फेरोंच्या राज्यात...
“इजिप्त? आता हे कुठले ठिकाण? पिरॅमिड्स शिवाय काय आहे इजिप्त मध्ये? तिकडे रेताड, रुक्ष वाळवंटात जाण्यापेक्षा इकडे जवळचं मॉरिशस किंवा बाली ला का जात नाहीये तुम्ही? जुनी पुराणी थडगी बघण्यासाठी इतका खर्च करणार तुम्ही? बाकीचं जग बघून झालाय का तुमचं?" अशा अनेक नकारात्मक प्रतिक्रिया ऐकतच आम्ही इजिप्तला जाण्याची तयारी करत होतो. फक्त हर्षवर्धन आणि अनुजा आम्ही इजिप्त ला जाणार म्हणून जाम खुश झाले होते. हर्षवर्धन नुकताच त्याच्या पीएचडी च्या काही कामानिमित्त दोन महिने इजिप्तला राहून आला होता. इजिप्त तुम्हाला नक्की आवडेल असे त्याने आम्हाला ठामपणे सांगितले होते. माझ्याही मनाच्या कोपऱ्यात 'काही ठिकाणे बघायचीच' असे होते, त्यापैकी इजिप्त हा देश बऱ्याच वरच्या क्रमांकावर होता. त्यामुळे या दिवाळी नंतर इजिप्त वारी करायचीच असे ठरवून 'विणा वर्ल्ड' कडे आम्ही बुकिंग करून टाकले. इजिप्त बद्दल थोडीफार माहिती घ्यायला सुरवात केली. प्राचीन इतिहास असणाऱ्या इजिप्त सारख्या ठिकाणांचा पूर्वइतिहास, तिथल्या संस्कृतीची किमान जुजबी का होईना माहिती घेणे आवश्यक असते, अन्यथा त्या पाहिलेल्या ठिकाणांचे महत्व आपल्या लक्षातच येत नाही आणि मग बघताना कंटाळा येऊ लागतो. इजिप्त च्या बाबतीत बऱ्याच जणांचे तसेच होत असल्याने बहुदा वर उल्लेख केलेल्या प्रतिक्रिया येत असाव्यात. असो..![]() |
जगप्रसिद्ध पिरॅमिड्स |
आफ्रिका खंडाच्या पूर्वोत्तर भागात असलेला इजिप्त हा देश सहारा वाळवंटाचा एक भाग आहे. रुक्ष वाळवंट असलेल्या ह्या इजिप्त मधून दक्षिणोत्तर वाहणारी नाईल नदी इजिप्तची जीवनदायिनी ठरली आहे. या नदीच्या आजूबाजूने पुरातन काळापासूनच संस्कृती वसली गेली, वसाहती निर्माण झाल्या. असं म्हणतात की 'इजिप्त ही नाईल नदीने जगाला दिलेली देणगी आहे'. केवळ या नाईल नदीमुळेच इजिप्त देश तरला असेच म्हणावे लागेल. जगातील सर्वात लांब असलेली नदी आफ्रिकेतील बुरुंडी, रवांडा, टांझानिया, काँगो, केनिया, सुदान हे देश सुपीक करत करत शेवटी इजिप्त मधून वहात जाऊन उत्तरेकडे भूमध्य समुद्राला (मेडिटेरिअन सी) मिळते. या नदीची एकूण लांबी ६८५३ किलोमीटर असून केवळ इजिप्त मधील लांबीच तब्बल ११०० कि.मी. आहे. भूमध्य सागराशी मिळताना तिला अनेक फाटे फुटतात. इजिप्तच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त सहा टक्के भागातच म्हणजे नाईल नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशातच लोकवस्ती आहे. बाकीच्या चौऱ्याणणउ टक्के भागात आजिबात लोकवस्ती नसलेलं कोरडं ठक्क वाळवंट.
![]() |
आफ्रिका खंडातील 'इजिप्तचे' स्थान |
पुराव्यानिशी पाच हजार वर्षांचा सलग इतिहास उपलब्ध असलेला इजिप्त हा एकमेव सर्वात जुना देश आहे. साधारणपणे इ.स. पूर्व ३१५० च्या सुरवातीला इजिप्त मध्ये ईजिप्शियन संस्कृती उदयास आली. म्हणजे इ.स.पुर्वीची तीन हजार वर्षे अधिक इ.स. नंतरची म्हणजे आत्तापर्यंची दोन हजार वर्षे अशी तब्बल ५००० वर्षांच्या भूतकाळात हा इतिहास आपल्याला घेऊन जातो. त्याही प्राचीन काळात खोदकाम, बांधकाम, शेती, व्यापार वगैरे क्षेत्रात प्राविण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती. 'ओझयारीस' या मृत्यूच्या देवतेशिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्त मध्ये केली जात होती. देवांच्या पूजेसाठी पुरोहित नेमलेले असत. मृत्यू नतंर माणूस वेगळ्या लोकात जातो, तिथे त्याला चिरंतन आयुष्य लाभते, मृत्यू ही पुढील जीवनाच्या प्रवासाची सुरवात असते अशी त्याकाळी दृढ श्रद्धा होती. त्यामुळे त्याकाळी मृत्यूनंतर मृतदेहाबरोबर त्याच्या पुढील चिरंतन प्रवासासाठी आवश्यक वस्तू पुरण्याची प्रथा होती. अर्थात अशा प्रथा राजे, त्यांचे सरदार व त्यांच्या महत्वाचे नातेवाईक यांच्या बाबतीत केल्या जात. प्राचीन ईजिप्शियन सम्राटांना 'फेरो' (Pharaoh) म्हणत असत. या फेरोंना जनता देवासमान मानत असे. मग काय या फेरोंच्या मृत्यू नंतर मृतदेहाबरोबर दागदागिने, उंची मद्य, त्यांची नेहेमीची भांडीकुंडी, इतकेच काय पण जिवंत दासदासी देखील थडग्यात पुरले जात. थडग्यातील भिंतीवर या राजांची, त्यांच्या सत्कर्मांची माहिती त्या काळातल्या प्राचीन चित्रलिपी द्वारे लिहिली जात असे. विशिष्ठ वनस्पतीपासून तयार केलेल्या 'पपायरस' नावाच्या कागदावरदेखील अशाप्रकारची चित्रे काढून देखील लिखाण केले जाई.
अश्या ह्या अतिप्राचीन फेरोंच्या देशाला भेट देणे हे माझे फार दिवसांचे स्वप्न होते. माझ्या बकेट लिस्ट मधील रोम, पॉम्पे, काप्री, फ्लोरेन्स ही इटली मधील ऐतिहासिक ठिकाणे दोन वर्षांपूर्वी बघून, अनुभवून झाली होती. रोम, पॉम्पे या ठिकाणांना दोन अडीच हजार वर्षांचा इतिहास होता. इजिप्त संस्कृती त्याहूनही प्राचीन. तब्बल पाच हजार वर्षांचा थरारक, आश्चर्यकारक इतिहास ! सामानाची आवराआवर करताना इजिप्त बद्दलचेच विचार सुरू होते. कधी एकदा इजिप्त ला जाईन असं झालं होतं.
इजिप्त ची राजधानी - 'कैरो'
१३-११-२०१८ : बारा तारखेला संध्याकाळी सात वाजताच पुण्याहून मी आणि अलका टॅक्सीने मुंबई विमानतळावर निघालो. दोनतीन वर्षांपूर्वी इटली ला जाताना खंडाळा घाटात दरड कोसळून घाटात ट्राफिक जाम होण्याचा अनुभव पाठीशी होता, त्यामुळे थोडे लवकरच निघालो होतो. सुदैवाने वेळेवर म्हणजे रात्री आकरा वाजता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. इजिप्त ट्रिप चा आमचा अडोतीस जणांचा ग्रुप होता. विमानतळावर पोहोचताच वीणावर्ल्ड वाल्यांनी माणशी अंदाजे माणशी दोन किलो वजनाचे खाद्यपदार्थ असलेल्या पिशव्या प्रत्येकाच्या हातात ठेवल्या. हे खाद्यपदार्थ बॅगेत ठेवण्यासाठी सर्वांची एकच धांदल उडाली. आमचे सामान खूपच कमी असल्यामुळे आम्हाला फारशी अडचण आली नाही. पण काहीजणांची मात्र आधीच गच्च भरलेल्या बॅगांमध्ये हे जास्तीचे सामान भरताना तारांबळ झाली. 'आदित्य' नावाचा आमचा टूर मॅनेजर 'सर्वजण आलेत का? का कुणी राहिलंय? सर्वांना खाण्याचे पदार्थ मिळालेत का?' वगैरे च्या गडबडीत होता. सुटसुटीत सामानामुळे आम्ही निवांत होतो. उगाचच विमानतळावरील फोटो, सेल्फी काढत टाईमपास करत होतो.सुरक्षेचे सर्व सोपस्कार पूर्ण करत करत दोन वाजून पन्नास मिनिटांनी आमच्या इजिप्त एअरलाईन्स च्या विमानाने मुंबई वरून कैरो च्या दिशेने उड्डाण केले. आम्ही कैरो ला सकाळी साडेसहाला पोहोचलो. विमानतळावरच फ्रेश होऊन लगेचच आम्ही आमच्या बस मध्ये येऊन बसलो. सुरवातीला एका छानशा रेस्टोरंट मध्ये आमचा नाश्ता झाला. आमची कैरो ची सफर सुरु झाली. कैरोच्या रस्त्यावरून आमची बस धावू लागली. मधेच एके ठिकाणी इथली 'दिना' नावाची एक लोकल गाईड आम्हाला सामील झाली. ही 'दिना' खूप बडबडी होती. आता दिना आठ दिवस आमच्या बरोबर राहणार होती. बस मधील आम्ही सर्व सहप्रवाशांनी आपापल्या ओळखी करून घेतल्या. हसत खेळत, गप्पा मारत आम्ही बस मधून आजूबाजूचे कैरो शहर न्याहाळत होतो. 'दिना' गाईड आम्हाला कैरो शहराबद्दल माहीती सांगत होती. नाईल नदी ही जशी इजिप्त ची ओळख आहे, तसेच कैरो हे शहर देखील इजिप्तची एक महत्वाची ओळख बनले आहे. हे शहर इजिप्तच्या आर्थिक उलाढालीचं प्रमुख केंद्र आहे. कैरो शहराचा हा भाग श्रीमंती ल्यालेला दिसत होता. सुंदर वळणावळणाचे रस्ते, उत्तुंग इमारती. तर काही मध्यवर्ती जुन्या भागात गरीब वस्ती देखील आहे.
![]() |
'तहरीर चौक' |
तेव्हड्यात दिना ने आमचे लक्ष वेधून घेतले व ती म्हणाली " डाव्या बाजूचा जो मोठा चौक दिसतोय त्याला 'ताहिरीर चौक' म्हणतात. हा कैरो शहरातील फार मोठा आणि महत्वाचा चौक आहे. हा चौक २०११ मधील ईजिप्शियन क्रांतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या विरोधात इजिप्तच्या जनतेने मोठा उठाव केला होता, तेंव्हा याच चौकात लाखो लोक जमा झाले होते. त्यांनी उग्र निदर्शने केली होती. या उठावामुळे होस्नी मुबारक यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते." ताहारीर चौक प्रचंड मोठा चौक असून मध्यभागी वर्तुळाकार आयलंड आणि त्यात सुंदर हिरवळ आहे. भोवताली सहासात पदरी गोलाकार रस्ता आहे. कैरोचं बरंचसं सांस्कृतिक जीवन इथं एकवटलं आहे. या चौकाच्या जवळ अमेरिकन दूतावास आहे. पलीकडेच 'अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ कैरो' आहे. आजूबाजूला मोठी मोठी आंतरराष्ट्रीय हॉटेल्स आहेत. इथून जवळच कैरोचं जगप्रसिद्ध नॅशनल म्युझियम आहे. आता आम्ही तिकडेच चाललो होतो...
![]() |
ईजिप्शियन नॅशनल म्युझियम |
म्युझियम च्या आवारात आमची बस आल्यावर म्युझियम ची इमारत दृष्टीक्षेपात आली. ईजिप्शियन नॅशनल म्युझियम ची इमारत दोन मजली, पण प्रचंड विस्तार असलेली आहे. या संग्रहालयाच्या आजूबाजूला काही पुतळे दिसले, त्याबद्दल विचारल्यावर दिना म्हणाली "सुमारे शंभर वर्षांपूर्वी पुराणवस्तूप्रिय फ्रेंच संशोधकांनी हे संग्रहालय उभारलं. अशा निरपेक्ष संशोधकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी इथल्या सरकारनं त्यांचे संगमरवरी पुतळे इथल्या बागेत उभारलेले आहेत." पुरातन ईजिप्शियन चित्रलिपीचा अर्थ लावणाऱ्या 'शापोलियन' चा पुतळा सर्वांच्या मध्ये आहे. इथले अनेक स्थानिक गाईड्स व्यवसाय मिळवण्यासाठी पर्यटकांच्या मागेपुढे करत होते. प्रचंड गर्दी होती. ही इमारत संग्रहालय म्हणूनच बांधली गेलेली असल्यामुळे त्यात प्रचंड मोठी दालने होती. खरं तर तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा सांभाळायला हे भव्य संग्रहालय कमीच पडत होतं. आताच्या दसपट मोठी इमारत बांधली असती तरी देखील ती कमीच पडली असती इतक्या पुरातन वस्तूंचा इथे अक्षरशः खच पडला होता. त्यामुळे हे संग्रहालय पिरॅमिड असलेल्या गिझा पठाराजवळ च्या प्रशस्त जागेत न्यायचं इथल्या सरकारने ठरवलं आहे. मोठ्या इमारतीचा बांधकामही सुरु आहे. इथं येण्यापूर्वी बस मधून दिना ने आम्हाला ते दाखवलं होतं.
![]() |
शवपेटी (कॉफीन) |
सगळ्या इजिप्तमध्ये उत्खदनात सापडलेल्या सर्व महत्वाच्या प्राचीन वस्तू, पुतळे, दागिने, भांडीकुंडी, कपडे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याकाळच्या फेरोंच्या (राजांच्या) 'ममीज' इथे व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत. सर्व पर्यटकांचे आणि अर्थात मलाही आकर्षण असलेल्या ममीज साठी एक स्वतंत्र दालनच इथं आहे. पहिल्या मजल्यावर नुकत्याच म्हणजे १९२२ मध्ये सापडलेल्या 'तुतनकामुन' नावाच्या तरुण राजाच्या थडग्यातील अवशेष व अमाप खजिना मांडून ठेवला आहे. या दालनाच्या मध्यभागी तुतनकामून राजाचं सोन्याचा सिंहासन ठेवलं आहे. तिथंच जवळ एका काचेच्या पेटीत आकरा किलो वजनाचा, शुद्ध सोन्यात बनवलेला त्याचा विश्वविख्यात मुखवटा ठेवला आहे. हा मुखवटा तुतनकामूनच्या ममी च्या चेहेऱ्यावर ठेवलेल्या स्थितीत सापडला होता. हा मुखवटा बघण्यासाठी पर्यटक एकच गर्दी करत होते.
![]() |
तुतनखामुनचा विश्वविख्यात मुखवटा |
शेवटचं दालन होतं आजवर सापडलेल्या फेरोज च्या ममीजचं. इथं काचेत एकूण दहाबारा ममीज ठेवल्या होत्या. खोलीतलं वातावरण या प्रेतांमुळे काहीसं गूढ बनलं होतं. आम्ही पर्यटक देखील खालच्या गालिच्यावर पावलं न वाजवता अतिशय शांततेत ह्या ममीज पाहत होतो. वाळून जीर्ण झालेली शरीरं, काळी पडलेली कातडी अक्षरशः हाडांना चिकटल्यामुळे जणू हाडांचे सापळेच ठेवल्यासारखे दिसत होते. सर्वांच्या उघड्या तोंडातले दातही स्पष्ट दिसत होते. कुठलासा एक फेरो लढाईच्या ऐन रणधुमाळीत मरण पावला होता. त्याच्या चेहेऱ्यावर त्याकाळी झालेल्या जखमा, जखमी वेडेवाकडे हात स्पष्ट दिसत होते. इजिप्तचा सर्वात महान, सुप्रसिद्ध फेरो 'दुसरा रामसिस' ची ममी देखील इथं आहे. हा दुसरा रामसिस तब्बल ९२ वर्षे जगला होता. या वृद्ध रामसिस चं झडलेलं शरीर भयानक दिसत होतं. डोळ्यांच्या खाचा, वृद्धत्वामुळे पडलेल्या टकलाच्या बाजूने दिसणारे तुरळक केस.. त्याच्याकडं अक्षरशः बघवेना. पाच हजार वर्षांपूर्वी त्याच्या काळात तो केवढ्या वैभवात जगाला असेल? आता तो ममीच्या अवस्थेमध्ये अगतिक, केविलवाणा भासत होता. एव्हढी वर्षे ही प्रेतं कशी काय टिकली असतील? मृत्यू नंतरचा चिरंतन प्रवास त्यांनी खरंच अनुभवला असेल काय? ही प्रेतं टिकवून नेमकं काय साध्य झालं असेल? आता यानंतर पुढं काय होणार या प्रेतांचं? कदाचित अजून काही हजार वर्ष टिकतील ती, पुढं काय? मनात विचारांचा कल्लोळ दाटून आला होता. मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी या दालनातून आता लवकरात लवकर बाहेर पडणे एव्हडेच काय ते माझ्या हातात होते...
