Monday, 6 June 2016

मी… 'नॉन रोटेरियन' राजीव…

                                                
                                               मी… नॉन रोटेरियन राजीव…
 
 परवा एका रोटेरियन मित्राचा माझ्या मोबाईलवर SMS आलात्यात लिहिले होते , 'पुढच्या वर्षी मी आमच्या क्लबचा प्रेसिडेंट होतोय..! पुन्हा क्लब जॉईन करतोस का ?’ मी माझ्या त्या रोटेरीयन  मित्राला रिप्लाय केला लिहीले  ‘मित्रा ! आता फार उशीर झाला आहे '. 'नक्की नाही.
        खरे तर आता रोटरी सोडून बरीच वर्षे होऊन गेली. रोटरीतल्या चांगल्या, वाईट घटना मी बऱ्या पैकी विसरत चाललो आहे. पण कधी कधी एखादा मित्र रोटरीत येण्याची गळ घालतो आणि मग माझ्या आयुष्यातील रोटरीने व्यापलेल्या एका मोठ्या कालखंडातील काळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यापुढून सरकू लागतो

रोटरी क्लब कर्वेनगर मध्ये प्रवेश :

१९९२ / ९३ च्या सुमारास मी रोटरीमध्ये  सामील झालो. मला आठवतंय की मला त्यावेळचा प्रेसिडेंट रवी धोत्रे याच्या ऑफिसमध्ये रोटरी इंटरनॅशनल ह्या संस्थेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्याला रोटरीच्या  भाषेत 'रोटरी  इन्फर्मेशन ' असे म्हणतात. माझ्या बरोबर ते लोकांना ही रोटरी इन्फर्मेशन देण्यात आली . त्यात माझ्या लक्षात राहिला तो 'सदा बर्वे ' तो खूप छान गातो. अतिशय तरल भावूक अशी गाणी तो गात असे म्हणून असेल कदाचित. पण एकूणच त्याचे माझे जमायचे.  अशा प्रकारे मी रोटरी क्लब पुणे कर्वेनगर ह्या क्लब मध्ये ' रोटरीयन राजीव जतकर ' म्हणून दाखल झालो. ह्या क्लब मध्ये येण्या पूर्वीचा असलेला माझा कॉलेजमधील मित्र 'रोटे. विलास पाठक' मुळेच मी रोटरीत आलो.
   कर्वेनगर क्लब मध्ये मी खरे तर ' बॅक बेंचर ' होतो. रोटरीचे कल्चर मला नवीनच होते. असले क्लब श्रीमंताचे असतात  असे वाटत असे आणि ते काही प्रमाणात खरे ही आहे. कर्वे रोडवरील ऑफिस क्लब नावाच्या एका छोटे खानी एअर कंडीशंड हॉल मध्ये आम्ही जमत असू. काही महिन्यांनी असे लक्षात आले की काही रोटेरियन मंडळी जवळच असलेल्या 'शांग्रीला 'नावाच्या बार रेस्टोरेंट मध्ये प्रत्येक मिटिंगनंतर बसतात. शांग्रीलात ड्रिंक्स, जेवण, आणि सोबतीला चमचमीत गॉसिप्स असे येथील माहोल असायचा. मला खरे तर हे फारसे रुचत नसे. (कारण दर आठवड्याला असला खर्च ही परवडणारा ही नव्हता) पण तसे न दाखवता सर्वांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत असे.
   
कळत न कळत मी त्यांच्यातला एक भाग बनत चाललो होतो. बहुतेक त्याच सुमारास रोटरी इंटरनॅशनलचा 'पल्स पोलिओ' हा कार्यक्रम पुढे आला आणि कदाचित मला थोडी दिशा सापडली असावी. काहीसा झपाटल्यासारखा पोलिओ निर्मूलनाच्या या रोटरी अभियानात समरसून काम करू लागलो. आमच्या क्लब मधील प्रत्येक सभासदासाठी कामाची विभागवार वाटणी होत असे. अलका देखील माझ्या बरोबर उत्साहाने अशा कामात मदत करायची. मला बऱ्याच वेळी केळेवाडी, हनुमान नगर ह्या वसाहतीतील लहान मुलांना पोलिओची लस देण्याच्या कामाची जबाबदारी असे. केळेवाडीतल्या 'दत्ता चोरगे 'नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याची आम्हाला खूप मदत होत असे. लसीकरण करण्याआधी केळेवाडीत पोस्टर्स लावणे, वर्तमान पत्रातून माहिती पत्रके वितरीत करणे वगैरे कामे आम्ही करत असू. सगळ्यात गंमत यायची ती ' पथनाट्य ' या माध्यमातून पोलिओ बद्दल जागरुकता आणताना….! खूप धमाल करायचो आम्ही. एका वर्षी माझ्या बुथवर दिवसात १००० लहान बाळांना लस देण्यात आली होती. खूप समाधान वाटायचे.
     रोटरीत दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी माधव बांदीवडेकर नावाच्या प्रेसिडेंटने मला 'बेस्ट रोटेरियन' असे पारितोषिक दिले होते. बरे वाटले. नंतर कालांतराने लक्षात आले की रोटेरियन्सनी काम करावे म्हणून प्रत्येकाला काहीना काही तरी बक्षीस, ट्रॉफीज, पारितोषिके, सर्टिफिकेट्स देतातच. हळूहळू मी रोटरीत रुळत होतो. मला क्लब मध्ये नवे मित्र मिळाले होते. अधून मधून 'शांग्रीला' ग्रुप मध्ये ही बसत होतो. पण का कोणास ठाऊक तिथं मन फारसे रमत नसे. तथापि रोटरीतल्या काही गोष्टी मला खूप आवडत असत आणि कदाचित त्यामुळेच मी रोटरीत जवळ जवळ २० वर्षे टिकून राहिलो.
    रोटरीत प्रत्येक आठवड्याच्या मिटींगला निरनिराळ्या विषयातल्या तज्ञ व्यक्तींना, प्रसिद्ध व्यक्तींना बोलावण्याची, त्यांचे विचार ऐकण्याची पद्धत आहे. पैकी मला ठळकपणे आठवणाऱ्या व्यक्ती म्हणजे श्रीकांत मोघे, डॉ. विश्वास मेहंदळे, डॉ. श्रीराम लागू, सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई लवाटे, सिंधुताई सकपाळ, कवी सुधीर मोघे, संदीप खरे, सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध लेखक अनिल अवचट, नर्मदा परिक्रमा करणारे डॉ. जगन्नाथ कुंटे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर वगैरे. ह्या आभाळाएवढ्या मोठ्या व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मला रोटरीमुळेच मिळाली. डॉ. श्रीराम लागू यांच्या घरचे वायरिंगचे काम करण्याची संधी ही मिळाली. त्या निमित्ताने त्यांच्या घरी वारंवार जाण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मी घेतली आहे. विजयाताई लवाटे यांची मिटिंग तर मी आयुष्यात कधी विसरूच शकणार नाही. ह्या बाई खूप अफाट होत्या. त्या दिवशी त्या खूप भरभरून आणि तळमळीने बोलत होत्या. बोलता बोलता गहिवरत होत्या. आम्हीही सार्वजण अस्वस्थ होत होतो. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठी विजयाताईंनी आपले आयुष्य वेचले. समाजातील अशा प्रकारच्या वेगळ्या वेदनांची, प्रश्नांची जाणीव मला प्रथमच होत होती.

    एकीकडे रोटरीतील अशा घटनांनी मन समृद्ध होते, मनाची तरलता वाढत होती. मन विचारक्षम होत होते. तर दुसरीकडे रोटरी मधील राजकारण, शांग्रीला संस्कृती, गॉसीप्स सारख्या मला न भावनाऱ्या गोष्टी कायम रोटरी सोडण्यासाठी उद्युक्त करीत. अलकाला (बायकोला) तर रोटरी कधीच आवडली नाही. मी तिला सांगत असे की सामाजिक संस्थांच्या मध्ये वावरताना चांगल्या गोष्टींचा आनंद घेताना, वाईट गोष्टीही जुळवून घ्याव्या लागतात. पुढे १९९९ च्या सुमारास रोटरी क्लब कर्वेनगर मधील सभासदांच्या काही भांडणातून दोन गट पडले. भांडणे विकोपाला गेली. अंदाजे ४० सभासद असलेल्या आमच्या क्लबमधून सुमारे २७ ते ३० सभासदांनी क्लबचे राजीनामे दिले. मी ही त्यामधील एक होतो. मला काही समजायच्या आत ह्या घटना घडत गेल्या. त्यानंतर जवळ जवळ वर्षभर मी आणि माझे इतर मित्र 'टेल्को क्लब' मध्ये जमत होतो. (समांतर रोटरी क्लब असे म्हणूयात.) रोटरी क्लब प्रमाणेच सुरवातीला राष्ट्रगीत, नंतर पाहुण्यांचे भाषण, आभार प्रदर्शन अशा पद्धतीने समांतर क्लब आम्ही चालवत असू. त्याकाळी मी खूप गोंधळलेल्या अवस्थेत होतो. रोटरी सोडलेले आम्ही सर्वजण नवीन रोटरी क्लब स्थापण्याच्या प्रयत्नात होतो. आमच्या ग्रुपमधील काही मंडळींच्या प्रयत्नांना वर्षभराने यश आले व रोटरी क्लब सिंहगड रोडची स्थापना झाली. (साल: २०००)

