Friday, 9 June 2023

सिर्फ 'मनोज वाजपेयी' काफी है!

सिर्फ 'मनोज वाजपेयी' काफी है!



गेल्या महिन्यात दोन चांगले चित्रपट माझ्या पाहण्यात आले. एक म्हणजे नेटफ्लिक्स वरचा 'कटहल' आणि दुसरा झी वरचा 'सिर्फ एक बंदा काफी है!'. पैकी नेटफ्लिक्स वरील 'कटहल' विनोदी ढंगाने जाणारा उपहासात्मक आणि करमणूक प्रधान चित्रपट आहे (त्यावर पुन्हा कधीतरी बोलू). पण निर्माते विनोद भानुशाली यांचा आणि दिग्दर्शक अपूर्वासिंग कार्की यांचा 'सिर्फ एक बंद काफी है!' हा नुकताच  झी वर प्रदर्शित झालेला चित्रपट पाहून मला अस्वस्थ व्हायला झाले. हा चित्रपट समाजातील अंधश्रद्धेसारख्या गंभीर विषयावर भाष्य करतो. मनोज वाजपेयी याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. काही वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणा प्रकरणी शिक्षा झालेल्या आणि सध्या जेल मध्ये असलेल्या आसाराम बापूच्या प्रकरणावर हा चित्रपट आधारित आहे. अर्थात आसाराम बापू सारख्या धार्मिक बाबा ची पार्श्वभूमी या चित्रपटाला असली तरी आसाराम बापूला तुरुंगात पाठवणाऱ्या पी.सी. सोळंकी नावाच्या लढवय्या वकिलाची खऱ्या अर्थाने ही गोष्ट आहे.

 

सध्या समाजात वाढलेल्या तीव्र स्वरूपाच्या धार्मिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट आपल्याला निश्चितच अस्वस्थ केल्याशिवाय राहात नाही. श्रद्धा ही मानवी जीवनामध्ये आवश्यक असणारी भावना आहे. आई, वडील, गुरुजन यांबद्दल असणारी श्रद्धा निश्चितच महत्वाची असते. पण श्रद्धेचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत रूपांतरित होऊन समाजाला हानिकारक ठरतो. बुवा, साधू, महंत, मुल्ला-मौलवी यांच्याकडून फसवल्या गेलेल्या लोकांच्या बातम्या आपल्याला नेहेमी ऐकायला मिळतात, तेंव्हा जाणवते की अजूनही आपला तथाकथित प्रगत समाज अंधश्रद्धेच्या अंधारातच चाचपडतो आहे. या विज्ञानयुगातही अंधश्रद्धाळू मंडळी या अश्या बुवाबाजी मध्ये कसे अडकतात ते कळतच नाही. आजही अशी बाबा मंडळी कार्यरत आहेतच आणि लाखो अंधश्रद्धाळू विचारशक्ती गमावून बसलेली माणसे त्यांच्या सभा-किर्तनांना तोबा गर्दी करतातच...

 

या चित्रपटाची कथा तशी आपल्याला माहिती आहेच, कारण या चित्रपटातील सर्व घटना पूर्वी प्रत्यक्ष घडलेल्या आहेत. लाखोंच्या संख्येने अंधभक्त अनुयायी असलेला एक बाबा एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करतो. या मुलीचे आईवडील बाबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. पोलीस बाबाला अटकही करतात. मग अंध भक्त संतापतात. बाबांना सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतात. महत्वाच्या साक्षीदारांचे खून होतात. पीडित अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या आईवडिलांवर मानसिक दबाव टाकला जातो. पीडित मुलीच्या बाजूने लढणाऱ्या वकिलावर म्हणजे पी.सी. सोळंकी वर जीवघेणे हल्ले देखील होतात. या सोळंकीला कोट्यवधी रुपयांचे आमिष देखील दाखवले जाते. पण हा कणखर वकील आपल्या ध्येयापासून विचलित होता ही केस लढतो आणि जिंकतो देखील...  या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पी. सी. सोळंकी ची भूमिका 'मनोज वाजपेयी या गुणी अभिनेत्याने जबरदस्त पद्धतीने सादर केली आहे. पी.सी. सोळंकींची भूमिका मनोजने अक्षरशः जिवंत उभी केली आहे. जोधपूरच्या वकिलाची भाषा, देहबोली हे मनोज ने कमालीच्या ताकदीने निभावली आहे. या कथानकाला ज्या प्रकारचा संयत अभिनय अपेक्षित असतो, तोच मनोज ने त्याच्या बहारदार अदाकारीतून साकार केलाय.

