'ट्रायल बाय फायर'
अर्थात उपहार मधील अग्नितांडव.
(एक अस्वस्थ करणारं पुस्तक आणि वेब सिरीज)

१३ जानेवारी २०२३ ला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणारी 'ट्रायल बाय फायर' ही वेबसिरीज, याच महिनात माझ्या वाचनात आलेलं 'ट्रायल बाय फायर' हे सुन्न करणारं पुस्तक आणि याच महिन्यात म्हणजे ११ ते १७ जानेवारी ला महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग तर्फे साजरा होणारा विद्युत सुरक्षा सप्ताह हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. १३ जून १९९७ मध्ये म्हणजे २६ वर्षांपूर्वी दक्षिण दिल्ली मधील उपहार नावाच्या सिनेमागृहाच्या तळघरात असलेल्या दिल्ली विद्युत बोर्डाच्या (DVB)
ट्रान्सफॉर्मर ने अचानक पेट घेतला आणि भीषण अग्नी तांडव झालं अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि शेकडो जखमी झाले. भारतातल्या सर्वात भीषण अग्निकांडापैकी ही एक घटना मानली जाते. या घटनेची दाहकता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी म्हणून 'ट्रायल बाय फायर' हे नीलिमा आणि शेखर कृष्णमुर्ती लिखित इंग्रजी भाषेतील पुस्तक 'पेंग्विन बुक्स इंडिया प्रा. लि.' या प्रकाशन संस्थेनं २०१६ मध्ये प्रसिद्ध केलं. २०१९ मध्ये ह्या पुस्तकाची हिंदी आवृत्ती देखील प्रकाशित झाली. बांधकाम आणि विद्युत क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना ह्या दुर्दैवी घटनेची थोडीफार माहिती असतेच. तथापि ह्या भीषण घटनेची तपशीवर माहिती नसण्याची दाट शक्यता आहे. ह्या दुर्दैवी घटनेदरम्यान नेमकं काय घडलं? हे सर्वसामान्यांना माहिती व्हावं या साठी हे पुस्तक आणि नेटफ्लिक्स वरील वेब सिरीज अतिशय महत्वाची ठरते.
१३ जून १९९७ हा दिल्ली शहरातील एक सर्वसामान्य दिवस ! नेहेमीप्रमाणेच धुक्याची जाड चादर हळू हळू बाजूला सारत दिल्ली जागी होत होती. सर्वसामान्य लोकांप्रमाणे नीलिमा आणि शेखर कृष्णमूर्ती या सुखी कुटुंबाचा दिवस देखील सुरु झाला. कृष्णमूर्ती दाम्पत्याची १७ वर्षाची मोठी मुलगी 'उन्नति' कॉम्पुटर वर काहीतरी करत बसलेली आणि १३ वर्षांचा धाकटा मुलगा 'उज्वल' वडिलांबरोबर टीव्ही गेम्स खेळात बसला होता. नीलिमा नेहेमीप्रमाणेच स्वैपाकघरात व्यस्त ! अचानक निलीमाला आठवण झाली की आज आपण मुलांना सिनेमा दाखवायचं कबूल केलंय. उन्नती ला सिनेमा बघायची अतिशय आवड होती. मग नीलम ने सकाळच्या गडबडीतच दक्षिण दिल्लीतील उपहार चित्रपटगृहामध्ये
फोन करून आजच सुरु झालेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाची दोन तिकिटे काढली. दुपारचा ३ ते ६ चा फर्स्ट डे-फर्स्ट शो पाहण्याची मजा काही औरच असते ना? उज्वल आणि उन्नती जाम खुश होते. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरील आणि सनी देओल आणि इतरही अनेक प्रतिथयश अभिनेत्यांचा 'बॉर्डर' हा सिनेमा बघायची दोन्ही मुलांना कमालीची उत्सुकता होती.
 |
शेखर आणि नीलम कृष्णमूर्ती |
त्या दिवशी नीलम यांच्या पतीने म्हणजे शेखरने जेवणासाठी चिकन करी बनवलेली होती. सर्व कुटुंबाने एकत्रपणे खेळीमिळीत दुपारचे जेवण घेतलं. मुले एकमेकांच्या खोड्या काढत जेवत होती. जेवणानंतर सिनेमाला घरातून बाहेर पडताना उन्नतीने उज्वलला त्याचा अस्थम्याचा इन्हेलर बरोबर घेण्याची आठवण केली. मुलं घराबाहेर पडली. नीलिमा सांगतात ' मुलांना मी त्यावेळी शेवटचं पाहिलं...
