‘दात सलामत तो... लड्डू पचास‘
आपल्या तोंडात बत्तीस दात असतात हे अनेकदा वाचनात आले होते., पण आपल्या तोंडात खरंच बत्तीस दात आहेत हे मी कधी मोजून पाहिले नाही किंबहुना कुणी दात खरंच मोजून पाहिले असतील असं वाटत नाही. आतापर्यंत माझ्या दातांकडे माझे कधीच फारसे लक्ष गेले नव्हते. कारण माझे दात भक्कम असल्याने ते कधीच दुखले खुपले नाहीत. दातात अजिबात फटी नसल्याने त्यात कधी काही अडकत नसे, त्यामुळे ते कधी किडले ही नाहीत. आगदी परवा परवा पर्यंत म्हणजे वयाच्या सत्तावन्न अठ्ठावन्न पर्यंत पानातील सुपारी , चकल्या , ऊस , बायकोने केलेले लाडू ( हे बाकी बायकोला सांगू नका बरं ) वगैरे कडक पदार्थ लिलया भक्षण करत होतो. लहानपणापासून माझ्या एकसारख्या आणि शुभ्र दातांचे कौतुक मी अनेकांच्या कडून ऐकत आलो आहे. कदाचित माझ्या कृष्ण कांतीने ( म्हणजे काळ्याकुट्ट रंगामुळे ) माझे शुभ्र दात काहीसे उठून दिसत असावेत. रोज सकाळी मन लावून दात ब्रश करणे ह्या पलीकडे मी माझ्या दातांसाठी फारशी मेहनत घेतली नाही. खळखळून हसताना माझी बत्तीशी दाखवायला मला कधी लाज वाटली नाही, किंबहुना मला माझ्या बत्तिशीचा अभिमानच वाटतो. चुकून कोणी माझ्या दाताबद्दल वेडेवाकडे बोलले तर समोरच्याची बत्तीशी मी त्याच्या घशात घालायला मी मागे पुढे पहिले नसते.
पण तरी देखील माझी बत्तीशी लाख मोलाची असेल असे मला कधी वाटले नव्हते. नुकत्याच झालेल्या एका घटनेने मात्र माझ्या बत्तिशीकडे माझे लक्ष वेधले जाऊन तिची खरी किंमत माझ्या लक्षात आली. त्याचे असे झाले की माझ्या अठ्ठावन्नाव्या वाढदिवसादिवशी मी सकाळी प्रसन्न मनाने उठलो. नेहमी प्रमाणे सकाळचा फिरण्याचा व्यायाम आटोपून बायकोने दिलेला गरम गरम चहा घ्यायला बसलो. चहाचा पहिला घोट घेता क्षणी उजवीकडच्या वरच्या दाढेतून जीवघेणी कळ आली. पार मस्तकापर्यंत गेली. मला काय होतंय ते समजेना. कसा बसा चहा संपवला नंतर नाश्त्याच्या वेळी तेच ! नाश्त्यानंतर चूळा भरताना देखील पुन्हा येऊ लागल्या. संध्याकाळी तडक डेंटिस्ट मित्राकडे गेलो. डेंटिस्टने ती तपासणी करून त्यावर उपचार करून माझी दाढ दुखी थांबवली. दवाखान्यातून निघताना डेंटिस्ट मित्र म्हणाला "तुझे दात छानच आहेत , तथापी वयोमानानुसार तुझ्या दातांची झीज झालेली आहे. तुझे दात असेच चांगले ठेवायचे असतील तर तुझ्या दातांना एका विशिष्ट उपचाराची गरज आहे. पण आपण ते नंतर पाहू. आत्ताच त्याची काही घाई नाही. " मी डॉक्टरांच्या त्या विशिष्ट उपचाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करीत आणि दाढ दुखी थांबल्याच्या आनंदात घरी आलो.
