‘कच्छ’ नही देखा तो कुछ नही देखा
![]() |
कच्छचे रण |
सध्या हर्षवर्धन आणि अनुजा
एका महिन्यासाठी पुण्यात घरी आलेले आहेत. वर्ष दोन वर्षांनी मुले जेव्हा लंडन मधुन
पुण्यात घरी रहायला येतात तेव्हा एक प्रकारचे धमाल, आनंदी वातावरण असते. पण ह्या वेळी
घरी येऊन देखील त्यांचे ऑनलाइन ऑफिस सुरुच होते. ऑफिसचे काम, काही नातेवाईकांच्या,
मित्रांच्या भेटीगाठी यामध्ये ते घरी असुन देखील आमच्या वाट्याला फारसे येत नव्हते.
पण अर्थात त्याला इलाज नसतो. 'मुले घरी आली एवढ्यावर समाधान मानायला हवे' असा मनात
विचार येत असताना हर्षवर्धन, अनुजा म्हणाले "आपण चौघेच कुठेतरी ट्रिपला जाउयात
का? म्हणजे आपल्याला एकमेकांना नक्की वेळ देता येईल. आमच्या मनात गुजरात मधील कच्छच्या
वाळवंटात जायचे आहे. आपण जाउयात का?" आम्हा दोघांना तसे फिरायला आवडतेच. पण नुकतेच
आम्ही 'व्हिएतनाम' ला जाऊन आलो होतो. शिवाय दोन महीन्यांनी आम्ही पंजाबची ट्रीप देखील
नक्की करुन त्याचे पैसे ही भरले होते. त्यामुळे लागोपाट ट्रीप चा धडाका चालुच होता.
शिवाय आमच्या 'बकेटलिस्ट मधील गुजरात बरेच बघुन झाले होते. आता पुन्हा गुजरात? मी विचारात
पडलो. मनात विचार आला ' काय आहे कच्छ मधे बघण्यासारखे? ' अनुजाने मला तिथल्या संस्कृती
बद्दल, कच्छच्या जवळ असलेल्या मिठाच्या वाळवंटाबद्दल थोडीफार माहिती दिली. मग मात्र
माझी उत्सुकता ताणली गेली. आणि आम्ही चौघांनी गुजरात मधील कच्छ वाळवंट बघण्यासाठी तयारीला
लागलो. आमच्या बकेटलिस्ट मधील पंजाबची चिठ्ठी सोडून बाकी सर्व ठिकाणांच्या चिठ्ठयांमध्ये
अस्वस्थता पसरली. आता हे 'कच्छ' कुठुन आमच्या मध्ये आलं? असंच त्यांच्या मनात असणार.
मी अर्थात सर्व ठिकाणांच्या चिठ्ठयांची कशीबशी समजुत घालुन त्यांना शांत केले. 'गो-अराउंड'
च्या मृणाल जोशींना फोन करून कच्छ ट्रीप बद्दल चर्चा केली. सर्व ट्रीपची आखणी करुन
मृणाल जोशी यांनी आमची विमानाची, हॉटेल्सची बुकींग करुन टाकली.
तशी मी भारतातील, परदेशातील अनेक ठिकाणे पाहीलेली आहेत. भारतातील केरळ, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यातील अनेक ठिकाणे आम्ही पाहिलेली आहेत. आता पंजाबला ही जाणार आहोत. पण गुजरात राज्यातील कच्छच्या आखातातील प्रदेशाबद्दल मी कधीही काहीही ऐकले नव्हते. गुजरातमधील देखील बराच भाग पाहिला होता. पण कच्छ राहीले होते. खरं तर कच्छ बद्दल मला माहीती देखील नव्हती. त्यामुळे सुरवातीला मी या ठिकाणाबद्दल जरा साशंकच होतो. पण कच्छला जाउन आल्यावर कच्छ बद्दल माझे मत पुर्ण बदलले. आणि ‘इतके दिवस कच्छ का पाहीले नाही?’ असा विचार मनात येउन गेला.
![]() |
हिमालय |
भौगोलीक, सांस्कृतीक, भाषा, खाद्यपदार्थ, हवामान अशा सर्वच बाबतीत कमालीची विवीधता असलेला असा आपला भारत देश आहे. भौगोलीक दृष्ट्या आपल्या भारतात थरचे वाळवंट देखील आहे, चेरापुंजी सारखा जगात सर्वात जास्त पाऊस पडणारा भाग देखील आहे. उत्तरेला हिमालयासारखा जगात उंच पर्वत आहे, जिथे हिमवर्षाव होतो तर दक्षिणेला विस्तीर्ण असा सागर किनारा लाभला आहे. भारतात नैसर्गिक, भौगोलिक बरीच आश्चर्ये आहेत. जगातील सर्वात उंच असा हिमालय पर्वत आहे, आणि हा हिमालय पर्वत अगदी अलीकडच्या काळात म्हणजे सुमारे फक्त ३० लाख वर्षांपूर्वी निर्माण झाल्यामुळे त्याला 'सर्वात तरुण पर्वत' असेही संबोधता येईल. भारतात सर्वात मोठे खारफुटीचे वन किंवा जंगल, पश्चिम बंगाल मध्ये असून गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आहे. या तिन्हीही नद्या बंगालच्या उपसागरात जिथे मिळतात तिथे हे खारफुटीचे जंगल तयार झालेले आहे. हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल मानले जाते. राजस्थानातील सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खारट सरोवर आहे. राजस्थानातील शुद्ध मिठाच्या उत्पादनाचा हा सर्वात मोठा स्रोत आहे. हे खारट सरोवर देखील एक भौगोलिक आश्चर्यच आहे. ह्या सांबर सरोवराच्या अगदी उलट म्हणजे भारतातील शुद्ध, गोड पाण्याचे सरोवर काश्मीर मध्ये आहे, जे दक्षिण आशियातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
![]() |
भारत आणि श्रीलंका यांच्या मधील प्राचीन 'रामसेतू' |
भारताच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यापर्यंत खडकांनी बांधलेला एक सेतू किंवा पूल आहे. हा पूल प्रभू श्री रामाने आणि त्याच्या वानर सेनेने बांधला होता अशी आख्यायिका आहे. ३० मैलापेक्षा अधिक लांबीचा हा पूल असून तो मानव निर्मित असला तरीही येथील भौगोलिक परिस्थिती पूल बांधण्यासाठी पूरक आहे. या भागातील समुद्र तळ खूपच उथळ आहे. भारतातील अशा अनेक आश्चर्यांपैकी गुजरात मधील कच्छच्या रणाचा देखील या यादीत समावेश करता येईल आणि हे आश्चर्यजनक ठिकाण बघण्यासाठी आम्ही निघालो होतो. गुजरात मधील कच्छच्या आखातात पांढऱ्या शुभ्र मिठाचे वाळवंट आहे. अशा ह्या सांस्कृतीक आणि भौगोलीक आश्चर्य असलेल्या गुजरात मधील कच्छ मध्ये जाण्याची उत्सुकता आम्हाला होती.
![]() |
कच्छ चे रण |
कंटाळवाणा प्रवास आणि L.L.D.C.
आम्ही चौघे ही (मी, अलका, हर्षवर्धन आणि अनुजा) पुण्याहुन अहमदाबादला दि. १३ फेब्रु २०२४ ला पहाटे विमानाने निघालो. सुमारे दीड तासाने आम्ही अहमदाबाद विमान तळावर पोहोचलो. विमानतळा बाहेर आमच्या इनोव्हा कारचा ड्रॉयव्हर 'घनश्याम' आमची वाटच बघत होता. एअरपोर्ट वरुन आम्ही फ्रेश होण्यासाठी 'लेमन ट्री प्रिमियर' नावाच्या एका अलीशान हॉटेल मधे आलो. तिथेच छानसा नाश्ता केला, आणि कच्छ मधील भुज च्या दिशेने प्रवास सुरु केला. आमची इनोव्हा कार जवळपास नवीनच होती. ड्रॉयव्हर घनश्याम वयाने तरुण आणि गप्पीष्ट होता. वाटेत त्याने गुजरात राज्यातील भौगोलीक, सामाजीक परिस्थीतीवर त्याच्या आवाक्यानुसार माहिती सांगितली. आमचा हा प्रवास तब्बल आठ तासांचा होता. शिवाय कच्छ हा वाळवंटी रुक्ष प्रदेश, वाटेत चढउतार, डोंगर, झाडे वगैरे नसल्यामुळे प्रवास फारच कंटाळवाणा होता. हर्षवर्धन,अनुजा,अलका आर्ध्यापाउण तासातच झोपुन गेले. मला प्रवासादरम्यान गाडीत अजीबात झोप येत नसल्यामुळे घनश्याम ड्रॉयव्हर बरोबर गप्पा मारणे हाच काय तो विरंगुळा होता. रस्ता देखील सरळसोट होता. त्यामुळे ड्रॉयव्हर बरोबर गप्पा मारुन त्याला झोप न येउ देणे हा देखील उद्देश साध्य होत होता.
L.L.D.C. संग्रहालय:
![]() |
लिव्हींग अँड लर्निग डिझायनींग सेंटर |
खरे तर आज आम्हाला कुठलेही पर्यटन स्थळ बघायचा कार्यक्रम नव्हता. थेट होडका गावातल्या आमच्या 'शाम ए सरहद' नावाच्या रिझॉर्ट मध्ये जाउन मुक्काम करायचा होता. मग आम्ही विचार केला की आजचा दिवस का वाया घालवायचा? वाटेतच असलेल्या LLDC (लिव्हींग अँड लर्निग डिझायनींग सेंटर) या कला संग्रहालयाला भेट देऊन उशिराने मुक्कामाला जावे असे ठरले. अर्थातच हा सल्ला आमच्या घनश्याम ड्रॉयव्हरनेच दिला होता. अहमदाबाद ते भुज हे सुमारे ३३० कि.मी. चे अंतर कापुन पार करुन आम्ही तीनच्या सुमारास भुज ह्या कच्छ मधील एका प्रमुख शहरात आलो. पुढे भुज पासुन जवळच म्हणजे १५ कि.मी. अंतरावर असलेल्या 'अजरखपूर' या गावाजवळच्या LLDC या संग्रहालय संकुलात आलो. या कला संकुलाची अप्रतिम आणि कलात्मक इमारत बघुन आर्किटेक्ट असलेलेले माझा मुलगा आणि सुन प्रथम दर्शनीच प्रेमातच पडले. या प्रदर्शनाच्या इमारतीत गेल्यावर एका हसतमुख तरुणाने आमचे स्वागत केले. आमची आपुलकीने चौकशी करुन आम्हाला ह्या संग्रहालयाची माहिती सांगू लागला..
२००१ मधे कच्छ भागात झालेले विनाशकारी भुकंपामुळे या भागातील जनजीवन उध्वस्त झाले. या भुकंपाचे परीणाम विविध प्रकारचे होते. येथील लोकांची उपजीविकेची साधने नष्ट झाली.
संपुर्ण प्रदेशातील लोकांची निवासस्थाने नष्ट झाली. भुकंपानंतर संपुर्ण जगभरातून मदतीचा विलक्षण ओघ सुरु झाला. सरकारी यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात कर सवलती देउन मदतीचा हात पुढे केला. या आपत्तीच्या पार्श्वभुमीवर 'चंदा श्रॉफ' यांच्या नेतृत्वाखाली कच्छ मधील ' श्रुजन' या स्वयंसेवी सामाजिक संस्थेने स्थानीक लोकांचे जीवन पुर्ववत कारण्यासाठी अनेक पातळ्यांवर पुढाकार घेउन काम सुरु केले. या कामातील एक म्हणजे हे L.L.D.C. संग्रहालय.
कच्छ मधील अजरखपुर नावाच्या गावाजवळ हे संग्रहालय तब्बल आठ एकरात वसले आहे. ह्या संग्रहालयाची वास्तु सुमारे १, २ लाख स्क्वे. फुटांची असुन ह्या प्रकल्पाचे काम २०१५ मधे पुर्ण झाले. उदय अंधारे, आणि मौसमी अंधारे हे प्रकल्पाचे वास्तु विशारद आहेत. LLDC हे या भागातील पुरातन काळापासुन चालत आलेल्या कलाकुसरी चे जतन करणे त्यांचा प्रसार करणे यासाठी निर्माण केले गेले आहे. या कला संकुलात भूतकाळातील वैभवाचे जतन तर केले जातेच, शिवाय वर्तमान काळातील आजच्या अस्तित्वात असलेल्या कारागीरांना व्यवसायाची संधी देखील दिली जाते. त्यांच्या सर्जनशीलतेचा देखील इथे गौरव केला जातो. कुठल्याही कलेचा पाया असतो तो म्हणजे त्या कलात्मक रचनेचा किंवा त्याच्या आविष्काराचा आराखडा किंवा डिझाईन! त्यामुळे विविध कलांच्या अविष्काराचे डिझाइन मधे नाविन्य आणण्याचे कसब, वृत्ती या भागातील कलाकारांमधे निर्माण करण्याचे किंवा जोपासण्याचे काम या कला संकुलात केले जाते. त्यामुळे नाविन्यपुर्ण डिझाइन्स ची इथे निर्मिती सातत्याने केली जाते. या प्रकल्पाचा दुसरा महत्वाचा हेतू म्हणजे नवोदितांना कला शिकवणे. L.L.D.C. हे एक महत्वाचे कलेचे शैक्षणिक केंद्र बनले आहे. येथे सर्व प्रकारच्या हस्तकला शिकवल्या जातात. कच्छ भागात अनेक समुदाय वास्तव्यास आहेत. प्रत्येक समुदायांच्या कला वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या कला अनेक समुदायातील कलाकारांना इथे शिकता येतात. या कला संग्रहालयात येथील स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेची विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान दिले जाते. आता स्थानिक बाजारपेठे बरोबर जागतिक बाजारपेठेची देखील माहिती दिली जाते. या कला संग्रहालयात एम्ब्रॉयडरी, भरतकाम वगैरे वैशिष्ट्यपूर्ण पारंपारीक कलाकुसर केलेले कलाकृतींचे नमुने ठेवलेले आहेत.
