‘गरुडमाची’
- एक अद्भुत ठिकाण.
"जतकर... २० नि २१ जुलै या तारखा राखीव ठेवा. तुम्हा उभयतांना 'गरुडमाची'ला यायचंय. काही जवळची मित्रमंडळी देखील बोलावली आहेत. मस्त पाऊस, रुचकर खाणेपिणे, नवीन ओळखी आणि झकास गप्पा असा कार्यक्रम आहे. नक्की या." फोनवर वसंत वसंत लिमये बोलत होते. वीसपंचवीस वर्षांपूर्वी माझी वसंत वसंत लिमयांची ओळख झाली. नावापासूनच वेगळेपण असलेले लिमये माझ्या लक्षात राहिले ते त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण नावामुळे आणि घरामुळे. त्यांचा बंगला अनेक जुन्या, प्राचीन वस्तूंनी सजला आहे. गिर्यारोहणाचा, भटकंतीचा प्रचंड ध्यास असल्याने, भटकंतीच्या दरम्यान मिळालेले अनेक प्राचीन दरवाजे, लाकडी कोनाडे, प्राचीन वस्तू यांनी सजलेला त्यांचा बंगला म्हणजे अशा वस्तूंचं एक संग्रहालयच आहे. त्यानंतरच्या काळातही संपर्क होतंच राहिला. त्यांच्या गरुडमाची बद्दल बरंच ऐकलं होतंच. गरुडमाचीवर विकेंड साजरा करायचा ही कल्पनाच उत्साहवर्धक होती. मी अर्थातच वसंतरावांचे आमंत्रण स्वीकारले. पण अलका म्हणाली "मलाही खरं तर बघायचंय गरुडमाची. मी बरंच ऐकलंय त्याबद्दल. पण तिथे आपल्या ओळखीचं कुणी नाही. तुम्हीच जा. मी येत नाही." मी हिरमुसलो. पण सुदैवाने काही वेळाने ती म्हणाली " जाऊयात ! नवीन ओळखी होतील".
वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आम्ही गरुडमाचीला पोहोचलो. पुण्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर ताम्हिणी घाटात ‘गरुडमाची’ हे वसंत लिमये आणि मृणाल परांजपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेलं एक अफलातून ठिकाण आहे. अंदाजे ५५ एकराच्या डोंगरावरील दाट जंगलात हे ठिकाण आहे. गरुडमाचीवर पोहोचलो तेंव्हा पाऊस सुरु होताच. गरुडमाचीचे व्यवस्थापक संतोष शहासने यांनी हसतमुखाने आमचं स्वागत केलं.
बाकीची मित्रमंडळी हळू हळू जमत होती. मृणाल परांजपे, मिलिंद कीर्तने, प्रेम मगदूम या हाय प्लेसेस कंपनीच्या संचालकांसमवेत ऍडव्होकेट रवींद्र पाटील, राजन आणि मोहन उडाणे (पौड रोडवरील सर्वात जुन्या आणि सुप्रसिद्ध ‘श्रीमान’ हॉटेलचे मालक) अशी मंडळी जमली. आमचा या नवीन मित्रांबरोबर मैत्री व्हायला फारसा वेळ लागला नाही. बाहेर कोसळणारा पाऊस, हवेतील गारवा, वाफाळलेली कॉफी. मस्त गप्पा रंगल्या. मग गरुडमची वर फेरफटका मारण्यासाठी आम्ही सर्व बाहेर पडलो.
![]() |
आऊटडोअर ट्रेनिंग |
फिरता फिरता वसंत लिमये उत्साहाने हाय प्लेसेस आणि गरुडमाची बद्दल माहिती देत होते. ते म्हणाले "१९८९ च्या सुमारास आम्ही हाय प्लेसेस ही कंपनी सुरु केली. त्याकाळी 'आऊटडोअर मॅनेजमेंट ट्रेनिंग’ कंडक्ट करणारा व्यावसायिक उदयोग ही संकल्पना नवीन होती. सुरवातीला वर्षातून दोन तीन प्रोग्रॅम्स आम्ही करायचो, ते देखील भाड्याच्या जागेत. मग या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद बघून आम्ही स्वतःची जागा घेण्याचे ठरवले. ताम्हिणी घाटातील या डोंगरावरील ७ एकर जागा आम्ही घेतली. त्यावेळी या जागेतील डोंगर कपारीत गरुडांचे वास्तव्य आहे हे आमच्या लक्षात आले. म्हणून याचे नाव 'गरुडमाची'! माझ्या हाय प्लेसेस या कंपनीचे 'गरुडमाची' हे व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र ताम्हिणी घाटमाथ्यावर, टाटाच्या डोंगरवाडी कॅम्प शेजारी वसलं आहे. गरुडमाचीवरील प्रशिक्षण केंद्र २००४ साली सुरु झालं. व्यावसायिक वाढीमुळे ही सात एकराची जागा कमी पडू लागली. मग हळू हळू आजूबाजूची डोंगरावरील जागा आम्ही घेत गेलो आणि आता ५५ एकराच्या या गरुडमाचीवर आमचा व्यवसाय बहरला आहे. गरुडमाची मध्ये जवळजवळ २०० प्रशिक्षणार्थींना राहायची व जेवणाची सोय आहे. वर्षभर सतत अनेक कंपन्यांचे गृप्स इथे निरनिराळ्या प्रकारचे व्यवस्थापनाचे धडे घेत असतात. कंपन्यांच्या गरजेप्रमाणे देखील आम्ही ट्रेनिंग कोर्सेस तयार करतो. आमचं गरुडमाची हे रिसॉर्ट नसून ट्रेनिंग सेंटर आहे. त्यामुळे आम्ही पर्यटकांना हे राहायला देत नाही”. असेही त्यांनी आवर्जून सांगितले..
