मैफिल
माझे जवळचे मित्र श्री. नरेंद्र दुवेदी यांचं पुण्यापासून सुमारे ६०/७० कि.मी. दूर लवार्डे गावाजवळ टेमघर धरणाच्या बॅक वॉटरला लागून 'निर्मला' नावाचं एक सुरेख फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या विद्युतीकरणाच्या निमित्ताने मी सुरवातीपासूनच नेहेमी जात होतो. डोंगर उतारावर आणि धरणाच्या पाण्याला लागूनच असलेल्या या फार्म हाऊस वर मी पहिल्यांदा जेंव्हा गेलो तेंव्हा या फार्महाऊसच्या प्रेमातच पडलो. शहराच्या कोलाहलापासून दूर, हिरवाई, पक्षी आणि मोकळ्या हवेचा अनुभव घेण्यासाठी हे फार्महाउस अतिशय आदर्श ठिकाण आहे. दुवेदींच्या फार्महाऊसचं अजून एक वेगळेपण आहे. श्री. नरेंद्र दुवेदी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चित्रा दुवेदी हे अतिशय संवेदनशील आणि सर्व कलाप्रकारात रस घेणारं जोडपं आहे. त्यांच्या फार्महाऊसवर ते दर दोन महिन्यांनी जवळच्या मित्रमंडळींसाठी एखादा सुंदर कार्यक्रम आयोजित करतात. अश्या आम्हा सुमारे ५० मित्रमंडळींचा एक व्हाट्स अप ग्रुप देखील आहे. कार्यक्रमाच्या दिवशी रुचकर शाकाहारी नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था देखील केली जाते. मित्रमंडळींबरोबर जेवण, गप्पा आणि एखाद्या प्रसिद्ध कलाकाराचा उत्तम कार्यक्रम! अजून काय हवे? गेल्या रविवारी सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्या बहारदार कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळच्या सुरेख नाश्त्यानंतर कार्यक्रम सुरु झाला.
मला नवीन पिढीतील संदीप खरे, सलील कुलकर्णी, वैभव जोशी, संकर्षण कऱ्हाडे वगैरे कलाकार मंडळी फार भावतात. ही प्रतिभावान मंडळी अतिशय सध्या पद्धतीने व्यक्त होतात. कुठलंही शब्दांचं अवडंबर नाही, फार भयंकर न कळणाऱ्या शब्दबंबाळ रचना नाहीत, आणि कदाचित त्याच मुळे माझ्या सारख्या सामान्य रसिकांना ते आणि त्यांचे अविष्कार जास्त भावतात. त्यांचा कलाविष्कार श्रोत्यांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचवण्यात ते कमालीचे वाकबगार आहेत. वैभव जोशी हे देखील याच पठडीतले कवी आहेत. या कार्यक्रमात गप्पा मारताना 'कविता ही मुळात कशी सुचते?' ह्या प्रश्नाचं उत्तर देताना वैभव जोशी म्हणाले की 'कविता कशी सुचते हे सांगणं कवीला फार अवघड असतं. कविता ही उत्स्फूर्त असते. कवीच्या मनात ती एका क्षणापुर्वी नसते, दुसऱ्या क्षणी ती असते, आणि पुढच्या क्षणी ती कवीची नसते, त्याने ती लोकार्पण केलेली असते. वैभव जोशी असो किंवा संदीप खरे असो या प्रतिभावान कवींच्या कविता ऐकल्यावर त्या ऐकणाऱ्या हजारो श्रोत्यांच्या मनात येतं की 'अरे, हेच मला म्हणायचं होतं.' कविता ही कमीतकमी शब्दात बरंच काही सांगणारी हवी. वैभव जोशी म्हणतात 'कविता ही शंभर लोलकातून तुम्हाला शंभर रंग दाखवणारी हवी. अन्यथा ती रुक्ष आणि गद्यप्रधान होते.
या कवितांच्या आणि गप्पांच्या मैफिलीत वैभव जोशींनी गीतकार, कवी, गझलकार यातील फरक, काव्यातील व्याकरण, वृत्तांचे सौंदर्य, मुक्तछंदातल्या कवितांचे वैशिठ्य अशा अनेक गोष्टींचे विस्तृत विश्लेषण केले. या अनुषंगाने गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांच्या अनेक काव्यरचना सादर केल्या आणि आम्हा श्रोत्यांची वाहवा मिळवली, जसे...
उममले आभाळभर चांदणे माझे तुझे !
लपवूनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे...
हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो !
आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे...
