ऑपरेशन 'नेपच्यून स्पिअर' - क्रूरकर्म्याचा खातमा.
![]() |
वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला. |
मागच्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर 'अमेरिकन मॅनहंट : ओसामा बिन लादेन' हा अप्रतिम माहितीपट (डॉक्युमेंट्री) पाहण्यात आला. अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांकडून झालेल्या भीषण हल्ल्यापासून, ते तब्बल १० वर्षांनी अमेरिकेने घेतलेल्या ओसामा लादेनच्या खातम्या पर्यंतच्या घटनांची साखळी उलघडणारा हा थरारक माहितीपट अतिशय उत्कंठावर्धक आहे. नेटफ्लिक्सवर या सर्व घटनांची तीन भागात माहिती देण्यात आलेली आहे. नुकत्याच 'पेहेलगाम' वर झालेल्या दहशदवाद्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही वेब मालिका मनाला भिडते. बऱ्याचवेळेला माहितीपट किंवा डॉक्युमेंट्रीज बघायला काहीश्या कंटाळवाण्या असतात. पण ही वेबमालिका सुरवातीपासूनच मनाचा ठाव घेते.
![]() |
वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला. |
अमेरिकेने मध्यपूर्वेतील देशांवर विशेषतः इराक आणि अफगाणिस्तान या देशांवर अनेक निर्बंध घातले होते. त्यामुळे अल-कायदा ही दहशदवादी संघटना आणि संघटनेचा प्रमुख नेता 'ओसामा बिन लादेन' अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांवर नाराज होते. 'ओसामा लादेन' याने अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेवर अतिशय योजनाबद्ध पद्धतीने हल्ला करायचा ठरवला. त्यासाठी ११ सप्टेंबर २००१ हा दिवस ठरवण्यात आला. ओसामा लादेन याने त्या हल्ल्यासाठी १९ दहशदवाद्यांना निवडले. हे सर्व कट्टरपंथीय दहशदवादी आत्मसमर्पणासाठी तयार होते. या निवड झालेल्या दहशदवाद्यांनी एकाच दिवशी चार अमेरिकन प्रवासी विमानांचे अपहरण केले. पैकी अमेरिकन एअरलाईन्सचे एक विमान अतिरेक्यांनी अपहरण करून सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी न्यूयार्क येथील सुप्रसिद्ध 'वर्ल्ड ट्रेंड सेन्टर'
च्या दोन उंच इमारतींपैकी उत्तरेकडील इमारतीवर धडकवण्यात आले.
त्यानंतर १५ मिनिटांनी दुसरे अपहरण केलेले विमान दक्षिणेकडील इमारतीवर धडकवण्यात आले. अनेक व्यावसायिक कार्यालये असलेल्या या दोनीही इमारतीवर विमाने धडकल्यामुळे प्रचंड स्फोट झाले. त्यामुळे लागलेल्या आगीमुळे ह्या दोनीही इमारती पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळल्या. एकच हाहाकार झाला. गजबजलेल्या या इमारतीमधील शेकडो निरपराध नागरिक मरण पावले. इमारती कोसळल्यामुळे प्रचंड धुळीचे लोट उसळले. अमेरिकनांना हा धक्का बसतो ना बसतो तोच अर्ध्या तासाने अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील अर्लिंग्टन शहरात असलेल्या 'पॅंटॅगॉन' इमारतीवर तिसरे विमान धडकवण्यात आले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रमुख कार्यालय असलेली पॅंटॅगॉन ही इमारत अमेरिकेच्या दृष्टीने फारच महत्वाची होती. या इमारतीवर हल्ला झाल्याने जणू अमेरिकेच्या प्रतिष्ठेवरच हल्ला झाल्यासारखे झाले.
ह्या धक्क्यातून सावरेपर्यंत या हल्ल्याचा एक भाग असलेले चौथे विमान पेनसिल्व्हानिया येथील एका पॅलेस वर धडकण्या ऐवजी चुकून जवळच्या एका शेतात कोसळले. या चारही विमानांच्या अपहरकर्त्यांसहित विमानातील सर्व निरपराध प्रवासी देखील मरण पावले. एकाच दिवशी एकाच वेळी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात सुमारे ३००० निरपराध नागरिक बळी गेले.
