तलाक_ तलाक_ तलाक
मागील आठवड्यात नेटफ्लिक्सवर दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांचा 'हक' हा सुंदर आणि विचारप्रवृत्त करणारा चित्रपट पाहण्यात आला. न्याय आणि धर्म जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेंव्हा कुणाचा विजय होतो? कोणाचा विजय व्हायला हवा? असे प्रश्न पडतात. अशा अवघड प्रश्नांची उकल करण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतो. हा चित्रपट एक उत्तम कोर्टरूम ड्रामा देखील आहे. या चित्रपटात न्यायालयामध्ये दाद मागणाऱ्या मुस्लिम पीडित महिलेचा आणि पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेतील पुरुषाचा कोर्टमधील दाखवलेला संघर्ष केवळ शब्दांचा न राहता तो भिन्न विचारधारांचा होतो. दिग्दर्शक सुपर्ण वर्मा ज्याप्रमाणे एक गुंतागुंतीचा विषय सोप्या पद्धतीने चित्रपटात सादर करतात आणि हृदयस्पर्शी संदेश देतात ते पाहण्यासारखे आहे. हा चित्रपट धर्मात रुजलेल्या पितृसत्ताक कायद्यांना प्रभावीपणे आणि थेट उघड करतो. हा चित्रपट सत्तर ते ऐंशीच्या दशकात गाजलेल्या 'शाहबानो केस' पासून प्रेरित होऊन सादर केलेला आहे. हा चित्रपट केवळ कायदेशीर शब्दजाला पेक्षा मानवी भावनांवर लक्ष केंद्रित करून तयार केला गेलाय. त्यामुळे हा चित्रपट एक प्रभावी सिनेमॅटिक अनुभव बनतो. पडद्यावरील प्रत्येक फ्रेम आपल्याला विचार करायला भाग पाडते.
'हक' या चित्रपटाची कथा 'जिग्ना व्होरा' यांनी लिहिलेल्या 'बानो: भारत की बेटी' या पुस्तकात लिहिलेल्या सत्यकथेचे काहीसे काल्पनिक आणि नाट्यमय रूप आहे. सत्तर ते ऐंशीच्या दशकात घडणारी ही सत्यकथा 'शाझिया बानो' (यामी गौतम) भोवती फिरते. शाझिया बानो हीचा निकाह किंवा विवाह आब्बास खान (इमरान हाश्मी) या एका प्रतिथयश वकिलाबरोबर होतो. लग्नानंतर सर्व सुरळीत सुरु असताना शाझिया बानोला एका धक्कादायक वास्तवाला सामोरे जावे लागते. लग्नानंतर अनेक वर्षांनी अब्बास खान शाझियाला, आपल्या पत्नीला न विचारता दुसरे लग्न करतो. या दुसऱ्या पत्नी 'सायरा' (वार्तिका सिंग) बरोबर अब्बासचे आधीचेच प्रेम संबंध असतात. एका तणावपूर्ण प्रसंगात अब्बास खान शाझिया बानोला केवळ तीन वेळेला तलाक - तलाक - तलाक असे म्हणत क्षणार्धात घटस्फोट देऊन टाकतो. शाझिया बनोचे या घटनेमुळे आयुष्यच उध्वस्त होते. त्यावेळी शाझिया च्या पदरात तीन मुले देखील असतात. आपल्या छोट्या मुलांना सांभाळायचे कसे? त्यांचे शिक्षण, पालनपोषण कसे करायचे? या विवंचनेत ती आपल्या पतीकडे ४०० रुपये पोटगीची मागणी करते. अब्बास त्यास नकार देतो. मग या अन्यायाची दाद मागण्यासाठी शाझिया न्यायालयात धाव घेते. शाझिया बानोचे वडील मौलवी बशीर (दानिश हुसेन) हे तिच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात. स्थानिक न्यायालयात तसेच जिल्हा न्यायालयात पुरेसा न्याय न मिळाल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाते, तेंव्हा ती एक कायदेशीर लढाई न रहाता देशभरातल्या असंख्य महिलांच्या संघर्षाचे प्रतीक बनून, स्त्रियांच्या हक्कांसाठी एक नैतिक लढाई बनते. या चित्रपटाची कथा मांडताना अनावश्यक नाट्यमयता टाळली गेली आहे. या चित्रपटाची पकथा, संवाद लेखन अप्रतिम आहे. याचे सर्व श्रेय पटकथाकार 'रेशु नाथ' यांना द्यायला हवे. या चित्रपटातील संवाद प्रामाणिक आणि आपल्या मातीतले वाटतात. संवादातील प्रत्येक ओळ हेतू दर्शवते. परिणामी तल्लीन करणारा, विचार देणारा एक अद्भुत, अनोखा अनुभव आपल्याला मिळतो. हा चित्रपट बघताना आपण शाझिया बानोच्या हक्क आणि प्रतिष्ठेसाठीच्या झालेल्या लढाईचे साक्षीदार बनतो. संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाने ही कथा एकतर्फी किंवा विशिष्ठ समाजापुरती वाटू नये याची काळजी घेतली आहे.