पुन्हा रोटरीत प्रवेश :
        रोटरी क्लब पुणे सिंहगड रोड ह्या क्लबमध्ये सुमारे २००० साली पुन्हा रोटरीमध्ये मी प्रवेश केला. कर्वेनगर क्लबमधील कटू आठवणी विसरून मी नवीन क्लब मध्ये रमू लागलो. हा क्लब माझा एक मित्र रोटे. धनंजय कुलकर्णी ह्याच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आला होता. कर्वेनगर क्लब मधील काही अपवाद सोडले तर जवळजवळ सर्व रोटेरियन्सनी रोटरी क्लब सिंहगड रोडमध्ये प्रवेश केला. कर्वेनगर क्लब मधील काहीजणांनी रोटरीच सोडली. अशा रोटरी सोडणाऱ्यांच्यापैकी माझा व सर्वांचा मित्र माधव बांदिवडेकर हा माझ्या लक्षात राहिला. अतिशय मितभाषी असा हा माझा मित्र रोटरीपासून कायमचाच दुरावला. सतीश सातारकर, रवि जमखिंडीकर, रवि धोत्रे, अरुण उंदीरवाडकर यांच्यासारखे मित्र इतर निरनिराळ्या क्लबमध्ये गेले.
    ह्या नवीन क्लबमध्ये काही नवीन मित्र मिळाले. धनंजय कुलकर्णी, मिलिंद जावकर, प्रशांत मिरजकर यांच्यासारखे नवीन मित्र जोडले गेले. तथापि पुन्हा ३/४ वर्षात हे मित्र आमचा क्लब सोडून दुसरीकडे गेले. मला वैयक्तिकरित्या खूप वाईट वाटले. असे का होत असावे? हे टाळता येत नाही का? वगैरे प्रश्न माझ्या मनात कायम येत असत. ५/६ वर्षांनी पूर्वीच्या कर्वेनगर क्लबचा रानडे नावाचा एक मेंबर भेटला. तो म्हणत होता, "जतकर खरच चुकले राव आपले. इतक्या गंभीरपणे भांडणे करायला नको होती. काय निष्पन्न झाले? माझे ही चुकलेच जरा !" मी काय बोलणार, हसलो झाले…
    रोटरी क्लब सिंहगड रोड मध्ये मी सिनियर कॅटेगरीत गणला जाऊ लागलो. एकूणच क्लब छान चालला होता. पूर्वीच्या कर्वेनगरच्या कटू आठवणीतून बाहेर पडून नव्याने कामाला लागलो. क्लब मधील निरनिराळ्या पदावर कामाचा अनुभव घेऊ लागलो. निरनिराळ्या विभागांपैकी कम्युनिटी सर्विस हा विषय माझ्या जवळचा. समाजातील लोकांशी संपर्कात राहून निरनिराळे सामाजिक प्रकल्प राबवणे मला विशेष आवडे. का कोणास ठाऊक, पण कर्वेनगर क्लब पेक्षा सिंहगड क्लबमध्ये माझा रोटरीतील एकूणच सहभाग वाढला होता . निरनिराळ्या विभागात काम करताना खूप उत्साह आणि आनंद मिळत होता. २००२ साली उत्तम कामाबद्दल Excellence Work Award मला मिळाले . खरे तर प्रत्येक वर्षी काही ना काही कारणाने बक्षीस मिळत गेली. रोटे. विलास जगताप जेव्हा रोटरी क्लब प्रेसिडेंट होता तेव्हा तर जवळजवळ प्रत्येक मिटींगला मला कोणत्या तरी कारणासाठी गुलाबाचे फुल मिळे. फूल घेण्यासाठी व्यासपीठावर अध्यक्षांनी बोलावण्याच्या आतच बॅक बेंचर सभासद 'जतकर फूल घेण्यासाठी उठा !' असे ओरडत. नंतर नंतर फूल घेण्याचा मला कंटाळा येऊ लागला. बक्षिसे किंवा फुले देऊन माझा कामाचा उत्साह वाढतो आहे असाच त्यांचा समज होत असावा. मला त्यांच्या ह्या गैरसमजाची गंमत वाटे. अलका मला नेहमी चिडवायची व म्हणायची 'प्रत्येक वर्षीचा अध्यक्ष तुमच्याकडून मोठ्या खुबीने कामे करवून घेतो. अध्यक्षपदाचा कालावधी संपल्यावर अध्यक्षांचे फोन येणे बंद होते का नाही पहा !, बायकोचे हे चिडवणे  मला कधी खोडून काढता आले नाही. तथापि मी रोटरीतील कामे माझ्या आनंदासाठी करीत असल्याने मी सर्व कामे आनंदाने व मनापासून करीत राहिलो ……

माझी लिहिण्याची व भाषण करण्याची सवय……
       रोटरीमध्ये असल्यामुळे म्हणा किंवा माझ्या आजोबा व आई, वडिलांच्या कडून आलेल्या वारस हक्काने म्हणा गेल्या काही वर्षात मला काहीतरी, काहीबाही लिहिण्याची उर्मी व्हायला लागली होती.  रोटरीमध्ये प्रत्येक मिटींगला बोलावलेल्या पाहुण्यांची ओळख करून देणे किंवा आभार प्रदर्शन करणे हे काम कोणत्यातरी सभासदाला करावे लागे. बर ही जबाबदारी क्लबचे अध्यक्ष अचानकपणे कोणाला तरी सांगत. त्यामुळे चार चौघात व्यासपीठावरून बोलावे लागे. माझ्यावरही असे प्रसंग येत असल्याने मला सगळ्यांच्या समोर बोलावे लागत असे. सुरवातीला खूप भीती वाटे. पण नंतर सवय होत गेली. बोलण्याच्या किंवा भाषण करण्याच्या बाबतीत रोटेरियन रवींद्र रांजेकर हा आमचा आदर्श होता. त्याचे बोलणे ऐकत रहावे असे वाटे. नंतर नंतर बोलण्याची भीड चेपत गेली. मी फार उत्तम वक्ता बनू शकलो नाही, तरी थोडे थोडे बोलता येऊ लागले. ही बोलण्याची कला मला नंतरच्या काळात म्हणजे मी जेव्हा  इकॅम (इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ़ महाराष्ट्र) च्या पुणे विभागाचा अध्यक्ष झालो तेव्हा कामी आली. इकॅम मध्ये 'वासरात लंगडी गाय शहाणी ' ह्या उक्तीप्रमाणे मी काहीसा भाव खावून जात असे. 'आपले आजचे भाषण छान झाले किंवा छान बोललात आज !' असे जेव्हा कोणी सभासद येउन सांगे तेव्हा बरे वाटायचे. मुंबईमधील इकॅमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (मी पुणे विभागचा अध्यक्ष झाल्यानंतरची पहिलीच सभा) मी केलेले भाषण माझे मलाच खूप आवडले होते. खूप उत्स्फुर्तपणे, मनापासून बोललो होतो. तयारीही केली होती. त्यामुळे नंतरच्या काळात मी काहीतरी बोलावे असा प्रेमळ आग्रहही होऊ लागला.
       आमच्या क्लबचे (सिंहगड रोड क्लबचे) साद प्रतिसाद नावाचे एक मुखपत्र (Bulletin) दर आठवड्याला प्रकाशित होत असे. प्रत्येक रोटरी क्लबचे असे एक bulletin असते. त्यामध्ये प्रत्येकाने काहीतरी लिहावे असा एक प्रघात आहे. तथापि 'लिहिणे आपले काम नाही' अशा समजुतीने मी व अनेक रोटेरियन सभासद काही लिहित नसत. मग त्या त्या वेळेचा ‘साद प्रतिसाद’ चा संपादक सर्वांच्या मागे 'काहीतरी लिहून द्या' असा लकडा लावत असे. रोटेरियन 'सतीश खाडे' हा त्या पैकी एक! हैराण केले होते त्याने मला ! मी त्याला काहीतरी कारण सांगून टोलवीत असे. कधीतरी बराच प्रयत्न करून काहीबाही लिहून देत असे.
      २००४ च्या सुमारास माझी आई (इन्ना) खूप आजारी होती. दिनानाथ हॉस्पिटलमध्ये एडमिट करावे लागले होते. जवळ जवळ १०/१५ दिवस मला हॉस्पिटल मध्ये रात्री मुक्कामाला जावे लागे. रात्री वेळ जात नसे. अलका म्हणाली वाचायला पुस्तके घेऊन जा. मग अनिल अवचटांची पुस्तके वाचायला सपाटाच लावला. अनिल अवचटांची लेखनशैली मला खूप आवडायची. कोणत्याही प्रकारचे अवघड शब्दांचे अवडंबर नाही, अवघड साहित्य लिखाणाचा आव नाही, साधे, सोपे… त्यांचे लिखाण रोजच्या जगण्यातले असते. मला खूप भावते. एके दिवशी वाचता वाचता काहीतरी लिहावेसे वाटू लागले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये येताना एक पेन व पॅड घेऊन आलो. मनात साठलेले अनेक विचार लिहित सुटलो. वेग वेगळ्या विषयांवरील ७ ते ८ लेख (लेख हा शब्द खूप जड आहे, खरे तर 'काहीबाही' हा शब्द योग्य !) लिहून काढले. नंतर दादांना (माझ्या वडिलांना) दाखवले. त्यांना खूप आनंद झाला. माझ्या ह्या काही बाही लिखाणाचे विषय होते, लग्नपद्धतीमधील चुकीच्या प्रथा, वृद्धांचे प्रश्न, अंधश्रद्धा, रोटरी युथ एक्स्चेंज वगैरे वगैरे …
       २००४-२००५ मध्ये मी आमच्या रोटरी क्लबचा ‘क्लब सर्व्हिस’ ह्या विभागाचा प्रमुख झालो. त्यातीलच एक उप विभाग म्हणजे 'सादप्रतिसाद' हे क्लब बुलेटीन. ह्या आमच्या क्लब बुलेटीन ची जबाबदारी 'संपादक' म्हणून रोटे. वैशाली जुमडेनी उचलली. रोटे. वैशाली सादप्रतिसाद चे काम खूप मनापासून करत असे. ते काम करताना मलाही खूप मजा आली. आईच्या आजारपणात हॉस्पिटल मध्ये रात्री लिहिलेले काहीबाही त्या वर्षी बुलेटीन मध्ये छापून टाकले. प्रत्येक लेखाची सुरवात 'जरा असाही विचार करून पहा' अशा शीर्षकाने मी करत असे व लेखाचा शेवट ''माझे म्हणणे तुम्हाला पटले तर होय म्हणा नाही तर सोडून द्या" ह्या वाक्याने करीत असे. क्लब मधील काही जणांनी लिखाण आवडले असे आवर्जून सांगितले.
      
एकदा असेच लिहिण्याचा मूड आला व "माझ्या परदेशी लेकी" अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला. युथ एक्स्चेंज ह्या रोटरीच्या उपक्रमात काम करताना परदेशातील दोन मुलींना माझ्या घरी होस्ट करण्याचा योग आला होता. मला मुलगी नसल्याने वर्ष दीड वर्ष दोन मुलींचा बाप होण्याचे भाग्य मला मिळाले. दोघी माझ्याकडे छान राहिल्या. खूप जीव लाऊन गेल्या. माझ्या घरातील त्यांच्या वास्तव्यावर आधारित काहीबाही लिहिले व 'सकाळ' ह्या पुण्यातील लोकप्रिय वर्तमानपत्राचे त्यावेळचे सहसंपादक श्री. श्रीपाद ब्रह्मे यांच्यासमोर ठेवले. त्यांनी तो लेख ठेऊन घेतला. सकाळ सारख्या वर्तमान पत्रात माझे काहीतरी लिहिलेले छापून येण्याची शक्यता जवळ जवळ नव्हतीच. मी सकाळ मध्ये दिलेला लेख जवळजवळ विसरूनही गेलो होतो. अचानक एकेदिवशी सकाळी दादांनी मला आनंदाने घाईघाईत उठवले व सांगितले कि जवळ जवळ अर्ध्या पानाचा माझा लेख चक्क छापून आला आहे. माझा विश्वासच बसेना. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा ठरला. दिवसभर मला माझ्या नातेवाईकांचे, मित्रांचे अभिनंदनाचे फोन येत होते.
       
