'कटहल'
(छोटी कथा-बडा धमाका)
![]() |
'कटहल' बोले तो 'फणस ' |
कोणत्याही
चित्रपट निर्मितीमध्ये कथेचं महत्व अनन्यसाधारण असतं. वेगवेगळ्या विषयावरील कथा हुडकून
किंवा रचून त्या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केल्या जातात. कथेमध्ये नाट्यपूर्ण घटना
असणे, कथेचा शेवट अनपेक्षित वळणाने होणे, अशा गोष्टींनी कथा, आणि त्या कथेवर आधारित
असलेला चित्रपट प्रेक्षणीय करणे वगैरे, हे कथाकार, दिग्दर्शक वगैरे मंडळी करत असतात.
चित्रपटासाठी कथा जशीच्या तशी चित्रित करता येत नाही, त्यासाठी कथेला अनुसरून पटकथा
तयार करावी लागते. काही कथा खूप छोट्या असतात. अशा लघुकथांवरून चित्रपट तयार करताना
त्यात बरीच भर घालावी लागते. बऱ्याच वेळेला काही उपकथानकांची देखील जोड ह्या चित्रपटाच्या
मूळ कथेला बेमालूमपणे द्यावी लागते. त्यामुळे पुष्कळदा मूळ कथेचा लेखक आणि पटकथा लेखक
वेगवेगळे असतात. त्या व्यतिरिक्त पटकथा तयार
होताना कथेला अनुसरून संवादलेखन आणि गाण्यांची पेरणी करून चित्रपटाला उठाव दिला जातो.
संवादलेखक आणि गीतकार हे देखील वेगळे असतात. मात्र काही प्रतिभावान लेखक कथा, पटकथा,
संवाद, एवढेच काय पण गीत लेखक म्हणून देखील भूमिका लिलया निभावताना दिसतात. ह्याचे
उत्तम उदाहरण म्हणून ग.दि. माडगूळकर ह्यांचे नाव घेता येईल. सुमारे सत्तर ऐंशी चित्रपटांसाठी
त्यांनी अशा प्रकारचे चौफेर लेखन केलं आहे. दादा कोंडके हे देखील असेच हरहुन्नरी, चौफेर
कलाकार होते.
![]() |
पत्रकाराच्या भूमिकेत 'राजपाल यादव' |
मला
कथाकारांमध्ये असलेली आश्चर्यकारक प्रतिभा नेहेमीच थक्क करत आलेली आहे. कथा म्हणजे
अनेक घटनांची मालिका असते. छोट्या कथेतील घटनांची मालिका बऱ्याच वेळी आपण वन लायनर
पद्धतीने सांगू शकतो. पण अशा संक्षिप्त स्वरूपातील कथा अगदीच कंटाळवाणी होऊ शकते. पूर्ण
लांबीचा चित्रपट करताना अश्या वेगळ्या लघु कथा किंवा वन लायनर कथा अनेक पद्धतीने फुलवाव्या
लागतात. कथेच्या अनुषंगाने कथेमध्ये काही इतरही पात्रांची रचना केली जाते. मग या पात्रांची
स्वभाव वैशिष्ठ्ये, या पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारे संघर्ष, भोवतालचे
सामाजिक वातावरण दाखवत कथा करमणूकप्रधान केली जाते. कधी ही कथा विनोदी पद्धतीने, कधी
रहस्यमय अंगाने,तर कधी कधी प्रेक्षकांच्या भावनेला हात घालत सादर केली जाते. कथेत सतत
'पुढे काय होणार? अशी चित्रपट रसिकांना उत्कंठा वाटायला लावताना लेखकाचे कौशल्य पणाला
लागते. चित्रपट निर्मितीतून कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे खूपच कठीण काम असते.
पण हे काम कथाकार, दिग्दर्शक मंडळी सहजपणे करत असतात.
मुळात
कथाकारांना वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा सुचतातच कशा? ह्याचं मला नेहेमीच आश्चर्य वाटत
आलंय. काही मजेशीर कथांचे उदाहरण इथे देता येईल. कथालेखक 'शंतनू श्रीवास्तव', पटकथा
आणि संवाद लेखक 'अक्षत घलडियाल' यांचा 'बधाई हो' हा चित्रपट कुटुंबातील मध्यमवयीन व्यक्तीच्या
लैंगिक जीवनावर उघडपणे भाष्य करतो. या कुटुंबातील पन्नाशीतील जोडप्याच्या जीवनात 'गुड
न्यूज' येते आणि या कुटुंबाचे विश्वच बदलून जाते. एरवी गुड न्यूज म्हणलं की कुटुंबात
चैतन्याने बाहेरून येणं अपेक्षित असते, पण पन्नाशीतील आई गरोदर राहिल्यामुळे संपूर्ण
कुटुंब अतिशय लाजिरवाण्या परिस्थितीत येऊन ठेपते. खरं तर ह्या चित्रपटाचा विषय मध्यमवर्गीय
कुटुंबाची भावनिक आणि सामाजिक गळचेपी मांडणारा आणि गंभीर आहे. पण ह्या कुटुंबाची ह्या
गुडन्यूज मुळे झालेली लाजिरवाणी परिस्थिती विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. भारतीय
समाजात लैंगिक संबंध किंवा प्रेमभावना या बद्दल खुलेपणाने चर्चा होत नाही. त्यातच जास्ती
वयाच्या दाम्पत्यांनी प्रेम करणे असभ्यपणाचे मानले जाते. आईला देवासमान मानणारा आपला
समाज हे विसरून जातो की, पन्नाशीतली आपली आई ही देखील एक स्त्री आहे. तिला देखील भावना
आहेत. 'पन्नाशीतील आई वडिलांनी मूल जन्माला घालणे ह्यात शरमेची बाब मुळीच नाही' हा
विचार चित्रपटाच्या कथाकाराने, पट्कथाकाराने, संवाद लेखकाने खूप ताकदीने मांडला आहे.
