'जमी जमाई व्यवस्था कोई बदलना ही नहीं चाहता' - 'टवेल्थ फेल'
![]() |
मनोजकुमार शर्मा यांच्या भूमिकेत: विक्रांत मेस्सी |
आय पी एस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या 'टवेल्थ फेल' अर्थात ‘१२ वी नापास’ या चित्रपटातील वरील डायलॉग प्रेक्षकांना आत्ममग्न करतो. विचार करायला भाग पाडतो. अनेक सामान्य माणसांना ही तथाकथित 'जमी जमाई' सामाजिक व्यवस्था रोजच्या जगण्याला त्रास देत असते, पण ती बदलायला मात्र कुणाला नको असते. कारण एक तर हे भ्रष्ट व्यवस्था बदलण्याचे धाडस कुणात नसते आणि दुसरे म्हणजे ही व्यवस्था सगळ्यांच्या सोयीची पण असते. हा चित्रपट आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडला जातो. या पार्श्वभूमीवर निर्माता, दिग्दर्शक विधू विनोद चोप्रांचा 'टवेल्थ फेल' हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी दिग्दर्शकाने कमालीच्या संयत पद्धतीने विषय हाताळला आहे. हा चित्रपट अनुराग ठाकूर यांच्या १२वी फेल या पुस्तकावर आधारित आहे. आयपीएस अधिकारी 'मनोजकुमार शर्मा' आणि त्यांची सुविद्य पत्नी 'श्रद्धा जोशी' यांचा हा बायोपिक आहे असंही म्हणायला हरकत नाही.
ह्या चित्रपटाच्या निमित्ताने समाजात वाढत चाललेला भ्रष्टाचार, शैक्षणिक क्षेत्रातील नीतिमूल्यांचा ऱ्हास वगैरे गोष्टी ऐरणीवर आणल्या गेल्या आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. या परीक्षांमध्ये चांगले मार्क्स घेऊन प्रत्येकाला पुढील आयुष्यात स्वतःचे भविष्य घडवायचे असते. जीवघेण्या स्पर्धेमुळे ह्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे अति महत्वाचे असल्यामुळे विद्यार्थी येन केन प्रकारेण परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रसंगी कॉपी देखील करतात. कॉपी करणे आजकालच्या काळात कुणाला गैर वाटेनासे झाले आहे. शाळांचा निकाल चांगला लागण्यासाठी शिक्षक सुद्धा कॉपीला प्रोत्साहन देताना दिसतात. गंमत म्हणजे विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच विद्यार्थ्यांच्या पास होण्याची काळजी वाटत असते. विशेषतः ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर शिक्षक स्वतःच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना सांगत असतात. एव्हडेच काय काही ठिकाणी तर परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी करण्याची मुलांना परवानगी दिली जाते. अशा ठिकाणी वर्गातील फळ्यावर प्रश्नांची उत्तरे लिहून दिली जातात. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, परीक्षा केंद्र संचालक, शाळा चालवणारे राजकीय पुढारी असे सर्वच जण सामील असतात.
![]() |
निर्माता दिग्दर्शक: विधू विनोद चोप्रा |
हा चित्रपट आयपीएस मनोजकुमार शर्मा यांचा बायोपिक असला तरी उच्चशिक्षणाचे स्वप्न बघणाऱ्या खेडेगावातील विद्यार्थ्यांचं तो प्रतिनिधित्व करतो. पार्श्वसंगीत, संकलन, छायाचित्रण, संवाद, दिग्दर्शन अशा सर्वच पातळ्यांवर या चित्रपटाची भट्टी चांगलीच जमली आहे. निर्माता दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या कारकिर्दीतील परिंदा, १९४२ अ लव्ह स्टोरी, मुन्नाभाई एमबीबीएस, परिणीती, थ्री इडियट्स अशा यशस्वी आणि गाजलेल्या चित्रपटांच्या मालिकेतील 'टवेल्थ फेल' या चित्रपटाचे स्थान 'उपरकी पादानपे' आहे असेच म्हणावे लागेल.
![]() |
मनोजकुमार यांना प्रेरणा देणाऱ्या डीएसपी दुष्यंतकुमार यांची भूमिका करणारे अभिनेते : प्रियांशु चॅटर्जी |
या चित्रपटाची अभिनयाची बाजू अतिशय भक्कम आहे. मनोज कुमार शर्मा यांची भूमिका प्रभावीपणे वठवणारा 'विक्रांत मेस्सी' या गुणी कलाकाराचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. विक्रांत मेस्सी याच्या करियरची सुरवात टीव्ही मालिकांपासून सुरु झाली. 'मिर्झापूर' या वेबसिरीज मुळे विक्रांतला खरी ओळख मिळाली. या वेबसिरीज मधील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. टवेल्थ फेल या चित्रपटासाठी ६९ व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात त्याला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. 'मेधा शंकर' या अभिनेत्रीने मनोजकुमार यांची प्रेयसी श्रद्धा जोशी यांची भूमिका साकारली आहे. तिच्या साधेपणाने साकारलेल्या आणि दमदार अभिनयाने ती प्रेक्षकांची मने जिंकते. मेधा शंकर या अभिनेत्रीने मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून आपल्या करियरची सुरवात केली. अनेक चित्रपट समीक्षकांनी तिची विशेष दाखल घेऊन तिचे कौतुकही केलंय. मनोजकुमार शर्मा यांना प्रेरणा देणाऱ्या डीएसपी दुष्यंतकुमार यांची भूमिका करणारे, हिंदी आणि बंगाली चित्रपटातून आपला ठसा उमटवणारे 'प्रियांशु चॅटर्जी' हे त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतात. 'अंशुमन पुष्कर' हा माझा आवडता नट. या अंशुमन पुष्करला मी पहिल्यांदा 'ग्रहण' नावाच्या एका वेब सिरीज मध्ये पाहिलं होतं. टवेल्थ फेल या चित्रपटात, स्वतः परीक्षेत नापास होऊनही इतर विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या 'गौरीभय्या' ची भूमिका अंशुमन ने जबरदस्त साकारली आहे. मनोजकुमारचे वडील अतिशय प्रामाणिक असतात. प्रामाणिकपणामुळे त्यांची नोकरी गेलेली असते. त्यातच मनोजकुमार १२ वीत नापास होतो. 'हरीश खन्ना' या अभिनेत्याने मनोजकुमारच्या वडिलांची होणारी घुसमट अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे. 'गीता शर्मा अगरवाल' या अनुभवी अभिनेत्री मनोज च्या आईच्या भूमिकेत चमकल्या आहेत. त्यांचे काम देखील वाखाणण्याजोगे आहे.