ह्या घटनेने एक मात्र नक्की असे घडले की, एकूणच माझ्या आत्मविश्वासात भर पडली. त्याच्या नंतरच्या काळात लोकसत्तेमध्ये ही माझे युथ एक्स्चेंज ह्या विषयावरील २/३ लेख छापून आले. युथ एक्स्चेंज मध्ये काम करताना त्या विषयावरील एक छोटेसे पुस्तक (बुकलेट किंवा पुस्तिका म्हणा हवे तर…) लिहिले. त्या कामात मला रोटरी क्लब पुणे मेट्रो’ मधील रोटे. दिपक बोधनी या माझ्या जवळच्या मित्राची खूप मदत झाली. हे छोटेखानी पुस्तक म्हणजे साहित्यिक लिखाण नसून, रोटरीच्या युथ एक्स्चेंज या उपक्रमातील नियम, घ्यावयाची काळजी वगैरे गोष्टींची माहिती आहे. ती एकत्रीत करताना त्यातील रुक्षपणा घालवून, ती माहिती रंजक पद्धतीने व सोप्या भाषेत मांडली आहे. बहुधा अशा प्रकारचे या विषयावरील मराठी व इंग्रजीतील एकमेव पुस्तक असावे. रोटरी सोडायच्या आधी अंदाजे एक वर्ष मी 'इकॅम' पुणे विभागचा अध्यक्ष झालो. 'इकॅम पुणे वार्ता' या नावाचे पुणे विभागाचे त्रैमासिक सुरु केले. माझ्या लिखाणाची हौस त्यातून पूर्ण होऊ लागली. इकॅम वार्ता मध्ये आमच्या विद्युत क्षेत्रातील प्रश्न व्यावसायिक अडचणी मांडत होतो. माझ्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील म्हणजे ३ वर्षात इकॅम वार्ताचे काम झपाटल्यासारखे केले. पुढेही कदाचित करेन…

रोटरी युथ एक्स्चेंजचे काम…… एक आनंद पर्व……
        
परवा फेसबुकवर एक आनंदाची बातमी समजली आमच्या लेकीला 'क्रिस्तीना’ ला मुलगा झाला. कॉम्प्युटर, इंटरनेट, फेसबुक वगैरे तंत्रज्ञानामुळे एक बरे झाले आहे, पाच मिनिटात बातमी सगळीकडे ! पाच, दहा मिनिटे वयाच्या सुंदर तान्ह्या मुलाकडे क्रिस्तीना आनंदाने पाहतानाचा फोटो फेसबुकवर दिसला. आमच्या जावयाने ('बेरनार्दो' हे त्याचे नाव !)  फोटो लगेचच फेसबुकवर टाकला होता. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. ऑफिसच्या केबिनमध्ये एकटाच होतो. आनंदाने एक उडी मारली, मला नातू झाला होता…
      रोटरीमध्ये काम करताना अनेक आनंदाच्या क्षणांच्या पैकी हा एक परमोच क्षण असावा.  क्रिस्तीना (ब्राझील) व सोसिलीया (अर्जेंटीना) या माझ्या दोन लेकींनी आमच्या घरातले वातावरण त्याकाळी पार बदलून टाकले होते. २००३-२००४ साली हर्षवर्धन (माझा मुलगा) रोटरीच्या युथ एक्स्चेंज या कार्यक्रमांतर्गत अर्जेंटीना येथे एका वर्षासाठी गेला आणि त्यामुळे घरात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. माझे आई, वडील तर माझ्यावर नाराजच होते. हर्षवर्धनला एका वर्षासाठी परदेशात पाठवायचे ते ही इतक्या लहान वयात ! (हर्षवर्धनचे वय त्यावेळी १५ वर्षाचे होते). त्यांचा स्पष्ट विरोध होता. पण हर्षवर्धनच्या एक्स्चेंजमध्ये जशा ह्या परदेशी मुली आमच्याकडे राहायला आल्या तसे त्यांचा हा विरोध मावळला. ते मला एकदा म्हणाले "आमच्या उतारवयातील ह्या निरस  आणि रुक्ष आयुष्यात ह्या पोरींनी खरच खूप मजा आणली."  आज माझे आईवडील हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता. माझे आई, वडील गेल्यावर सेसीलीया चा सांत्वनपर फोन आला होता. एखाद्या मोठ्या मुलीप्रमाणे गंभीरपणे माझ्याशी बोलत होती. माझे सांत्वन करीत होती. आईवडिलांच्या आठवणींनी गहिवरत होती. 
     
सेसिलीया तिच्या मायदेशी परत जाताना खूपच हळवी झाली होती. आमच्या गळ्यात पडून जाम रडत होती. मी खरे तर तसा भावना शून्य, पण मलाही काहीसे दाटून आले. स्वतःच्या मुलीला लग्नानंतर सासरी पाठवताना आई वडिलांना असेच काहीसे होत असेल का? कोण कुठल्या साता समुद्रापलीकडील माझ्या ह्या परदेशी लेकी आम्हा सर्वांना लळा लावून गेल्या…..              





रोटरी युथ एक्स्चेंज कमिटीत प्रवेश :


       २००३-२००४ साली हर्षवर्धन अर्जेन्टिनाला जाताना मला रोटरी डिस्ट्रीक्ट कमिटी मधील रोटेरियन मित्रांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव झाली. अर्ज भरणे, युथ एक्स्चेंज मधील नियमांची माहिती करून देणे, व्हिसा काढण्याच्या कामात मदत करणे वगैरे. सर्वच प्रकारची मदत ही माझी मित्र मंडळी करत होती. मला जाणवले कि आपण ही अशा प्रकारचे काम करून ह्याची परतफेड केली पाहिजे. मी युथ एक्स्चेंज कमिटीला पत्र लिहून काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि २००३ -०४ च्या शेवटी शेवटी माझी नेमणूक डिस्ट्रीक्ट कमिटीवर 'मल्टीडिस्ट्रीक्ट को-ऑर्डीनेटर' या पदावर झाली. 'मल्टीडिस्ट्रीक्ट को- ऑर्डीनेटर' म्हणजे काय हे ही मला माहिती नव्हते. कमिटी मिटींग्ज ना नियमित जाणे व युथ एक्स्चेंज या कार्यक्रमाचे कामकाज समजावून घेणे, एवढेच काम सुरवातीला मी करत असे.
    आमच्या कमिटीच्या दोन तीन मिटींग्ज झाल्यानंतर अचानकपणे एक विचित्र घटनेने मी अस्वस्थ झालो.  त्यावेळच्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नी एकदा आमच्या मिटिंग ला भेट दिली, आणि काही समजायच्या आत अत्यंत अपमानास्पद शब्दात कमिटी चेअरमन व कमिटीची कानउघाडणी केली. मी या कमिटीत अगदीच नवीन होतो. मला काय झाले हे समजेना. आमचे कमिटी चेअरमन अतिशय दुखावले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आम्ही सर्वजण झाल्या घटनेने अस्वस्थ व दुःखी झालो. दुसऱ्या दिवशीच सकाळी आमच्या चेअरमनने युथ एक्स्चेंज कमिटीचा राजनामा दिला. सर्व कमिटीच बरखास्त झाल्यावर युथ एक्स्चेंज कार्यक्रमाचे काय होणार? त्यात भाग घेतलेल्या मुलांचे काय होणार? परदेशातून पुण्यात येणाऱ्या मुलांचे काय होणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. काही दिवस अत्यंत अस्थिर परिस्थिती निर्माण झाली. आमच्या डिस्ट्रीक्ट ३१३० या युथ एक्स्चेंज कार्यक्रम अचानक धोक्यात आला होता.

