Monday, 21 September 2020

मैं जैसा हूं... वैसा हूं.

 

मैं जैसा हूं... वैसा हूं.

 

मागच्याच आठवड्यात वर्तमानपत्रातील एका लेखाने माझे लक्ष वेधले. 'ग्रे हेअर्स किंवा पांढऱ्या केसांचे चाहते' या विषयावर लेख होता. त्यात अलीकडील केलेल्या सर्वेक्षणात 'सुमारे ७२ टक्के महिलांना वयाने मोठे आणि करड्या पांढऱ्या केसांचे पुरुष आवडतात' असा दावा केलेला होता. अलीकडच्या काळातील मध्यमवयीन मिलिंद सोमण, जॉर्ज क्लुनी, ब्रॅड पिट यासारखे अभिनेते, मॉडेल्स, पांढरे केस ठेवणारे काही खेळाडू स्त्रियांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. म्हणजे वयाने फार म्हातारे नसतानाही आपले पांढरे केस लपवता फॅशन म्हणून किंवा एक हटके स्टाईल म्हणून ही मंडळी डोक्यावर पांढरे केस कौतुकाने मिरवू लागली आहेत. केसांवर अशाप्रकारचा मोठा लेख होऊ शकतो याची मला खूप गंमत वाटली.

 

कळत माझं मन भूतकाळात गेलं. कॉलेजात असतानाच माझ्या डोक्यावर पांढऱ्या केसांनी आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली होती. हळूहळू (खरं तर वेगात) डोक्यावर पुढच्या बाजूला एक मोठासा पांढऱ्या केसांचा झुपका दिसू लागला. आमच्या घरातील मी सोडून सगळ्यांना माझ्या पांढऱ्या केसांची काळजी वाटू लागली. अश्या पांढऱ्या केसांमुळे माझे लग्न कसे होणार? या काळजीने घरातला प्रत्येकजण मला केस काळे करण्याचा सल्ला देऊ लागला. 'अमुक एखादे तेल वापरून पहा, मीठ कमी खा, शिर्षासन कर' अशा अनेक सूचनांचा माझ्यावर भडीमार होऊ लागला. मी मात्र सर्वांकडे साफ दुर्लक्ष करायचो. कारण माझ्या डोक्यावर वेगाने वाढणाऱ्या केसांबद्दल मला अजिबात न्यूनगंड वाटत नव्हता. कृत्रिम रंग लावून केस काळे करण्यात मला फारसे स्वारस्य नव्हते. केस रंगवणे बरेचसे वेळ खाऊ आणि कटकटीचे काम असल्यामुळे मी त्या वाटेल कधी गेलोच नाही. जे लोक केसाला डाय करतात त्यांचे नवीन वाढणारे केस पांढरेच असल्याने रंगवलेले केस काळे, मग नवीन उगवणारे पांढरे आणि या दोन्हीही रंगाच्या मधले तांबूस असे विचित्र रंगाचे केस बघून मला उबग यायचा. माझ्या लहानपणी बघितलेले तांबूस रंगाचे केस असलेले टांगेवाले मला आठवायचे. 'असे विचित्र भेसूर दिसण्यापेक्षा पांढऱ्या केसांचा मी बरा' असेच मला वाटेशिवाय केस काळे करून माझ्या मुळातच नसलेल्या सौंदर्यात फारसा फरक पडणार नाही याची मला पुरेपूर खात्री होती. त्यामुळे तरुण वयात देखील मी कधी माझे केस काळे केले नाहीत. पुढे माझ्यासारखेच विचार असणाऱ्या माझ्या बायकोने देखील मला केस काळे करण्याचा हट्ट धरला नाही, माझ्या डोक्यावरच्या पांढऱ्या केसांचा मला कधी तोटा तर झाला नाहीच, पण काहीसा फायदाच झाला. व्यवसायाच्या सुरवातीला नवीन असून देखील मी अनुभवी असल्यासारखा आत्मविश्वासाने वावरत असे.


पुढे वयोमानाप्रमाणे डोक्याच्या मागच्या भागात गोलाकार टक्कल देखील पडू लागले. सुरवातीला टक्कल डोक्याच्या मागे असल्याने मला कधी दिसत नसे. पण कालांतराने ते मला कधीकधी कटिंगच्या दुकानात मागून आरसा दाखवताना, कधी पाठमोऱ्या फोटोत दिसू लागले. पुढे ते खूप वाढू लागले, पण मला कधीही विग लावावासा वाटला नाही. विग कितीही महागडा, चांगल्या प्रतीचा घातला तरी विग घातलेला कळतोच. 'आपण नैसर्गिकपणे जसे दिसतो तेच बरे' असे मला नेहेमी वाटते. शेवटी कृत्रिम ते कृत्रिमच. माझ्या पांढऱ्या केसांबद्दल किंवा टकलाबद्दल कुणी काळजी व्यक्त केली किंवा चेष्टा केली की मी म्हणायचो "मी जसा आहे... तसा आहे. (मैं जैसा हूं... वैसा हूं.)  असो...