![]() |
दुसऱ्या रामसिसची ममी |
कैरो टॉवर :
कमीतकमी तीनचार दिवस निवांतपणे बघावे असे हे संग्रहालय आम्ही तीनचार तासातच बघून बाहेर पडलो. पुन्हा बसमध्ये बसून कैरो शहराची सैर करायला आम्ही सुरवात केली. कैरो शहराच्या मधून नाईल नदी अखंड वहात असते. नदीच्या काठावर दुतर्फा उंची उंच जवळपास पंचवीस तीस मजली उंच इमारती, हॉटेल्स होती. रहदारी मी म्हणत होती. शहराचे दोन्हीही किनारे जोडणारे अनेक लहान मोठे पूल नदीचे आणि शहराचे सौंदर्य वाढवत होते. नाईल नदीचे पाणी स्वच्छ वाटत होते आणि ते अखंड वाहत होते. हवेत मात्र प्रदूषण जाणवत होते. असं म्हणतात की कैरो शहर आफ्रिका खंडातलं सर्वात प्रदूषित आहे. नदीपासून जवळच एक उंच टॉवर आमचे लक्ष वेधून घेत होता. या कैरो टॉवर वरून कैरो शहराचा विहंगम नजारा दिसतो.![]() |
कैरो टॉवर |
कैरो मधील सर्वात उंच, एखाद्या मशिदीच्या मिनाराप्रमाणे रचना असलेला हा कैरो टॉवर जवळजवळ १८७ मीटर्स उंच आहे. वर जाण्यासाठी अर्थातच इथे तीन मोठ्या लिफ्ट्सची सोय आहे. या टॉवर च्या वर एक फिरते उपहारगृह देखील आहे. आम्ही वर जाऊन कैरो शहराचे दर्शन घेतले. गजबजलेला कैरो शहर, त्यामधून दुथडी भरून वाहणारी नाईल नदी, नदीवरचे आकर्षक पूल, नदीतून प्रवास करणारी बोटी बघताना जीव हरकून जातो. डोळ्याचं अगदी पारणं फिटतं.
![]() |
टॉवर वरून दिसणारं कैरो शहर |
काल संध्याकाळ पासून पुण्याहून सुरु केलेला प्रवास, लगेचच कैरो म्युझियम, कैरो टॉवर, कैरो शहर बघता बघता चोवीस तास उलटून गेले होते. शरीर थकलेले होते. गिझा पिरॅमिड्स च्या जवळच असलेल्या 'कैरो पिरॅमिड्स हॉटेल मध्ये आमचा मुक्काम होता. रात्रीचं जेवण करून हॉटेल मधील आमच्या खोलीमध्ये आम्ही विसावलो. उद्या अलेक्झांड्रिया शहराला भेट द्यायची होती. थकलेल्या डोळ्यात झोप कधी उतरली ते आम्हाला कळलेच नाही.
ऐतिहासिक आणि रम्य ‘अलेक्झांड्रिया’
१४-११ २०१८. : पहाटे पाच वाजता वेक अप कॉल खणखणला. छान झोप झाल्यामुळे प्रसन्न वाटत होतं. आवराआवरी करून हॉटेल च्या डायनिंग हॉल मध्ये आम्ही नाश्त्यासाठी आलो. युरोपियन पद्धतीचा भरपूर नाश्ता करून आठ वाजता आम्ही कैरो शहर सोडले. अलेक्झांड्रिया शहराकडे आमची बस धावू लागली. अंदाजे तीन तासांचा प्रवास होता. वाटेत एक टॉयलेट ब्रेक होता. जसे जसे अलेक्झांड्रिया शहर जवळ येत होते तसतसे ट्राफिक वाढू लागला. मधेच पाऊस आला. मी काळजीत पडलो पावसामुळे घोळ होतो कि काय? पण सुदैवाने पावसाने कृपा केली. शहरात प्रवेश करता करता पाऊस थांबला. प्रवास दरम्यान आमच्या दिना गाईड ने अलेक्झांड्रिया बद्दल बरीचशी माहिती सांगितली होतीच.![]() |
भूमध्य सागर |
कैरो खालोखाल अलेक्झांड्रिया हे इजिप्त मधील महत्वाचं शहर, मात्र बऱ्याच बाबतीत वेगळं. कैरोचं हवामान उष्ण, वाळवंटी तर अलेक्झांड्रिया थंड हवामानाचं. थंड हवामानामुळं युरोपियनांचं आणि एकूणच पर्यटकांचं आवडतं ठिकाण. अलेक्झांड्रिया अतिशय रम्य असून भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. इथं नाईल नदी सागराला मिळते. समुद्राला मिळताना नदीला अनेक फाटे फुटतात, आणि या फाट्यांच्या मधील जमीन नदीने आणलेल्या गाळामुळे खूप सुपीक बनलेली आहे. इतिहासाची फार मोठी पार्श्वभूमी या शहराला लाभलेली आहे. एके काळी अलेक्झांड्रिया ही इजिप्त ची राजधानी होती. इ.स. पूर्वी ३३१ मध्ये अलेक्झांडर या महान ग्रीक योध्याने स्वारी करून इजिप्त चा पराभव केला, आणि आपलं राज्य प्रस्थापित केलं. अलेक्झांड्रिया हे शहर वसवून त्याने आपल्या राज्याची राजधानी केली. पुढे रोमन सत्ताधीशांचे आक्रमण होईपर्यंत म्हणजे अंदाजे सहाशे वर्षं इजिप्त मध्ये ग्रीकांचे साम्राज्य होते आणि राजधानी होती अलेक्झांड्रिया. या काळात युरोप आणि आशिया मधलं हे शहर अतिमहत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जाई.
पॉम्पे पिलर आणि रोमन थिएटर :
आमची बस सुरवातीला अलेक्झांड्रिया मधील काहीश्या जुन्या भागातून जात होती. रस्ते निमुळते, जुनाट दोन तीन मजली घरे, रस्त्याच्या दुतर्फा छोटी छोटी दुकाने, रसवंती गृहे वगैरे. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्यावर चिखलाचा राडा होता. चहाच्या दुकानांच्या बाहेर हुक्का ओढत बसलेली रिकामटेकडी माणसेही दिसत होती.
![]() |
'पॉम्पे पिलर |
पुढे 'पॉम्पे पिलर' या ठिकाणी आमची बस थांबली. दिनाच्या भोवती आम्ही सर्व ग्रुपची मंडळी उभे राहून दिना ने सांगितलेली माहिती ऐकू लागलो. रोमन कालखंडातील काही अवशेषांपैकी रोमन पिलर अतिशय प्रेक्षणीय आहे. ग्रीकांच्या नंतर रोमन राज्यकर्त्यांची इथे सत्ता प्रस्थापित झाली. रोमन काळातदेखील अलेक्झांड्रिया ही इजिप्तची राजधानी होती. सुप्रसिद्ध राणी क्लिओपात्रा इथंच होऊन गेली. तिचं सौंदर्य, चातुर्य, राजकारण, तिची प्रेमप्रकरणे यासाठी ती प्रसिद्ध होती. रोमन पिलर किंवा स्तंभ इथल्या एका टेकडीवर उभा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दोन स्पिंक्सच्या प्रतिकृती आहेत. या स्तंभाची उंची ३० मीटर्स एव्हडी आहे. त्याकाळी संपूर्णपणे संगमरवरी दगडात बांधलेल्या रोमन देवळाचा हा राहिलेला एक खांब आहे. त्यावरून या प्राचीन देवळाची भव्यता लक्षात येते. या स्तंभाच्या आजूबाजूला या प्राचीन देवळाचे अवशेष दिसतात. पर्यटकांना या देवळाच्या तळघराच्या काही भाग पाहता येतो. आम्हाला इथल्या तळघरात काळ्या दगडात कोरलेला एक बैल पाहायला मिळाला. त्या काळात सर्वगुणसंपन्न असलेल्या बैलाला देव मानून त्याची पूजा केली जात असे. आपल्या हिंदू धर्मातील ‘नंदी’ ची संकल्पना देखील या बैलाशी मिळतीजुळती आहे नाही का? तासभर हे ठिकाण बघून आम्ही पुढे निघालो.
![]() |
'कॅटॅकुम्स |
त्यानंतर 'कॅटॅकुम्स' हे ठिकाण बघण्यासाठी गेलो. इथं जमिनीखाली जवळजवळ तीनचार मजले खोल काही इमारती आहेत. इथं प्रेतांचं ममीफिकेशन करून ममीज ना पुरण्यात येई. गोलाकार अरुंद, अंधाऱ्या जिन्याने खाली खोल जाण्याचा मार्ग होता. खाली जाताना अक्षरशः भीती वाटत होती. हे कॅटॅकुम्स दगडात कोरून निर्माण केलेले आहेत. जमिनीवरून पाहताना इतक्या खोल काहीतरी असेल अशी पुसटशी देखील कल्पना आपल्याला येत नाही.
![]() |
'रोमन थिएटर' |
अलेक्झांड्रिया मधील प्राचीन 'रोमन थिएटर' देखील बघण्यासारखे आहे. रोमन सत्ताधीशांनी बांधलेलं हे अँफिथिएटर अगदी अलीकडे म्हणजे १९६४ साली सापडलं. या ठिकाणी काही बांधकामासाठी खोदाई करताना हे अचानक सापडलं. संपूर्ण संगमरवरात बांधलेला हे प्राचीन अँफिथिएटर उत्तम स्थितीत आहे. त्याच्या शेजारी रोमन व्हीला, स्नानगृहे यांचे देखील अवशेष सुस्थितीत दिसतात. इथे मात्र आम्हाला थोडा वेळ दिला गेल्यामुळे आमच्या सहप्रवाशांनी फोटो, सेल्फ्या काढण्याची संधी साधली.
जगप्रसिद्ध प्राचीन ग्रंथालय :
![]() |
सुप्रसिद्ध प्राचीन ग्रंथालय |
अलेक्झांड्रियातील ऐतिहासिक स्थळे बसमधून बघत जात असताना दिना ने आमचे लक्ष एका वैषिठ्यपुर्ण इमारतीकडे वेधून घेतलं. ती म्हणाली "हेच ते अलेक्झांड्रियातलं सुप्रसिद्ध ग्रंथालय." मी या ग्रंथालयाबद्दल मी पूर्वी कुठंतरी वाचलेलं होतं. या ग्रंथालयाला प्राची इतिहासाची पार्श्वभूमी आहे. राजकीय आणि व्यापारी भरभराटी बरोबरच अलेक्झांड्रियाची सांस्कृतिक वाढही प्राचीन काळात झाली होती. त्याकाळी इथल्या ह्या ग्रंथालयाची कीर्ती जगभर पसरली होती. दोन हजार वर्षांपूर्वी या ग्रंथालयात पाच हजार ग्रंथ होते. देशोदेशीचे विविध विषयावरील ग्रंथ इथे असत. इथे ग्रंथवाचन करून देशोदेशीचे तज्ज्ञ त्यावर चर्चा, विवेचनं करीत. पण दुर्दैवानं त्याला आग लागून ते भस्मसात झालं. त्यानंतर पुन्हा त्याची उभारणी करण्यात आली. पण या ग्रंथालयाचे दुर्दैव अजून संपलेले नव्हते. मुसलमान राजवटीत राज्यकर्त्यांनी या ग्रंथालयाची राखरांगोळी केली.
जागतिक महत्वाचे असलेल्या व प्राचीन परंपरा असलेल्या या ग्रंथालयाचे महत्व इजिप्त सरकारने ओळखून आता पुन्हा हे ग्रंथालय मोठ्या दिमाखात उभे केले आहे. या ग्रंथालयाची इमारत देखील वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधलेली आहे. एकाच छताखाली लाखोंची ग्रंथसंपदा असलेलं जगातलं हे एकमेव ग्रंथालय आहे. सध्या एकूण तीन ते चार लाख पुस्तकांचा संग्रह इथं असून अजून साथ सत्तर लाख पुस्तकं इथं ठेवण्याची तरतूद कऱण्यात आलेली आहे. शिवाय इथं बसून विविध विषयावरील चित्रफिती, ध्वनिफिती बघता व ऐकता येतात. सन २००२ मध्ये इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या हस्ते या ग्रंथालयाचा भव्य ऐतिहासिक सोहळ्यात पुन्हा शुभारंभ करण्यात आला. "मात्र वेळेअभावी हे ग्रंथालय आपल्याला आतून बघता येणार नाही" दिनाच्या या शेवटच्या वाक्याने आम्ही भानावर आलो आणि निराश झालो. पण काही का असेना हे ग्रंथालय बाहेरून का होईना किमान डोळे भरून बघता आले या समाधानात आम्ही पुढे निघालो.
आता संध्याकाळ झाली होती. आमच्या मुक्कामाकडे म्हणजे 'हॉटेल शेरेटन' कडे आमची बस निघाली. डावीकडे अथांग भूमध्य सागर आणि उजवीकडे उंच इमारती अशा पार्श्वभूमीवरील मोठ्या चारसहा पदरी रस्त्यावरून जात होतो. समोर कितीतरी लांबवर पसरलेला अर्धचंद्राकृती सागरकिनारा दिसत होता. आमचं हॉटेल या चंद्रकोरीच्या पूर्वेकडील समोरच्या टोकाला होतं. पाठीमागून संध्याकाळची तिरपी सोनेरी किरणं आसमंतात पसरली होती. रस्त्यावरची प्रचंड रहदारी आमच्या पथ्यावरच पडली होती. शहराचे मनोहारी दर्शन घडत होते. मुंबईच्या क्वीन्स नेकलेस, किंवा मरिनड्राइव्ह प्रमाणे दिसणाऱ्या समुद्रकिनाऱ्याच्या पश्चिमेला दूरवर एक किल्ला संध्याकाळच्या उन्हात चमकत होता. दिनाला त्याबद्दल विचारले असता तिने सांगितले की तो किल्ला आम्ही उद्या सकाळी बघणार आहोत. ![]() |
सुप्रसिद्ध प्राचीन ग्रंथालय |
जागतिक महत्वाचे असलेल्या व प्राचीन परंपरा असलेल्या या ग्रंथालयाचे महत्व इजिप्त सरकारने ओळखून आता पुन्हा हे ग्रंथालय मोठ्या दिमाखात उभे केले आहे. या ग्रंथालयाची इमारत देखील वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधलेली आहे. एकाच छताखाली लाखोंची ग्रंथसंपदा असलेलं जगातलं हे एकमेव ग्रंथालय आहे. सध्या एकूण तीन ते चार लाख पुस्तकांचा संग्रह इथं असून अजून साथ सत्तर लाख पुस्तकं इथं ठेवण्याची तरतूद कऱण्यात आलेली आहे. शिवाय इथं बसून विविध विषयावरील चित्रफिती, ध्वनिफिती बघता व ऐकता येतात. सन २००२ मध्ये इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या हस्ते या ग्रंथालयाचा भव्य ऐतिहासिक सोहळ्यात पुन्हा शुभारंभ करण्यात आला. "मात्र वेळेअभावी हे ग्रंथालय आपल्याला आतून बघता येणार नाही" दिनाच्या या शेवटच्या वाक्याने आम्ही भानावर आलो आणि निराश झालो. पण काही का असेना हे ग्रंथालय बाहेरून का होईना किमान डोळे भरून बघता आले या समाधानात आम्ही पुढे निघालो.
दिवसभराच्या प्रवासाने, ऐतिहासिक स्थळदर्शनाने शाररिक थकवा आला होता. संध्याकाळी सात च्या सुमारास आम्ही समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या हॉटेल शेरेटन मध्ये प्रवेश करते झालो. आमची रूम हॉटेलच्या सातव्या मजल्यावर आणि समुद्राच्या समोर होती. संध्याकाळचे थंडगार समुद्री वारे खिडक्यांच्या तावदानावर आदळत होते. समुद्रकिनाऱ्यावरची उपाहारगृहे लाखो दिव्यांनी उजळून निघाली होती. सातव्या मजल्यावरील बाल्कनीत बसून, तो चंद्राकृती सागरकिनारा निवांतपणे न्याहाळताना मला माझ्या आवडत्या बियर ची आठवण होणे स्वाभाविकच. मग काय बियर मागवली. समुद्रावरील खारे वारे अंगावर घेत थंड बियरची लज्जत काही औरच होती. भरपेट जेवणानंतर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत मी निद्रेच्या कधी अधीन झालो ते कळलेच नाही...
सात आश्चर्यापैकी एक : 'गिझा पिरॅमिड्स'.