आब्बास खान (इमरान हाश्मी) आणि शाझिया बानो (यामी गौतम)
'हक' या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या भूमिका खूप महत्वपूर्ण, बहुआयामी अशा आहेत. यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी भूमिकेत अक्षरशः झोकून दिले आहे. 'यामी गौतम' हिला शाझिया बानोच्या कायदेशीर लढाईचे महत्व समजलेले असल्यामुळे ते बानोची भूमिका समरसतेने करताना दिसते. तिची भूमिका कधीही धर्माच्या विरोधात जात नाही. ती केवळ पुरुषांना अनुकूल असलेल्या कायद्यांविरोधात लढते. धक्का, राग, दुःख, असहाय्यता असे अभिनयाचे अनेक पैलू पहाताना संपूर्ण चित्रपटात तिच्या बद्दल आपल्याला सहानुभूती तर वाटतेच, पण तिचा संघर्ष आणि कधीही मागे न हटण्याच्या तिच्या लढाऊ वृत्तीबद्दल अभिमानही वाटतो. 'यामी गौतम' तिची भूमिका समजावून घेत तिचा सर्वोत्तम अभिनय सादर करते. शाझियाच्या वडिलांच्या भूमिकेतील दानिश हुसेन यांनी खोल सहानुभूतीने भरलेले पात्र जबर्दस्त पद्धतीने साकारलेले आहे. पडद्यावर त्यांचा अभिनय नेहेमीच मनमोहक असतो. 'बेला जैन' या वकिलाच्या भूमिकेतील 'शिबा चड्ढा हे माझी आवडती अभिनेत्री आहे. शाझिया बानोचा खटला स्थानिक पातळीवरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यात आघाडीवर असलेल्या 'बेला जैन' या वकिलाची भूमिका तिने समर्थपणे आणि जबाबदारीने निभावली आहे.