पण हा माझा आनंद फार काळ टिकला नाही. दोन महिन्यानंतर माझी तीच दाढ पुन्हा दुखू लागली. पुन्हा डॉक्टर ! या वेळी मात्र माझ्या या दुखऱ्या दाढेचे ' रूट कॅनॉल ' केले. म्हणजे दाढेचे वरचे अवरण (एनॅमल) तोडून एक छोटे छिद्र पाडले जाते. त्या छिद्रातून दाढेच्या मुळापर्यंत चक्क बारीक तारा घालून संवेदना निर्माण करणाऱ्या नसा नष्ट केल्या जातात. आतील खराब झालेला( infected ) भाग स्वच्छ केला जातो. त्यामुळे दाढ किंवा दात दुखायचा पूर्णपणे थांबतो. माझ्या दाढेचे रूट कॅनॉल चालू असताना डॉक्टर मित्र म्हणाला "तुझे दात झिजल्यामुळे तुला अशा प्रकारच्या दातांच्या तक्रारी या पुढे येत राहतील. त्यामुळे मी तुला सुचवलेली उपचार पद्धती तू करून घ्यावीस हे उत्तम ! हा माझा तुला डेंटिस्ट म्हणून आणि त्याहीपेक्षा मित्र म्हणून सल्ला आहे. " त्यावर मी त्याला विचारले '"दात का झिजतात ?" त्यावर त्यांनी गम्मतशीर उत्तर दिले. तो म्हणाला "वयापरत्वे दातांची झीज होणे ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यातच भर कि काय काहीजण स्वतःच्या न कळत दातावर दात घासत असतात. उदाहरणार्थ एखाद्या बरोबर भांडताना किंवा एखाद्याचा राग आला तर आपण न काळत
दात ओठ खाऊन भांडतो तसे !" माझ्या एकदम लक्षात आले, अरे हो... बायको बरोबर दात ओठ खाऊन भांडतोच की. बायको बरोबरचे भांडण म्हणजे आपलेच दात अन आपलेच ओठ नाही का ? असो... डॉक्टर पुढे सांगत होते काही जणांना झोपेत दात खाण्याची सवय असते, " वारंवार होणारी ऍसिडिटी देखील दातांच्या झिजेचे एक महत्वाचे कारण असते. "
माझे समुपदेशन करताना माझा हा डेंटिस्ट मित्र मला नव नवीन माहिती सांगत होता. "आपल्या तोंडात एकूण बत्तीस दात असतात. पैकी तोंडाच्या आत अगदी शेवटी वर दोन आणि खाली दोन अशा चार अक्कल दाढा असतात." अक्कल दाढांचा माणसाच्या अकलेशी काहीतरी संबंध असणार असा माझा समज होता. माझ्या दंतोपचारादरम्यान मला दोनच अक्कल दाढा आहेत असे डॉक्टररांनी सांगितल्यावर मी दचकलो ! तेवढ्यात डॉक्टर हसून पुढे म्हणाले. "माणसाच्या अकलेचा आणि अक्कलदाढांचा अर्थाअर्थी संबंध नसल्याने तुला काळजी करायचे कारण नाही." मी सुस्कारा सोडून आनंदाने माझे दात विचकले आणि पुन्हा डॉक्टर मित्राच्या त्या विशिष्ठ उपचार करून घेणे आवश्यक आहे ' या महत्वाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आनंदात घरी गेलो. माझी दुखरी दाढ 'रूट कॅनॉल ' या उपचाराने कायमची दुखायची थांबली.
पण दुर्दैव माझी पाठ सोडायला तयार नव्हते. पुढील आठच दिवसांनी घडलेल्या एका घटनेने मात्र माझ्या डेंटिस्ट मित्राने सांगितलेल्या त्या 'विशिष्ट ' उपचाराचा मला गंभीर पणे विचार
करायला भाग पडले. त्या दिवशी मी काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. दुपारच्या जेवणानंतर
पान खाल्ले. त्यातील सुपारी चावताना तोंडात काहीतरी बारीकसा 'कट्ट' असा आवाज मला जाणवला.
