'दारात उभा ठाकलेला शत्रु' अर्थात 'एनिमी ऍट द गेट्स'
![]() |
'वॅसली यायत्सेव' ( ज्यूड लॉ ) |
खलनायक
असून देखील नायकाचे वलय लाभलेला क्रूरकर्मा हुकूमशहा अडाल्फ हिटलर माझा आवडता खलनायक आहे. त्याच्यातले अनेक अवगुण लक्षात घेतले तरी त्याच्या गुणांकडे दुर्लक्षून चालणार नाही. प्रखर देशभक्ती, अमोघ आणि भारावून टाकणारे वक्तृत्व, देशातील आणि परराष्ट्र राजकारणावरची असणारी आश्चर्यकारक पकड अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असलेला हा महाखलनायक माझ्या आकर्षणाचा विषय आहे. या हिटलरमध्ये उरात धडकी भरवणारे, बुद्धीला आकलन न होणारे असे काहीतरी नक्की होते. पण ज्यू वंशाबद्दल चा कमालीचा तिरस्कार, स्वतःच्या आर्य वंशाचा वृथा अभिमान आणि त्यातूनच अवघ्या जगावर सत्ता मिळवण्याची लालसा निर्माण झाल्यामुळे हा खलनायक अस्ताला गेला. हिटलर च्या नाझी साम्राज्याचा अंत होण्याची अनेक करणे आहेत. त्यातील उत्तर आफ्रिकेच्या आघाडीवरचे आक्रमण सुरु असतानाच रशिया वर चढाई करण्याचा त्याचा निर्णय त्याच्या पराभवास प्रमुख कारण ठरले. हा आणि असे निर्णय घेताना त्याने अनेक जवळच्या सहकाऱ्यांचा विश्वास गमावला. स्वतःच्या सैन्यातील अनेक मेहेनती आणि अनुभवी सेनानींना त्याने अपमानास्पद वागणूक दिली. जर्मनीच्या पराभवाला रशिया मधील कडाक्याची थंडी हे देखील एक प्रमुख करण ठरले.
![]() |
स्टालिनग्राड ची धुमश्चक्री |
१९३८ च्या सुमारास हिटलर ने सुरु केलेले हे महायुद्ध १९४५ ला समाप्त झाले. हिटलर हा मुत्सद्दी राजकारणी होता. त्याने सुरवातीला रशिया बरोबर चांगले संबंध ठेऊन स्वतःच्या विस्तारवादी भूमिकेत भागीदार करून घेतले. स्टालिन सारखे रशियन नेते देखील महत्वाकांक्षी होते. पण रशिया वरचढ होण्याची चिन्हे दिसताच हिटलरने शेवटी त्यांच्यावरही आक्रमण केले. या दुसऱ्या महायुद्धात शेवटी शेवटी म्हणजे सन १९४१ मध्ये हिटलर ने रशियावर चढाईला सुरवात केली आणि काही नेत्रदीपक विजय ही मिळवले. पण लेनिनग्राड, कीव्ह कॉकेशस, रोस्टोव्ह यासारख्या शहरातून त्याला कडवा विरोध होऊ लागला. यातील काही शहरे त्याने जिंकली देखील! मॉस्को ही रशियाची राजधानी अगदी दृष्टीक्षेपात आली होती. पण वेळेचा अंदाज चुकल्यामुळे चढाई चा वेग काहीसा मंदावला होता. जून १९४१ मध्ये सुरु झालेली ही रशियावरची स्वारी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत लांबली आणि रशियामध्ये हिवाळा सुरु झाला. जर्मन सेना थंडीने काकडू लागली. सततच्या हिमवर्षावामुळे तपमान शून्य अंशाखाली घसरू लागले. थंडीसाठी आवश्यक असणारे उबदार कपडे, बर्फात लढण्यासाठी आवश्यक असणारा अनुभव जर्मन सैन्याकडे नव्हता. त्यामुळे जर्मन सैन्याची ससेहोलपट झाली. रशियाची विजयी घोडदौड आणि जर्मनीची पीछेहाट सुरु झाली. प्रचंड हिमवर्षाव, सैनिक सामुग्रीचा अभाव पेट्रोल चा प्रचंड तुटवडा यामुळे जर्मन सैन्य पार मेटाकुटीला आले होते. जर्मन सेनानी फिल्ड मार्शल 'पोलस' शर्थीने लढत होता. त्याने हिटलरला माघार घ्यावी असा सल्ला दिला, पण तरीही हिटलरच्या हट्टामुळे ते शक्य झाले नाही. ज्या दोन प्रमुख लढायात हिटलरच्या साम्राज्याला घरघर लागली त्यापैकी एक म्हणजे उत्तर आफ्रिकेतील अल्-आलेमीन ची लढाई आणि रशिया च्या आघाडीवरील स्टॅलिनग्राड ची लढाई! या दोन्हीही लढयात हिटलरच्या सैन्याने सपाटून मार खाल्ला. अल्-आलेमीन मध्ये फिल्ड मार्शल 'रोमेल' आणि स्टॅलिनग्राडची आघाडी सांभाळणारा 'पोलस' या हिटलरच्या दोन्हीही कडव्या सेनानींनी पराक्रमाची शर्थ केली. पण हिटलरच्या हट्टी आणि चुकीच्या निर्णयाने त्यांना पराभव पत्करावा लागला.