युथ एक्स्चेंज कामाची खरी सुरवात :
    एके दिवशी ब्राझील मधून एक इमेल आम्हाला मिळाली, त्यात लिहिले होते... "आमच्या डिस्ट्रीक्ट मधील 'कुरीतीबा ' येथून दोन ब्राझीलीयन मुली भारतात येत आहेत. त्यांच्या भारतातील होस्ट फॅमिली ची ची नावे आम्हाला तुमच्याकडून कळविण्यात आली नाहीत. आता देवच त्यांचे रक्षण करो "आम्ही हादरलोच…. वेळेचे गणित मांडले तर त्या त्याच दिवशी रात्री/पहाटे मुंबईत विमानाने येणार होत्या. रोटे. विलास जगताप मला हे दुपारी ३ वाजता सांगत होता. मी आणि विलासने ताबडतोब त्यांना आणायला जायचे ठरवले. विचार करायला सवडच नव्हती. आम्ही दोघांनी एक मोठी गाडी घेतली आणि मुंबई एअरपोर्टवर सकाळी ५ वाजता निघालो. रात्री (पहाटे) २ वाजता क्रिस्तीना व लियांड्रा ह्या ब्राज़ीलियन मुलींचे एअरपोर्टवर स्वागत केले. त्यांना घेऊन आम्ही पुण्यात पहाटे ५।। ते ६ च्या दरम्यान पोहोचलो. पण या दोघी परदेशी मुलींच्या पुण्यातील Host Families बद्दल आम्हाला काहीच माहीती नव्हती. या दोघींच्या राहण्याची व्यवस्था कुठे करायची? याचाच विचार आणि चर्चा पुण्यात येताना आम्ही करत होतो. या दोघींनाही आमचे मराठीतून चाललेले बोलणे समजत नव्हते. त्यामुळे त्या आनंदात होत्या. आम्ही कुणाकडे राहणार आहोत? असा प्रश्न त्यांनी एक दोनदा विचारला आम्ही उत्तर देण्याचे टाळले. बर आयत्या वेळेला या मुलींना सांभाळायला कोण तयार होणार? आमच्या क्लबमधल्या काही रोटेरियन मित्रांना पहाटे पहाटे फोन करून विचारले. पैकी 'प्रमोद अपशंकर' एका क्षणात होय म्हणाला. चला एका मुलीची राहण्याची सोय झाली. दुसरीचे काय ? पुण्यात प्रवेश करता करता मी एकीला 'होस्ट' करण्याचा निर्णय घेवून टाकला. अलकाला ह्यातले काहीच माहित नव्हते. त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळालाही मला कदाचित सामोरे जावे लागणार होते…
          सकाळी ५ ।। च्या दरम्यान मी माझ्या क्रिस्तिना नावाच्या परदेशी लेकीला घेऊन घरी आलो अलकाला परिस्थितीची कल्पना दिली. अलकाला न विचारता मी हा निर्णय घेतलेला असल्याने ती स्वाभाविकपणे काहीशी नाराज होती. ती स्पष्टपणे मला म्हणाली "ह्या परदेशी मुलीची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे करा". एक दोन दिवस ती आपल्याकडे राहायला हरकत नाही. मी काहीच बोललो नाही..... 
       क्रिस्तिना ला मी तिची बेडरूम दाखवली. प्रवासाचा शीण व नवीन वातावरण यामुळे थकलेली व बरीचशी गोंधळलेली क्रिस्तीना गाढ झोपी गेली. दादा व इन्ना उत्सुकतेने क्रिस्तीनाबद्दल अनेक प्रश्न विचारत होते. सकाळी ९ वाजता उठून ती बेडरूममधून जेव्हा बाहेर आली तेव्हा आम्ही सारेच दचकलो? क्रिस्तीना तिचे रात्री घालायचे कपडे तसेच ठेवून बाहेर आली होती. बीन बाह्यांचा टी-शर्ट व अर्धी चड्डी (short pant) असा तिचा पेहराव होता. घरातील वातावरण अचानक गंभीर झाले. मी ताबडतोब उठलो व क्रिस्तिनाला समजावून सांगितले की "आम्ही अशा प्रकारचे कपडे घालत नाही. माझ्या आई वडिलांना ते आवडणार नाही". सर्वांचे गंभीर चेहरे पाहून तोपर्यंत क्रिस्तिनालाही अंदाज आला असावा. ती मला 'सॉरी' म्हणून लगेचच कपडे बदलून आली.
      रोटरीमध्ये युथ एक्स्चेंज कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुलांना व पालकांनाही अशा प्रकारचे सांस्कृतिक धक्के (Cultural shocks) हाताळायचे चक्क प्रशिक्षण देण्यात येते. क्रिस्तिना खरच एक गोड मुलगी होती. एक दोन दिवसातच ती आमच्यात मिसळून गेली. ३/४ दिवसांनी आम्ही क्रिस्तिना ची राहण्यासाठी दुसऱ्या एका रोटेरियनकडे व्यवस्था केली आणि तसे क्रिस्तिनाला सांगितले. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ती म्हणाली "मी इथे तुमच्याकडेच का राहायचे नाही ? मला इथेच राहायला आवडेल. मला तुमचे घर व तुमचे कुटुंब खूप आवडले आहे". मला काय बोलावे ते सुचेना. थोड्या वेळाने अलका माझ्या जवळ आली व म्हणाली अहो! राहू द्या क्रिस्तिना ला आपल्याकडेच! मुलगी गोड आहे…
      २२ वर्षाची क्रीस्तीना आमच्याकडे राहायला आली आणि आमच्या घरातले वातावरणच बदलून गेले. क्रिस्तिना अतिशय गोड, हसरी, समजूतदार, प्रगल्भ विचारांची (Mature) होती. तिच्या देशापेक्षा, कुटुंबापेक्षा संपूर्ण वेगळे वातावरण असलेल्या आपल्या देशाच्या, पुण्याच्या, माझ्या कुटुंबाच्या वातावरणाशी समरस होण्याचा ती मनापासून प्रयत्न करत होती. भारतातील राजकारण, पुण्यातील सांस्कृतिक वातावरण वगैरे गंभीर विषयावर देखील चर्चा करणारी क्रीस्तीना पुण्यातील रस्ता ओलांडताना मात्र घाबरून माझा हात घट्ट पकडून ठेवत असे. रस्ता ओलांडल्यावर एखादी लढाई जिंकल्याचे आनंदी भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत ! दादा देखील तिच्या बरोबर अनेक विषयावर चर्चा करीत. दादांची देवपूजा चालू असताना ती त्यांच्या जवळ जाऊन बसत असे.
     इन्ना (माझी आई) व क्रिस्तिना किंवा सेसिलीया या परदेशी मुलींच्या मधील संवाद, गप्पा म्हणजे एक धमाल प्रकार असे. माझ्या परदेशी लेकींना मराठीचा गंध नव्हता आणि माझ्या आईला पोर्तुगीज (क्रिस्तिना ची भाषा) व स्पॅनिश (सेसिलीयाची भाषा) किंवा इंग्रजी भाषा येत नव्हती. आश्चर्य म्हणजे ह्या मुली व माझी आई तासनतास गप्पा मारत असत. भावना एकमेकांच्या पर्यंत पोहचण्यासाठी भाषेची गरज नसते हेच खरे! मला व अलकाला मात्र मध्यस्थाची (दुभाषा) भूमिका कधी कधी घ्यावी लागे. माझ्या ह्या परदेशी लेकींचे इंग्रजी यथातथाच होते. त्यामुळे आम्हा सर्वांची इंग्रजी बोलण्याची 'कॉन्फिडन्स लेव्हल' मात्र वाढली.

युथ एक्स्चेंज Outbound Chairman ह्या पदावर नियुक्ती:
 क्रिस्तिना आमच्या घरी राहायला आल्यावर आमच्या रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ (त्या वेळचा ३१३०) ने माझी Outbound Chairman या पदावर नियुक्ती केली. मला युथ एक्स्चेंज या कार्यक्रमाची काहीच माहिती नव्हती. माझ्याच क्लबचा रोटेरियन विलास जगताप याने मला युथ एक्स्चेंज च्या कामातील सुरवातीचे धडे दिले. त्यातील बारकावे शिकवले. युथ एक्स्चेंज ह्या कार्यक्रमाची, त्यातील नियमांची माहिती सर्व रोटरी क्लब्ज मधील सभासदांना देणे, यात भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांचे अर्ज मागवणे त्या अर्जांची छाननी करणे, त्या मुलांचे इंटरव्ह्यू घेणे, ह्या मुलांसाठी निरनिराळे देश ठरवणे, जाणाऱ्या मुलांचे पासपोर्ट, व्हिसा, विमानाची तिकिटे वगैरे कामात मदत मदत करणे, अशी कामे करावी लागत. सर्वात महत्वाचे काम म्हणजे जगातील अनेक देशातल्या अनेक रोटरी डिस्ट्रीक्ट व क्लब्ज यांच्याशी संपर्कात राहून आपल्या भारतीय मुलांसाठी ओपनिंग्ज मिळवणे. या निमित्ताने बऱ्याच देशातील रोटेरियन सभासदांच्याबरोबर माझी मैत्री वाढली हा अनुभव खूप वेगळा होता.
युथ एक्स्चेंज मधील काम हे अत्यंत जबाबदारीचे असते. त्यामुळे ह्यातील कामे वेळच्यावेळी करणे फार गरजेचे असते. त्यामुळे परदेशातून आलेल्या रोजच्या मेल चेक करण्याचे काम काम मी सकाळचा चहा घेतानाच करत असे. कारण दिवसभरातील व्यावसायिक कामातून ह्या कामाला वेळ मिळेलच असे सांगता येत नसे.
   मला हे काम करताना एका गोष्टीचे नेहमी वाईट वाटे, ते म्हणजे हा कार्यक्रम गरज नसताना फक्त इंग्रजी भाषेतून चालतो. त्यामुळे फक्त पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरातील मुलेच ह्या कार्यक्रमात भाग घेताना दिसतात. आपल्याकडच्या छोट्या शहरातील किंवा खेडेगावातील मुले किंवा पालक यात भाग घ्यायला बिचकतात. किंबहुना ह्या कार्यक्रमाचा निटसा प्रसार किंवा प्रचार देखील आपल्या खेड्यात होत नाही. मला नेहमी असे वाटते की छोट्या गावातल्या मराठी मुलांनी ह्यात भाग घेतला तर खऱ्या अर्थाने रोटरीचे युथ एक्स्चेंज कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. मग छोट्या गावातून युथ एक्स्चेंज चा प्रसार व्हायचा असेल तर युथ एक्स्चेंज चे काम मराठीतून चालायला हवे अशा विचारांनी माझ्या मनात ठाण मांडले. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशातील नागरिकांना आपापल्या मातृभाषेचा अतिशय अभिमान असतो. दुर्दैवाने आपण आपल्या मातृभाषेला विसरत चाललो आहोत अशा विचारातून मी युथ एक्स्चेंजवरील माहिती मराठीतून लिहून पुस्तक प्रसिद्ध करायचे असा घाट घातला. ह्या कामात रोटे. दीपक बोधनी याने मनापासून आणि खूपच मदत केली. आम्ही दोघांनी या पुस्तकाचे मराठीतून आणि इंग्रजीतून प्रकाशन केले. या पुस्तकाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी रोटे. अशोक भंडारी, रोटे. संजय रुणवाल, रोटे. सी. डी. महाजन वगैरे अनेक मित्र पुढे आले.

Inbound विभागाचे काम :
              रोटे. डॉ. महेश कोटबागी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर झाले आणि त्यांनी Inbound विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. Inbound विभागामध्ये परदेशातून भारतात आलेल्या (म्हणजेच डिस्ट्रीक्ट ३१३०) मुलामुलींची काळजी घेणे, ह्या संदर्भातील कामांचे व्यवस्थापन करणे अशी अत्यंत जबाबदारीची कामे असतात. निरनिराळ्या देशातून वर्षभरासाठी आलेल्या या मुलांना सतत व्यस्त ठेवणे हे एक आव्हान या कामात असते. ही परदेशी मुले आपल्या तुलनेत मोकळ्या वातावरणात वाढलेली असतात.  त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतात. परदेशी मुलांची मानसिकता आणि भारतीय पालकांची मानसिकता या परस्पर विरोधी गोष्टींचा समतोल राखावा लागतो. मग अडचणी निर्माण झाल्यावर या परदेशी मुलांचे आणि काही प्रसंगी भारतीय पालकांचे समुपदेशन (Counselling) करावे लागते.