या संग्रहालयातील निरनिराळ्या दालनातून फिरताना अनेक स्थानिक कलाकृतींचे दर्शन होते. कपड्यावरील प्राचीन मुद्रणकला, एम्ब्रॉयडरी, भरतकाम, कॉपर किंवा विविध धातूंपासून बनवलेल्या घंटा, वाद्ये, शिल्पकला, निरनिराळे दागिने इत्यादी प्राचीन कलाकृती इथे बघायला मिळतात. इथे चारपाच ठिकाणी या भागातील पारंपरिक संगीत, लोकगीते, लोकनृत्ये यांचे दृक्श्राव्य माध्यमातील (व्हिडीओज) कार्यक्रम दाखवले जातात. इथल्या लोकांची डोक्याला बांधायची पारंपरिक पगडी किंवा फेटा बांधण्याचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओ देखील इथे दाखवला जातो. तसेच वैशिष्ठ्यपूर्ण कलाकुसर केलेल्या वस्तू जसे कोरीवकाम केलेली लाकडी बैलगाडी, पालखी, लहान मुलांचे पाळणे, उंट किंवा बैलांना सजवण्यासाठी तयार केलेली झूल बघताना आम्हाला वेळेचे भानच उरले नव्हते. हे संग्रहालय बघताना कच्छ मधील पारंपरिक संगीत सातत्याने कानावर पडत असल्याने इथे एक वेगळाच माहोल तयार झाला होता.
हे संग्रहालय बघताना आमचे एक
दोन तास कसे गेले ते समजलेच नाही. मुख्य इमारतीच्या बाहेर पडल्यावर इथल्या एका छोटेखानी
उपाहारगृहात आम्ही थोडे खाल्ले, चहा देखील घेतला. संग्रहालयाबाहेर एक सुमारे शंभर सव्वाशे
आसनांची व्यवस्था असलेले सभागृह (Auditorium) देखील आहे. कलेसंबंधीत चर्चा, सुसज्ज
कार्यशाळा, विविध कार्यक्रम येथे होतात. त्यापलीकडेच एक छोटी सुसज्ज कॉन्फरन्स रुम
देखील दिसली. आमच्या सारख्या पर्यटकांसाठी इथे शॉपिंग करण्यासाठी दुकाने देखील होती.
त्यामधे आम्ही 'अजरख' शैलीत प्रिंटींग केलेले बेडशीट, एम्ब्रॉयडरी केलेल्या दोन सुरेख
पिशव्या अशी काहीबाही खरेदी केली. अलका आणि अनुजा यांच्या ट्रिपच्या पहिल्याच दिवशी
दिसलेल्या खरेदीतील उत्साहाने, मला ट्रिप मधील पुढील ४/५ दिवसात माझ्या खिशावर येणाऱ्या
संकटाची जाणीव झाली.
एव्हाना संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले होते. आमचा प्रवास अजुन संपला नव्हता. अजुन सुमारे पंन्नास साठ कि. मी. अंतरावर असलेल्या होडका नावाच्या छोट्या गावातील रिझॉर्ट मधे
मुक्कामाला जायचे होते. पुन्हा कंटाळवाणा प्रवास सुरु झाला. संध्याकाळी आमच्या 'शाम ए सरहद' ह्या रिझॉर्ट मधे आम्ही पोहोचले. हे रिझॉर्ट बघून आम्ही थक्क झालो. पुढील चार दिवस आमचा मुक्काम ह्या भन्नाट रिझॉर्ट मधे असणार होता. खूप धमाल येणार होती.
दिवस दुसरा
प्राचीन धोलावीरा आणि
फॉसील पार्क
पारंपारीक 'भुंगा' घरे
आम्ही 'होडका' गावात ज्या रिझॉर्ट
मधे पुढील तीन चार दिवस राहणार होतो ते 'शाम ए सरहद' रिझॉर्ट कमालीचे सुंदर होते. काल
आम्ही रात्री येथे पोहोचल्यामुळे रिझॉर्टचा अंदाज आला नव्हता. सवयीप्रमाणे सकाळी साडेपाच
सहालाच जाग आली होती. आमच्या कॉटेजच्या बाहेर आलो. सगळीकडे शुकशुकाट होता. वातावरणात
खुप थंडी होती. पक्षांचा चिवचिवाट सुरु झाला होता. चहा मिळतो का ते बघण्यासाठी रिझॉर्टच्या
डायनींग हॉल कडे आलो. रिझॉर्टमधील कामगार मंडळी अजुन झोपलेलीच होती. मग माझ्या कॉटेजच्या
बाहेरील मातीच्या कट्ट्यावर बसुन तिथलं वातावरण अनुभवु लागलो. सकाळी सातच्या सुमारास
रिझॉर्ट मधील 'रमझान' नावाचा एक तरुण वेटर माझ्यासाठी मातीच्या भांडयातुन गरम गरम चहा
घेऊन आला. चहाचे घुटके घेत मी रमझान बरोबर गप्पा मारु लागलो. रमझान अतिशय नम्र आणि
काहीसा लाजाळु होता. गप्पा मारता मारता तो या रिझॉर्टची आणि इथल्या वैशिष्ट्यपूर्ण
घराची माहीती सांगु लागला....
कच्छ मधील पारंपरिक गोलाकार
घरांना भुंगा असे म्हणतात. ही घरे चिकणमाती, बांबू लाकूड वगैरे स्थानिक उपलब्ध सामान
वापरून बनवलेली असतात. दगडाच्या गोलाकार प्लिंथवर मातीच्या भिंती आणि त्यावर गोलाकार
शंकूसारखे वर निमुळते होत जाणारे लाकडी छत असते. भिंतीवर असलेल्या लाकडी फ्रेम्स पासून
बनवलेल्या छोट्या खिडक्या या घरातील हवा खेळती ठेवतात. उन्हाळ्यातील तीव्र सूर्य प्रकाशात
ही घरे थंड राहतात. त्याच प्रमाणे रात्रीच्या वेळी हीच घरे उबदार राहतात. लाकडी छतावर
वाळलेल्या गवताचे अच्छादन घातलेले असते. ही घरे इथल्या वाळवंटी वातावरणात वाळूच्या
वादळात, चक्री वाऱ्यात देखील सुरक्षित राहतात. कच्छ हा कायमच भूकंप ग्रस्त असलेला प्रदेश
आहे. 'भुंगा ' घरांची रचना भूकंपापासून संरक्षण देते. भूकंपात ही घरे त्याच्या गोलाकार
रचनेमुळे सुरक्षीत राहतात. या घरांमधील हलक्या बांधकाम साहित्यामुळे भूकंपात ही घरे
पडली तरी जीवीत हानी होत नाही. या घरातील भिंतीच्या आतील आणि बाहेरील भाग मातीने अधून
मधून सारवला जातो. रिसॉर्ट मधील कॉटेजेस सुद्धा मातीने सारवलेली होती. या सारावण्याच्या
प्रक्रियेला लिंपन असे म्हणतात. या भिंती रंगी बेरंगी, सुंदर पेंटिंग्जने सजवलेली असतात.
या पेंटिंग्ज मध्ये काचेचे तुकडे देखील इथे पारंपारीक पद्धतीने लावून सजवलेली जातात.
आजकालच्या काळात ही भुंगा घरे
अधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज केली जातात. उदाहरणार्थ भुंगा झोपड्यांना लागुनच असलेल्या
छोटया झोपडीत स्वतंत्र टॉयलेट ब्लॉक (जो भुंगा प्रमाणेच पण थोडा लांबट असतो)
मध्ये
आधुनिक पध्द्तीचे कमोड्स, गरम पाण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्था असते. श्रीमंत पर्यटक,
परदेशी पर्यटक यांच्यासाठी या भुंगा झोपडीत रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स वगैरे देखील
लावलेले असतात. आमच्या 'शाम ए सरहद' रिझॉर्ट देखील सर्व सुविधांनी परिपूर्ण होता. कच्छ
रणरणत्या आणि रखरखीत हवेत गारवा आणण्याचं काम ही भुंगा घरे करतात. २००१ साली कच्छच्या
बछाउ तालुक्याला ७. ७ रिश्टर स्केल चा भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. भुज मधील अनेक
घरे भुईसपाट झाली होती. पण या भुंगा नावाच्या गोलाकार झोपडी वजा घरात जे लोक झोपले
होते ते मात्र वाचले होते. भुज सारखे शहरी गाव मात्र उध्वस्त झाले, पण छोट्या खेड्यातील
भुंगा घरात राहणारी माणसे मात्र वाचली.
एव्हाना समोरच्या हर्षवर्धन
अनुजा ज्या घरात होते त्या घराच्या मागुन सुर्य हळुहळु क्षितिजावर येत होता. मी रिझॉर्ट
मधील भुंगा झोपड्या, सूर्योदयाचे वगैरे फोटो काढण्यात गर्क झालो. रमझान म्हणाला 'तुमचे
आवरुन झाल्यावर नऊ साडेनऊ पर्यत नाश्ता करायला डायनिंग मधे या, मी आता जातो. पुढच्या
तयारीला लागतो.’ एव्हाना हर्षवर्धन, अनुजा देखील उठले होते. साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही
नाश्ता करायला बसलो. पराठे, ब्रेड बटर कच्छ मधील एका विशिष्ट फळाचे चविष्ट लोणचे, चहा
कॉफी असा दमदार नाश्ता करुन आम्ही आमच्या इनोव्हा कार मधे जाउन बसलो. आमचा सारथी घनश्याम
तयार होउन बसला होताच. आज आम्ही सकाळी कच्छ जिल्हातील धोलावीरा गावाजवळ सापडलेले मोहोंजोदडो,
हडप्पा संस्कृतीतील गावाचे अवशेष पाहण्यासाठी निघालो. भारतीय सभ्यतेची प्राचीनता सांगणाऱ्या
मोहोंजोदडो, हडप्पा, कालिबंगा, राखीगडी या ठिकाणांच्या जोडीने धोलावीर हे ठिकाणही खुप
महत्वाचे मानले जाते. कच्छमध्ये असे प्राचीन गाव आहे हे मुळी मला माहीतीच नव्हते. त्यामुळे
हे गाव बघण्यासाठी मी खुपच उत्सुक होतो.
भारताला लाभलेले अती प्राचिन
जागतीक वारसा स्थळ: ‘धोलावीरा’
स्वर्गाकडे जाणारा रास्ता
(रोड टु हेवन)
भारतातील इतर अनेक प्रदेशाप्रमाणे
कच्छ हा गुजरात मधील प्रदेश भौगोलीक आणि सांस्कृतीक विविधतेने नटलेला आहे. तब्बल ५०००
वर्षापुर्वीच्या सिंधु संस्कृतीच्या खुणा येथे बघायला मिळतात. हे प्राचीन स्थळ कच्छच्या रणाच्या
मध्यभागी असुन या ठिकाणी जाताना या कच्छच्या पांढऱ्या वाळवंटातुन आपल्याला प्रवास करावा
लागतो. धाडुकी ते सांतालपूर या २७८ कि.मी. लांबीच्या राष्टीय महामार्गावरील मधे कच्छच्या
पांढऱ्या वाळवंटाच्या मधे 'खवडा' गावापासुन जाण्याऱ्या या रस्त्याला 'वे टू हेवन' अर्थात
स्वगाकडे जाणारा रास्ता असे संबोधले जाते. या भागातील उथळ, पाणथळ प्रदेशातुन ह्या रस्त्यावरुन
प्रवास करणे हे पर्यटांमधे विशेष लोकप्रीय आहे. ह्या रस्त्यावरील प्रवास अक्षरश:मंत्रमुग्ध
करणारा आहे. आम्हाला या रस्त्याची थोडीफार माहीती घनश्याम ने सांगितली होतीच. पण प्रत्यक्षात
या स्वर्गीय रस्त्यावरील प्रवास थक्क करणारा होता.
