Wednesday, 22 August 2018

मृत्यूच्या वाटेवरचा आशेचा किरण...'ऑस्कर शिंडलर'.


मृत्यूच्या वाटेवरचा आशेचा किरण...'ऑस्कर शिंडलर'.

ऑस्कर शिंडलर

आतापर्यंत हिंदुस्थानावर अनेक परकीय आक्रमणे झाली. अनेक परकीय राजवटी आल्या. जेत्यांची राजवट पराभूत स्थानिकांना नेहेमी क्रूरच वाटते, आणि ती असतेही. जेते हे पराभूतांना नेहेमीच अपमानास्पद वागणूक देऊन छळ करतात. आधी मोगलांनी आणि मग इंग्रजांनी भारतीयांवर सत्ता गाजवताना त्रास दिला. जेत्यांच्या मग्रुरीमुळे, उन्मादामुळे पराभूतांच्या कत्तली (मास किलिंग) देखील होतात. अलीकडच्या इंग्रजांच्या काळातील जालियनवाला बाग सारखी एखाददुसरी घटना सोडली तर भारतीयांच्या नशिबी सभ्य शासकच आले असेच म्हणावे लागेल. दुसऱ्या महायुद्धाची झळ आम्हा भारतीयांना फारशी बसली नाही. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर त्याच्या नाझी चांडाळचौकडीने सार्वजनिक मानवी कत्तलिंचे सर्व विक्रम मोडीत काढले. दुसऱ्या महायुद्धाची आपण माहिती घेतली तर भारतावर राज्य करणारे इंग्रज राज्यकर्ते नाझी राज्यकर्त्यांपेक्षा शतपटीने चांगले होते असेच म्हणावे लागेल. माझे म्हणणे थोडे धक्कादायक वाटले तरी दुसऱ्या महायुद्धातील परिस्थितीचा तुलनात्मक विचार केला तर युरोपातील आणि भारतातील पारतंत्र्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आधी काहीशी सभ्य इंग्रजी राजवट आणि नंतर आता स्वैराचाराचा अतिरेक असलेली लोकशाही उपलब्ध झाल्यामुळे आम्हा भारतीयांना स्वातंत्र्याचे खरे महत्व कधी कळलेच नाही. स्वातंत्र्याचे महत्व काय असते हे जाणून घ्यायला प्रत्येक भारतीयाला दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाचा अभ्यास करणे अनिवार्य केले पाहिजे.

१९३९ मध्ये जर्मन सैन्याने पोलंडवर स्वारी करून त्यांचा दारुण पराभव केला. नाझी सैन्याच्या झंझावाताने पोलिश सैन्याला सावरायला आणि विरोध करायला फारशी संधी देखील मिळू शकली नाही. ज्यू वंशाचे नागरिक पोलंड मध्ये मोठ्या प्रमाणात होते. ज्यू लोकांचा प्रचंड तिरस्कार करणाऱ्या हिटलर आणि मंडळींनी प्रथम काय केलं तर सर्व ज्यू लोकांच्या नावांची नोंदणी सुरु केली. छोट्या वस्त्या, खेड्यांमधून त्यांच्या जवळच्या शहरात आणून त्यांचे पुनर्वसन करायला सुरवात केली. पुनर्वसन कसले ते... आपली सोयीसाठी 'घेट्टो' नावाच्या कोंडवाड्यात एकत्र केले इतकेच ! विचार करा पिढीजात व्यवसाय, घरदार, मालजुमला सोडून कुठेतरी भलतीकडेच राहायला जायचं? तिथेही नाझी सैनिकांचा मार खात, अपमानास्पद परिस्थितीत मोलमजुरी करायची. राहायला कोंदट वातावरणातील अंधाऱ्या बराकी, आठवड्यात कधीतरी सार्वजनिक अंघोळी, दीडदोनशे कैद्यांच्या प्रातर्विधीसाठी आठ ते दहा शौचालये, खायला पावाचा एक तुकडा आणि छोटं भांडंभर सूप, आणि सर्वात वाईट म्हणजे कोणत्याही किरकोळ कारणाने नाझी सैनिकांच्या गोळीने येणाऱ्या मरणाची भीती... 