अग्नितांडव

दुपारी तीन वाजता बॉर्डर सिनेमाचा पहिला शो सुरु झाला. उज्वल आणि उन्नती यांची तिकिटे वरच्या मजल्यावरील बाल्कनी मधे होती.
सर्वजण चित्रपटात रंगून गेले. सुमारे ५ वाजता मध्यंतरानंतर सिनेमा हॉल मध्ये धूर येऊ लागला. प्रेक्षक अस्वस्थ होऊ लागले. त्यांचा श्वास घुसमटू लागला. मुख्य हॉल मध्ये आग पोहोचली मग एकीकडे आगीचे चटके, ज्वाळा आणि दुसरीकडे वाढत जाणारा धूर यामुळे मात्र लोकांचा धीर सुटला. त्यातच हॉल मधली वीज गेली. कुणालाच काय होतंय ते कळेना. पॅनिक होऊन लोक सैरावैरा पळू लागले. चेंगराचेंगरी झाली. लोक खिडक्यांची तावदाने फोडून खाली उड्या मारू लागले. बऱ्याच वेळाने अग्निशामक दलाला कुणीतरी फोन केला, पण त्यावेळी दिल्लीच्या ग्रीनपार्क भागात ट्राफिक जाम होता. त्यामुळे मदत पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे मृतांची आणि जखमींची संख्या वाढली. या दुर्घटनेत तब्बल ५९ लोकांचा मृत्यू झाला, त्यात २३ लहान मुले होती. त्यात एक महिन्याचं एक बाळ देखील होतं. शेकडो लोक जखमी झाले. या अग्नितांडवात उन्नती आणि उज्वल यांचा देखील धुरात गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. उज्वल ला त्याच्या जवळ असलेल्या इन्हेलरचा काहीही उपयोग झाला नाही...
 |
उन्नती |
 |
उज्वल |
का आणि कशी घडली ही घटना?
 |
तळघरातील ट्रान्सफॉर्मर |
त्या दिवशी सकाळी सहा वाजता या इमारतीच्या तळघरात असलेल्या दिल्ली विद्युत बोर्डाच्या (DVB)
ट्रान्सफॉर्मर मध्ये काहीतरी बिघाडामुळे ठिणग्या उडून छोटीशी आग लागली होती. देखरेख करणाऱ्या वायरमन, फोरमन मंडळींनी सदर आग तात्पुरती डागडुजी, दुरुस्ती करून आग विझवली होती अशी देखील माहिती नंतरच्या तपासात पुढे आली आहे. त्या दिवशी ३ वाजून ५५ मिनिटांपासून ५ वाजेपर्यंत दिल्ली विद्युत बोर्डाने लोड शेडींग जाहीर केले होते. त्यानुसार ते सुरु झाले. चित्रपटाच्या मध्यंतर नंतर म्हणजे ४ वाजून ५५ मिनिटांनी वीज पुन्हा सुरु झाली आणि नेमके त्याच वेळी या तळघरातील ट्रान्सफॉर्मर मध्ये स्पार्किंग सुरु झाले. असे स्पार्किंग केबलच्या कंडक्टर मधील लूज कनेक्शन मुळे झालेले असण्याची खूप दाट शक्यता असते. हा लूज असलेला कंडक्टर ट्रान्सफॉर्मर मधून बाहेर निघून आला आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या ठिणग्यांमुळे ट्रान्सफॉर्मर मध्ये स्फोट झाला. ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल तळघरात आजूबाजूला उडाले आणि तळघरात चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने उभ्या केलेल्या गाड्यांनी पेट घेतला. तळघरात अग्नितांडव सुरु झाले. या आगीतून प्रचंड धुराचे आणि आगीचे लोळ जिन्या वाटे, एअर कंडिशनर च्या डक्ट मधून वरच असलेल्या सिनेमा हॉल मध्ये शिरू लागले.