![]() |
क्रूरकर्मा 'ओसामा बिन लादेन' |
अल-कायद्याच्या इतरही दहशदवादी कारवायांमुळे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर अल-कायदा आणि ओसामा बिन लादेन पूर्वीपासूनच होते. या ९/११ च्या हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेन याला शोधण्याची मोहीम अधिकच तीव्र करण्यात आली. सुरवातीला तालिबानी राजवट असलेल्या अफगाणिस्तान मध्ये हा ओसामा लादेन लपला असावा अशी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा कयास होता. तालिबान सरकार ओसामा लादेनला आश्रय देत असावा असे मानून अमेरिकेने तालिबान्यांना सत्तेतून दूर केले. तरी देखील हा क्रूरकर्मा ओसामा लादेन सापडत नव्हता. ९/११ च्या हल्ल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी ओसामा बिन लादेनचा सुगावा लागला. पाकिस्तानच्या इस्लामाबाद शहरापासून ३५ किलिमीटर अंतरावर असलेल्या 'एबोटाबाद' या शहराबाहेरील विरळ, लोकवस्ती असलेल्या भागात तो राहत आहे अशी खात्रीलायक बातमी समजली. मग अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने उपग्रहामार्फत त्याच्या घरावर लक्ष ठेवले. हे घर तीन माजली असून या घरात दोन तीन कुटुंबे, लहान मुले देखील राहतात असे लक्षात आले. अमेरिकेच्या उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रे आणि व्हिडीओज मार्फत ओसामाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. मात्र ओसामा घरातून फारसा बाहेर पडत नव्हता. फक्त एका मध्यस्था मार्फत हा ओसामा जगाशी संपर्क करत असे. बराच काळ ही संशयास्पद व्यक्ती ओसामा बिन लादेनच ह्याची खात्री होत नव्हती. ओसामा रोज या घराच्या आवारात फिरत असे. उपग्रहाने घेतलेल्या व्हिडिओत दिसणाऱ्या त्याच्या सावली वरून ओसामाच्या उंचीचा अंदाज घेण्यात आला. लादेन चा हा ठावठिकाणा समजल्यावर देखील अमेरिकेने त्याला पकडण्याची किंवा मारण्याची घाई केली नाही. अनेक पुरावे गोळा करून अमेरिकेने या क्रूरकर्म्याला पकडायचे किंवा ठार मारायचे ठरवले.
![]() |
ऑपरेशन नेपच्यून स्पिअर |
ऑपरेशन 'नेपच्यून स्पिअर'
अमेरिकन गुप्तचर विभाग, सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सी.आय.ए.) तसेच सर्व पक्षीय राजनैतिक अमेरिकन नेते यांच्या बरोबर सखोल चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊन अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष 'बराक ओबामा' यांनी पाकिस्तानात लपलेल्या ओसामा लादेन चा खातमा करण्यासाठी रणनीती आखली. ह्या योजनेचे नाव ठेवण्यात आले 'ऑपरेशन नेपच्यून स्पिअर.' ह्या योजनेस साठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पाकिस्तान जवळच्या अफगाणिस्तान मधील 'जलालाबाद' येथून या ऑपरेशन ची सुरवात करायची ठरली. या ऑपरेशन साठी अमेरिकन स्पेशल फोर्समधील नेव्ही सील्स च्या चोवीस धाडसी कमांडोज नेमणूक केली गेली. २ मे २०११ या दिवशी पहाटेच्या काळोख्या रात्री जलालाबाद येथून दोन हेलिकॉप्टर्स मधून हे कमांडोज निघाले. या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा, त्यांच्या मंत्रिमंडळामधील काही नेते हिलरी क्लिंटन, अँटनी ब्लिंकन, विरोधी पक्षातील ज्यो बायडन अशी काही मात्तब्बर नेते मंडळी कॉन्फरन्स रूम मध्ये तणावपूर्ण वातावरणात बसली होती. ही योजना फसली तर जगाला काय उत्तर द्यायचे? यशस्वी झाली तर पाकिस्तान व इतर देशांना काय सांगायचं याचा या बैठकीत विचार सुरु होता. या ऑपरेशन ला हिलरी क्लिंटन आणि ज्यो बायडन यांचा काहीसा विरोध होता. पण प्रखर राष्ट्रप्रेम हा एक महत्वाचा धागा ह्या सर्वांना एकत्र बांधून ठेवत होता. सर्वच जण प्रचंड मानसिक तणावाखाली होते.