कच्छच्या रणाचे प्रथम दर्शन
आम्हाला झाले. सुमारे ३० कि.मी. लांबीच्या ह्या सरळ रस्त्याच्या आजुबाजुला क्षितीजापर्यंत
पांढरे शुभ्र मिठाचे वाळवंट पसरलेले आहे. आपण जणु स्विग्झरलँड किंवा काश्मीरच्या
बर्फाळ प्रदेशातुन चाललेलो आहोत असाच भास होत होता. हा रस्ता खादिर नावाच्या एका बेटावरील
धोलावीराच्या दिशेने जातो. हा रास्ता २०१९ मधे बांधण्यास सुरवात झाली. आता तो बऱ्यापैकी
पुर्ण देखील झाला आहे. पण अजुन ही काही ठिकाणी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालु
आहे. बरेच पर्यटक आपल्या गाड्या रस्त्यावर थांबवुन फोटोग्राफी करत होते. प्रचंड मोठया,
विस्तीर्ण पांढऱ्या वाळवंटाच्या मधुन जाणारा हा रास्ता वाळवंटाचे दोन भाग करतोय असा
भास होत होता. आमचा चक्रधर घनःश्याम सांगत होता की, मान्सुन मधील येणाऱ्या पावसामुळे
इथं दलदल तयार होते. दिवसा ही मिठाची पांढरी शुभ्र दलदल चांदीप्रमाणे चमकत असते. तर
रात्री चंद्राच्या प्रकाशात चमकते. हा स्वर्गाकडे जाणारा रस्ता जिथे संपतो तिथेच एक
‘हेवन’ नावाचे रेस्टॉरंट आहे. ह्या रेस्टॉरंटच्या मालकांच्या कल्पकतेचे मला कौतुक वाटले.
जणु हा रस्ता स्वर्गाकडे म्हणजे त्याच्या हॉटेलकडेच जातो आहे.
प्राचिन जागतीक वारसा स्थळ:
‘धोलावीरा’
'हेवन' रेस्टोरंट पासून उजवी
कडील रस्त्यावरून साधारणपणे सहा सात किलोमीटर अंतरावरचं 'धोलावीरा' हे हडप्पन संस्कृतीच्या
पाऊलखुणा दाखवणारं प्राचीन गाव लागतं. भारतीय
पुरातत्व विभागाला १९६७ साली या जागेचा शोध लागला. ५००० वर्षांपूर्वीच्या भारतीय सभ्यतेची
प्राचीनता सांगणाऱ्या सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या मोहेंजो दडो, हडप्पा, कालिबंगा,
राखीगडी, रोपार या गावांच्या बरोबरीने धोलावीरा हे अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी
सिंधू संस्कृती मधील काळ्या रंगाने रंगवलेली नक्षी असलेली लाल भांडी, सिंधू लिपीत अक्षरे
असलेला फलक, गोलाकार नाणी , तांब्याच्या बांगड्या, प्राण्यांच्या छोट्या आकाराच्या
मातीच्या मूर्ती, धान्यांच्या साठवणुकीचे रांजण अश्या चारपाच हजार वर्षांपूर्वीच्या
वस्तू इथे सापडलेल्या आहेत. त्यामुळे धोलावीरा बघण्या बद्दलची उत्सुकता वाढली होती.
![]() |
गुजरात मधील धोलावीराचे ठिकाण |
आज योगायोगाने मृणाल जोशींचा
एक ग्रुप आम्हाला धोलावीरा येथे गाठ पडला. तसा थोडा अंदाज आम्हाला मृणाल जोशींनी दिला
होताच. त्यामुळे त्यांच्या ग्रुप मध्ये आम्हीं सामील झालो. पार्किंग मध्ये गाडी लावून
आम्ही धोलावीराच्या प्राचीन गावाकडे निघालो. या स्थळाची माहिती देणारा स्थानीक गाईड
देखील होता. हा गाईड अतिशय मनापासून आम्हाला माहिती देत होता. आमच्या अनेक प्रश्नांची
तो न कंटाळता उत्साहाने माहिती देत होता. धोलावीरा हे गाव कच्छ च्या वाळवंटी भागात
सुमारे १०० हेक्टर जागेत पसरले असून त्याचे स्थान कर्क वृत्ताच्या उष्ण कटिबंधावर स्थित
आहे. ५००० वर्षांपुरीच्या सिंधू संस्कृतीतील सापडलेल्या काही गावांपैकी धोलावीरा हे गाव सर्वात मोठे आणि
प्रमुख स्थळ मानले जाते. कच्छच्या रणामध्ये 'खदिर' नावाच्या बेटावर हे शहर सापडले आहे.
या भागात दोन मोसमी प्रवाह किंवा नद्या वाहतात. धोलावीराच्या उत्तरेला 'मानसर' आणि
दक्षिणेला 'मनहर' नावाच्या दोन नद्यांमध्ये हे चौकोनी आकाराचे शहर सापडले आहे.
धोलावीरा येथील पाण्याचे व्यवस्थापन.
या प्राचीन शहराच्या चारीही
बाजूंनी एक संरक्षणात्मक मोठी भिंत आहे. सुरवातीलाच एकेपाठोपाठ काही बांधीव जलाशय दिसतात.
अर्थातच सध्या ते कोरडे पडलेले आहेत. या शहरासाठी त्या काळाच्या लोकांनी केलेले पाण्याचे
उत्तम नियोजन अचंबित करणारे आहे. गाईड ने सांगितले की अलीकडेच या प्राचीन शहरात ७३
मीटर लांब, ३० मीटर रुंद आणि सुमारे १० मीटर खोल अशी आयताकृती पायऱ्या असलेली विहीर
सापडलेली आहे. पाणी साठवण्यासाठी तयार केलेल्या
विहिरीच्या तळाशी अजून एक खडडा केलेला दिसतो. उन्हाळ्यात इथले प्रवाह आटतात, त्यामुळे
कोरड्या पडलेल्या या जलाशयातील थेंब न थेंब
वापरता यावा म्हणून असे खड्डे केलेले दिसतात. पावसाळ्यात शेजारच्या डोंगरावरून आणि
नदीतून आलेले पाणी दगडांनी बांधलेल्या टाक्यांमध्ये
सोडले जायचे. हे पाणी अर्थातच गढूळ आणि कचरायुक्त असायचे. या पहिल्या टाकीत हे गढूळ
पाणी काही दिवस स्थिर ठेवले की त्या पाण्यातील गाळ खाली तळाशी बसून वर राहिलेले नितळ
पाणी पुढे लागूनच असलेल्या दुसऱ्या जलाशयात किंवा टाकीत सोडले जायचे. पुढे अशाच प्रकारच्या
टाक्यांमधून ही पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया होत हे पाणी स्वच्छ होऊन पिण्या योग्य
व्हायचे. मग हे पाणी संपूर्ण शहरभर वितरित केले जायचे. हे पाण्याचे वितरण टेकडीच्या
नैसर्गिक उतारांचा वापर करून कल्पकतेने केलेले दिसते.
![]() |
धोलावीरा मधील पाण्याचे नियोजन |
तब्बल ५००० वर्षांपूर्वी येथील
लोकांनी पाण्याची साठवण, संवर्धन, वितरण याचा किती खोल वर विचार केले होता हे लक्षात
येते. उत्तरेकडील 'मनसर' आणि दक्षिणेकडील
'मनहर' या नैसर्गिक ओढ्यांच्या किंवा नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहांना छोटे छोटे बंधारे
बांधून, नद्यांचे पाणी वळवून या गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये सोडले जायचे आणि साठवून
ठेवले जायचे. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा कार्यक्षम वापर
विचारपूर्वक केलेला इथे दिसतो. या गावामध्ये पाण्याच्या वितरणासाठी भूमिगत वाहिन्यांचे
जाळे होते. जलस्रोतांच्या कार्यक्षम वापरामुळे इथले लोक उत्तम प्रकारे शेती करत असत.
दुष्काळ आणि नद्यांना येणारे पूर या सारख्या नैसर्गिक आपत्तींना त्यांना तोंड देता
आले होते. येथील लोकांनी सांडपाण्याचे देखील उत्तम व्यवस्थापन केले होते. या अशा प्रकारच्या
व्यवस्थापन पद्धतीमुळे जीवन व्यथित करताना स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीचे त्यांना
महत्व जाणवलेले होते असे आपल्या लक्षात येते.
धोलावीरा ची नगररचना
धोलावीराची नगररचना अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण
असून सर्वसाधारण पणे या शहराचे तीन भाग केलेले आढळतात. या शहराच्या मध्यभागी थोडेसे
उंचावर श्रीमंत, सत्ताधारी अधिकाऱ्यांचा किल्ल्यासमान दिसणारा राजवाडा होता. त्याला
भक्कम अशी तटबंदी होती. या भागातून शहराच्या व्यवस्थापनाचे निर्णय, राजकारण, न्यायदानाचे
काम चाले. या राजवाड्याच्या सभोवताली माध्यम वर्गीयांची घरे होती. या मधल्या वस्तीत
दोन ते पाच खोल्यांच्या घरांचे जोते (प्लिंथस) आढळून आलेले आहेत. आमचा गाईड विनोदाने
म्हणाला 'त्या काळी सुद्धा दोन किंवा तीन बेडरूम, हॉल, किचन ची संकल्पना होती'. या
माध्यम वर्गीय नागरिकांसाठी देखील संरक्षक भिंतीची व्यवस्था होती. या नंतर काहीश्या
दूर अंतरावर कनिष्ठ वर्गातील किंवा श्रमिक वर्गातील लोकांच्या राहण्याची व्यवस्था होती.
या सामान्य वर्गातील लोकांच्या घरांची जोती सुद्धा इथे दिसतात. मोहेंजो दडो आणि हडप्पा
येथील घरांच्या तुलनेत धोलावीरा हे शहर चौकोनी आणि आयताकृती आकाराच्या पक्क्या विटांनी
किंवा कोरलेल्या दगडांनी असे चांगले बांधलेले आहे. धोलावीराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ
कोरलेल्या दहा अक्षरांचा एक मोठा फलक आढळून आला आहे. हा फलक काळाच्या ओघात काही कारणाने
खाली पडला असावा. आपल्या काही पूर्वजांनी हा फलक उचलून काळजीपूर्वक नीट ठेऊन दिला.
या फलकातील दहा अक्षरे शाबूत राहिलेली आहेत. ही अक्षरे चित्रलिपीच्या स्वरूपात आहेत,
मात्र या अक्षरांचा अर्थ लावण्यात पुरातत्व शाश्त्रज्ञांना अजूनही यश आलेले नाही. हा
फलक त्यावेळच्या या शहराच्या नावाचा असू शकतो, किंवा या शरिरात येणाऱ्यांचे स्वागत
करण्यासाठी असू शकतो. आज ही या फलकावरची अक्षरे, त्याची लिपी, अक्षरांचा अर्थ वगैरे
गूढच बनून राहिलेले आहे.
धोलावीराच्या किल्ल्यासमान
असलेल्या मुख्य भागाच्या उत्तरेला एक विस्तृत मैदान आढळलेले आहे. या लांबट मैदानाच्या
दोन्हीही बाजूंना अँफी थिएटर प्रमाणे उतरत्या पायऱ्या आहेत. यावर बसून त्या काळातील
लोक सामूहिक समारंभ, खेळ किंवा घोड्यांच्या रथांच्या शैर्यती बघत असावेत. या धोलावीरा
मध्ये हडप्पन संस्कृतीच्या समकालीन शहरांपेक्षा बऱ्याच वेगळ्या गोष्टी आढळून आलेल्या
आहेत. या शहराच्या संरक्षक भिंती पलीकडे दूर अंतरावर इथे एक स्मशान भूमी होती हे सिद्ध
करणारे पुरावे देखील सापडलेले आहेत. दगडांचे तासून पॉलिश केलेले गुळगुळीत खांब इथे
दिसतात. त्यामुळे ५००० वर्षांपूर्वी देखील इथले स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते हे
लक्षात येते. असे हे प्राचीन शहर काळाच्या ओघात कधीतरी नष्ट झाले. पुरातत्ववेत्यांचा अनुमानानुसार हे शहर इस. सन पूर्व
१८०० पर्यंत नष्ट होण्याच्या मार्गावर आले होते. धोलावीराच्या विनाशाच्या बाबतीत अनेक
अंदाज व्यक्त केलेले आहेत. उदा. या भागातील एखाद्या शक्तिशाली भूकंपामुळे घडलेल्या
भौगोलिक स्थित्यंतरामुळं हे शहर नष्ट झाले असावे. हवामानातील अचानक झालेल्या बदलांमुळे,
पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळे किंवा मग नदी नाल्यांच्या प्रवाहात झालेल्या बदलांमुळे
पडलेल्या विनाशकारी दुष्काळामुळे हे शहर नष्ट झालेले असावे. ५००० वर्षांपूर्वीच्या
हडप्पन संस्कृतीतील अशी अनेक शहरे कशामुळे नष्ट झाली असावीत? हे गूढ रहस्य कायमच आपला
मेंदू कुर्तडतच राहील. धोलावीरा येथील हडप्पा कालीन प्राचीन अवशेषांचे महत्व लक्षात
घेऊन युनेस्को या जागतिक संस्थेने या ठिकाणाला
'जागतिक वारसा' म्हणून घोषित केलेले आहे.
![]() |
धोलावीरा मध्ये सापडलेला फलक |
![]() |
चित्रलिपी प्राचीन |
जीवाश्म पार्क (फॉसिल पार्क)
![]() |
किनाऱ्यावर मिठाचा चिखल किंवा दलदल |
धोलावीराच्या अद्भुत भूतकाळातील
प्रवासातून आम्हाला पोटातल्या भुकेने वर्तमानकाळात आणून सोडले. दुपारचे तीन वाजले होते.