घेट्टो मधील ज्यू कैद्यांच्या रांगा

 पोलंडची राजधानी असलेल्या वार्सा शहराच्या दक्षिणपूर्वेला असलेल्या 'क्रॅकोव्ह' नावाच्या शहरात मार्च १९ ४० रोजी नाझी सरकारची एक दवंडी पिटली जात होती. 'क्रॅकोव्ह' आजूबाजूच्या गावावस्त्यातील ज्यूंनी घेट्टो मध्ये राहायला जावे, जे ज्यू घेट्टो मध्ये राहायला जाणार नाहीत त्यांच्या जीविताची हमी ज्याची त्याने घ्यावी'. वास्तविक सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे सप्टेंबर १९३९ मधेच नाझी जनरल झिगमंड च्या सैन्याने क्रॅकोव्ह शहर काबीज केले होते. नाझी सरकार ने सर्व ज्यू नागरिकांची बँकेची खाती गोठवली. मुलांच्या शाळा बंद केल्या. व्ययसाय सक्तीने बंद करायला लावले. बायाबापड्यांच्या अंगावरचे दागिनेही जप्त झाले. आणि आता ही मार्च ची दवंडी...   ज्यूंनी घेट्टो मध्ये जाण्याचा शेवटचा दिवस २० मार्च असा ठरवण्यात आला होता.

ज्यू कैद्यांना राहण्यासाठी च्या बराकी - कोंडवाडे 
घेट्टो’ म्हणजे शहराच्या थोडं बाहेर दगडी भिंतीच्या आत बांधलेल्या कोंदट खुराड्यासारख्या चाळी. ह्या घेट्टोत जाण्यासाठी हजारो ज्यूंनी अक्षरशः रंग लावल्या. इथं घेट्टोत राहताना देखील ज्यूं नागरिकांवर अनेक बंधने घातली गेली होती. ज्यूंनी कोणत्याही जर्मन नागरिकांशी किंवा अधिकाऱ्याशी बोलताना प्रथम 'मी ज्यू आहे' असे सांगणे बंधनकारक केले गेले. प्रत्येक ज्यू ने आपली उजव्या दंडावर ज्यू असल्याची खूण किंवा ओळख म्हणून चांदणीचे चित्र असलेली पिवळ्या रंगाची पट्टी बांधणे बंधनकारक केले गेले. घेट्टो मधील चाळीत खूप छोट्या छोट्या खोल्या होत्या. एका छोट्या खोलीत तीनतीन कुटुंबे दाटीवाटीने राहत होती. सगळीकडे तुंबलेली गटारं आणि घाणीचे साम्राज्य ! 'अशा भयानक परिस्थितीत, अपमानास्पद जगण्यापेक्षा मरण काय वाईट'? अशीच भावना प्रत्येकाच्या मनात होती. अशा भयावह परिस्थितीत या ज्यू कैद्यांना एकाच आशेचा किरण दिसू लागला तो म्हणजे कारखानदार, उद्योगपती 'ऑस्कर शिंडलर'...

हान्स शिंडलर आणि लुसिया शिंडलर या दाम्पत्याला ऑस्कर आणि एल्फ़्रिड (बहीण) ही दोन अपत्यं. हे कुटुंब मूळचं ऑस्टिया मधलं आणि खाऊनपिऊन सुखी होतं. वडिलांचा म्हणजे हान्स शिंडलरचा शेतीची अवजारं दुरुस्त करायचा कारखाना होता. त्यामुळं ऑस्करला यंत्रांशी खेळायचं बाळकडू लहानपणीच मिळालं होतं. हे कुटुंब कॅथॉलिक ख्रिश्चन आणि काहीसं सुधारणावादी देखील होतं. 'स्वतःच्या धर्माबद्दल स्वाभिमान ठेऊन दुसऱ्या धर्माचा आदर करावा' हे संस्कार ऑस्करला लहानपणापासूनच मिळाले होते. जातपात, धर्म वगैरे गोष्टींच्या तो पलीकडे होता. त्यामुळे हिटलरचा ज्यू द्वेष, त्यांच्या कत्तली त्याला फारसे पटत नव्हते.  पण विरोधही नसावा.