मुलांचे आणि पालकांचे समुपदेशन… एक अफाट अनुभव:
        एकदा असेच एक अमेरिकन मुलगी एक वर्षासाठी पुण्यातील एका मध्यम वर्गीय कुटुंबाकडे म्हणजेच श्री व सौ. देशपांडे यांच्याकडे रहावयास येणार होती. देशपांडे दापंत्याचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत गेला होता. देशपांडे पती पत्नींना मुलगी नसल्याने ह्या अमेरिकन मुलीच्या आगमनाकडे ते उत्सुकतेने डोळे लावून बसले होते. या मुळ अमेरिकन मुलीच्या स्वागताची जय्यत तयारी या साध्या सरळ स्वभावाच्या देशपांड्यांनी केली होती. आपल्या घरी आल्यावर तिला छान वाटावे म्हणून सौ. देशपांडे यांनी तिची खोली मस्तपैकी सजवून ठेवली. ठरलेल्या दिवशी ही अमेरिकन मुलगी मुंबई विमानतळावर उतरली. देशपांडे दाम्पत्य विमानतळावरच तिच्या स्वागतासाठी गेले होते. त्यांनी तिचे प्रेमाने स्वागत केले व तिला आपल्या पुण्यातील घरी आणले. घरात प्रवेश करताच ह्या १६ वर्षाच्या अमेरिकन मुलीने या मध्यम वर्गीय देशपांडे पती पत्नींना प्रश्न विचारला "मला सिगारेट ओढायची आहे. मी इथे सिगारेट ओढली तर चालेल का?" देशपांडे पती पत्नी या प्रश्नाने हादरलेच ! साध्या सरळ मध्यम वर्गीय देशपांडे दाम्पत्याला हे मानवणारे नव्हतेच.
   त्यांनी ताबडतोब मला फोन केला व सांगितले की, "आम्हाला ही असली मुलगी नकोच, तुम्ही तिची दुसरीकडे व्यवस्था करा". मी ताबडतोब त्यांच्या घरी गेलो. त्या अमेरिकन मुलीला झालेला प्रकार सांगितला. तिला हे समजेना कि आपली एवढी मोठी काय चूक झाली? तिला मी समजावून सांगितले की भारतीय कुटुंबातील स्त्रिया, मुली सहसा धुम्रपान करत नाहीत. त्यामुळे तुला इथे घरी धुम्रपान करता येणार नाही त्या मुलीने ते तातडीने मान्यही केले. पण देशपांडेंना समजावून सांगता सांगता माझ्या नाकी नऊ आले. वास्तविक ती मुलगी स्वभावाने समंजस होती, चांगली होती. पण तिच्या देशात मुलींनी धुम्रपान करणे ही एक सहज व नेहमीची गोष्ट होती. तिच्या अमेरिकन पालकांना देखील ती धुम्रपान करते हे माहिती होते. माझ्या १५/२० दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर देशपांडे दाम्पत्य ह्या सांस्कृतिक धक्क्यातून (Cultural Shock) बाहेर आले. ही मुलगी नंतर वर्षभर देशपांडे यांच्याकडे छान राहिली. माझ्याकडे अशा असंख्य घटनांचा साठा आहे….
  ‘आपला मुलगा परदेशात जाऊन बिघडेल' अशा मानसिकतेने ग्रासलेल्या एका आईला मी महत्प्रयासाने ह्या गैरसमजातून बाहेर काढले आहे. अन्यथा हा मुलगा परदेशात जावूच शकला नसता. पुण्यात राहून किंवा आपल्याच घरात राहून मुले बिघडत नाहीत असे थोडेच आहे? त्यासाठी परदेशात कशाला जायला हवे? खरे तर मनुष्य स्वभाव जगाच्या पाठीवर कोठेही सारखाच असतो. पालक काय किंवा मुले काय सगळीकडेच गुणदोष सारखेच!
     पालकांना युथ एक्स्चेंज चे महत्व सांगताना मला विलक्षण आनंद व समाधान मिळत असे, तर कधी कधी नैराश्य हि यायचे. एकदा एक झोडपे माझ्या घरी युथ एक्स्चेंज ची माहिती घेण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर त्यांची १५/१६ वर्षाची स्मार्ट मुलगी देखील आली होती. गप्पांना सुरवात केल्यावर १० मिनिटातच माझ्या लक्षात आले की, या मुलीच्या आईचा मुलीला परदेशात १ वर्षासाठी पाठवण्यास सक्त विरोध होता. त्या बाबतीत आई थोडी अधिकच आक्रमक होती. वडील आणि मुलगी काहीसे आगतिक ! मी जवळ जवळ दोन तीन दिवस या आईचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी मी थोडा निराश व हतबल झालो होतो. मग मुलीच्या वडिलांनी ठाम निर्णय घेतल्याने या आईने नाईलाजाने मुलीला परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला. या मुलीला 'स्वीडन' ह्या देशात जाण्याची संधी मिळाली. सहा महिन्यांनी ही हट्टी माऊली मला भेटून म्हणाली "या कार्यक्रमाचा माझ्या मुलीला खूपच फायदा होतो आहे. सुरवातीला मी घेतलेली भूमिका खरोखरच चुकीची होती. तुमच्या प्रयत्नाच्या मुळेच हे घडते आहे." त्या माऊलीचे हे उद्गार ऐकून मला खूप बरे वाटले……
      Inbound विभागात काम करताना अनेक विचित्र घटनांना मला तोंड द्यावे लागले. परदेशातील बऱ्याच कुटुंबात पराकोटीचे व्यक्तिस्वातंत्र्य असते. त्यामुळे भारतात आलेली ही परदेशी मुले थोडी स्वैर व आक्रमक असतात. आपल्या कुटुंबातील 'सातच्या आत घरात' ही प्रणाली त्यांना झेपतच नाही. कारण इतर बऱ्याच देशात डिस्को संस्कृती बोकाळल्यामुळे ह्या परदेशी तरुणाला रात्री सात नंतर उजाडते (आपल्या भारतीय संस्कृतीतही हे लोण वेगाने झिरपत आहे). भारतीय कुटुंबातील आई वडिलांना हे कसे पटावे ? मग कधी कधी परदेशी मुलगा किंवा मुलगी आणि भारतीय पालक यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण व्हायची. मग त्यांच्यात समन्वय साधण्याची कामगिरी करावी लागत असे. कधी कधी वाटे कि आपण हे काय करतो आहोत? ह्या लष्करच्या भाकऱ्या आपण का भाजायच्या? पण का कुणास ठाऊक, मला ह्या कामात विलक्षण आनंद मिळत असे ! तरुण मुलांच्या विकासासाठी युथ एक्स्चेंज हा एक महत्वाचा राजमार्ग आहे अशी माझी दृढधारणा आहे.

रोटरी युथ एक्स्चेंज मधील आपत्कालीन घटना :
          ह्या काळात काही आपत्कालीन परिस्थितीला देखील मी तोंड दिले. एका घटनेने मला अक्षरशः घाम फुटला होता. ती घटना मी आयुष्यात विसरूच शकणार नाही.
    रोटे. महेश कोटबागी हे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर असतानाच्या वर्षी डिस्ट्रीक्ट कॉन्फ़रन्स औंध मधील 'पॅनकार्ड क्लब’ येथे आयोजित करण्यात आली होती. तो दिवस होता ३१ डिसेंबर २००५. वर्षाचा शेवटचा दिवस व कॉन्फ़रन्स अशा दोन्ही घटनाच्यामुळे त्या वर्षीचा हा कार्यक्रम विशेष चांगला व आनंददाई असा होणार होता. खूप छान छान सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. युथ एक्स्चेंज मधील सर्व परदेशी मुलांना ह्या कॉन्फरन्सला आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. पुण्यातील निरनिराळ्या भागात राहणाऱ्या ह्या मुलांना गोळा करत करत मी कार्यक्रम स्थळी पोहचलो. माझ्या मदतीला अलका होतीच. (खरे तर युथ एक्स्चेंज कमिटीतले कुणीच मदतीला का नव्हते? जाऊ दे…. आता आठवत नाही.)
   कॉन्फरन्स संपल्यावर ३१ डिसेंबरची पार्टी सुरु झाली. कर्कश संगीताच्या तालावर २०० ते ३०० रोटेरीयन्स ची पावले थिरकू लागली. परदेशी मुला मुलींना देखील नाचण्याची इच्छा होऊ लागली. ३१ डिसेंबर असल्याने मी या मुलांना धमाल करण्याची परवानगी दिली. त्या प्रचंड गर्दीत जाण्यापूर्वी या मुलांना ड्रिंक्स न घेण्याबद्दल आणि नाचणे वेळेवर संपविण्यासंबंधी सूचना दिल्या. पण ह्या गर्दीत मुलांना सोडताना माझ्यावर भीती वजा दडपण आले होते.
   मी मनाई करून देखील ह्या परदेशी मुला मुलींनी मद्यपान केलेच. मात्र मी सांगितलेल्या वेळेत सगळी गर्दीतून बाहेर पडली. ह्या परदेशी मुलामुलींत 'फेनिया' नावाची एक जर्मनीतील मुलगी देखील होती. तिच्याबरोबर बोलताना मला जाणवले की तिच्यावर मद्यपानाचा अंमल जर जास्तीच झाला होता. मी तिला रागवत होतो. त्यावर ती माझी माफी मागत होती, आणि बोलता बोलता ती जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. मला ब्रह्मांड आठवले. काय करावे ते सुचेना. बरोबर असलेली सर्व इतर परदेशी मुले देखील घाबरली.
     मी फेनिया च्या तोंडावर पाणी मारून तिला सावध करण्याचा प्रयत्न केला पण काहीच घडेना. मला अचानक आठवले की 'पॅनकार्ड कल्ब' मध्ये प्रवेश करताना मला एक अम्ब्युलन्स दिसली होती. मी अलकाला गमतीने म्हणालो देखील होतो “इथे अम्ब्युलन्स कशाला?" ते आठवताच मी ताबडतोब  अम्ब्युलन्सच्या दिशेने धावत गेलो. ड्रायव्हर आत मध्ये गाढ झोपला होता त्याला कसेबसे उठवून तयार केले. स्ट्रेचर वरून फेनियाला अम्ब्युलन्समध्ये ठेवले. डॉ. महेश कोटबागीला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी फोन केला. त्याने ताबडतोब निर्णय घेऊन मला सांगितले की “फेनियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी आलोच!”
      परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोटे. दीपा भागवत आमच्या मदतीला धावून आली. ती आमच्या कमिटीची एक सदस्य होती. जाम धावपळ झाली. आम्ही बेशुद्ध फेनियाला हॉस्पिटलमध्ये अडमिट केले. तो पर्यंत फेनियाची परिस्थिती आणखीनच गंभीर झाली होती. तिच्यावर उपचार सुरु झाले तेव्हा अंदाजे रात्रीचे २ वाजले होते. उद्या सकाळपर्यंत काहीही सांगता येत नाही. असे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा आमच्या ग्रुप मधील इतर परदेशी मुली रडू लागल्या. सगळ्यांना सावरता सावरता मला, अलकाला व दीपा भागवतला अक्षरशः दम लागत होता.
   पहाटे ४ वाजता डॉक्टरांनी सांगितले की फेनियाची प्रकृती आता स्थिर आहे. (आणि तिच्या ड्रिंक मध्ये कुणीतरी काहीतरी मिसळले असावे असेही डॉक्टर म्हणाले होते) मग मी सर्व मुलांना बसमध्ये बसवून पुण्यातल्या त्यांच्या त्यांच्या घरी पोहचवून आलो. मला व अलकाला घरी पोहचायला पहाटेचे ५ वाजले होते. ३/४ दिवसांनी फेनिया बरी झाल्यावर माझी माफी मागण्यासाठी घरी आली. माझ्यासमोर बसून खूप खूप रडली. खरे तर फेनिया हि एक चांगली मुलगी होती. ती कधीच मद्यपान करत नसे. पण ३१ डिसेंबरचा माहोल असल्याने असेल तीने मैत्रीणींच्या नादाने थोडे मद्यपान केले होते.  मी व अलका तिची बराच काळ समजुत घालत होतो. पुन्हा मद्यपान करू नकोस असे सांगत होतो. फेनियाच्या विनंतीवरून मी तिच्या जर्मनीतल्या पालकांना ही घटना सांगणार नाही असेही आश्वासन मी दॆले. मनात विचार येत होता… माझ्या मुलीच्या बाबतीत असे घडले असते तर मी काय केले असते? मी कसा रियाक्ट झालो असतो?…