मग धोलावीराला येताना लागलेल्या हॉटेल हेवन मध्ये आम्ही आमचा जठराग्नी शांत केला. खास
कच्छी पद्धतीचे जेवण घेऊन आम्ही तृप्त झालो. तोपर्यंत दुपारचे चार वाजले होते. बाहेर
ऊन रणरणत होते. तेव्हड्यात आमचा गाईड म्हाणाला 'आता आपण फॉसिल पार्क मध्ये जाऊ. तोपर्यंत
थोडा उन्हाचा कडाका देखील कमी होईल.' आम्ही लगेचच आमच्या इन्होवा कारच्या ए.सी च्या
थंडाव्यात बसलो आणि निघालो. धोलावीरापासून सुमारे दहा बारा कि.मी. अंतरावर हे निसर्गाचे
आश्चर्य लपलेले आहे. हे ठिकाण तुलनेने कमी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे कमी पर्यटक येतात.
पण आमच्या गाईडच्या सांगण्यामुळे आम्ही या जागेला भेट दिली. या ठिकाणी ज्युरासिक युगातील
लाकडांचे, वनस्पतींचे जीवाश्म दिसतात. ज्या काळात डायनॉसॉर्स चे अस्तित्व होते, त्याकाळातील
जीवाश्म इथे दिसतात. या ठिकाणी सापडलेले जीवाश्म तब्बल १८० दशलक्ष वर्षे इतक्या जुन्या
काळातले आहेत. कच्छच्या रणा मधोमध असलेल्या एका टेकडीच्या उतारावर हे प्राचीन जीवाश्म
सापडलेले आहेत. टेकडीचा उतार संपताच लगेचच मिठाचे पांढरे वाळवंट दृष्टीक्षेपात येते.
इथे या टेकडीवर वरपर्यंत समुद्राची पातळी होती. त्याच्या खुणा देखील टेकडीच्या उतारावर
दिसत होत्या. इथल्या पांढऱ्या वाळवंटात फूटदीड फूट साठलेले खारे पाणी असते. उन्हाळ्यात
हे पाणी बाष्पीभवनाने कमी होऊ लागते. त्यामुळे इथे किनाऱ्यावर मिठाचा चिखल किंवा दलदल
तयार होते. पण किनाऱ्यापासून आत थोडेफार पाणी असते. इथे आम्हाला लाल, गुलाबी रंगाचे
अनेक फ्लेमिंगो पक्षांचे थवे दिसत होते. या रणामधील मिठाच्या पाण्यात किंवा दलदलीत
असणारे लाल रंगाचे किडे खाण्यासाठी फ्लेमिंगो इथे स्थलांतरित होतात. शिवाय या पांढऱ्या
मिठाच्या वाळवंटात माणसांचा वावर फारसा नसल्यामुळे ते निर्धास्तपणे येतात. हे लाल रंगाचे
किडे पाहण्यासाठी हर्षवर्धन, अनुजा आणि अलका दलदलीतून चालत थोडे आतपर्यंत गेले. मी
मात्र आत गेलो नाही. मी फोटोग्राफीमध्ये गुंतलो होतो.
![]() |
ज्युरासिक काळातले झाडाचे खोड |
आमच्या गाईडने आम्हाला एक गमतीशीर
माहिती सांगितली. इथे या डोंगरावर एक विशिष्ठ प्रकारचा दगड सापडतो. इथले दगड अरबी समुद्रातून
पार इजिप्त पर्यंत नेऊन तेथील पिरॅमिड च्या बांधकामासाठी त्यांचा वापर केला गेलेला
आहे म्हणे. आजच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता माझा यावर विश्वास बसणे अवघड गेले.
इथे गोड्या पाण्याचे एक तळे देखील आहे. इथे मिठाच्या वाळवंटात खाद्य शोधात येणाऱ्या
पक्षांना गोड पाणी पिण्यासाठी निसर्गाने केलेली ही व्यवस्था पाहून आश्चर्य वाटते. या
गोड पाण्याच्या तळ्यात बरेच पक्षी डुंबत होते. आमच्या गाईडच्या आग्रहाखातर आम्ही हे
फॉसिल पार्क बघितल्या मुळे तो समाधानाने शेवटी आम्हाला म्हणाला 'आमच्या कच्छ मध्ये
बघण्यासारखे खूप आहे. पण दुर्दैवाने अशा ठिकाणी यायला पर्यटक कंटाळा करतात. तुम्ही
माझ्या विनंतीला मन देऊन इथपर्यंत आलात त्याबद्दल धन्यवाद! पुढच्या वेळेस थोडा वेळ
काढून या. अजून इथे बघण्यासारखे खूप काही आहे.' मला या गाईडच्या बोलण्याचे खूप कौतुक
वाटले. संध्याकाळ झाली होती. दिवसभर उन्हात फिरल्यामुळे थकवा आला होता. पुन्हा रोड टू हेवन
वरून फोटो काढत परतीच्या प्रवासाला लागलो. रात्री उशिरानेच आमच्या रिझॉर्ट वर आलो.
रमजान आणि त्याचे सहकारी आमची जेवणासाठी वाटच बघत होते. तुडुंब जेवण करून आम्ही झोपेच्या
आधिन झालो...
![]() |
फ्लेमिंगो पक्षी |
दिवस तिसरा.
भुज :
आजचा दिवस आमच्या ट्रीपमधील वेगळा आणि महत्वाचा देखील दिवस होता. आज कच्छ भागातील आश्चर्यकारक हस्तकला, ऐतिहासिक वास्तू, भव्य राजवाडे असलेल्या भुज शहराला आम्ही भेट देणार होतो. कालच्यासारखी आज फारशी धावपळ नसल्यामुळे थोड्य उशिरानेच उठलो. ९ वाजता नाश्ता करून भूजच्या दिशेने निघालो. आमच्या रिझॉर्ट पासून भुज सुमारे ६५ कि.मी. अंतरावर होते. 'मोहित व्होरा' नावाचे गाईड आम्हाला भुज आणि आजूबाजूच्या भागाची माहिती देणार होते. साधारणपणे दीड तासाने आम्ही भुज शहरात पोहोचलो. गाईड मोहित व्होरा यांनी आमचे हसत मुखाने स्वागत केले. हे मध्यमवयीन गृहस्थ अतिशय गपिष्ठ होते. गुजरात बद्दलचे त्याचे अतोनात प्रेम त्यांच्या बोलण्यात जाणवत होते. पंतप्रधान मोदींच्या बद्दल बोलताना ते थकत नव्हते. भुज शहराचा इतिहास, येथील भुज संस्थानिकांच्या राजघराण्याचा इतिहास, कच्छ ची भौगोलिक माहिती, इथली कला, साहित्य, संगीत वगैरे गोष्टींची इत्यंभूत माहिती त्यांनी आम्हाला दिली.
![]() |
उलट्या पडलेल्या कासवाप्रमाणे असलेला कच्छ चा आकार |
सुरवातीलाच 'या भागाला कच्छ
हे नाव का पडले?' ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले 'कच्छ' म्हणजे 'कासव.'
नकाशा बघितला तर आमच्या कच्छ चा आकार उलटे पडलेल्या कासवाप्रमाणे दिसतो. त्यामुळे या
भागाला कच्छ हे नाव पडले असावे.' त्यांनी स्वतः काढलेल्या उलट्या कासवाचे चित्र दाखवून
त्यातील जिल्हे, भुज शहराचे कच्छ मधील स्थान, महत्वाची गावे आम्हाला दाखवली. पुढे ते
म्हणाले 'आमच्या भुज मध्ये बघण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. त्यापैकी प्राग महाल, आणि
त्याच्या शेजारीच असलेला आयनां महाल आपण आज बघणार आहोत. याशिवाय भुज मध्ये हमीरसर तलाव,
कच्छ संग्रहालय, रामकुंड, मोहोमद पन्ना मशीद, श्री स्वामीनारायण मंदिर, भुजिया किल्ला,
टपकेश्वरी मंदिर, स्मृतिवन भूकंप स्मारक आणि संग्रहालय अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत,
पण त्यासाठी तुम्हाला दोनतीन दिवस वेळ काढून आमच्या भुज मध्ये राहावे लागेल.' कच्छ
मधील ग्रामीण ग्रामीण भागातील लोकांच्या कलेला, त्यांनी तयार केलेल्या पारंपरिक वस्तुंना
लगेचच जवळची बाजारपेठ म्हणून भुज फार महत्वाची कामगिरी बजावते. त्यामुळे तुम्हाला भुजमध्ये
शॉपिंग ला भरपूर वाव आहे. पण ते नंतर. आधी आपण प्राग महाल आणि आयना महाल बघून घेऊयात.'
आम्ही आमची गाडी प्राग महाल कडे वळवली.
प्राग महाल:
भुज शहराच्या मधोमध गावठाणात
असलेल्या, दाटीवाटीने असलेल्या छोट्या गल्ल्या पार करत आम्ही प्राग महालाजवळ आलो. किल्ल्यासारखी
तटबंदी असलेल्या भिंतीमधील भल्यामोठ्या लाकडी दरवाज्यातून आत, महालाच्या मोठ्या प्रांगणात
आम्ही प्रवेश केला. गाडी पार्क केली आणि असे लक्षात आले की प्राग महाल आणि आयना महाल
या दोन्हीही वास्तू एकाच आवारात शेजारी शेजारी आहेत. या दोनीही वास्तू कलाकुसरीने परिपूर्ण
आहेत. या भागातील राजे 'राव प्रागमलजी' यांच्या नावावरून त्यांच्या या महालाला 'प्राग
महाल' असे नाव दिले गेले. राव प्रागमलजी यांनी १८६५ मध्ये या महालाचे बांधकाम सुरु
केले. या राजवाड्याला त्या काळात 'तीन दशलक्ष रुपये' इतका खर्च आला होता. राव प्रागमलजी
यांच्या नंतर त्यांचे नातू 'तिसरे खेंगरजी' यांच्या राजवटीत १८७९ मध्ये या महालाचे
बांधकाम पूर्ण झाले. हा राजवाडा राजस्थानमधील वाळूच्या खडकांपासून बांधला असून इटालियन
संगमरवराचा इथे मुबलक वापर केलेला दिसतो. या महालात कॉरिंथियन शैलीतले खांब दिसतात.
ही खांबांची शैली ग्रीक आणि रोमन संस्कृतीशी साम्य दाखवते.
याला इटालियन गॉथिक शैली असेही
म्हणतात. त्याकाळी अनेक इटालियन आणि कच्छी स्थानिक बांधकाम कामगारांचा या महालाच्या
उभारणीत हातभार लागला होता. या राजवाड्यातील अनेक दालनांमध्ये पूर्वीच्या राजांच्या
वापरातल्या वस्तू, पेंटिंग्ज, कपडे शस्त्रे वगैरे वस्तू संग्रहालयाप्रमाणे मांडून ठेवल्या
होत्या. या राजवाड्यात मोठा 'दरबार हॉल' आहे. त्यात राजकीय खलबते, कधी कधी राजघराण्यातील
कौटुंबिक कार्यक्रम व्हायचे. हा दरबार अतिशय प्रेक्षणीय आहे. या
दरबार हॉल मध्ये १९ व्या शतकात बनवलेले चांदीचे सिंहासन आहे. या दरबार हॉल चे नूतनीकरण 'महाराव प्रागमलजी तिसरे'
यांच्या काळात करण्यात आले. या ठिकाणी 'लगान' या प्रसिद्ध चित्रपटाचे शुटिंग झाले आहे.
या हॉल मध्ये पर्यटकांसाठी एका फिरत्या कॅमेऱ्याद्वारे सेल्फी व्हिडीओ काढण्याची सोय
होती. अर्थातच या दरबारहॉल च्या पार्श्वभूमीवर फिरते सेल्फी शूटिंग आम्ही केले. खूप
मजा आली.
भुज मधील प्रयलंकारी भूकंप:
प्राग महाल आतून बघून आम्ही
बाहेर आलो. या राजवाड्याच्या इमारतीच्या समोरच्या बाजूला उंच मनोरा आहे. त्यावर एक
भलेमोठे घड्याळ आणि एक मोठी घंटा आहे. या मनोऱ्यावरून भुज शहराचे विहंगम दृश्य दिसते.
मात्र त्या मनोऱ्याला बऱ्याच भेगा पडलेल्या दिसल्या आणि त्याची दुरुस्ती चालू आहे असे
लक्षात आले. त्याबद्दल विचारल्यावर गाईड ने भुज मध्ये घडलेल्या एका दुःखद घटनेची माहिती
दिली. कच्छ हा अतिशय भूकंप प्रवण प्रदेश आहे. या भागात नेहेमीच छोटे मोठे भूकंप होत
असतात. २६ जानेवारी २००१ या दिवशी आपला सगळा भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करत होता
आणि त्याच दिवशी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी कच्छ मध्ये एक महाभयंकर भूकंपाने थैमान
घातले. या भूकंपाचा केंद्रबिंदू भुज शहराच्या जवळच होता. हजारो लोक मृत्युमुखी पडले.
तर लाखो लोक जखमी झाले. शेकडो गावेच्या गावे
भुईसपाट झाली. भुज शहरातील चाळीस टक्के घरे उध्वस्त झाली. भुज मधील स्वामीनारायण मंदिर,
प्राग महाल, आयना महाल, अशा प्राचीन वास्तूंची पडझड झाली. या भूकंपानंतर प्राग महाल
आयना महाल मधील दुर्मिळ वस्तू चोरीला गेल्या. चोरांनी अमूल्य अश्या पुरातन वस्तू चोरल्या.