  त्या काळात सर्व जर्मन नागरिकांना त्यातही तरुणांना सैन्य भरतीसाठी सक्ती केली जायची. ही सक्तीची सैन्य भरती तरुण ऑस्करला मानवणारी नव्हती. स्वभावाने व्यावसायिक, आणि उद्योगी असणाऱ्या ऑस्करला या युद्धाच्या काळात व्यावसायिक संधी दिसत होती. १९३८ मधेच जर्मन सैन्याबरोबरच त्याने क्रॅकोव्ह शहरात व्यवसायिक हेतूने पाय ठेवला. युद्धाच्याच पार्श्वभूमीवर त्याने ऑस्करनं क्रॅकोव्ह च्या उपनगरात लिपोव्हा स्ट्रीट वर जवळपास बंद पडलेला एक कारखाना विकत घेतला. या कारखान्याचा पूर्वीचं 'रेकॉर्ड वर्क्स' हे नाव बदलून 'डाईश ईमेलवेरन फॅब्रिक'(DEF) असं ठेवलं. सैपाकासाठी इतर कामासाठी लागणारी छोटी मोठी धातूची भांडी तयार करायचं काम ऑस्करनं ठरवलं होतं. आता ही धातूची भांडी तयार करण्याच्या यंत्रांचा आवाज या कारखान्यातून येऊ लागला. मोठ्या मोठ्या जर्मन अधिकाऱ्यांमध्ये मिसळणे त्यांच्याबरोबर कॉकटेल पार्ट्या, मेजवान्या करणे हे त्याचे नित्याचे काम होऊन बसले. त्यामुळे नाझी लष्कराची कंत्राटे ऑस्करला मिळू लागली. काम वाढू लागलं...

डावीकडून इश्ताक स्टर्न आणि ऑस्कर शिंडलर चर्चा करताना  
जसं काम वाढलं तसं कामगारांची गरज वाढू लागली. सुरवातीला ४५ कामगार असलेल्या ऑस्कर च्या कारखान्यात कामगारांची संख्या २५० पर्यंत वाढवावी लागली. कामगार वाढवण्यासाठी कारखान्याच्या इतर कामातही मदत करण्यासाठी 'इश्ताक स्टर्न' नावाचा एक ज्यू इसम ऑस्करला मदत करत असे.  हा स्टर्न खूप हुशार होता. त्याला व्यवसायाची, उद्योग धंद्यातल्या बारकाव्यांची माहिती होती. तो स्वतः ज्यू असल्याने नाझी वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या ज्यू लोकांबद्दल कळवळा होता. ऑस्कर च्या कारखान्यातील उत्पादने जर्मन सैन्याला उपयोगी असल्याने कारखान्यातील कामगारांच्या जीवाला धोका काहीसा कमी आहे हे त्याच्या लक्षात आले होते. इकडे युद्धाची व्याप्ती जशी वाढू लागली तशी ऑस्करच्या कारखान्यातील उत्पादनांची मागणी वाढू लागली, आणि कारखान्याचा फायदा वाढू लागला. रात्रपाळी सुरु करावी लागली. ऑस्कर ला तरी अजून काय हवे होते? त्याचे पैसे मिळवणे हेच तर उद्दिष्ट होते. आता स्टर्न आणि ऑस्कर पक्के मित्र झाले.

