अस्वस्थ मनाच्या
लाटांचा घेतलेला वेध : 'कासव'
संकट आलं की कासव कसं शरीर आक्रसून आपल्या पाठीवरच्या कवचात घेतं, तसं आपलं मन आजारी असलं की ते स्वतःला आक्रसून घेऊन स्वतःच्याच कोषात बसतं कासवांसारखं ! काहीसे गूढ आणि अतर्क्य असलेलं मानवी मन जेंव्हा आजारी पडतं तेंव्हा मनाचा फारच गोंधळ उडतो. अगदी आपल्यासारख्या निरोगी मनाचा देखील कधी कधी गोंधळ उडतो. मनात निराशा दाटून येते. काहीच करावेसे वाटत नाही. पण मग त्यातून आपण स्वतःला सावरून घेत पुन्हा नव्या उमेदीनं भरभरून जगू लागतो. पण एखाद्याचे मन जेंव्हा जास्त आजारी पडते तेंव्हा त्या माणसाला औषधोपचाराबरोबरच बरोबरच्या आपल्या जवळच्या माणसांच्या मायेची गरज असते. आजूबाजूच्या जवळच्या माणसांनी या मनाने आजारी पडलेल्या व्यक्तीला मायेने सावरणे, गोंजाराने, प्रेम देणे आवश्यक असते, त्यामुळे ‘आजारी मन पुन्हा सावरू शकतं’, असाच काहीसा संदेश दिलाय ‘कासव’ नावाच्या सुंदर चित्रपटानं !
कासव आणि त्याच्या आश्चर्यकारक जीवनक्रमाच्या प्रतीकात्मक पार्श्वभूमीचा चपखल वापर करीत दिग्दर्शक द्वयीने आपली कथा या चित्रपटात साकारली आहे. नैराश्याच्या गर्तेत गेलेला 'मानव' ( अलोक राजवाडे ) नावाचा एक सुशिक्षित तरुण भरकटलेल्या अवस्थेत शहरातून भटकताना चित्रपटाची सुरवात होते. हा तरुण मनाने आजारी आहे. नैराश्याचा आवेग प्रमाणाबाहेर वाढल्याने हा तरुण एका निर्मनुष्य पुलावर बसून आत्महत्येचा प्रयत्न करतो. कुणीतरी त्याला हॉस्पिटलात पोहोचवतं. शुद्धीवर आल्यावर हा तरुण तिथूनही पळून जातो. पुढे असाच भरकटलेल्या अवस्थेत हा तरुण कुठल्याश्या धाब्यावर मृतवत पडलेल्या अवस्थेत जानकी ( इरावती कर्वे ) ला सापडतो. जानकी कोकणातल्या गावी कासव संगोपन केंद्रात काही संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी जात असते. जानकी ह्या तरुणाला आपल्याबरोबर कोकणातल्या गावी घेऊन जाते. जानकी ला देखील आपल्या पूर्वायुष्यात अश्याच काहीश्या आजाराला सामोरे जावे लागलेले असल्यामुळेच की काय जानकी या तरुणाला आधार देते. त्याला समजावून घेते. त्याच्यावर औषधोपचार करते. जानकीच्या या प्रयत्नात तिचा ड्रायव्हर आणि तिच्या सर्व कामात मदत करणारा यदु ( किशोर कदम ), परशु ( ओंकार घाडी ), दत्ताभाऊ ( डॉ. मोहन आगाशे ), बाबल्या ( संतोष रेडकर ) यांचे योगदान फार महत्वाचे ठरते. कथेत पुढे काय होते ते पडद्यावर पाहणे च योग्य ठरेल.
हा चित्रपट अनेक पातळ्यांवर अप्रतिम आहे. सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर या जोडीच्या दिग्दर्शन कौशल्यावर लिहावे तितके थोडेच आहे. त्यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे किंबहुना त्याहूनही सरस असा हा चित्रपट ठरावा. त्यावर अनेक उत्तमोत्तम चित्रपट समीक्षक भरभरून लिहीतीलच, पण मला जास्त भावले ते चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद
! जीवनविषयक तत्वज्ञान सहज सोप्या भाषेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुमित्रा भावे यांच्या संवाद लेखनानं केलय. या माध्यमातूनच ‘दत्ताभाऊ’ जुन्या पिढीचे ‘मन निरोगी ठेवण्याचे रहस्य सतत कार्यमग्न राहण्यात आहे’ असे भाष्य करतात. आजारी मनाच्या माणसाला हाताळताना ‘यदु’ आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करतो.
मला सर्वात जास्त आकर्षित केलं ते बाबल्या आणि परशु यांच्या तोंडी असलेल्या संवादानं. या पैकी संतोष रेडकर हा दशावतारात काम करणारा स्थानिक कलाकार आहे. स्वतः अनाथ असणारा, हॉटेल मधील चहा वाटणाऱ्या पोऱ्याचे काम करणारा 'परशु' त्याच्या सहज अभिनयानं आणि संवादांनं प्रेक्षकांना जिंकतो. नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या मानव ला हा लहान पोऱ्या सोप्या भाषेत 'जीवनात कसे वागावे' ते सांगतो. तो एकदा मानव शी बोलताना सहज बोलून जातो
"एकावेळी एकाच करुचा. भजी खाऊची तर भजी खाऊची, चाय पिउची तर चाय पिउची... आनी दोनी एकदम कोंबलं तर ठसको लागतलो."
मनावर कमी ताण येण्यासाठी 'एकावेळी एकाच काम करावे' हे साधं सोपं तत्वज्ञान हा लहानगा सहज सांगून जातो. "कुटुंबाची व्याख्याच बदलायला हवी, कुटुंब हवंच आधाराला, पण मनाच्या नात्यांच, नुसत्या रक्ताच्या नात्यांनी कुटुंब आता ठरणार नाही." हे जानकीचं स्वगत प्रेक्षकांना अंतर्मुख करून जातं.
चित्रपट पाहताना धनंजय कुलकर्णी
यांचं
छायांकन मन प्रसन्न करतं. उसळणारा समुद्र, किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या समुद्र लाटा यांचं चित्रण अतिशय सुरेख आहे. कोणताही चित्रपट पाहताना माझं लक्ष त्यातील संगीताकडे आणि पार्श्वसंगीताकडे जरा जास्तच असतं. साकेत कानेटकर यांनी संगीत देताना जपलेलं वेगळेपण जाणवतं. 'लेहेर समंदर रे' आणि 'अपनेही धून में' हि गाणी बरीचशी लोकसंगीताकडे झुकणारी, खूप वेगळी आणि मनाला थेट भिडणारी !
हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पहिलाच पाहिजे. वेगळं काही पाहू इच्छिणाऱ्या चित्रपट रसिकांसाठी साठी तर हा चित्रपट म्हणजे पर्वणीच !
राजीव जतकर