त्यानंतर २००७ पर्यंत ह्या इमारती दुर्लक्षित अवस्थेत होत्या. २००७ नंतर अभिनेते श्री
अमिताभ बच्चन ह्यांनी वैयक्तिक लक्ष घालून या राजवाड्याची, इथल्या मनोऱ्याची दुरुस्ती
करवून घेतली. घड्याळ दुरुस्त करण्यात आले. या मनोऱ्यावर असलेल्या भव्य घंटेचं वजन ३५०
किलो एवढे आहे.
आयना महाल:
प्राग महाल बघून आम्ही शेजारीच
असलेल्या 'आयना महाल' बघायला गेलो.भुज च्या भूकंपात या आयना महालाच्या इमारतीचे अतोनात
नुकसान झालेले दिसत होते. येथील राजघराण्यातील राण्यांसाठी हा महाल बांधण्यात आला होता.
या महालात फोटोग्राफी करण्यास मनाई होती. या आयना महालाला 'पॅलेस ऑफ मिरर्स' असे देखील
म्हणतात. हा महाल कच्छ राज्याचे 'राव लखपती जी' यांनी १७५० मध्ये बांधला. राव लाखापतीजी
यांचे प्रमुख वास्तुशास्त्री 'रामसिंग मालन' यांनी स्थानिक पद्धतीचे बांधकाम करून युरोपियन
शैलीत काच, आरसे, टाईल्स वापरून सुंदर सजावट केली आहे. आयना महालाच्या पहिल्या मजल्यावर
'हॉल ऑफ मिरर्स' नावाचे दालन आहे. त्यात महाराव लाखापतीजींचा एक पलंग आहे तो अतिशय
पाहण्यासारखा आहे. या पलंगाचे पाय शुद्ध सोन्याचे आहेत. या ठिकाणी एक हिरेजडित तलवार
देखील ठेवलेली आहे. असे म्हणतात की ही तलवार मुघल सम्राट आलमगीर याने राव लाखापतीजींना
भेट दिली होती. या दालनाच्या शेजारीच 'फुवारा' महाल नावाचे एक दालन आहे. या मध्ये एका
छोट्याश्या पाण्याच्या तळ्याची उभारणी केली आहे. सायफन पंप वापरून हे छोटे तळे पाण्याने
भरण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. त्यामुळे या आणि आजूबाजूच्या दालनांमधून थंड हवा
खेळती राहत असे. दुसऱ्या मजल्यावर न्यायालय किंवा कोर्ट हॉल आहे. इथे शहाजहान, जहांगीर
दारा शुकोह या मुघल सम्राटांनी १६१७ ते १६५८ दरम्यान जारी केलेली मुघल फर्माने आपल्याला
बघायला मिळतात. पण दुर्दैवाने या आयना महालाचा बराचसा भाग पडझड झाल्यामुळे दुरुस्ती
साठी बंद होता. आम्हाला हा कलात्मक असा आयना महाल नीटसा बघता आला नाही. असो... भुज मधील ऐतिहासिक राजवाडे, महाल बघून आम्ही शहरातून
फेरफटका मारला. भुज च्या पूर्वेला भुजिया नावाची एक टेकडी आहे. या टेकडीवर एक छोटासा
किल्ला आहे. भारतातल्या इतर शहरांप्रमाणे अरुंद आणि गर्दी असलेल्या रस्त्यांचे हे शहर
आहे. कच्छमध्ये येऊन 'कच्छी दाबेली' असे कसे होईल? रस्त्यावरच्याच पण एका छानश्या गाडीवर
आम्ही मनसोक्त 'कच्छी दाबेली' खाल्ली. पोटपूजा झाल्यावर भुज च्या मेन मार्केट मध्ये
जाऊन शॉपिंगची मजा लुटली.
'निरोना' गावातून फेरफटका:
भुज हे भारतातील विविध हस्तकलेचं
प्रमुख केंद्र मानले जाते. शॉपिंग करताना आम्हाला कच्छ मधील विविध रंग आणि जिवंतपणा
असलेले कपडे, लाकडी कोरीव मूर्तीं, वस्तू, धातूच्या घंटा, रंगीत लाखेपासून सुशोभित
केलेल्या लाकडी वस्तू यांनी खचाखच भरलेली अनेक दुकाने दिसत होती. गाईड मोहित व्होरा
म्हणाले 'तुम्हाला इथल्या पारंपरिक कलाकृती प्रत्यक्ष बनवताना बघायच्या असतील तर भुज
च्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात फिरायला हवे.' भूजच्या आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात
अनेक छोटी छोटी गावे आहेत. या गावांमध्ये शेकडो कारागीर पिढ्यानपिढ्या अनेक प्रकारच्या
पारंपरिक कला जोपासत आपला उदरनिर्वाह करतात. कापडावर मिरर वर्क, आजरख ब्लॉक प्रिंटिंग,
विणकाम, भरतकाम, धातूच्या घंटा बनवणे, खेळणी तयार करणे अशा विविध प्रकारच्या हस्तकला
भुज च्या आजूबाजूच्या खेड्यातील कारागीर परंपरागत पद्धतीने तयार करत असतात. अजरखपूर,
ढोरडो, निरोना, सुमरासर, लुधीया, झुरा, अंजार अशी असंख्य खेडी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण
हस्तकलांसाठी प्रसिद्ध आहेत. अर्थात ही सगळी गावे बघणे शक्य होणार नसल्यामुळे भुज पासून
सुमारे ४० कि.मी. अंतरावरील 'निरोना' नावाच्या गावात जायचे असे आम्ही ठरवले. निरोना
गावाकडे जाताना आमचे गाईड आम्हाला ह्या छोट्या गावांची माहिती देत होते.
भुज पासून ३० कि.मी. अंतरावरील
झुरा' ह्या गावातील रहिवासी कारागीर भरतकाम केलेल्या पादत्राणांचे उत्पादन करतात. येथे
तांब्याच्या पत्र्यापासून घंटा देखील बनवल्या जातात. भूजच्या उत्तरेला 'लुडिया' नावाच्या
गावातील बहुतेक सगळे कारागीर काष्ठकलेमध्ये पारंगत आहेत. 'नख्तरणा' हे भुज च्या वयवेला
असणारे छोटे खेडेगाव असून या गावाला भुज व्हे 'क्राफ्ट सेंटर' म्हणतात. साड्या किंवा
कापडावर बांधणी पद्धतीने रंग भरण्याची कला येथील लोकांना पिढ्यानपिढ्या अवगत आहे. या
नख्तरणा गावाजवळ चिंकारा अभयारण्य देखील आहे असे समजले. भूजच्या उत्तरेस 'सुमरासर'
येथे 'सोडा' नावाची आदिवासी जमात राहते. इथले लोक आहिर आणि सुफ प्रकारातील भरतकामात
तरबेज आहेत. या गावात कला रक्षा केंद्र नावाची एक संस्था असून ही संस्था कच्छ मधील
कारागिरांना विविध पारंपरिक हस्तकला बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेमधून
प्रशिक्षित झालेले कारागीर सक्षम बनून आत्मनिर्भर झालेले आहेत. ढोरडो हे गाव भूजच्या
उत्तरेला सुमारे ८० कि.मी. अंतरावर असून येथील रहिवासी साखळी पद्धतीची शिलाई करण्यात
तरबेज आहेत. इथे केलेल्या शिलाईत किंवा भरतकामामध्ये छोटे आरसे, छोट्या चांदीच्या घंटा
लावून ही शिलाई सुशोभीत केली जाते. ढोरडो गाव चांदीचे दागिने आणि चामड्याच्या वस्तूंसाठी
सुप्रसिद्ध आहे. आमच्या गाईडने दिलेली रंजक माहिती ऐकता ऐकता आम्ही निरोना गावात येऊन
पोहोचलो.
'रोगन' आर्ट:
निरोना गाव खूपच छोटेसे होते.
शहरी आधुनिकीकरण इथं पोहोचलेले दिसत नव्हते. दाटीवाटीने घरे असलेल्या निरोना गावात
निर्मनुष्य असे रस्ते होते. ऐन दुपारची वेळ असल्यामुळे कडकडीत ऊन होते. वाऱ्याचा मागमूसही
नव्हता. मधेच एखादा सायकलस्वार इकडून तिकडे जात होता. एका घराच्या दरवाजात जख्खड म्हातारी
आजी निवांतपणे बसलेली होती. एकूणच सगळीकडे शुकशुकाट होता. गाईड सांगत होते की, या गावातील
कारागिरांना वैशिष्ट्यपूर्ण 'रोगन' शैलीतले पेंटिंग करताना बघण्यासाठी देशविदेशातून
पर्यटक येतात. रोगन ही प्राचीन कला चारपाचशे वर्षांपूर्वी पर्शियातून कच्छ येथे आली.
इथे ही कला रुजली, वाढली, स्थिरावली. ही कला मुस्लिम कलाकारांनी पिढ्यानपिढ्या जपली.
आज या गावात फक्त दोन मुस्लिम कुटुंबे ही कला चालवतात. त्यांच्या पुढील नवीन पिढ्या
देखील ही कला जोपासण्याचे काम करत आहेत. ही रोगन आर्ट म्हणजे काय? हे समजावून घेण्यासाठी
आम्ही निरोना गावातील जगप्रसिद्ध रोगन कलाकार 'श्री अब्दुल गफूर खत्री' यांच्या घरी
गेलो. अब्दुल खत्री ह्यांची या कलेचा वारसा चालू ठेवणारी आठवी पिढी आहे. श्री अब्दुल
खत्री यांना २०१९ मध्ये भारतातील सर्वात प्रतिष्ठित 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित
करण्यात आलेले आहे. या शिवाय या कुटुंबाने या कलेसाठी चार राष्ट्रीय पुरस्कार आणि सात
राज्य पुरस्कार देखील मिळवलेले आहेत.
श्री अब्दुल खत्री कामानिमित्त
कुठेतरी बाहेरगावी गेले होते. अब्दुल खत्री यांच्या भावाने आमचे स्वागत केले. आमच्या
समोर रोगन आर्टचे प्रात्यक्षिक दाखवत ते आम्हाला या कलेतील बारकाव्यासहित माहिती सांगू
लागले. रोगन आर्ट ही नैसर्गिक आणि हाताने बनवलेले रंग वापरून कापडावर नक्षीकाम करण्याची
कला आहे. एरंडेलच्या बियांपासून काढलेले तेल दोन दिवस उकळऊन, त्यात रंगद्रव्ये, खनिज
रंग घालून या मिश्रणाची जाडसर घट्ट, चमकदार पेस्ट तयार केली जाते. ही घट्टसर पेस्ट
एका बारीक काडीवर घेऊन कापडावर सुंदर नक्षीकाम केले जाते. हे बारीक नक्षीकाम करताना
कारागिरांच्या संयमाचा कस लागतो. कालौघात आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही कला आता
नष्ट होत चालली आहे. खत्री कुटुंबीय या कलेचा वारसा पुढे चालवत आहेत. ही माहिती देता
देता खत्री एका काळ्या कापडावर पिवळ्या रंगाच्या रोगन मिश्रणाने सुरेख नक्षी काढत होते.
रोगन आर्ट पेंटिंग साठी सहसा गडद रंगाचे कापड वापरतात. पारंपरिक रोगन पेंटिंग मध्ये
पाने फुले, मोर यांचा वापर करून नक्षीकाम केले जाते. जुन्या काळी या कलेचा वापर महिलांच्या
साड्या, पुरुषांनी घालायची पगडी, फेटे, लहान मुलांचे कपडे वगैरे साठी करण्यात येई.
आता ही प्रथा आणि कला फॅशन म्हणून परत आली आहे. अब्दुल खत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी
या कलेत आधुनिकता आणून पिशव्या, भिंतीवर लावण्यासाठी शोभेसाठी लावायच्या फ्रेम्स, पांघरायच्या
रझया, पुरुषांचे कुर्ते, स्त्रियांच्या हातातल्या पर्सेस, स्टोल्स, मोबाईल कव्हर्स
वगैरे उत्पादने तयार करून लोकप्रिय केलेली आहेत. पूर्वीच्या काळी या कलेमध्ये फक्त
पुरुषांचीच मक्तेदारी होती. मात्र अब्दुल खत्री यांनी आजूबाजूच्या भागातील स्त्रियांना,
मुलींना ह्या कलेचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आणि आता शेकडो महिलांना रोजगाराची
संधी उपलब्ध होत आहे. खत्री परिवाराने उचलेले हे एक मोठे पाऊल आहे. रोगन कला टिकून राहावी व जास्तीजास्त प्रमाणात समाजापर्यंत
पोहोचावी या साठी ह्या कुटुंबाने स्वतःला वाहून घेतले आहे. आमची आणि अब्दुल खत्री यांची
गाठ पडू शकली नाही याची आम्हाला चुटपुट लागून राहिली होती.