![]() |
हॉटेल शेरेटन |
पुन्हा समुद्रकिनाऱ्याच्या कडेने चंद्रकोरीच्या पश्चिम टोकावरील पांढुरक्या रंगाच्या किल्ल्या कडे जात राहिलो. आता उजव्या बाजूला समुद्र आणि डाव्या बाजूला इमारती दिसत होत्या. कालच्या संध्याकाळच्या काळोखात न लक्षात आलेली एक गोष्ट जाणवली ती म्हणजे अलेक्झांड्रियातील बऱ्याच इमारती गिलावा किंवा प्लास्टर न केलेल्या दिसत होत्या. बहुसंख्य इमारतींना रंगही दिलेला नव्हता. काही इमारतींच्या कोपऱ्याचा काही भाग पडलेला दिसत होता. त्यामुळे रम्य समुद्रकिनारा लाभलेलं हे शहर विद्रुप दिसत होतं. आमच्यातल्या एका सहप्रवाशाने त्याचं कारण विचारलं असता दिना म्हणाली "बांधकाम चालू असताना इथे महानगरपालिकेचा टॅक्स नसतो. पण इमारत पूर्ण होताच पूर्णत्वाचा दाखला घेताक्षणी खूप जबर टॅक्स सुरु होतो. त्यामुळे टॅक्स वाचवण्यासाठी इमारत अपूर्णावस्थेतच दाखवून इथले नागरिक टॅक्स वाचवतात. त्यामुळे संपूर्ण शहर जणू एखादा बॉम्ब पडून उध्वस्थ झाल्यासारखे भासते. टॅक्स वसूल करून महसूल वाढवण्याच्या नादात महापालिका आणि टॅक्स वाचवण्याच्या नादात नागरिक, दोघांच्याही हे लक्षात येत नाही की आपलं शहर विद्रुप दिसतंय? बाकी काहीही असो आम्हाला ते विद्रुप दिसत होतं. कैरो मध्ये ही अशा विद्रुप इमारती दिसतात.
![]() |
किल्ला |
हळूहळू बदामी रंगाचा पांढुरका दिसणारा किल्ला जसजसा जवळ येत होता, तसतसे त्याची भव्यता जाणवू लागली. जवळजवळ सातशे वर्षांपूर्वी बांधलेला हा किल्ला आत्ता नुकताच बांधल्यासारखा नवीन वाटत होता. या किल्ल्याच्या जागी पूर्वी म्हणजे तेवीसशे वर्षांपूर्वी इथं एक उंच आणि भव्य दीपगृह उभं होतं. त्याच्या शिखरावर रात्री तेलाचे दिवे लावले जायचे. या दिव्यांच्या बाजूने ब्राँझचे चमकदार आरसे लावले जायचे. त्यामुळे हे तेलाचे दिवे चमकून दिव्याचा प्रकाश दूरवर पसरायचा. या प्रकाशाचा उपयोग समुद्रातील जहाजे, खलाशी याना व्हायचा. चौकोनी जोत्यावर अष्टकोनी आकाराचा आणि सर्वात वर घुमट असा आणि काहीसा मशिदीच्या मिनारा सारख्या आकाराचा हा दीपस्तंभ होता. वारे, वादळं, लाटांशी झुंजजत हे दीपगृह तब्बल सतराशे वर्ष उभं होता. पुढे १३०३ मध्ये झालेल्या एका मोठ्या भूकंपात ते जमीनदोस्त झालं. मग याच जागेवर या दीपस्तंभाचेच दगड वापरून हा भव्य किल्ला उभा राहिला. दिना म्हणाली "वेळेअभावी आपल्याला हा किल्ला आतून बघता येणार नाही" आता दिनाच्या ह्या वाक्याची आम्हाला सवय होऊ लागली होती. मग फोटो, सेल्फी वगैरे उरकून आम्ही कैरोच्या दिशेने मार्गस्थ झालो.
'गिझा पिरॅमिड्स'
![]() |
खुफू' पिरॅमिड |
सुरवातीलाच नजरेस पडले ते 'खुफू' राजाचे थडगे म्हणजेच पिरॅमिड. या खुफू राजाच्या मुलाचे म्हणजे 'खाफ्र' राजाचा पिरॅमिड त्याच्या पुढेच उभा आहे. थोडेसं पुढे खुफू चा नातू, खाफ्रच्या मुलाचे आकाराने या दोघांच्या पिरॅमिडपेक्षा छोटे पिरॅमिड डोळ्यात भरते. त्यातली खुफू आणि खाफ्र ची पिरॅमिड्स इतकी भव्य आहेत की ती डोळ्यात मावत नाहीत. सुरवातीला वाळू तुडवत खुफू पिरॅमिड जवळ जाताच मान वर करून बघताना टोपीच पडावी इतका तो उंच. एकावर एक अति प्रचंड दगडं रचलेल्या बांधकामाचा तो त्रिकोणी आविष्कार बघून मन थक्क होतं. त्रिकोणाचं वरचं टोक आकाशात घुसलेलं. चौकोनी चबुतऱ्यावर त्रिकोणी आकारात वर वर रचलेले घडीव चौकोनी अजस्त्र दगड नुसते एकावर एक ठेवलेले आहेत. याच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचा चुना, सिमेंट असं काहीही भरलेलं नाही. प्रत्येक दगड चौकोनी आकाराचा, पण सामुदायिक बांधकामाची रचना मात्र त्रिकोणी आकाराची. सर्व बाजूंनी चिरेबंद वास्तू. खुफू(आजोबा), खाफ्र(वडील), आणि मेनकावरे(नातू) या तिघा फेरो राजांनी उभी केलेली ही स्वतःची स्मारकं गेली साडेचार हजार वर्षे इथं आश्चर्यकारक रित्या टिकून आहेत.
दिना गाईड आम्हाला सांगत होती.. "हे पिरॅमिड्स जेंव्हा बांधले तेंव्हा संपूर्ण पिरॅमिडवर 'तुरा' नावाच्या स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या शुभ्र, नितळ पॉलिश केलेल्या दगडाचं चार फूट जाडीचं आवरण होतं. साडेचार हजार वर्षात ते आवरण नष्टं होऊन आतले अजस्त्र चौकोनी दगड दिसू लागले. या तुरा दगडाचं आवरण आजही खाफ्र च्या पिरॅमिडच्या टोकाशी शिल्लक राहिलेलं दिसतं. पूर्वी पिरॅमिड्स च्या वर टोकाशी सोन्याचांदीच्या मिश्र धातूची त्रिकोणी टोपी बसवलेली होती. 'त्या काळी ही पिरॅमिड्स कशी दिसत असतील? लख्ख सूर्यप्रकाशात तुरा दगडाच्या आवरणात पिरॅमिड्स पूर्वी किती चमकत असतील? रात्रीच्या चंद्रप्रकाशात ते किती लखलखत असतील?' असे विचार सर्वांच्याच मनात आले असणार.
दोन ते पंधरा टन एव्हड्या वजनाचे तासून आकार दिलेले तब्बल पंचवीस लाख दगड एकट्या खुफूच्या पिरॅमिड साठी वापरलेले आहेत. इतके वजनदार आणि प्रचंड संख्येने असणारे हे अजस्त्र दगड कुठून आणले असतील? कसे आणले असतील? इतक्या उंचीवर कसे नेऊन बसवले असतील? माझी बुद्धी अक्षरशः चालत नव्हती. असे मोठे दगड गिझा च्या पठारावर कुठेही मिळत नाहीत. 'शेकडो मैल लांब असण्याऱ्या खाणीतून हे प्रचंड दगड शेजारीच असलेल्या नाईल नदीतून, त्यासाठी बनवलेल्या कालव्यातील पाण्यातून गिझा पर्यंत आणले गेले' असं संशोधक म्हणतात. प्राण्यांच्या कातड्याच्या प्रचंड मोठ्या पिशव्या हवेने भरून, त्या या दगडांना बांधल्यामुळे हे दगड तरंगायचे. हे तरंगणारे दगड वाहून न्यायला सोपे जात असत. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून हे दगड उंचावर देखील नेऊन ही बांधकामं केली असावीत. नंतर आत फेरोंची प्रेतं ठेऊन हे पिरॅमिड्स सीलबंद (हवाबंद) करण्यात आले. हवाबंद केल्यामुळं यात ठेवलेली प्रेतं हजारो वर्षं टिकली.
हे पिरॅमिड्स अंतराळातून आलेल्या ‘एलियन्स’ नी बांधली असावीत असाही एक समज आहे. 'रात्री दिसणाऱ्या तारे, नक्षत्रांशी पिरॅमिड्स चा संबंध आहे, मृग नक्षत्राच्या मध्यातले तीन प्रकाशमान तारे म्हणजे हे तीन पिरॅमिड्स, मृग नक्षत्राच्या शेजारी असणारी आकाशगंगा म्हणजे नाईल नदी' असेही बरेच समज पूर्वापार चालत आलेले आहेत. पुढे काळाच्या ओघात पिरॅमिड मधील अमोल संपत्तीच्या आशेने चोर दरोडेखोरांनी पिरॅमिड्स फोडले. आत जाण्यासाठी भगदाडे पाडली गेली. पिरॅमिड्वर बसवलेली सोन्याचांदीची मौल्यवान टोपी पळवली गेली. पिरॅमिड वरचे तुरा चे चकचकीत दगड कैरोतल्या कित्येक मशिदी, इमारतीसाठी वापरले गेले. जणू काही सुंदर, घडीव दगडांची आयती खाणच पिरॅमिडच्या रूपाने लोकांना सापडली. पिरॅमिड्स वर परिणाम झाला तो काळाचा नाही तर लोकांच्या करंटेपणाचा !
'खाफ्र' पिरॅमिड |
खुफूचं पिरॅमिड डोळेभरून पाहून आम्ही वळलो शेजारीच असलेल्या 'खाफ्र' च्या पिरॅमिडकडे. या पिरॅमिडच्या आत भुयारात जाऊन आलो. आत जायला वेगळे तिकीट काढावे लागते. एका छोट्या बोगद्यासारख्या अरुंद, अंधाऱ्या भुयारात ओबडधोबड रस्त्यावरून आम्ही जाऊ लागलो. अंधार असला तरी इथं दिव्यांची व्यवस्था आहे. ही वाट इतकी अरुंद आणि उंचीला कमी आहे की कमरेत अक्षरशः नौव्वद अंशाचा कोन करूनच वाकून चालावे लागते. काहीशी भीती वाटत होती. काही वयस्क व्यक्ती किंवा घाबरट पर्यटक मधेच मागे फिरत होते. खूप वाकून चालावे लागत असल्याने कंबर आणि मांड्यांवर ताण येऊन त्या दुखू लागल्या. दहा मिनाइटांच्या चालण्यास हा उताराचा रास्ता एका छोट्या बंदिस्त दगडी खोलीत संपला. अंदाजे १५X २० फूटाच्या या खोलीत ग्रॅनाईट च्या दगडाची एक शवपेटी ठेवली होती. खोलीतले तापमान थंड होते. कसलाही आवाज नव्हता, केवळ पर्यटकांची होत असलेली हालचाल, श्वासांचे आवाज... मला तर कधी एकदा बाहेर येतो असे झाले होते.
![]() |
'खाफ्र' पिरॅमिडच्या आत जाण्याचा मार्ग |
बाहेर येताच मोकळा श्वास घेतला. आम्हाला आता थोडा मोकळा वेळ होता. या खाफ्र पिरॅमिड च्या पलीकडे आकाराने लहान तिसरा मेनकावरे याचा पिरॅमिड होता. आजूबाजूला आणखीन काही छोटे पिरॅमिड्स होते. ऊन रणरणत होतं. या गिझा पठारावर तळपत्या उन्हात देखील अनेक पर्यटक काही पायी, काही उंटावरून भटकत होते. पलीकडे दूरवर कैरो शहर पसरलेलं दिसत होतं. इथं घोड्यागाड्या देखील पर्यटकांना सैर करावीत होत्या. इथल्या परिसरात छोटे पिरॅमिड्स, थडगी, नाईल नदीमधून त्याकाळी बांधकामासाठी लागणारे दगड वाहून आणण्यासाठी बांधलेले कालवे, छोटी बंदरं, अनेक छोटी पुरातन देवळे यांचे भग्नावशेष दिसत होते. एका बाजूच्या टोकाला काही अंतरावर पाठमोरा 'स्फिन्क्स' चा पुतळा दिसत होता.
अद्भुत 'स्फिन्क्स'
या परिसरातील आणखी एका महत्वाच्या जगप्रसिद्ध शिल्पाला भेट देण्यासाठी आमचा ग्रुप निघाला. इजिप्तचे प्रतीक बनलेला आणि सर्वात प्रसिद्ध असलेला स्फिन्क्स ची महाप्रचंड शिल्पाकृती बघण्याची आम्हा सर्वांनाच उत्सुकता होती. स्फिन्क्स च्या समोर उभे राहिल्यावर त्याची भव्यता आपल्याला लक्षात येते. या स्फिन्क्स चं शरीर बसलेल्या सिंहासारखं, तर तोंड मात्र मानवी होतं. हे शिल्प नेमकं कुणी बांधलं, कधी बांधलं हे माहिती नसल्यानं ते काहीसं गूढ वाटतं. हे शील्प स्त्रीचं आहे का पुरुषाचं आहे या बद्दलही माहिती नसल्यानं स्फिन्क्स विषयी अनेक अंद्धश्रद्धा, दंतकथा आहेत. हा पुतळा सव्वादोनशे फूट लांब, सत्तर फूट रुंद, आणि साठ फूट उंच आहे. या शिल्पाच्या चारीही बाजूंनी चर खणला आहे. वाळू मध्ये गळ्यापर्यंत पुरलेल्या अवस्थेत स्फिन्क्सला इ. स. पूर्वी चौदाव्या शतकात बाहेर काढल्याची नोंद प्राचीन शिलालेखात आढळते.![]() |
स्फिन्क्स |
स्फिन्क्स ची नजर पूर्वेला दूरवर रोखलेली आहे. हा स्फिन्क्स दिमाखदार पद्धतीने एका मोठ्या खडकावर विराजमान झाला आहे. डोक्याला पंचकोनी शिरोभूषण, पण नाकाचा शेंडा कोणीतरी तोडल्यासारखा नष्ट झालेला. असं म्हणतात की नेपोलियननं इजिप्त वरील विजय साजरा करण्यासाठी, इजिप्तचे नाक कापल्याचं प्रतीक म्हणून या स्फिन्क्स चं नाक नष्ट केलं होतं. मला मात्र हे काही पटलं नाही. असो... पण अशा भग्न अवस्थेत देखील स्फिन्क्स चा रुबाब, देखणेपणा आजिबात कमी झालेला नाही. त्याच्या स्थिर, रोखलेल्या डोळ्यात हजारो वर्षांचा इतिहास साठला आहे. खाफ्र पिरॅमिडच्या सरळ रेषेत पूर्वेला बसलेला स्फिन्क्स जणू गिझाच्या दफनभूमीचा राखणदार म्हणूनच बसला आहे असं वाटतं. भव्य स्फिन्क्सला मी माझ्या छोट्या डोळ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करीत कितीतरी वेळ बसलो होतो.
दुरून विणा वर्ल्ड चा आदित्य आम्हाला सारखा हाका मारीत होता. नाईलाजानेच आम्ही बसकडे परत वळलो. आज रात्री याच ठिकाणी लाईट साउंड शो बघायला आम्हाला यायचं होतं. तोपर्यंत शॉपिंग करण्यासाठी आम्हाला मोकळीक होती. मग आदित्य ने आम्हाला कैरो मधील उंची अत्तरे, कपडे यांची चांगली दुकाने दाखवली काही सहप्रवाशांनी कपडे तर काहींनी अत्तरे घेतली. प्राचीन इजिप्त मध्ये त्याकाळी पपायरस नावाच्या झाडाच्या साली पासून तयार केलेल्या कागदावर चित्रलिपीत लिखाण केले जाई. पाच हजार वर्षांपूर्वी कागद तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. एका दुकानात अशा प्रकारे वनस्पतीपासून कागद बनवण्याचे प्रात्यक्षिक आम्हाला दाखवण्यात आले. मग अशा कागदावर काढलेल्या चित्रांची खरेदी आमच्यापैकी काही जणांनी केली.
