निवडणूक व्यवस्थेच्या विसंगतीवर भाष्य करणारा 'न्यूटन'
![]() |
न्यूटन च्या प्रमुख भूमिकेतील राजकुमार राव |
भारतीय कायदे, कानून अशा आदिवासी लोकांना विकासाचे फायदे मिळण्यासाठी बनवले गेलेले आहेत. जंगलात खोलवर राहणाऱ्या आदिवासी लोकांना या निवडणुकांचा खरंच काही फायदा होतो का? दुर्दैवाने असे लोक विकासापासून वंचितच राहतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांना भारतीय व्यवस्थेतील अनेक गोष्टी खटकत असतात, पटत नसतात. प्रत्येकाला आपल्या देशाप्रती काहीतरी चांगले करायचे असते, पण आपण सर्वच जण प्रवाहाच्या रेट्यात अगतिकपणे वाहत जात असतो. पण असेही काहीजण असतात जे रोजच्या जगण्यात नियमाप्रमाणे वागत आपले कर्तव्य पूर्ण करत असतात. अशा कर्तव्यनिष्ठ लोकांना जगाशी काही घेणेदेणे नसते. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असतात. ह्या अशा सर्व पार्श्वभूमीवर दिग्दर्शक 'अमित मसुरकर' हे आपल्या 'न्यूटन' नामक चित्रपटाद्वारे अतिशय परखडपणे व्यक्त होतात. भारतीय निवडणूक प्रक्रियेवर ते प्रश्नचिन्ह उभे करतात.
आपल्या
सामाजिक व्यवस्थेमध्ये चुकून एखाद्याने प्रामाणिकपणे वागायचं ठरवलं तर त्याला त्रासच होतो. या चित्रपटाचा नायक 'नूतन कुमार' (राजकुमार राव) हा त्यापकीच एक ! नूतन कुमार हा अतिशय प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ असा सरकारी अधिकारी असतो. स्वभावातील अतिप्रामाणिकतेमुळे तो थोडा हट्टी देखीलअसतो. त्याला स्वतःचे नूतन कुमार हे नाव आवडत नसल्याने त्याने स्वतःच्या नावातील 'नु' चे 'न्यू' आणि 'तन' चे 'टन' असा बदल करून 'न्यूटन' हे नाव धारण केलेले असते. त्याला जेंव्हा सरकारी नोकरी लागते तेव्हाच निवडणुका जाहीर होऊन छत्तीसगड मधील नक्षलग्रस्त दंडकारण्य च्या जंगली भागात निवडणूक अधिकारी म्हणून त्याची नेमणूक होते. न्यूटन चा भारतीय निवडणूक प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असतो. 'लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, त्यामुळे नक्षलग्रस्त भागातही मतदान झालेच पाहिजे' अशा विचाराने विचाराने झपाटून जाऊन तो कामाला लागतो. मात्र नक्षलग्रस्त भाग धोकादायक असल्याने घाबरटपणामुळे म्हणा किंवा नकारात्मक विचारांमुळे म्हणा न्यूटनला सर्वजण तिकडे जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या तत्वांना जीव की प्राण मानणाऱ्या न्यूटनवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तो हट्टाने या दूरवर असलेल्या जंगलातील भागात निवडणूक प्रक्रिया राबवायची ठरवतो आणि मग सुरु होतो माणसातल्या सकारात्मक आणि नकारात्मक वृत्तीमधील संघर्ष !