कॉपर बेल आर्ट:
रोगन आर्ट बघून आम्ही पुढच्या
एका गल्लीतल्या एका घरात गेलो. हे घर एका लोहाराचे होते. येथील लोहार 'अली मोहोमद सिद्दीकी'
तांब्याच्या पत्र्यापासून घंटा बनवत होते. ह्या तांब्याच्या घंटा बनवण्याच्या कलेला
देखील सुमारे ३०० वर्षांचा इतिहास आहे. लोहार 'अली मोहोमद सिद्दीकी' यांनी आणि त्यांच्या
कुटुंबीयांनी ही कला अनेक पिढ्यांपासून जोपासली आहे. पंतप्रधान मोदींनी या कुटुंबाचा
विशेष पारितोषिक देऊन गौरव केला आहे. परदेशात या घंटा आणि घंटांपासून तयार केलेली झुंबरे
व इतर वस्तू यांना प्रचंड मागणी असते. विशेष म्हणजे ह्या घंटा बनवताना कुठल्याही मशीनचा
वापर केले जात नाही. घंटेच्या सर्व कलाकृती हाताने व पारंपरिक हत्यारे वापरून बनवल्या
जातात. सिद्दीकी यांचे घर त्यांच्या दुकानामागेच होते. घरातल्या सर्व महिला देखील व्यवसायाला
हातभार लावत होत्या. आम्ही या सिद्दीकी कुटुंबाकडून दहा पंधरा छोट्या घंटा गुंफलेल्या
एका झुंबराची खरेदी केली. वाऱ्यामुळे हे झुंबर हलले की चिमण्यांच्या किलकिलाटासारखा
मंजुळ आवाज यातून येतो.
लाखेचे रंगकाम:
निरोना गावातल्या छोट्या गल्ल्या
पार करत आम्ही गावाच्या एका टोकावर असलेल्या वस्तीत गेलो. जाताना आमचे गाईड म्हणाले
' इथे प्राचीन काळापासून चालत आलेली अजून एक कला आहे. लाखेपासून लाकडी वस्तू रंगवण्याची
कला ही कच्छ मधील 'वाधा' समुदायातील लोकांची मक्तेदारी आहे. ही जमात आर्थिक दृष्ट्या
गरीब असून शक्यतो गावाच्या एक बाजूला राहते. या वस्तीमध्ये शिरताना सांडपाण्याचे ओहोळ
पार करीत, ओलांडत आम्ही वस्तीत शिरलो. या वस्तीतील लोक आर्थिक दृष्ट्या गरीब असावेत.
आम्ही इथल्या चौकात येताच एक वयस्कर माणूस त्याचे पागोटे सावरत लगबगीने आमच्या समोर
आला. हसतमुखाने स्वागत करीत चौकातल्या एका मोठ्या झाडाच्या सावलीत असलेल्या पारावर
त्याने आम्हाला नेले. मग त्याने आपली आयुधे गोळा करून त्याच्या कलेचे प्रात्यक्षिक
दाखवायला सुरवात केली. स्वैपाकात वापरायच्या एक लाकडी उलथन्याच्या दांड्यावर लाखेचे
रंगकाम करीत त्यावर तो सुंदर नक्षी काढू लागला. त्याचे हे नक्षीकाम करण्याचे कसब कमालीचे
अप्रतिम होते. हे लाखेचे रंगकाम करताना तो या कलेची माहिती, इतिहास सांगत होता... 'आम्ही
'वाधा' नावाच्या भटक्या जमातीतील कुटुंबे आहोत. सात आठशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज
चरितार्थासाठी भटकत भटकत कच्छ मध्ये आले. त्याकाळी आमच्या पूर्वजांनी इथल्या स्थानिक
जंगलातील लाकडापासून वस्तू बनवून त्यावर लाखेचे रंगकाम करण्याची कला आत्मसात केली.
कालांतराने वाधा जमातीतील आमच्यासारखी काही कुटुंबे निरोना, झुरा यासारख्या काही छोट्या
गावात स्थिरावली. ही पारंपरिक प्राचीन कला आमचे उपजीविकेचे साधन आहे.'
या कारागिराची कला बघाताना
आणि तो सांगत असलेली माहिती ऐकताना माझे आजूबाजूला लक्ष जात होते. या वस्तीतील बायका,
मुले घरातून डोकावून कुतूहलाने आमच्या कडे बघत होती. काही धिटुकली मुले शेम्बूड पुसत,
खाली ओघळणारी चड्डी सावरत आमच्या भोवती गोळा झाली होती. आम्ही आलेले बघताच काही घरातल्या
बायकांनी आणि छोट्या मुलींनी आपल्या घराच्या अंगणात सतरंजी अंथरून त्यावर त्यांनी बनवलेल्या
गृहपोयोगी वस्तू लगबगीने मांडून ठेवल्या. या वस्तूंमध्ये रंगीबेरंगी लाखकाम ऐकलेली
लाकडी खेळणी, भोवरे, स्वैपाकघरात वापरण्याची उलथणी, ताक घुसळायची रवी, लाटणी, अश्या
अनेक गोष्टी होत्या. कलेचे प्रात्यक्षिक झाल्यावर आम्ही त्यांच्या वस्तू विकत घ्याव्यात
म्हणून ही तात्पुरती दुकाने तयार झाली होती. आम्ही अर्थातच काही वस्तू विकत घेतल्या.
पण खरेदी तरी किती करायची? मला ह्या वस्तीतल्या सर्वच कुटुंबांची कीव यायला लागली.
गंमत म्हणजे इथल्या कोणत्याही विक्रेत्या महिलेने वस्तू विकत घ्याव्यात असा आग्रह किंवा
आर्जवे केली नाहीत. लाखेच्या रंगकामाँचे प्रात्यक्षिक करून दाखवलेल्या माणसाने आम्हाला
आवर्जून सांगितले की पंतप्रधान मोदींमुळे आम्हा कारागिरांच्या परिस्थितीत खूप सुधारणा
झाली आहे. ते आमच्या गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कच्छ मधील पर्यटनाला प्रोत्साहन
दिल्यामुळेच हे चांगले दिवस आम्हाला बघायला मिळत आहेत. अमिताभ बच्चन साहेबानी केलेल्या
जाहिरातींमुळे देखील इथले पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परदेशी पर्यटकांमुळे आम्हाला
बऱ्यापैकी पैसे मिळतात. आता आमची कला जगभरात प्रसिद्ध झाली आहे.' मी विचारले 'ही लाख
कशी तयार करतात?' मी त्याच्या कलेत रस घेऊन प्रश्न विचारतोय हे बघून तो उत्साहित होऊन
म्हणाला ' लाख ही एका विशिष्ठ प्रकारच्या किड्यांच्या लाळेपासून तयार होते. हा कीड
आपल्या पिंपळ, वड, बोर, पळस या वर्गातील काही देशी झाडांवर आढळतो. हा कीडा अतिशय बारीक
आकाराचा असून तो झाडांचा रस शोषून जगत असतो. स्वसंरक्षणासाठी तो आपल्या तोंडातून लाळेसारखा
द्राव सोडत असतो. या लाळेचा घट्ट झालेला थर म्हणजे लाख. या लाखेत निरनिराळे रंग मिसळून
लाकडी वस्तूंवर चढवले जातात. फक्त लाखेच्या बांगड्या किंवा काही खेळणी देखील आम्ही
बनवतो. रंगकामात लाखेचा उपयोग करण्याचे प्रमुख कारण म्हणजे लाखेमध्ये असलेला नैसर्गिक
चमकदारपणा !' मी उत्सुकतेने माहिती ऐकत होतो. कच्छ च्या रुक्ष वाळवंटात शेती फारशी
होत नाही. अशा परिस्थितीत इथल्या लोकांच्या उपजीविकेसाठी ह्या अशा हस्तकला महत्वाच्या
ठरतात. विशेषतः इथल्या महिला वर्गाला या हस्तकलांमुळे रोजगाराचा अजून एक मार्ग उपलब्ध
होतो. या वस्तीतून परत जाताना मी मागे वळून पहिले असता तात्पुरती मांडलेली दुकाने पुन्हा
बंद केली जात असताना मला दिसली. मन काहीसे उदास झाले. वाटले आपल्या सारख्या शहरी लोकांना
सर्व सोयी सुविधा सहज उपलब्ध असून आपण कायम कुठल्यातरी दुःखात असतो पण इथले लोक इतक्या
दुरवर रखरखत्या वाळवंटातसुद्धा आनंदात, समाधानात जगत आहेत.
कडिया
ध्रो:
निरोना गावात फिरता फिरता दुपारचे
दोन अडीच वाजून गेले होते. आमचे गाईड आम्हाला म्हणाले 'आता आपल्या टूर प्रोग्रॅम मधील
'कडिया ध्रो' नावाच्या ठिकाणी जायचे आहे. पण तिथे तुम्ही गेला नाहीत तरी चालेल. कारण
हे ठिकाण तसे निर्मनुष्य असते. या रुक्ष ठिकाणी बघण्यासारखे काहीही नाही. त्यापेक्षा
तुम्ही थेट 'काला डुंगर' येथे जा. तिथला सूर्यास्त बघण्यासारखा आहे. या दोन्हीही ठिकाणी
माहिती देण्यासारखे फारसे काही नाही त्यामुळे माझी आवश्यकता नाही. तुमचे तुम्ही जाऊन
आलात तरी चालेल. मी आता परत भुजला गेलो तर चालेल का?' मोहित व्होरांना आम्ही परत जायला
परवानगी दिली आणि काय करावे? असा विचार करू लागलो. आमचा ड्रायव्हर घनश्याम उत्साही
होता, तो म्हणाला 'तुम्ही इतक्या लांबून कच्छ बघायला आलेला आहात तर 'कडिया ध्रो' नक्की
बघाच'. मग आमच्या गाईड साहेबांना निरोप देऊन आम्ही 'कडिया ध्रो' ला निघालो. भुज पासून
सुमारे ३५ कि.मी. अंतरावर असलेले 'कडिया ध्रो' पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण गुजरातचे 'ग्रँड कॅनियन' म्हणून ओळखले
जाते. कच्छी भाषेत कडिया म्हणजे शहर आणि ध्रो म्हणजे नदीच्या पात्रात आढळणारे छोटे
छोटे तलाव. कडिया ध्रो हे कच्छ मधील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून देखील इथे भारतीय
पर्यटक फिरकतच नाहीत. कारण इथे नसलेल्या सोयी सुविधा.
![]() |
गुजरातचे 'ग्रँड कॅनियन' |
निरोना गावातून अर्ध्या पाऊण
तासातच आम्ही ‘कडिया ध्रो’ ला पोहोचलो. पण त्याआधीचा पाच सात किलिमीटरचा रस्ता महाभयंकर
आहे. हा रस्ता कच्चा आणि अति खडबडीत असल्यामुळे हा शेवटचा टप्पा जीप मधूनच करावा लागतो.
आमचे अंग अगदी खिळखिळे झाले. हादऱ्यांमुळे अंग दुखायला लागले. मनात विचार आला गाईडचे
ऐकले असते तर बरे झाले असते. मात्र प्रत्यक्ष जागेवर पोहोचल्यावर आम्ही खुश झालो. इथल्या
नदीवर निसर्गाचा एक चमत्कार दिसतो. लाखो वर्षांपासून वाहणाऱ्या इथल्या नदीच्या प्रवाहामुळे
खडक झिजून नदीच्या पात्रातील खडकांमध्ये आश्चर्यकारक आकार तयार झाले आहेत. नदी दगड
कापत खोल गेली आहे. इथले खडकातील आकार, खाचखळगे बघण्यासारखे आहेत. दुर्दैवाने पर्यटक
नसल्यामुळे इथे कमालीची शांतता होती. मात्र निसर्गप्रेमींना हे आवडण्यासारखे ठिकाण
आहे. ट्रेकिंग प्रेमी, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करणाऱ्या मंडळींसाठी हे आदर्श ठिकाण
आहे. मात्र इथे भेटलेल्या एका माणसाने सांगितले कि या नदीत मगरीचे वास्तव्य आहे त्यामुळे
जरा जपूनच. त्यामुळे आम्ही पाण्यात जायचे टाळले.
महाराष्टात पुण्याजवळ नगर जिल्ह्यातील निघोज गावाजवळून वाहणाऱ्या कुकडी नदीवर पाण्याच्या
घर्षणाने तयार झालेले रांजणखळगे दिसतात. अर्थात इथे कडिया ध्रो ला असे दगडातले नक्षीकाम
खूपच मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या गाईडचे ऐकून आम्ही इथे आलो नसतो तर एक नैसर्गिक आश्चर्य
बघायचं राहून गेलं असतं.
कालो डुंगर:
आता सूर्य पश्चिमेकडे सरकू
लागला होता. भुज पासून १०० कि.मी अंतरावरील कालो डुंगर या ठिकाणी सूर्यास्ताच्या थोडं
आधी पोहोचणं आवश्यक होतं. घनश्याम ड्रायव्हरने 'आपण वेळेवर पोहोचू, काळजी करू नका'
असं आम्हाला आश्वासन दिलं. आमची इनोव्हा वेगाने कालो डुंगर कडे धावू लागली. स्थानिक
भाषेतला कालो डुंगर म्हणजे काळा डोंगर किंवा ब्लॅक हिल हे कच्छ मधील सर्वोच्च ठिकाण.