क्रूर अमॉन गॉथ 
व्यवसाय वाढीसाठी नाझी अधिकाऱ्यांना भेटवस्तू, उंची दारूच्या बाटल्या, महागड्या सिगारेट्स, प्रसंगी लाचही देणे ऑस्करच्या व्यवसायाचा एक भाग होता. क्रॅकोव्ह मध्ये त्या काळात 'अमॉन गॉथ' नावाचा एक क्रूर स्वभावाचा नाझी अधिकारी तैनात होता. नाईलाजाने का होईना त्यालाअमॉन गॉथ बरोबर जुळवून घ्यावे लागे. घेट्टो मधील ज्यूंचा खातमा करणे ह्या विशेष कामासाठी त्याची नियुक्ती झाली होती. त्याच्या निर्दयीपणाचे अनेक किस्से महायुद्धानंतर वाचलेल्या ज्यूंनी कथन केले आहेत. हा विक्षिप्त माणूस रोज सकाळी उठून उघड्या अंगाने, आळस देत त्याच्या घराच्या बाल्कनीत येऊन समोरच्या पटांगणात मजुरी करणाऱ्या ज्यू कैद्यांवर लक्ष ठेवायचा, आणि करमणूक म्हणून मधेच एखाद्या कैद्यांवर बंदुकीची गोळी झाडून मारून टाकायचा, अगदी मजा म्हणून !  (दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमॉन गॉथला क्रोकोव्ह मधेच जाहीरपणे फाशी देण्यात आले) या भयंकर अमॉन गॉथ बरोबर दोस्ती करत, त्याला लाच देऊन खुश करत आपली कारखान्यासाठी त्याने अनेक ज्यू कैद्यांना आपआपल्या कारखान्यामध्ये कामावर घेतले होते.

ज्यू कैद्यांच्या प्रेतांचे ढिगारे
पुढे ज्यूंच्या अडचणी वाढल्या.  आजूबाजूच्या भागातून हजारो ज्यू  क्रॅकोव्ह मध्ये आणले जाऊ लागले. या हजारो, लाखोंच्या संख्येने एकत्र आणलेल्या ज्यूं चं काय करायचं? हा प्रश्न नाझींना छळू लागला. मग आजारी पडलेल्याना, म्हाताऱ्याकोताऱ्यांना गोळ्या घालून ठार मारले जाऊ लागले. मोलमजुरी करण्याऱ्यात अशक्त माणसांचं काम तरी काय? त्यांनाही गोळ्या घातल्या जाऊ लागल्या. सुरवातीला ज्यू कैद्यांच्या कडूनच जमिनीत चर खणून त्यात प्रेतं पुरण्यात येत होती. पण हे काम कष्टाचं आणि वेळखाऊ होतं. बंदुकीने मारून गोळ्याही उगाच वाया जात होत्या. मग ह्या कैद्यांना मारण्यासाठी गॅस चेंबर्स ची उभारणी करण्यात आली. मग विषारी गॅसने मेलेली ह्या कैद्यांची प्रेते जाळण्यासाठी आगीच्या आणि विजेवर चालणाऱ्या भट्ट्या उभारण्यात आल्या. या भट्ट्यातून हजारो प्रेत जाळण्यात येऊ लागली.या भट्ट्यांची एका वेळी तीनसाडेतीन हजार प्रेतं जाळण्याची क्षमता होती. या भट्ट्या दिवस रात्र पेटलेल्या असायच्या. वार्सा, बिकानूर, ट्रेंब्लिका, कुबलीन अशा अनेक ठिकाणी या मृत्यूच्या भट्ट्या धडधडू लागल्या. १९३९ ते १९४५ या युद्धकाळात नाझींनी सुमारे ६०लाख ज्यूंना यमसदनी पाठवले.
गॅस चेंबर्स - मृत्यूच्या खोल्या   
स्टर्न आणि ऑस्कर काळजीत पडले. मग स्टर्न जास्तीजास्त ज्यू कैद्यांना कारखान्यात काम देऊन त्यांना नाझी त्रासातून वाचवण्याच्या प्रयत्नात लागला, इकडे ऑस्कर त्याला होणाऱ्या फायद्यामुळे खुश होता. सुरवातीला तरी असेच चित्र होते.  ऑस्कर शिंडलर चे उद्दिष्ट जरी पैसे कमावण्याचे होते तरी त्याच्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी माणुसकीचा झरा होता. तो एकीकडे तो आपला कारखाना वाढवत होता, तर दुसरीकडे कुठंतरी हे थांबलं पाहिजे असं त्याला वाटायला लागलं होतं. तो ज्यूंच्या नरसंहाराने अस्वस्थ होत होता. हळू हळू तो कळत आपल्या कारखान्यातील ज्यू कामगारांत आणि त्यांच्या कुटूंबियात भावनिक दृष्ट्या गुंतत चालला होता.