प्रमुख
रशियन सेनानी 'जोसेफ स्टॅलिन' याने जर्मन सैन्याची पूर्वेकडील घोडदौड रोखण्यासाठी आणि रशियन सैन्यात उमेद निर्माण करण्यासाठी एक आदेश जारी केला होता. हा आदेश म्हणतो 'आता माघार नाही. माघार घेण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. आता जिंकू किंवा मरु. आता एकही पाऊल मागे हटायचं नाही.' मग या आदेशातील 'नॉट वन स्टेप बॅक' हे युद्धाचं घोषवाक्यच बनून गेलं. रशियन सैन्य मोठ्या त्वेषानं युद्ध करू लागलं.
![]() |
स्टालिनग्राड - तुंबळ युद्ध |
दुसऱ्या महायुद्धातील स्टालिनग्राड च्या निर्णायक युद्धाचा थरार अनुभवायचा असेल तर दिग्दर्शक 'ज्यो जॅक अनो' याचा 'एनिमी ऍट द गेट्स' हा हॉलीवूडपट पाहायला हवा. स्टॅलिनग्राड शहरात जर्मन आणि रशियन सैन्यात झालेलं तुंबळ युद्ध या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे चित्रित केलेलं आहे. चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक जणू प्रत्यक्ष युद्धभूमीवरच वावरत आहोत असा भास होतो. स्टॅलिनग्राड शहरातील युद्ध अक्षरशः घराघरात लढले गेले. बॉम्बवर्षावाने घरांची झालेली पडझड, प्रेतांचा पडलेला सडा, आसमंतात कुजलेल्या प्रेतांचा दुर्गंध, कोणत्याही क्षणी मृत्यू येण्याची भीती, याचे काळीज थिजवणारे चित्रण पाहतांना, अनुभवताना जीवाचा अक्षरशः थरकाप होतो.
![]() |
'वॅसली यायत्सेव' ( ज्यूड लॉ ) |
रशियन प्रदेश जिंकत निघालेल्या जर्मन फौजा जेंव्हा स्टालिनग्राड शहरावर आग ओकू लागल्या तेंव्हा तेथील बायाबापडे, म्हातारेकोतारे, मुलंबाळं शहर सोडून निघाले. मात्र धडधाकट, तरुण पुरुष स्त्रियांना लष्कराच्या मदतीसाठी थांबावं लागलं. 'एनिमी ऍट द गेट्स' या युद्धपटात 'वॅसली यायत्सेव' ( ज्यूड लॉ ) या पट्टीच्या नेमबाजाची सत्यकथा आहे. लहानपणापासूनच आपल्या आजोबांपासून नेमबाजीचा धडे घेतलेला वॅसिली तरुणपणी रशियन सैन्यात भरती झाला. स्टालिनग्राडच्या युद्धात 'वॅसली' ने खूप पराक्रम गाजवला. आजूबाजूला उसळलेल्या आगडोंबात वॅसिली एकाग्र होऊन शांतपणे एकेक जर्मन सैनिक बंदुकीने टिपत असे. रशियन सैन्याच्या एक जेष्ठ अधिकाऱ्याने 'केमीसार दानिलाव' (जोसेफ फिएन्स) ने वॅसिलीची नेमबाजीतील निपुणता हेरली. दानिलाव याने वॅसिलीला युद्धकालीन रशियन वार्तापत्रातून प्रसिद्धी देऊन हिरो करायचं ठरवलं. कारण त्यामुळे रशियन सैन्याचं मनोबल वाढणार होतं. जर्मन सैनिकांना हेरणारी भेदक नजर व एकाग्रता यामुळे अनेक जर्मन सैनिक वॅसिलीच्या बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडू लागले. जर्मन अधिकारी काळजीत पडले.
![]() |
'एरवीन कोनिंग' (एड हॅरिस) |
या वॅसिलीला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्मन सेनानींनी जर्मनीतील पट्टीचा नेमबाज मेजर 'एरवीन कोनिंग' (एड हॅरिस) याची नेमणूक केली. हे दोघेही नेमबाज एकमेकांना वरचढ होते. यानंतर मात्र हि स्टालिनग्राडची लढाई वॅसिली आणि कोनिंग यांच्यातली जणू व्यक्तिगत लढाई झाली. या दोन्हीही नेमबाजात शेवटी कोण विजयी होतं ते प्रत्यक्ष पडद्यावर बघणं गरजेचं आहे. तसा हा चित्रपट २००१ मधील, त्यामुळे आता चित्रपटगृहातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणं अवघडच, तथापि ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ च्या माध्यमातून या चित्रपटाचा आनंद आपण मिळवू शकतो. (म्हणजे किमान दुधाची तहान ताकावर.)
पुढे जर्मनांना रशियन सैन्याच्या रेट्यामुळे स्टॅलिनग्राड आणि रशियातूनही पळ काढावा लागला. पूर्वेकडून रशिया आणि पश्चिमेकडून इंग्लंड अमेरिका ही दोस्तराष्ट्रे यांनी जर्मनांचा सफाया केला हे सर्वज्ञात आहेच. पण इतिहासाची पाने चाळताना दुसऱ्या महायुद्धातील स्टालिनग्राडची लढाई आपल्याला थक्क केल्याशिवाय राहत नाही.
राजीव जतकर.