सिनेमा हॉल मधील बाल्कनी च्या खालच्या भागातले प्रेक्षक सुदैवाने दरवाजे उघडून कसेबसे बाहेर पडू शकले, पण बाल्कनी मधील प्रेक्षक दुर्दैवी ठरले, कारण बाहेर पाडण्यासाठी असणारे सर्व दरवाजे बाहेरून बंद (लॉक) करण्यात आले होते. त्यामुळे बाल्कनी मधील प्रेक्षक बाहेर पडू शकले नाहीत. धुराने श्वास गुदमरून अनेक मृत्यू झाले. चेंगराचेंगरी झाली. बाल्कनी मधील दरवाज्याजवळ नियमबाह्य पद्धतीने सुमारे ५२ अतिरिक्त खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. व्ही.आय.पी. प्रेक्षकांसाठी स्वतंत्र प्रायव्हेट बॉक्स बसवण्यात आलेले होते. त्यामुळे एग्झिट दरवाजांचे मार्ग निमुळते झाले होते. त्यामुळे गोंधळात भर पडली. बाल्कनीत प्रेक्षक पूर्णपणे अडकले होते. एकच गोंधळ उडाला.
निष्काळजीपणाचे परिणाम
ह्या उपहार चित्रपटगृहाच्या मॅनेजरला ह्या आगीची माहिती समजली तेंव्हा आग आटोक्यात आणण्याऐवजी तो ह्या सिनेमाचा जमा झालेला गल्ला घेऊन कुठेतरी निघून गेला. त्याने आगीची माहिती अग्निशमन दलाला कळवलीच नाही. त्यामुळे सुमारे ५ वाजता लागलेल्या आगीची माहिती अग्निशमनदलाला जवळजवळ ५ वाजून २५ मिनिटांनी उशिरा म्हणजे २५ मिनिटे उशिरा मिळाली. त्यातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचताना त्यांना ट्राफिक जाम चा सामना करावा लागला. त्यामुळे देखील मृतांची आणि जखमींची संख्या वाढली. सुरक्षेच्या नियमानुसार या चित्रपगृहाच्या इमारतीमधील बसवण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा देखभाली अभावी पूर्णपणे निकामी झालेली होती. फायर एस्टिंग्विशर्स अस्तित्वातच नव्हते. या संपूर्ण इमारतीत मध्ये कुठल्याही प्रकारचे आपत्कालीन दिवे लावलेले नव्हते. त्यामुळे अंधारातून मार्ग काढताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
 |
तळघरातील जळालेल्या गाड्या |
ह्या भयंकर अग्नितांडवाची माहिती नीलम आणि शेखर यांना त्यांच्या मुलीच्या मित्राने विशाल ने दिली. नीलम आणि शेखर घटनास्थळी अक्षरशः धावले. तिथल्या गर्दीत ते मुलांना शोधत राहिले. बऱ्याच वेळाने जखमींना हलवण्यात आलेल्या एम्स रुग्णालयात त्यानी धाव घेतली. तिथे मृतांच्या गर्दीत स्ट्रेचरवर उन्नतीचे आणि उज्वलचे कलेवर त्यांना दिसले आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच पसरला. आईवडिलांना आपल्या मुलांचा मृत्यू पाहण्यासारखं मोठं दुःख ते काय असू शकतं ? आता मुले या जगात नाहीत, आता जगायचं तरी कशाला? आता कुणासाठी जगायचं? नीलम आणि शेखरच्या दुःखाला पारावार उरला नाही. त्याही परिस्थितीत उन्नतीच्या मृत शरीरावरुन हात फिरवताना दुःखावेगाने रडणाऱ्या नीलम च्या लक्षातआले की उन्नतीच्या गळ्यातले नेकलेस आणि कानातले कुणीतरी ओरबाडून नेले होते. विकृत मनुष्यस्वभावाची नीलम यांना किळस आली. नीलमच्या मनातील दुःखाची जागा क्रोधात रूपांतरित होत होती.
 |
मृत आणि जखमींना हॉस्पिटल मध्ये नेताना |
दीर्घ
कायदेशीर लढाई
मुलांच्या अशा भयंकर मृत्यूनंतर नीलम आणि शेखर हे दांपत्य दुःखाने पार कोलमडून गेले. मात्र थोडे सावरल्यावर नीलम कृष्णमूर्ती यांच्या मनात अनेक शंका फेर धरून नाचू लागल्या. या आगीची जास्त झळ फक्त बाल्कनीतील प्रेक्षकांनाच जास्त का बसली? दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या ट्रान्सफॉर्मरची देखभाल का झाली नव्हती? देखभालीची जबाबदारी कोणाची? इमारतीतील सर्व सुरक्षा साधने जागेवर का नव्हती? याला जबाबदार कोण? अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा का आले? अशा एक ना अनेक शंका नीलम यांना सतावू लागल्या. त्यांची खात्री पटली की ही घटना म्हणजे एक मानवनिर्मित घटना आहे. मोडलेले नियम आणि प्रशासनाचा गलथान कारभाराचा हा परिपाक आहे. जशी जशी जास्त माहिती मिळू लागली तस तसे नीलम यांना उपहार इमारतीच्या मालकांचा राग येऊ लागला. 'आपल्या मुलांसाठी आपण कायदेशीर लढा द्यायलाच हवा' असा निश्चय या धाडसी दाम्पत्याने केला.