हे ठिकाण समुद्रसपाटीपासून फक्त ४६२ मीटर एवढ्याच उंचीवर आहे. थोडक्यात म्हणजे ही एक
छोटीशी टेकडी आहे. या टेकडीवर जाताना रस्त्यामध्ये एका चुंबकीय क्षेत्राचा गंमतशीर
अनुभव आला. या रस्त्यावर च्या एका भागात घनश्यामने आमची कार न्यूट्रल मध्ये ठेऊन बंद
करून उभी केली. इथे जमिनीतील चुंबकीय क्षेत्रामुळे आमची कार मागे मागे जाऊ लागली. काही
सेकंदात गाडीने थोडा वेग देखील पकडला. अशाच प्रकारचा अनुभव आम्ही लडाख मधील लेह जवळच्या
रस्त्यावर देखील घेतला होता.
![]() |
कालो डुंगर |
सूर्यास्तापूर्वी सुमारे अर्धापाऊण
तास आम्ही या डोंगरावर पोहोचलो. इथे सुरवातीलाच एक दत्तात्रयाचं मंदिर आहे. हे मंदिर
अंदाजे ४०० वर्ष जुनं आहे असं म्हणतात. या ठिकाणी इथल्या पारंपरिक गाणी म्हणणाऱ्या
लोकांचा एक ग्रुप बसला होता. मी नेहेमीप्रमाणे तिथे रेंगाळलो. कच्छ मध्ये आल्यापासून मला अशा गाण्यांचे विलक्षण
आकर्षण वाटतंय. बाकी या डोंगरावर फारसं विशेष काही नाही. धार्मिक लोकांसाठी दत्तमंदिर
आणि आमच्या सारख्या निसर्गप्रेमींसाठी कच्छ च्या रणा चे थोडे उंचावरून विहंगम दर्शन.
हा काळा डोंगर पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ म्हणजे फक्त ५० कि.मी. अंतरावर आहे. या
ठिकाणाहून पुढे जाण्यास पर्यटकांना मनाई आहे. या डोंगरावरून कच्छ चे रण फारच अफाट दिसते.
विशाल पांढऱ्या रणाच्या पार्श्वभूमीवर क्षितिजावरून अस्ताला जाणारा सूर्य बघणे म्हणजे
केवळ आनंद! इथे फारसं काही नसलं तरी आमची संध्याकाळ
मात्र फार सुरेख गेली. रिझॉर्ट मध्ये परतताना अंधार पडला होता. आज दिवसभर उन्हात फिरल्यामुळे
आम्ही सर्वच जण दमलो होतो. हर्षवर्धनला ताप आला होता.. जेवण करून हर्षवर्धन ला क्रोसीन देऊन
आम्ही झोपी गेलो.
![]() |
कालो डुंगर येथील सूर्यास्त |
दिवस चौथा:
कच्छ चे अद्भुत पांढरे वाळवंट:
सकाळी उठल्यावर लक्षात आले की हर्षवर्धन तापाने फणफणला होता. तापामुळे त्याला अशक्तपणा देखील आला होता. तो म्हणाला 'मी आज रिझॉर्ट मधेच विश्रांती घेतो, तुम्ही फिरून या.' अनुजाने स्वाभाविकपणे हर्षवर्धन बरोबर रिझॉर्टमध्येच राहायचं ठरवलं. आज कच्छ चे रण, तिथला रणोत्सव बघायचा होता. आम्ही काळजीत पडलो. अनुजा म्हणाली 'आपण दुपारपर्यंत वाट बघुयात. औषध घेऊन अजून थोडी विश्रांती झाली की त्याला बरे वाटेल. तुम्ही काळजी करू नका.' मग आम्ही दोघांनीच जवळच्याच होडका गावात जायचे ठरवले. आज सकाळी होडका गावातून फेरफटका मारून संध्याकाळी हर्षवर्धन ला बरे वाटले तर कच्छच्या रणामध्ये जायचे असे आम्ही ठरवले. सकाळचा नाश्ता करून रिझॉर्टपासून जवळच असलेल्या होडका गावात निघालो. जाताना रस्ते नेहेमीप्रमाणे निर्मनुष्य होते. होडका गावात देखील अशीच परिस्थिती होती. सगळीकडे शुकशुकाट. इथं काय बघायचं? तेच आम्हाला कळेना.
मग त्या गावातल्या (गाव कसलं, वस्तीच म्हणायला हवी)
एक छोट्या चौकात दोन तीन खेडूत गप्पा मारताना दिसले. आमच्या ड्रायव्हरने त्याच्याशी
संवाद साधून 'तुमचे गाव बघायला हे पाहुणे आलेले आहेत. तुमचे गाव, कला ह्यांना दाखवाल
का?' अशी विचारणा केली. त्यातले दोघे हसून लगबगीने उठले आणि आमच्याबरोबर चालू लागले.
गावातली बहुतेक घरे भुंगा पद्धतीची गोल आणि मातीपासून बनवलेली होती. कुठेतरी घरासमोर
बसलेल्या बायका आम्हाला पाहून डोक्यावरचा पदर चेहेऱ्यावर पुढे ओढत घरात निघून गेल्या.
या स्त्रियांच्या अंगावरचा पेहेराव रंगीबेरंगी आणि कलाकुसरीचे विणकाम केलेला होता.
त्यातील एकीच्या अंगावर मोठे मोठे, जड दागिने घातले होते. माझ्यातला फोटोग्राफर जागा
झाला. मी आमच्या बरोबर असलेल्या माणसाला त्या बायकांचे फोटो काढायची इच्छा सांगितली.
त्या माणसाने त्या बायकांशी बोलून मला फोटो काढायची परवानगी दिली. मी त्या बायकांच्या
जवळ गेल्यावर लक्षात आले की त्या तरुण मुली आहेत. मी पुन्हा त्या मुलींची परवानगी काढून
त्यांचे फोटो काढले. फोटो काढताना त्या काहीश्या लाजत होत्या.
आमच्या बरोबर आलेल्या माणसाचे
नाव 'वासिमभाई' होते. वासिमभाई गपिष्ट होते. होडका गावात फिरत फिरत त्यांनी गावाची
बरीच माहिती सांगितली. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजने अंतर्गत ग्रामीण संस्कृतीच्या
विकासासाठी आणि ग्रामीण भागातील समुदायांच्या आर्थिक विकासासाठी कच्छ मधील बऱ्याच छोट्या
गावांना प्राधान्य दिले गेले होते. त्यातील होडका ह्या गावाला सरकार कडून खूप मदत मिळाली
होती. आधीपासूनच इथं अस्तित्वात असलेल्या स्थानिक कौशल्याचा फायदा घेऊन इथल्या लोकांचे
राहणीमान उंचावण्यास त्यामुळे खूप मदत झाली. कच्छ वाळवंटातील बन्नी नावाच्या भागात
होडका सहितअसलेली ३५ गावे या प्रकल्पात सामील करण्यात आली. येथील बहुतेक सर्व रहिवासी
मुस्लिम धर्मीय असून बहुतेक सर्वजण 'मालधारी' म्हणजे गुरे पाळणारे आहेत. या सर्व भागात
उत्कृष्ठ भरतकाम करणारे आणि चामड्याच्या वस्तू करणारे कारागीर आहेत. २००१ मधील भूकंपानंतर
झालेल्या मदतकार्यात होडका गावाला अनेक तंबू मिळाले होते. सुरवातीला पर्यटकांसाठी ह्या
तंबूचा वापर करून काही निवासस्थाने उभारण्यात आली. इथल्या वाळवंटी जंगलाची साफसफाई
करून ही निवासस्थाने उभारण्यात आली. मग काही समाजसेवी संस्थांनी राहण्यासाठी जागा निश्चित
करणे, गोलाकार मातीची घरे बांधणे, ही घरे आतून सुसज्ज करण्यासाठी मदत करणे वगैरे संकल्पना
इथे राबवल्या. या गावाला लागूनच इथे पर्यटकांसाठी अनेक रिझॉर्टस बांधण्यात येऊन इथल्या
स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्यात आली. पर्यटकांना सेवा कशी द्यायची, त्यांच्याशी
कसे बोलायचे याचे इत्यंभूत शिक्षण देखील इथल्या ग्रामस्थांना देण्यात आले. आम्ही राहत
असलेले 'शाम ए सरहद' हे रिझॉर्ट देखील ह्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. होडका गावाच्या
आजूबाजूला अनेक हाय-एन्ड सुविधा असलेली रिझॉर्टस आहेत.
गप्पा मारता मारता वासिमभाई आम्हाला त्यांच्या घरी
घेऊन गेले. तिथे मी मघाशी फोटो काढलेल्या मुली
होत्या. त्या वासिमभाईंच्याच मुली होत्या असे समजले. घरातील एक खोलीतच त्यांचे दुकान
होते. मग एकापाठोपाठ एक कलाकुसरीची रंगीबेरंगी बेडशीट्स, ड्रेसेस, ओढण्या उशांचे अभ्रे,
लहान मुलामुलींचे कपडे, फॉक्स, छोट्या मुलींसाठी बांगड्या, हेअर क्लिप्स वगैरे समोर
येऊ लागले. अलकाने थोडेफार शॉपिंग केले. थोड्या वेळाने चहा आला. अतिशय नम्रपणे ही मंडळी
आम्हाला त्यांच्याकडील वस्तू दाखवीत होती. सोबतीने गप्पा सुरूच होत्या. वासिमभाई म्हणाले
'तुम्ही काहीही विकत घेतले नाही तरी चालेल. फक्त आमच्या कलापूर्ण वस्तू पहा, त्यांचे
कौतुक करा, तुमच्या पुण्यात जाऊन सगळ्यांना सांगा. एवढेच आम्हाला पुरेसे आहे.' बाहेर
आल्यावर इतर ग्रामस्थांशीही आम्ही गप्पा मारल्या. सर्वांच्या तोंडी एकाच नाव होते ते
म्हणजे 'नरेंद्र मोदी!' 'आमच्या कच्छच्या प्रगतीचे
शिल्पकार नरेंद्र मोदी हेच आहेत' असे सर्वांनी निक्षून सांगितले. (मी मोदींचा प्रचारक
नाही. अंधभक्त तर मुळीच नाही) असो...
![]() |
वसीमभाई आपल्या घरच्याच दुकानात. |
कच्छ चे रण:
होडका गावातील भटकंती संपता
संपता दुपारचा एक वाजून गेला. आम्ही पुन्हा आमच्या रिझॉर्ट मध्ये आलो. हर्षवर्धन अजूनही
झोपलाच होता. अनुजा कुठलेसे पुस्तक वाचत बसली होती. दुपारचे जेवण करण्यासाठी आम्ही
हर्षवर्धनला उठवले. विश्रांती आणि औषधामुळे त्याला आता बरे वाटत होते. ताप गेला होता.
जेवण करून आम्ही सर्वांनीच थोडी वामकुक्षी घेतली. चार साडेचार वाजता चहा घेऊन आम्ही
आमच्या कार मध्ये बसलो. आजची संध्याकाळ कच्छच्या रणात घालावयाची होती. निसर्गाचा एक
अद्भुत चमत्कार पुन्हा एकदा बघायचा होता. संध्याकाळी पाच वाजता आम्ही कच्छच्या रणावर
जिथे रणोत्सव साजरा केला जातो तिथे पोहोचलो. सुरवातीलाच पार्किंग ची भव्य आणि उत्तम
व्यवस्था केलेली दिसली. पार्किंगच्या लगेचच पुढे पर्यटकांच्या राहण्यासाठी अनेक तंबूंची
व्यवस्था केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इथले तंबू सर्व सोयी सुविधांसहित
तयार केलेले आहेत. श्रीमंत आणि परदेशी पर्यटकांसाठी
वातानुकूलित तंबू देखील इथे उपलब्ध असतात.
कच्च मधील रणोत्सव:
२००५ साली गुजरात पर्यटन मंत्रालयाच्या
वतीने रण उत्सवाला सुरवात करण्यात आली. देशी विदेशी पर्यटकांना इथल्या विशाल रणाकडे
आकर्षित करण्यासाठी अनेक उपाय योजले गेले गेले. सुरवातीला हा रणोत्सव तीन दिवसांचा
असे. पण पाहता पाहता या रणउत्सवाची ख्याती आणि लोकप्रियता इतकी वाढली की तीन दिवसांचा
हा राणोत्सव आता तब्बल चार महिने सुरु असतो. हा उत्सव नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत
साजरा केले जातो. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी रणामध्ये फेरफटका मारण्यासाठी सोयी, पारंपरिक
कलावस्तूंची प्रदर्शने, पारंपरिक नृत्यकला अनुभवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन आणि अर्थातच
स्थानिक चविष्ठ जेवण आणि खाद्यपदार्थांची रेलचेल असते. कच्छच्या रणामध्ये पौर्णिमेच्या
रात्री फेरफटका मारणे हा पर्यटकांसाठी विशेष आनंदाचा भाग असतो. कारण पौर्णिमेच्या रात्रीच्या
चंद्रप्रकाशात हे मिठाचे पांढरे वाळवंट अक्षरशः चमकत असते. चंद्रप्रकाशात अक्षरशः उजळून
निघते. हा नजारा अद्भुत दिसतो. रात्रीच्या वेळी चंद्राचा प्रकाश पांढऱ्या शुभ्र मिठाच्या
स्फटिकावरून परावर्तित होऊन चमकत डोळ्यांना सुखावतो.
आम्ही आमची कार पार्किंग मध्ये
लावून रणाकडे निघालो. पण असे लक्षात आले की अजून एक दिड कि.मी. हे रण पुढे आत आहे.