पुण्यात आल्यावर तडक डॉक्टर ! डॉक्टरांनी बरोबर ओळखले ते म्हणाले "काहीतरी कडक
खाल्ल्यामुळे तुझ्या डावीकडच्या वरच्या दाढेला उभी क्रॅक गेली आहे. तरी मी तुला सांगत
होतो तुझे झिजलेले दात भक्कम करण्यासाठी मी सुचवलेली ‘विशिष्ट’ ट्रीटमेंट तुझ्या दातांसाठी
आवश्यक आहे. नाहीतर तुला अशा अडचणी येण्याची शक्यता दाट आहे." मला मात्र हे पटत
नव्हते, कारण माझे दात खूप चांगले आहेत असे माझे ठाम मत होते. यथावकाश माझ्या क्रॅक
गेलेल्या दाढेचा छोटा तुकडा डॉक्टरांनी काढून टाकला. मात्र या घटनेने मी डॉक्टरांच्या
'विशिष्ठ' उपचाराच्या सल्ल्याचा गंभीरपणे विचार करू लागलो. डॉक्टरही माझ्या प्रश्नांच्या
भडीमाराला न कंटाळता मला त्या 'विशिष्ठ' उपचाराची माहिती देऊ लागले.
"वयोमानानुसार
व इतर कारणांमुळे आपल्या दातांची झिजण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू असते. दातांची
उंची कमी होण्याबरोबरच जाडी हि कमी होत जाते. त्यामुळे दातांचे वरील कठीण असलेले एनॅमल
नावाचे अवरण कमी होत जाऊन संवेदना निर्माण करणाऱ्या नसा आणि आतील मऊ भाग उघडा पडायला
सुरवात होते. मग गरम किंवा थंड पदार्थ खाताना किंवा पिताना दातात कळा येऊ लागतात. दातांचे
तुकडे ही पडू लागतात. मग शेवटचा उपाय म्हणून दात काढून टाकावे लागतात. मग कृत्रिम दात
किंवा कवळी बसवली जाते. पण कवळीने मूळ दातांप्रमाणे अन्न व्यवस्थित चावले जात नाही.
मग अन्नपचनाच्या तक्रारी सुरु होतात. प्रकृतीवर दूरगामी परिणाम होतो. शिवाय दात काढून
टाकल्याने जबड्याचा आकार बदलतो". मी हे सर्व मन लावून ऐकत होतो , "मग यावर
उपाय काय?" मी विचारले डॉक्टर पुढे सांगू लागले...
"सुदैवाने दातांच्या
उपचार पद्धतीमध्ये सध्याच्या काळात आश्चर्यकारक प्रगती झालेली आहे. मूळ दातांची झीज
थांबवण्यासाठी सर्वच्या सर्व बत्तीस दातांची उंची व जाडी वाढवली जाते. ही उपचार पद्धती
अतिशय क्लिष्ट, अवघड, वेळखाऊ आणि खर्चिक असते. (डॉक्टरांच्या 'खर्चिक' या शब्दजवळ मी
थबकलो. सावध झालो) योग्य वेळी हे उपचार केल्याने त्याचा जास्त फायदा होतो. पेशंटचे
मूळ दात वाचवण्याकडे आमचा कल असतो". मी हे सर्व थक्क होऊन ऐकत होतो. भानावर येत
मी डॉक्टरांना विचारले "डॉक्टर हे सर्व ठीक आहे हो, पण खर्च किती ?" यावर
डॉक्टरांनी "सुमारे तीन लाख असा बॉम्ब टाकला. तीन लाखाचा खर्च आणि दातांसाठी
? आकडा ऐकून माझी 'दातखीळच' बसली. हे म्हणजे 'दात दाखवून अवलक्षण' करून घेण्यासारखे
झाले. तसा मी सढळ हाताने खर्च करणारा आहे. 'दात कोरून पोट भरणे' आपल्याच्याने कधी जमले
नाही. पण दातांसाठी 'तीन लाख' ?