उपहार अग्नितांडवाची चौकशी सुरु झाली. २२ जुलै १९९७ रोजी पोलिसांनी उपहार चा मालक सुशील आणि गोपळ अंसल यांना मुंबईतून अटक केली. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २४ जुलैला दिल्ली पोलिसांनी हे गंभीर प्रकरण सी.बी.आय. कडे सुपूर्त केलं. इकडे दोषींना जास्तीजास्त शिक्षा व्हावी म्हणून नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांनी पुढाकार घेऊन A.V.U.T. म्हणजेच
'असोसिएशन ऑफ व्हिक्टिम्स ऑफ उपहार ट्रॅजिडी' नावाची संस्था काढली. या आगीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक
या संस्थेचे सदस्य झाले. सगळे शोकाकुल नातेवाईक आता एकत्रितपणे न्यायालयीन लढा देऊ लागले. या लढ्यात नीलम कृष्णमूर्ती यांचा महत्वाचा भाग होता. नीलम यांनी लढा सुरु झाल्यावर आता गुन्हेगारी कायदा, सुरक्षा यंत्रणांचे नियम, कोर्टाच्या कामांच्या पद्धती आणि त्यातील कामांचे बारकावे वगैरे गोष्टींचा अभ्यास सुरु केला. सी.बी.आय. नं सुशील आणि गोपाळ अंसल या भावांसमवेत १६ जणांवर (यात चित्रपटगृहाच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणारे कर्मचारी, अश्या असुरक्षित इमारतीला परवानग्या देणारे भ्रष्टाचारी सुरक्षा निरीक्षक, दिल्ली विद्युत बोर्डाचे (DVB) चे अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता.) आरोपपत्र दाखल केलं. २० नोव्हेंबर २००७ मध्ये कोर्टाने अंसल बंधूंसह १२ आरोपींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
 |
गोपाळ आणि सुशील अंसल |
पण इमारतीचे मालक सुशील आणि गोपाळ अंसल ही राजकीय वर्तुळात उठबस असलेली मोठी मात्तब्बर मंडळी. दिल्ली विद्युत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देखील ‘ट्रान्सफॉर्मर च्या देखरेखीत निष्काळजीपणा’ दाखावल्याबद्दल आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. पण ही मंडळी छोट्या छोट्या शिक्षा भोगून बाहेर आली. AVUT संस्थेनं म्हणजेच पीडितांच्या संघटनेनं हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. या आव्हानानंतर २०१५ मध्ये अंसल बंधूंना प्रत्येकी ३० कोटींचा दंड ठोकून सोडून दिलं. यावर सीबीआय ने केलेल्या पुनर्विचार याचिकेवर अंसल बंधूंना पुन्हा १ वर्षाची शिक्षा झाली. ७५ वर्षांच्या सुशील अंसल त्यांच्या जास्त वयामुळे सोडून देण्यात आलं. या कोर्टाच्या निर्णयावर नीलिमा कृष्णमूर्ती यांनी निराशा व्यक्त केली. निकाल ऐकल्यावर त्या म्हणाल्या 'कोर्टाच्या या निकालानंतर मी माझ्या हातातली कागदपत्रे फेकली आणि कोर्टाच्या बाहेर येऊन पहिल्यांदाच खूप रडले'. त्या दिवसाची आठवण सांगताना त्या खूप भावुक झाल्या होत्या. कृष्णमूर्ती दांपत्याचा हा न्यायालयीन लढा तब्बल २१ वर्षे चालला.
अर्थात निराश न होता त्यांनी 'सुशील अंसल यांनी किमान त्यांना सुनावलेली शिक्षा भोगून पूर्ण करावी' याकरिता सुप्रीम कोर्टात अजून एक अपील केलं आहे. कोर्ट त्यांच्या या अपिलावर कधी सुनावणी घेईल याची त्यांना कल्पना नाही....
वेब सिरीज : भयानक अनुभव.