.jpg)
वडिलांच्या भूमिकेतील 'दानिश हुसेन'
साधारण मध्यंतरानंतर कोर्टरूम ड्रामा सुरु होतो. कोर्टातील काही प्रसंग, संवाद आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सुरवातीला न्याय मागण्यासाठी शाझिया बानो जेंव्हा न्यायालयात जाते तेंव्हा न्यायाधीश तिला 'अशी प्रकरणे तुम्ही न्यायालयात नव्हे तर तुमच्या एखाद्या काझीकडे जाऊन सोडावा. तुम्ही मुस्लिम धर्मीय असल्यामुळे तुमचे प्रकरण 'मुस्लिम कायद्यांतर्गत येते.' त्यावर शाझिया बानो म्हणते 'न्यायाधीश महाराज, आज मी कुणाचा खून केला असता तर तुम्ही मला हाच सल्ला दिला असता का?' पुढील याच दृश्यात अब्बास खान (इमरान हाश्मी) स्वतःचा बचाव करताना म्हणतो की 'इस्लाम धर्मात आम्ही केलेलं लग्न हा एक करारनामा असतो. आमच्या धर्मात हिंदू धर्माप्रमाणे लग्न हे सात जन्माचं नातं नसतं. त्यामुळे मी शाझियाला तलाक दिला आहे. आमचा करार संपला, आता आमचा काहीही संबंध नाही. यावर केवळ तीन वेळा नुसते 'तलाक' असं म्हणाल्यामुळे तलाक किंवा घटस्फोट कसा होऊ शकतो?' असा प्रश्न शाझिया बानो उपस्थित करते. त्यावर अब्बास खान त्याची बाजू मांडताना 'हे सर्व शरियत मध्ये लिहिलेले आहे आणि त्यामुळे तेच खरे आहे. हा प्रश्न मुस्लिम पर्सनल लॉ मधील तरतुदीप्रमाणे सोडवला पाहिजे' असे ठामपणे सांगतो. पुढे या खटल्याचं स्वरूप वैयक्तिक न
रहाता त्याला धार्मिक आणि सामाजिक स्वरूप येते. मुस्लिम पर्सनल लॉ आणि संकलर लॉ यांना एकमेकांसमोर आणणे हे सामाजिक सलोख्यासाठी खूप धोकादायक असल्याचे कारण देत न्यायाधीश या संवेदनशील खटल्यावर न्याय देण्याचे टाळतात आणि शाझिया बानोला तिचे गाऱ्हाणे 'मुस्लिम लॉ बोर्डात' घेऊन जायला सांगतात.
मुस्लिम लॉ बोर्डात शाझिया बनोचे गाऱ्हाणे पोहोचते. तेंव्हा पुरुषसत्ताक आणि कर्मठ मानसिकता असलेल्या मुल्ला, मौलवींच्या समोर शाझिया बानोला बुरख्यात आणि पडद्याआड उभे केले जाते. तेंव्हा मौलवी म्हणतात, 'तुम्ही कोर्टात गेलात याचा अर्थ तुम्ही शरियतला नाकारलं आहे.' त्यावर शाझिया बानो धीटपणे सांगते की 'तुम्हीच शरियत ला नाकारत आहात. 'आप खुदाके नुमायंदे है! खुदा नही!' तुम्ही मुस्लिम धार्मिक ग्रंथ वाचलेले दिसत नाहीत. सुरत-अल बकरा किंवा सुरत अन-निसा या सारख्या मुस्लिम धार्मिक ग्रंथात तलाक घ्यायचा असेल तर त्या आधी सामोपचारासाठी (सुलाह) तीन महिन्यांची मुदत द्यावी लागते. या काळात सामोपचाराने प्रश्न सुटला तर तलाक घेण्याची आवश्यकताच नाही. पती पत्नी ने नातं तोडण्याची गरजच नाही. अब्बास ने माझ्या पतीने तीन वेळा तलाक-तलाक-तलाक हे शब्द उच्चारत काही सेकंदात घटस्फोट घेतला. ही पद्धत कुठल्याच मुस्लिम धार्मिक ग्रंथात नाहीये. उलट आशा प्रकारे घटस्फोट घेणाऱ्या पुरुषाला सार्वजनिक ठिकाणी उभे करून सर्वांदेखत त्याच्या पाठीवर आसूड ओढावेत असे मुस्लिम धार्मिक ग्रंथात लिहिलेले आहे. तुम्ही मुस्लिम ग्रंथांचे नीट वाचन केलेले दिसत नाहीये.' शाझिया बानो च्या अभ्यासपूर्ण केलेल्या प्रत्युत्तर ऐकून मुस्लिम लॉ बोर्डातील मौलवी निरुत्तर होतात. ह्या प्रसंगात शेवटी शाझिया ठामपणे सांगते.. 'हमारे और हमारे खुदा के बीच जो भी है, उस पर आप कूछ नही कह सकते!