माझ्या दातांसाठी एव्हडा
खर्च करून हे उपचार करणे गरजेचे आहे, हे मला काही झेपेना.. शक्यच नाही. मग दुसऱ्या
डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला. माझ्या दातांची प्रकृती तपासून त्यांनी
मला त्याच उपचाराचा सल्ला दिला. खर्च ही थोड्या फार फरकाने तेव्हडाच सांगितला. माझ्या
नात्यातल्या एका डॉक्टरांनी देखील या उपचाराने फायदाच होईल असे सांगितले. पण खर्चाकडे
पाहून माझे मन काही तयार होईना. बायको म्हणाली "अहो ! स्वतःच्या शरीर स्वास्थासाठी
हे करणे गरजेचे आहे. आपण पुढची एखादी ट्रिप कॅन्सल करू हवं तर! आणि हो...तुमच्या पार्ट्या
कमी करा यापुढे!" ह्या शेवटच्या ब्रह्मास्त्रासारख्या
वाक्याने दात ओठ खाऊन मी गप्प बसलो. बरीच मानसिक तयारी करून तब्बल महिना दीड महिन्या
नंतर जड मनाने मी माझ्या दातांवर डॉक्टरांनी सुचवलेला उपचार करायचे ठरवले.
अश्याप्रकारे माझ्या दातांवर उपचार सुरु झाले. सुरवातीला माझ्या तथाकथित झिजलेल्या दातांना, दाढांना आणखी घासून त्यांचा पृष्ठभाग काहीसा खडबडीत करण्यात आला. पुढच्या वरच्या दर्शनी सहा दातांना आतून पातळ पापुद्रे लावून त्यांची जाडी वाढवली गेली. मग डॉक्टरांनी खालच्या दर्शनी सहा दातांची उंची वाढवण्यात आली. या खालच्या दातांच्या वाढवलेल्या उंची मुळे माझ्या दाढांमध्ये अंतर पडायला लागून मला खाणे मुश्किल झाले. अर्थात हे आधीच सांगून डॉक्टरांनी माझी मानसिक तयारी केलीच होती. हे सर्व चालू असताना मला अन्न चावून खाता येत नव्हते. रोज मिक्सरवर बारीक केलेले पदार्थ खावे लागायचे. पोट भरायचं नाही. थोडा अन्नपचनावरही परिणाम झाला. त्यामुळे माझे एकदोन किलो वजनही कमी झाले. अर्थात हा उपचारादरम्यानचा तात्पुरता परिणाम होता. कधी एकदा माझ्या तरंगणाऱ्या दाढांची उंची वाढून ते व्यवस्थित होतायत असे झाले होते.
तब्बल चार ते पाच महिने माझी हि ट्रीटमेंट चालू होती. हे उपचार बऱ्यापैकी वेदनाविरहित होते, पण हे पाच महिने म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मारच! माझ्या सहनशक्तीची कसोटीच होती. यथावकाश माझ्या सर्व दाढांची उंचीही वाढवली गेली, आणि मी हुश्श केले. पण एक मात्र नक्की म्हणजे माझ्या डॉक्टरांच्या सहनशक्तीची देखील कसोटीच होती ही ! एका विचित्र, पण गंमतशीर अनुभवातून मी गेलो. आता माझे तसे चांगलेच असलेले दात आणखीन बळकट, एकसारखे आणि चांगले झाले आहेत, अगदी तरुणपणी होते तसे. बायकोने बनवलेले लाडू आता मी कितीही खाऊ शकतो. कदाचित माझ्यासारख्याच बिचाऱ्या कोणीतरी ही म्हण तयार केलेली असावी... ‘दात सलामत तो...लड्डू पचास’.
राजीव.