Wednesday, 10 January 2024

व्हिएतनाम - लढवय्या लोकांचा देश

 

व्हिएतनाम - लढवय्या लोकांचा देश

 



आज सकाळी पहाटेच कसल्यातरी आवाजाने जाग आली. तशीही आजकाल झोप जरा कमीच झाली आहे. बेडरूम च्या कोपऱ्यात आवाजाच्या दिशेने सहजच लक्ष गेले. तिथे ठेवलेल्या माझ्या प्रवासाच्या लिस्टच्या बकेट मधील काही चिठ्या हालचाल करीत होत्या. एक चिठ्ठी जास्तच धडपड करीत बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होती. जवळ जाऊन बघितले तर ती चिठ्ठी 'व्हिएतनाम' ची होती. जणू ती म्हणत होती 'आता माझी पाळी. आता व्हिएतनामला जाऊयात.' नुकतेच गो-अराउंड' टूर कंपनीच्या मृणाल जोशींचा व्हाट्सअप (फोन नं.  ९६०४८४४९८५) वर कंबोडिया-व्हिएतनाम टूर चा प्रोग्रॅम आला होता. मग काय सकाळच्या चहा बरोबर अलका शी बोलून आम्ही व्हिएतनामची ट्रिप बुक करून टाकली.

 


आम्ही काही वर्षांपूर्वी गो-अराऊंड तर्फे कंबोडिया ची ट्रिप केली होती. गो-अराऊंड कंपनीच्या व्यवस्थापनाचा आम्हाला खूप छान अनुभव होता, कंबोडिया पाहिलेले असल्यामुळे आम्ही फक्त व्हिएतनाम ला जायचे ठरवले. गो-अराऊंड चे वैशिष्ट्य असे की यांच्या ट्रीपमधील प्रवाशांचे छोटे छोटे ग्रुप्स म्हणजे अगदी १५/२० लोकांचे ग्रुप्स असतात. त्यामुळे संचालिका मृणाल जोशी यांचे प्रत्येक पर्यटकावर वैयक्तिक लक्ष असते. खाण्यापिण्याची चंगळ तर असतेच, शिवाय राहण्यासाठी फोर, फाईव्ह स्टार हॉटेल्स ची व्यवस्था असते. शिवाय प्रत्येक ट्रिपबरोबर गो-अराउंड कंपनीच्या संचालिका मृणाल जोशी सुद्धा बरोबर असतात. बरेच प्रवासी वैयक्तिक ओळखीतून आलेले असल्यामुळे ट्रिप्स अगदी आरामदायी, हसत खेळत आणि धमाल होतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गो-अराउंड कंपनी तर्फे प्रत्येक देशातील एक इतिहास तज्ज्ञ ग्रुप बरोबर असतो  या वेळी आमच्याबरोबर इंडॉलॉजी विषयाचे तज्ज्ञ प्रो. 'डॉ. अंबरीश खरे' होते.  डॉ. अंबरीश खरे 'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'मध्ये इंडॉलॉजी विषयाचे प्रोफेसर असून, प्राचीन हिंदू संस्कृती, प्राचीन मंदिरे ह्या वर त्यांचा विशेष अभ्यास आहे. बृहत्तर भारत (भारताबाहेरील भारत) संस्कृतीवरील तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अशा तज्ज्ञ व्यक्तींमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने तो देश समजतो. अर्थात स्थानिक गाईडची देखील व्यवस्था असते. त्यामुळे आम्ही इतर टूर कंपन्यांच्या पर्यायांचा विचार देखील केला नाही. सातआठ वर्षांपूर्वी माझा मुलगा आणि सून कंबोडिया आणि व्हिएतनामला हनिमून साठी गेले होते. तोपर्यंत या दोन्हीही देशांबद्दल मला फारशी माहिती नव्हती. हनिमून वरून परत आल्यावर त्यांच्याकडून या देशांचे वर्णन ऐकून लगेचच आम्ही कंबोडियाला जाऊन आलो होतो. व्हिएतनाम बघायचेच होते. पण 'जाऊ पुन्हा कधीतरी' असं म्हणून गेलो नव्हतो आता तो योग्य जुळून आला होता.. 

 

 दिवस पहिला -

'हो ची मिन्ह' शहरातील मुक्काम.

आमचा व्हिएतनाम देशातील पहिला मुक्काम 'हो ची मिन्ह' या व्हिएतनामच्या अति दक्षिणेकडीलअसलेल्या शहरात होता. 'हो ची मिन्ह', दा नांग', आणि 'हानोई' या प्रमुख शहरांना आम्ही भेट देणार होतो. ही शहरे आणि आजूबाजूची प्रेक्षणीय पर्यटन स्थळे आमच्या टूर मध्ये समाविष्ट होती. मुंबईहून मध्यरात्री व्हिएतनाम एअरवेज कंपनीच्या विमानाने निघून आम्ही सुमारे तासाच्या प्रवासानंतर सकाळी 'हो ची मिन्ह' च्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. आमच्या 'नॉर्दन हॉटेल' च्या व्यवस्थापनाने आम्हाला हॉटेलवर घेऊन जाण्यासाठी गाडी पाठवली होतीच आमच्या ट्रीपमधील आमचे सहप्रवासी आज रात्रीच्या विमानाने कंबोडिया देश बघून आमच्याच हॉटेल मध्ये मुक्कामास येणार होते. त्यामुळे आजचा दिवस आम्हाला पूर्णपणे मोकळाच होता. सकाळची अंघोळ, नाष्टा हॉटेलमध्ये उरकून आम्ही 'हो ची मिन्ह' शहर बघायला, भटकायला बाहेर पडलो...

 


'हो ची मिन्ह' हे शहर व्हिएतनाम मधील सर्वात मोठे शहर असून या देशाचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे अर्थातच गर्दीने भरलेले रस्ते, निरनिराळी दुकाने, रेस्टोरंट्स, हॉटेल्स वगैरे अव्याहत सुरु असतात. हे शहर 'सायगॉन' किंवा सैगॉन नावाच्या नदीच्या काठावर वसलेले आहे. उभ्या लांबट आकाराच्या व्हिएतनामच्या दक्षिणेला जिथे सायगॉन नदी दक्षिण चीन च्या समुद्राला मिळते अशा ठिकाणी हे शहर वसलेले आहे. पूर्वी या शहराचे नाव सायगॉन असेच होते. एकोणिसाव्या शतकामध्ये हे शहर फ्रेंचांच्या अधिपत्याखाली होते. १९०२ पर्यंत हे शहर फ्रेंच इंडोचीन ची राजधानी होती. १९५५ ते १९७५ च्या दरम्यान च्या युद्धापर्यंत सायगॉन हे दक्षिण व्हिएतनामच्या राजधानीचे ठिकाण राहिले. या युद्धात हो ची मिन्ह या महान नेत्याच्या नेतृत्वाखाली लढलेल्या व्हिएतनामी सैन्याने दक्षिण व्हिएतनामच्या सत्तेत असलेल्या सरकारचा पराभव केला, त्यामुळे मे १९७५ रोजी सायगॉन या शहराचे नाव बदलून 'हो ची मिन्ह' असे ठेवण्यात आले.

 


शहरातून भटकताना हे शहर व्हिएतनामचे आर्थिक केंद्र असल्याचे जाणवत होते. विस्तीर्ण चकचकीत रस्ते, उंच उंच इमारती, भले मोठे चौक नजरेत भरत होते. लंडन शहरात आहेत तशा लाल रंगाच्या उघड्या, छत नसलेल्या डबलडेकर बसेस पर्यटकांना घेऊन शहर दाखवत होत्या. इथं दुचाकी स्कुटर्स चे प्रमाण बऱ्यापैकी जास्ती आहे असे जाणवले. रहदारी बऱ्यापैकी शिस्तीत सुरु होती. सर्व दुचाकीस्वार हेल्मेट घालून गाड्या चालवत होते. सार्वजनिक ठिकाणी बसवलेले विजेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर्स) अतिशय व्यवस्थित बसवलेले आणि उत्तम देखरेख केलेले दिसत होते. रस्त्यांच्या दुतर्फा स्ट्रीटफूड चे स्टॉल्स दिसत होते. या स्ट्रीटफूड च्या स्टॉल मध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये महिलांची संख्या खूप जास्त जाणवली. कोनिकल आकाराच्या वेताच्या काड्यांनी विणलेल्या गोल गोल घातलेल्या टोप्या हे व्हिएतनामी लोकांचे वैशिष्टय जाणवत होते.

 

हो ची मिन्ह शहर 


फिरत फिरत दुपार होऊन गेली. भूक लागली होती म्हणून एका रेस्टोरंट मध्ये शिरलो. तिथं खायला काय घ्यावं हे कळेना. पदार्थांची नावं चित्रविचित्र, तीही व्हिएतनामी भाषेत लिहिलेली, काही कळेना. मग बाहेर पडून एका बागेत बसून मृणाल जोशींनी बरोबर दिलेले पालक पराठे, बुंदीचे लाडू खाल्ले. भटकंती पुन्हा चालू केली. तशी आता संध्याकाळ होत आलीच होती. फिरत फिरत एका भव्य चौकात (प्लाझा) आलो. तिथे व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या 'हो ची मिन्ह' या महान नेत्याचा भव्य पुतळा उभा होता. या पुतळ्या समोर उभे राहून फोटो काढणाऱ्या पर्यटकांची लगबग सुरु होती. छोट्या छोट्या भेटवस्तूंची विक्री करणारे विक्रेते पर्यटकांच्या मागे मागे करत होते. बहुतेक विक्रेत्या तरुण मुली, महिलाच दिसत होत्या. हवेतला गारठा थोडा वाढला होता. आम्हाला हा चौक खूप आवडला. अनेक पर्यटक तिथं खूप धमाल करत होते. स्वच्छता तर इतकी होती की अनेक पर्यटक, त्यांची छोटी मुले चौकातच मांडी ठोकून बसलेले होते. इथे वाहनांना बंदी होती. सगळीकडे आनंदी आणि उत्साही वातावरण पसरलेले होते. बराच वेळ आम्ही या चौकातच रेंगाळलो. थोड्या उशिरानेच आम्ही आमच्या हॉटेलमध्ये परतलो. रात्री हॉटेलच्या गच्चीवर असलेल्या बार-रेस्टोरंट मध्ये आम्ही नूडल्स आणि सूप मागवले. नेमका त्याच वेळी पाऊस देखील आला. या टेरेस रेस्टोरंट च्या जवळच एक निळाशार स्विमिंग पूल देखील होता. आमच्या हॉटेलची इमारत १४ मजल्यांची होती. त्यामुळे उंचावरून शहराचे नयनरम्य दृश्य इथून दिसत होते. ख्रिसमस जवळ आल्यामुळे सर्वच इमारतींवर विद्युत रोषणाई केलेली होती. अश्या या जादुई वातावरणात बियर घेणं म्हणजे गुन्हाच ठरला असता. व्हिएतनामच्या तिथलया BIA -SAIGON नावाच्या स्थानिक बियर चा मी आस्वाद घेतला हे वेगळे सांगायला नकोच. आमच्या ग्रुप मधील कंबोडियावरून येणारे सहप्रवासी रात्री आकार वाजता इथे पोहोचले. आता उद्या पासून खऱ्या अर्थाने आमची एकत्रित व्हिएतनाम टूर सुरु होणार होती. आता जास्त धमाल येणार होती...

 


दिवस दुसरा

युद्धभूमीची दाहकता


 व्हिएतनाम म्हणले की सर्वप्रथम आठवते ते व्हिएतनामचे अमेरिकेसारख्या बलाढ्य असलेल्या देशाबरोबर तब्बल १९ वर्षे चाललेले भयंकर युद्ध! या युद्धाची कथा, इतिहास अतिशय थरारक आहे. एकीकडे अमेरिकेसारखा बलाढ्य देश आणि दुसरीकडे प्रखर राष्ट्रप्रेमाने भरलेले व्हिएतनामी सैन्य असा हा लढा होता. या दीर्घ काळ चाललेल्या लढाईमध्ये अमेरिकेने आपले प्रचंड म्हणजे सुमारे लाख सैन्य व्हिएतनाम मध्ये पाठवले होते. असंख्य लढाऊ विमाने, हिंसक रासायनिक बॉम्ब, युद्धशास्त्रातली अनेक आधुनिक तंत्रे यांचा वापर अमेरिकेने या युद्धात केला. पण व्हिएतनामी चिवट सैन्यापुढे त्यांना यश आले नाही. अर्थात अमेरिकेने या या युद्धात अनेक चुका देखील केल्या. हो ची मिन्ह या व्हिएतनामच्या प्रभावी नेतृत्वाला अमेरिकेने कमी लेखले. या जबरदस्त नेत्याच्या नेतृत्वाचा अमेरिकेला अंदाजच आला नाही. अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाममधील लोकद्रोही, प्रतिगामी, जुलमी लष्करशहांना पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय चळवळीतील नव्याने निर्माण झालेले अंतर्विरोध अमेरिकेने समजावूनच घेतले नाहीत. त्यामुळे अमेरिकेने व्हिएतनामी लोकांची सहानभूती गमावली, एव्हडेच काय पण स्वतःच्या देशातील लोकांच्या रोषालाही अमेरिकेला सामोरे जावे लागले. अमेरिकेने १९५४ मध्ये व्हिएतनामशी युद्धाला सुरवात केली. हे युद्ध १९७३ पर्यंत म्हणजे एकूण १९ वर्षे सुरु राहिलं. या काळात अमेरिकेत तीन राष्ट्राध्यक्ष देखील बदलले. १९ मार्च १९७३ रोजी अमेरिकन सैन्याची शेवटची तुकडी व्हिएतनामच्या भूमीवरून परत माघारी फिरली. या युद्धात व्हिएतनामचे अतोनात नुकसान झालं.व्हिएतनामी सैन्य स्वतःच्या देशात लढत असल्यामुळे त्यांना आपल्या देशातील भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अंदाज होता. 'गनिमी कावा' हा हा व्हिएतनामी सैन्याचा मुख्य गाभा होता. त्यामुळे व्हिएतनामच्या युद्धात साधनसामुग्री, तंत्रज्ञान शस्त्रास्त्रे या दृष्टीने वरचढ असलेल्या अमेरिकेच्या सैन्याचा व्हिएतनामी सैन्याने पराभव केला. अमेरिकेचे  व्हिएतनाम विषयक आंतरराष्ट्रीय धोरण चुकीच्या कल्पनांवर आधारलेले होते हे कालांतराने सिद्ध झाले. पण तोपर्यंत व्हिएतनामचे व्हायचे ते नुकसान होऊन गेले. कोणत्याही युद्धात प्रखर राष्ट्रप्रेम नेहेमी वरचढ ठरते हे सिद्ध झाले...