![]() |
लाईट अँड साउंड शो |
रात्री साडेसात वाजता लाईट अँड साउंड शो साठी पुन्हा गिझा पठारावरील स्फिन्क्स च्या पुतळ्या समोर मांडून ठेवलेल्या खुर्च्यांवर येऊन बसलो. थंडी पडली होती. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरु झाला. काळ्याकुट्ट अंधाऱ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर समोर स्फिन्क्स चा भव्य पुतळा, पाठीमागे पिरॅमिड्स अशी हजारो वर्षांची प्राचीन शिल्पे जणू जिवंत होण्याची वाटच बघत होती. अचानक हि शिल्पे बोलू लागली. प्रकाशमान होऊ लागली, जणू पुन्हा जिवंत झाली. धीरगंभीर आवाजात स्फिन्क्स बोलू लागला, आमच्याशी संवाद साधू लागला. इजिप्तवरील आक्रमणांचा इतिहास, त्या काळातले महत्वाचे कर्तृत्ववान 'तुतनखामुन', 'दुसरा रामसिस' यांसारख्या राजांची माहिती नाट्यमयरित्या पुढे सरकत होती. प्रकाशाचा खेळ, आणि आवाजाच्या जादूने गिझा पठारावरील जमलेले आम्ही प्रेक्षक हजारो वर्षे मागे गेलो, इतिहासात गेलो. पिरॅमिड्स प्रकाशात उजळत होते, मावळत होते. नाना रंगात अक्षरशः निथळत होते. हा अनुभव खूपच भारावून टाकणारा होता. सुमारे तासाभराच्या या जादुई खेळात आम्ही रंगून गेलो.
रात्रीचा मुक्काम कैरो मधील आमच्या नेहेमीच्या 'कैरो पिरॅमिड हॉटेल' मधेच होता. रात्रीचं जेवण घेऊन आमच्या खोलीतल्या गादीवर अंग टाकलं, पण आज झोप लवकर येईना. पिरॅमिड चं बांधकाम कसं केलं असेल? पंधरा टनी अजस्त्र दगडाचे चिरे वर कसे चढवले असतील? स्फिन्क्स नेमका कुणी निर्माण केला असेल? याच विचारात रात्री कधीतरी डोळा लागला. उद्या अबू सिम्बेल येथील दुसऱ्या रामसिस च्या मंदिराला भेट द्यायची होती. अबू सिम्बेलला जाणारी आमची फ्लाईट पहाटे पाचला होती. त्यामुळे उद्या पहाटे तीनला उठायचे होते.
'आस्वान' व्हाया 'अबू सिम्बेल'..
![]() |
विमानातून दिसलेला सूर्योदय |
सकाळी साडेसात आठ वाजता आम्ही अबू सिम्बेल विमानतळावर उतरलो. इथून अबू सिम्बेलचं देऊळ थोडं लांब आहे. देवळाकडे जाण्यासाठी आलेलया बसमधून आम्ही निघालो. देवळाकडे जाणारा रास्ता अतिशय सुंदर होता खरा, पण आजूबाजूला वस्तीचं नामोनिशाण नाही. अबू सिम्बेल नावाचं एक गाव इथून थोडं दूर आहे. प्रत्यक्ष देवळापाशी आल्यावर आम्ही पायउतार झालो. समोर डावीकडे एक अर्धगोलाकार रखरखीत टेकडी आणि उजव्या हाताला आस्वान धरणाचं बॅक वॉटर किंवा साठलेलं पाणी, ज्याचं नाव 'नासर लेक' किंवा सरोवर. डावीकडच्या अर्धगोलाकार टेकडीला वळसा घालून टेकडीच्या पुढच्या म्हणजे पूर्वेच्या बाजूला गेलो तर अति प्रचंड अबू सिम्बेलचं देऊळ दृष्टीक्षेपात आलं.
![]() |
'अबू सिम्बेल'चं देऊळ |
या देवळाच्या समोर नासर सरोवराचा अथांग जलाशय. टेकडीच्या अर्धगोलातलया बाजूला असलेल्या या देवळाच्या प्रवेशद्वारातच चार महाकाय बसलेल्या स्थितीतले पुतळे दिसतात. या देवळाच्या पलीकडेच काटकोनात वाळलेल्या डोंगराच्या पोटात 'नेफरटारी' या रामसिस राजाच्या राणीचं तुलनेनं थोडं लहान देऊळ दिसलं. नासर तलाव आणि हे दोन्ही देवळं यामध्ये विस्तीर्ण पटांगण... आमची गाईड दिना आमच्या बरोबर होतीच. तिने सर्वांना एकत्र करून या देवळाबद्दलची माहिती सांगायला सुरवात केली. देवळाच्या आत कोणत्याही गाईड ला येण्याची परवानगी नसते, त्यामुळे सर्व ठिकाणी गाईड्स सर्व ठिकाणांच्या बाहेरच माहिती देतात. दिना सांगत होती...
![]() |
दुसरा रामसिस |
इ.स. पूर्व १२७५ मध्ये इजिप्तच्या दक्षिण भागात, नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर दुसऱ्या रामसिस राजानं हे देऊळ बांधलं. दुसऱ्या रामसिस च्या काळात म्हणजे साडेतीन हजार वर्षांपूर्वी ईजिप्तचं साम्राज्य दूरवर पसरलेलं होतं. व्यापाराची भरभराट झाली होती. त्याकाळी इजिप्तची जनता त्यावेळच्या फेरोंना (राजांना) मृत्यूनंतर देवत्व बहाल करीत असे. पण दुसऱ्या रामसिस या राजाला स्वतःच्या मृत्यूपर्यंत थांबणे मान्य नव्हतं. स्वतःचीच देवळं त्याने स्वतःच्याच हयातीत बांधली. त्यापैकी सर्वात भव्य असं अबू सिम्बेलचं देऊळ. हे अतिभव्य देऊळ एकाच खडकात कोरलेलं आहेआणि ते पूर्ण करायला तब्बल वीस वर्षे लागली. नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर भक्कम दगडाची एक टेकडी त्यानं निवडली, आणि त्यात हे देऊळ कोरून अद्वितीय कलाकृती निर्माण केली. प्रवेशद्वारावरच त्याने स्वतःचे साठसत्तर फूट उंचीचे चार भव्य बसलेल्या स्थितीतले पुतळे खोदले. रामसिसच्या या चार पुतळ्यांपैकी एक पुतळा काळाच्या ओघात भंगलेला आहे. देवळाच्या आतील सभागृहाच्या आधारासाठी आपल्याच पुतळ्यांचे सोळा खांब उभे केले. अंतर्भागात रामसिसच्या पराक्रमाच्या गाथा चित्रलिपीत चितारलेल्या आहेत. आणखीन आत गेलं की अखेरीस अरुंद दाराचा चौकोनी गाभारा दिसतो, आतील गाभाऱ्यात देखील देवदेवतांच्या मूर्तीबरोबर स्वतःची मूर्ती. म्हणजे यत्र, तत्र, सर्वत्र स्वतः रामसिसचं! आत गाभाऱ्यात बराचसा अंधार. या देवळातल्या गाभाऱ्यात नेहेमी अंधारात असलेल्या रामसिसच्या मूर्तीवर त्याच्या वाढदिवसादिवशी म्हणजे २१ फेब्रुवारी व त्याच्या राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबर या वर्षातल्या दोनच दिवशी सूर्याचे किरण पडतात आणि हे सूर्याचे किरण या गाभाऱ्याला उजळून टाकतात. मनात विचार आला 'साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या वास्तुशास्त्रज्ञांना खगोलशास्त्राचं देखील केवढं सखोल ज्ञान होतं.'
![]() |
साडेचार हजार वर्षांपूर्वीची चित्रलिपी |
'अबू सिम्बेल' चे अजब स्थलांतर
१८ व्या शतकात एका स्विस पुरातत्व संशोधकाला हे देऊळ प्रथम सापडलं. ही दोन्हीही देवळं वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. नाईल नदीच्या पुराचं या देवळाच्या प्रवेशद्वाराच्या भव्य पुतळ्यांच्या पायापर्यंत येऊन थांबे. १९व्या शतकात इजिप्तची लोकसंख्या बेसुमार वाढली. पाण्याची टंचाई भासू लागली. शेतीला पाणी कमी पडू लागले. त्यामुळे अगदी अलीकडे १९६० मध्ये नाईल नदीवर एक प्रचंड धारण बांधायचा प्रस्ताव इजिप्त सरकार कडे आल्यावर आस्वान येथे मोठे धारण बांधायचे सरकारने ठरवले. पण धारण बांधल्यावर धरणाच्या पाठीमागे साठणाऱ्या प्रचंड पाण्याखाली हे अबू सिम्बेलचं देऊळ बुडणार होतं. त्यामुळे ह्या धरणाच्या बांधणी आधी मानवी वस्त्यांबरोबरच नदीकाठच्या अबू सिम्बेलचं आणि टेम्पल ऑफ फिलाय ह्या दोन प्राचीन देवळांना मागे हलवावं लागलं. या कामासाठी जगातल्या इतर अनेक देशांनी इजिप्त सरकारला मोठ्या प्रमाणात तांत्रिक आर्थिक मदत देऊ केली.![]() |
अबू सिम्बेल देवळाच्या आतील गाभारा |
१९६८ साली इजिप्त सरकारने मोठ्या जिद्दीने हे अबू सिम्बेलचं देऊळ धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्याही पलीकडे म्हणजे त्याच्या मूळ जागेपासून जवळ जवळ एक किलोमीटर एवढे मागे सरकावण्याच्या कामाची सुरवात केली. मूळ देवळाचे, पुतळ्यांचे काळजीपूर्वक अनेक तुकडे कापण्यात येऊन अजस्त्र क्रेनच्या मदतीने ते नवीन जागी नेण्यात आले. या तुकड्याना नंबर्स देण्यात आले. मग हे सर्व तुकडे एक एक करीत एखाद्या पझल प्रमाणे नंबर्स जुळवून पुन्हा जसेच्या तसे जोडण्यात आले. एक एक तुकडा जोडताना या देवळाचा जणू पुनर्जन्मच होत होता. साडेचार हजार वर्षांपूर्वी आश्चर्यकारकरित्या बांधलेल्या या देवळाचे तितक्याच आश्चर्यकारकरित्या नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले. आपला मानव जातीचा इतिहास जपण्यासाठी, कुठलंही राजकारण मध्ये येऊ न देता अनेक देशांनी एकत्र येऊन निसर्गावर मिळवलेला हा विजय बघून मन अचंबित होते.
आस्वान धरण: 'नासर तलाव'.
![]() |
आस्वान चं धरण |
"इथं प्रत्यक्षात दोन धरणे आहेत. पाहिलं धरण १९०२ साली बांधलं गेलं. त्याची उंची त्या मानानं कमी होती. त्याचे उपयोगही मर्यादित होते. थोडीफार वीजनिर्मिती आणि नदीच्या पुराच्या पाण्याला थोडी शिस्त लावणं इतकेच. मात्र १९६५ साली स्वतंत्र इजिप्तचे पहिले तत्कालीन अध्यक्ष नासर यांनी अस्वानला एक मोठं धरण बांधायचं ठरवलं. काही देशांच्या विरोधाला न जुमानता रशियाच्या मदतीने नासर यांनी हा प्रकल्प जिद्दीने पूर्ण केला. धरणाचं पाणी अडवून तयार झालेला हा जगातला सर्वात मोठा जलाशय आहे. इजिप्तच्या लोकांनी आपल्या खंबीर राष्ट्राध्यक्षांचं नाव या जलाशयाला दिलं आहे. 'नासर तलाव'. या रणरणत्या वाळवंटातील विस्तीर्ण जलाशयाकडे बघून डोळे निवत होते. नासर तलावाच्या दोन्ही बाजूंनी हिरवी किनार होती. समुद्राप्रमाणे भासणाऱ्या पण शांत पसरलेल्या जलाशयाच्या पलीकडे लगेचच वाळवंट सुरु झालेलं दिसत होतं. बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला खळखळत पुढे जाणारी नाईल नदी, बंधाऱ्याच्या जवळच नदीच्या किनाऱ्यावर वीजनिर्मिती केंद्र दिसत होतं. या धरणाच्या पाण्यामुळे इजिप्तची जवळजवळ तीस टक्के जमीन लागवडीखाली आली. विजेचं उत्पादन कितीतरी पटीनं वाढलं. या धरणाची उंची तब्बल एकशे आकरा मीटर्स असून, लांबी साडेतीन किलोमीटर्स आहे." दिना ने या धरणाबद्दल आणखीही काही गमतीदार, रंजक माहिती सांगितली. "दहा वर्षं सुरु असलेल्या या धरणाच्या बांधकामावर पस्तीस हजार कामगार कार्यरत होते. हे धरण उभारताना गिझा पिरॅमिडच्या अठरा पट जास्तं बांधकाम साहित्य लागलं." वगैरे वगैरे... आता खरं खोटं ती दिनाच जाणे. पण आस्वान धरण पाहून माझी मात्र मती गुंगच झाली.
![]() |
'फलुका |
नदीच्या निळ्याशार पाण्यातून जाताना अचानक बोटीच्या बाजूने दोन न्यूबियन पोरं सर्फिंग बोर्ड वर बसून, हातांचेच वल्हे करून आमच्या दिशेने येऊ लागली. बोटीच्या अगदी जवळ येऊन त्यांचं कुठलंसं लोकगीत खणखणीत आवाजात गाऊ लागली. एकाने सर्फिंग बोर्डवरच हाताने ठेका धरला होता. आमच्या बोटीतल्या चालकाने देखील प्रतिसाद देत या छोट्या मुलांच्या लोकगीतावर डफलीचा ठेका धरला. गाणं संपल्यावर पैसे न मागता ही दोन्हीही मुलं जाऊ लागली. तसे आमच्या ग्रुप मधील रोहिणीनं त्यांना पैसे देऊ केले. या मुलांच्या चेहेऱ्या वर हास्य उमटले. आस्वान धरणाच्या जलाशयात पूर्वीचा न्यूबिया नावाचा प्रदेश पार बुडाला. इथल्या न्यूबियन आदिवासी वसाहती स्थलांतरित करण्यात येऊन त्यांचं पुनर्वसन झालं. पण अजूनही पर्यटकांसाठी छोटेमोठे व्यवसाय करून पोटं भरणारी काही मंडळी इथं दिसतात. अर्ध्या पाऊण तासाने बोट पुन्हा आस्वान च्या किनाऱ्यावर परत फिरली.
क्रूझ वर जायला अजून थोडा वेळ होता. मग इथल्या थोडं लांब असलेल्या एका आदिवासी गावाला भेट देण्यासाठी आम्ही पुन्हा बोटीतून निघालो. विणा वर्ल्ड च्या ट्रिप च्या कार्यक्रमात ह्या आदिवासी गावाची भेट ठरलेली नव्हती. मग वेगळे पैसे भरून (पंचवीस तीस युएस डॉलर्स) आम्ही काहीजण या छोट्या भटकंतीला गेलो. हे आदिवासी गाव थोडं लॅब असल्यानं मोटारबोटीची व्यवस्था झाली. आता संध्याकाळ झाली होती. लालकेशरी रंगाच्या क्षितिजावर सूर्य अस्ताला जात होता. हवेत गारठा वाढला होता. नदीतून मोटारबोटीच्या तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही एक जुन्या गावात आलो. इथे जुन्या काळातली घरे, आदिवासींचे राहणीमान पर्यटकांना अनुभवता येते. इथल्या एका घरात आम्ही गेली असता पुदिन्याची पाने घातलेला, दुधाशिवाय असलेला लाल रंगाच्या चहानं आमचं स्वागत झालं. हा चहा म्हणजे अस्वानचा वैशिष्ठ्यपूर्ण 'हर्बल टी'. विशिष्ठ प्रकारच्या जास्वदींची पाने पाने वाळवून हा चहा तयार करतात. या लालभडक रंगाच्या चहाची चव काहीशी गोड कोकम च्या सरबतासारखी, पुदिन्याचा स्वाद असलेली होती. या छोट्या वस्तीसारख्या गावातील अरुंद बोळांसारख्या रस्त्यावरून पर्यटकांना उंटावरून फेरफटका मारायची सोय होती. अर्थातच पैसे देऊन! गायावया करून करून छोट्या छोट्या वस्तू पर्यटकांना विकणारी केविलवाणी मुले बघून मात्र वाईट वाटलं. त्यांच्याकडे बघवत नव्हतं. रात्री नऊसाडेनऊ ला आम्ही परत फिरलो. अंधार पडला होता. थंडीचा कडाका वाढला होता.
'नाईल डाल्फिन क्रूझ'
![]() |
'नाईल डाल्फिन क्रूझ' |
![]() |
'नाईल डाल्फिन क्रूझ' |
क्रुझवरचे रात्रीचे जेवण झकास होते. चिकन, फिश फिन्गर, विविध प्रकारचे ब्रेडचे प्रकार, बीन्स, चीज, अनेक प्रकारची फळे, ओला खजूर असे चौफेर जेवण होते. आज आमच्या ग्रुप मधील 'आरुष' नावाच्या छोट्या मुलाचा वाढ दिवस होता. त्या निमित्ताने क्रूझ वरील प्रमुख शेफ व वेटर्सनीं जेवणाच्या वेळी एक मोठा केक करून आणला. किचन मधून केक घेऊन नाचत नाचत, डफ वाजवत, गाणे म्हणत आरुष आणि त्याचे आईवडील जिथं बसले होते तिथं येऊन केक कापला, खूप जल्लोष केला. रात्री खूप धमाल आली. दिवसभर केलेली धमाल आठवत रात्री उशिरा आम्ही झोपलो. बाहेर नाईल नदी अखंड वाहत होती. क्रूझ मधून आमचा प्रवास सुरु झाला होता...
