Saturday, 10 August 2019

|| आयुष्यमान भव ||


|| आयुष्यमान भव ||


आयुष्यमान खुराना

आज दि. -०८-२०१९ रोजी सहासष्ठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची दिल्लीत घोषणा करण्यात आली. अनेक गुणी अभिनेते, सहअभिनेते, सर्वोत्तम चित्रपट, उत्कृष्ठ बालकलाकार अशा श्रेणीतील पुरस्कार जाहीर करण्यात आले. आनंदाची गोष्ट म्हणजे या जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आणि मराठी कलाकारांनी लक्षणीय कामगिरी केली. मला आणखीन एका कलाकाराला मिळालेल्या पुरस्काराचा विशेष आनंद झाला, तो कलाकार म्हणजे 'आयुष्यमान खुराना'. करियरच्या सुरवातीच्या काळात म्हणजे रियालिटी शोज मधील सूत्रसंचालकाच्या भूमिकेतील आयुष्यमान मला फारसा कधी आवडत नसे. पण नंतरच्या काळातील त्याच्या अभिनयक्षेत्रातील प्रगती अक्षरशः नेत्रदीपक आहे. आज त्याचा सर्वोत्कृष्ठ अभिनेता या श्रेणीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्याच बरोबर त्याने अभिनय केलेल्या 'अंधाधुन' आणि 'बधाई हो' या चित्रपटांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ठ चित्रपट आणि सर्वोत्कृष्ठ लोकप्रिय चित्रपट अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

 वास्तविक मी जुन्या पिढीतला. माझ्या तरुणपणीच्या काळातील हिंदी चित्रपटांचे आवडते नायक म्हणजे संजीवकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन वगैरे. त्यानंतरच्या काळातील सलमान, शाहरुख, अमीर ही खान मंडळी मला कधी फारशी रूचलीच नाहीत. तसा आमिरखान बराय म्हणा. पण त्यामुळे मध्यंतरीच्या काळात हिंदी चित्रपट बघितले ते केवळ करमणूक म्हणूनच. पण अलीकडच्या काळात 'आयुष्यमान खुराना' ह्या तरुण अभिनेत्याने माझं आणि खरं तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय. गेल्या काही वर्षातले त्याचे चित्रपट बघताना हा गुणी अभिनेता 'लंबी रेस का घोडा' आहे असेच म्हणावे लागेल. आयुष्यमान खुराना आणि त्याचे हटके चित्रपट गेल्या काही वर्षात माझ्या सारख्या त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी उत्सुकतेचा भाग बनले आहेत. 

आयुष्यमान खुराना

गंमत म्हणजे उच्चशिक्षित आयुष्यमानच्या करियरची सुरवात झाली ती एक गायक म्हणून. हा आयुष्यमान प्रथम दिसला तो एका रियालिटी शो मध्ये गायक स्पर्धक म्हणून. तेही वयाच्या सतराव्या वर्षी. गायनाबरोबर काही काळ त्याने दिल्ली मधील 'बिग एफ.एम.' या रेडिओ चॅनलवर रेडिओ जॉकीचे ही काम केले. कलर टीव्ही च्या 'इंडिया गॉट टॅलेंट' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून त्याने आपली चमक दाखवली. पुढे स्टारप्लस च्या 'म्युझिक का महाधमका' या रिऍलिटी शो मधून त्याने आपली स्वतःची स्वतंत्र ओळख दाखवून दिली. त्याच्या चित्रपट कारकिर्दीची खरी सुरवात २०१२ मध्ये आलेल्या 'विकी डोनर' या भन्नाट चित्रपटापासून झाली. जॉन अब्राहाम या प्रसिद्ध हिरो ची निर्मिती असलेलाआणि सुजित सरकार दिग्दर्शित 'विकी डोनर' हा चित्रपट आयुष्यमान खुराना आणि यामी गौतम यासारखे नवखे नट असून देखील कथेतल्या वेगळेपणामुळे आणि आयुष्यमानच्या अभिनयामुळे हिट ठरला. वेगळा ठरला. (या चित्रपटाच्या यशात अन्नू कपूर चा मोठा वाटा आहे.)  त्यानंतर लगेचच २०१३ साली आलेल्या 'नौटंकी साला' या चित्रपटाने आयुष्यमानचे चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के झाले, आणि मग मात्र आयुष्यमान ने मागे वळून पाहिलेच नाही. 

दम लगाके हैशा

बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात राहून देखील वेगवेगळ्या विषयातून सातत्याने प्रेक्षकांसमोर आलेला आयुष्यमान हा वेगळ्या वाटेवरील हरहुन्नरी कलाकार आहे. सुरवातीला काहीश्या हलक्याफुलक्या, विनोदी वळणाने जाणाऱ्या अनेक चित्रपटातुन (जसे 'विकी डोनर(२०१२), 'नौटंकी साला(२०१३), 'दम लगाके हैशा(२०१५). 'बरेली की बर्फी(२०१७), 'शुभमंगल सावधान(२०१७) आणि 'बधाई हो(२०१८) त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. हे जवळ जवळ सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिस वर यशस्वी ठरले. मागील वर्षातला 'बधाई हो' हा मला आवडलेला सर्वोत्तम चित्रपट आहे. अर्थात 'बधाई हो' चं यश आयुष्यमान बरोबर त्याचे सहकलाकार, कथेतला वेगळेपणा, तसेच सुंदर संवाद यांनाही द्यावं लागेल.(या चित्रपटाबद्दल देखील काहीबाही लिहायचं मनात आहे, बघूया..)

'बधाई हो'

२०१८ साली आलेल्या 'अंधाधुन' या चित्रपटाद्वारे आयुष्यमानने काहीशा गंभीर, थ्रिलर प्रकारच्या चित्रपटाकडे आपला मोहोरा वळवला. श्रीराम राघवन दिग्दर्शित 'अंधाधुन' चित्रपटाने आयुष्यमान च्या बाबतीतली सारी गणितेच बदलून टाकली. पहिल्यांदाच अशा प्रकारे वेगळ्या भूमिकेतून आलेल्या आयुष्यमानच्या या चित्रपटाला तिकीटबारीवर देखील घवघवीत यश मिळाले. नुकताच तो पुन्हा एकदा 'आर्टिकल-१५' या चित्रपटाद्वारे पोलीस अधिकाऱ्याच्या तडफदार भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आला. उत्तरप्रदेशात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये जातीभेदाविषयी भाष्य करण्यात आले आहे. एका मुलाखतीत संवेदनशील आयुष्यमान म्हणतो "भारतीय घटनेतील आर्टिकल-१५ नुसार कुठल्याही प्रकाराचा जातीभेद मान्य नसतानाही, राजरोस जातिव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचायला हवा." पुढे तो म्हणतो "मी चित्रपट स्वीकारताना माझ्या नेहेमीच्या साच्यातून आणि प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकाराने नेहेमी बदलत राहिलं पाहिजे". 

'अंधाधुन'

ज्या प्रकारची भूमिका मिळेल त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन, भूमिकेत पूर्णपणे शिरून हा सशक्त अभिनेता प्रेक्षकांसमोर व्यक्त होत असतो. चोखंदळपणे वेगळ्या चित्रपटांची निवड करत, चित्रपट रसिकांची मने जिंकणाऱ्या खुरानांच्या गुणी आयुष्यमान ला चित्रपटक्षेत्रातील पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद…. || आयुष्यमान भव ||

राजीव जतकर.