 


आज आम्ही व्हिएतनाम युद्धाच्या खाणाखुणा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी जाणार होतो. सकाळी लवकर उठून हॉटेल मधील अप्रतिम असा नाश्ता उरकून आम्ही बाहेर पडलो. हॉटेलच्या बाहेर आमची मोठी बस आणि स्थानिक गाईड असलेली तरुणी ( हिचं नाव विसरलो. लक्षात राहण्यासारखं नाव नव्हतेच ते) हसतमुखाने उभी होती. शहरापासून काहीश्या दूर अंतरावर असलेल्या युद्धभूमीच्या एका भागाकडे आम्ही निघालो. हा भाग पर्यटकांसाठी खास राखून ठेवला आहे. या ठिकाणी व्हिएतनामी सैनिकांनी लढाई दरम्यान शेकडो कि.मी. लांबीचे भूमिगत बोगदे, दारुगोळा ठेवण्यासाठी भूमिगत कोठारे बांधली होती. या बोगद्यातून व्हिएतनामी सैनिक लपून राहत असत, आणि अचानक बाहेर जमिनीवर येऊन अमेरिकन सैन्याचा खातमा करत असत. ह्यालाच 'गुरिला तंत्र' किंवा छापा तंत्र असे म्हणतात, ज्याला आपल्याकडे 'गनिमी कावा' म्हणतात. अशाच गनिमी कावा पद्धतीने शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी अनेक युद्धात यश मिळवले होते. इथल्या या भुयारांना किंवा टनेल्स ना 'कुची टनेल्स' असं म्हणतात. संपूर्ण व्हिएतनाम मध्ये या भुयारांचा वापर करून व्हिएतनामी सैन्याने अमेरिकन सैनिकांना सळो की पळो करून सोडले होते. या भुयारातून लढण्यासाठी खास कमी उंचीच्या व्हिएतनामी सैनिकांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या सैनिकांना 'टनेल रॅट' असे संबोधले जायचे. अमेरिकेने 'टनेल रॅट' नावाची मोहीम देखील राबवली होती. अमेरिकेने या भुयारांवर बॉम्बचे प्रचंड वर्षाव केले तरीही हजारो व्हिएतनामी सैनिक या भुयारांमध्ये सुरक्षित राहिले.

 


बस मध्ये आमची गाईड आम्हाला या सर्व थरारक युद्धाची माहिती सांगत होती. अंदाजे दीड तासाच्या प्रवासानंतर या राखून ठेवलेल्या युद्धभूमीवर पोहोचलो. अत्यंत गर्द  झाडी असलेला हा युद्धभूमीचा भाग इथल्या सरकारनं सैनिकांची शौर्यगाथा पर्यटकांना सांगण्यासाठी राखून ठेवला आहे. कारण ही युद्धभूमी पाहून पुढील भविष्यातील पिढ्यांमध्ये व्हिएतनामी सैनिकांचे शौर्य लक्षात राहील. येथील कु ची टनेल्स पाहताना शत्रूच्या सैनिकांना मारण्यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्या वापरून तयार केलेले सापळे किंवा ट्रॅप्स बघून आम्ही अक्षरशः थक्क झालो. प्रत्यक्ष भुयारातून चालण्याचा अनुभव तर अतिशय थरारक होता. मोजून तीनचार फूट उंचीच्या भुयारातून वाकून चालताना आम्हाला अक्षरशः घाम फुटला. गुढगे वाकून चालताना गुढगे, मांड्या भरून आल्या. कधी एकदा भुयारातून बाहेर येतो असे झाले. व्हिएतनामी सैनिक या भुयारातून कसे लढले असतील? महिनोंमहिने कसे राहिले असतील?  डोक्यातून कितीतरी वेळ विचार जात नव्हते. इथं पर्यटकांना प्रत्यक्ष खऱ्या रायफली, आधुनिक बंदुका हाताळायची देखील सोया आहे. इथं पर्यटकांना रायफल शूटिंग देखील करता येते. ही भुयारे बघताना पाठीमागे सतत फायरींगचे कानठाळ्या बसवणारे आवाज येत होते. त्यामुळे या संपूर्ण ठिकाणाला युद्धभूमीचा फील येत होता. वातावरण गंभीर बनले होते. प्रत्येकाने हा अनुभव घ्यायलाच हवा. 

 


व्हिएतनाम वॉर म्युझियम (War Remnants Musium)   


ह्या नंतर आम्ही व्हिएतनाम वॉर म्युझियम बघायला गेलो. इथे या संग्रहालयाच्या बाहेरच्या आवारात युद्धात वापरलेली हेलिकॉप्टर्स, फायटर विमाने ठेवली होती. तिकिटे काढून आम्ही आत गेलो. जसजसे चित्रे, शस्त्रे, युद्धाच्या स्टोऱ्या पाहात दुसऱ्या मजल्यावर गेलो, तेव्हा युद्धानंतर व्हिएतनामची झालेली स्थिती पाहून अंगावर काटा आला. सुरुवातीच्याच दालनात युद्धादरम्यान काढलेले फोटोज, त्याकाळातल्या वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, यांचं प्रदर्शन पाहूनयुद्धाच्या दाहकतेचा अंदाज यायला लागतो. पुढे युद्धातील नरसंहाराच्या फोटोंचा विभाग बघून हृदय अक्षरशः पिळवटून निघते. व्हिएतनामी सैनिक, निरपराध व्हिएतनामी नागरीक यांच्यावर अमेरिकेने केलेले अत्याचार बघवत नाहीत. इथे एजंट ऑरेंज इफेक्ट्स नावाचे एक दालन आहे. अमेरिकेने एजंट ऑरेंज नावाच्या एका रासायनिक शास्त्राचा वापर व्हिएतनामच्या जंगलावर केला होता. 'नेपाम (Nepalm) नावाच्या रसायनाची देखील येथील घनदाट जंगलावर वारंवार फवारणी केली होती. त्यामुळे संपूर्ण जंगलात आगी लागत. जंगले जंगले आगीत भस्मसात होत. मग त्यामुळे अमेरिकी विमानांना जमिनीवरील व्हिएतनामी सैन्याच्या हालचाली समजत असत. मग हल्ले करणे सोपे जाई. अशा हल्ल्यांमुळे शेकडो, हजारो एकर जंगले नष्ट होऊन रुक्ष अशी नापीक जमीन तयार झाली. या जंगलात राहणारे निरपराध रहिवासी देखील मारले जात. जखमी होत. बऱ्याच नागरिकांमध्ये कायमचे अपंगत्व आले. एव्हडेच काय पण रासायनिक हल्ल्यांमुळे येथील रहिवाशांच्या पुढील पिढ्यांमध्ये शाररिक विकृती, अपंगत्व दिसत राहिले. या सर्वांचे फोटो इथे या संग्रहालयात आहेत. ते बघून मन अस्वस्थ होते. हे वॉर म्युझियम  पाहून आम्ही कुठल्याश्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये शॉपिंग करण्यासाठी गेलो खरे, पण म्युझियम बघून सुन्न झालेल्या मनात शॉपिंग वगैरे चे विचार येणे शक्यच नव्हते. हॉटेलवर परतण्यापूर्वी आम्ही कुठल्याश्या भारतीय रेस्टोरंट मध्ये जेवण घेतले आणि लवकर झोपी गेलो कारण उद्या आम्हाला 'दा नांग' शहरात जायचे होते. आमची फ्लाईट सकाळी लवकर होती.



 दिवस तिसरा ()

'दा नांग' एक अद्भूत शहर.



'दा नांग' शहर आणि त्याच्या आजूबाजूची पर्यटन स्थळे ही पर्यटकांसाठी महत्वाची असून व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देणारी आहेत. मध्य व्हिएतनाम मधील वाहतुकीसाठी हे एक महत्वाचे केंद्र मानले जाते. समुद्री वाहतुकीसाठी 'दा नांग' हे अतिशय आदर्श भौगोलिक परिस्थिती असलेले बंदर आहे. हे बंदर व्हिएतनाम च्या पूर्व किनाऱ्यावर 'हान' नावाच्या नदीच्या मुखाशी वसलेले आहे. दक्षिणेकडील 'हो ची मिन्ह' आणि उत्तरेकडील 'हानोइ' (व्हिएतनामची राजधानी) या शहरांच्या खालोखाल महत्व असलेले हे शहर आहे. दा नांग अनेक शैक्षणिक संस्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. हे शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे येथील मासेमारीचा उद्योग शेतीपेक्षा महत्वाचा आणि जास्त आहे. एकूण शेतीच्या उत्पन्न पेक्षा मासेमारीचे उत्पन्न जवळपास दुप्पट आहे. उद्योगाच्या क्षेत्रात देखील दा नांग प्रचंड प्रगतिशील मानले जाते. विविध प्रकारची यंत्र सामुग्री, रसायनांचे उत्पादन, विद्युत साहित्य, कापड, खते, सिमेंट यांच्या उत्पादनांबरोबर जहाज बांधणी, विमान बांधणी अशा मोठ्या अवजड उद्योगांकडे देखील इथले सरकार लक्ष देत आहे. या शहराच्या जवळच असलेले 'बा ना हिल्स हे थंड हवेचे ठिकाण, तसेच युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेले 'माय सन' हे सुमारे हजार वर्षांपूर्वीची प्राचीन हिंदू मंदिरे असलेले स्थळ असल्यामुळे इथे पर्यटक खूप आकर्षित होतात. विशेषतः भारतीय हिंदू इथे मोठ्या संख्येने भेट देतात.




 
'बा ना हिल्स' वर धमाल.



भल्या सकाळी 'हो ची मिन्ह' शहरा मधून विमानाने 'दा नांग' ला निघालो. सुमारे दीड तासाच्या विमान प्रवासानंतर दा नांग ला पोहोचलो. कमी वेळ आणि जास्त महत्वाची पर्यटन स्थळे बघायची असल्यामुळे आम्ही आमच्या हॉटेलला चेक इन करता विमानतळापासून लगेचच साईट सिईंग साठी बस प्रवासास सुरवात केली. आम्ही 'बा ना हिल्स' नावाच्या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी निघालो. बा ना हिल्स हे पूर्वी फ्रेंच लोकांचे सुट्टी घालवण्यासाठी असलेले थंड हवेचे ठिकाण होते.  आज वातावरण काहीसे ढगाळच होते. समुद्र सपाटीपासून सुमारे १५०० मीटर्स उंच असलेल्या बा ना हिल्स वर जाण्या साठी जगातील सर्वात मोठ्या असलेल्या केबल कार ने जाण्याची व्यवस्था आहे. ही केबल कार सुमारे सहा कि.मी. लांबीची आहे. केबल कारच्या  प्रवेशासाठी इथे खाली एक इमारत आहे. त्याला 'बा ना हिल' चे प्रवेशद्वार म्हणता येईल. या इमारतीमध्ये तिकिटे काढून या केबल कार च्या अद्भुत प्रवासाला सुरवात केली. बा ना हिल्स च्या ह्या पर्वतावर जाताना आजूबाजूला हिरव्यागार झाडीने नटलेला निसर्ग मन हरकून टाकत होता. आम्ही जसजसे उंच जात होतो तसतसे हवेतला गारठा वाढत होता. धुके आणि ढग आल्यामुळे थोड्यावेळाने सभोवताली फक्त पांढुरके ढगांचे पुंजके दिसू लागले. थोड्या वेळाने पाऊसही सुरु झाला. जोराच्या पावसाने बा ना हिल वर आमच्या बरोबरीनेच प्रवेश केला. पावसामुळे आम्ही काळजीत पडलो. ज्यासाठी आम्ही इतक्या लांब व्हिएतनाम मध्ये आलो होतो तो 'दोन हातांनी पेललेला अजस्त्र गोल्डन ब्रिज' आम्हाला दिसतो का नाही ? केबल कार मधून बाहेर पडताच आम्ही रेनकोट्स, छत्र्या वगैरे पावसाळी आयुधे बाहेर काढली.  

 


इथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक भले मोठे मनोरंजन केंद्र किंवा अम्युझमेंट पार्क उभारलेले आहे. इथे लहान थोरांना अनेक प्रकारचे खेळ (Indoor Gems) खेळता येतात.  'सन वर्ल्ड' नावाच्या या मनोरंजन केंद्रात प्रौढ माणसे, लहान मुले, तरुण मंडळी एकाच कॉम्प्लेक्स मध्ये मजा घेऊ शकतात. इथे बाळगोपाळांना आवडणारे एक ज्युरॅसिक पार्क देखील आहे. इथले सर्व खेळ खेळायचे ठरवले तर एक संपूर्ण दिवस देखील कमी पडेल. संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची आदर्श अशी ही जागा आहे. इथे एक मेणाच्या पुतळ्यांचे एक संग्रहालय देखील आहे, ज्या मध्ये जगभरातील विविध क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. विविध वस्तूंच्या खरेदी साठी देखील इथे पर्यटकांची झुंबड दिसत होती. या बा ना हिल्स वर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी २०१८ मध्ये गोल्डन ब्रिज ची उभारणी करण्यात आली. येथील केबल कार स्टेशन पासून विविध बागांना जोडण्यासाठी एक अर्धवर्तुळाकार गोल्डन ब्रिज नावाचा पादचारी पूल उभारलेला आहे. हा गोल्डन ब्रिज फायबर ग्लास आणि वायर्स च्या जाळीने बनवलेल्या दोन महाकाय हातांनी पेललेला आहे. पण ढग, धुके आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे आम्हाला हा हातांनी धरलेला पूल फारसा स्पष्ट दिसला नाही. बराचसा अंधुकसा दिसला. असो...


Fantacy Park

व्हिएतनाम मध्ये येणाऱ्या पर्यटकांनीबा ना हिल्स’ ला भेट दिलीच पाहिजे.

 

दिवस चौथा ()

माय सन : पुरातन हिंदू मंदिरे.

आमचे दा नांग चे हॉटेल फारच सुंदर होते. रूम्स अतिशय प्रशस्त होत्या. आमची रूम हॉटेलच्या ११व्या मजल्यावर होती. आमच्या रूमच्या बाल्कनीतून दा नांग शहराचे दृश्य विहंगम दिसत होते. काल बा ना हिल च्या पावसात भिजलेले कपडे शूज, पायमोजे वगैरे वाळायला बाल्कनीची मदत झाली. नेहेमीप्रमाणे सूर्योदयाचे फोटो देखील काढले. हॉटेलच्याच रेस्टोरंट मध्ये ब्रेकफास्ट साठी आम्ही सकाळी एकत्र जमलो. या चौथ्या मजल्यावरच्या रेस्टोरंटच्या आत पाऊल टाकले आणि मी दचकलो. रेस्टोरंटच्या संपूर्ण फ्लोअर ला जाडसर पारदर्शक काच होती. त्यामुळे खालच्या रिसेप्शनच्या मजल्यापर्यंतचे खोलवर दृश्य दिसत होते. सुरवातीला डोळे गरगरले, मग मजा वाटू लागली. आजच्या ब्रेकफास्ट मध्ये व्हिएतनामचे अनेक प्रकारचे स्थानिक पारंपरिक पदार्थ होते. मांसाहारी पदार्थांमधे बीफ पासून चिकनच्या विविध पाककृती, मासे, शिंपले वगैरे होते. शाकाहारी पदार्थांची देखील रेलचेल होती. मी बीफ सोडून जवळजवळ सर्व पदार्थांची चव चाखून पहिली. व्हिएतनाम मधील सर्वच पदार्थ कमी तिखटमिठाचे काहीसे सपक असायचे. पण काहीतरी नवीन खायला मजा पण यायची. व्हिएतनामच्या ट्रीपमध्ये मी सगळीकडेच मासे आणि प्रॉन्झ भरपूर खाल्ले. असो...

