तद्दन आणि भंपक भारतीय मानसिकतेचा बुरखा फाडणारा चित्रपट: 'हिंदी मिडीयम' प्रत्येक भारतीयाने बघायलाच हवा.
काल खरे तर आम्ही 'चि. व चि. सौ. का.' हा चित्रपट बघण्यासाठी सिटी प्राइड ला गेलो होतो. पण रविवारचे सर्व शोज हाऊसफुल होते. एकीकडे मराठी चित्रपटाचे सर्व खेळ हाऊसफुल झालेले पाहून मन सुखावले देखील, पण आम्हाला तिकीट न मिळाल्याने आम्ही थोडे हिरमुसलो देखील. मग मिळेल तो म्हणून 'हिंदी मिडीयम' या चित्रपटाला जाऊन बसलो. ह्या चित्रपटाबद्दल इरफान खान या गुणी अभिनेत्याशिवाय आधी कसलीच माहिती नसताना चित्रपट बघणे म्हणजे तशी रिस्क च होती. पूर्वग्रह विरहित मनाने, नजरेने नेहेमी चित्रपट पाहावेत असे माझे ठाम मत आहे. म्हणजे चित्रपट आपल्याला चित्रपटाबद्दल स्वतःचे नेमके आणि खरे खुरे मत मांडता येते.
शिक्षणाची भाषा मातृभाषा असावी की इंग्रजी असावी हा तास वादाचा विषय. इंग्रजी माध्यमाच्या शाळा ताशा श्रीमंत वर्गात मोडणाऱ्या. त्यामुळे पालकांचा गोंधळ होणे खूप स्वाभाविक असते. रोजच्या व्यवहारात मातृभाषाजरी
आपण वापरात असतो तरी व्यावसायिक कामामध्ये म्हणा किंवा उच्च शिक्षणासाठी म्हणा इंग्रजीचा
कुशल वापर अतिशय महत्वाचा असतो. आणि म्हणून मग पालक आपल्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या
आणि श्रीमंत शाळांमध्ये गर्दी करतात. विशेषतः माध्यम वर्गीय व श्रीमंत पालकांमध्ये
हे प्रमाण आता शंभर टक्क्यांवर आले आहे. नेमक्या ह्याच विषयावर अतिशय नर्मविनोदी आणि
विडंबनात्मक पद्धतीने हा चित्रपट करमणूक तर करतोच पण त्याच बरोबर भंपक आणि चुकीच्या
मानसिकतेवर आसूड ओढतो.
आपल्या पाल्याला इंग्रजी भाषेत आणि त्यातही इंग्रजी शाळेमध्ये शिकवावे किंवा नाही हा वादाचा विषय होऊ शकतो. तथापि पालक नोकरी, व्यवसायामध्ये कमालीचे व्यस्त असल्यामुळे त्यांच्या आंग्रजाळलेल्या पाल्यांच्या संस्काराचे काय करायचे असा गंभीर प्रश्न उभा ठाकतो. या आंग्रजाळलेल्या मुलांना मातृभाषेची श्रीमंती कशी कळणार? हा खरा प्रश्न आहे. पु.ल. देशपांड्यांच्या
खुसखूषीत
विनोदातील गंमत पुढील पिढयांना कशी समजणार? कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर, शांत शेळके, ग.दि.माडगूळकर यांच्यासारखे असंख्य मराठी साहित्यिक, कवी समजायला आपल्या मुलांनी मातृभाषेतूनच शिक्षण घ्यायला हवे. मातृभाषेतून घेतलेले शालेय शिक्षण आणीअर्थातच घरातून मिळालेल्या संस्कारातूनच मातृभाषेतील बारकावे समजू शकतात. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारी आजकालची छोटी छोटी मुले जेंव्हा लाल रंगाला 'रेड' आणि पिवळ्याला 'यल्लो' म्हणायला लागली कि मला या मुलांची आणि आणि त्यांच्या पालकांची कीव वाटायला लागते. असो...