अतिशय सध्या, छोट्या कथेची मांडणी या चित्रपटाच्या सर्वच कलाकारांनी अप्रतिमपणे सादर
केली आहे. हा गंभीर विषयावरचा हलक्याफुलक्या
विनोदी पद्धतीने चित्रित केलेला चित्रपट पाहण्यासारखा आहे.
![]() |
चोरीला गेलेल्या फणसाच्या झाडाकडे बघणारा आमदार व त्याचे कुटुंबीय |
छोटी
कथा, त्यात बेमालूमपणे विरघळणाऱ्या उपकथा, खुसखुशीत संवाद लेखन यांच्या अप्रतिम मिश्रणातून
तयार झालेला 'लापता लेडीज' या चित्रपटाचं उदाहरण देखील या निमित्तानं देता येईल. या
चित्रपटाची कथा देखील दोनचार ओळीत सांगण्यासारखी आहे. नुकताच लग्न झालेला नवरदेव आपल्या
रिवाजाप्रमाणे डोक्यावरून पदर घेतलेल्या बायकोला घेऊन गावाकडच्या घरी येतो. येताना
रेल्वे प्रवासादरम्यान दोन घुंघट घेतलेल्या नववधूची अदलाबदली होते. गावाकडील कुटुंबातील
सर्वजण आनंदित असतात. पण आपण जीला बायको म्हणून घरी आणलाय ती आपली बायकोच नाही, वेगळीच
कुणीतरी आहे, असं जेंव्हा या नवरोबाला कळतं तेंव्हा एकच गोंधळ उडतो. पुढे या धमाल कथेत
एखाद दुसरे उपकथानक मिसळून एक धमाल आणि आश्चर्यकारक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो.
संवादातून हा चित्रपट आपल्याला खळखळून हसवतो तर काही प्रसंगी आपल्या डोळ्याच्या कडा
देखील पाणावतात. अशा उत्तम कथांनी सजलेल्या अनेक चित्रपटांची इथं मोठी यादीच देता येईल.
टॉम हंक चा 'बिग' नावाचा इंग्रजी चित्रपट देखील
अशाच अफाट कथेचा! कथा खूपच छोटी! लहानपणाला कंटाळलेल्या छोट्या 'जॉश' ला मोठं व्हायचं
असतं आणि एकदा चमत्कार घडतो आणि तो चक्क मोठा होतो. मग पुढे घडणाऱ्या गंमतीजमतींवर
आधारित हा चित्रपट अनेक वळणे घेत पुढे जातो. बिग हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला
होता. गॅरी रॉस आणि ऍना स्पीलबर्ग या द्वयीने बिग ची कथा लिहिली होती. केवळ १८ दशलक्ष
डॉलर्स इतक्या उत्पादनखर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरातून तब्बल १५० दशलक्ष
डॉलर्स ची कमाई केली होती. सध्या, सोप्या आणि एका वाक्यात सांगता येण्यासारख्या कथेचे
मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांचा
'एक कप च्या' हा अप्रतिम चित्रपट! चित्रपटाची कथा सांगायची झाली तर खेडेगावातील एका
गरीब कुटुंबाला अचानक एकदा ७३ हजार रुपयांचे वीजबिल येते आणि ते संपूर्ण कुटुंब अक्षरशः
कोलमडून पडते. मग या प्रचंड आलेल्या या वीजबिलाच्या तक्रारीवर न्याय मिळवण्यासाठी या
कुटुंबाला काय काय अडचणी येतात याचं सुरेख आणि वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात केलं
गेलंय. छोट्या कथेच्या माध्यमातून करमणुकीबरोबरच समाजातील भ्रष्टाचार आणि कायद्याबद्दल
जागरूकता निर्माण करण्याचं महत्वाचं काम हा चित्रपट करतो.