 


नाश्ता करून आम्ही बसने 'माय सन' नावाच्या भागातील पुरातन हिंदू मंदिरांच्या समूहाकडे निघालो. वाटेत दा नांग चा समुद्रकिनारा दिसला. अतिशय स्वच्छ असलेला हा लांब विस्तीर्ण किनाऱ्यावर पर्यटक एन्जॉय करत होते. ह्या शहरात फिरताना 'हान' नदीवरील ड्रॅगन ब्रिजचे दर्शन सातत्याने घडते. या ब्रिजवर असलेला भलामोठा, अक्राळविक्राळ ड्रॅगन शहराचे सौंदर्य वाढवतो. रात्रीच्या वेळी ह्या ड्रॅगनवर रंगीत प्रकाश झोत सोडतात तेंव्हा हा ब्रिज फारच सुंदर दिसतो. माय सन पर्यंतचा प्रवास साधारणपणे दीड दोन तासांचा होता. वाटेत एका कॉफीशॉप मध्ये आम्ही थांबलो. तिथे एक शॉपिंग सेंटर देखील होते. आमच्या ग्रुपमधील महिलावर्गाने तिथे गर्दी केली. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा माय सन कडे कूच केले.

 


‘दा नांग’ शहराच्या नैऋत्येस सुमारे ७० कि.मी. अंतरावर ही हिंदूंची प्राचीन मंदिरे आहेत. ही दोन पर्वत रांगांनी वेढलेल्या सुमारे दोन किलोमीटर रुंद अश्या दरीत आहेत. सुमारे हजारो वर्षांपूर्वी त्याकाळात मध्य आणि दक्षिण व्हिएतनामच्या पूर्व किनारपट्टीवर 'चंपा' ही आशियाई हिंदू संस्कृती किंवा सभ्यता विकसित झाली होती. या संस्कृतीचे अवशेष अंशतः उध्वस्त झालेल्या शैव (शिव) मंदिरांच्या रूपाने आपल्याला इथे पाहायला मिळतात. पंधराव्या शतकाअखेर चंपा राजघराण्याच्या अस्तानंतर व्हिएतनाम मध्ये हिंदू धर्म हळू हळू नाहीसा झाला आणि बौद्ध धर्म उदयास आला. 

 

'माय सन' कडे जाताना बस मधील प्रवासात आमची इथली स्थानिक गाईड आम्हाला या ऐतिहासिक स्थळांची माहिती देत होती. दोन पर्वतरांगांच्या मधील दरीत असलेला हा भाग गर्द झाडीने व्यापला आहे. येथील प्रवेशद्वारापासून प्रत्यक्ष मंदिरांपर्यंत जाण्यासाठी येथील व्यवस्थापनाने बॅटरीवरील चालणारी वाहने उपलब्ध केलेली आहेत. येथील प्रवेशद्वारापाशीच असलेल्या एका पाटीने आमचे लक्ष वेधले. या पुरातन हिंदू मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारच्या आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे या मंदिरांच्या संवर्धनासाठी व्हिएतनाम आणि भारत यांची सरकारे एकत्रितपणे काम करतात. इथे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे एक ऑफिस देखील आहे. तेथील एका भारतीय अधिकाऱ्याबरोबर आम्ही गप्पा देखील मारल्या. पुढे आम्ही बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांनी प्रत्यक्ष मंदिरे असलेल्या स्थळापर्यंत गेलो. सोबत असलेली आमची गाईड तरुणी (हिचे नावहॉ’ कीहूं’ असे काहीतरी होते) आम्हाला ह्या मंदिरांची माहिती देतच होती. पण तिचे इंग्रजी उच्चार आमच्या ग्रुपमधील काही जणांच्या समजण्याच्या पलीकडील होते, त्यामुळे आमच्या बरोबरचे डॉ. अंबरीश खरे यांनी तपशीलवार सोप्या मराठी भाषेत माहिती द्यायला सुरवात केली...

 


 ह्या जागेचा इतिहास अतिशय मनोरंजक तर आहेच, पण तेव्हडाच आश्चर्यकारक देखील आहे. मध्य व्हिएतनाम मधील ह्या भागात हजारो वर्षांपूर्वी हिंदू संस्कृती अस्तित्वात होती हे समजल्यावर मन अभिमानाने भरून येते. ह्या मध्य व्हिएतनाम मध्ये 'चंपा' नावाचे हिंदू साम्राज्य होते. ही एक आग्नेय आशियायी संस्कृती किंवा सभ्यता होती, जी इसवी सन ४०० ते १७०० दरम्यान अंदाजे बाराशे तेराशे वर्षांच्या कालखंडात मध्य आणि दक्षिण किनारपट्टीवर विकसित झाली होती. त्याकाळी 'चाम' लोक व्यापाराच्या निमित्ताने भारत, चीन, इंडोनेशिया अशा महत्वाच्या देशांना जोडणाऱ्या सागरी व्यापारी मार्गांवर यातायात करत. चंपा साम्राज्याचा इतिहास कंबोडियातील ख्मेर, जावा वगैरे लोकांबरोबर कधी संघर्षाचा तर कधी सहकार्याचा होता. माय सन येथे सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे त्याकाळी राजा भद्रवर्मन, राजा संभूवर्मन, रुद्रवर्मन, प्रकाशधर्म, हरिवर्मन अशा हिंदू राजांनी हिंदू संस्कृती स्वीकारली आणि येथील प्रदेशात ती वाढवली. सर्वात जुन्या पुराव्यानुसार इसवी सनानंतर ३८० ते ४१३ सालापर्यंत राजा भद्रवर्मन याने इथे राज्यकारभार केला. 'शिवा' (भद्रेश्वर) ची पूजा करण्यासाठी त्याने इथे मंदिरे निर्माण करून शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. राजा भद्रवर्मनने इथे उभारलेल्या शिलालेखावर या घटनांची नोंद सापडते. पुढे अनेक पिढ्या इथली मंदिरे चंपा साम्राज्याचे महत्वाचे धार्मिक केंद्र बनले. भद्रवर्मनने ही मंदिरे लाकडापासून बनवलेली होती. दुर्दैवाने राजा रुद्रवर्मन च्या कारकिर्दीत इसवी सनानंतर ५२७ ते ५७२ या कालखंडात ही मंदिरे आगीत भस्मसात झाली. पुढे रुद्रवर्मन आणि संभुवर्धन ह्या राजांनी या मंदिरांची पुनर्बांधणी केली. पुढील काळात प्रकाशधर्म आणि हरीवर्मन आणि नंतरच्या पिढ्यांनी या मंदिरांचा वेळोवेळी जीर्णोद्धार करून इतरही अनेक लहान मोठी मंदिरे बांधून माय सन चा विकास केला. राजा इंद्र वर्मन च्या कालखंडातल्या काही घटनांचा उल्लेख इथल्या शिलालेखांतून आढळतो. चंपा साम्राज्यातील त्या काळातल्या राजांनी शिलालेखांत संस्कृत आणि जुन्या प्राचीन चाम ह्या दोन्ही भाषांमध्ये लिखित नोंदी ठेवल्या आहेत. हे शिलालेख व्या  ते १२ व्या शतकादरम्यानचे आहेत. त्याकाळातल्या काही महत्वाच्या शहरांची नावे आणि माहिती देखील या शिलालेखांतून मिळते. या काळातील शहरांची नावे सिंहपुरा, वीरपुरा, राजापूर, विजया अशी भारतीय पद्धतीची होती. काळाच्या ओघात या मंदिरांचा समूह विस्मरणात गेला.

 


अगदी अलीकडच्या काळात म्हणजे इसवी सन १८८५ मध्ये फ्रेंच लोकांनी ही मंदिरे शोधून काढली. माय सन मधील शिला लेख, वास्तुकला, कला यांचा अभ्यास करायला त्यांनी सुरवात केली. १९३७ मध्ये फ्रेंचांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार करायला सुरवात केली. तथापि अमेरिका - व्हिएतनाम युद्धादरम्यान पुढे या मंदिर समूहातील वास्तू पुन्हा नष्ट झाल्या. माय सन आणि आजूबाजूचा भाग व्हिएतनामी सैनिकी तळाचा भाग असल्याने १९६९ मध्ये अमेरिकेने ह्या भागात प्रचंड बॉम्बवर्षाव केला. येथील मंदिरांच्या आजूबाजूचा प्रदेश अजूनही स्फोट झालेल्या लॅन्ड माईन्स (जमिनीतील स्फोटके) मुळे धोकादायक बनलेला आहे.

 


आता आजूबाजूला पडझड झालेली, तरीही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेली मंदिरे दिसू लागली. या मंदिरांचा जीर्णोद्धार करताना मंदिरांच्या बांधकामात मातीच्या विटांचा वापर केला. त्यामुळे २१ व्या शतकापर्यंत ती सुस्थितीत राहिली. या मंदिरांच्या बांधकामासाठी वापरलेले तंत्रज्ञान पुरातत्व शास्त्रज्ञांना अजूनही बुचकळ्यात टाकते. इथे काही भागात स्तूप आणि थडगी देखील दिसतात. थडग्यांच्या उत्खदनानंतर असे लक्षात आले की चौथ्या शतकांपासून येथील राजांना आणि महत्वाच्या व्यक्तींना या जागेत दफन करण्यात येत होते. 'चंपा' राजवटीचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या या मंदिरांच्या संकुलात एकूण सत्तर हुन अधिक इमारती अजूनही उभ्या आहेत. या माय सन हिंदू मंदिर समूहाला युनोस्को ने त्यांच्या निकषानुसार सांस्कृतिक उत्क्रांती आणि बदलाचे उत्तम उदाहरण म्हणून मान्यता दिलेली आहे. इथे मंदिरांचे भग्नावशेष बघताना आपली हिंदू संस्कृती किती प्राचीन होती ते जाणवते. हे प्राचीन वारसास्थळ बघताना आम्ही कळत हजारो वर्षांपूर्वीच्या काळात गेलो होतो. आम्हाला वर्तमानाचा जणू विसरच पडला होता...

 

'अनोखे व्हिएतनामी जेवण' 



एव्हाना दुपारचे साडेतीन वाजले होते. खूप भूक लागली होती. मृणाल जोशी म्हणाल्या 'आता आपण जेवायला जाऊयात. आजचे जेवण खूप स्पेशल असणार आहे. खास व्हिएतनामी पद्धतीचे पारंपरिक, स्थानिक पदार्थ असणारे जेवण आपण घेणार आहोत, शिवाय जेवणानंतर एक सरप्राईझ देखील आहे'. आमची उत्सुकता आणि भूक ताणली गेली होती. येताना अगदी खेडेगावासारख्या दिसणाऱ्या ग्रामीण वस्तीतल्या एका घरामध्ये आम्ही गेलो. मुख्य रस्त्यापासून हे घर खुप  आत आत असल्यामुळे आमची बस या घराच्या काहीशी लांबच थांबली आणि आम्ही आत घरापर्यंत पायी चालत गेलो. या घराच्या अंगणात वीसपंचवीस माणसे दुतर्फा बसतील अश्या एका डायनिंग टेबलावर आम्ही विसावलो. खूप उन्हातून आल्यामुळे या घराच्या आणि आजूबाजूच्या सावलीत खूप छान, थंडगार वाटले.

 


 या घरातील कुटुंबातली मंडळी आम्हाला हसतमुखाने एक एक पदार्थ वाढू लागली. सुरवातीला थंडगार वेलकम ड्रिंक दिले गेले. बियरप्रेमींसाठी स्थानिक बियर ची विचारणा झाली. आमच्या ग्रुप मधील माझ्यासकट काहींनी बियर घेतली. आमच्या पुढ्यात एक स्वच्छ पांढऱ्या रंगाचा चौकोनी पारदर्शक कागद डिश मध्ये वाढण्यात आला. आम्हाला काही कळेना. मग समजले की हा चौकोनी कागद तांदळापासून बनवलेला असून तो खायचा कागद आहे. ह्या कागदात धिरड्यासारखा एक काहीसा तेलकट पण चविष्ठ डोसा त्या तांदळाच्या कागदावर ठेवण्यात आला. मग या तांदळाच्या कागदाची डोश्यासकट सुरळी करून खायची आहे असे सांगण्यात आले. ह्या घरातल्या व्हिएतनामी लोकांनी मोठ्या हौसेने हसत, हसत हा पदार्थ कसा खायचा हे सांगितले. आमची या जगावेगळ्या अनोख्या जेवणाला सुरवात झाली.थोड्यावेळाने स्प्रिंग रोल सारखा दिसणारा आणि त्याच चवीचा एक कुरकुरीत पदार्थ वाढला गेला. या बरोबरीनेच उकडलेल्या निरनिराळ्या हिरव्या भाज्यांचे बनवलेले सूप, सॅलड्स, टोफूची वेगळ्याच चवीची भाजी असे पदार्थ आमच्या समोर येत राहिले. थंडगार बियरने जेवणाची रंगत अजूनच वाढली. जेवणाबरोबर आमच्या हसणे खिदळणे, गप्पा टप्पा चालूच होत्या. जेवण झाल्यावर मस्त पिकलेल्या पिवळ्याधमक सोनकेळ्यांचा फलाहार झाला. आम्ही मग काहीसे सुस्तावलो. या साग्रसंगीत जेवणानंतरआम्ही थोडा आराम केला. आता दुपारची उन्हे पश्चिमेकडे मावळू लागली होती…

 



या साग्रसंगीत भन्नाट जेवणानंतर आता सरप्राईझ काय असावे याची उत्सुकता होती. तेव्हड्यात आम्ही विश्रांती घेत असलेल्या जागेच्या मागील भागात बॅकवॉटर मध्ये काहीतरी हालचाल दिसू लागली. एक एक करून गोल गोल वेताने विणलेल्या होड्या दिसू लागल्या. प्रत्येक होडीत पारंपारिक व्हिएतनामी गोल टोपी घातलेल्या बायका ह्या होड्या घेऊन येत होत्या. मृणाल जोशी म्हणाल्या 'हेच ते सरप्राईझ! आता ह्या होड्यातून आपण सफर करणार आहोत'. आम्हाला अश्या प्रकारच्या नौकानयनाच्या कार्यक्रमाची कल्पना आधी दिली नव्हती. हे सरप्राईझ ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आम्हाला तो आश्चर्याचा धक्काच होता. अश्या होड्यांमधून सफर करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता. मग प्रत्येक होडीत दोन असे प्रवासी घेऊन ह्या होड्या अरुंद अश्या ओढ्यासारख्या दिसणाऱ्या बॅक वॉटर मधून एकामागोमाग एक अश्या प्रवास करू लागल्या. आम्हा प्रत्येकाला घालण्यासाठी व्हिएतनामी गोल टोप्या देण्यात आल्या. आजूबाजूला दाटीवाटीने असलेली नारळाची, पाम ची झाडे डोळ्यांना सुखावत होती. मावळतीचा सूर्य आणि अगदी पाण्याच्या शेवटी, पलीकडे दिसणारे लालभडक, गडद  केशरी आकाश... केवळ आनंद! बाकी काही नाही. मी आणि अलका निशःब्द होऊन या सर्व आसमंताचा, निसर्गाचा अनुभव घेत होतो, ती अद्भुत निसर्गदृश्ये डोळ्यात साठवून घेत होतो. आमच्या भावना शब्दात मांडणे केवळ अश्यक्य आहे...