फिल्म एडीटींगचा छंद…
           युथ एक्स्चेंजच्या Inbound विभागात काम करताना परदेशातून आलेल्या मुलांच्यासाठी विविध सहली आयोजित करणे हे एक अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे काम असते. उत्तर भारत, दक्षिण भारताबरोबर गोवा, अजंठा वेरूळ, कोकण अशा विविध सहलींचे नियोजन करावे लागते. Inbound विभागाचा प्रमुख म्हणून काम करताना मला एक कल्पना सुचली. ह्या विविध सहलींच चित्रण (Video Shooting) करून त्या चित्रणाचे छानपैकी संकलन करून त्याच्या C.D./ D.V.D. ह्या परदेशी मुलांना द्यायच्या, अशी ती कल्पना ! यामुळे सहलीचे आनंदक्षण व भारतातील स्थलदर्शन यांचा साठाच या मुलांना देता आला तर मुलांच्या बरोबरच त्यांच्या देशातील आई, वडिलांना व इतरांना ही भारताबद्दल माहिती होईल असाही महत्वाचा विचार त्यात होता. 
       तसे मला लहानपणापासूनच फोटोग्राफीबद्दल आकर्षण होतेच. मी एक उत्तम व्हिडीओ कॅमेरा विकत घेतला. या परदेशी मुलांच्या सहलीमधील प्रसंगांचे शुटींग मी करून ठेवत असे. ज्या सहलीला मी जात नसे तेव्हा सहलीबरोबर असलेल्या रोटेरियन मित्राला शुटींग करायला सांगत असे. पण ह्या चित्रीकरणाचे संकलन (एडीटींग) कसं करायचे हा मोठा प्रश्न मला पडला. माझा हा प्रोब्लेम सोडवण्यासाठी माझा मित्र रोटे. विलास पाठक माझ्या मदतीला आला. मला एडीटींग शिकवण्याचे त्याने मान्य केले. मग घराच्या कॉम्प्युटरवर एडिटिंग चे सॉफ्टवेअर घेतले. कॉम्प्युटरमध्येही काही बदल करावे लागले. खरेतर हे सर्व खर्चिक होते. पण म्हणतात ना हौसेला मोल नसते. मी विलासला खरच ह्या एडिटिंग च्या शिक्षणासाठी खूप त्रास दिला आहे. आमची शिकवणी बऱ्याचवेळी फोनवरच चालत असे. विलास ही माझा हा त्रास न वैतागता सहन करून मला एडिटिंग शिकवत असे. या फिल्म एडीटींगच्या छंदाने मला त्या काळात झपाटून टाकले होते. या चित्रफिती च्या DVD करताना मी रात्री दोनतीन वाजेपर्यंत काम करीत असे. जवळजवळ पाच वर्षे मी युथ एक्स्चेंज च्या फिल्म्स बनवत गेलो. त्या काळातील रोटरी कॉन्फरन्स मधील युथ एक्स्चेंज च्या परदेशी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रेझेंटेशन असो किंवा या मुलांचे अनेक क्लबमध्ये आपापल्या देशातील माहितीचे सांस्कृतीचे सादरीकरण व्हायचे, त्याचेही मी चित्रीकरण करीत असे. काही परदेशी मुलांच्या त्यांच्या होस्ट फॅमिलीत झालेल्या वाढदिवसाच्या पार्ट्याचेही चित्रीकरण केले.  ह्या फिल्म्स कलात्मक दृष्टया फारशा चांगल्या नसतीलही पण मला परदेशी मुलांना आनंद देणाऱ्या होत्या. भारतातील वास्तव्याच्या आठवणींच्या ह्या फिल्म्स मी जेव्हा परदेशी मुलांना देत असे तेव्हा त्यांचे आनंदित चेहरे मला विलक्षण समाधान देत असत.

           माझ्या सिंहगड रोटरी क्लब मधील अनेक प्रोजेक्टस चित्रीकरण करून फिल्मस बनवल्या होत्या. रोटरी आयडॉल, पथनाट्य, गणित ऑलींपियाड या आम्ही घेतलेल्या स्पर्धा, इंटरनॅशनल मँचिंग ग्रॅट प्रोजेक्ट, गोव्याच्या कॉन्फारन्समध्ये आम्ही सर्व क्लब मेंबर्सनी केलेली धमाल अशा एक ना अनेक फिल्म मी बनवल्या आहेतह्या फिल्मसच्या कॉपीज मी माझ्याकडे जपुन ठेवल्या आहेत. म्हातारपणात उपयोगी येतील त्या !

         आमच्या क्लब मधील आलापी परचुरे ही मुलगी अर्जेंटीनाहून एक वर्षानंतर परत आली तेव्हा  तिने येताना अर्जेंटीनामधील तिच्या कुटुंबाबरोबर काही व्हिडीओ शुटींग केले होते. त्याचा वापर करून मी एक फिल्म तयार केली. त्या शुटींगमध्ये खूप भावनिक प्रसंग होते. विमानतळावर तिला निरोप ध्यायला तिचे आई, वडील, आजी, आजोबा वगैरे नातेवाईक आले होते. सगळ्यांना गहिवरून आले होते . अत्यंत ह्रद्यद्रवक अशा प्रसंगाचे ते शुटींग होते. ही फिल्म माझी मलाच सर्वात जास्त आवडलेली होती. ह्या फिल्मचा उपयोग युथ एक्स्चेंज च्या प्रमोशनल प्रोग्राम मध्ये अजूनही कधी कधी केला जातो.

होस्ट फॅमिलीजची कमतरता :
 युथ एक्स्चेंज मधील माझ्या सहभगाची सुरवातच मुळी या प्रोब्लेममुळे झाली होती. भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने आलेल्या ह्या परदेशी मुलामुलींना होस्ट करण्यासाठी आपल्या देशातील पालक दुर्दैवाने अनुत्सुक असतात. हे एक कटू सत्य मला युथ एक्स्चेंज मध्ये काम करताना जाणवले. मग ते पालक रोटरी मधील असोत किंवा रोटरीच्या बाहेरचे असोत. पण रोटरी जगतामध्ये असा एक गैरसमज आहे की रोटेरियन फॅमिलीज परदेशी मुलांचा चांगला सांभाळ करतात. त्यामुळे नॉन रोटेरियन कुटुंबच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा दुय्यम प्रतीचा असतो. पण माझा अनुभव काही अशा प्रकारचा नव्हता. किंबहुनानॉन रोटेरियन फॅमिलीज ह्या जास्त जबाबदारीने ह्या मुलांना सांभाळतात.  रोटेरियन फॅमिलीजना आपण रोटेरियन असल्याचा वृथा अभिमान असल्याने ( रोटेरीयन्स च्या डोक्यावर बहुदा एखादे शिंग असावे ) त्यांना मला समजावून सांगणे कठीण जाई. तुलनेने नॉन रोटेरियन फॅमिलीज ना एखादी गोष्ट समजावून सांगणे मला सोपे जाई. याची अनेक उदाहरणे मी देऊ शकतो
       मला आठवतय एके वर्षे ब्राझिलचा एक मुलगा एका रोटेरियन फॅमिलीत राहायला आला. ह्या रोटेरियनचा मुलगा ब्राझिल मध्ये एक वर्षासाठी गेला होता. / महिन्यानंतर अचानक ह्या आपल्या रोटेरियन सभासदाची कुठेतरी बदली झाली. आणि त्याच्याकडच्या परदेशी मुलाला फ्लॅटमध्ये एकटे ठेवून हे सर्व कुटुंब बदलीच्या]ठिकाणी निघून गेले . ह्या रोटेरियनच्या क्लब प्रेसिडेंटला मी दुसरी होस्ट फॅमिली तयार करण्यास सांगीतले. पण त्याच्या क्बलमध्ये ह्या ब्राझिलच्या मुलाला सांभाळायला कोणीही रोटेरियन तयार होईना! मग आम्ही बऱ्याच प्रयत्नांनंतर त्या मुलाला एक होस्ट फॅमिली मिळवून दिली. मला आठवतय तो मुलगा / महिने फ्लॅटवर एकटाच राहत होता. त्याने त्याच्या देशात परत गेल्यावर भारताविषयी काय संदेश त्याच्या देशवासियांना दिला असेल?
      'आपण भारतीय, आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आदरातिथ्याने वागवतोहॉंस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य हे भारतीय सांस्कृतिचा एक महत्वाचा भाग आहे ' असा माझा गोड गैरसमज युथ एक्स्चेंज मध्ये काम करताना मात्र पार गेला.  परदेशातून भारतीय सांस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी आलेल्या परदेशी मुलामुलींना होस्ट फॅमिलीज् मिळवून देणे हे आमच्या युथ एक्स्चेंज कमिटीपुढे हे एक अवघड आव्हानच असायचे. रोटरीमध्ये नसलेल्या कुटुंबांचे मी समजू शकतो, पण रोटेरियन कुटुंबे देखील ह्या मुलांना सांभाळायला अनुत्सुक असतात याचे फार वाईट वाटे
       आणि याच्याबरोबर उलटे चित्र परदेशातील कुटुंबांमध्ये दिसे. आपल्या भारतीय मुलांचा अतिशय छान सांभाळ परदेशात केला जातो. मला एकदा कोणीतरी रोटेरियन म्हणाला " आपली मुले सुसंस्कृत असतात, ती परदेशात चांगली वागतात त्यामुळेच असा अनुभव येतो " परदेशी मुले स्वैर असल्याकारणाने आपल्याला सांभाळताना त्रास होतो."  मला असे कधीच वाटले नाही. मुले सगळीकडे सारखीच निरागस, थोडी वांड, थोडी खोडकर, मग ती भारतीय असोत किंवा जगातील कोणत्याही देशातील!  माझ्या पाच वर्षाच्या अनुभवात / अनुभव असेही आहेत की परदेशातून गैरवगणुकीच्या कारणाने आपल्या मुलांना भारतात परत पाठवण्यात आले होते.  परदेशी मुले स्वैर जरी वागत असली तरी त्यांची मानसिकता समजावून घेऊन योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली तर परदेशी मुलांना सांभाळणे (Host करणे) हा एक अतिशय आनंदीदायी आणि वेगळा अनुभव आहे .
 
