Wednesday, 17 March 2021

न संपणारी अथांग भरकट... ' ऍड्रिफ्ट '.

 

संपणारी अथांग भरकट...  ' ऍड्रिफ्ट '.


टॅमी ओल्डहॅम 

समुद्र आणि समुद्र किनारे म्हणलं की माझं भानच हरपतं. समुद्रावारे छातीत खोलवर भरून घेणे हा माझा आवडता छंद आहे. अथांग निळा समुद्र, त्याच्या उसळणाऱ्या लाटा, लाटेबरोबर येणारा पांढरा फेस, लांबवर डोलणाऱ्या शिडाच्या नावा, अशा दृषयांचे मला विलक्षण आकर्षण आहे. प्रत्येकालाच ते असते. जेंव्हा त्या फेसाळत येणाऱ्या लाटा किनाऱ्याला शिवून मागे फिरतात, तेंव्हा लाट केंव्हा येते, संपते आणि दुसरी पुन्हा केंव्हा येते ते काही उमगत नाही. लाटांचा हा पाठशिवणीचा खेळ मनसोक्तपणे बघताना अक्षरशः भान रहात  नाही. अथांग सागराची भव्यता माझ्या नजरेत मावत नाही. सागराची उदात्तता मनाला व्यापून टाकते. मग मनातील अहंकाराचे साखळदंड तुटून पडतात. मन निर्मळ होते. अथांग पाण्याकडे बघताना स्वतःच्या क्षुद्र अस्तित्वाची जाणीव होते. स्वतःच्या क्षुल्लक दुःखांचा विसर पडतो. पाय कळत किनाऱ्यावरच्या मऊशार वाळूशी खेळू लागतात. मुठीत धरलेली भुरभुरीत वाळू पाहता पाहता गळून पडते. विधात्याच्या या विलक्षण निर्मितीने मन वेडावून जाते.

 


मात्र गेल्या काही दिवसात ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहिलेल्या दोन चित्रपटांनी माझ्या मनातील समुद्राचे हे सुखद चित्र पार बदलून टाकले. 'ऍड्रिफ्ट' आणि 'ऑल इज लॉस्ट' हे ते दोन चित्रपट ! हे चित्रपट पाहिल्यावर समुद्राच्या भयावह, आक्राळविक्राळ बाजूची जाणीव होते. किनाऱ्यावरून रम्य सुखद वाटणारा हा समुद्र प्रत्यक्षात किती भयानक, किती जीवघेणा असू शकतो याची जाणीव होते. या दोन्हीही चित्रपटात बरेचसे साम्य असले तरी या चित्रपटांची जातकुळी बरीचशी वेगळी आहे. 'ऍड्रिफ्ट' या चित्रपटात संपणाऱ्या एका भरकटी बरोबरच एक तरल, हळवी प्रेमकथा देखील आहे. वर्तमानाच्या जीवघेण्या प्रवासाबरोबरच भूतकाळातील हळुवार प्रेमाचा प्रवास फ्लॅशबॅक पद्धीतीने चित्रित करण्यात आला आहे. 'बाल्तासार कोर्माकूर' (Baltasar Kormakur या नावाचा उच्चार मी माझ्या पद्धतीने केला आहे. चुकिचा असण्याची शक्यता आहे) याने दिग्दर्शित केलेला 'ऍड्रिफ्ट' गहिऱ्या सागराची खोली दाखवतो, सागराची निळाई दाखवतो, निसर्गापुढे माणसाची होणारी अगतिकता दाखवतो, समुद्री लाटांचा आक्राळविक्राळपणा दाखवतो, माणसाच्या जगण्याची जिद्द दाखवतो, माणसाच्या मनातील आशा निराशेचा अनोखा खेळ दाखवतो.