 



'होई अँन' आणि रात्रीचे व्हिएतनाम

सूर्यास्तानंतर आम्ही 'होई अँन' नावाच्या छोट्या पण जुन्या शहराकडे आलो. 'होई अँन' या शब्दाचा अर्थ व्हिएतनामी भाषेत 'शांत ठिकाण' असे केले जाते. चंपा साम्राज्यापासून या शहरा बद्दलचे उल्लेख इतिहासात सापडतात. सातव्या ते दहाव्या शतकादरम्यान 'माय सन' ही व्हिएतनामचे अध्यात्मिक राजधानी होती तर 'होई अँन' ही व्यावसायिक राजधानी म्हणता येईल. थु बॉन’ नदीच्या काठी वसलेले हे प्राचीन शहर व्हिएतनामच्या शेजारील लाओस आणि थायलंड अशा देशांतर्गत वाहतुकीसाठी महत्वाचे केंद्र होते. ‘थु बॉन’ नदीचा उपयोग ह्या सखल प्रदेशातील मालाच्या वाहतुकीसाठी केला जाई. प्राचीन काळी युरोप, चीन, भारत आणि जापान यांच्यातील व्यापारी साहित्याच्या यातायातीसाठी महत्वाचा व्यापारमार्ग म्हणूनहे हे शहर प्रसिद्ध होते. असेही काही पुरावे  सापडलेले आहेत की त्यावरून असे समजते की व्हिएतनामी आणि आशियाई मातीची भांडी 'होई अँन' पासून आफ्रिका खंडाच्या उत्तरेला 'इजिप्त' पर्यंत नेली जात होती. परंतु काळाच्या ओघातथु बॉननदीच्या मुखातील गाळ साचल्यामुळेहोई अँन’ ने व्यापारी बंदर म्हणून आपला दर्जा गमावला, आणि शेजारच्याचदा नांग’ शहराने हा दर्जा मिळवला. आजही 'होई अँन' हे शहर त्याचा प्राचीन इतिहास, पारंपरिक वस्तूकला, उत्तम प्रतीचे कापड आणि कलाकुसरीयुक्त मातीची भांडी यामुळे पर्यटकांमध्ये अतिशय आवडते ठिकाण आहे. इथले रात्रीचे वातावरण जादुई असते. या शहराच्या गल्ल्यांमधून अनेक हॉटेल्स, रेस्टोरंटस, बार्स यामुळे इथल्या रात्री अखंड जाग्या असतात. इथलं नाईट लाईफ अनुभवण्यासाठी जगभरातलया पर्यटकांचा इथे ओघ अव्याहत सुरूच असतो.

 


कंदिलांचा (लँटर्न फेस्टिव्हल) उत्सव:

‘होई अँन’ मधे दर पौर्णिमेला जेंव्हा चंद्र सर्वात तेजस्वीपणे तळपत असतो त्या रात्री एक कंदिलांचा (लँटर्न फेस्टिव्हल) उत्सव साजरा केला जातो. येथील हा लँटर्न फेस्टिव्हल सांस्कृतिक कार्यक्रम, प्रकाश, रंग आणि परंपरा यांचा हा उत्सव आहे.हा उत्सव स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघांनाही विलक्षण अनुभव देणारा असतो. ह्या उत्सवात हजारो प्रकाश कंदीलांचे शहरभर प्रदर्शन केले जाते. त्यामुळेहोई अँन’ शहर आणि शांतपणे वाहणारीथु बॉन’ नदी रात्रीच्या वेळी उजळून निघते. हा उत्सव चिनी, जपानी, आणि युरोपियन संस्कृतीचे एक अद्वितीय मिश्रण असते. आता पर्यटकांच्या वाढत्या सहभागामुळे इथे जवळजवळ नेहेमीच हे उत्सवी वातावरण असते.

 


मृणाल जोशींनी सांगितले कीतुम्हाला आता फ्री टाइम आहे. तुम्हाला काय पाहिजे ते इथे एन्जॉय करा. फक्त दोन तासांनी ह्या रस्त्याच्या शेवटी असलेल्या चौकात आपण एकत्र जमू’. मग आम्ही ह्या शहराच्या जादुई वातावरणामध्ये मिसळून गेलो. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या छोट्या छोट्या दुकानातुन कुणी शॉपिंग करू लागले तर कुणी स्ट्रीटफूड ची मजा चाखू लागले. रस्त्यावरून फिरताना हे खाद्यविक्रेते व्हिएतनामी भाषेत आम्हाला त्यांच्याकडील पदार्थ विकत घेण्यासाठी आर्जवे करीत होते. तांदुळामध्ये घातलेले नूडल्स (ह्याला 'कॉम गा'असे म्हणतात), शिजवलेल्या तांदळात घातलेले चिकन चे सूप, विविध प्रकारची सॅलड्स अशी वैशिष्टपूर्ण चवीचे स्थानिक पदार्थांची इथे रेलचेल दिसत होती. इथे या पदार्थांच्या बरोबरीने स्थानिक मिरची सॉस चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि तो प्रचंड लोकप्रिय देखील आहे. एका स्टॉल वर एक मुलगी पिकलेल्या केळ्यांचे काप घालून बनवलेले अंड्यांचे ऑम्लेट बनवत होती. ह्या ऑम्लेट ची चव कशी लागत असेल? असा विचार करीत मी पुढे सरकलो. रस्त्याने पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. आपल्या तुळशी बागेत असतात तशी छोटे छोटे सामान, भेटवस्तू मिळणारीही काही दुकाने होती. इथे किमतीमध्ये प्रचंड घासाघीस देखील करावी लागते. पण एकंदरीत सर्व गोष्टी बऱ्यापैकी स्वस्त वाटल्या. मग सटरफटर वस्तू खरेदी करत आम्ही या रस्त्याच्या शेवटी असलेल्या एका मोठ्या चौकात आलो.  



अजून आमच्या ग्रुपमधील काही मंडळी यायची होती. त्यांची वाट बघत आम्ही तिथल्या एका कट्टयावर बसलो. आमच्या सारखे अनेक पर्यटक तिथे होते. या चौका समोरच थु बॉन नदी शांतपणे वाहत होती. नदीमध्ये पर्यटकांसाठी बोटिंग ची व्यवस्था होती. अंधाऱ्या रात्रीच्या काळ्या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्यात पर्यटकांनी सोडलेले दिवे नदीला उजळवून टाकत होते. नौकानयनासाठीच्या नावांमध्ये देखील प्रकाशमान कंदील लावलेले होते. हवेत गारठा वाढला होता. बऱ्याच वेळाने ग्रुपमधील मंडळी इथे एकत्र जमा झाली. मग इलेकट्रीक बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या गाड्यांमधून आम्ही आमच्या हॉटेल मध्ये परतलो. येताना रात्रीच्या लखलखत्या दिव्यांनी उजळून निघालेले दा नांग शहर, प्रकाश झोतात उजळून निघालेला नदीवरील ड्रॅगन ब्रिजचे शेवटचे दर्शन आम्ही डोळ्यात साठवून ठेवत होतो. आज लवकर झोपायला हवे होते, कारण उद्या आम्हाला पहाटेच्या विमानाने 'हानोइ' या व्हिएतनामच्या राजधानीकडे जायचं होतं. 

 


दिवस पाचवा ()

 

व्हिएतनामची राजधानी 'हानोइ'


'दा
नांग' मधील हॉटेलातून लवकर उठून तिथेच भरपेट नाश्ता करून आम्ही 'हानोइ' कडे जाणाऱ्या व्हिएतजेट कंपनीच्या विमानातून निघालो. विमानातूनच हानोई शहराचे विहंगम दृश्य दिसू लागले होते. सुमारे दीड तासानंतर हानोई विमानतळावर उतरलो. हानोई शहरातील पर्यटनस्थळे बघायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आम्ही इथल्या हॉटेल मध्ये चेक इन करता थेट आमच्या बस मध्ये येऊन बसलो. फ्रेश होण्यासाठी आम्ही 'हानोई कॉफी कल्चर' नावाच्या कॉफी शॉप मध्ये गेलो. हे रेस्टोरंट इतके सुंदर होते की मी या रेस्टोरंट च्या प्रेमातच पडलो. अतिशय जुन्या कलात्मक पद्धतीचे आणि हटके रंगसंगतीने सजवलेल्या या कॉफी शॉप चे किती फोटो काढू किती नको असं होऊन गेलं. फ्रेश झाल्यावर आम्ही हानोई शहर आणि शहरातील महत्चाची पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पुन्हा बस मधून निघालो. बसमध्ये जाता जाता इथला स्थानिक गाईड आम्हाला या शहराची माहिती देत होता..

 



व्हिएतनामच्या उत्तरेला संस्कृती आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेलं आणि व्हिएतनामची राजधानी असलेलं 'हानोई' हे शहर 'रेड रिव्हर' किंवा लाल नदीच्या काठी वसलेलं आहे. इथे Hoan Kiem नावाचा एक सुंदर तळं आहे. हे तळं शहराच्या मध्य भागात आहे. या तळ्याच्या मध्यभागी Ngoc son नावाचं एक मंदिर आहे. या शिवाय इथे ऐतिहासिक 'टेम्पल ऑफ लिटरेचर' हे शैक्षणिक इमारतींचं संकुल, व्हिएतनाम चा नेता हो ची मिन्ह याचे स्मारक बघण्यासारखे आहे. इथला सुप्रसिद्ध 'पपेट शो' बघायला देखील आपल्याला बघायला जायचंय. हानोई हे व्हिएतनाममधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे उत्तम प्रकारे जतन केलेल्या फ्रेंच वसाहती, बौद्ध धर्म, कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मियांची धार्मिक स्थळे बघायला मिळतात. पर्यटकांमुळे येथे मनोरंजनाचे विविध पर्याय देखील उपलब्ध आहेत. आधुनिक आणि पारंपरिक थिएटर्स, करावके बार्स, डान्स क्लब्ज, खरेदीसाठी भरपूर शॉपिंग मॉल्स, आर्ट गॅलरीज वगैरेंची इथे रेलचेल आहे. हानोई शहरामध्ये स्थानिक कलाकारांनी सादर केलेले 'वॉटर पपेट शोज' पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. गाईड ची माहिती ऐकता ऐकता बस मधून आम्हाला हानोइ शहराचे दर्शन होत होते. आम्ही बस मधून शहराच्या मध्यभागी असलेल्या Hoan Kiem तळ्यासमोर उतरलो.

 



हे तळं बऱ्यापैकी मोठं आहे. निळसर हिरवे पाणी असलेल्या तळ्याच्या मध्यभागी 'टर्टल टॉवर' नावाची एक ऐतिहासिक वास्तू आहे. इथे एक आख्यायिका देखील सांगितली जाते. प्राचीन काळी म्हणजे साधारणपणे पंधराव्या शतकात व्हिएतनाम ला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर येथील राजघराण्याचे संस्थापक 'ले लुई' या तळ्यात नौकाविहार करत होते. त्यांना अचानक सोनेरी कासवाने दर्शन दिले. आणि युद्धात जिंकण्यासाठी पूर्वी या सोनेरी कासवाने दिलेली एक तलवार ले लुई कडून परत घेतली, आणि हा कासवरूपी देव तलावाच्या पाण्यात गायब झाला. या ठिकाणी सापडलेली दोन महाकाय कासवांची शरीरे इथे जतन करून ठेवलेली आहेत. येथील श्रद्धावान लोकांचा असा विश्वास किंवा समज आहे की अजूनही अशा देवत्व प्राप्त झालेल्या कासवांचं अस्तित्व या तळ्यात आहे. (थोडक्यात श्रद्धावान (की अंधश्रद्ध ?) लोक सगळीकडे असतातच) असो... तळ्याच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळच्या एका उंचवट्यावर जेड माउंटन चे (ज्याला Ngoc Son मंदिर असे म्हणतात) मंदिर आहे. हे मंदिर अठराव्या शतकात उभारलेले आहे. प्रत्यक्षात हे मंदिर पाण्यात असल्यामुळे मंदिर आणि होनाईच्या रस्त्याला जोडण्या साठी एक लाल रंगाचा सुरेख पूल उभारला आहे. हा लाल पूल, मंदिर, टर्टल टॉवर, तळे हे सर्वच होनाई च्या सौंदर्यात भर टाकतात. आमच्या ग्रुप मधील कुणीतरी पुणेकराने 'हे मंदिर आपल्या तळ्यातल्या गणपती' सारखे आहे अशी कुजबुज केलेली मी ऐकली.

 



'टेम्पल ऑफ लिटरेचर'

यानंतर आम्ही 'टेम्पल ऑफ लिटरेचर' (किंवा साहित्याचे मंदिर) बघायला गेलो. हे पुरातन शैक्षणिक मंदिर बघण्यासाठी आणि त्या मागचा  इतिहास जाणून घेण्यासाठी पर्यटक इथं गर्दी करतात. हे साहित्य मंदिर १०७० मध्ये म्हणजे तब्बल नऊशे ते एक हजार वर्षांपूर्वी बांधले गेले. राजघराण्यातील सदस्यांना आणि उच्चभ्रू, श्रीमंत वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षित करण्या साठी हे विद्यापीठ खुले होते. अनेक विद्यार्थ्यांना या साहित्य मंदिरात वास्तव्य करून शिकता यायचे. या विद्यापीठात विद्यार्थी विविध साहित्य प्रकाराची चर्चा करीत. कवितांचा अभ्यास करीत, विविध प्रकारचे लेखन करीत. विद्यार्थ्यांना चिनी आणि व्हिएतनामी भाषेतील छापील पाठ्यपुस्तके पुरवली जात. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन ते सात वर्षांसाठी नोंदणी करावी लागे. दर महिन्याला छोट्या चाचण्या वर्षातून चार वेळेला मोठ्या परीक्षा या विद्यार्थ्यांना द्याव्या लागत. अशा परीक्षेतील यशानंतर या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परीक्षेस बसण्यास पात्र ठरवले जायचे.