![]() |
क्रूझ मधील आमची खोली |
फिलाय आणि कोमोम्बो ची मंदिरं...
१७-११-२०१८ : आज सकाळी सहा वाजता उठून, आवरून क्रूझच्या डायनिंग हॉल मध्ये येऊन भरपेट नाश्ता घेतला. क्रूझ वरील जेवण आणि नाश्त्यावर मी जाम खुश होतो. आज आम्हाला 'टेम्पल ऑफ फिलाय' बघायला जायचं होतं. जिथं हे देऊळ होतं, तिथपर्यंत आमची मोठी क्रूझ जाऊ शकत नसल्यामुळं आमच्या साठी एका छोट्या मोटारबोटीची व्यवस्था करण्यात आली होती.![]() |
'फिलाय' टेम्पल |
१९६५ मधील बांधलेल्या आस्वान धरणामुळं निर्माण झालेल्या नासर जलाशयामुळं जलाशयाच्या आजूबाजूच्या मानवी वस्त्यांना स्तलांतरित करावा लागलं. न्यूबिया नावाचा एक मोठा प्रदेशच या जलाशयानं गिळंकृत केला. माणसांच्या बरोबरीनं नदीकाठच्या अनेक प्राचीन मंदिरांना देखील हलवावं लागलं. खरं तर १९०२ इंग्रजांनी बांधलेल्या मधील बांधलेल्या लोअर डॅम मुळे आधीच निम्मे अर्धे पाण्याखाली गेलेल्या टेम्पल ऑफ फिलाय ला हलवणे हे इजिप्त सरकारपुढे एक मोठं आव्हान होतं. १९०२ ते १९६५ पर्यंत हे देऊळ निम्मा पाण्यात बुडालं होतं. लोअर डॅम धरणाचं पाणी जसं वरखाली होई तसे या देवळाचे खांब बुडत आणि पाण्याबाहेर बाहेर येत. या काळात हे देऊळ पाहण्यासाठी पर्यटकांना छोटा छोट्या होड्यातून यावे लागे. अर्ध्यापाऊण बुडालेल्या खांबातून पर्यटकांच्या होड्या प्रवास करीत. पुढे १९६५ मधील मोठ्या धरणाच्या बांधकामाच्या प्रस्तावानंतर या देवळाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला. विशेषतः हे देऊळ १९०२ पासूनच निम्मअर्धं पाण्यात असल्यामुळं ते बरंचसं कमकुवत झालं होतं. 'युनोस्को'नं हे देऊळ वाचवायचं ठरवलं आणि फिलाय चं देऊळ त्याच्या मूळच्या जागेच्या जवळील एका थोड्या उंच बेटावर हलवलं गेलं. अर्थात देऊळ हलवायची पद्धत हुबेहूब अबू सिम्बेल मधील देवळांप्रमाणेच.
![]() |
'फिलाय' टेम्पल |
एका छोट्या मोटारबोटीतून आम्ही टेम्पल ऑफ फिलाय बघायला नाईल नदीतून प्रवास करू लागलो. आमच्या सहप्रवाशांच्या मस्त ओळखी झाल्यामुळे आता एकप्रकारचा मोकळेपणा आला होता. गप्पाटप्पा सुरु होत्या. थोड्या वेळाने बोटीच्या चालकानं बोटीच्या मध्यभागी झाकून ठेवलेल्या भेटवस्तूंचा खजाना विक्रीसाठी उघडला. मग काय ग्रुप मधील बायकांची पुन्हा शॉपिंगसाठी झुंबड उडाली. वेळ मजेत जात होता. नदीतून जाताना छोटीमोठी बेटं दिसत होती. नदीच्या पाण्याचा विस्तार आता खूप मोठा दिसत होता. सकाळची नऊची वेळ असून देखील बाहेर उन्हाचा कडाका जाणवत होता. पण नदीच्या पाण्यावरून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळुका ऊन सुसह्य करीत होत्या.
![]() |
'फिलाय' टेम्पल |
हे देऊळ 'अजिल्टिक' नावाच्या काहीश्या उंच बेटावर हलवलं गेलं आहे. या बेटाच्या कडेला आमची मोटार बोट थांबली. नदीच्या काठावर लगेचच फिलायचं देऊळ दिसू लागलं. नेहेमीप्रमाणे देवळाच्या वाटेवर असंख्ये विक्रेते दिसत होते. छत्र्या, रुमाल, पंखे, पपायरस कागदावरची चित्रं, गळ्यात घालायच्या माळा, पिरॅमिडच्या प्रतिकृती वगैरे असंख्य वस्तू विकण्यासाठी विक्रेते केविलवाणी धडपड करत होते. आमच्या ग्रुप कडे बघून इंडिया इंडिया असे ओरडत होते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर आमची गाईड दिना सरसावली आणि माहिती देऊ लागली...
![]() |
'फिलाय' टेम्पल |
"हे 'इसिस' नावाच्या देवतेचं मंदिर आहे. प्राचीन इजिप्तमध्ये फेरोंच्या काळातली इसिस देवता पुढे ग्रीकांनी देखील स्वीकारली होती. ग्रीक राजवटीनंतर आलेल्या रोमन राजवटीत या 'इसिस' देवतेची महती अपरंपार वाढली. मात्र ख्रिश्चनांच्या आक्रमणानंतर ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला. ख्रिश्चनांनी या देवळाचं चर्च करायचा घाट घातला. याचे अनेक पुरावे या देवळात दिसतात. इसिस च्या गाभार्याच्या दारावर ठळक असा क्रॉस आजही दिसतो. सर्व देवळांप्रमाणे इथेही सगळीकडे चित्रलिपी चितारलेली दिसते. या देवळात सहाव्या शतकापर्यंत इसिस या देवतेची पूजाआर्चा चालायची. या परिसरात इतरही अनेक देवळं होती. इसिस या देवतेचा मुलगा 'होरुस' याची देखील एक खोली इथं आहे. या होरुस देवाचे एक स्वतंत्र मंदिर एडफू गावात आहे. ते आपण नंतर बघायचे आहेच. या ठिकाणी रात्री 'लाईट अँड साउंड शो' असतो पण आपल्याला वेळे अभावी तो बघता येणार नाही". दिनाच्या या शेवटच्या वाक्यामुळे ग्रुपमधील बरीच मंडळी कुरकुरली. पण त्याला इलाज नव्हता. या देवळात आणि परिसरात आम्ही दोन अडीच तास भटकत होतो. प्रत्येक भागात प्रमाणबद्ध, अतिभव्य खांब होते. त्यावरील कोरीव काम देखील कमालीचं सुंदर आहे.
जवळजवळ साडेबारा वाजेपर्यंत फिलाय देऊळ बघून आम्ही पुन्हा मोटारबोटीतून परत क्रूझ वर आलो. क्रूझ वर जाऊन फ्रेश होऊन क्रूझच्या चौथ्या मजल्यावरच्या डेक वर आम्ही आलो. आमचे सर्व सहप्रवासी वर गप्पा मारीत बसले होते तर कुणी डेकवरच्या निळ्याशार स्विमिंग पूल मध्ये डुंबत होते. दुपारचे कडकडीत ऊन, नदीवरून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका.. काय सुरेख वातावरण होते. मग काय इजिप्तची 'स्टेला' नावाची लोकल बियर मागवली. तासभर निवांतपणे बियर पीत आराम केल्यावर जेवायला क्रूझच्या तळमजल्यावरील डायनिंग हॉल मध्ये आलो. जेवणात नेहेमीप्रमाणे विविध पदार्थांची रेलचेल होती. तुडुंब जेवण करून आमच्या रुम मध्ये विश्रांतीसाठी आलो. थोडी वामकुक्षी घेऊन रुम च्या खिडकीतून बाहेर पाहतो तर क्रूझ पुढच्या प्रवासाला निघाली होती.
आज दुपारचा थोडा वेळ मिळाला होता. संध्याकाळी 'कोमोबो'चं देऊळ बघायचं होतं. डेकवर बियरचा आस्वाद, मग जेवण, त्यानंतर वामकुक्षी असा आराम झाला. गेले काही दिवसाच्या धावपळीनंतर हा आराम सुखावह होता. आमच्या रुम ला एक भली मोठी खिडकी होती. त्या खिडकीला लागूनच एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. मग या टेबलखुर्चीवर बसून बाहेरचा नजारा बघत थोडं लिहायला बसलो. निवांत वेळ असला की छान लिहायला देखील होतं. खिडकीतून नाईल नदीचा भला मोठा संथ वाहणारा नितळ प्रवाह डोळे निववीत होता. मधूनच पक्षांचे थवे इकडून तिकडे विहरत होते. नदीच्या किनारी असलेली खजुराची झाडे मागे पळत होती. कधी कधी अगदी किनाऱ्यावर उसाचे मळे किंवा केळीच्या बागा दिसत होत्या. नदीच्या किनाऱ्यावरील शेतात क्वचित शेतकरी काम करताना दिसत होते. कुठेकुठे शेतात पाणचक्क्या बसवलेल्या होत्या. सगळीकडे नांदत्या जीवनाचं दर्शन होत होतं. शेतांच्या सोबतीनं अधूनमधून प्राचीन इतिहासाचे अवशेषही दिसत होते. जगातल्या सर्वात लांब आणि मोठ्या नदीवरून आपण प्रवास करतोय ह्या कल्पनेनंच मन आनंदी होत होतं. मी नेहेमीप्रमाणे प्रवासाला निघताना लिखाणासाठी वही नेलीच होती. लिहायचा मूड देखील होता. बराच वेळ लिहीत बसलो...
![]() |
क्रूझ प्रवासादरम्यान दिसणारा नजारा |
कोमोम्बो देऊळ :
अलकाने संध्याकाळी पाच वाजता मला भानावर आणले. आत्ता संध्याकाळी आम्हाला सुप्रसिद्ध कोमोम्बो चं देऊळ बघायला जायचं होतं. हे देऊळ नदीच्या किनाऱ्यावरच आहे. आमची क्रूझ किनाऱ्यावर थांबली. संध्याकाळ झाली होती. सूर्य अस्ताला जात होता. क्रूझ मधून उतरून दहापंधरा मिनिटे चालत गेल्यावर आम्हाला कोमम्बो देऊळ दिसलं. किनाऱ्यालगतच्या उंच अशा खडकावर हे देऊळ बांधलेलं आहे. दोन देवतांचं जुळं असं हे देऊळ आहे. मृत्युदेव 'ओझायरीस' आणि मगरीचं तोड असलेला 'सार्बेक' या दोन देवतांची एकत्रित असलेली देवळं म्हणजे कोमोम्बो देऊळ.![]() |
कोमोम्बो चं देऊळ |
तसं पाहिलं तर याही देवळाची रचना इतर देवळांसारखीच. भव्य खांब, मोठाली सभागृह, गाभारे, कोरीव चित्रलिपी तशीच, मात्र दोन्ही देवळांना वेगळं करणारी एक भिंत या देवळामध्ये होती. देवळाच्या पाठीमागील भागात देवळाच्या मधोमध खाली तळघरात भविष्य सांगणारे महंत बसत. त्याकाळी भविष्याची चिंता असलेले चिंतातुर इथं यायचे आणि ओरॅकल नी म्हणजे महंतांनी सांगितलेले स्वतःचे भविष्य समजावून घ्यायचे. इथं विविध औषधे देखील मिळत असत. इथलं भविष्य आणि इथं मिळणारी औषधे या साठी दुरून लोक इथं येऊन त्याचा लाभ घेत असत. या कोमोम्बो देवळाच्या खांबांवर आणि भिंतींवर अनेक औषधांविषयी आणि अनेक रोगांवरील उपचारांची माहिती चित्रलिपीत रेखाटली आहे. उशिरा संध्याकाळच्या अंधारात संपूर्ण कोमोम्बो देऊळ पिवळ्या रंगाच्या दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाले होते. वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशयोजनेमुळे भिंतीवर आणि खांबावर कोरलेल्या चित्रलिपीतली माहिती, चित्रे विशेष उठून दिसत होती.
![]() |
कोमोम्बो चं देऊळ |
आमच्या सारख्या तीनचार क्रूझ एकाच वेळी इथं आल्यामुळे पर्यटकांची तोबा गर्दी इथं वहात होती. अर्थात दिनाच्या हातातील सतत उंच धरलेला वीणा वर्ल्डचा झेंडा आम्हाला गर्दीत हरवु देत नव्हता. इथं काही आश्चर्यकारक चित्रं देखील बघायला मिळाली. एका भिंतीवर अडीचतीन हजार वर्षांपूर्वी वापरात येणारी वैद्यकीय विषयावरील चित्रं, विशेषतः त्याकाळी शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणं कोरलेली होती. अगदी करवती, सुऱ्यांपासून, सुईदोऱ्यांपर्यंची सर्व उपकरणे इथं दाखवलेली आहेत. एका भिंतीवर दोन स्त्रिया बसलेल्या अवस्थेत बाळाला जन्म देत आहेत असंही चित्र कोरलेलं दिसलं. अश्या बैठ्या अवस्थेत पूर्वी बाळंतपणं व्हायची म्हणे. देवळाच्या एकीकडच्या भागात मगरीचे तोंड असलेल्या 'सार्बेक' नावाच्या देवाची उपासना व्हायची. या सार्बेक देवाचं प्रतीक म्हणून काही मगरीच्या ममीज बनवून एका दालनात ठेवलेल्या आहेत.
![]() |
'नायलोमीटर' |
इथं या देवळाच्या आवारात एक गंमतशीर, वैशिष्ट्यपूर्ण कोरडी विहिर आम्हाला बघायला मिळाली. या विहिरीला 'नायलोमीटर' असे म्हणतात. प्रत्येक वर्षी नाईल नदीला किती पूर येणार? याचा अंदाज येणासाठी अशा अनेक प्राचीन विहिरी नाईल नदीच्या किनाऱ्यावर आढळतात.या विहिरींच्या तळाशी एका विशिष्ठ जागेतून नदीचं पाणी आत येण्यासाठी एक मार्ग असे. विहिरीत चढलेल्या पाण्यावरून यंदा नदीला किती पूर येणार याचा अंदाज पूर्वीचे लोक घ्यायचे. पूर्वी विहिरीत नदीचे पाणी चढू लागले की विहिरीच्या भिंतीवर रेघा कोरून ठेवल्या जात. विहिरीत जितकं पाणी चढेल तेव्हढा नदीच्या पाण्याबरोबर येणारा सुपीक गाळ अधिक येणार, यावरून पिकांचं उत्पादन किती जास्त होणार, यावरून येणाऱ्या समृद्धीचे अंदाज त्याकाळी बांधले जायचे. त्यामुळे नाईल नदीच्या काठी जागोजागी असलेल्या या विहिरींना प्राचीन काळी अतोनात महत्व होते.
![]() |
देवळाचा गाभारा |
कोमोम्बो देऊळ, मगरीच्या ममीज आणि नायलोमीटर विहिरी बघून माझी माती गुंग झाली. साडेतीनचार हजार वर्षांपूर्वीचा तो काळ. त्याकाळी काय प्रकारचे वातावरण असेल इथं? इथंच कुठंतरी भविष्य समजावून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत असतील, इथंच कुठल्यातरी दालनात शस्त्रक्रिया होत असतील, हजारो वर्षांपूर्वीचं हे मंदिर त्याकाळी कसे असेल? आता मात्र शतकानुशतक नाईल नदीच्या पुराचे फटके बसल्यामुळं ते बरंचसं खिळखिळं झालेलं आहे. तरीदेखील काळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर, हॅलोजन दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात न्हाऊन निघालेलं कोमोबो देऊळ मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवायचा बराच वेळ प्रयत्न करीत होतो. रात्री क्रुझवरील माझ्या खोलीतल्या बिछान्यावर झोपताना दिवसभरातली दृश्ये मिटल्या डोळयासमोर येत होती. आमची क्रूझ पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली होती...
होरुस, कर्नाक, लुक्सार ची देवळं, नाईल लॉक आणि बरंच काही...
