Wednesday, 18 October 2023

तरुण व्हायचंय ? 'बिग' पहा.

 

तरुण व्हायचंय ? 'बिग' पहा.



बारा तेरा वर्षांचा 'जॉस' आपल्या पालकांबरोबर गावात सुरु असलेल्या एका जत्रेत (कार्निव्हल) गेलेला असतो. जत्रेत फिरत असताना त्याच्याच वयाच्या मुलीकडे लक्ष जातं. जत्रेतील एका खेळाच्या राईड मध्ये बसण्यासाठी ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत तिकिटाच्या रांगेत उभी असते. 'जॉस' त्या मुलीबरोबर सलगी वाढवण्याच्या उद्देशाने तिच्या बरोबर रांगेत उभा राहतो खरा, पण तिकीट देणारा माणूस 'जॉस' ला म्हणतो 'तू अजून वयाने लहान आहेस, तुला ही राईड घेता येणार नाही. मोठा झाल्यावर ये'. त्या मुलीचा बॉयफ्रेंड 'जॉस'ची चेष्टा करतो. एकूणच 'जॉस' चा सर्वांसमोर अपमान होतो. 'जॉस' जाम वैतागतो. उदास होतो. त्याला लहान असण्याचे दुःख होते. निराश मनाने तो या जत्रेतल्या गर्दी नसलेल्या ठिकाणी जातो. तिथे त्याला वेगळ्याच प्रकारचा पण बहुदा बंद असलेला एक खेळ दिसतो. व्हेंडिंग मशीन प्रमाणे किंवा टेलिफोन बूथ प्रमाणे दिसणाऱ्या या मशीन मध्ये एका अक्राळविक्राळ राक्षसाचा चेहेरा असतो. या मशीन मध्ये एक नाणे टाकले की आपण आपली इच्छा या राक्षसाला सांगायची. मग हा मशीन मधला राक्षस आपली इच्छा पूर्ण करतो. असा काहीसा हा खेळ असतो. पण हे मशीन बंद पडलेले असल्या मुळे त्याच्या मालकाने ते थोडे बाजूला कोपऱ्यात ठेवलेले असते. 

 


अपमानाने वैतागलेला, निराश झालेला लहानगा जॉस काहीतरी चाळा म्हणून बंद पडलेल्या मशीन ला रागाने जोरजोरात थपडा मारतो, आणि आश्चर्य म्हणजे ते मशीन सुरु होते. जॉसला मजा वाटते. मग तो हा खेळ खेळायचा असं ठरवून मशीन मध्ये एक नाणे टाकतो. मशीन मधून कसलेतरी गूढ आवाज येऊ लागतात. राक्षसाच्या डोळ्यांमधील लाईट्स सुरु होतात. जॉस ने मशीन मध्ये सरकवलेलं नाणं राक्षसाच्या '' वासलेल्या तोंडातून मशीन मध्ये जाते. 'मला मोठं  व्हायचंय' अशी इच्छा मशीन मधल्या राक्षसाला जॉस सांगतो. मशीन मधून पुन्हा खाडखूड आवाज येतात, आणि मशीन मधून एक चिठ्ठी बाहेर येते. त्या चिठ्ठीवर लिहिलेले असते 'Your wish is granted' म्हणजेचतुझी इच्छा मंजूर झालेली आहे’. जॉसला काहीच कळत नाही. त्याचे लक्ष सहजच मशीन च्या पाठीमागे जाते. विजेवर चालणाऱ्या ह्या मशीन ची वायर आणि पिन खाली पडलेली असते. ती वीजपुरवठा करणाऱ्या प्लगला जोडलेली नसतेच. आता मात्र जॉस दचकतो. विजेवर चालणारे हे मशीन विजेशिवाय चाललेच कसे? आपल्याला मशीन मधून मिळालेल्या चिठ्ठी मधील वाक्याचा अर्थ काय? अशा अनेक शंका जॉस च्या मनात येऊ लागल्या. त्याच सुमारास सोसाट्याचा वारा सुटतो. वातावरण काहीसे गूढ झालेले असते. जॉसला दरदरून घाम सुटतो. घाबरून तो घराकडे पळत सुटतो. आईला उठवता, सांगता जॉस आपल्या बेडरूम मधील बंकबेड मध्ये जाऊन झोपतो. बाहेर वादळ सुरूच असते...

