सत्यता न पडताळता अफवा पसरवणाऱ्या निर्बुद्ध समाजावर ताशेरे ओढणारा... 'अफवाह'
मध्यंतरी एका फेक व्हाट्स अप व्हिडीओ मेसेजवर मी माझ्या एका मित्राला 'सदर व्हिडीओ खोटा असून तो फॉरवर्ड करू नये' अशी विनंती केली. (हा व्हिडीओ धार्मिक तेढ वाढवणारा होता) त्यावर तो म्हणाला 'तुमच्यासारख्यांमुळेच हिंदू धर्म धोक्यात आलाय, पण आता बास.. आता हिंदू धर्म जागा होतोय वगैरे वगैरे ... ' मी त्याला समजावून सांगायचं प्रयत्न करत होतो की
'अरे मुळात हा मेसेज खोटा आहे त्याचं काय? कुणीतरी जाणूनबुजून मूळ व्हिडीओ मध्ये काटछाट करून गैरसमज पसरवणारा व्हिडीओ तयार केलाय. पण व्यर्थ ! हा माझा मित्र भलताच पेटला होता. आता तर त्याच्या दृष्टीने मी एक हिंदू विरोधी ठरलो होतो. कहर म्हणजे आमच्या या संभाषणाचा शेवट त्याने मला देशद्रोही म्हणून केला. हा माझा मित्र आताशा माझ्याशी बोलत नाही. माझा एक चांगला मित्र माझ्या पासून दुरावलाय. गंमत म्हणजे सामाजिक तणाव फक्त हिंदू मुस्लिम यांच्यातच नसून तो ब्राह्मण, दलित, मराठा असा सर्वच जाती धर्मात आहे. या अनुभवावरून आता मी कुणाला समजावून सांगणे सोडून दिले आहे. त्यामुळे माझ्या पुरता हा प्रश्न जरी सुटला असला तरी समाजातील प्रचंड वेगाने पसरणारी धार्मिक तेढ, दरी कशी थांबवायची हा एक ज्वलंत प्रश्न माझ्या मनाला अस्वस्थ करत रहातो...
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावरून फेक न्यूज आणि अफवा पसरवण्याचं प्रमाण काळजी करण्याइतकं वाढलं आहे. आपल्या एका चुकीच्या मेसेज फॉरवर्ड करण्यामुळे समाजावर त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात आणि आपण केलेली छोटीशी चूक किती आणि कशी महागात जाऊ शकते हे समजावून घ्यायचे असेल तर नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला 'अफवाह' हा चित्रपट समाजातील प्रत्येकानेच बघायला हवा. हा चित्रपट सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरावर आणि त्याच्या भयंकर परिणामांबद्दल प्रकाश टाकणारा आहे.
या चित्रपटाच्या कथेला सध्या चर्चेत असणाऱ्या लव्ह जिहाद, गोहत्या वगैरे प्रकारची पार्श्वभूमी आहे. ह्या गोष्टी काही प्रमाणात घडत देखील असतील. पण अशा प्रकरणांची संख्या खूप वाढवून प्रक्षोभक पद्धतीने समाजात सोशल मीडिया द्वारे पसरवली जाते. आणि त्यासाठी सरसकट एखाद्या जातीला, धर्माला वेठीस धरले जाते. प्रत्येक जातीधर्मात समाज कंटक असतातच. त्यात राजकारणी देखील आपली पोळी भाजून घेतात. आपली व्होटबँक सुरक्षित ठेवण्यासाठी समाजात दुफळी कशी तयार होईल या साठी राजकारणी वाटेल थराला जातात हे आपण पाहतोच. सध्या अनेक राजकीय पक्षांनी स्वतःची आय. टी. यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. अशा यंत्रणा मूळचे खरे व्हिडीओ काटछाट करून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. असे सामाजिक तेढ वाढवणारे व्हिडीओज आपणही कसलाही विचार न करता व्हायरल करत असतो. मग अफवांचा पेव फुटतं. हा अफवांचा भस्मासुर कधीतरी आपल्याच डोक्यावर हात ठेऊ शकतो हे आपल्या लक्षातच येत नाही. असो... आपण चित्रपटाकडे वळू.