 


ह्या साहित्य मंदिरात मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक भलीमोठी घंटा बांधलेली आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीचे किंवा भिक्षूंचे आगमन झाल्याची माहिती आतील लोकांना व्हावी या साठी ही घंटा वाजवली जायची. व्हिएतनाम मधील अनेक बौद्ध मंदिरात, पॅगोडाज मध्ये अशा घंटा दिसतात. या शैक्षणिक संकुलामध्ये एकापाठोपाठ अशी तीनचार विस्तीर्ण प्रांगणे आहेत. पैकी आतील तिसऱ्या प्रांगणात एक भली मोठी चौकोनी विहीर आहे. या विहिरीच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा, त्यांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी, तसेच त्यांच्या अभ्यासाला प्रात्साहन देण्यासाठी दगडांची सिंहासनांसारखी रचना असलेली कासवे उभारलेली आहेत. (पुरातन काळापासून कासव हे दीर्घायुष्य आणि बुद्धीचे प्रतीक मानले गेले आहे) प्रत्येक दगडी कासवांच्या या बैठकांवर शाही परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी पदवीधारकांची नावे, जन्मस्थळ, आणि त्यांच्या यशाची माहिती कोरलेली आहे. या मंदिराच्या चौथ्या प्रांगणात विद्यापीठाचे प्रमुख रेक्टर किंवा प्रमुख शिक्षणाधिकारी यांची मंदिरे आहेत. इथे या विद्वानांची नियमितपणे पूजा केली जाई. येथील एका छोट्या भागात एक संग्रहालय देखील आहे. या छोट्याश्या संग्रहालयात या मंदिरात शिकलेल्या काही विद्यार्थ्यांच्या पेन्स, शाई ठेवायची भांडी (दौत), पुस्तके आणि त्यांच्या काही वैयक्तिक कलाकृती, त्याचबरोबर त्यांचे लिखाण वगैरे सारख्या वस्तू  संग्रहित करून ठेवल्या आहेत. या दालनाच्या समोरील प्रांगणात सांस्कृतिक अभ्यासकांच्या स्मरणार्थ काही समारंभ देखील आयोजित केले जातात. व्हिएतनाम मध्ये हजार वर्षांपूर्वी देखील शिक्षणाला इतके महत्व दिले जात होते हे बघून मन अचंबित होते...

 


एव्हाना दुपारचे तीन वाजलेले होते. पोटात कावळे ओरडू लागले होते. मृणाल जोशी म्हणाल्या 'आज आपण थोडं वेगळ्या प्रकारचं जेउयात. आजचे दुपारचे जेवण इथल्या 'मॅकडोनल्ड्स' मध्ये!' मी खुश झालो. मी कितीतरी वर्षात बर्गर्स खाल्ले नव्हते. अलकाला मात्र हे असले चीज घातलेले फास्ट फूड आवडत नसल्यामुळे ती थोडी हिरमुसली. मग आमची सगळी गॅंग हानोइ मधील मॅकडोनल्ड्स मध्ये घुसली. व्हेज बर्गर्स, फ्रेंच फ्राईज आणि कोकाकोला असे जेवण जेऊन बहुतेक मंडळी खुश झाली.

 


'हो ची मिन्ह' यांची समाधी.



जेवण संपवून आम्ही व्हिएतनामच्या स्वातंत्र्यास कारणीभूत ठरलेल्या आणि व्हिएतनामचे राष्ट्रपिता असलेल्या 'हो ची मिन्ह' या महान क्रातींकारी नेत्याच्या समाधी स्थळाकडे निघालो. हे समाधी स्थळ हानोइ शहरातील 'बा दिन' नावाच्या भव्य चौकात आहे. ही समाधी १९७३ ते १९७५ या काळात बांधली गेली. व्हिएतनामच्या या महान नेत्याचे पार्थिव या इमारतीच्या मध्यवर्ती भागात जतन करून ठेवलेले आहे. हो ची मिन्ह या नेत्याचे महत्व व्हिएतनामी जनतेच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे कारण या क्रांतिकारी नेत्याने वसाहतवादी महासत्तांविरूद्ध सर्वात जास्त काळ लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने व्हिएतनामच्या स्वातंत्र्य लढ्यात जपान, फ्रेंच आणि अमेरिकन सैन्याचा सपशेल पराभव केला. हा महान नेता राजकारणी असण्याव्यतिरिक्त एक उत्तम लेखक, एक संवेदनशील कवी, आणि पत्रकार देखील होता. या नेत्याने चिनी, व्हिएतनामी आणि फ्रेंच भाषेत अनेक पुस्तके, लेख कविता लिहिल्या. या समाधी स्थळाच्या इमारतीवर 'अध्यक्ष, हो ची मिन्ह' (CHû TịCH HỒ CHÍ MINH) अशी अक्षरे लिहिलेली आहेत. इमारतीच्या दोन्ही बाजूला दोन लांब आकाराचे बॅनर्स दिसत होते. त्यावर ' सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम दीर्घायु होवो' अशी इंग्रजीत लिहिलेली अक्षरे लक्ष वेधून घेत होती. या समाधीच्या समोर आणि आजूबाजूच्या प्रशस्त जागेमध्ये विविध वानस्पती आणि रंगीबेरंगी फुलांच्या बागा आहेत. या जागेच्या जवळच 'वन पिलर पॅगोडा' देखील बघण्यासारखा आहे. हो ची मिन्ह यांची समाधी म्हणजे व्हिएतनामी लोकांसाठी आपल्या महान नेत्याप्रती असलेल्या कृतज्ञता आणि आदराचे प्रतीकच आहे. पर्यटकांसाठी हे स्मृतीस्थळ रोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खुले असते. या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा गार्डस असतात. गार्डस बदलताना या ठिकाणची परेड बघण्यासारखी असते. आम्ही या नेत्याप्रती आदर व्यक्त करून, त्यांना आदरांजली वाहून निघालो...

 


हानोइ मधील लोकप्रिय 'वॉटर पपेट शो'



हो ची मिन्ह यांच्या समाधी स्थळावरील काहीशा शांत आणि गंभीर वातावरणातून बाहेर पडून आम्ही हानोइ मधील सुप्रसिद्ध अशा 'पाण्यातील कठपुतळ्यांचा खेळ' बघायला निघालो. हा खेळ पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ह्या खेळाचे थिएटर हानोइ च्या गजबजलेल्या जुन्या भागात होते. जिथे जाण्यासाठी आम्ही खास व्हिएतनामी सायकल रिक्षांचा पर्याय निवडला. ह्या सायकल रिक्षा सोईस्कर, स्वस्त, आरामदायी असल्याने शहराच्या गजबजलेल्या मध्यवस्तीत सायकल रिक्षांमधून प्रवास करणे किंवा भटकंती करणे हा व्हिएतनाम मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय आनंददायी गोष्ट असते. या सायकल रिक्षा पारंपरिक संस्कृती जपण्याचे काम करीत असतानाच अनेक स्थानिक लोकांचे हे एक उपजीविकेचे साधन देखील असते. आपल्याकडे या सायकल रिक्षांमध्ये साधारणपणे ही रिक्षा चालवणारा चालक पुढे आणि मागील बाजूला मागेच तोंड करून प्रवासी बसतात. पण येथील रिक्षा चालक रिक्षेच्या मागे असतो आणि प्रवासी पुढच्या बाजूला बसण्याची सोय असते. या सायकल रिक्षा चालवण्याचे काम सामान्यतः पुरुषांद्वारेच केले जाते. आमचा रिक्षावाला हानोईच्या मध्यवस्तीतल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून वाट काढत, गर्दीतून लीलया आम्हाला नेत होता. खूप धमाल आली. सुमारे अर्ध्या तासाच्या सायकल रिक्षेच्या प्रवासानंतर आम्ही एका थिएटर पर्यंत आलो. इथे वॉटर पपेट शो बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झालेली होती. आमची तिकिटे आधीच काढलेली असल्यामुळे आम्ही थिएटर मध्ये आमच्या खुर्च्यांवर बसलो. थोड्याच वेळात शो सुरु झाला... 

 


वरून खाली अशा उतारावर प्रेक्षकांच्या खुर्च्या आणि समोर खाली मधोमध या खेळाचे स्टेज अशी एखाद्या अँफी थिएटर सारखी इथे रचना होती. स्टेज च्य मध्ये एक चौकोनी पाण्याचा हौद, हौदाच्या दोन्हीही बाजूला ह्या खेळाच्या सादरीकरणाच्या वेळी साथसंगत करणारे वादक, गायक बसले होते. सगळी कडे विविध रंगाचे प्रकाश झोत सोडलेले होते. कठपुतळ्यांच्या खेळाला सुरवात झाली. कठपुतळ्या लाकडांपासून बनवलेल्या होत्या. या कठपुतळ्यांना पाण्याखालून एक बांबू जोडलेला असून त्याचे दुसरे टोक पाण्याखालून स्टेज च्या पाठीमागील बाजूस बसलेल्या कलाकारांच्या हातात असते. हे कलाकार स्टेज च्या मागील भागातून स्टेज वरील पाण्यात असलेल्या बाहुल्यांना हलवून नाट्य सादर करत होते. हौदाच्या दोन्हीही बाजूला बसलेलय कलाकारांचा संच या नाट्याला पार्श्वसंगीत किंवा गाणी म्हणून रंगत आणत होता. पारंपरिक वाद्ये जसे लाकडी घंटा, झान्ज, बांबुची बासरी, विशिष्ठ प्रकारची तंतुवाद्ये यासारख्या वाद्यांनी वातावरण निर्मिती केली जात होती.

 


रेड रिव्हर किंवा लाल नदीच्या त्रिभुज प्रदेशात आणि उत्तर व्हिएतनामच्या सुपीक प्रदेशात हजारो वर्षांपासून तांदूळ पिकवला जातो. प्राचीन काळात या तांदळाच्या शेतात करमणुकीसाठी शेतकरी शेतातील पाण्यात हा कठपुतळ्यांचा खेळ खेळत असत. गावकरी, शेतकरी भात  कापणी संपल्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी, धार्मिक सणामध्ये करमणुकीसाठी ह्या खेळाची सुरवात झाली. तांदूळ हा व्हिएतनामी आहाराचा एक मुख्य भाग, जो शेतातल्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यावर पिकवला जातो. पूर्वी या कठपुतळ्यांचा खेळ भाताच्या शेतातील पाण्यात खेळाला जात असे. स्टेज वरील चौकोनी हौदातल्या पाण्यात एक पारंपरिक लोककथा गाण्याच्या आणि संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात होती. कठपुतळ्यांसोबत रंगीबेरंगी ध्वज, प्रकाशझोत, मंचाची शोभा वाढवत एक प्रकारचे उत्सवाचे वातावरण निर्माण करीत होते. आमचा दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. आमचा आजचा दिवस खूपच धावपळीत गेला. ‘पपेट शो’ नंतर आम्ही हानोई शहरातील आमच्या हॉटेलच्या जवळच असलेल्या एका भारतीय रेस्टोरंट मध्ये भारतीय पद्धतीचे म्हणजे रोटी, पंजाबी भाज्या, शेवयाची खीर असे जेवण करून झोपी गेलो.

 

दिवस सहावा ()

 

अद्भुत 'निन्ह बिन्ह' प्रदेश - 'दिन्ह होआंग' मंदिर आणि निसर्गरम्य नौकानयन.



आजचा मुक्काम हानोइ मधेच असल्यामुळे थोडे निवांतच उठलो. आज आमच्या  ग्रुप मधील डॉ. विभा मिटकरी यांचा वाढदिवस असल्याने मृणाल जोशींनी त्यांच्यासाठी एक मोठा केक आणला होता. हॉटेल मधील रेस्टोरंट मध्ये नाश्त्याच्या वेळी आम्ही सगळे जमल्यावर केक कापून डॉ. विभा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज नाश्त्यामध्ये अनेक पदार्थ मला खुणावत होते. विशेषतः नॉनव्हेज विभागात माशांचे अनेकविध नवीन प्रकार दिसले. त्यामुळे आज मी प्रॉन्झ मासे यांवर ताव मारला. इथे व्हिएतनाम मध्ये सी फूड अतिशय ताजे आणि चविष्ठ मिळते. अर्थात इतरही इंग्लिश पदार्थ होतेच. भरपेट नाश्त्यानंतर आम्ही बस मधून निघालो. आज आम्ही दिन्ह होआंग मंदिर बघायला जाणार होतो. वाटेत बसमध्ये आमचा गाईड या मंदिराचा इतिहास आणि वैशिष्ठ्ये सांगत होता...

 


हे 'दिन्ह होआंग' हे मंदिर हानोई पासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे. दहाव्या शतकात 'दिन्ह होआंग' नावाचा एक अतिशय अल्पायुषी पण कर्तुत्ववान, प्रभावी राजा होऊन गेला. व्हिएतनामी स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी त्याने बंडखोर सरदारांचा बिमोड केला आणि स्वतःला त्याने पहिला सम्राट म्हणून घोषित केले. त्याने चीन बरोबर चांगले संबंध प्रस्थापित तर केलेच शिवाय नवीन राज्याचा पाय मजबूत करण्यासाठी व्हिएतनामच्या प्रशासन आणि सशस्त्र दलामध्ये अनेक सुधारणा देखील केल्या. 'दिन्ह होआंग' चे मंदिर पूर्वीच्या 'होआ लू' नामक चुनखडीच्या पर्वतमय प्रदेशात होते. सम्राट 'दिन्ह होआंग', त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले गेले. या मंदिराच्या आत निरव अशी शांतता होती. आपल्या देवळांप्रमाणे इथेही उदबत्त्या लावण्याची प्रथा आहे. इथे लावलेल्या उदबत्त्या गोल गोल वेटोळ्यांनी बनलेल्या (आपल्या कछुआ छाप अगरबत्तीसारख्या) होत्या. या मंदिराच्या बाहेरच्या चौकात आपल्याकडील तुळशीवृंदावना सारखा दिसणारा एक चबुतरा होता. त्यावर देखील भाविक उदबत्या लावत होते.