 

माझं हे केस पुराण आठवण्याचं अजून एक कारण घडलं. केसांच्या समस्यांची पार्श्वभूमी असलेले तीन चित्रपट एका पाठोपाठ माझ्या पाहण्यात आले. लॉकडाऊन मधील रिकामा वेळ मी प्राईम व्हिडिओं आणि हॉटस्टार वरील अनेक सुंदर चित्रपट आणि वेबसेरीज बघण्यात व्यतित केला. हे तीन चित्रपट म्हणजे  'गॉन केश', 'बाला' आणि 'उजडा चमन'. हे तीनही चित्रपट छान आहेतच पण त्यातील मला खूप आवडलेला चित्रपट म्हणजे 'गॉन केश'.

 

खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी कमतरता असतेच. काहीजणांना शाररिक व्यंग असते, कुणाला कोड असते, काही जणांना अकाली टक्कल पडते, काहीजण तोतरे बोलतात, तर काहीजण स्थूल असतात.(जाड व्यक्तींच्या आयुष्यात असणाऱ्या समस्येवर 'दम लगाके हैशा' हा अतिशय सुंदर सिनेमा जरूर पहा. आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या या चित्रपटावर देखील लिहायचं आहे, कधी मुहूर्त लागणार आहे कुणास ठाऊक?) अश्या काही व्यंगांमुळे तरुण मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या आयुष्यात वादळ येते, आयुष्य उध्वस्त होते. दुर्दैवाने आपल्या समाजात अशा व्यक्तींकडे काहीशा विचित्र नजरेने पहिले जाते. त्यांची चेष्टा देखील होते. पण अशा अडचणीचा त्या व्यक्तीने आत्मविश्वासाने सामना करणे महत्वाचे असते. अशाच काहीश्या विषयावर हे तीनही चित्रपट आधारलेले आहेत. 'अकाली टक्कल पडणे' हा सामान विषय या तीनही चित्रपटात वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहेलहान किंवा तरुण वयात टक्कल पडल्याने निर्माण होणारे शाररिक, मानसिक आणि सामाजिक प्रश्न या तीनही चित्रपटात अतिशय सुंदर पद्धतीने मांडले आहेत. या चित्रपटातील मध्यवर्ती कथाकल्पना जरी केसांच्या समस्येवर आधारित असली तरी या चित्रपटांची जातकुळी वेगवेगळी आहे. ‘बाला’ आणिउजडा चमन’ हे चित्रपट हलक्याफुलक्या विनोदी वळणाने जाणारे असूनगॉन केश’ काहीसा गंभीर स्वभावाचा आणिएलोपेशिया’ नावाच्या केसांच्या आजारावर आधारित चित्रपट आहे.   

 

एलोपेशिया हा खरं तर क्वचितच कुणाला होणार आजार आहे. हा आजार झालेल्या व्यक्तीचे केस खूप जास्त प्रमाणात गळून पूर्णपणे टक्कल पडते. स्वयंप्रतिरोध (ऑटो इम्यून) या प्रकारातील हा आजार आहे. म्हणजे शरीरात आजार बरे करण्यासाठी नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक यंत्रणा काम करीत असते. कधी कधी ही यंत्रणा बिघडते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशी शरीराबाहेरून येणाऱ्या जंतूशी युद्ध करण्याऐवजी आपल्याच शरीरातल्या काही पेशींवर हल्ला करतात. या अशा विचित्र असंतुलनामुळे त्याचा परिणाम शरीरातल्या केसांच्या मुळाशी असलेल्या पेशींवर होऊ लागतो. परिणामी शरीरावरील विशेषतः डोक्यावरील केस वेगाने गळू लागतात आणि संपूर्ण टक्कल पडते. काही व्यक्तींचे डोक्याबरोबर शरीरावरील इतरही केस जसे भुवया, पापण्यांचे केस देखील गळतात. हा आजारामुळे अनेक शाररिक, सामाजिक प्रश्न निर्माण होतात. त्यातही हा आजार स्त्रियांना झाला तर बघायलाच नको, त्यांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते


विपीन शर्मा, श्वेता त्रिपाठी आणि दीपिका अमीन 

'गॉन केश' या चित्रपटातील 'एनाक्षी' (श्वेता त्रिपाठी) नावाच्या एका शाळकरी मुलीला 'एलोपेशिया' हा आजार होतो. मध्यमवर्गीय आईवडिलांची एकूलतीएक एनाक्षी या आजारामुळे उध्वस्त होते. ते रम्य बालपण, त्या शाळेतले मित्र मैत्रिणी सर्व काही दुरावते. मित्रमैत्रिणींमध्ये ती एक चेष्टेचा विषय होतो. मध्यमवर्गीय आईवडील काळजीत पडतात. या आपल्या लाडक्या मुलीचे पुढे कसे होणार? हिच्याबरोबर लग्न कोण करणार? अर्थात गडबडून जाता, संयमाने ते आपल्या मुलीच्या आजाराशी सामना करायचा ठरवतात. स्वतःच्या आशा आकांक्षांना मुरड घालतात. मग स्पेशालिस्ट डॉक्टर, महागडी औषधे, पथ्यपाणी वगैरे सुरु होते. स्टिरॉइड प्रकारातील औषधांचा मारा केल्याने एनाक्षीला औषधांच्या साईड इफेक्टशी सामना करावा लागतो. स्ट्रॉंग औषधांमुळे एनाक्षीच्या ओठावरील लव झपाट्याने वाढू लागते. हनुवटीवर दाढी येऊ लागते. प्रश्न आणखीनच गंभीर होतो. नाईलाजाने औषधे थांबवावी लागतात. आशा निराशेच्या हिंदोळ्यावर एनाक्षीचे आयुष्य पुढे सरकत असते. डॉक्टर, दवाखाने, पथ्य कशाचाही उपयोग झाल्यामुळे केसांचा विग घालण्याचा पर्याय पुढे येतो. एनाक्षी नाईलाजानेच हा पर्याय स्वीकारते.

 

खरं तर लहानपणापासूनच एनाक्षीला नृत्यांगना व्हायचं असतं. पण संपूर्ण टक्कल पडलेल्या एनाक्षीचे स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहते. तिला लग्नासाठी बघायला आलेली मुले अर्थातच तिला नाकारत असतात. एनाक्षी आणि तिचे आईवडील नैराश्याच्या खोल गर्तेत जात रहातात. एकदा अचानक शाळेत असल्यापासूनच एनक्षीवर मनापासून प्रेम करणाराश्रीजोय’ (जितेंद्र कुमार) एनाक्षीच्या आयुष्यात येतो आणि...

श्रीजोय (जितेंद्रकुमार) आणि एनाक्षी (श्वेता त्रिपाठी)

एनाक्षीच्या आयुष्यातील हे एक जबरदस्त वळण असते. पुढं काय होतं? एनाक्षीचे केस गळणे कमी होते का? श्रीजोय एनाक्षीला स्वीकारतो का? अंतर्मनाच्या आशा निराशेच्या द्वंद्वावर एनाक्षी विजय मिळवते का? तिच्या नृत्यांगना होण्याच्या स्वप्नाचे पुढे काय होते? हे जाणून घ्यायला 'गॉन केश' हा नितांत सुंदर चित्रपट बघायलाच हवा. एनाक्षीची भूमिका 'श्वेता त्रिपाठी' या गुणी अभिनेत्रीने जबरदस्त पद्धतीने साकारली आहे. अंदाजे वयाच्या पस्तिशीतील असलेल्या अभिनेत्रीने शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलीपासून ते पंचविशीतील कॉलेज तरुणीची भूमिका अतिशय सक्षमपणे साकारली आहे. डोक्यावर वेगाने टक्कल पडताना एनाक्षीची होणारी घालमेल, घुसमट तिने तिच्या सहज अभिनयातून दाखवली आहे. एनाक्षीच्या आई वडिलांची भूमिका करणारे अनुक्रमे 'दीपिका अमीन' आणि 'विपीन शर्मा' अतिशय संयमित अभिनयाने चित्रपट वास्तव बनवतातसध्या इंटरनेटवरील OTT प्लॅटफॉर्मवर गाजणारा 'जितेंद्र कुमार' या चित्रपटात देखील कमाल करतो. खरं तर या चित्रपटातील सर्वच अभिनेते त्यांच्या सहज अभिनयाने चित्रपटाची उंची वाढवतात.

 

एनाक्षी (श्वेता त्रिपाठी)

ह्या चित्रपटाच्या शेवटी असलेले एनाक्षीचे एक स्वगत चित्रपटाचे सार सांगून जाते. एनाक्षी स्वतःशीच म्हणते "दुनियामे सबकी जिंदगीमें कुछ ना कुछ कमी है... मगर जिंदगी इन सब कमियोंको मिलाकेही तो पुरी होती है... मैं जैसी हूं, वैसी हूं... 

 

राजीव जतकर.