१९४४ च्या शेवटी शेवटी दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती पालटली. रशियन आघाडीवर जर्मनीचा पराभव होऊ लागला होता. पूर्वे कडून रशियन सैन्यदले आणि पश्चिमेकडून अमेरिका मित्र राष्ट्रे पोलंड पर्यंत येऊन धडकली होती. जर्मनीचा पराभव डोळ्यासमोर दिसत होता. ऑस्ट्रिया, पोलंड, हंगेरी, झेकोस्लोवाकिया या देशातून जर्मन सैन्य आपला गाशा गुंडाळायला लागले. केलेली पापे जगासमोर येऊ नयेत म्हणून मोठ्या संख्येने उभारलेले घेट्टो, कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस खाली करून ते नष्ट करण्यासाठी नाझींची पळापळ सुरु झाली. या धामधुमीत पुन्हा भरडले जात होते ज्यू कैदीच !  बर्लिन वरून क्रॅकोव्ह मधील ऑस्करच्या कारखान्यासहित इतरही कारखाने बंद करून नात्यातील ज्यू कैदी कामगारांची वासलात लावावी (म्हणजे मारून, जाळून टाकावे) असा आदेश आला. ऑस्कर हादरला. कारण त्याच्या कारखान्यातील ८०० कामगारांचे जीवन संकटात सापडले होते. या पूर्वीच ऑस्कर ने युद्ध सामुग्री आणि दारुगोळा तयार करण्याचा विभाग कारखान्यात सुरु केला होता. खरं तर या कारखान्याच्या विभागात तत्सम उत्पादने कधीच तयार केली नव्हती. हा कारखान्याचे विभाग केवळ एक दिखावा होता. पण या निमित्ताने त्याला आणखी काही ज्यू कैदी कामगार म्हणून भरती करता आले होते. युद्धासाठी या विभागात तयार होणारं (खरं तर होणारं) सामान दारुगोळा युद्धासाठी महत्वाचं असल्याने ऑस्कर च्या ज्यू कामगारांना हात लावायचे धाडस कोणत्याही नाझी अधिकाऱ्याच्या नव्हते. एव्हडेच काय पण हा ऑस्कर चा कारखाना अति महत्वाचा असल्याने क्रॅकोव्ह मधून हलवून जवळच असलेल्या ब्रिनालीट्झ या गावात तो हलवावा असाही आदेश आलाकारखान्याच्या स्थलांतरासाठी कारखान्यातील सर्व ज्यू कामगारांची एक यादी तयार करून ती सरकार दफ्तारी जमा करावी असेही ऑस्करला कळवण्यात आले. आता ऑस्करच्या पक्के लक्षात आले की आपले कामगार सुरक्षित राहणार आहेत. मग तो आपल्या कामगारांच्या यादीत जास्तीतजास्त ज्यू कैद्यांची नोंदणी करून ही यादी मोठी करण्याच्या प्रयत्नाला लागला. या कामात स्टर्न मदत करत होताच. नेहेमीच्या पद्धतीने त्याने नाझी अधिकाऱ्यांना पटवून आपली कामगारांची यादी जवळजवळ १२०० पर्यंत नेली. युद्धसमाप्तीनंतर ही यादी 'शिंडलर्स लिस्ट' म्हणून जगात प्रसिद्ध झाली. त्याने आपला कारखाना ब्रिनालीट्झला हलवला. या भानगडीत तो स्वतः मात्र कफल्लक झाला. पण काही महिन्यातच बातमी येऊन धडकली की हिटलरने आत्महत्या केलेली असून जर्मनी चा पराभव आता अटळ आहे...

