'द बॉय इन द स्ट्राईप्ड पायजमाज' (मला आवडलेलं पुस्तक)
ही अस्वस्थ करणारी व्हिडीओ क्लिप बघितल्यानंतर काही दिवसातच लेखक जॉन बायेन लिखित आणि मुक्ता देशपांडे यांनी अनुवादित केलेले 'द बॉय इन द स्ट्राईप्ड पायजमाज' नावाचे एक अफाट पुस्तक माझ्या वाचनात आले. दुसऱ्या महायुद्धात घडलेली, आठ नऊ वर्षाच्या 'ब्रुनो' नावाच्या लहान मुलाच्या भावविश्वात होणाऱ्या उलथापालथीची ह्यात कहाणी आहे. युद्ध मोठी माणसे करतात, पण स्त्रिया, लहान मुले यांच्या मनावर, आयुष्यावर युद्धाचे किती खोलवर परिणाम होतात याची जाणीव करून देणारी ही कथा आहे. गोष्ट तशी साधीच आहे, पण लेखकाच्या लेखनशैली मुळे, ही छोटेखानी कादंबरी अतिशय औत्सुक्यपूर्ण, आणि वास्तववादी होते. जॉन बायेन ह्या संवेदनशील लेखकाची लेखनशैली आणि मुक्ता देशपांडे यांनी केलेला स्वैरानुवाद कोणत्याही सर्जनशील मन असलेल्या वाचकाच्या मनात थेट उतरतो.
दुसऱ्या महायुद्धात नाझी भस्मासुरांनी उघडलेल्या छळछावण्या, त्यात लाखो ज्यूंचा होणारा नरसंहार अशा घटनांची पार्श्वभूमी या कथेला आहे. पोलंड मधील अनेक छळछावण्यांपैकी ऑशविट्झ नावाच्या छळछावणीत रोज साडेतीन चार हजार ज्यूंना विषारी गॅस चेंबरमध्ये कोंडून ठार केले जायचे. नंतर हे हजारो मृतदेह आगीच्या भट्ट्यांमधून जाळण्यात येत असत. जर्मनीची राजधानी बर्लिन मध्ये या युद्धाची झळ सुरवातीला फारशी बसलेली नव्हती. या कादंबरीतल्या 'ब्रुनो' ची गोष्ट तशी साधीच, फारशी गुंतागुंत नसलेली, पण ब्रूनोच्या मनातील होणाऱ्या उलाघालीची ! 'ब्रुनो' बर्लिन मधील एका सुखवस्तू कुटुंबाचा एकुलता आठ वर्षाचा मुलगा. त्याला 'ग्रेटेल' नावाची १३ वर्षांची मोठी बहीण असते. ब्रूनोचे वडील नाझी सैन्यात हिटलरच्या मर्जीतील मोठे अधिकारी असतात. घरात प्रेमळ आई, लाड करणारे आजीआजोबा, खट्याळ, नटखट बहीण असल्याने ब्रुनो चे बालपण अगदी आनंदात जात असते. रोज शाळेला जाणे, मित्रांबरोबर दंगामस्ती करणे हा ब्रुनो चा दिनक्रम असतो. दुसरे महायुद्ध चालू असल्याचे त्याच्या खिजगणतीतही नसते.
एके दिवशी मात्र छान, मजेत आयुष्य चाललेल्या ब्रूनोच्या आयुष्यात एक वादळ येते. ब्रूनोच्या वडिलांना नोकरीत बढती मिळते आणि त्यांची बदली बर्लिन पासून दूर असलेल्या ऑशविट्झ छळछावणीवर देखरेख करण्यासाठी होते. या छळ छावणीत प्रमुख कमांडंट पदावर रुजू होण्यासाठी त्यांना आणि अर्थातच ब्रुनो सहित सर्वांना बर्लिन सोडून जावे लागणार होते. या बढतीमुळे ब्रूनोच्या वडिलांच्या मित्रांना, नातेवाईकांना खूप आनंद होतो. पण ब्रुनो मात्र नाराज होतो. त्याला बर्लिन सोडून कुठेतरी दूर रुक्ष, ओसाड जागी असलेल्या ठिकाणी राहायला जावे लागणार होते. ब्रुनो त्याच्या शाळेशिवाय, शाळेतल्या त्याच्या आवडत्या मित्रांशिवाय एकटा पडणार होता. तिकडे गेल्यावर आपल्याला करमणार कसे? आपल्याबरोबर खेळायला कोण असेल? या काळजीत ब्रुनो पडला होता.