पुढील दोन अडीच तास वैभव जोशींच्या कवितांची अक्षरशः बरसात आम्हा श्रोत्यांवर होत होती. त्यात मधून मधून वैभव जोशींच्या कधी गंभीर तर कधी मिश्किल गप्पा आम्हा श्रोत्यांना कधी आत्ममग्न करणाऱ्या तर कधी चेहेऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या होत्या. नवराबायकोच्या मधील संवाद हा एक सहनशीलता वाढवणारा प्रकार आहे असे सांगत त्यांनी
गोष्ट तशी रोजची परंतु... घटना अगदी ताजी आहे...
पेपर वाचत सहज म्हणालो..'आज कोणती भाजी आहे?'
ही तमाम स्त्री पुरुष वर्गाला खळखळुन हसवणारी कविता सादर केली. गंमत म्हणजे प्रेक्षकात आमच्या बरोबर बसलेल्या त्यांच्या पत्नी देखील या हास्यकल्लोळात सामील झाल्या.
घरी आई आणि बायकोच्या चक्रामध्ये पिचलेला मध्यमवर्गीय नवरा जेंव्हा महिन्याभराचा शीण घालवण्यासाठी बारमध्ये प्यायला बसतो, तेंव्हा पिताना त्याच्यात जे बदल होतात याचे मजेशीर वर्णन करणारी कविता वैभव जोशींनी सादर केली तेंव्हा माझी खात्री आहे की या कवितेचा आनंद घेणाऱ्या पुरुष वर्गाने कवितेत जणू स्वतःलाच पहिले असेल.
एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले !
सशासारखे जीणे एकदम बाणेदार झाले...
वरचं बटण सोडलं अन भरला पहिला ग्लास !
तेल लावत गेली नोकरी अन खड्ड्यात गेला बॉस...
अर्थात अशा हलक्या फुलक्या कवितांबरोबर वैभव जोशींनी श्रोत्यांना काही गंभीर व्हायला लावणाऱ्या कविता देखील सादर केल्या. या पैकी त्यांची 'डोह' नावाची कविता सर्वांनाच काहीशी गंभीर करून गेली. त्यात ते असं म्हणतात...
प्रत्येक डोहाचा तळ
गाठायलाच हवा असं नाही!
एखादा डोह असू द्यावा अथांग..
कुठल्याही क्षणी हक्काने जावं
आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अशा अंतरावर बसून बघत रहावं
आपण डोहाकडे
आणि डोहाने आपल्याकडे..
ना आपल्या चेह-यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नाहीत
तर कसला अपेक्षाभंग?!
डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला
इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला
अन हलकेच
आपल्या दिशेने एक पान सरकवत
त्याने दाखवून द्यावं की
बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला
अशावेळी
ते पान परत पाण्यात सोडून द्यावं..
कारण हाती आलेला प्रत्येक पुरावा
वापरायलाच हवा असं नाही
प्रत्येक डोहाचा तळ
गाठायलाच हवा असं नाही !
'आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधणे किंवा प्रत्येक नात्याच्या तळाशी जाणे गरजेचे नसते. काही गोष्टी न उलघडता, अपूर्ण असलेल्याच सुंदर असतात.' असं काहीसं सांगणारी ही कविता सर्वांनाच विचारमग्न करून गेली. वैभव जोशींच्या या कवितेतील 'एखादा डोह असू द्यावा अथांग' ही ओळ मनाला स्पर्शून गेली. या ओळींमध्ये 'जीवनात काही गोष्टी शांतपणे, स्वीकारायला हव्यात' असं काहीसं कवीला अभिप्रेत असावं. प्रत्येक रसिक श्रोता आपापल्या दृष्टिकोनातून या कवितेचा अर्थ लावू शकतो हे या कवितेचे मला वैशिष्ठ्य वाटले. ही कविता आपल्याला आयुष्याकडे अधिक समंजसपणे, अथांगपणे बघण्याचा दृष्टिकोन देते.
'भरतीचा माज नाही' असं म्हणत आपले उत्तुंग यश नम्रपणे स्वीकारणाऱ्या कवी वैभव जोशी यांची मैफिल नेहेमीप्रमाणेच रंगली. आपल्या बरोबरीच्या आणि आपल्यापेक्षा जेष्ठ कवींची मनापासून स्तुती करणारा, आदराने त्यांच्याही कवितेतील सौंदर्यस्थळे सांगणारा आणि माझ्या सारख्या रुक्ष माणसातील कवीमन जागृत करणारा हा कवी मला मनापासून भावून गेला.
राजीव जतकर
४ एप्रिल २०२६.