होरुस चं देऊळ :
१८-११-२०१८ : पहाटे पाच वाजता जाग आली आणि खिडकीच्या बाहेर बघताच लक्षात आले की आमची क्रूझ 'एडफू' नाकाच्या गावात येऊन थांबली होती. माझ्या रूमच्या खिडकीजवळच दुसरी एक मोठी क्रूझ उभी होती. सकाळचे प्रातर्विधी उरकल्यावर चहा ब्रेकफास्ट घेतला. ब्रेकफास्टच्या वेळी वीणा वर्ल्ड च्या आदित्यने सांगितले की 'आज आपण सकाळी होरुस देवतेचं मंदिर बघून संध्याकाळपर्यंत आपण लुक्सार नावाच्या शहरात जाणार आहोत. लुक्सार मधील कर्नाक आणि लुक्सार ही अप्रतिम देवळं बघणार आहोत. आज आपला मुक्काम लुक्सारमधेच असणार आहे. आज थोडं चालण्याची तयारी ठेवा' असेही तो शेवटी म्हणाला. ग्रुपमधील बऱ्याच सहप्रवाशांची इच्छा असल्याने लुक्सार शहरातील मार्केट मध्ये शॉपिंग साठीही वेळ मिळणार होता. शिवाय आज जेवणानंतर रात्री क्रूझवर खास ईजिप्शियन बेली डान्स पार्टी होती. त्यामुळं आजचा दिवस खूप धावपळीचा, करमणुकीचा आणि शॉपिंगची धमाल असलेला देखील होता.एव्हडी धमाल असून देखील आमच्या ग्रुप मधील काही सहप्रवासी कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम नाराजच असायचे. कधी सारखं पहाटे उठावं लागतं म्हणून, तर कधी जेवणच चांगलं नाही म्हणून. सारखी सारखी देवळंच काय बघायची? अशीही कुणीतरी तक्रार केली होती. एका दाम्पत्यानं तर 'आमचं इजिप्त ट्रीपचं सिलेक्शनच चुकलं, उगाचच आलो या ट्रिपला' अशीही कुरकुर केली. मला अश्या कुरकुरणाऱ्या प्रवाशांचं फार आश्चर्य वाटतं. आता चाळीस वेगवेगळ्या स्वभावाच्या, वयोगटाच्या लोकांची मोट बांधून परदेशात फिरवायचे म्हणजे थोडं पुढंमागं होणारच. काही कारणांनी काही थोडीफार गैरसोय झाली तर झाली, बाकी आनंदाचे क्षण तर उपभोगायला पाहिजेतच नं ! ही कुरकुरणारी मंडळी इतका खर्च करून ट्रीपमध्ये कायम दुःखी राहतात. गम्मत म्हणजे अशा लोकांनाच जास्त अडचणी येतात. असो...
![]() |
होरुस देवळाकडे घेऊन जाणारी घोडागाडी |
होरुस चे देऊळ बघण्यासाठी आम्ही सकाळी लवकरच क्रूझच्या बाहेर पडलो. क्रूझच्या पाठीमागे सूर्यदेव उगवण्याची वाट बघत होते. क्षितिजावर लालसर रंगाची सूर्यप्रभा सूर्यदेवांच्या आगमनाची वर्दी देत होती. नदी किनाऱ्यालगतच्या एडफू गावाच्या रस्त्यावर आम्ही आलो. एडफू गाव अगदीच छोटे होते. धुळीने भरलेले कच्चे रस्ते होते. रस्त्यावर अनेक काळ्या रंगांच्या घोडागाड्या वाट बघत होत्या. आमचे प्रत्येकी चार प्रवासी बसवून घोडागाड्या होरुस देवळाकडे धावू लागल्या. सगळीकडे धूळ उडत होती. रस्ता एडफू गावाच्या मुख्य बाजारपेठेतून जात होता. अर्थात खूप सकाळ असल्याने बाजारपेठेतली दुकाने बंदच होती. रस्त्याने तुरळक प्रमाणात पायघोळ लांब कपड्यातला पुरुष दिसत होते. एखादी स्त्री दिसलीच तर ती बुरख्यात.
होरुस देवळाबाहेर घोडागाड्यांची तुंबळ गर्दी होती. सर्व घोडागाडीवाले आपलं घोडं पुढं दामटण्यासाठी गडबड करीत होते, एकमेकांशी भांडत होते. कर्कश्य आवाजात आरडाओरडा करत होते. गर्दीतून पुढं जाण्यासाठी घोड्यांच्या पाठीवर सतत आसूड ओढत होते. आमच्या गाडीच्या घोड्याला खाऊन खाऊन जखमा झाल्या होत्या. मला त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याची कीव येत होती. देऊळ बघून झाल्यावर याच घोडागाडीतून परत जायचे असल्याने या घोडागाडीचा नंबर लक्षात ठेवायचा होता. देवळाच्या प्रवेशद्वारा जवळ आम्ही नेहेमीप्रमाणे दिनाच्या भोवती कोंडाळं करून उभे राहिलो. दिना आम्हाला माहिती देऊ लागली...
![]() |
'होरुस' चे देऊळ |
इसवी सनापूर्वी तीन शतकं इजिप्तवर ग्रीकांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. आपली ग्रीक संस्कृती लादण्याऐवजी इथलीच ईजिप्शियन संस्कृती ग्रीकांनी आपलीशी केली. अलेक्झांडर च्या निधनानंतर त्याच्या 'टोलेमी' नावाच्या सरदार घराण्यानं इथलं राज्य बळकावलं. या काळात हे होरुस देवाचं देऊळ बांधलं गेलं. जवळजवळ दोनशे वर्षं या देवळाचं बांधकाम चालू होतं. इजिप्त मधील सुस्थित राहिलेल्या देवळांपैकी हे एक देऊळ आहे. कारण थोडं उंचावर, आणि नदीपासून थोडं लांब बांधल्यामुळे नाईल नदीच्या पुराची ह्या देवळाला झळ बसली नाही. या देवळाच्या बांधकामात ग्रीक शैली स्पष्ट दिसते. या देवळाच्या बाहेर चारशे फूट रुंद आणि अडीचशे फूट उंच अशी अजस्त्र भिंत कोणतीही पडझड न होता हजारो वर्ष इथं उभी आहे. या भिंतीवर बाराव्या टॉलेमी राजाची कोरीव चित्रं दिसतात. 'शत्रूच्या शेंड्या पकडून टॉलेमी राजा त्यांना नमवतो आहे, त्यांची मुंडकी उडवतो आहे, आपल्या देवतांना खूष करतो आहे' अशी ती चित्रं ! अतिभव्य भिंतीवरील त्या चित्रातील हावभाव, वेग, आवेश डोळे दिपवून टाकत होता.
पूर्वीच्या काळात हे देऊळ विविध रंगांनी रंगवलेलं होतं. पण गेल्या अडीच तीन हजार वर्षात ऊनवाऱ्याच्या परिणामामुळे या देवळाचा बहुतेक सर्व रंग उडाला आहे. पण अजूनही काही ठिकाणी लाल, निळ्या रंगांचे अवशेष पूर्वीच्या सौंदर्याचे पुरावे दाखवत होते. गर्दीतून आम्ही आतमधील एका भव्य चौकात आलो. या चौकाच्या चारीही बाजूंनी विशाल खांब उभे होते. त्याच्या कोरीव कामाचे बारकावे नजरेत भरत होते. प्रत्येक खांबाच्या खाली उसळणाऱ्या लाटा, मध्ये उमललेली कमळे, आणि सर्वात उंच लांबट गोल राजचिन्ह कोरलेली. (या राजचिन्हांना 'कार्टूश' असे म्हणतात. ही अशी राजचिन्ह प्राचीन इजिप्त मधील सर्वच देवळात, प्रासादात दिसतात.)
![]() |
शौर्याचं दैवी प्रतीक 'होरुस' |
या चौकाच्या पलीकडे मुख्य देवळाच्या प्रवेशद्वारापाशी 'होरुस' म्हणजे बहिरी ससाण्याचा दहाबारा फूट उंचीचा भलामोठा पुतळा उभा आहे. शौर्याचं दैवी प्रतीक म्हणून होरुस ला बहिरी ससाण्याच्या रूपात दाखवलं जाई. त्याला सूर्यपुत्र देखील मानत. हा पुतळा काळ्या ग्रॅनाईट दगडाचा असून त्याच्या चेहेऱ्यावर रागीट भाव आहेत. 'वाकडी तीक्ष्ण चोंच, वटारलेले डोळे, आल्यागेल्याकडे तुच्छतेने बघणारी नजर.' मला कळेना तो का चिडलेला दाखवलाय? आणि तो कुणावर चिडलाय? मी तसं दिनाला विचारलं देखील पण दिना या प्रश्नांची उत्तरं देऊ शकली नाही.
![]() |
'होरुस' चे देऊळ |
आतमधील देवळाच्या सभागृहात आम्ही प्रवेश केला. इथं भव्य खांबांवरती असलेलं छप्पर व्यवस्थित शाबूत आहे. आजूबाजूंच्या भिंतीवर ग्रीकांनी केलेलं कोरीव काम चौथ्या शतकात आलेल्या ख्रिश्चनांनी खराब केलं. ख्रिश्चन एकाच ईश्वराची पूजा करणारे. त्यामुळे त्यांनी इथल्या देवदेवांच्या मूर्तींचा जमेल तेव्हडा विध्वंस केला. अशा अनेक मोल्यवान मूर्ती, त्यांचे अवशेष इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी देशातील संग्रहालयांची शोभा वाढवत आहेत. पण आत्ताच्या इजिप्तच्या हे पथ्यावरच पडले आहे. कारण या विविध प्रगत देशांच्या संग्रहालयातील इजिप्तचे प्राचीन अवशेष पाहून पर्यटक इजिप्तमध्ये येण्यास प्रवृत्त होतात. कोणतीही मूर्ती नसलेल्या गाभाऱ्यात माझी नजर गेली. मूर्तीच्या जागी त्या काळातलं वार्षिक पंचांग कोरलेलं आहे. सूर्याच्या दिवसभरातील सर्व अवस्था इथं कोरून ठेवल्या आहेत. प्राचीन इजिप्तच्या लोकांनी खगोलशास्त्रात किती प्रगती केली होती याचाच हा पुरावा आहे. होरुस च्या देवळातून बाहेर आलो तेंव्हा साडेनऊ वाजले होते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरणे (खरं कडक उन्हाची किरणे) संपूर्ण देवळावर पसरली होती. आम्ही आमच्या घोडागाडीतून क्रूझ वर परतलो. आल्यावर आदित्यने सांगितलं की 'थोडा आराम करून सर्वांनी बारा वाजेपर्यंत डेक वर जमायचं आहे कारण आपल्याला नाईल नदीवरील 'एस्ना लॉक' बघायचं आहे. त्यानंतर जेवण आणि अंदाजे तीन वाजता आपण लुक्सार ला पोहोचणार आहोत.' मग रूमवर जाऊन थोडी डुलकी काढली, आराम केला. इडफू गावाचा किनारा आमच्या क्रूझ ने सोडला होता. बारा वाजता आम्ही सगळे डेकवर जमा झालो.
'एस्ना लॉक' आणि 'लुक्सार'
सगळे एकत्र जमल्यावर वीणा वर्ल्डच्या आदित्यने सांगितलं की आत्ता आपण लुक्सारला जाताना एस्ना लॉक पाहणार आहोत. मी विचारलं 'हे एस्ना लॉक म्हणजे नेमकं काय आहे'? आदित्यनं नाईल नदीवरच्या लॉक ची माहिती सांगितली. आम्ही डेक वरून उत्सुकतेने लॉक येण्याची वाट बघू लागलो. क्रूझ पुढे जातच होती. डेकवर आम्हा सर्वांच्या गप्पा सुरूच होत्या. नाईल नदीच्या पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी लुक्सार जवळ इस्ना इथं एक मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा किंवा छोटं धरण ब्रिटिशांनी १९०६ साली बांधलं. या बंधाऱ्याच्या एका बाजूला एक अरुंद कालवा किंवा कॅनॉल बांधलेला आहे. या कॅनॉलच्या दोन्ही बाजूला पाणी अडवण्यासाठी आणि सोडण्यासाठी विजेवर उघडझाप होणारे अजस्त्र लोखंडी दरवाजे बसवण्यात आले आहेत. बंधाऱ्याच्या एका बाजूला पाणी साठल्यामुळे पाण्याची पातळी उंच असते, आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची पातळी कमी असते. कॅनॉल मधून मोठ्या बोटी, क्रूझ जाताना या भल्यामोठ्या दरवाज्याची उघडझाप करून वरच्या पातळीवर असलेल्या बोटी कमी उंचीवर आणून किंवा बोटींची उंची वाढवून बोटींची यातायात केली जाते. आम्ही मागच्या वर्षी लंडन मधील कॅम्डेन भागातील कॅम्डेन कॅनॉलवरील अशी लॉक्स बघितली होती. पण कॅम्डेन लॉक्स खूपच छोटी होती. पण हे नाईल नदीवरचं एस्ना येथील लॉक खूपच मोठं आहे.![]() |
एस्ना 'लॉक' |
मग लॉक बघण्यासाठी उत्सुकतेनं आम्ही क्रूझच्या पुढच्या भागात डेकवर उभे राहिलो. नदीवरचा भणाणता थंड वारा असून देखील वरून येणाऱ्या सूर्याची कडक किरणे वातावरण उबदार करत होती. आजूबाजूला नदीचं रुंद पात्र डोळ्यांना सुखवीत होतं. आता एस्ना येथील बंधारा आणि लॉक दृष्टीक्षेपात आलं. बंधाऱ्याच्या कडेच्या अरुंद कॅनॉल मधून आमची क्रूझ पुढे जाऊ लागली. आमच्या भव्य क्रूझच्या मानाने हा कॅनॉल फारच अरुंद होता. कॅनॉल च्या दोन्ही कडेच्या भिंतींना आमची क्रूझ चक्क घासतच जात होती. क्रूझच्या कडेच्या भागाचे या घासण्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून क्रूझ च्या कडांना मोठीमोठी टायर्स लावली होती. अशी घासाघाशी करताच आमची क्रूझ लॉकच्या लोखंडी दरवाजांपाशी थांबली. थोड्या वेळच्या प्रतीक्षेनंतर आमच्या क्रूझच्या समोरचा अजस्त्र दरवाजा उघडू लागला. त्यामुळे कॅनॉल मधील पाणी बंधाऱ्याच्या पलीकडच्या बाजूला वाहून जाऊ लागले. त्यामुळे कॅनॉल मधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली. त्यामुळे क्रूझ देखील खाली जाऊ लागली. एव्हडी मोठी आमची क्रूझ चक्क तीस फूट खाली आली, आणि बंधाऱ्याच्या पलीकडील कमी पातळीच्या पाण्यात अलगद शिरली. हा थरारक अनुभव खूप वेगळा होता.
![]() |
एस्ना 'लॉक' |
आम्हाला या वेळी आणखीन एक गंमतशीर अनुभव आला. अरुंद कॅनॉलमध्ये क्रूझ शिरण्याआधी आमच्या क्रूझच्या अवतीभवती छोट्याछोट्या होड्यांत बसून स्कार्फ, शाली, गळ्यात घालायच्या माळा अशा वस्तूंची विक्री करणारे काही विक्रेते फिरू लागले. खरं तर आम्ही करुझच्या डेकवर म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास फूट उंचावर होतो. हे होड्यांमधून आलेले विक्रेते खालूनच आपला माल दाखवून किमती सांगत होते. घासाघीस करत होते. आमचे लक्ष वेधून घेण्यासाठी 'इंडिया इंडिया' असे खालूनच ओरडत होते. एकदा तर एका नावाड्याने एका शालीचं पॅकेट खालूनच आमच्या उंच डेकवर भिरकावलं. खरेदी विक्रीची ही अजब पद्धत पाहून मी थक्क झालो. नंतर आम्ही डेकवर रेंगाळलो. दुपारचा दीड वाजला होता. क्रूझ च्या डायनिंग हॉल मध्ये मस्तं जेवण झालं. क्रूझ लुक्सार च्या दिशेने जात होती. अंदाजे साडेतीनच्या सुमारास नदीच्या आजूबाजूला लुक्सार दिसू लागलं. चार वाजता लुक्सार शहराच्या किनाऱ्यावर क्रूझ थांबली. आत्ता संध्याकाळी आम्ही कर्नाक चं देऊळ आणि रात्री लुक्सारचं देऊळ बघणार होतो.
‘कर्नाक’ मंदिर.
![]() |
'कर्नाकचं' देऊळ |
![]() |
क्रायो-स्फिन्क्सच्या रांगा |
देवांचा राजा 'आमून' आणि 'रा' म्हणजे सूर्यदेव अश्या दोन देवांचं एकत्रीत 'आमून-रा' नावाच्या देवाचं हे देऊळ आहे. या देवळाचा परिसर खूपच मोठा असून देवळाची रचना एका सरळ रेषेत आहे. आतमध्ये विशाल स्तंभांची भव्य सभागृहे आहेत. अनेक लहानमोठी पूजास्थानं आणि पुतळे इथं लक्ष वेधून घेतात. साठपासष्ठ फूट उंच, दहाजणांच्या कवेत न मावणारे तब्बल एकशेचौतीस दगडी खांब बघताना मन हरकून जातं. डोळे अक्षरशः फाटतात. साडेतीन हजार वर्षांपूर्वी हे अवजड खांब इथं कसे आणले असतील? ते कसे उभे केले असतील? विचार करून मती अगदी गुंग होऊन जाते. या भव्यतेकडं बघताना आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव होते. सभागृहाच्या मध्यभागी दुसऱ्या रामसिस राजाचा महाभव्य पुतळा दिसत होता. त्याच्या पायाशी त्याच्या आवडत्या 'नेफरटारी' या राणीचा पुतळा होता.