![]() |
अशा तंबूत (टेन्ट) राहायची उत्तम व्यवस्था |
शहरी गजबजाटापासून दूर असलेल्या गरुडमाची मध्ये व्यवस्थापनाच्या संबंधित अनेक इनडोअर ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात, पण त्याचबरोबर अनेक साहसी आऊटडोअर ऍक्टिव्हिटीज, जसे ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, व्हॅली क्रॉसिंग वगैरे देखील घेतल्या जातात. इथं प्रशिक्षण घेणाऱ्यांकरिता उत्तम राहण्याची, रुचकर खाद्यपदार्थ व जेवणाची व्यवस्था आहे. इथलं आणखीन एक वैशिठ्य म्हणजे इथे गरुडमाचीच्या जंगलात टेन्ट्स मध्ये देखील राहण्याची सोय आहे. एका टेन्ट मध्ये सहा प्रशिक्षणार्थींना राहता येतं. हे टेन्ट्स आतून सर्व सोईंनी परिपूर्ण आहेत. इथे ग्रुप्सना राहण्यासाठी काही डॉर्मेटरीज देखील आहेत. येथील पन्नास साठ जणांचा कर्मचारी वर्ग वसंत लिमयांच्या खास पठडीत तयार झालेला असल्याने अतिशय नम्र आणि अगत्यशील आहे. एका चांगल्या सुरक्षित वातावरणात इथे प्रशिक्षणार्थींना मोकळेपणाने व्यक्त व्हायला मदत होते. प्रशिक्षणार्थींच्या मनात कळंत नकळत साचलेल्या गोष्टींचा इथल्या नैसर्गिक वातावरणात व प्रशिक्षणादरम्यान निचरा होऊन त्यांची कार्यतत्परता, कार्यक्षमता आश्चर्यकारकरित्या विकसित होते. या संदर्भात बोलताना वसंत लिमये म्हणाले " २००९ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी टेस्ट सिरीज सुरु होती. पहिल्या दोन्हीही टेस्ट मॅचेस मध्ये भारतीय टीमचा लाजिरवाणा पराभव झाला होता. अशा नैराश्येने ग्रासलेल्या भारतीय टीमने दोन दिवस गरुडमाचीला भेट दिली. अर्थात ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. गरुडमाची मधील वास्तव्याने आणि निरनिराळ्या इनडोअर, आऊटडोअर सत्रांमुळे आपल्या भारतीय टीमला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली. गम्मत म्हणजे पुढील उरलेल्या तीनही टेस्टमॅचेस भारताने जिंकल्या आणि संपूर्ण सिरीज देखील जिंकली".