आत्ता नुकतीच म्हणजे १३ जानेवारी २०२३ रोजी 'ट्रायल बाय फायर' या नीलिमा आणि शेखर कृष्णमूर्ती लिखित पुस्तकावर आधारित वेब सिरीज नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाली आहे. दिग्दर्शक प्रशांत नायर, रणजित झा आणि अवनी देशपांडे यांनी अतिशय प्रभावीपणे या वेब सिरींजची मांडणी केली आहे. 'राजश्री देशपांडे' यांनी नीलिमा कृष्णमूर्ती यांची भूमिका कमालीची सुंदर वठवली आहे. शेखर कृष्णमूर्ती यांच्या भूमिकेत 'अभय देओल' प्रभावी कामगिरी करतो. काहीसा मागे पडलेला असा हा उत्तम अभिनेता आहे. 'आशिष विद्यार्थी', 'रत्ना पाठक', 'अनुपम खेर', 'शिल्पा शुक्ल', 'राजेश तेलंग', 'सिद्धार्थ भारद्वाज' अश्या मान्यवर, प्रतिथयश, अनुभवी अभिनेत्यांमुळे ही वेब सिरीज एका वेगळ्याच उंचीवर जाते.
 |
अभय देओल आणि राजश्री देशपांडे |
वेब सिरीज बघताना हे उपहार अग्निकांड कसे चित्रित केले असेल याची मला उत्सुकता होती. ती अंगाचा थरकाप उडवणारी आगीची घटना वेब सिरीज च्या शेवटच्या ७ व्या भागात येते. त्यानंतर सिरीज संपून घटनेचा इम्पॅक्ट आपल्या मनाचा ताबा घेतो आणि तो बरेच दिवस राहतो. मन सुन्न होते. कृष्णमूर्ती दांपत्यांचं पुस्तक या दुर्दैवी घटनांच्या बारीक बारीक तपशिलांनी भरलेलं आहे. मात्र वेब सिरीज ला वेळेचं बंधन असल्याने वेब सिरीज मध्ये घटनेतील बारकावे नाहीत, मात्र आवश्यक ती नाट्यमयता जरूर आहे. ही नाट्यमयता या माध्यमाची गरज असते, त्यामुळे या घटनेला समांतर घडणाऱ्या, पण काही प्रत्यक्षात न घडलेल्या अशा छोट्या छोट्या घटना, घडामोडी घडतात. पण त्यामुळे या वेब सिरीजचं महत्व कमी होत नाही. थोडक्यात दोन्हीही माध्यमातून समोर आलेली ही दुर्दैवी घटना (पुस्तक आणि वेब सिरीज) पाहून प्रेक्षक आणि वाचक अंतर्मुख होतो. प्रत्येकाने ट्रायल बाय फायर हे पुस्तक आणि वेब सिरीज या दोन्ही माध्यमातून ही अग्नितांडवाची घटना समजावून घेतली पाहिजे, अनुभवली पाहिजे.

-दिल्लीतलं उपहार सिनेमागृह अजूनही मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभं आहे. २६ वर्षांपूर्वी झालेल्या अग्नितांडवाच्या खुणा आजही ह्या वास्तूवर दिसतात. नीलिमा यांच्या शेवटच्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय लागल्याशिवाय ते पाडताही येत नाही.
-सुरक्षेच्या नियमांप्रती शासकीय यंत्रणा आणि नागरिकांमध्ये असलेली प्रचंड उदासीनता, समाजात खोलवर झिरपलेली भ्रष्टाचाराची कीड, माणसांमध्ये पैसे मिळवण्याचा वाढलेला हावरटपणा, कासवाच्या गतीनं काम करणारी न्यायव्यवस्था अशा गोष्टींची भेदक जाणीव वाचकांना आणि प्रेक्षकांना या निमित्ताने होत राहते.
-अजून एक महत्वाचे... या उपहार अग्निकांडानंतर ३ वर्षानंतर २००० साली ‘कोणत्याही इमारतीमध्ये ऑइल फिल्ल्ड ट्रान्सफॉर्मर्स’ बसवण्यास बंदी करण्यात आली. या बंदीनंतर २२ वर्षांनंतरही भारतातल्या अनेक मोठ्या शहरातील इमारतीच्या तळघरातील ट्रान्सफॉर्मर्स देखरेखीविना अजूनही चालू आहेत. स्वतःचा स्फोट होण्याची ते वाट पाहत आहेत...
राजीव जतकर.
२७ जानेवारी २०२३.