व्हिएतनाम मधील राजांची, ठिकाणांची नावे भाषा अतिशय वेगळी असल्याने येथील प्राचीन इतिहास समजावून घेणे आणि तो लक्षात ठेवणे हे एक कर्मकठीण काम होते. शिवाय इथल्या गाईडचे किंवा स्थानिक लोकांचे  इंग्रजी उच्चार देखील समजायला अवघड जात होते. पण सुदैवाने आमच्या बरोबर प्रो. डॉ. अंबरीश खरे असल्यामुळे आम्ही येथील ठिकाणे बघितल्यावर इथला इतिहास, वैशिष्ठ्ये समजायला सोपा जाई.

 

'Tam Coc' येथे अफलातून नौकानयन

'दिन्ह होआंग' चे मंदिर बघून आम्ही निन्ह बिन्ह या भागातल्या 'Tam Coc' येथे नौकानयन करण्यासाठी निघालो. बोटिंग म्हणल्याबरोबर आमच्या ग्रुप मध्ये एक आनंदाची लहेर पसरली. वाटेत बस मधून आजूबाजूचा हिरवा निसर्ग, भात शेते बघत आम्ही Tam Coc येथे आलो. इथे 'एनगो डाँग' नावाच्या एका छोट्या नदीतून प्रवास करायचा होता. या नदीत नौकानयन करताना चुनखडीच्या तीन गुहा लागतात. पैकी पहिल्या गुहेचे नाव 'Hang Ca', दुसऱ्या गुहेचे नाव 'Hang Giua', तर तिसऱ्या गुहेला 'Hang Cuoi' म्हणतात. (ह्या नावांचे उच्चार कसे करतात ते मला माहित नाही. वाचकांनी त्याचा शोध घ्यावा) ह्या गुहा आणि या नदीतील प्रवास हा मात्र एक रोमांचकारी अनुभव आहे.

 


आमचा ग्रुप तसा छोटाच होता. आम्ही नदीच्या किनाऱ्यावर जाताच दहाबारा नावाडी त्यांच्या वल्व्हायच्या नावा घेऊन आले. आमचे या नदीतील सफरी चे देखील बुकिंग आधीच झालेले होते. प्रत्येक नावे मध्ये दोन याप्रमाणे आम्ही बसलो आणि आमची ही धमाल सफर सुरु झाली. मी आणि अलका अगदी शेवटच्या नावेत बसलो. बाकीचे सहप्रवासी पुढे निघून गेले. प्रत्येक नावेचा नावाडी नावेच्या पाठीमागे आरामात बसून पायाने वल्हे मारत होता. हा पायाने वल्हे मारण्याचा मजेशीर प्रकार मी इथे पहिल्यांदाच पहिला. या सर्व नावाड्यांमध्ये महिला आणि मुलींची संख्या लक्षणीय होती. सर्व सहप्रवासी पुढे गेल्याचे पाहून आमच्या नावाड्याने नावेत जास्तीची ठेवलेली दोन वल्ही खुणेनेच (भाषेची अडचण) आम्हाला घ्यायला सांगितली आणि नाव चालवायला सांगितली. मग काय आम्ही खुश!. मी आणि अलकाने जोरात वल्ही मारत पुढे गेलेल्या आमच्या सहप्रवाशांना गाठले. मज्जा आली. 'एनगो डाँग' नदीचे पाणी वाहणारे आणि अतिशय स्वच्छ, नितळ तर होतेच, पण विशेष म्हणजे या नदीच्या पाण्यात आजूबाजूला शेकडो लालगुलाबी कमळे फुलली होती. डोक्यावर दुपारचे ऊन होते तरीही पाण्यामुळे आणि आजूबाजूच्या झाडीमुळे हवेत अल्हाददायक गारवा होता. ह्या प्रवासात आमची नाव जेंव्हा पहिल्या गुहेत शिरली तेंव्हा गुहेत पूर्ण अंधार होता. आमच्या नावाड्याने त्याच्याकडील एक बॅटरी आमच्या हातात दिली, आणि स्वतःकडील एक बॅटरी सुद्धा चालू केली. बॅटरीच्या प्रकाश झोतात आम्ही निसर्गाचा हा चमत्कार पाहू लागलो.

 


हजारो लाखो वर्ष पावसाचे पाणी ह्या गुहांच्या वर असलेल्या डोंगरावर पडून, डोंगरातून पाझरून गुहेत पडते. हे पाणी पाझरताना डोंगरातील खनिजे, क्षार बरोबर घेऊन खाली पडत राहते. या क्षारयुक्त पाण्याचे थेंब एकाखाली एक वळून साठत जातात. लाखो वर्षानंतर या थेंबांचे उभे खांब तयार होतात. काही ठिकाणी या क्षारांची झुंबरेच तयार होतात. यांना मराठीत 'लवणस्तंभ' असे म्हणतात. ह्या लावणस्तंभांचे वय लवणस्तंभांच्या वाढीच्या वेगावर ठरवतात.  आपल्याकडील अंदमानात देखील अशा गुहा आहेत. ह्या गुहा उंचीला इतक्या कमी होत्या की नावेत बसल्या बसल्या आम्ही या लवणस्तंभांना हात लावू शकत होतो. काही ठिकाणी नावाडी आमच्या डोक्याला हे लवणस्तंभ लागू नयेत म्हणून सूचना देखील करत होता. एके ठिकाणी आमच्या नावाड्याने गुहेच्या एका कडेला त्याच्याकडील बॅटरीचा झोत टाकला आणि नैसर्गिकपणे तयार झालेल्या बुद्धा प्रमाणे आकार असलेल्या खडकाला दाखवले.या दगडाच्या बुद्ध मूर्तीवर काही भाविकांनी फुले देखील वाहिलेली दिसली. मला हसू आले. म्हणतात ना..  श्रद्धाळू माणसांना दगडात देखील देव दिसतो. मनुष्य स्वभाव सगळीकडे सारखाच!  मला मात्र त्या दगडाच्या आकारात बुद्ध वगैरे किंवा देवबिव काही दिसला नाही. असो..

 


अंदाजे पाऊणएक तासाची आमची ही बोट राईड तीनही गुहा बघून आता परतीच्या प्रवासाला लागली होती. तसा आमचा नावाडी खूप बोलका होता, पण त्याला आमची मराठी किंवा इंग्रजी भाषा आणि आम्हाला त्याची व्हिएतनामी भाषा येत नसल्याने हातवारे, खाणाखुणा यावरच आमचा मधून मधून कसाबसा संवाद चालू होता. आमच्या गाईड ने 'हे नावाडी पैसे (टीप) मागतील, पण तुम्ही ते देऊ नका' असे बजावले होते. पण त्याचा बोलका स्वभाव आणि उन्हात तासभर नाव चालवायचे कष्ट बघून अलकाला त्याची दया आली. आम्ही शेवटी खुश होऊन त्याला एक डॉलर टीप दिली. तो ही खुश झाला.

 

 

'बीच डाँग पॅगोडा



या नावेच्या धमाल सफरी नंतर आम्ही Tom Coc घाटाच्या पूर्वेस सुमारे चारपाच कि.मी. अंतरावर असलेला 'बीच डाँग पॅगोडा' बघायला गेलो. जाताना बस मध्ये नेहेमीप्रमाणे आमच्या गाईडने आम्हाला या पॅगोडा ची माहिती दिली, आणि सांगितले की 'हा पॅगोडा उंच अशा डोंगरावर आहे. सुमारे चारशे पायऱ्या चढायला लागतील. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनीच चढा'. अलकाचा गुढगा आजकाल दुखतो त्यामुळे ती काळजीत पडली. 'आता आपण इतक्या लांब आलेलो आहोत तर थोडा प्रयत्न करून बघुयात, जेव्हडे जमेल तेव्हडे चढूयात, नाहीच जमले तर खाली येऊन बसू' वगैरे सांगून मी तिच्या मनाची तयारी केली. आणि आम्ही पॅगोडा बघण्यासाठी डोंगराच्या पायऱ्या चढू लागलो. पायऱ्या उंच असल्याने थोडी दमछाक झाली खरी पण आम्ही चढून गेलो. ह्या पॅगोडाच्या समूहात एकूण तीन पॅगोडांचा समूह आहे. हा पॅगोडा समूह 'बीच डाँग' पर्वताच्या तीन पातळ्यामध्ये विखुरला आहे. पहिल्या पातळीवर म्हणजे पर्वताच्या पायथ्यालाच एक पॅगोडा आहे. त्याला 'लोअर पॅगोडा' असं म्हणतात. 'ट्रूग पॅगोडा' हा साधारणपणे पर्वताच्या मध्यावर आहे. आणि पर्वताच्या उंच भागातील पॅगोडाला 'थुओंग पॅगोडा' असं नाव आहे. आजूबाजूला भव्य अश्या पर्वत रांगा आणि गर्द हिरवळीत लपलेला हा पॅगोडा समूह म्हणजे निसर्ग आणि मानवाने निर्माण केलेली अप्रतिम कलाकृती आहे. या सर्व पागोडांमधून जाताना आम्हाला अनेक उंच दगडी पायऱ्या आणि काही ठिकाणी अंधाऱ्या गुहांमधून जावे लागले. सर्वात वरील पॅगोडा मध्ये दोन उतरत्या छपराच्या घरासारख्या दिसणाऱ्या खोल्या आहेत. या खोल्यांच्या समोर एक प्रांगण असून आतील खोलीत बोधिसत्वाची एक सुरेख मूर्ती आहे. इथल्या तीनही पॅगोडाज मधील मुर्त्यांची समोर मेणबत्या, उदबत्त्या, आणि दिवे लावलेले असल्याने एक प्रकारचे अतिशय पवित्र वातावरण इथे होते. इथल्या भारलेल्या वातावरणामुळे आम्ही कळत हा उंच पर्वत सहज चढून गेलो होतो. तिसऱ्या पॅगोडावर थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा खाली उतरलो. हानोइ शहराकडे कडे परतताना दिवस मावळला होता... 

 


दिवस सातवा ()

 

'हालॉंग बे' - डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग.

आम्ही आता व्हिएतनाम टूर च्या शेवटच्या टप्प्याकडे जात होतो. 'हालॉंग बे' हा आमच्या टूर मधील अतिशय महत्वाचा भाग होता. आम्ही सर्वच जण हालॉंग बे बघण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. सकाळी साडेसात वाजता नेहेमीप्रमाणे नाश्ता करून आम्ही हानोई च्या हॉटेल मधून चेक आऊट करून बाहेर पडलो. हालॉंग बे च्या दिशेने आमची बस धावू लागली. हानोइ पासून हालॉंग बे साधारणपणे दीडशे कि. मी. लांब आहे. 'हाय फोंग' नावाच्या महामार्गावरून आमची बस जात होती. हा हायवे अतिशय प्रशस्त आणि सरळ आहे. सहप्रवाशांबरोबर गप्पागोष्टी करत आणि मृणाल जोशींनी आणलेला खाऊ हादडत आमचा प्रवास मजेत चालला होता. साधारण दीड तासानंतर आमची बस टॉयलेट ब्रेक साठी एके ठिकाणी थांबली. इथे कृत्रिम पद्धतीने मोती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात.  या मोत्यांपासून तयार केलेले दागिने विक्री साठी असलेला एक मोठा मॉल तिथे होता. मोती निर्माण कसे करतात हे दाखवण्यासाठी एका दालनात काही कारागीर त्यांची आयुधे घेऊन बसले होते. इथे दोनतीन व्हिएतनामी तरुणी येऊन आम्हाला मोती कसे करतात ह्याची माहिती देऊ लागल्या...

 


ऑयस्टर नामक समुद्री जीव स्वसंरक्षणासाठी टणक अश्या शिंपल्यामध्ये राहत असतो. या ऑयस्टर ला आपल्याकडे 'कालवं' असे म्हणतात. सरसकट सर्वच शिंपल्यांमधून मोती तयार होत नसतात. काही विशिष्ठ शिंपले शोधून त्यात मोती तयार केले जातात. या शिंपल्यांच्या आतील भागात राहणारा ऑयस्टर अतिशय मऊ, मुलाय, नाजूक असतो.  या शिंपल्यात एखादा कठीण वाळूचा कण किंवा एखादा सूक्ष्म कठीण कण गेला की तो आतील ऑयस्टरला टोचू लागतो. ही टोचणी कमी व्हावी म्हणून शिंपल्यातला ऑयस्टर स्वतःच्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट आणि पाणी ह्यांचे मिश्रण असलेलया द्रावाचे थर त्या वाळूच्या कणावर चढवू लागतो. ही प्रक्रिया फार सावकाश होत असते. त्यामुळे मोती तयार व्हायला काही महिने किंवा वर्षे लागतात. नैसर्गिक रित्या मोती तयार होण्याचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे मानवाने कृत्रिमरित्या मोती तयार करण्याचे  तंत्र विकसित केले. हे तंत्र जगात सर्वप्रथम जपान मध्ये विकसित झाले. नियंत्रित वातावरणात हे शिंपले ठेऊन नंतर योग्य वेळी हे शिंपले थोडेसे उघडून त्यात बारीक वाळूच्या कणाचे रोपण केले जाते. मग हा शिंपला पुन्हा बंद करून ठेवला जातो. काही काळानंतर या शिंपल्यात मोती तयार होतो. तयार झालेला मोती शिंपल्यातून बाहेर काढून त्याला चमक आणण्यासाठी त्यावर काही रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. मोती संवर्धनाच्या कामामुळे येथील स्थानिक ग्रामीण लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. ह्या ठिकाणी तयार झालेल्या मोत्यांचे सुरेख दागिने लागूनच असलेल्या मोठ्या मॉल मध्ये विक्रीसाठी ठेवलेले होते. तिथे आमच्या ग्रुपमधील काही मंडळींनी छोटीमोठी खरेदी केली. इथे एक कॉफी शॉप देखील होते. आम्ही आपली दागिन्यांच्या खरेदी ऐवजी कोल्ड कॉफी पिणेच पसंत केले.