  यूथ एक्सचेंज मधून स्वेच्छा निवृत्ती :-
 जिल्हा पातळीवर (District Level ) यूथ एक्सचेंज या रोटरीच्या  कार्यक्रमात काम करताना मी त्यातील विविध उपविभागाचा प्रमुख म्हणून काम केले . शेवटची वर्षे संपूर्ण युथ एक्स्चेंज कार्यक्रमाचा उपप्रमुख (Co-Director) या पदावर देखील काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा पातळीवर प्रमुख (Director) पदावर काम करण्यासाठी अनुभव असणे गरजेचे असते. त्याच बरोबर डायरेक्टर हा माजी प्रेसिडेंट देखील असावा लागतो. पैकी माझ्यापाशी अनुभव होता, तथापि मी माझ्या क्लब चा कधीही अध्यक्ष ( President ) झाल्यामुळे Past President नावाचे आवश्यक असणारे एक शिंग माझ्या डोक्यावर उगवले नव्हते. त्यामुळे कदाचित Director ह्या पदापासून मी सुदैवाने लांबच राहिलो. (डिस्ट्रीक्ट पातळीवर पदे देताना वरिष्ठ मंडळी कोणत्या निकषांचा आधार घेतात हे मला नेहमीच उलघडलेले कोडे आहे) रोटरितील पदे मिळवण्यासाठी रोटेरीयन्सची चालणारी केविलवाणी धडपड बघून मला नेहमी आश्चर्य वाटे, त्याही पेक्षा गंमत वाटे४० / ५० रोटेरीयन्स असलेल्या या ओसाड गावाचे मला कधी अध्यक्ष व्हावे वाटले नाही . आणि त्यासाठी जीव तोडून राजकारण करण्याचा माझा स्वभाव ही नाही. माझ्या अतिशय चांगल्या अशा 'सिंहगड रोड ' ह्या क्लबचा बोजवारा अशाच मूर्ख राजकारणातून झाला.

           माझ्या युथ एक्स्चेंज मधील कार्यकाळात माझे काही डायरेक्टर्स खूप छान होते. त्यांनी मला काम करताना खूप मोकळीक (free hand) दिली होती.  'कैलाश मोंगा' डायरेक्टर असताना च्या वर्षात मला काम करताना मजा आली होतीडिस्ट्रीक्ट गव्हर्नरकडून प्रोत्साहन मिळणे हे देखील महत्वाचे असते. महेश कोटबागीच्या काळात त्याच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच मी उत्साहाने काम केले. शेवटच्या वर्षात का कोणास ठाऊक पण माझा उत्साह कमी होऊ लागला.  शेवटच्या वर्षात डिस्ट्रीक्ट गव्हर्नर आणि आमच्या कमिटीच्या काही सदस्यांमध्ये  काहीतरी शीतयुद्ध सुरु असावे. ह्या भानगडीत माझी कुचंबणा होऊ लागली. माझ्या दृष्टीने राजकारणापेक्षा युथ एक्स्चेंज च्या कामाला महत्व होते.  माझ्या शेवटच्या वर्षी आमच्या संपूर्ण कमिटीने वेळा ह्या राजकारणापायी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मी ह्या निर्णयाला ठाम विरोध केला. संपूर्ण कमिटीने राजनामा दिल्यानंतर मुलांच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या कार्यक्रमावर काय परिणाम होतात ते मी अनुभवले होते. त्या वर्षी माझ्या मनाने ठरवले  'आता पुरेयुथ एक्स्चेंज चे काम थांबवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे’.  मी तब्बल पाच वर्षाच्या कामानंतर युथ एक्स्चेंजच्या विभागातून स्वेच्छानिवृत्ती घेतली
                               साधारण त्याच सुमारास इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर्स् असोसिएशन (इकॅम) पुणे विभागाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली आणि भरपूर मतांनी निवडूनही आलो. सार्वजनिक कामाचा थोडा फोकस बदलला. रोटरी क्लब मधील काम कमी होऊन असोसिएशनला जास्ती वेळ द्यावा लागत होता. जवळ जवळ एक वर्ष मी इकॅमचा अध्यक्ष आणि रोटरीचा सभासद अशा दोन्ही ठिकाणी कार्यरत होतो. तुलनेने मला इकॅम मध्ये जास्ती वेळ द्यावा लागत होता. रोटरीतले काम खूपच कमी करत होतो. पण सर्व मित्र सभासदांच्या बरोबर धमाल येत होती. आमचा रोटरी क्लब सिंहगड रोड हा जिल्हा पातळीवर विशेष चमकत होता. पण कुठेतरी माशी शिंकली आणि अतिशय उत्तम चाललेल्या अशा माझ्या क्लबला कुणाची तरी दृष्ट लागली.
                  "पुढील प्रेसिडेंट कोणी व्हावे "? अशी काळजी बऱ्याच रोटेरीयन्सना उगीचच वाटत असते. वास्तविक सर्व गोष्टींचा विचार करून रोटरीने सर्व बाबतीत एक नियमावली (घटना) केलेली आहे. त्यामुळे रोटरीच्या घटनेमधील नियमांनुसार कोणीही इच्छुक उमेदवार प्रेसिडेंट बनू शकतो. किंबहुना रोटरीने प्रत्येकाला प्रेसिडेंट बनण्याचा हक्क दिला आहे. तरी देखील काही रोटरीयन्स विशिष्ट सभासद प्रेसिडंट व्हावा किंवा होऊ नये यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे उगाचच तेढ निर्माण होते, दुरावा निर्माण होतो. ग्रुप्स पडतात. मागे एकदा असेच जाणवले होते.  सदा बर्वेच्या गच्ची वर एक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मी अलका गेलो होतो. सुरवातीला तासभर सर्वजण गप्पा टप्पा करत होते. मी हि गप्पा एन्जॉय करीत होतो. अचानक माझ्या लक्षात आले की विषय भलतीकडेच वळला आहे. त्यावेळी प्रेसिडेंट पदासाठी निवडून आलेला एक रोटरीयन सभासद कसा अयोग्य आहे अशी काहीशी चर्चा सुरु झाली.  माझा त्या पार्टीचा गप्पांचा आनंदच निघून गेला. तासाभराने त्या अयोग्य (?) उमेद्वाराऐवजी कोणाला प्रेसिडेंट करायचे अशी चर्चा सुरु झाली. मग इतक्या वेळ गप्प असलेल्या मला रहावेना ! अशा प्रकारच्या चर्चेला मी कडाडून विरोध केला. / रोटरीयन्स सोडले तर इतरांना स्वतःची मतेच नसावीत. कोणीच विरोध करत नव्हतेमला आठवतंय थोड्या वेळाने सुबोध मालपाणी ने मला पाठींबा दिला. बर अशा मिटींग्ज च्या बातम्या लगेचच सगळीकडे पोहोचतात. माझी खात्री आहे काहीजण दुखावले असणार ! मग गोंधळाला अशीच सुरवात होते …. किंबहुना सुरवात झालीच ……
      दरवर्षी रोटरीमध्ये नवीन सभासदांना आमंत्रित करून सभासदांची संख्या वाढवणे ही एक महत्वाची प्रक्रिया सुरु असते. त्या प्रमाणे अनेक नवीन, नव्या उमेदीचे, नव्या विचारांचे अनेक सदस्य आमच्या क्लब मध्ये सामील होत होते. नवीन, तरुण रोटेरीयन सभासदांच्यापैकी अजय शिर्के, नितीन चवरे, सतीश खाडे हे सभासद खूप उत्साहाने काम करीत असत. नवीन सभासदांच्यापैकी नितीन चवरे हा स्वभावाने गरीब आणि कार्यकर्त्यांचा पिंड असलेला होता. बॅनर लावणे, सतरंज्या उचलणे यासारखी कामे देखील तो मनापासून करत असे. अशा कार्यकर्त्यांच्याच जीवावर नेते मंडळी यशाच्या शिखरावर बसून स्वतःला मिरवत असतात. अजय शिर्के नंतर नितीन क्लब चा अध्यक्ष बनावा अशी चर्चा सुरु होती. मला आनंद झाला, वाटले 'कार्यकर्त्याला नेतेपद मिळावे म्हणजे त्याच्यातल्या कार्यकर्त्याचा बहुमानच !'
       पण क्लब मध्ये काहीतरी वेगळेच वारे वाहत होते. बहुधा आणखीन कुणाला तरी प्रेसिडेंट व्हायचे होते. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली. मला एका गोष्टीचे नेहमी आश्चर्य वाटे. अवघे ४०/५० सभासद असलेल्या क्लबचे प्रेसिडेंट होण्यासाठी एवढी का धडपड करावी वाटते? त्यातून नेमके काय मिळते? आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची मानसिकता का तयार होत असावी?
        कधीतरी माझ्या कानावर आले की आमच्या २०/२५ क्लब सभासदांच्या वेगळ्या बैठका होत आहेत. त्यात काहीतरी राजकारण शिजत होते. स्वाभाविक पणे या ग्रुप व्यतिरिक्त उरलेले क्लब सभासद एकत्रित येउन त्यांचा एक ग्रुप झाला.
         हे सर्व सभासदांचे ध्रुवीकरण होत असताना इमेल युद्ध सुरु झाले. इमेलद्वारे दोन्ही ग्रुप मधील सभासद भांडणे वाढतील अशा प्रकारची प्रक्षोभक भाषा वापरून काही सभासद इमेल्स लिहित. रोटरीच्या घटनेतील नियमांचा कीस पाडला जाऊ लागला. ज्या रोटरीयन सभासदांचा क्लब मधील कामात अजिबात सहभाग नसे असेही काही सभासद इमेल युद्धात सहभागी होऊ लागले, नियम सांगू लागले. फक्त नियमांच्या आधारे कोणतीही संस्था चांगली चालू शकत नाही, असे माझे ठाम मत आहे. ह्याचा अर्थ नियम अजिबातच नको असे नव्हे. तथापि घट्ट मैत्रीच्या पायावर उभी असलेली संस्था नियम किंवा त्यातील त्रुटी शिवाय ही उत्तम राहू शकते.
      ह्या इमेलच्या युद्धात एकदा चुकून मीही एक पत्र सभासदांना लिहिले होते. मी हे पत्र लिहायला नको होते, असे मला नंतरच्या काळात नेहमी वाटत आले आहे. अर्थात मी हे पत्र कुठल्यातरी गटात सामील होऊन, कुणाच्या तरी विरोधात लिहिले नव्हते. तथापि क्लब मधील भांडणे कमी व्हावीत अशा उद्देशाने लिहिले होते. तरी देखील माझे चुकलेच…. मी ते लिहायला नको होते. खूप मोठे पत्र लिहिले होते मी क्लब सभासदांना ! 
  त्यावेळी मी क्लबला लिहिलेले पत्र आता फारसे आठवत नाही. थोडे फार आठवतयं…. ते असे.