![]() |
श्रद्धा जोशी यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री: मेधा शंकर |
'टवेल्थ फेल' या चित्रपटाच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी एक म्हणजे या चित्रपटातील विचारप्रवृत्त करणारे संवाद ! काही प्रसंग आणि त्यातील संवाद आपल्या अक्षरशः अंगावर येतात. आपण सुन्न होऊन जातो. मनोजकुमारांचा आयपीएस साठीचा इंटरव्हियू चा प्रसंग मी कमीतकमी वीसपंचवीस वेळा तरी पहिला असेल. (ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मचा हा असा एक फायदा. आवडलेला प्रसंग पुन्हा पुन्हा पाहता येतो. हा चित्रपट 'डिस्ने हॉटस्टार' या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.) या संपूर्ण प्रसंगाचे चित्रण, पार्श्वसंगीत संवाद कुठल्याही संवेदनशील माणसाला निशःब्द करेल ह्यात शंकाच नाही.
एका प्रसंगात पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या मनोजकुमारला भेटायला त्याची प्रेयसी 'श्रद्धा' येते. त्यावेळी तिथे काहीसा अंधार असतो. ते बघून श्रद्धा मनोजकुमारला म्हणते 'इतक्या कमी उजेडात तू अभ्यास कसा काय करणार?' त्यावेळी मनोज तिला सांगतो 'मेरे पापा केहेते थे की बाहरके अंधेरेसे नही, अपने अंदरके अंधेरेसे डरो ! सुविधाओंके लालच में समझोतोंका अंधेरा!' अशा अतिशय आशयपूर्ण संवादांनी चित्रपट वेगळीच उंची गाठतो.
![]() |
मनोज च्या वडिलांचे काम करणारे 'हरीश खन्ना' |
काही ठिकाणी हा चित्रपट आपल्याला भावुक करतो. पिठाच्या गिरणीत काम करत असताना एकदा मनोजकुमारचे वडील त्याला भेटायला येतात. तेंव्हा ते परिस्थितीमुळे पार मोडून गेलेले असतात. प्रामाणिपणे जगण्याच्या लढाईत ते हरलेले असतात. ते मनोजकुमारला म्हणतात 'सोचा था बेईमानीके खिलफा डट के खडा राहुंगा, तो आखिर में जीत सच्चाईके ही होगी ! बेईमानी के खिलाफ लढते लढते मैने आपना घर बरबाद कर दिया ! मैं हार गया बेटा ! हम वापस घर चालते है ! सब बेकार है ये इमानदारीकी लढाई !' त्यावर मनोज वडिलांना धीर देतो 'इतनीभी बेकार लढाई नही है पिताजी !' ह्या हृदयद्रावक प्रसंगात वडिलांचे डोळे पुसत मनोज त्यांनीच लहानपणी शिकवलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण करून देतो.
टूटे हुवे सपनोंकी, सुने कौन सिसकी !
अंतर को चीर व्यथा, पलकोंपर ठिठकी !
हार नही मानूंगा, रार नही ठानूंगा !
काल के कपाल पर, लिखता मिटाता हुं !
गीत नया गाता हुं...
गीत नया गाता हुं...
या प्रसंगात वाजपेयी यांच्या प्रेरणादायी कवितेचा अतिशय सुंदर पद्धतीने चपखल वापर केला गेलाय. ह्या प्रसंगात मनोज च्या वडिलांचे काम करणारे 'हरीश खन्ना' आपल्या अभिनयाची चुणूक दाखवतात. मनोज आणि त्याची आई यांचेही काही प्रसंग मनाचा ठाव घेतात. या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अर्थपूर्ण आहे. एका प्रसंगात मनोज निराश होऊन रस्त्यावर बसलेला असतो आणि त्याच्या मागील आरशावर लिहिलेले असते.. 'हारा वही, जो लढा नही'.
![]() |
प्रत्यक्षातले आयपीएस श्री मनोजकुमार शर्मा आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी. |
हा चित्रपट पाहिल्यावर लगेचच समाजजागृती वगैरे होऊन समाजातील सर्वजण प्रामाणिकपणे वागायला सुरवात करतील अशी शक्यता नाही. तथापि चित्रपट पाहणारा प्रत्येक नागरिक चुकीचे वागताना क्षणभर का होईना आत्ममग्न होऊन थबकेल हे नक्की! प्रामाणिकपणे वागणे ही काही एकट्या दुकट्याची जबाबदारी नाही. सर्वांचीच आहे. पण किमान प्रेक्षकांच्या मनात चांगल्या विचारांची थोडीफार पेरणी करणारा हा चित्रपट आहे. विशेषतः समाजातील तरुणाईने हा चित्रपट बघायलाच हवा...
टीप: हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे.
राजीव जतकर.
२१ फेबुवारी २०२४.