![]() |
दुसऱ्या रामसिस राजाचा भव्य पुतळा |
सरळ पुढे गेल्यावर दुसऱ्या चौकात रस्त्याच्या डाव्या बाजूला एक ओबेलिस्क म्हणजे विजयस्तंभ दिसत होता. या अखंड दगडात कोरून काढलेल्या विजयस्तंभाच्या शिखरावर एक त्रिकोणी टोपी होती. उजव्या बाजूचा दुसरा विजयस्तंभाचा वरचा अर्धा भाग तुटून खाली पडलेला दिसत होता. हे विजयस्तंभ इजिप्त मधील सर्वात उंच विजयस्तंभ मानले जातात. यांची उंची जवळजवळ नव्वद फूट असून त्यावरील त्रिकोणी टोपी पूर्वी सोन्याची होती. 'हॅटशेपसूट' नावाच्या स्त्री फेरोनं आपल्या पित्याच्या स्मरणार्थ हे विजयस्तंभ उभे केले आहेत. या नव्वद फूट उंच विजयस्तंभांच्या उभारणी नंतर त्याहूनही उंच शहाण्णव फुटी उंच विजयस्तंभ 'तुतमोसिस' नावाच्या फेरो राजानं उभारला होता. मात्र हा सर्वात उंच स्तंभ रोमन राज्यकर्त्यांनी पळवून नेला. अजूनही तो रोम शहराची शोभा वाढवतो आहे. दोनतीन वर्षांपूर्वी मी माझ्या रोमच्या भेटीत पाहिलेला आहे.
![]() |
'स्कॅरॅब' म्हणजे शेणकिड्याची मोठी दगडी प्रतिमा |
या देवळाच्या पाठीमागील भागात एक मोठा तलाव आहे. या तलावाच्या समोरच एका चबुतऱ्यावर 'स्कॅरॅब' म्हणजे शेणकिड्याची मोठी दगडी प्रतिमा ठेवलेली आहे. हा स्कॅरॅब कीडा शेणाचा गोळा करून त्या शेणात आपली अंडी उबवतो. प्राचीन काळी हा कीडा पृथ्वीचं आणि पुनरुज्जीवनाचं प्रतीक मानत. काळ्या झुरळासारखा दिसणारा हा सहा पायांचा किडा प्राचीन इजिप्तमध्ये फार पवित्र मनाला जाई. या किड्याभोवती लग्न होण्यासाठी तीनदा, मूलं होण्यासाठी सातदा प्रदक्षणा घातली की तो पावतो अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या किड्याच्या प्रतिमेला प्रदक्षणा घालताना पाहून गंमत वाटली. कर्नाकचं हे देऊळ इतकं मोठं आहे की आम्ही इथं जवळ जवळ तीन तास भटकत होतो. कितीही वेळा ही भव्यता डोळ्यात भरून घेतली तरी समाधान होत नव्हते.
![]() |
देवळाच्या आतील सभागृह |
सूर्य मावळतीला उतरू लागला होता. आम्ही देवळाच्या बाहेर आलो तेंव्हा वीणा वर्ल्डचे आदित्य आणि दिना आमची वाट बघत बसपाशी आमची वाट बघत उभेच होते. आदित्यने सांगितलं की आता आपण लुक्सारचं देऊळ बघायला जाणार आहोत. त्यानंतर शॉपिंग करू इच्छिणाऱ्यांसाठी फ्री टाईम असेल. ज्यांना शॉपिंग करायचे नाही त्यांनी क्रूझवर जाऊन आराम केला तरी चालेल. आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे आज जेवणानंतर सर्वांसाठी ‘ईजिप्शियन बेली डान्स’ आयोजित आलेला आहे. (बेलीडान्स च्या अनाउन्समेंट मुळे ग्रुपमधील तमाम पुरुष मंडळींच्या चेहेऱ्यावर आनंद पसरला)
'लुक्सार'चं देऊळ...
![]() |
'लुक्सार'चं देऊळ |
![]() |
'लुक्सार'चं देऊळ |
आणखीन आतमध्ये दुसऱ्या सभागृहात पुन्हा दुसऱ्या रामसिस चे बसलेले पुतळे विराजमान झालेले दिसत होते. पुतळ्यांच्या खाली प्राचीन चित्रलिपीत माहिती कोरलेली दिसत होती. या दुसऱ्या रामसिस ना आपलं नाव कालातीत राहावं, अमर राहावं यासाठी स्वतःचे अनेक पुतळे उभे केले आहेत. पुढे आणखीन एक मोठा चौक दिसतो. त्याच्या डाव्याउजव्या बाजूंना अजस्त्र खांबांच्या रांगा दिसत होत्या. या प्रचंड खांबांना खुबीनं केलेल्या प्रकाशयोजनेमुळं सारं मंदिर उजळून निघालं होतं. फोटो तर किती काढू आणि किती नको असं झालं होतं. फेरोंच्या आश्रयानं इथं धर्म, कला,लेखन, संस्कृती, भरभराटीस आली होती. आम्ही त्या गतकाळातील वैभवाच्या खुणा विस्फारलेल्या नजरेनं बघत होतो, अनुभवत होतो...
![]() |
दुसऱ्या रामसिसच्या पुतळ्यांच्या खाली प्राचीन चित्रलिपीत कोरलेली माहिती |
पूर्वीच्या काळी कर्नाक आणि लुक्सारच्या देवळांदरम्यान जवळजवळ तीन किलोमीटर लांबीचा एक राजमार्ग होता. या राजमार्गावर दुतर्फा 'क्रायोस्फिन्क्स' ची रांग होती. क्रायोस्फिन्क्स म्हणजे सिंहाचं शरीर आणि माणसाचं मुंडकं असलेले सातशे वीस स्फिन्क्स या रस्त्याच्या दुतर्फा होते. आता त्यातले फक्त अठ्ठावन्न शिल्लक आहेत. हा दोन्ही देवळं जोडणारा मार्ग आता काळाच्या ओघात लुप्त झाला आहे. लुक्सार शहराच्या खाली गेला आहे. या देवळात आमून-रा देवाची प्रतिष्ठापना झालेली होती. या देवळांत आमून-रा देवाच्या राण्या राहत असत. दरवर्षी याच राजपथावरून आमून-रा आपल्या राण्यांना भेटण्यासाठी कर्नाक देवळातून लुक्सार च्या देवळात वाजतगाजत येत असे. दरवर्षी इथं त्यानिमित्ताने मोठा उत्सव होई. या उत्सवाला 'ओपेट'चा उत्सव म्हणत. इथल्या भिंतींवर 'ओपेट'च्या उत्सवाचे देखावे कोरलेले दिसतात. सगळंच आश्चर्यकारक आणि थक्क करून सोडणारं.
![]() |
'लुक्सार'चं देऊळ |
आमच्या ग्रुपमधील काही शॉपिंग प्रेमी मंडळी हे देऊळ फारसे न बघता आधीच देवळाच्या बाहेर पडून लुक्सार शहरातील प्रसिद्ध असलेल्या मार्केट मध्ये शॉपिंगला पळाली होती. इथले विक्रेते अतिशय आक्रमकपणे आमच्या दिशेने येत असत. आमचे भारतीय कपडे आणि तोंडावळा बघून "इंडिया इंडिया' ओरडत आपला माल विकायचा प्रयत्न करायचे. इथं घासाघीस देखील फार करावी लागे. 'घासाघीस करून सांगितलेल्या किमतीच्या निम्म्या किमतीत वस्तू मागा' असा सल्ला दिनाने आधीच दिलेला असल्याने खरेदीला धमाल येत होती. आम्ही मार्केट मध्ये आलोच आहोत तर किरकोळ खरेदी म्हणजे दोन स्कार्फ आणि फ्रीझ ला लावायचं मॅग्नेट घेतलं. आम्हाला शॉपिंग वगैरे काही करायचं नव्हतं, पण गम्मत म्हणून मार्केट मध्ये फेरफटका मारून आम्ही क्रूझ वर चालत चालत आलो. रात्रीचे नऊ वाजत आले होते.
![]() |
बेलीडान्स |
नेहेमीप्रमाणे क्रुझवरील अप्रतिम जेवण झाले, आणि उत्सुकतेने आम्ही बेलीडान्स बघायला क्रुझवरील तिसऱ्या मजल्यावरच्या बार हॉल मध्ये गेलो. बेलीडान्स म्हणजे सगळ्या अरब जगतातील लोकप्रिय नृत्यप्रकार. एक प्रकारचा कॅबेरे डान्स. अरबांच्या रुक्ष वाळवंटातील एकमेव करमणुकीचं साधन. मी आणि अलका काहीसे मागेच बसलो. काही वेळाने बरेचसे अंग दाखवत, अगदी तोकड्या अरबी पोशाखात एक सुंदरी (?) आली. उग्र मेकअप केलेली ही सुंदरी आपली जाड, थुलथुलीत कंबर आश्चर्यकारक वेगाने हलवत नृत्य करू लागली. कामुक हावभाव करून आपली भलीमोठी वक्षस्थळे हलवत ही ललना जेंव्हा पुढे बसलेल्या स्त्रीपुरुषांना जेंव्हा तिच्याबरोबर नृत्यात सामील करून घेऊ लागली तेंव्हा आम्ही दोघे दचकलो. हे काही आम्हाला झेपण्यासारखे नव्हते. तिच्या थुलथुलीत पोटाकडे आणि कंबरेकडे अगदी बघवेना. जाम कंटाळा आला. शिवाय उद्या पहाटे तीन वाजता उठून आम्हाला 'हॉट एअर बलून राईड' ला जायचं होतं, त्यामुळे लवकर झोपणं देखील आवश्यक होतं. बेलीडान्सच्या ओंगळ करमणुकीपेक्षा झोपणे आम्ही पसंत केले... उद्या 'हॉट एअर बलून राईड' साठी पहाटे तीन चा वेक अप कॉल होता. फक्त तीन चार तासांची झोप होणार होती. शिवाय उद्या 'व्हॅली ऑफ किंग्ज' आणि 'हॅटशेपसूट' राणीचं मंदिर देखील बघायचं होतं. उद्या प्रेक्षणीय स्थळं बघून आम्ही मुक्कामाला कैरो ला जाणार होतो. आमचा क्रुझवरील आजचा शेवटचा मुक्काम होता. क्रूझवर तीन दिवस धमाल आली होती.
'हॉट एअर बलून' ची धमाल, 'अद्भुत व्हॅली ऑफ किंग्ज', आणि हॅटशेपसूट देऊळ.
![]() |
हॉट एअर बलून |
![]() |
हॉट एअर बलून |
या तीसचाळीस फुट उंच असलेल्या अजस्त्र रंगीबेरंगी बलूनच्या खाली पंधरावीस माणसे बसतील एव्हडा एक पाळणा होता. आम्ही या पाळण्यात बसल्यावर जसजशी गरम हवा बलून मध्ये भरली जात होती, तसतसे आमचे बलून आकाशात उंच उडू लागले. जवळ जवळ हजार मीटर उंचीवर गेल्यावर आमचा बलून चालक विनोदाने म्हणाला "मला बलून उंचावर न्यायाचे प्रशिक्षण मिळाले आहे, पण मला बलून खाली उतरवण्याचे शिक्षण मिळाले नाही." हा विनोद तो प्रत्येक बलून राईड च्या वेळी करत असणार. असो... सुरवातीला वर जाताना तसा अंधारच होता. आता उंचीवर आल्यावर मात्र पूर्वेला सूर्योदयाचाही चिन्ह दिसू लागली. क्षितिजावर लाल केशरी रंग पसरला. आजूबाजूला आमच्या प्रमाणे दहापंधरा बलून्स उडत होते. अबू सिम्बल ला जाताना विमानातून काही हजार मीटर उंचीवरून सूर्योदय पहिला होता, तसेच काहीसे दृश्य होते. समोर उडणाऱ्या बलून्स च्या पार्श्वभूमीवरील त्या तेजस्वी दिनकराचे मला किती फोटो काढू असं झालं होतं. माझ्यातील सुप्त फोटोग्राफर जागा झाला होता. मी त्या विहंगम सूर्योदयाचे पटापट फोटो काढू लागलो. उंचावर गेल्यामुळे नाईल नदी आणि आजूबाजूचा सुपीक हिरवागार शेतीचा प्रदेश दिसत होता. नदीपासून दुतर्फा दीडदोन किलोमीटर चा हिरवागार परिसर संपल्यावर पुढे अमर्याद कोरडं ठक्क वाळवंट स्पष्टपणे दिसलं. खाली बघितलं तर अजूनही चालू असलेल्या पुरातन, प्राचीन अवशेषांचं उत्खदन, आणि अजूनही सापडणारे अवशेष दिसत होते. छोटी घरे, वाळवंटातून काळ्या रेघोट्या माराव्यात तसे डांबरी रस्ते दिसत होते. हा सर्व अनुभव कमालीचा वेगळा आणि अवर्णनीय असा होता. तासभर एखाद्या पक्षाप्रमाणे आकाशात विहरून आम्ही खाली आलो.
![]() |
हॉट एअर बलून |
आज क्रूझ मधून निघाल्यापासून एक व्हिडीओग्राफर व्हिडीओ कॅमेरा घेऊन सतत आमच्या बरोबर होता, आणि सतत आमच्या ग्रुपचे व्हिडीओ चित्रण करीत होता. आम्हाला समजत नव्हते की हे काम त्याला कुणी सांगितलं आहे? त्याचा उलघडा आम्हाला बलून राईड संपल्यावर झाला. बलून मधून उतरल्यावर त्याने सांगितले की 'तुमच्या आजच्या बलून राईडचे सर्व व्हिडीओ चित्रण मी केले आहे, या चित्रणाची डीव्हीडी तुम्हाला मी फक्त शंभर ईजिप्शियन डॉलर्स ना देईन. डीव्हीडी घ्यायची की नाही हे ऐच्छिक असेल.' व्यवसायाचा हा नाविन्यपूर्ण प्रकार पाहून मी थक्क झालो. (मी अर्थातच ही डीव्हीडी घेतली हे सांगायला नकोच.) पुन्हा मोटारबोटीतून पलीकडच्या तीरावरील आमच्या क्रूझवर आम्ही परत आलो तेंव्हा भूक लागली होती. क्रूझवर नाश्ता तयारच होता.
![]() |
हॉट एअर बलून |
'व्हॅली ऑफ किंग्ज'
![]() |
'व्हॅली ऑफ किंग्ज' |
![]() |
हजारो वर्षे टिकलेल्या ममीज |
थडग्यातील मौल्यवान वस्तू आणि मृत शरीरं चोराचिलटांपासून सुरक्षित राहावीत म्हणून आडवाटेवरच्या डोंगरच्या रांगांची जागा निवडली गेली तीच ही 'व्हॅली'. येथील डोंगरांच्या पायथ्यापासून आत खोल जमिनीत भुयारं खोदली जायची. या भुयारात चोरवाटा, गुप्त दरवाजेही असत. लुटारूंना फसवण्यासाठी हा भूलभुलैया असे. पण त्याचा उपयोग झाला नाही. लुटारूंना बरोब्बर सुगावा लागे. साडेतीन हजार वर्षात लुटारूंनी ही सगळी थडगी फोडून लुटून नेली. कधी कधी थडग्यांच्या बांधकामात कसूर राहायची, मग चोरटे त्याचा फायदा उठवायचे. या दरीत एकूण चौसष्ठ थडगी आहेत. ही सर्वच्या सर्व थडगी लुटारूंनी पूर्णपणे लुटली आहेत. फक्त 'तुतनखामुन' नावाच्या एका तरुण फेरोचं थडगं अगदी अलीकडेच सापडलं, त्यात मात्र ठेवलेली तुतनखामुन या फेरोची ममी आणि अमाप संपत्ती सापडली. १९२२ साली 'हॉवर्ड कार्टर' नावाच्या इंग्लिश संशोधकाला १८ व्या वर्षी मरण पावलेल्या तुतनखामुन राजाचं थडगं इथं सापडलं. लुटारुंच्या कचाट्यातून वाचलेलं हे एकमेव थडगं आहे. या थडग्यात तुतनखामुनच्या ममी बरोबर प्रचंड संपत्ती, ममीच्या चेहेऱ्यावर ठेवलेला आकरा किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा हे सर्व जसं च्या तसं सापडलं. १९२२ साली नोव्हेंबर महिन्यात कार्टरनं हे थडगं शोधून काढलं. या साठी तो तब्बल दहा वर्ष काम करत होता.