       " प्रिय सभासद,
आज मी रोटरीची घटना, नियम, पोट नियम या बद्दल तुमच्याशी काहीही बोलणार नाही. कारण नियम समजणारा True Rotarian नक्कीच नाही. किंबहुना फक्त नियमांच्यावर आधारित असलेली कोणतीही संस्था चालत नसते, असे माझे मत आहे. नियमांची चौकट ही नक्कीच असायला हवी, परंतु नियमांच्या साठी आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी जेव्हा आटापिटा करण्याची जेव्हा परिस्थिती निर्माण होते ,तेव्हा धोक्याची घंटा वाजायला लागते. कोणतीही संस्था हि मैत्रीच्या आधारावरच जास्त चांगली चालते.
     नियमांचा कीस पाडून काही सभासदांनी त्यात बदल सुचवलेले आहेत हे बदल खोडून काढणे मला सहज शक्य आहे. पण तो माझा स्वभाव नाही. ते मी करणार नाही. तथापि मित्रांनो एक मात्र नक्की सुचवेन की नियमात बदल, सुधारणा करताना कोणी दुखावला जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. सुरवातीला लहान वाटणारे वाद कालांतराने उग्र होण्याची दाट शक्यता असते, नव्हे ते होतातच… आणि एकदा मने दुरावली कि मित्रांच्यामधील सारासार बुद्धीही संपुष्टात येते. वगैरे ……
      हे पत्र मी खूप मनापासून लिहिले होत. पण सारासार विचारबुद्धी नष्ट झालेल्या, भांडणाऱ्या सभासदांच्या हृदयापर्यंत ते पोहोचलेच नाही. भांडणे विकोपाला गेलेली जाणवत होती. खरे तर २/३ रोटेरीयन विरुद्ध २/३ रोटेरीयन्स अशाच प्रकारचे भांडण होते. मग बाकीचे सभासद कुठल्याना कुठल्या गटात सामील होत गेले. नवीन आलेल्या सभासदांना काहीच कळत नव्हते. ते बिचारे गोंधळलेले होते. काही सभासद या भांडणाचा आनंद घेत होते. गॉसिप्स / गप्पा रंगात आल्या होत्या.

माझ्या आयुष्यातील रोटरीचा शेवट:- 

रोटरीमध्ये प्रेसिडेंट व त्याचे संचालक मंडळ निवडण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. सर्व प्रथम क्लबच्या सभासदांच्यामधून एक नॉमिनेशन कमिटी निवडली जाते, आणि मग नॉमिनेशन कमिटीचे सभासद प्रेसिडेंट व त्याचे संचालक मंडळ निवडतात. त्यामुळे अर्थातच नॉमिनेशन कमिटीच्या सभासद निवडीला प्रचंड महत्व असते. दि. ………रोजी आमच्या रोटरी क्लबची नॉमिनेशन कमिटी निवडण्याची मिटींग ठरली. काहीतरी अभद्र घडणार ह्याची कुणकुण सर्वांना लागेली होती. मी ही अस्वस्थ होतो. त्या दिवशी सकाळीच प्रेसिडेंट अजय शिर्केला फोन केला त्याला सांगितले की "आजची मिटींग फार महत्वाची आहे. आज तुझ्या नेतृत्व कौशल्याचा कस लागणार आहे. आज सर्व निर्णय स्वतःच्या सारासार विचार बुद्धीने घे. क्लबला फुटण्यापासून वाचव. आज तुझ्या निर्णयाने एक तर तू 'हिरो' ठरशील किंवा क्लब चा ‘शेवटचा बाजीराव’! त्या दिवशी मिटिंग मध्ये भांडणे होणार हे नक्की माहिती असल्याने मी मुद्दाम मिटींगला जाण्याचे टाळले…….
    ज्याची भीती वाटत होती तसेच घडले. सारासार बुद्धी नष्ट झालेले दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. प्रेसिडेंट अजयला परिस्थिती हाताळता आली नाही. त्याचा शेवटचा बाजीराव झालाच…. आमच्या डिस्ट्रीक्ट मध्ये उत्तुंग यशाच्या शिखरावर असलेला रोटरी क्लब सिंहगड रोड क्षणार्धात फुटला. होत्याचा नव्हता झाला. खरे तर भांडणे ३/४ रोटेरियन सभासदाच्या मध्येच होती. उरलेल्या सभासदांनी ह्या ३/४ भांडखोर सभासदांना गप्प केले असते तर हा अनर्थ टळला असता, पण बहुतांश सभासद कोणत्या ना कोणत्या कळपात मेंढरांच्या प्रमाणे सामील झाले. भांडणाचा आनंद घेत राहिले. गॉसिपिंग करीत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेसिडेंट अजय माझ्या घरी आला. रडवेला झालेला दिसला. मला म्हणाला "राजाभाऊ, तू सांगितलेला शब्द न शब्द खरा ठरला. माझा शेवटचा बाजीराव झाला. मी कमी पडलो" मी त्याची समजूत घालत राहिलो. आता कुणाच्याच हातात काहीच राहिले नव्हते. मला काय करावे सुचत नव्हते. मला दोनीही गटातील भांडणाऱ्या रोटेरीयन्सचा राग येत होता, कुठल्या कुठल्या गटात सामील होणाऱ्या रोटेरीयन्सच्या निष्क्रीयतेबद्दल दुःख होत होते. या गोंधळामध्ये मला काही करता येत नव्हते. त्यामुळे निराशा आली होती. क्लब सोडलेले माझे काही मित्र दुसरा क्लब काढण्याच्या मनस्थितीत होते. फुटून बाहेर पडलेल्या मित्रांच्या बरोबर जावे का सिंहगड रोड क्लब मध्ये असलेल्या मित्रांच्या बरोबरच राहावे हा निर्णय मला घेता येईना. सगळेच माझे मित्र होते…
      त्यानंतर ३ दिवसांनी अचानक ही कोंडी फुटली. त्या दिवशी सकाळी अलका अचानक म्हणाली 'सोडून द्या रोटरी'. हे माझ्या डोक्यात आले नव्हते. पण तिच्या तिच्या बोलण्यात तथ्य वाटले, त्यात मला वेगळी वाट दिसली. अर्थात हे तितके सोपेही नव्हते. मला ही रोटरीची सवय लागली होती. विचार पूर्वक निर्णय पक्का झाला व रोटरीचा राजीनामा लिहून काढला… तारीख होती २६/११/२०१०.
 
प्रिय प्रेसिडेंट,
  रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड, पुणे.

महोदय,
       आज मी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या रोटरी क्लबचा राजीनामा देत आहे. गेली २० वर्षे मी 'रोटरी इंटरनॅशनल ' या महान अशा संस्थेचा सभासद आहे/होतो.
      सध्या क्लब मधील घडत असलेल्या घडामोडींच्या मुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. मैत्री पेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्व असते, हे माझ्या सारख्या सामान्य कुवतीच्या रोटेरियनला कसे कळावे? चांगले काय, वाईट काय? हे माझ्या सारख्याला कधी कळले नाही, हेच खरे!
     मागे वळून जर बघितले तर एक मात्र नक्की कि मी रोटरीचा आनंद मात्र नक्की घेतला. युथ एक्स्चेंज असो किंवा पल्स पोलिओ असे किंवा रोटरीच्या इतरही उपक्रमात भाग घेतल्याने खूप समाधान मिळाले. रोटरीतील आनंदाचे क्षण मी कधीही विसरणार नाही.
      माझ्या राजीनाम्या मुळे काहीतरी घडावे किंवा घडेल, या भ्रमात मी नक्कीच नाही, परंतु एकूणच खूप कंटाळा आल्यामुळे किंवा माझ्या इतर व्यावसायिक अडचणींच्या मुळे असेल मी ह्या निर्णयाप्रत आलो आहे.
     तुम्हा सर्वांच्या पुढील वाटचालींना माझ्या शुभेच्छा!

                                              आपला,        
                                              राजीव जतकर
                                                                 

     रोटरीच्या राजानाम्यानंतर एक दोन महिने 'मी रोटरीत नाही' हे खरेच वाटत नव्हते. खूप चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. अस्वस्थ वाटत होते. सिंहगड क्लबचे ५/६ सभासद माझ्या घरी आले व राजीनामा परत घ्या असे म्हणाले. मी त्यांना नम्रपणे नकार दिला. सिंहगड रोड क्लब मधून फुटून निघालेल्या माझ्या मित्रांनी नवीन ‘रोटरी क्लब पुणे प्राईड' नावाचा क्लब काढला. रोटरीच्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नर ने ह्या नवीन क्लबला मान्यता दिली.
        ज्या रोटेरियन मित्रांची प्रेसिडेंटशीप साठी भांडणे होती, ते ते रोटेरीयन्स त्यांच्या त्यांच्या क्लब चे प्रेसिडेंट झाले. त्यांची स्वप्ने पूर्ण झाली. दोन्ही क्लबचे सभासद आपापल्या विजयाप्रीत्यर्थ आनंदोत्सव करू लागले. तिकडे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर ने त्याच्या कारकिर्दीत नवीन क्लब स्थापल्याचे क्रेडीट घेऊन उर बडवून घेतलेला असणार. एकूण काय सगळीकडे आनंदी आनंद. चांगला क्लब फुटल्याचे दुःख कुणालाच नाही. असो…
                मला मात्र ह्या सगळ्या भांडणाचा जाम कंटाळा आला होता. सारखे राजकारण, गॉसिप्स वगैरे सारख्या वातावरणाचा उबग आला होता. ह्या साठी मी रोटरीत मी नक्कीच आलो नव्हतो. मी माझ्या जुन्या मित्रांना सांगायचो कि हे आपण पूर्वी एकदा केले आहे. कर्वेनगर क्लब त्यावेळी अशाच काहीशा कारणांनी फुटला होता. तो क्लब हि फुटून फारसे काहीच घडले नाही. दुर्दैवाने (कदाचित मी रोटरीत नवीन असल्याने) त्या घटनेचा मी ही एक भाग होतो. क्लब फोडल्याने किंवा क्लब मधून बाहेर पडल्याने कोणी सुधारेल असे वाटणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. त्यावेळी फुटलेला कर्वेनगर क्लब ८/१० सभासद संख्येवर अजूनही चालू आहेच… वास्तविक रोटरी इंटरनॅशनल ही एक अप्रतिम अशी जगव्यापी संस्था आहे. अतिशय विचारपूर्वक बांधलेली घटना या संस्थेच्या मुळाशी आहे. अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची आखणी या मध्ये केलेली आहे. एकट्याने सामाजिक कार्य करणे अवघड असते. अशा वेळी मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या बरोबरीने ते काम करणे सहज शक्य असते. त्यातून मैत्रीचाही निखळ आनंद मिळू शकतो. पण नुसती संस्था चांगली असून चालत नाही. असो… !

रोटरी सोडून आता पाच सहा वर्षे उलटून गेली. परवा परवा मॉर्निंग वॉक ला गेलो होतो तेंव्हा दोन्हीपैकी एका क्लबचा प्रेसिडेंट मला भेटला व म्हणाला 'आता आमचे दोन्ही क्लबचे छान चालले आहे. आम्ही एकत्रित पणे काही प्रोजेक्ट हि करतो आहोत.' मनातल्या मनात हसलो आणि मनातल्या मनातच मी त्याला कोपऱ्या पासून हात जोडले. वाटले... हे आपल्याला कसे जमावे? 
'रोटरी सोडण्याचा निर्णय योग्यच होता' या समाधानात मी पुढे चालू लागलो...
           

राजीव जतकर
मोबाइल : ९८२२०३३९७४                                                           इमेल : electroline4929@gmail.com