नवाझुद्दीन सिद्दीकी - भूमी पेडणेकर
राजस्थानच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही कथा आहे. राजस्थानातील संबळपूर गावातल्या निवडणुकीत विक्की सिंग (सुमित व्यास) हा पुढारी उभा आहे. राजकीय लाभासाठी विक्की सिंग ने विरोधी पक्षनेत्यांच्या मुलीबरोबर म्हणजेच निवी बरोबर (भूमी पेडणेकर) लग्न करायचं ठरवलेलं असतं. दोन समाजात वितुष्ट आणणारं विक्कीचं राजकारण निवी ला आवडत नसतं. तिचं दुसऱ्याच एका तरुणावर प्रेम असतं. मग ती एके दिवशी घर सोडून पळून जाते. त्याच सुमारास अमेरिकेतली चांगली नोकरी सोडून मायदेशासाठी काहीतरी करावे अशा उद्देशाने रहाब अहमद (नवाझुद्दीन सिद्दीकी)हा भारतात परत आलेला असतो. एकदा पळून गेलेल्या निवी ला विक्की सिंग चे गुंड जबरदस्तीने पळवून नेताना राहब अहमदला दिसतात. स्वाभाविकपणे निवीला वाचवण्यासाठी रहाब पुढे येतो. तिथे थोडी झटपट होते.
नवाझुद्दीन सिद्दीकी - शारीब हाश्मी - भूमी पेडणेकर
गुंडांपासून बचाव करण्यासाठी निवी रहाब च्या गाडीतून पळून जाते. तिथे जमलेल्या गर्दीतील कुणीतरी ह्या घटनेचे व्हिडीओ चित्रण करतो. ह्या गोंधळाचा गैरफायदा घेऊन विक्की सिंग काही आय. टी. तज्ज्ञांना हाताशी धरून व्हिडीओ चित्रण बदलतो. हिंदू असलेली निवी आणि मुस्लिम असणारा रहाब एकत्रितपणे पळून जातानाच्या व्हिडिओला लव्ह जिहादचा रंग दिला जातो. या व्हिडिओची सत्यता न पडताळून फॉरवर्ड करणाऱ्या आपल्या निर्बुद्ध समाजाच्या हातात हा व्हिडीओ पडल्यावर दुसरे काय होणार? समाजात प्रक्षोभ उसळतो. त्यातच पुढे निवी आणि रहाब ज्या ट्रक मधून पळून जात असतात त्या ट्रक मधून गायीची वाहतूक होते आहे अशी अजून एक अफवा पसरते. निवी आणि राहाब च्या अडचणींमध्ये भर पडते. कथेत पुढे काय होतं ते महत्वाचं
नाही. ते चित्रपट पाहूनच अनुभवावं लागेल, पण या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक सुधीर मिश्रांचा संदेश आणि उद्देश खूप जास्त महत्वाचा आहे.
नवाझुद्दीन सिद्दीकी हा माझा खूप आवडता नट ! नेहेमीप्रमाणेच त्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे. निवीला मानवतेच्या साहजिक भावनेने वाचवणाऱ्या आणि त्यामुळे संकटात सापडलेल्या रहाब ची भूमिका त्याने जबरदस्तपणे साकारली आहे. 'दम लगाके हैशा!' या चित्रपटापासून माझ्या लक्षात राहिलेली भूमी पेडणेकर, राजकारणी नेत्याच्या नकारात्मक भूमिकेतील सुमित व्यास, शारीब हाश्मी वगैरे कलाकार अनुभवी आहेतच. ते त्यांचे चित्रपटातील योगदान १०० टक्के देतात. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील टी . जे. भानू
ही अभिनेत्री लक्षात राहते. तिच्या आईच्या सांगण्यावरून ती तिच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याबरोबर शय्या सोबत करते, हे मात्र पटण्यासारखे नाही. अर्थात अशा न पटण्यासारख्या काही घटना या कथेत आहेत.
निवी आणि रहाब ज्या ट्रक मधून पळू जात असतात त्या ट्रक मध्ये हत्या करण्यासाठी गायीची वहातुक होत आहे अशी देखील एक अफवा पसरवली जात असते. त्यामुळे तथाकथित धर्मरक्षक अजून चवताळलेले असतानाच हा ट्रक शेवटी जेंव्हा पोलीस पकडतात, तेंव्हा तपासणी दरम्यान त्यातून गायींऐवजी गाढवे बाहेर पडतात. म्हणजे त्या ट्रकमधून गाढवांची वाहतूक होत असते. दिग्दर्शक सुधीर मिश्रा प्रेक्षकांना थेट संदेश देतात... "डोळे झाकून सोशल मीडियाचा वापर करणारे गाढवांपेक्षा कमी नसतात"...
माझी खात्री आहे की हा चित्रपट पाहिल्यावर समाजातील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली काही मंडळी तरी आक्षेपार्ह, सामाजिक तेढ वाढवणारे मेसेजेस फॉरवर्ड करताना थबकतील...
राजीव जतकर.
१० जुलै २०२३.