![]() |
पोलीस इन्स्पेक्टर महिमा आणि तिचे सहकारी. |
'कटहल' नावाचा अश्याच छोट्या कथेचा एक सुंदर चित्रपट
नुकताच माझ्या पाहण्यात आला. कथा दोनतीन ओळीत सांगण्यासारखी, पण हा चित्रपट सुमारे
दोन तास आपले मस्त मनोरंजन करतो. 'कटहल' म्हणजे फणस. तर होतं असं की उत्तरप्रदेशातील
मोबा नावाच्या गावातील एका आमदाराच्या बंगल्यातल्या झाडावरून दोन भले मोठे फणस चोरीला
जातात. ते शोधण्यासाठी हा आमदार पोलीस ठाण्यात फणसाच्या चोरीची तक्रार नोंदवतो. पोलिसांकडून
होणाऱ्या या चोरीला गेलेल्या फणसाच्या शोधकार्याची धमाल या चित्रपटात अतिशय मनोरंजक
पद्धतीने मांडली आहे. या आमदाराच्या घरी एकदा त्याच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते जेवायला
आलेले असतात. जेवताना आमदाराच्या बायकोने वाढलेले फणसाचे लोणचे त्यांना फारच आवडते.
वरिष्ठ या फणसाच्या लोणच्याची मागणी करून लोणचे पाठवले तर आमदाराला बढती देण्याचे आणि
महत्वाच्या खात्याचा मंत्री बनवण्याचे आश्वासन देतात. ह्या घटनेनंतर आमदाराच्या बंगल्यातल्या
झाडावरचे दोन फणस चोरीला जातात. मोठ्या आणि महत्वाच्या खात्याचा मंत्री होण्याच्या
या आमदाराच्या महत्वाकांक्षेला खीळ बसते. मग आमदार पोलीस चौकीत जाऊन एफआयआर दाखल करून
पोलीस यंत्रणेला कमला लावतात. आता हे चोरीला गेलेले दोन फणस हुडकायचे कसे? असा प्रश्न
पोलिसांना पडतो. राजकीय दबावामुळे पोलिसही बिचारे तपासाच्या कामाला लागतात. पोलिसांच्या
फणसाच्या तपासकार्याच्या कथेत एक ट्विस्ट येतो. गावातली एक गरीब मुलगी बेपत्ता असल्याचं
समोर येतं. 'फणसाची चोरी कुणी केली असावी?' या गोंधळात पडलेली पोलीस इन्स्पेक्टर महिमा
(सान्या मल्होत्रा) फणसाच्या चोरीचा संबंध या बेपत्ता मुलीशी असावा अश्या विचाराने
पुढचा तपास सुरु ठेवते. पुढे फणसाची चोरी सापडते का? हे समजण्यासाठी चित्रपट बघण्यात
मजा आहे.
![]() |
पोलीस इन्स्पेक्टर महिमा आणि तिचे सहकारी. |
'अशोक मिश्रा' यांच्या कथेवरील हा चित्रपट अतिशय हलक्याफुलक्या आणि विनोदी पद्धतीने चित्रित करण्यात आलाय. कटहल हा चित्रपट छोटी गोष्ट मनोरंजक पद्धतीने सांगताना समाजातील जातिव्यवस्थेवर भाष्य करतो. आमदाराच्या घराच्या फणसाच्या चोरीची गंभीरपणे दखल घेणारे पोलीस खाते एका गरीब बेपत्ता झालेल्या मुलीच्या बापाच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करते, या सामाजिक वास्तवाकडे हा चित्रपट लक्ष वेधून घेतो. सुमारे दोन तासांचा हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत कथेत गुंतवून ठेवतो. पोलीस इन्स्पेक्टर महिमा ची भूमिका साकारणाऱ्या 'सान्या मल्होत्रा'ने तीचं काम समरसून केलंय. तिने चित्रपटासाठी घेतलेली मेहेनत चित्रपट बघताना जाणवते. विजयराज ह्या जबरदस्त अभिनेत्याची आमदाराची भूमिका खूपच दमदार आहे. राजपाल यादव ने साकारलेला पत्रकार चित्रपटात धमाल उडवून देतो. अनंत जोशी, विजेंद्र काला, रघुवीर यादव हे अनुभवी अभिनेते चित्रपट मनोरंजक करण्यात मोठा हातभार लावतात. कटहलच्या छोट्या कथेचं सोनं करण्यात दिग्दर्शक 'यशोवर्धन मिश्रा' कमालीचे यशस्वी झालेले आहेत. त्यांनी विनोदाच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थेवर उपहासात्मक भाष्य केलंय. मुलींना समाजात मिळणारं दुय्यम स्थान, जातीय विषमता, मुलापेक्षा मुल्गी मोठ्या पदावर असल्यास त्यांच्या लग्नाला घरच्यांचा असलेला विरोध अशा अनेक विषयांना कथेच्या ओघात न कळत हात घातला जातो. चित्रपटाचा शेवट अपेक्षित असला तरी चित्रपटाचं सादरीकरण अफाट आहे. हा उत्तम चित्रपट तयार होताना अर्थातच काही त्रुटी राहिलेल्या आहेत. तथापि एका छोट्या कथेची गंमत अनुभवायची असेल तर त्रुटींकडे दुर्ल्क्षच करायला हवं. संपूर्ण कुटुंबासोबत एखाद्या विकेंडला आरामात बसून बघण्यासारखा हा चित्रपट एन्जॉय करायला हरकत नाही.
हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.
राजीव जतकर.
१
जानेवारी २०२५.