![]() |
डावीकडून मेजर आत्मासिंग, मध्ये लोकनाथ आणि उजवीकडे न्यूटन |
![]() |
मेजर आत्मासिंग (पंकज त्रिपाठी) |
![]() |
लोकनाथ (रघुवीर यादव), |
समाजातील सकारात्मकता आणि नकारात्मकता या वृत्तीचा संघर्ष या चित्रपटात अतिशय वेधक पद्धतीने मांडण्यात आलेला आहे. या दोन्ही टोकाच्या भूमिका घेणाऱ्या न्यूटन आणि मेजर आत्मासिंग यांच्या संघर्षात थोडा सुवर्णमध्य साधणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य वर्गाचे प्रतिनिधित्व न्यूटन चे सहकारी करतात. न्यूटनचे सहकारी लोकनाथ (रघुवीर यादव), शंभुनाथ (मुकेश प्रजापती), आणि या नक्षलग्रस्त भागातली स्थानिक रहिवासी तरुणी माल्को (अंजली पाटील) अतिशय प्रभावीपणे आणि मिश्किलपने आपापल्या भूमिका सकरतना दिसतात. त्यातही अतिशय अनुभवी आणि कसलेले अभिनेते रघुवीर यादव विशेष लक्षात रहातात. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या सावटाखाली काम करताना गमतीजामती करत ताण हलका करणारा लोकनाथ त्यांनी मस्तच रंगवला आहे. नक्षलवाद्यांचे वास्तव आणि त्यांच्याबद्दलचा सरकारी विपर्यास या दोन्हीही बाजूंची जाण असलेल्या माल्को च्या भूमिकेत असलेल्या अंजलि पाटिल या अभिनेत्रिने अतिशय संयमित अभिनय केलाय. नक्षलवाद्यांच्या भीतीच्या सावटखाली जगणाऱ्या स्थानिक आदिवासींची नेमकी ओढाताण ती सातत्याने न्यूटनला समजावून सांगते. मोठ्या आणि दमदार सहकलाकारांमध्ये ती आपली छाप सोडून जाते. वेगळ्या प्रकारच्या अनेक चित्रपटातून दिसणारा पंकज त्रिपाठी हा कसलेला अभिनेता मला नेहेमीच आवडत आलाय. आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण भूमिकेत चमकलेला पंकज त्रिपाठी मेजर आत्मासिंगच्या भूमिकेचे अक्षरशः सोने करतो.
![]() |
माल्को (अंजली पाटील) |
न्यूटन
च्या प्रमुख भूमिकेतील राजकुमार राव या अभिनेत्याबद्दल लिहावे तितके थोडेच आहे. खरं तर त्याचा 'ट्रॅपड' हा एकमेव चित्रपट मी पाहिलेला आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'न्यूटन' ह्या चित्रपटासाठी राजकुमार राव याला उत्तम अभिनयासाठी 'एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड' मिळाले असून 'फिल्म फेअर क्रिटिक्स अवॉर्ड' देखील देऊन त्याला गौरवण्यात आले आहे. न्यूटन च्या व्यक्तिरेखेत राजकुमार राव अगदी मिसळून गेला आहे. या भूमिकेतील न्यूटनची नोकरीप्रती असणारी कर्तव्यनिष्ठता, इमानदारी त्याच्या सहज अभिनयातून उभी राहते. कमी बोलूनही केवळ डोळ्यातून भाव व्यक्त करणे हे ह्या गुणी अभिनेत्याचे वैशिष्ट्य आहे. राजकुमार राव चा अभिनय या चित्रपटाचा प्राण आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील राजकुमार राव हा एक 'लंबी रेस का घोडा' आहे, असेच म्हणावे लागेल.
या चित्रपटातील काही संवाद प्रेक्षकांना अंतर्मुख करतात. चित्रपटातील रघुवीर यादव यांच्या आवाजातील शेवटचे 'दिल बोला तू अपना काम कर' हे गाणे अतिशय अर्थपूर्ण आहे. दुर्दैवाने ते शेवटच्या श्रेयनामावलीच्या वेळी असल्याने 'घरी जायची घाई' असलेल्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहचत नसावे. अतिशय नकारात्मक वातावरणात वावरणारा आपल्यासारखा सामान्य प्रेक्षक चित्रपट संपल्यावर एक आशावाद घेऊनच चित्रपटगृहाबाहेर पडतो. निवडणुकांसारख्या गंभीर सामाजिक विषयावर उत्तम कास्टिंग असलेला हा चित्रपट निवडणूक व्यवस्थेच्या विसंगतीवर नेमके भाष्य करतो आणि आपल्याला अंतर्मुख करून जातो.
टीप: ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर हा चित्रपट उपलब्ध आहे. ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघाच !
राजीव जतकर.