![]() |
'व्हॅली ऑफ किंग्ज' |
‘तुतनखामुन' फेरोचं थडगं
![]() |
'व्हॅली ऑफ किंग्ज' |
या व्हॅलीच्या सुरवातीला एक प्रवेशद्वार असलेली इमारत होती. तिथं आम्ही तिकिटं दाखवून आत शिरलो. सुरवातीलाच असलेल्या प्रशस्त हॉल मध्ये या व्हॅलीची पारदर्शक फायबर मध्ये बनवलेली एक प्रतिकृती काचेच्या आवरणात ठेवलेली होती. त्यामुळे दरीच्या खाली जमिनीत या थडग्यांसाठी भुयारं कशी काढलेली आहेत ते कळतं. या प्रवेशद्वारानंतर वाळूतुन व्हॅलीकडे जाण्यासाठी एक डांबरी रस्ता होता. या रस्त्याच्या दुतर्फा वाळूच्या रंगाचे भुऱ्या रंगाचे खडबडीत डोंगर होते. या मुख्य दरीला मिळणाऱ्या अनेक दऱ्या होत्या. थडग्यांच्या ठिकाणी जाताना वाहनांच्या धुरामुळे थडग्यातली चित्रं खराब होऊ नयेत म्हणून इथल्या सरकारनं विजेवर चालणाऱ्या गाड्यांची सोय केली आहे. शिवाय या गाड्यांमुळे दुपारच्या कडक उन्हापासूनही बचाव होत होता. या गाड्यातून आम्ही थडग्यांपाशी पोहोचलो. थडगी बघण्याची प्रचंड उत्सुकता मनात दाटून आली होती.
![]() |
'तुतनखामुन'च्या सुप्रसिद्ध थडग्याजवळ मी आणि अलका |
मी, अलका आणि आमच्या ग्रुपमधील चारपाच जणांनी सर्वप्रथम मोर्चा वळवला तो 'तुतनखामुन'च्या सुप्रसिद्ध थडग्याकडे ! दरीच्या सुरवातीलाच असलेलं हे थडगं बाहेरून बघताना त्याचा उथळपणा जाणवतो. मनात आलं की इतकं उथळ, जमिनीलगत असलेलं हे थडगं सर्वात शेवटी का सापडलं असावं? प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पर्यटकांसाठी बांधलेल्या पायऱ्यांवरून आम्ही खोल खोल उतरू लागलो. उतार संपल्यावर आत एक प्रशस्त खोली लागली. या खोलीच्या डाव्या बाजूच्या एका दुसऱ्या खोलीत साक्षात तुतनखामुनची ममी एका बंदिस्त काचेच्या पेटित ठेवलेली होती. अठराव्याच वर्षी मरण पावलेला हे तरुण फेरो अगतिकपणे पडल्यासारखा वाटत होता. काळा पडलेला जीर्ण हाडांचा सापळा, पाठीमागे किंचित लांबट असलेली डोक्याची कवटी, डोळ्यांची भोके आणि स्पष्टपणे दिसणारे पांढुरके दात. एव्हड्या मोठ्या इजिप्त साम्राज्यचा हा राजा इथं तब्बल चार हजार वर्षे अगतिकपणे चिरविश्रांती घेतोय. अजून किती वर्षे त्याची ही विश्रांती चालणार कुणास ठाऊक? माझ्या मनात विचारांची गर्दी झाली.
![]() |
'तुतनखामुन'ची ममी |
उजव्या बाजूला चारपाच फूट खोल असलेल्या एका मोठ्या खोलीत एक दगडी शवपेटी ठेवलेली होती. याच शवपेटीत तुतनखामुनची ममी सापडली होती. आत एकात एक अश्या सोन्याच्या पेट्या होत्या. तुतनखामुनच्या चेहेऱ्यावर खांद्यापर्यंत आकरा किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा होता. हा मुखवटा आणि इथं थडग्यात सापडलेली अमाप संपत्ती कैरो मधील नॅशनल म्युझियम मध्ये ठेवली आहे. आमच्या ट्रीपमधील पहिल्याच दिवशी आम्ही हा मुखवटा म्युझियम मध्ये पाहिलेला होता. या खोलीच्या भिंती आणि भिंतींवरील त्याकाळी काढलेली रंगीत चित्रं मात्र सुस्थितीत आहेत. या तुतनखामुनच्या थडग्यात पर्यटकांची मात्र फारशी गर्दी नव्हती. बहुदा जास्तीचं वेगळं तिकीट असल्यामुळं इथं शुकशुकाट होता. माझ्या मनात विचार आला "बरं झालं हे सगळं पाहण्यात रस नसलेले आणि कुरकुरणारे सहप्रवासी इथं आले नाहीत, अन्यथा त्यांनी नाकं मुरडत चर्चा केली असती "एव्हडे पैसे खर्च करून इथं येऊन काय बघायचं तर सडलेलं प्रेत आणि फक्त एक दगडी शवपेटी." मी मात्र काहीतरी अद्भुत बघायला मिळालं या समाधानात तिथून बाहेर पडलो.
![]() |
'तुतनखामुन'ची ममी या खोलीत सापडली |
तुतनखामुनचं थडगं बघितल्यावर नववा रामसिस, चौथा रामसिस आणि मेरेनप्ताह या फेरोंची थडगी आम्ही पहिली. या सर्वच थडग्यांत प्राचीन शिल्पकला चित्रकला हजारो वर्षे आबादित राहिली. त्यातील संपत्ती जरी लुटारूंनी लुटली असली तरी प्राचीन चित्रलिपीतील पुरावे मात्र टिकले. सर्वच थडग्यातील भिंती चित्रलिपीने भरलेल्या आहेत. मृत फेरोराजे किती चांगले होते याची रसभरीत वर्णने केलेली इथं आढळतात. इथल्या चित्रातून या प्राचीन संस्कृतीचं आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीशी असलेलं साम्य जाणवलं. कारण आपल्या हिंदू संस्कृतीतील गणपती, नरसिंव्ह यांच्याप्रमाणेच फेरोंच्या काळातील देवदेवतांना प्राण्यांची तोंडं जोडलेली दिसतात. प्राचीन काळातल्या 'अनुबिस' देवाला कुत्र्याचं तोंड, तर 'रा' नावाच्या देवाला गरुडाचं तोंड होतं. हॅथॉर नावाच्या देवतेला गायीचं तोंड होतं. आपलया मारुतीला नाही का वानराचा चेहेरा. त्याकाळी मांजर फार शुभशकुनी मानलं जाई, त्यामुळे त्याकाळी मांजराची पूजाअर्चा व्हायची. आश्चर्य म्हणजे हिंदू आणि ईजिप्शियन संस्कृत्या एकाच काळात विकसित होत होत्या, झाल्या होत्या. ईजिप्शियन संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या चिरंतन प्रवासाची संकल्पना हिंदू संस्कृतीतल्या पुनर्जन्माच्या संकल्पनेशी मिळतीजुळती आहे. तिकडे नाईल नदी ईजिप्शियन संस्कृती तर इकडे सिंधू नदी हिंदू संस्कृती जोपासत होत्या. पण दुर्दैवाने प्राचीन हिंदू संस्कृतीचे ठोस पुरावे मिळाले नाहीत. जे मिळाले ते आपण नीट सांभाळले नाहीत. जिथं ते मिळालेत ती हडप्पा, मोहेंजोदडो आता आपल्या भारतात देखील नाहीत. आता पाकिस्तानमध्ये असलेल्या आपल्या प्राचीन संस्कृतीचे संशोधन होणे कितीही गरजेचं असलं तरीही अशक्यच! असो...
'हॅटशेपसूट' राणीचं मंदिर
![]() |
'हॅटशेपसूट' राणीचं मंदिर |
![]() |
'हॅटशेपसूट' राणीचं मंदिर |
आमची बस दुतर्फा असलेल्या वाळवंटी प्रदेशातून, तुरळक वस्तीतून, आजूबाजूला ठायीठायी असलेल्या प्राचीन अवशेषातून 'हॅटशेपसूट' राणीच्या देवळाकडे जात होती. जिथं आमची बस थांबली तिथून चालत जाण्याच्या थोड्या अंतरावरील देवळाकडे आम्ही जाऊ लागलो. उन्हाचा कडाका प्रचंड होता. थोड्या दूरवर असणाऱ्या देवळाकडे त्याच्या बांधणीचं वेगळेपण मला जाणवायला लागलं. समोरच्या चंद्राकृती आकाराच्या उंच डोंगराच्या कुशीत हे देऊळ आडवं पसरलेलं आहे. जसजसं जवळ जात होतो तसतसं लक्षात आले की हे देऊळ तीन मजली असून त्याची भव्यता डोळ्यात मावण्यासारखी नाही. हे देऊळ तीन हजार वर्षांपूर्वीचं आहे हे सांगून खरं वाटणार नाही, इतकं ते देखणं आहे. हे देऊळ पूर्वी हजारो वर्षे वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं.
![]() |
'हॅटशेपसूट' राणीचं मंदिर |
थोडं चालून गेल्यावर एका तिरप्या रॅम्प प्रमाणे दिसणाऱ्या चढत्या पायऱ्यांवरून चढून आम्ही देवळाच्या पहिल्या मजल्यावर आलो. इथं दोन्हीही बाजूला भव्य खांब होते. प्रत्येक खांबावर हॅटशेपसूट राणीचा फेरोंच्या वेषातला पुतळा होता. आतल्या भिंतीवर चित्रलिपीत या राणीच्या राजवटीतील अनेक यशोगाथा, घटना चितारलेल्या आहेत. दिनाने सांगितलेलं ' कर्नाक च्या देवळात हॅटशेपसूट राणीनं बसवलेले विजयस्तंभ वाहून नेतानाचं चित्र' ही इथं दिसलं. वरच्या मजल्यावरची देवळाची रचनाही काहीशी अशीच होती. तिसऱ्या मजल्यावर मधोमध राणीचं मंदिर आहे. या देवळाची सध्या अवस्था मात्र तशी वाईटच आहे. या राणीच्या नंतर सत्तेवर आलेल्या फेरोंनी राणीचे पुतळे विद्रुप केले आहेत. वरून आजूबाजूचा सर्व परिसर दिसतो, त्यात मोडतोड केलेल्या भग्न इमारती, पुतळे इतस्ततः विखुरलेले आहेत.
आम्हाला हे देऊळ बघण्यासाठी एकदिड तासाचा अवधी मिळाला होता. देवळात भटकून आम्ही पुन्हा बस मध्ये येऊन बसलो. बाहेर भयंकर ऊन होतं. बस मधील एअरकंडिशनरमुळे जिवात जीव आला. आज संध्याकाळी आम्ही कैरो ला जाणार होतो. तोपर्यंत आता दुपारचे जेवण, आणि वाटेतले एक प्राचीन ठिकाण बघायचं होतं. बस निघाली. वाटेत बस एका मोठ्या दुकानाच्या समोर थांबली. दुकानाच्या प्रवेशद्वारापाशी काही कामगार दगडांच्या वस्तू बनवत बसले होते. ठिसूळ पण मार्बलप्रमाणे असलेल्या दगडावर कारागिरी करताना दगडाची धूळ सर्वत्र उडत होती. नाकाला फडकं बांधून कामगार काम करत बसले होते. 'दुकानातल्या दगडांच्या वस्तू बनवताना कामगारांना किती कष्ट पडतात' हे पर्यटकांना दाखवण्यासाठी हा खटाटोप. दुकानात इथंच हाताने बनवलेल्या वस्तू दिसत होत्या. काही वस्तू रंगीत दगडातही बनवलेल्या होत्या. फेरो राजांचे छोटे पुतळे, ईजिप्शियन देवतांचे पुतळे, सुप्रसिद्ध नेफरटीटी राणीचे छोटे पुतळे, छोट्या शवपेट्यांच्या प्रतिकृत्या दुकानात शोकेस मध्ये मांडून ठेवल्या होत्या. एका कपाटात ठेवलेल्या फिकट हिरव्या पारदर्शक वस्तू दाखवताना सेल्समनने अचानक दुकानातील सर्व दिवे घालवून अंधार करण्यात केला. अंधारात ह्या सर्व हिरव्या वस्तूंमधून चक्क प्रकाश येऊ लागला. या शोकेस मधील सर्व वस्तू रेडियम सारख्या चमकू लागलया. अर्थातच या सर्व वस्तूंच्या किमती अफाट होत्या. काही हौशी सहप्रवाश्यांनी मनमुराद खरेदीचा आनंद लुटला.
![]() |
'रामासीयम' च्या देवळाचे भग्नावशेष |
आता पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवायला जाताना बसमधून रस्त्याच्या डाव्या बाजूला पन्नास साठ फूट उंचीचे बसलेल्या स्थितीतीतल्या कुणाचे तरी अजस्त्र पुतळे दिसू लागले. हे पुतळे जवळ आल्यावर बस थांबवण्यात आली. या ठिकाणाची माहिती देताना दिना म्हणाली "खरं तर लुक्सार मधील हे सर्वात देखणं, पण आता पूर्णपणे नष्ट झालेलं देऊळ. स्वतःची महती सांगण्यासाठी दुसऱ्या रामसिसनं जी अनेक देवळं बांधली, त्यापैकी हे एक. समोरचे दोन्हीही पुतळे दुसऱ्या रामसिसचेच ! आम्ही बस मधून उतरून फोटो घेऊ लागलो. खूप मोठ्या मैदानावर या मंदिराचे अनेक भग्नावशेष विखुरलेले होते. काळाच्या ओघात रामसिसचे दोन्हीही पुतळे जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने ते विद्रुप दिसत होते. या देवळाला 'रामासीयम' असे म्हणतात".
![]() |
पिझ्झ्यावर ताव |
जेवण्यासाठी आमची बस लुक्सार शहराच्या मध्यवर्ती भागातल्या पिझ्झाहट च्या रेस्टॉरंट समोर थांबली. आज दुपारचा जेवण पिझ्झ्याचं होता. मी मला आवडणाऱ्या पिझ्झ्यावर ताव मारला. पण अलकाला पिझ्झा आजिबात आवडत नाही. अलकाप्रमाणेच बऱ्याच सहप्रवाश्याना पिझ्झ्याचं जेवण आवडलं नाही. कुरकुरणारी मंडळी कुरकुरत होती. असो...
आजचा दिवस लुक्सार मधील शेवटचा दिवस होता. लुक्सार एअरपोर्ट वरून कैरो कडे जाणारी आमची फ्लाईट संध्याकाळी सहा वाजता होती. जेवणानंतर बसमधूनच लुक्सार शहरातून फेरफटका मारत आम्ही लुक्सार विमानतळावर पोहोचलो. लुक्सार वरून कैरोला पोहोचायला आम्हाला संध्याकाळ झाली. आम्ही ट्रीपच्या पहिल्या दिवशीच उतरलेल्या 'कैरो पिरॅमिड हॉटेल' मध्ये मुक्काम केला. आज आमचा फेरोंच्या राज्यातला म्हणजे इजिप्त मधील शेवटचा मुक्काम होता. उद्या वीस तारखेच्या संध्याकाळी कैरोहुन मुंबई कडे जाणारे विमान संध्याकाळी सहाला होते. रात्री झोपल्यावर तुतनखामुनचं थडगं डोळ्यासमोर येत होतं. त्यावेळी नेमकं काय घडलं असेल? तिथलं वातावरण कसं असेल? मृत फेरोंबरोबर थडग्यात बंद केलेल्या त्यांच्या दासदासींची मानसिकता कशी असेल? असले काहीतरी विचार करता करता रात्री उशिरा झोप लागली.
फेरोंच्या राज्यातून पुन्हा मुंबईकडे...
![]() |
ईजिप्शियन नाश्ता |
![]() |
कैरोमधील तुळशीबाग |
हॉटेल मधून सकाळी लवकर बाहेर पडून आम्ही लुक्सार शहरातील मेन मार्केट गेलो. आपल्या पुण्यातल्या तुळशीबागेप्रमाणे गजबजलेल्या मार्केट मध्ये दीड दोन तास भटकलो. घासाघीस करून, काहीही न खरेदी करता (फक्त अत्तराच्या दोन छोट्या कुप्या मात्र घेतल्या) टाईमपास करत करत आम्ही मार्केट मध्ये भटकलो. दुपारी दोन वाजता 'फिशबोट' नावाच्या एका मोठ्या बोटीचा आकार असलेल्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवण केले. ह्या नाईल नदीवर तरंगणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जेवताना वेगळीच मजा आली. कैरो शहरातून रमतगमत फिरत आम्ही चार वाजेपर्यंत कैरो विमानतळावर आलो. सर्व सुरक्षेचे सोपस्कार करून संध्याकाळी सहा वाजता आम्ही मुंबई कडे झेपावलो.
![]() |
'फिशबोट' मध्ये जेवण |
गेले आठ दिवस आम्ही एका वेगळ्याच विश्वात होतो. तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीच्या फेरोंच्या राज्यात भटकत होतो. पाच हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अवशेषांमधून फिरताना ईजिप्तमधील आजचं जीवनही इथं अखंड चालूच आहे. प्राचीन अवशेष बघून आपण थकलो की इथल्या आधुनिक जीवनपद्धतीत आपण विसावतो. निसर्गाची नानाविध रूपं गेल्या आठ दिवसात अनुभवायला मिळाली. नाईल नदीचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचं माझं अनेक वर्षांचं स्वप्न या फेरोंच्या राज्यात भटकताना पूर्ण झालं…
![]() |
मुंबईकडे प्रयाण |
राजीव जतकर.
संदर्भ: इजिप्तायन - मीना प्रभु.
माहितीचं भांडार: गुगल