 


मनोज वाजपेयी याच्या अभिनयाबद्दल काय आणि किती बोलावे? हा गुणी अभिनेता म्हणजे केवळ अभिनेताच आहे असं नव्हे, तर तो एक स्वतः मध्ये अभिनयाची   संस्थाच आहे. आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याने तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्म फेअर पुरस्कार मिळवले आहेत. मनोज ला सर्वोत्कृष्ठ अभिनयासाठी ६७ व्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. १९९७ मध्ये आलेल्या 'सत्या' या चित्रपटामुळे मी मनोजच्या प्रेमातच पडलो. 'द्रोहकाल', 'बँडिट क्वीन', 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'फीजा', 'शूल', 'वीर-झारा' अशा अनेक चित्रपटातील त्याच्या अभिनयातल्या वेगळेपणामुळे तो माझ्या लक्षात राहिला. मग मी त्याच्या चित्रपटांची वाट पाहू लागलो...

 

मनोज वाजपेयी याने हा चित्रपट एकट्या स्वतःच्या खांद्यावर पेलला आहे हे खरेच! पण हा चित्रपट प्रभावी ठरण्याची इतरही कारणे आहेत. या चित्रपटाची महत्वाची जमेची बाजू म्हणजे कथा लेखक 'दीपक किंगरानी' यांचे प्रभावी कथालेखन आणि उत्कंठावर्धक संवाद! कोर्टामध्ये दोन्हीही बाजूच्या वकिलांचे संवाद आपल्याला खिळवून ठेवतात. हा चित्रपट म्हणजे एक जबरदस्त कोर्टड्रामा आहे. पार्श्वसंगीत प्रभावी आहेच, त्यामुळे घटनेतील नाट्य अधिक दमदार होतं. या चित्रपटातील काही घटना पी. सी. सोळंकींच्या संवेदनशील मनाचं दर्शन घडवतात. पीडित मुलीचे आईवडील 'तुमची वकील फी किती आहे'? असा प्रश्न सोळंकी वकिलाला विचारतात तेंव्हा सोळंकी 'तुमच्या मुलीच्या चेहेऱ्यावरचं हसू हीच माझी फी असेल' असं सांगून आपल्या संवेदनशील मनाचं दर्शन घडवतो. सोळंकी वकील चित्रपटात धर्माच्या तथाकथित ठेकेदारांविरोधात कोर्टात आक्रमकपणे युक्तिवाद करताना जरी दिसत असला, तरी एक बाप म्हणून तो स्वतःच्या मुलावर योग्य संस्कार करताना देखील दिसतो. हा चित्रपट कधीही कंटाळवाणा होत नाही. खरं तर आधीच घडलेल्या घटनेच्या कथेवर प्रभावी चित्रपट करणं हे खूप कठीण असतं. पण दिग्दर्शकाची चित्रपटाची मांडणी आणि सादरीकरणामुळे चित्रपट भन्नाट झालाय.

 

कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह असं काहीही सांगता हा चित्रपट न्यायव्यवस्था, समाजाची मानसिकता, पोलीस यंत्रणा यावर आपल्याला विचार करायला लावतो, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अंध भक्तांवर चांगलेच ताशेरे ओढतो. मनोज वाजपेयी साठी हा चित्रपट नक्की बघायलाच हवा. विशेषतः कोर्टात आपली बाजू मांडताना मनोज च्या शेवटच्या भाषणामुळे आपण सुन्न होतो. हा सुन्नपणा अनुभवण्यासाठी चित्रपट आवश्य बघा. झी या ओटीटी प्लँटफॉर्मवर हा चित्रपट पाहून झाल्यावर माझ्या तोंडून उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर पडले... 'सिर्फ एक मनोज वाजपेयी काफी है!'

 

राजीव जतकर.

०९ जून २०२३.