 


पुन्हा हालॉंग बे च्या दिशेने आमचा बस प्रवास सुरु झाला. आज आणि उद्या आमचा मुक्काम हालॉंग च्या खाडी समुद्रातल्या एका क्रूझ वर होता. त्यामुळे आज आणि उद्याचा अनुभव काहीतरी वेगळा असणार होता. हालॉंगच्या खाडीत राहण्यासाठी इथे अनेक लहान मोठ्या क्रुझची व्यवस्था असते. मृणाल जोशींनी 'अथेना' नावाच्या क्रूझवर आमची व्यवस्था केली होती. आमची बस हालॉंग खाडीत जाण्यासाठी तिकिटे काढण्याची व्यवस्था असलेल्या इमारती समोर थांबली. आमची बस आम्ही आता सोडणार असल्यामुळे आमचे सर्व सामान, बॅगा घेऊन आम्ही निघालो. तिकिटांच्या इमारतीत आल्यावर आमचा 'अथेना क्रूझ'चा मॅनेजर हसत मुखाने सामोरा आला. त्याने आमचे स्वागत केले. अथेना क्रूझ मोठी असल्यामुळे ती खोल समुद्राच्या आत दूरवर उभी होती. तिथपर्यंत आम्ही छोट्या मोटारबोटीतून जाणार होतो. ही छोटी मोटारबोट येईपर्यंत आम्हाला इथे थोडा वेळ काढायचा होता. इथे या इमारतीत इतरही काही क्रूझ बोटी आपापल्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या होत्या त्यामुळे इथे पर्यटकांची अक्षरशः झुंबड होती. इथल्या शॉपिंग साठी असलेल्या दुकानातून आम्ही विंडो शॉपिंग करत वेळ काढला. थोड्या वेळाने आम्ही आमच्या आमच्या क्रूझ वर जाण्यासाठी छोट्या मोटारबोटीत बसलो.

 

'अथेना' क्रुझ मधील धमाल



छोट्या मोटारबोटीतून खोल समुद्रखाडीत जाताना आम्हाला अनेक बोटीतून जाणारे प्रवासी दिसत होते. दूरवर अनेक मोठ्या क्रूझबोटी नांगर टाकून उभ्या असलेल्या दिसत होत्या. त्यांच्या पाठीमागे दूरवर उगवलेले उंच डोंगरसुळके देखील आता दृष्टीक्षेपात येऊ लागले. आम्ही आता काहीतरी काहीतरी आश्चर्यकारक निसर्गाचा अविष्कार बघणार आहोत ह्याचा अंदाज येऊ लागला होता. आमची 'अथेना' क्रूझ आम्हाला जेंव्हा दिसली तेंव्हा क्रूझच्या प्रवेशद्वारावर तीन व्हिएतनामी ललना हसत मुखाने आणि टाळ्या वाजवत आमचे स्वागत करताना दिसल्या. प्रत्यक्ष क्रूझवर प्रवेश केल्यावर आत येताना पारंपरिक ढोल वाजवून खाली वाकत या तरुणींनी आमचे स्वागत केले. एका तरुणीने फ्रेश होण्यासाठी आम्हा प्रत्येकाला एक ओला सुगंधित नॅपकिन आणि वेलकम ड्रिंक देखील दिले. क्रूझच्या रिसेप्शनिस्ट ने आम्हाला आमच्या खोल्यांची किल्ली (कार्ड) दिली. आमच्या रूम मध्ये जाऊन आमचे सामान ठेऊन आम्ही थोडे स्थिरावलो. या क्रूझ मधील रूम्स अतिशय अद्ययावत होत्या. प्रत्येक रूमच्या समुद्राकडील बाजूला एक भली मोठी काचेची खिडकी होती. त्यातून समोरचा अथांग समुद्र आणि मधून मधून समुद्राबाहेर आलेले उंच डोंगरसुळके दिसत होते. याच बाजूला एक बाल्कनी देखील होती. या बाल्कनीत उभे राहून समोरचे अद्वितीय निसर्गदृश्य पहात, समुद्रावरून येणारा भणाणणारा थंड वारा अंगावर घेत, गरम गरम कॉफीचे घुटके घेणे म्हणजे स्वर्गीय आनंदच...

 




आमची क्रूझ तीन मजली होती. क्रूझच्या दोन्ही बाजूला आमच्या खोल्या होत्या. दुसऱ्या मजल्यावर क्रूझच्या पुढच्या बाजूला किचन आणि डायनिंग हॉल होता. इथे इथं ब्रेकफास्ट,लंच, डिनर साठी उत्तम व्यवस्था होती. तिसऱ्या मजल्यावर देखील पर्यटकांसाठी रूम्स होत्या त्यावरी टेरेसच्या डेक वर एक सुरेख बार होता आणि बसण्यासाठी, आराम करण्यासाठी आरामखुर्च्या देखील  ठेवल्या होत्या. आम्हाला नाश्त्यासाठी थोड्यावेळाने बोलावण्यात आले. आम्ही दुसऱ्या मजल्यावरच्या डायनिंग हॉल मध्ये जमलो. तिथेच आमच्या क्रूझ मॅनेजरने 'क्रूझवर असताना सुरक्षेसाठी काय काळजी घ्यायची, किंवा क्रुझवरील ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत' याची आम्हाला सविस्तर माहिती दिली.  तसेच त्याने हालॉंग बे ची देखील सविस्तर माहिती दिली.

 



तो सांगत होता... हालॉंग बे हे युनेस्को (UNESCO) ने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेले महत्वाचे वारसास्थळ आहे. ही खाडी हालॉंग शहराच्या जवळ आहे. या खाडी मध्ये शेकडो लहानमोठे चुनखडी पासून बनलेले उंच डोंगरसुळके आहेत.   या खाडीचे क्षेत्रफळ सुमारे १५५० स्क्वे. कि.मी. इतके आहे. या खाडीतील चुनखडीयुक्त बेटे हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या परिस्थितीतून आणि वेगवेगळ्या वातावरणात तयार झालेली आहेत. या विस्तीर्ण अशा समुद्रखाडीत अनेक प्रकारचे प्रवाळ, समुद्री जीव, त्यांच्या अनेक प्रजाती यांची वाढ येथील उष्णकटिबंधीय हवामानामुळे उत्तम होते. त्यामुळे येथील जैवविविधता अतिशय समृद्ध आहे. सुमारे वीस हजार वर्षांपासूनच्या विकसित झालेल्या व्हिएतनामी संस्कृतीचे अस्तित्व, खाणाखुणा, पुरावे या खाडीतील डोंगर सुळक्यांमध्ये सापडलेले आहेत. या खाडीतील सुळक्यांकडे वरून आकाशातून (Arial View) पहिले असता हे सुळके एखाद्या लांब अक्राळविक्राळ ड्रॅगन सारखे दिसतात. एका स्थानिक पौराणिक कथेनुसार व्हिएतनामी लोकांना पूर्वीपासूनच आक्रमणकर्त्या शत्रूंविरुद्ध संघर्ष करावा लागला होता. व्हिएतनामी लोकांना त्यांच्या देशापासून संरक्षण मिळण्यासाठी देवतांनी ह्या ड्रॅगनला संरक्षक म्हणून पाठवले. या ड्रॅगनने समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंची जहाजे अडवण्यासाठी ह्या सुळक्यांची निर्मिती केली. त्यामुळे ह्या डोंगरसुळक्यांमुळे शत्रूंची जहाजे खडकावर आणि एकमेकांवर आदळत असत, आणि शत्रूचा नाश होई. या आणि अशा अनेक पौराणिक आख्यायिकांवर इथल्या स्थानिक लिकांचा विश्वास आहे. युद्ध संपल्यावर देखील कायम शांतता अबाधित राहावी म्हणून या ड्रॅगनने इथं कायमचं वास्तव्य केलेलं आहे असे देखील इथले लोक मानतात. या हालॉंग च्या खाडीत चुनखडीच्या सुमारे २००० सुळक्यांचा किंवा बेटांचा समूह आहे. प्रत्येक डोंगर सुळक्यावर घनदाट झाकी, जंगली वनस्पती आहेत. यातील अनेक बेटे आतून पोकळ अशा गुहांनी बनलेली आहेत. बऱ्याच बेटांवर पर्यटकांसाठी हॉटेल्स आहेत. काही बेटांवर छोटे छोटे रम्य समुद्रकिनारे आहेत. इथल्या काही बेटांवर कायमस्वरूपी स्थानिक रहिवाशांचं वास्तव्य देखील आहे. ह्यातील काही रहिवासी तरंगत्या घरांमध्ये देखील राहतात. हे रहिवासी मासेमारी आणि मत्स्यपालन करून आपली उपजीविका करतात. वेळेअभावी आम्हाला ह्या तरंगत्या घरांच्या वस्तीला भेट देता आली नाही. मात्र आज येथील एक नैसर्गिक गुहा बघायला आम्हाला जायचं होतं.

 




'सुंग सॉट' गुहा

आमच्या क्रूझ मॅनेजरकडून हालॉंग बे ची माहिती ऐकून आम्ही आज ब्रंच करायला सुरवात केली. वेळ कमी असल्यामुळे पुन्हा क्रूझवर येऊन दुपारचे जेवण करणे अवघड होते. आम्ही आता लगेचच 'सुंग सॉट' नावाची गुहा बघायला जाणार होतो. परत यायला आम्हाला संध्याकाळचं होणार होती त्यामुळे भरपूर खाऊन घेतले. आमच्या क्रूझ च्या ब्रंच मध्ये मी ऑयस्टर (आपल्या कोकणी भाषेत कालवं) किंवा शिंपले खाऊन पहिले. आयुष्यात पहिल्यांदाच खात असल्यामुळे जरा बेताबेतानेच चव घेतली. पण छान लागले. सर्व प्रकारचे मासे, कोळंबी सारखीच साधारण चव लागली. भरपेट खाऊन आम्ही हालॉंग बे मधील सर्वात मोठ्या 'सुंग सॉट' नावाच्या गुहेकडे निघालो. या हालॉंग च्या खाडीत साधारण मध्यभागी 'बॉ होन' नावाचा एक भलामोठा डोंगरसुळका आहे. या डोंगरामध्ये ही अतिप्रचंड गुहा आहे. ही गुहा १९०१ मध्ये फ्रेंचांनी प्रथम शोधुन काढली. या गुहेच्या आश्चर्यकारक सौंदर्यामुळे 'ग्रोटे डेस सर्प्राइझेस' किंवा आश्चर्यकारक गुहा असे या गुहेला नाव दिले गेले. आमची क्रूझ 'बो होन' डोंगर सूळक्यासमोर खाडीच्या खोल पाण्यात उभी केली गेली. क्रूझ मधून मग आम्ही छोट्या मोटारबोटीने 'बो होन' डोंगराच्या पायथ्यापाशी पोहोचलो. या डोंगरावर समुद्रसपाटीपासून सुमारे ३० मीटर्स चढून गेले की या गुहेचे प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेपर्यंत ही गुहा आपल्याला दिसत देखील नाही. गुहेच्या छोट्या प्रवेशद्वाराने गुहेत गेल्यावर त्या गुहेची भव्यता बघून मी आवाकाच झालो. ही गुहा तब्बल १०,००० चौरस मीटर्स इतकी मोठी आहे. सुमारे सरासरी ३० मीटर्स उंच आणि सुमारे ५०० मीटर लांब अश्या ह्या गुहेत सर्वत्र उजेडासाठी विविधरंगी प्रकाश झोत सोडलेले आहेत. या गुहेतील नैसर्गिकरित्या तयार झालेले लावणस्तंभांचे विविध आकार खडकांच्या चमत्कारिक पण आकर्षक रचना आपली मती गुंग करून सोडतात. आज आमचा क्रूझ मॅनेजर आमच्या बरोबर ह्या गुहेची माहिती सांगत फिरत होता. इथे दगडात हत्ती, सील, घोडा यासारख्या प्राण्यांसारख्या आकृत्या दिसू शकतात. एका अतिविशाल दगडात 'उंच दिशेने दाखवणाऱ्या बोटासारखा' आकार दिसतो. प्रत्येक पर्यटक आपापल्या कल्पनाशक्तीनुसार येथील दगडांच्या स्तरांमध्ये आपल्या मनाजोगते आकार शोधत असतो. ह्या गुहेत एका घोड्यासारख्या दगडाकडे आपले लक्ष जाते. या घोड्याबद्दल एक दंतकथा देखील इथं प्रचलित आहे. 'थान्ह गियोंग' या देवाने भुते आणि दुष्ट आत्म्यांना तलवारीने पराभूत करून स्थानिक लोकांचे संरक्षण केले आणि हे कार्य पूर्ण झाल्यावर भविष्यातील येणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्या साठी त्याने आपली तालावर आणि आणि घोडा इथेच म्हणजे या गुहेत ठेवली आणि तो स्वर्गात गेला. आपल्याकडेही आख्यायिका प्रचलित आहेत, तसेच इकडेही! शेवटी मनुष्य स्वभाव सगळीकडे सारखाच.

 


या गुहेत देखील क्षार, खनिजेयुक्त पावसाचे पाणी वर्षभर आत झिरपत असते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विचित्र आकाराचे लवणस्तंभ इथे दिसतात. या चित्रविचित्र लावणस्तंभा जवळ उभं राहून फोटो काढण्यासाठी पर्यटक गर्दी करत होते. आम्ही देखील भरपूर फोटो काढले. ही आश्चर्यकारक गुहा बघून आम्ही बाहेर पडलो.  पुन्हा छोट्या छोट्या भेटवस्तूंची स्टॉल्स बघत, ओलांडत आम्ही डोंगरपायऱ्या उतरलो आणि आमच्या मोटारबोटीत येऊन बसलो. आता सूर्य मावळतीकडे झुकला होता. ह्या 'बा होन' डोंगरसूळक्या जवळच असलेल्या दुसऱ्या एका उंच डोंगर सुळक्यावर आम्ही आलो. इथे एक सुंदर पण अतिशय छोटा समुद्रकिनारा होता. इथे आम्हाला भरपूर मोकळा वेळ दिला होता. आम्हाला इथे किनाऱ्यावर पोहोण्याची मुभा होती. त्यामुळे आमच्यापैकी काही मंडळी समुद्रात डुंबायला गेली. मी आणि अलकाने या किनाऱ्यालगत असलेल्या उंच डोंगरावर चढणे पसंत केले. (अल्काची गुढगेदुखी एव्हाना ती बहुदा विसरली असावी.) या उंच डोंगरावरून हालॉंग खाडीचा नजारा फारच अफाट दिसतो. उंचावरून या खाडीचे फोटो घेणे हे पर्यटकांसाठी खूप आनंदाचा भाग असतो. किनाऱ्यावरून सूर्यास्ताचे फोटो घेण्याचा मोह मला आवरला नाही.