प्रेतांची विल्हेवाट करण्यासाठी वाहतूक 
ऑस्कर आता पूर्णपणे बदलला होता. पूर्वी 'धंद्यासाठी आवश्यक' म्हणून ज्यू कैद्यांकडे बघणारा ऑस्कर आता धंद्याकडे 'ज्यूंना वाचवण्याचं साधन' म्हणून बघत होता.  आता व्यावसायिक नफा, तोटा, पैसा या गोष्टींना त्याच्या दृष्टीने शून्य किंमत होती. अनेक अडचणी सोसत, पाण्यासारखा पैसे खर्च करत तो आपल्या ज्यू कामगारांबरोबरच इतर कैद्यांना वाचवण्याच्या मागे तो लागला.

मे १९४५ रोजी पहाटे बीबीसी वरून जर्मनीच्या शरणागतीची बातमी सांगितली गेली. ऑस्कर कारखान्यातील सर्व कामगार कानात प्राण आणून बातमी ऐकत होते. आपले पुढे काय होणार या विवंचनेत प्रत्येक जण होता. कारखान्यात एक प्रकारची विचित्र शांतता पसरली होती. ऑस्कर जर्मन असल्याने त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. रशियन सैन्याच्या हाती लागण्यापेक्षा अमेरिकन सैन्याला शरण जाणे जास्त बरे ह्या विचाराने ऑस्करने आवराआवरी करायला घेतली. भावबंध जुळलेले कामगार ऑस्कर बेचैन झाले. ऑस्करने आपल्या सर्व कामगारांना एकत्र केले त्यांच्यासमोर एक निरोपाचे भाषण केले. भाषणात तो म्हणाला " मित्रांनो, आता आणखी काही तासातच तुम्ही स्वतंत्र झालेले असाल. पण माझ्या मागे जर्मनांच्या शत्रूचं म्हणजे रशियन सैन्य लागलेलं असेल. महायुद्ध संपल्यामुळे आता युरोपात शांतता प्रस्थापित होईल. आता तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही स्वतंत्र झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत सूडाच्या भावनेला थारा देऊ नका. शांतता राखा. सूडभावनेने वागाल तर शांततेची सुरु झालेली प्रक्रिया थांबेल. तुम्हाला वाचवण्यासाठी मला अनेक गैरमार्गाचा, भ्रष्टाचाराचा वापर करावा लागला. पण माझा नाईलाज होता. तुम्ही या रणधुमाळीतून वाचलात त्याबद्दल माझे आभार मानू नका, आभार मानायचेच  असतील तर ते या 'इश्ताक स्टर्न' चे माना".

 ऑस्कर ने आपले शेवटचे भाषण संपवले तेंव्हा सर्व कामगारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कमालीची शांतता पसरली. वातावरण हळुवार आणि दबक्या हुंद्क्यानी भरून गेले. सर्व कामगारांनी एकत्र येऊन सर्वांच्या सह्या असलेलं एक पात्र ऑस्करच्या हात ठेवलं. अमेरिकन सैन्यापासून ऑस्कर सुरक्षित राहावा म्हणून या कामगारांनी दोस्त राष्ट्राला या पत्रात विनंती केलेली होती. तेव्हडयात शेजारीच उभ्या असलेल्या इश्ताक स्टर्न ने पुढे होऊन ऑस्करला एक सोन्याची आंगठी भेट म्हणून दिली. ऑस्कर ला कळेना या छळ छावण्यांतून या कामगारांकडे एव्हडे सोने आले तरी कुठून? ऑस्करच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे बघत हसून स्टर्न म्हणाला " आमच्या 'जेरेथ'च्या तोंडातील काही सोन्याच्या दातांपासून आम्ही इथेच ही आंगठी खास तुझ्यासाठी बनवली आहे. शेजारीच उभा असलेला वृद्ध जेरेथ आपले तोंडाचे बोळके वासून हसत होता. त्या अंगठीवर ज्यूंच्या भाषेतलं एक वाक्य कोरलं होतं... 'एक जीव वाचवणं म्हणजे सगळ्या जगाला वाचवण्यासारखं आहे.' ऑस्करचे डोळे पाण्याने भरून गेले. कंठ दाटून आला. बोलता त्याने जेरेथ ला आपल्या मिठीत घेतलं. पूर्णपणे कफल्लक झालेल्या ऑस्करला तरी आता या कामगारांशिवाय कोण होतं?