रिचर्ड आणि टॅमी 

'ऍड्रिफ्ट' म्हणजे भरकट किंवा भरकटणे. सप्टेंबर १९८३ साली प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगावर किंवा सत्य घटनांवर आधारलेला हा चित्रपट आहे. रिचर्ड शार्प (Sam Claflin) आणि टॅमी ओल्डहॅम (Shailene Woodley) या तरुण सुंदर जोडीची ओळख तशी नुकतीच झालेली असते. टॅमी एक स्वच्छंदपणे जगणारी बिनधास्त अमेरिकन तरुणी असते. तिला पॅसिफिक महासागराच्या दक्षिणेला असणाऱ्या 'ताहिती' बेटावर रिचर्ड भेटतो. रिचर्ड ला देखील समुद्र सफरी करायची मनस्वी आवड असते. ओळखीचे प्रेमात रूपांतर होते. प्रेमाच्या लाटेवर हिंदोळे घेणाऱ्या या जोडीच्या लग्नाच्या आणाभाका देखील होतात. एकदा अचानक रिचर्ड ला त्याचे मित्र पीटर आणि क्रिस्तीन गाठ पडतात. पीटर ची 'हजाना' नावाची एक छोटी बोट कॅलिफोर्नियातील सॅन डियागो येथे पोहोचवण्याची गळ पीटर रिचर्डला घालतो. त्या बदल्यात पीटरला दहा हजार डॉलर्स चा मेहेनताना देण्याचे देखील तो कबुल करतो. भटकायची आवड असणाऱ्या पीटर आणि टॅमी ला ही पर्वणीच वाटते. पॅसिफिक समुद्रातून मनसोक्त स्वच्छंद भटकणे आणि वर दहा हजार डॉलर्सची भरभक्कम कमाई. अजून काय पाहिजे? रिचर्ड आणि टॅमी हे काम आनंदाने स्वीकारतात. 

 

हरिकेन रेमंड वादळ 

'ताहिती' बेट ते 'सॅन डियागो' हे अंतर मात्र तब्बल ४००० सागरी मैलांचे असते. सर्व सुखसोईंनी युक्त अश्या 'हजाना' बोटीतून नुकतंच प्रेमात पडलेलं हे युगुल प्रणयाराधनात मश्गुल होत प्रवासाला सुरुवात करतं. पण दुर्दैवानं काही दिवसातच रिचर्ड, टॅमी आणि त्यांची बोट 'हरिकेन रेमंड्स' ह्या चक्रीवादळात सापडते, आणि अगदी होत्याचं नव्हतं होतं. बोट उध्वस्त होते. सुदैवाने टॅमी वाचते. टॅमीचं पुढं काय होतं? रिचर्ड वाचतो का? बोट किनाऱ्याला लागते का? हे प्रत्यक्ष सिनेमा पाहूनच अनुभवायला हवं. सर्वच फार थरारक आहे.

एकाकी 'टॅमी' 

वादळानंतर तब्बल ४१ दिवस जखमी अवस्थेत टॅमी छोट्या बोटीबरोबर पॅसिफिक महासागरात भरकटत असते. दूरवर क्षितिजापर्यंत फक्त अथांग पाणीच पाणी. ते देखील खारं पाणी. वादळामुळे उध्वस्त झालेल्या बोटीवरील अन्न पाणी कधीच संपलेलं. पूर्णपणे शाकाहारी असलेली टॅमी नाईलाजानेच समुद्रातील मासे पकडायला आणि कच्चेच खायला शिकते. अन्न पाण्याविना टॅमी क्षीण होऊ लागते, तिच्या अंगातील शक्ती नष्ट होऊ लागते, ग्लानी येऊन बोटीवरच्या डेक वर ती निराश होऊन तासंतास पडून राहू लागते. हळू हळू तिच्या जगण्याच्या साऱ्या आशा नष्ट होतात... 

टॅमी आणि जखमी रिचर्ड 

     'आपल्यावर अशी वेळ आली तर आपण नेमके काय करू?' असा प्रश्न चित्रपट पाहणाऱ्याला प्रेक्षकांना हमखास पडेल. श्वास रोखून धरायला लागेल असे अनेक उत्कंठावर्धक प्रसंग या चित्रपटात आहेत. हरिकेन रेमंड वादळाचे चित्रीकरण म्हणजे चित्रपटाचा परमोच्च बिंदू. टॅमीने जगण्यासाठी केलेली धडपड बघताना आपण अस्वस्थ होतो. सुन्न होऊन जातो. हा चित्रपट बघितल्यावर बराच वेळ मला कोणाशीही बोलावेसे वाटत नव्हते. चित्रपटाचा प्रभाव बराच काळ आपल्या अंतर्मनावर राज्य करतो...

प्रत्यक्षातली उध्वस्त 'हजाना' बोट 

हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर उपलब्ध आहे. नक्की बघावा असा चित्रपट!

 

अशाच प्रकारच्या रॉबर्ट रेडफोर्ट याचा 'ऑल इज लॉस्ट' ह्या अप्रतिम चित्रपटाबद्दल पुन्हा कधीतरी...

 

राजीव जतकर.