 



क्रूझ वरील संध्याकाळचे स्वर्गसुख



सूर्यास्तानंतर आम्ही लगेचच आमच्या 'अथेना' क्रूझवर आलो. आता रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत आम्हाला बराच वेळ मोकळा होता. मग आम्ही आवरून क्रूझच्या टेरेसडेक वर जमा झालो. आता बऱ्यापैकी अंधार पडू लागला होता. या डेक वर अद्ययावत बार आणि रेस्टोरंट होते. मी 'हालॉंग सफायर' नावाची इथली लोकल बियर घेतली. ग्रुप मधील काही जणांनी वाईन, कोल्डड्रिंक,कॉफी घेतली. बियरचे घुटके घेत मी आजूबाजूचा निसर्ग न्याहाळू लागलो. सूर्यास्त होऊन गेला होता. हालॉंग च्या खाडीतले उंच डोंगरसुळके लालसर तांबूस क्षितीजाच्या पार्श्वभूमीवर फारच सुरेख दिसत होते. आमच्या अथेना क्रुझ प्रमाणे आजूबाजूला दूरपर्यंत खाडीत अनेक मोठ्या क्रुझेस तळ ठोकून उभ्या होत्या. त्यावरील दिव्यांच्या प्रकाशाने खाडीचे शांत पाणी चमकत होते. थंडगार समुद्री वारे शरीराला सुखावत होते. बियर मुळे शरीर सैलावले होते. सोबतीला सहप्रवाशांबरोबर गप्पाटप्पा चालूच होत्या. स्वर्गसुख याहून वेगळ काय असू शकतं ? दोन अडीच तासांच्या ह्या स्वर्गीय वातावरणातून बाहेरच पडू नये असं वाटंत असतानाच खालच्या दुसऱ्या मजल्यावरून जेवण्यासाठी बोलावणे आले



आज आम्हाला बुफे पद्धतीने जेवण देता इथल्या क्रूझ व्यवस्थापनाने सेव्हन कोर्स जेवण टेबलावरच द्यायचं ठरवलं होतं. आजच्या जेवणात सुरवातीला सूप्स, सॅलड्स, न्युडल्स, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार येऊ लागले. मग खास व्हिएतनामी पाककृतींचे पदार्थ सुरु झाले.अनेक मांसाहारी पदार्थ जसे चिकन, पोर्क, मोठे मोठे किंग प्रॉन्ज, ताज्या माशांच्या नानाविध पाककृती स्क्विड, लॉबस्टर असे अनेक प्रकार आमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तत्परतेनं आमच्या पुढ्यातल्या डिश मध्ये येऊन विसावत होते. मी बऱ्याच पदार्थांच्या चवी आवर्जून घेतल्या. आजचे हे जेवण खूपच स्पेशल होते. माझ्यातला ब्राह्मण तुडुंब जेवून अगदी तृप्त झाला. जेवल्यावर आम्ही आमच्या रूम मध्ये जाऊन झोपी गेलो.

 


दिवस आठवा () आणि शेवटचा

 

‘ताई ची’ योगा

नेहेमीप्रमाणे सकाळी सकाळी साडेपाच सहालाच जाग आली. मी समुद्राच्या बाजूच्या खिडकीचा पडदा बाजूला केला. पूर्वेला क्षितिजावर सूर्योदयापूर्वीचा अंधुक लाल प्रकाश  पसरला होता. आमच्या रूमच्या बाल्कनीत येऊन मी बाहेरचा नजारा अनुभवू लागलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रूझ ला लागूनच असलेल्या एका छोट्या लाईफ बोटीवर आमचा क्रूझ मॅनेजर चक्क दोरीवरच्या उड्या मारत व्यायाम करत होता. समुद्राच्या पाण्यावर पांढऱ्या शुभ्र धुक्याची जाडसर चादर पसरली होती. समुद्री पक्षांची आकाशात लगबग वाढू लागली होती. हवेत थंडावा देखील वाढला होता. तेव्हड्यात अलकाने गरम गरम कॉफीचा कप माझ्या हातात आणून दिला. जवळ जवळ अर्धा तास मी या जादुई वातावरणात रमून गेलो होतो. समोरच्या खाडीचे दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हड्यात कुणीतरी निरोप दिला की सात वाजेपर्यंत सगळ्यांनी व्यायामासाठी वरच्या टेरेस डेक वर जमायचंय. व्हिएतनाम मधील 'ताई ची' नावाचा योगा प्रकार आज आम्हाला कुणीतरी शिकवणार होतं. आता हा काय नवीन प्रकार आहे? ते कळेना. आम्ही उत्सुकतेने टेरेसडेक वर गेलो. तिथे टेरेसवर एक व्हिएतनामी योगा प्रशिक्षक आमची वाटच बघत होता.  सर्वजण जमल्यावर त्याने सर्वांना रांग करून एकामागे एक असे उभे राहायला सांगितले. सुरवातीला त्याने ह्या  'ताई ची' योगा बद्दल माहिती दिली.  'ताई ची' (Tai Chi) हा एक पारंपरिक चिनी मार्शलचा व्यायाम प्रकार असून तो शतकानु शतके केला जात आहे. हा व्यायाम सावकाश हालचाली करून करण्याचा व्यायाम आहे. हा व्यायाम खोल श्वासोच्छवास घेऊन करायचा असल्यामुळे याने शरीरातील रक्ताभिसरण उत्तम होते. संथ आणि नियंत्रित हालचाली केल्याने शरीराची गतिशीलता सुधारून शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. सौम्य आणि लयबद्ध हालचाली ह्या व्यायाम प्रकाराचे वैशिष्ठ्य आहे. या व्यायामाच्या नियमित सरावामुळे नैराश्य, चिंतामुक्ती कमी होऊन मानसिक आरोग्यही सुधारते म्हणे. असो... आमच्या ग्रुपमधील मंडळी जेंव्हा हा व्यायाम करू लागली तेंव्हा एकच हास्यकल्लोळ उडाला. प्रशिक्षकाकडे बघत सगळे शरीराच्या हालचाली करताना बघून मला हसू आवरेना. मी त्यांचे शूटिंग घेण्यात गुंतलो होतो. चेष्टा मस्करी करत सगळे धमाल व्यायाम करत होते. सुमारे अर्धातास हा विनोदी व्यायाम प्रकार चालू होता. 



'हँग ल्युओन' गुहेमधील नौकानयन

 सकाळचा व्यायाम झाल्यावर आम्ही अंघोळी वगैरे केल्या आणि या खाडीत बोटिंग करण्यासाठी निघालो. पुन्हा क्रूझ मधून निघून छोट्या मोटारबोटीने आम्ही 'हँग ल्युओन' गुहेच्या दिशेने निघालो. हाताने वल्व्हायच्या नावेतून ह्या खाडीत नौकानयन करणे म्हणजे एक अफाट प्रकार आहे. चारही बाजूंनी असलेल्या उंच डोंगर सुळक्यांमधील समुद्रखाडीतुन हे नौकानयन करायचे असते. दहा ते पंधरा पर्यटक बसतील एवढ्या मध्यम आकाराच्या सॅम्पसन बोटींमध्ये आम्ही तिकिटे काढून बसलो. आमची बोट एक व्हिएतनामी तरुण मुलगी चालवत होती. तिथल्या नावाड्यांमध्ये बहुतेक सर्व तरुण मुलीच नावा वल्व्हत होत्या. या डोंगरांनी वेढलेल्या पाण्यात एका गुहेतून जावे लागते. यान गुहेला 'हँग ल्युओन' गुहा असं म्हणतात. समुद्राच्या नितळ स्वच्छ पाण्यातून हँग ल्युओन गुहेतून जाताना या गुहेतील वातावरण काहीसं गूढ वाटतं. ही गुहा १०० मीटर लांब, मीटर रुंद आणि उंचीला फक्त मीटर आहे. या प्रवेशद्वारासारख्या गुहेतून आत गेल्यावर आम्हाला साधारण एक स्केअर किलोमीटर आकाराचे शांत दिसणारे अथांग असे एक, सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेले तळे दिसले. सभोवतालच्या डोंगर सुळक्यांनी बंदिस्त असलेल्या ह्या आतल्या भागातले समुद्रचे पाणी शांत होते. कारण आजूबाजूच्या डोंगरांनी समुद्रातील लाटा, वारा अडवलेला होता. या तळ्याच्या सर्व बाजूंनी चुनखडीचे खडक आणि डोंगरावरील घनदाट झाडी येथील तळ्याच्या सौंदर्यात भरच घालतात. वर निळ्या आकाशातील पांढरे ढग, पाण्यात पडलेली ढगांची आणि झाडांची प्रतिबिंबे यामुळे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याची परिसीमाच गाठते.

 


'हँग ल्युओनगुहेमधील नौकानयन

आम्ही नावेतून फिरत असताना अचानक आमची नाव चालवणाऱ्या मुलीने 'तुम्हाला नाव चालवायची आहे का?' असा प्रश्न विचारला. मला आश्चर्य वाटले. मी तात्काळ होकार देऊन तिच्या हातातली वल्ही हातात घेऊन मी नाव चालवू लागलो. पण हे नाव चालवायचे प्रकरण वाटते तितके सोपे नव्हते. वल्ही खूप जड होती. माझ्या वेड्यावाकड्या वल्व्हण्याने नाव कुठेही भरकटू लागली. थोड्याच वेळात माझे हात, दंड भरून आले, दुखायला लागले. माझी नाव चालवताना होणारी तारांबळ बघून ती नावाडी मुलगी आणि आमचे नावेतले सहप्रवासी हसू लागले. माझी नाव चालवायची हौस चांगलीच फिटली. ह्या सगळ्या हव्याहव्याश्या वातावरणातून बाहेरच पडावेसे वाटत नव्हते. पण इलाज नव्हता. सुमारे तासाभराच्या नावेतल्या सफर अनुभवत आम्ही 'हँग ल्युओन' गुहेतून बाहेर आलो. 'हँग ल्युओन' गुहा म्हणजे जणू स्वर्गाचे प्रवेशद्वारच आहे असे वाटते. ह्या नौकानयनांतर आमचा थकवा कुठच्या कुठे पळाला. एकूणच या हालॉंग खाडीमध्ये आल्यापासून आमचे नाते जणू निसर्गाशी जोडले गेले होते.

 


 आजचा आमचा व्हिएतनाम मधील शेवटचा दिवस होता. मृणाल जोशींनी क्रूझवर परत आल्यावर आमच्या आजच्या संध्याकाळी असलेल्या मुंबईला परत घेऊन जाणाऱ्या विमानाची आठवण केली. आणि आम्ही सर्वच जण भानावर आलो. गेले आठ दिवस एका स्वप्नवत जगात आम्ही वावरत होतो. क्रूझ चा निरोप घेऊन आम्ही हानोइ विमानतळाकडे आलो. संध्याकाळी वाजताच्या व्हिएतनाम एअरलाईन्स च्या विमानाने रात्री दहा वाजता मुंबई विमानतळावर उतरलो. यानंतर चार तासाच्या कंटाळवाण्या टॅक्सी प्रवासाने मध्यरात्री पुण्यातल्या घरी सुखरूप आलो. मात्र व्हिएतनामच्या त्या वातावरणातून मी बाहेरच पडू शकत नव्हतो. गेले आठ दिवस काय काय मजा आली हे आठवत होतो...

 

समारोप



सुरवातीला वाटले होते की या छोट्याश्या, गरीब देशात असं काय बघायला मिळणार आहे? कसे असतील इथले लोक? कशी असेल इथली व्यवस्था? पण या देशात गेल्यावर कळते की तुलनेने आपल्या भारतापेक्षा गरीब असला तरी हा देश आता खूप वेगाने प्रगती करत आहे. रक्तरंजित, अवहेलनाग्रस्त आणि हलाखीचा इतिहास मागे टाकून भविष्यातील प्रगतीच्या दिशेने हा देश वाटचाल करतो आहे. इथले लोक अतिशय कष्टाळू आणि नम्र आहेत. ते आपल्या कामात सतत मग्न असतात. व्हिएतनामी लोक शिस्तप्रिय देखील आहेत. इथे फिरताना रस्त्यात फारसे पोलीस दिसत नाहीत. चौकात आणि रस्त्यावर कर्कश्य हॉर्न वाजवताना देखील मला कधी कोणी दिसले नाही. इथे दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. त्यामुळे सर्वजण हेल्मेट घालून वाहन चालवताना दिसतात. एव्हडेच काय पण भरदाव वेगाने देखील एखादे वाहन जाताना दिसत नाही. चौकात सिग्नलवर किंवा रस्त्यात रहदारीचा कसलाही गोंधळ दिसला नाही. इथे रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवण्याचा नियम आहे. इथे अजून एक वेगळेपण म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे वाढवताना देखील प्रत्येक झाडाला एक लोखंडी फ्रेम लावून झाडे उंच आणि सरळ वरच्या दिशेने वाढतील अशी काळजी घेतलेली दिसत होती. म्हणजे झाडांना देखील इथल्या लोकांनी शिस्त लावली होती. त्यामुळे ही झाडे शहरांच्या सौंदर्यात भर टाकतात.

 


बाजारपेठ, वेगवेगळे व्यवसाय, स्टॉल्स कुठेही बघा इथं महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. व्हिएतनामच्या स्त्री-पुरुष प्रमाणात देखील महिलाच जास्त आहेत. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिलाच घेतात. व्हिएतनाम मध्ये भाषेची मात्र खूप अडचण होते. मी बऱ्याच ठिकाणी इथल्या लोकांशी बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांची व्हिएतनामी भाषा आणि आपली मोडकीतोडकी इंग्रजी यांचा मेळ कधी बसला नाही. जेवणात साधे मीठ मागायचे झाले तर किमान पाच सात मिनिटांची कसरत करावी लागे. एकदा मला कॉफीमध्ये दूध हवे होते, तर तब्बल दहा मिनिटाच्या मेहेनतीनंतर 'आमच्या कडे दूध नाही. आम्ही कॉफीत दूध घालत नाही' असे उत्तर मिळाले. त्याचे उत्तर मला समजायला पुढची दहा मिनिटे गेली ते वेगळेच. अशा गमतीजमती आमच्या ट्रिप मध्ये नेहेमीच घडायच्या. पण एक नक्की व्हिएतनाम हा अगदी वेगळा देश आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवायलाच हवा.

 


प्रवासाने थकल्यामुळे असेल पण रात्री उशिरापर्यंत झोप लागली नाही. मनात ट्रीपच्या आठवणींनी गर्दी केली होती. कधीतरी पहाटे झोप लागली. सकाळी उठून व्हिएतनामची चिठ्ठी पुन्हा माझ्या प्रवासीबकेटलिस्टच्या’ बकेट मध्ये खोल खाली जपून ठेवली. जाणो पुन्हा कधीतरी मला या ग्रेट देशात जायला मिळेल? इतर प्रवासी ठिकाणांच्या चिठ्या बकेट मधून वर येण्यासाठी धडपड करत होत्या. 'आता नंतर बघू' असे सांगून मी त्यांची समजूत घातली. पण तेव्हड्यात 'पंजाब' चे नाव लिहिलेली चिठ्ठी उसळी मारून वर आली आणि आर्जवे करीत, दोन्ही हात वर करीत मला म्हणून लागली 'आता मी...आता मी.' मला तिचा प्रेमळ आग्रह मोडवेना. (मी येत्या मार्च मधील पंजाब ट्रिप’ चे बुकिंग करून टाकले हे सांगायला नकोच, अर्थात मृणाल जोशींच्या ‘गो-अराऊंड’ मधेच).

 


समाप्त.

 

राजीव जतकर.

दि. जानेवारी २०२४