मोठ्या कष्टाने आपल्या ज्यू कामगारांचा निरोप घेऊन ऑस्कर अमेरिकन सैन्याच्या स्वाधीन झाला. त्याच्या सोबत कामगारांनी दिलेल्या पत्रा मुळे म्हणा किंवा त्याची कहाणी ऐकून हृदय द्रवल्यामुळे अमेरिकन सैन्याने आणि दोस्त राष्ट्रांनी त्याला पुढे चांगली वागणूक दिली. पुढील काळात ऑस्करने अनेक नाझी अधिकाऱ्यांना पकडून दिले. ऑस्करच्या कारखान्यातले वाचलेले ज्यू कैदी कामगार आपआपल्या नातेवाईकांचा शोध घेत काही दक्षिण अमेरिकतेत तर, काही इंग्लंड मध्ये, तर इस्त्राईल मध्ये असे जगभरात विखुरले गेले स्थायिक झाले.  पुढे या वाचलेल्या ज्यूंनी कफल्लक झालेल्या, वय वाढलेल्या ऑस्कर ला अक्षरशः सांभाळले. शेवटी ऑक्टोबर १९७४ रोजी शिंडलर ऑस्कर याने शेवटचा श्वास घेतला. जगातल्या प्रत्येक ज्यू नागरिकाने त्याला अखेरचा सलाम करून श्रद्धांजली वाहिली.
चित्रपट - शिंडलर्स लिस्ट 
एखाद्या माणसाच्या हृदयातला चांगुलपणा जर प्रत्यक्षात आला तर तो किती विलक्षण आणि चांगल्या गोष्टी करून दाखवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑस्कर शिंडलर ! या ऑस्कर शिंडलर नावाच्या देवदूताला समजावून घ्यायचं असेल तर १९८३ साली प्रकाशित झालेली थॉमस केनेली यांची 'शिंडलर्स लिस्ट' कादंबरी आवर्जून वाचायला हवी. हे पुस्तक वाचताना नाझींनी ज्यू कैद्यांवर केलेले अत्याचार वाचून अंगावर अक्षरशः काटा येतो. याच पुस्तकावर आधारित स्टीव्हन स्पिलबर्ग या प्रतिभावान दिग्दर्शकाचा 'शिंडलर्स लिस्ट' याच नावाचा कृष्ण धवल चित्रपट १९९३ साली पडद्यावर आला. स्टीव्हन स्पीलबर्ग हा स्वतः जन्माने ज्यू असल्याने त्याने या चित्रपटात अक्षरशः जीव ओतला. कृष्णधवल रंगात चित्रित केलेला हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या घटनांचा काळ नेमका उभा करतो. मी आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटात सर्वात सुंदर असा हा चित्रपट आहे. ऑस्कर शिंडलर च्या आयुष्यातील दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ह्या घटना पाहताना, वाचताना जी अस्वस्थता येते, ती चित्रपट संपल्यावर असो किंवा पुस्तक वाचून संपल्यावर पुढे अनेक वर्षे आपल्यावर अधिराज्य गाजवते. तुम्हीही बघाच ती अस्वस्थता अनुभवून... 
     
 राजीव जतकर.

संदर्भ:
चित्रपट- शिंडलर्स लिस्ट- स्टीव्हन स्पीलबर्ग.  
कादंबरी: शिंडलर्स लिस्ट- थॉमस केनेली. 
आणि अर्थात माहितीचं भांडार... गुगल