हर्षवर्धनची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही एक उंटाची गाडी करून प्रत्यक्ष रणापर्यंत
पोहोचलो. थेट क्षितिजापर्यंत पांढरे शुभ्र मिठच मीठ, जिकडे बघावं तिकडे फक्त मीठ! दुसरे
काहीही नाही. निसर्गाच्या या अद्भुत मिठाच्या वाळवंटात आम्ही चालायला सुरवात केली.
सुरवातीच्या पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आतमध्ये आम्ही चालत गेलो. पांढऱ्या शुभ्र
मिठावरून चालताना कर्र कर्र असा आवाज होत होता. आजारपणाच्या थकव्यामुळे हर्षवर्धन अलका
आणि अनुजा सगळेच एके ठिकाणी बसले. मी मात्र हा निसर्गाचा मजेशीर आणि अचंबित करणारा
अविष्कार बघण्यासाठी दूरवर चालत गेलो आणि इथला अद्भुत नजारा, इथला डोळ्यात न मावणारा
आसमंत, आणि निरव शांतता अनुभवू लागलो. सूर्य आता पश्चिमेकडे झुकू लागला होता. रणा च्या
किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होती. अनेक पर्यटक इथल्या मिठाच्या वाळवंटात उंटावरून
सफर करण्याचा आनंद लुटत होते. जाड मोठ्या चाकांच्या मोटारसायकल वरून काही पर्यटक इथे
वेगवान सफारीचा आनंद लुटत होते. पर्यटकांसाठी इथे पॅराग्लायडिंगची देखील इथे सोय होती.
मावळतीच्या सूर्यबिंबाच्या पार्श्वभूमीवर दूरवर ही पॅराग्लायडर्स अप्रतिम दिसत होती.
इथला सूर्यास्त बघणे हा एक वेगळाच अनुभव आहे. हा अनुभव मी कधीही विसरणे शक्य नाही.
इथे देखील या वाळवंटात पारंपरिक गाणी गाणाऱ्या काही कच्छी गायक, वादक कलाकारांचा एक
ग्रुप आपली कला सादर करत होता. मी त्यांच्या समोर मांडी ठोकूनच बसलो. या सांगीतिक मेजवानी
मध्ये किती वेळ गेला ते कळलंच नाही. सुर्यास्तानांतर आम्ही पुन्हा उंटगाडीतून परत फिरलो.
आजचा आमचा या रिझॉर्टमधला शेवटचा मुक्काम होता. रिझॉर्ट मधील रात्रीचे रुचकर जेवण करून
आम्ही झोपी गेलो. मिटलेल्या डोळयात या पांढऱ्या शुभ्र वाळवंटाची दृश्ये तरळत होती.
दिवस पाचवा:
समारोप
का भेट द्यावी कच्छला?
आजचा आमचा कच्छ मधील शेवटचा
दिवस होता. पहाटे उगीचच जाग आली. डोक्यात कच्छच्या अद्भुत नैसर्गिक चमत्काराचेच विचार
येत होते. आज सकाळीच लवकर आम्ही नाश्ता करून आवरून चेकआऊट करून परतीच्या प्रवासास लागलो.
कारण पुन्हा तोच अहमदाबाद पर्यंतचा कंटाळवाणा प्रवास होता. रात्री आठ वाजता आमची अहमदाबाद
ते पुणे अशी फ्लाईट होती. परतीच्या प्रवासात कुटुंबातील इतर मंडळींच्या गप्पात माझे
लक्ष लागत नव्हते. मनात सारखे कच्छ च्या रणा बद्दलचे विचार सुरु होते. मग प्रवासादरम्यान
गुगलवर कच्छच्या रणाच्या निर्मितीचे रहस्य उलघडतंय का ते पाहू लागलो. बघता बघता बरीच
माहिती मिळाली. शिवाय भूगोल माझा आवडता विषय असल्याने पृथ्वीवर अनेक भौगोलिक स्थित्यंतरे
घडत असतात हे मला माहिती होते. शिवाय गेल्याच महिन्यात लोकसत्तेत प्रसिद्ध झालेल्या
श्री एल. के. कुलकर्णी यांच्या लेखातून या भौगोलिक स्थित्यंतरांविषयी बरीच उद्बोधक
माहिती देखील मिळाली होती.
'प्राचीन काळात पर्वत हे स्थिर
असून, ज्या भूमीवर हे पर्वत उभे आहेत ती जमीन देखील जड आणि स्थिर आहे' असाच लोकांचा
समज होता. भूमी ला कधीही हलवणे किंवा ती हलणे शक्य नाही असे मानले जायचे. या कल्पनेला
सुमारे ३०० वर्षांपूर्वी तडा गेला. १७ व्या शतकात इटली मधील 'निकोलस स्टेनो' नावाच्या
संशोधकाला फ्लोरेन्स जवळील एका डोंगरावरील खडकांच्या थरात सागरी जीवांचे जीवाश्म (फॉसिल्स)
सापडले. पण त्याच्या ह्या निरीक्षणाची नोंद जगाने घेतली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर
१९१२ मध्ये 'वेगेनर' यांचा 'खंड निर्मितीचा' सिद्धांत पुढे आला. सध्याच्या खंडांचे
बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, खंडांचे समोरासमोरचे किनारे एकमेकांशी
तंतोतंत जुळतात. उदा. दक्षिण अमेरिकेचा पूर्वेकडील किनारा आफ्रिका खंडाच्या पश्चिम
किनाऱ्याशी तंतोतंत जुळतो. युरोपचा पश्चिमेकडील स्पेन, पोर्तुगाल इ. भाग मेक्सिकोच्या
आखाताबरोबर जुळतो. यावरून कधीतरी (सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी) पृथ्वीवरील खंड
एकमेकांबरोबर जोडलेले होते. नंतरच्या कोट्यवधी वर्षांच्या काळात ते एकमेकांपासून दूर
गेले. अमेरिका आणि आफ्रिका खंडांच्या एकमेकांपासून दूर जाण्यामुळे निर्माण झालेल्या
अटलांटिक समुद्रात खाली खोलवर एक निमुळती रिज किंवा खोल खाच किंवा दरी आहे. त्यावरून
सुद्धा या खंडांचे तुकडे एकमेकांपासून बाजूला जात आहेत या संकल्पनेला पुष्टी मिळते.
'वेगेनर' यांनी आपला सिद्धांत अनेक पुराव्यांच्या आधारावर जगाच्या समोर वारंवार मांडण्याचा
प्रयत्न केला. पण जगाने तो फेटाळून लावला. जगाने 'वेगेनर' यांचे म्हणणे खरे असल्याचे
त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ ३० वर्षांनी मान्य केले.
भारतातील भौगोलिक बदलांमुळे
झालेले आश्चर्यकारक बदल:
भारताच्या उत्तरेला असलेल्या
आपल्या हिमालय पर्वताच्या निर्मितीची प्रक्रिया देखील अशीच विस्मयकारक आहे. सुमारे
दीड कोटी वर्षांपूर्वी भारत ऑस्ट्रेलियाला जोडलेला होता. तेंव्हापासून भारताचा भाग
ऑस्ट्रेलिया पासून वेगळा होत उत्तरेकडे सरकू लागला. अंदाजे ३० लाख वर्षांपूर्वी तो
आशिया खंडाला जाऊन टेकला. आशिया खंड आणि भारताचा हा भाग यांची टक्कर होऊन त्यांच्या
मधील जमीन वर उचलली गेली आणि हिमालय तयार झाला. या हिमालयाच्या निर्मिती प्रक्रियेला
पुष्टी मिळण्याचे अजून एक कारण आहे, ते म्हणजे हिमालयातील उंच पर्वत शिखरांवर समुद्री
जीवांचे जीवाश्म सापडलेले आहेत. तात्पर्य असे की पृथ्वीवरील खंड, पर्वत, नद्या, समुद्र
यांच्या मध्ये अनेक भौगोलिक बदल घडत असतात. अर्थात हे बदल होण्याचा काळ खूपच सावकाश
असतो. इतरही काही कारणांनी असे भौगोलिक बदल घडतात असेही आपल्या लक्षात आले आहे. महाभयंकर
भूकंप, प्रलय आणणारी त्सुनामी, विनाशकारी वादळे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे
देखील भौगोलिक बदल घडतात.
गुजरातमधील ‘लुनी’ नदीची गंमत
आपल्याला माहिती आहेच की प्रत्येक
उगम पावलेली नदी शेवटी कुठल्याना कुठल्या समुद्राला जाऊन मिळते. मात्र भारतातील अशी
एक नदी आहे की ती समुद्राला कधीच मिळत नाही. राजस्थानातील अजमेर येथून उगम पावलेली
एकमेव ‘लुनी’
ही नदी जी राजस्थानातील आजूबाजूच्या प्रदेशाला सुपीक करत गुजरात मध्ये प्रवेश करते
आणि गुजरात च्या कच्छच्या वाळवंटात पसरते आणि बाष्पीभवन होऊन विरून जाते. ती समुद्राला
मिळतच नाही. लुनी नदीचं वैशिष्ठ्य म्हणजे अजमेरपासून बाडमेर पर्यंत या नदीचं पाणी गोड
आहे. मात्र, तेथून पुढे गेल्यावर नदीचं पाणी प्रचंड खारं होतं. यामागील प्रमुख कारण
आहे ते म्हणजे राजस्थानमधून वाहताना तेथील वाळवंटातून मिठाचे कण पाण्यात मिसळतात. त्यामुळे
नंतर पुढे जाऊन गुजरातमध्ये या नदीचं पाणी प्रचंड खारं होतं. नदीच्या खाऱ्या पाण्यामुळेच
या नदीला ‘लुनी’ नदी असं नाव देण्यात आलंय. लुनी हे नाव संस्कृतच्या लवणगिरी शब्दापासून
घेण्यात आल्याचं सांगितलं जातं. लवणगिरीचा अर्थ खाऱ्या पाण्याची नदी असा आहे.
कसे बनले कच्छचे रण?
गुजरात आणि पाकिस्तानच्या सीमेवर पसरलेल्या सिंध प्रांतात सुमारे २६००० स्क्वे. कि.मी. क्षेत्रात कच्छचे रण पसरलेले आहे. पूर्वी हे रण (वाळवंट) अरबी समुद्राचा एक भाग होते. अरबी समुद्राला या भागातून अनेक नद्या मिळत होत्या. जून १८१९ मध्ये या भागात एक शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे या भागात दोन महत्वाचे भौगोलिक बदल झाले. एक म्हणजे येथील अरबी समुद्राचा तळ जवळ जवळ ९ मीटर एवढा वरती आला. त्यामुळे या भागातल्या नद्यांनी आपली दिशाच बदलली. त्यामुळे पाण्याअभावी हा भाग कोरडा ठक्क पडून रुक्ष वाळवंट बनला. याआधी लाखो वर्षे येथे समुद्राचे खारे पाणी असल्यामुळे या जमिनीत क्षाराचे प्रमाण भरपूर आहे. या भागात भारतातल्या इतर भागाप्रमाणे मोसमी पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या मोसमी पावसामुळे आणि काही नद्यांच्या प्रवाहामुळे या वाळवंटात पाणी साठते, जे अतिशय उथळ असते. दोन तीन फूट पाणी साठलेल्या अवस्थेत हे पाणी काही काळ इथे राहते. कोरड्या किंवा उन्हाळ्याच्या हंगामात या पाण्याचे प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन होते. बाष्पीभवन होताना सुरवातीला या भागात मिठाच्या पाण्याची दलदल तयार होते. नंतर फक्त कोरडे मीठ उरते. कच्छचे वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट मानले जाते. अश्या जगातील आश्चर्यकारक कच्छला प्रत्येकाने भेट द्यायलाच हवी. भौगोलिक आश्चर्या व्यतिरिक्त कच्छला भेट देण्यासाठी अनेक गोष्टी सांगता येतील. जसे येथील कला, संस्कृती, इतिहास यांनी समृद्ध असे जीवन, स्थानिक लोकांमधील असलेली अगत्यशील वागणूक, येथील खाद्य संस्कृती आणि या सर्वांना जगाच्या पातळीवर प्रसिद्धीस आणणाऱ्या सरकारी यंत्रणांचे प्रामाणिक प्रयत्न हे सर्वच अफाट आहे. प्रत्येक भारतीयाने हे सर्व अनुभवायलाच हवे.
![]() |
अहमदाबाद मधील 'अटल ब्रिज' |
विचार करता करता आम्ही संध्याकाळी साडेचार पाच वाजता अहमदाबादला कधी आलो ते कळलंच नाही. विमानाला अजून थोडा वेळ होता हर्षवर्धन अनुजाला अहमदाबादचा नवीन झालेला 'अटल ब्रिज' बघायचा होता. आम्ही तिथे जाऊन थोडे रेंगाळलो. हर्षवर्धन ची तब्येत आता ठणठणीत झाली होती. रात्रीच्या आठच्या विमानाने आम्ही पुण्यात आलो. घरी आल्यावर झोपायला जाताना माझ्या प्रवासी बकेट लिस्ट मधील नाराज झालेल्या चिठ्यांकडे थोडे दुर्लक्षच करून आम्ही झोपी गेलो.
राजीव जतकर.
३१ मार्च २०२४
![]() |
कच्छचे रण आणि सूर्यास्त |
-समाप्त-