वसंत लिमयांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपार कष्टातून हे आगळंवेगळं आउटडोअर कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर उभा राहिलंय. वसंत लिमयांच्या सुविद्य पत्नी मृणाल परांजपे ह्यांचा गरुडमाची च्या उभारणीत सिंहाचा वाटा आहे. गरुडमाची प्रकल्पाची संकल्पना आणि संपूर्ण डिझाईन मृणालताईंचे असून त्यांना या गरुडमाची प्रोजेक्ट साठी आर्किटेक्टस, इंजिनियर्स, सर्व्हेअर्स असोसिएशन (AESA) या नामवंत संस्थेचे 'बेस्ट एन्व्हायर्मेंट फ्रेंडली इन्स्टिट्यूट' हे अवार्ड देखील मिळाले आहे. मृणालताई ‘हाय प्लेसेस’ या कंपनीच्या कार्यकारी संचालक म्हणून काम बघतात. सगळ्या अनोळखी लोकांच्यात कोणाशी आणि काय गप्पा मारायच्या? हा अलकाचा प्रश्न मृणालताईंमुळे चुटकीसरशी सुटला. संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर रात्री माझ्या आवडीच्या बियर आणि रुचकर जेवणाच्या जोडीने पुन्हा गप्पा रंगल्या. रात्री काहीश्या उशिरानेच आम्ही झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने पहाटेच जाग आली. पाऊस थांबला होता. रोजच्याप्रमाणे फिरायला जावे असा विचार करून मी आणि अलका बाहेर पडलो. बाहेरच्या पोर्च मध्ये वसंतराव, मृणालताई आणि रवींद्र पाटील गप्पा मारत बसले होते. त्यांच्याबरोबर वाफाळता चहा घेऊन फिरायला कुठे जावे अश्या विचारात असतानाच रवींद्र पाटील म्हणाले "जतकर... फिरायला निघालात का? इकडे पश्चिमेच्या घाटमाथ्यावरून फारच सुंदर नजारा दिसतो. तिकडे जा". नवीन जागा असल्याने वसंतरावांनी त्यांच्या संतोष नावाच्या एका कर्मचाऱ्याला आमच्या बरोबर जायला सांगितले. थोड्या उतरणीच्या कच्च्या निसरड्या पाऊल वाटेने आम्ही गरुडमाचीच्या पश्चिम टोकावर असलेल्या पठारावर गेलो. तिथून दिसणारा निसर्गाचा अलौकिक नजारा बघून आम्ही निशःब्द झालो. पश्चिमेचा ओलसर भणाणता वारा गात्रं उल्हसित करत होता. गरुडमाचीचे ते दूरवर पसरलेले पठार, समोर दिसणारे डोंगर हिरव्या रंगाचा शालू पांघरल्यासारखे दिसत होते. समोरच्या डोंगरदऱ्यांमधून अनेक छोटेमोठे पाण्याचे ओहोळ खळाळत खाली दरीमध्ये वहात लुप्त होत होते. मागील जंगलातून असंख्य वेगवेगळ्या पक्ष्यांचा चिवचिवाट उमटत होता.
ढगांचे कापसासारखे पुंजके, विमानातून दिसतात तसे समोरच्या दरीत आमच्या खाली पसरले होते. तिथेच उजव्या बाजूने 'लेंडा' नावाचा एक डोंगरसुळका ढगातून डोके वर काढून जणू आमच्याकडे उत्सुकतेने बघत होता. तिथूनच खाली खोल दरीत टाटा चा 'भिरा जलविद्युत प्रकल्प' अगदी छोटासा दिसत होता. अशा डोंगराळ भागात १९२७ साली सुरु झालेला हा जलविद्युत प्रकल्प म्हणजे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. त्याकाळी कोकण, घाटमाथ्यावरील दळणवळणाच्या सोयी खूप मर्यादित स्वरूपाच्या होत्या. प्रवासाची त्याकाळाची महत्वाची साधनं म्हणजे घोडे किंवा दोन पायाची गाडी. अशा काळात विद्युत प्रकल्पाची कल्पना सुचणे, तिचा अभ्यास करणे आणि अफाट प्रयत्नानंतर हा प्रकल्प अस्तित्वात आणणे हे सारंच अचंबित करणारं आहे. टाटा कंपनीनं इथली जागा १९०० सालानंतर विकत घेतली. इथे असलेली जवळजवळ वीसपंचवीस छोटी गावं, वस्त्या, वाड्या हलवुन या सर्व विस्थापितांचे पुनर्वसन करणे हे काम काही सोपे नव्हते. या विस्थापितांसाठी टाटांनी खूप प्रयत्न केले. हा प्रकल्प म्हणजे एक अभियांत्रिकी आश्चर्यच आहे. मुळशी तलावातून या विद्युत केंद्राला पाणी पुरवण्यासाठी ४ किमी किलोमीटर लांबीचे डोंगर खोदून बोगदे काढले आहेत. पश्चिम कड्यावरून सुमारे १० फूट व्यासाचे सहा अजस्त्र पाईप्स १५०० फूट खोल दरीत उतरवून या जलविद्युत केंद्राच्या जनित्रापर्यंत पोहोचवणे हे केवळ अशक्यप्राय वाटणारे काम त्याकाळी टाटांनी कसे केले असेल? असा प्रश्न पडतो.
![]() |
टाटा कंपनीचा 'भिरा' जलविद्युत प्रकल्प |
जवळ जवळ तास दीडतास आम्ही या घाटमाथ्याचे सौंदर्य निशःब्दपणे अनुभवत होतो. काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. निसर्गाच्या त्या विराट आसमंतात आम्ही पार हरवून गेलो होतो. स्वतःचे अस्तित्वच जणू विसरलो होतो. पण आता आमचा वाटाड्या कंटाळलेला असणार. त्याला हे दृश्य नेहेमीचेच. तो म्हणाला "तिकडे नाश्ता लावून झाला असेल. परत जाऊयात का?".नाईलाजानेच आम्ही परत फिरलो. पुण्यात काही कामे वाट बघत होती.
राजीव जतकर.