![]() |
ऑपरेशन नेपच्यून स्पिअर |
मोहिमेतील 'ब्लॅक हॉक्स' ही हेलिकॉप्टर्स लादेनच्या पाकिस्तानातल्या घराजवळ जाईपर्यंत पाकिस्तानी रडार वर दिसण्याचा धोका होता. पण अमेरिकेची ही हेलिकॉप्टर्स कमी उंचीवरून नेऊन रडारवर न दिसण्याची खबरदारी अमेरिकन कमांडोज नी घेतली होती. पहाटेच्या अंधारात ही हेलिकॉप्टर्स गुपचूप लादेनच्या घरावरून घिरट्या घेऊ लागली. हेलिकॉप्टर्स मधून कमांडोज दोराच्या साहाय्याने जमिनीवर उतरले आणि प्रत्यक्ष ऑपरेशनला सुरवात झाली. समोर येणारे सर्व अडथळे पार करत कमांडोज पुढे पुढे जात होते. लादेनचा मुलगा आणि इतरही काही बायका, माणसे ठार करण्यात आली. पण लादेन कुठे होता ते समजेना. या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील एक खोलीत तो सापडला. हा लादेन आहे याची खात्री पटताच कमांडोज नी कसलाही विचार न करता क्षणार्धात गोळ्या घालून त्याला ठार केले. ओसामा ठार झाल्याची खात्री झाल्यावर कमांडोजनी ही आनंदाची बातमी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा याना कळवली आणि आणि ओबामा यांच्यासहित बैठकीतील सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. या नंतर आधीच ठरल्याप्रमाणे लादेनचा मृतदेह 'कार्ल विन्सन' या अमेरिकी युद्धनौकेवरून खोल समुद्रात दफन करण्यात आला आणि या ऑपरेशनची सांगता झाली.
![]() |
नेते मंडळी कॉन्फरन्स रूम मध्ये तणावपूर्ण वातावरणात |
अमेरिकन मॅनहंट: ओसामा बिन लादेन हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला माहितीपट केवळ तीन भागांचा असूनही तो अतिशय परिणामकारक पद्धतीने सादर करण्यात आला आहे. हा माहितीपट कुठेही अतिरंजित किंवा नाटकी वाटत नाही. सी.आय.ए. च्या अधिकाऱ्यांच्या तसेच काही कमांडोज यांच्या प्रत्यक्ष मुलाखती या माहितीपटाला थरारक बनवतात. सर्व घटनांचे दुर्मिळ व्हिडीओचे फुटेज या मालिकेत दाखवलेले असल्यामुळे ही मालिका खूप वास्तववादी होते. ओसामा लादेनला शोधण्यासाठी अमेरिकेने केलेल्या तपशीलवार माहिती ही मालिका आपल्याला दाखवते. अल-कायदा ने केलेले अमेरिकेवरील हल्ले पाहून व्यथित झालेले आपण न कळत लादेनच्या शोध प्रक्रियेमध्ये गुंतून जातो. लादेन चा प्रत्यक्ष खातमा होताना ऑपरेशन नेपच्यून स्पिअर चा आपण एक भाग होऊन जातो. हा माहितीपट पहाताना माझ्या मनात अमेरिकेचे ऑपरेशन नेपच्यून स्पिअर आणि भारताचे ऑप्टेशन सिंदूर यांची न कळत तुलना होत होती. अमेरिकेतील विरोधी पक्षाचे 'ज्यो बायडेन' यांचा या मोहिमेला विरोध होता तसेच 'हिलरी क्लिंटन' यांच्या सहीत अनेक नेत्यांच्या मनात या ऑपरेशन बद्दल अनेक शंका होत्या. मात्र प्रत्यक्ष ऑपरेशन सुरु झाल्यावर सर्व नेतेमंडळी 'राष्ट्रप्रेम सर्वोतपरी' मानून एकत्रितपणे हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागले. अशा प्रकारच्या भारतीय मोहिमेत मात्र अनेक विरोधी नेते मोहिमेच्या यशस्वीततेबद्दल सरकारला पुरावे मागतात, अनेक प्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडतात. असो...
हा माहितीपट इतिहासप्रेमी, देशप्रेमी आणि सत्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. दहशदवाद ही केवळ एका देशापुरती मर्यादित समस्या नाही, ती संपूर्ण जगासाठी असलेलं एक संकट आहे. ही मालिका अमेरिकेची शौर्यगाथा तर सांगतेच, पण जगालाही सतर्कतेचा इशाराही देते.
राजीव जतकर
२७ मे २०२५.