'हिंदी मिडीयम' या चित्रपटाची कथा तशी साधी, सोपी, सरळ आहे. पण 'साकेत चौधरी' या दिग्दर्शकाने ही कथा अतिशय रंजक पद्धतीने मंडळी आहे. भारतीय शिक्षण पद्धतीच्या नेमक्या उणीवा, शिक्षण संस्थांचे बाजारीकरण त्यामुळे पालकांचा उडणारा गोंधळ, प्रवाहाच्या ह्या रेट्यात पालकांची होणारी घुसमट यावर आधारलेला हा चित्रपट आहे. दिल्लीतील चांदणी चौकाच्या परिसरात राहणाऱ्या आणि रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवणारा 'राज बत्रा' (इरफान खान) तास आर्थिक दृष्ट्या उत्तम, पण इंग्रजीचा गंध नसलेला, मोकळाढाकळा माणूस. त्याची पत्नी 'मिता' (सबा कमार) ही थोडी जास्त शिकलेली. ( या चित्रपटात इरफान खान हा एकाच नट काय तो माझ्या ओळखीचा) सुरवातीला सांगितल्याप्रमाणे हे पतिपत्नी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या 'पिया' च्या (दिशिता सहगल) शिक्षणाबद्दल अतिशय (थोडे अतीच) सतर्क असतात. पिया चं शिक्षण टॉप ग्रेड, उच्चभ्रू, श्रीमंत आणि अर्थातच इंग्रही माध्यमातून व्हावं असा मिताचा आग्रह असतो. त्यासाठी वाट्टेल ते करायची तिची तयारी असते. राज बत्रा पत्नीच्या आग्रहानुसार काहीश्या नाईलाजानेच प्रवेश साठी प्रयत्न सुरु करतो. मग सुरु होतो एक शाळेतील प्रवेशासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा जीवघेणा प्रवास! मग त्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले जातात. जसे शाळा प्रवेशासाठी बड्या कन्सल्टन्ट कंपनीची मदत, राजकारणी नेत्यांचा वशिला, एव्हडेच काय पण मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, मधील देवादिकांना नवस, साकडे ही घातले जाते. पण यश काही मिळत नाही.
प्रवेशाच्या प्रयत्नांदरम्यान या राज बत्रा ला असे कळते कि बड्या खाजगी शाळांमध्ये आर्थिक मागासवर्गीयांसाठी काही जागा राखीव ठेवल्या जातात. मग काय मुळात चांगली आर्थिक परिस्थिती असलेले राज आणि मिता स्वतःला गरीब दाखवून आपल्या मुलीच्या शाळा प्रवेशासाठी धडपड सुरु करतात. स्वतःला अति श्रीमंत दाखवणे आणि नंतर अति गरीब दाखवताना या कुटुंबाची केविलवाणी धडपड विनोदी ढंगात, छान करमणूक करत सादर करताना दिग्दर्शक कमालीचं यशस्वी झाला आहे. ही धडपड कधी कधी अतिरेकी वाटते, पण त्याने चित्रपटाच्या मूळ उद्देशाला धक्का लागत नाही. उच्चभ्रू वस्तीत राहायला गेल्यावर पत्नी मिता ला नेहेमीप्रमाणे 'मिठू' असे हाक न मारता 'हनी' या नावाने हाक मारावी असा लाडिक हट्ट करणाऱ्या पत्नी पुढे हतबद्ध झालेला राज, किंवा गरीब वस्तीत राहायला गेल्यावर डेंग्यू चा दास मारण्याचा प्रसंग या चित्रपटात धमाल आणतात. इरफान खान खेरीज ‘सबा कमार’ या अभिनेत्रीने समर्थपणे आपली भूमिका साकारली आहे. 'दीपक डोब्रियाल' ह्या गुणी अभिनेत्याची भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे. फारच कमाल काम केलाय यानं!
साकेत चौधरींचे अफाट दिग्दर्शन, सचिन-जिगर यांचा संगीत, अमर मोहिले यांचा पार्श्वसंगीत, झीनत लखानी आणि साकेत चौधरी यांची पटकथा सर्व जिथल्या तिथे आणि नेमके ! सर्वांनी हा चित्रपट करमणूक प्रधान करतानाच वास्तववादी बनवण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे.समाजातील अति श्रीमंत वर्गातील काही मंडळी कायदा कशी पायदळी तुडवतात याची हि गोष्ट आहे. आपल्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरणाऱ्या आजकालच्या पालकांची ही खरीखुरी गोष्ट आहे. शिक्षणक्षेत्रातल्या भ्रष्टाचाराच्या दुर्दैवाची ही गोष्ट आहे. शिक्षण संस्थांच्या 'ब्रँड' ला पालकांच्या कडून दिल्या जाणाऱ्या अवास्तव महत्वाची हि कहाणी आहे. अनेक प्रकारच्या वास्तवाला चव्हाट्यावर आणणारा हा चित्रपट प्रत्येकाने बघायलाच हवा.
राजीव जतकर.
मोबाईल : ९८२२०३३९७४.