 


दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते ते एका विचित्र घटनेनेच! जॉस चक्क मोठा झालेला असतो. बाथरूम मधील आरशामध्ये पाहिल्यावर त्याच्या लक्षात येते की आपण चक्क तरुण झालेलो आहोत. आपली उंची वाढलीये. तरुण माणसाप्रमाणे आपल्यात शारीरिक बदल झालेले आहेत. आपल्याला दाढी आलीये. त्याला बघून त्याची आई देखील घाबरून किंचाळते. जॉस ने खूप समजावूनही ती त्याला ओळखत नाही. त्याचे नेहेमीचे कपडे त्याला लहान होतात. शेवटी घरातील वडिलांचे कपडे अंगावर चढवून तो घरातून पळून जातो. त्याच्या बालमित्राला 'बिली'ला मात्र घडलेली घटना, त्याच्यात झालेला बदल वगैरे पटवून देण्यात जॉस कसाबसा यशस्वी होतो...

 


इथून पुढे  सुरु होतो मोठ्या झालेल्या जॉस चा पुढील आयुष्यातील धमाल अडचणींचा प्रवास... जॉसचा हा प्रवास मोठ्या रंजक पद्धतीने मांडण्यात या चित्रपटाच्या दिग्दर्शिका 'पेनी मार्शल' या कमालीच्या यशस्वी झालेल्या आहेत. मोठ्या झालेल्या जॉसच्या आयुष्यात काय काय अडचणी येतात? जॉसचा बालमित्र 'बिली' त्याला कशी मदत करतो? चित्रपटाच्या शेवटी काय होतं? हे 'बिग' हा चित्रपट बघून अनुभवण्यात खरी गंमत आहे. वास्तविक हा बालचित्रपट असला तरी तो मोठ्या प्रेक्षकांची देखील छान करमणूक करतो, आणि मग हा बालचित्रपट मोठ्यांचाही होऊन जातो. 'गॅरी रॉस' आणि 'ऍना स्पीलबर्ग' यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आणि फुलवलेली आहे. त्यांचं विशेष कौतुक करायला हवं. जॉसच्या भूमिकेतील 'टॉम हंक' नेहेमीप्रमाणे अप्रतिम कामगिरी करतो. जॉसचा बालमित्र 'बिल'च्या भूमिकेतील 'जार्ड रश्टन' याने त्याची भूमिका समरसून केली आहे. ऐंशीच्या दशकात आलेल्या 'Honey I Shrank the Kids' या चित्रपटात तो चमकला होता. या शिवाय 'एलिझाबेथ पार्किन्स', 'रॉबर्ट लॉगिया', 'जॉन हार्ड' वगैरे मात्तबर अभिनेते या चित्रपटात आपला ठसा उत्तमपणे उमटवतात. छोट्या जॉसची भूमिका साकारणारा 'डेव्हिड मॉस्को' आपल्या लक्षात राहतो.  बिग हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला आणि कमालीचा यशस्वी देखील झाला. केवळ १८ दशलक्ष डॉलर्स इतक्या उत्पादन खर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरातून तब्बल १५० दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. त्या वेळी या चित्रपटाला अकॅडमी ऍवॉर्डच्या बेस्ट ऍक्टर साठी (टॉम हंक) नामांकनही मिळाले होते.

 

मी माझ्या तरुणपणी हा चित्रपट बघितला होता. तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी बघितलेला हा चित्रपट मी जवळपास विसरूनही गेलो होतो. परवा डिस्ने-हॉटस्टार वर  अचानकपणे हा चित्रपट सापडला. मी हा चित्रपट अधाशासारखा बघितला. पुन्हा तरुणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी पुन्हा तरुण झालो. भूतकाळात गेलो. जॉस आणि माझ्यात फरक एव्हढाच की लहान जॉस अचानक तरुण होतो, आणि मी म्हाताऱ्या वयात अचानक तरुण झालो. गमतीचा भाग सोडा, पण तुम्ही कोणत्याही वयाचे असा, हा चित्रपट नक्की बघा... तरुण व्हाल !

 

राजीव जतकर.

१८-१०-२०२३.