ऑशविट्झ छळछावणीच्या जवळच असलेल्या एका बंगल्यात ब्रुनो आणि त्याचे कुटुंबीय राहू लागतात. ब्रुनो मात्र एकटे पडल्याने काहीसा दुःखी राहू लागतो. आईवडील त्याची समजूत घालतात, पण व्यर्थ ! एव्हडेच काय पण बहीण ग्रेटल बरोबर भांडण्यातही त्याला रस उरलेला नसतो. एकेदिवशी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या त्याच्या खोलीच्या खिडकीतून त्याला दूरवर काही घरे दिसतात. तिथे पट्टेरी कपडे घातलेल्या माणसांची हालचाल दिसते. पण स्पष्टपणे काहीच न दिसल्याने त्याची उत्सुकता चाळवते. तो बाबांना ह्या घरांबद्दल आणि पट्टेरी कपडे घातलेल्या माणसांबद्दल विचारतोही, पण बाबा त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरे देत नाहीत, आणि ब्रूनोला तिकडे जायला बंदीही केली जाते. ब्रूनोला बाबांचा राग येतो. पण काय करणार? बाबांना उलटं कसं बोलायचं? पण त्या कुंपणापलीकडं काय गूढ असावं या विचाराने तो अस्वस्थ राहू लागतो. कुंपणापलीकडचं रहस्य शोधून काढायचंच असा तो निश्चयही करतो.
कुंपणाच्या अगदी लगेचच पलीकडे ब्रूनोला एक साधारणपणे त्याच्याच वयाचा छोटा मुलगा बसलेला दिसतो. त्याने देखील पट्टेरी पायजमा आणि ढगळा शर्ट घातलेला असतो. "माझं नाव ब्रुनो... तुझं" ? ब्रूनो त्याची ओळख करून घेण्यासाठी आपणहून प्रश्न विचारतो. "माझं नाव श्म्युल" त्या पट्टेरी पायजम्यातील मुलगा उत्तर देतो. पाहताच क्षणी ब्रूनोला हा श्म्युल आवडतो. एकट्या पडलेल्या ब्रूनोला एक नवीन मित्र मिळालेला असतो. मग या दोघांचं रोज ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी, गप्पा मारायला भेटायचं ठरतं. कुंपणाच्या एका बाजूला ब्रुनो आणि पलीकडे श्म्युल अशा या मित्रांच्या गप्पा सुरु होतात. कधी कधी बुद्धिबळाचा डावही रंगू लागतो.
एकदा श्म्युल रडवेला होऊन ब्रूनोला सांगतो कि त्याचे बाबा (त्यांना तो 'पा' म्हणत असतो) हरवले आहेत. दोन दिवस झाले त्याला ते दिसलेले नसतात. ब्रुनोला ही वाईट वाटते. तो आपल्या मित्राची समजूत घालतो आणि त्याच्या ‘पा’ ना हुडकण्यासाठी मदत करेन असे आश्वासन देतो. श्म्युल ला मदत करण्यासाठी दुसऱ्या दिवशी ब्रुनो कुंपणापलीकडे जायचं ठरवतो. दुसऱ्या दिवशी जर्मन सैनिकांना ओळखू येऊ नये म्हणून श्म्युल ब्रूनोला एक छोट्या मापाचा पट्टेरी पायजमा आणि शर्ट देखील घेऊन येतो. काटेरी कुंपणातुन कपड्याची देवाणघेवाण होते. कुंपणाखालची जमीन उकरून कसेबसे सरपटत ब्रुनो कुंपणापलीकडे जातो. दोघेही श्म्युल च्या 'पा' ना हुडकू लागतात. कैद्यांच्या पट्टेरी कपड्यातील ब्रुनो सगळ्या कैद्यांमध्ये बेमालूमपणे मिसळून जातो.
आता सर्वांबरोबर ब्रुनो आणि श्म्युल एका बंदिस्त अंधाऱ्या खोलीत कोंडले जातात. या दोन्हीही मित्रांना खूप भीती वाटत होती. या बंदिस्त अंधाऱ्या खोलीचं लोखंडी दार कर्कश्य आवाज करत खाडकन बंद केले जाते. आता अंधारात भर पडून काहीच दिसेनासे होते. ब्रूनोला अगदी शेजारचा श्म्युल देखील दिसेनासा होतो. भीतीने दोघेही मित्र एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवतात. आता ब्रूनोला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. अंगाची लाही लाही व्हायला लागते. त्याला जाणवते श्म्युल च्या हातात असलेला आपला हात त्याने घट्ट आवळून धरला आहे. ब्रूनोला अचानक छातीत तीव्र वेदनेची जाणीव होते आणि डोळ्यासमोर अंधार होतो...
राजीव जतकर.