ना हम कौम के गद्दार है! ना ही हम अपने किये पर शरमिंदा है!' हम सही है!' हा प्रसंग इतका प्रभावशाली झालाय की आपण निःशब्द होतो. असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे थेट संवाद, प्रसंग या चित्रपटात आहेत.
'हक' हा चित्रपट सत्तरीच्या शतकात गाजलेल्या शहाबानो च्या केसच्या सत्यघटनेवर आधारित आहे. हा चित्रपट बघण्याआधी ही मूळ केस, खटला जाणून घेतला तर ह्या चित्रपटाचे महत्व समजते. शाहबानो केस चा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायद्यातील कलम १२५, तसेच कुराण, शरियत या मधील संदर्भ घेत शहाबानोच्या बाजूने दिला. न्यायालयाने शाहबानो यांना तलाक आणि त्यानंतर पोटगीचा अधिकार मान्य करून पोटगी तथा देखभालीचा खर्च देण्यात यावा असा निकाल जाहीर केला. शाहबानोच्या केस चा निकाल लागल्यावर हा निकाल प्रचंड वादाचे केंद्र बनला. या निकालावर मुस्लिमांच्या विविध धार्मिक संघटनांकडून निषेध करण्यात आला. 'हा निकाल म्हणजे मुस्लिम धर्मावर हल्ला आहे' असे संबोधले गेले. धार्मिक नेते रस्त्यावर उतरले. याच सुमारास राष्ट्रीय सार्वत्रिक निवडणूक झाल्या, त्यात काँग्रेस ने घवघवीत यश मिळवले आणि राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. तथापि रूढीवादी धार्मिक समूहाच्या दबावाखाली येऊन राजीव गांधींच्या काँग्रेस सरकारने शाहबानोच्या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करून तो सौम्य केला, आणि ह्या कायद्यात बदल करून घटस्फोटित महिलेला घटस्फोटानंतर केवळ ९० दिवसांपर्यंतच पोटगी द्यावी असे सांगितले. हा काँग्रेस सरकारने कायद्यात केलेला बदल महिलांच्या अधिकारासाठी लढलेल्या लढाईला मोठा झटका होता. मात्र २०१९ मधील भाजप सरकारने मुस्लिम महिला (घटस्फोटावरील हक्कांचे संरक्षण) अधिनियम हा सुधारित कायदा पारित केला. या अन्वये 'तीन तलाक' पद्धतीला 'अपराध' असे जाहीर केले, आणि देशातील सर्व मुस्लिम स्त्रियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. चित्रपटाच्या शेवटी ह्या खटल्याच्या निकालानंतरच्या घटनांचा धावत्या ओळीत उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपटाच्या शेवटी शाझिया बानो 'इकरा' म्हणजे आदेश देते आणि म्हणते 'पढ' ! म्हणजे प्रथम धार्मिक ग्रंथांचे नीट वाचन करा, ग्रंथ समजावून घ्या आणि त्याप्रमाणे चांगले जीवन जगा.

'बानो' तो बहाना है! हम पर हमला पुराना है!'
या चित्रपटात दिग्दर्शकाचं अस्तित्व कायम जाणवत रहातं. एका प्रसंगात पाठीमागील भिंतीवर 'बानो' तो बहाना है! हम पर हमला पुराना है!' हे वाक्य लिहिलेलं असतं. या वाक्यामुळे आपल्या देशातल्या अल्पसंख्यांकांच्या डोक्यातील धार्मिक, राजकीय, सामाजिक गोंधळ स्पष्ट होतो. या चित्रपटाविषयी माझ्या मनात येणारं काहीबाही लिहिताना मी हा चित्रपट किमान तीनचार वेळेला पाहिलाय. जितक्या वेळेला मी 'हक' पहिला, तितका तो मला अधिकाधिक आवडत गेला... अधिकाधिक उमजत गेला.
थांबतो!
राजीव जतकर
११ -०३ - २०२६.


