चला...वीज विकु या महावितरणला च !
(प्रसिद्धी : सकाळ १ जुलै २०१६)
होय…आता आपल्याला महावितरणला किंवा कोणत्याही वीजवितरण कंपनीला वीज चक्क विकता येणार आहे. केवळ अशक्यप्राय वाटणारी ही वस्तुस्थिती आता प्रत्यक्षात येणे शक्य होणार आहे. आपणासारख्या सर्वसामान्य नागरिकांना, सरकारी कार्यालये, कारखाने, हॉटेल्स, मॉल्स, निवासी सोसायट्या, बंगले धारक या सर्वांना आता स्वतःला आवश्यक असलेली वीज निर्माण करून अतिरिक्त वीज महावितरण ला विकता येणार आहे. यातून ग्राहकाला दोन महत्वाचे फायदे मिळणार मिळणार आहेत. एक म्हणजे वीज ग्राहकाने सौर यंत्रणेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा मोबदला महावितरण कडून मिळाल्यामुळे होणारा आर्थिक फायदा आणि दुसरा फायदा म्हणजे महावितरणच्या ग्रीड यंत्रणेवरील ताण कमी झाल्यामुळे देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभागी झाल्याचे समाधान !
भारतात
२०१० साली 'राष्ट्रीय सोलर मिशन' ची स्थापना झाली. उर्जेची वाढती गरज आणि पर्यावरणाचे रक्षण या महत्वाच्या बाबींमुळे सहा वर्षातच ५.२५ गिगा वॉट क्षमतेची सौर उर्जेची संयत्रे उभारली गेली. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात वीजनिर्मिती प्रामुख्याने कोळश्या पासून किंवा पाण्यापासून केली जाते. पण नैसर्गिकपणे उपलब्ध असलेले कोळसा व पाण्याची कमतरता आता गेले काही वर्ष जाणवू लागाली आहे. त्यामुळे पर्यायी उर्जा शक्तीची शोधाशोध सुरु झाली. त्यात प्रामुख्याने पवन उर्जा व सौर उर्जा हे नैसर्गिक व मुख्य म्हणजे अव्याहतपणे मिळणारे व कधीही न संपणारे उर्जा स्त्रोत जगापुढे आहेत. त्यातील वाऱ्यावर उर्जा निर्मिती करणाऱ्या पवन
चक्क्या जिथे वाऱ्याची
ठराविक गती वर्षभर उपलब्ध असते तिथेच उभारता येतात. त्यामुळे पवन उर्जेवर काहीश्या मर्यादा येतात. पण सूर्यप्रकाश मात्र जगात कमीअधिक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध असतो आणि भारतात तर तो मुबलक असतोय़ फुकट मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाची उर्जा वापरून पाण्याची वाफ करून स्टीम टर्बाइन्स चालवता येतात. तसेच फोटो व्होल्टाइक पैनल द्वारे ही विद्युत उर्जा निर्माण करता येते. भारतातील बहुतांशी भागात वर्षातील तीनशे दिवस सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. फोटो व्होल्टाइक पैनल मधून जवळ जवळ ५ युनिट प्रती किलो वॉट एव्हडी वीज निर्मिती होऊ शकते.
नेट मीटरिंग म्हणजे
काय
?
एखादा ग्राहक जेव्हा फोटो व्होल्टाइक पैनल द्वारे वीज निर्माण करतो, तेंव्हा हि निर्माण झालेली वीज डी. सी. ( डायरेक्ट करंट ) पद्धतीची असते. 'इन्व्हर्टर' या उपकरणाचा वापर करून या विजेचे ए.सी. ( आल्टरनेट करंट ) उर्जेत रुपांतर केले जाते. ग्राहकाने निर्माण केलेली हि सौर उर्जा थेट महावितरण च्या जाळ्याला (ग्रीड) ला जोडली जाते. ग्राहकाच्या आणि विज मंडळाच्या यंत्रणांमध्ये एक टु-वे मीटर (नेट मीटर) जोडला जातो. या वैशिष्ठ्यपूर्ण मीटर मध्ये ग्राहकाकडून महावितरण च्या ग्रीड ला जाणाऱ्या विजेची नोंद व महावितरण च्या ग्रीड मधून ग्राहकाकडे येणाऱ्या विजेची नोंद घेतली जाते. ग्राहकाने वीज मंडळाकडून घेतलेली वीज (इम्पोर्ट) आणि ग्राहकाने वीजमंडळाला दिलेली वीज या फरकातून वीज देयके बनवली जातात. यामुळे अर्थातच ग्राहकाने निर्माण करून वीज मंडळाला दिलेल्या विजेचा मोबदला ग्राहकाला मिळतो. थोडक्यात स्वतःच्या गरजेप्रमाणे वीज वापरून निर्माण केलेली अतिरिक्त वीज वीज मंडळाला विकता येते. अर्थात असे करताना महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने (एम.इ.आर.सी.) ठरवलेल्या नियमांतर्गत राहून हा फायदा आपल्याला घेता येतो.
![]() |
नेट मीटर |
सौर वीज निर्मिती मध्ये अनेक फायदे आहेत. पंचवीस ते तीस वर्षे असे प्रदीर्घ आयुष्य ही यंत्रणा पूर्णपणे देखभाल विरहित असून यातून अव्याहत पणे फुकट वीज मिळत राहते. सुरवातीला या यंत्रणेचा खर्च सत्तर हजार रुपये प्रती किलो वॉट एव्हडा येतो. या सौर वीज निर्मितीला शासनाकडून कर्ज ही मिळते. सौर वीज निर्मिती महागडी असल्याने ग्राहक या बाबतीत उदासीन असतात. सर्वसाधारणपणे हि निर्माण झालेली सौरऊर्जा बॅटरी मधे साठवून ठेवावी लागते. या बॅटरी चा खर्च व देखभालीचा खर्च हि खूप येतो. नेट मीटरिंग मध्ये बॅटरी ही संकल्पनाच काढून टाकण्यात आली आहे. सोलर फोटो व्होल्टाइक पैनल मध्ये निर्माण झालेली वीज थेट महावितरण च्या जाळ्याला (ग्रीड) ला जोडली जाऊ शकते. ग्राहकाला फायदेशीर असलेली नेट मीटरिंग ची पद्धत युरोप व अमेरिकेत अतिशय लोकप्रिय झालेली आहे. सुट्टीच्या दिवशी हमखास घराबाहेर पडणारी ही पाश्चिमात्य मंडळी आपल्या घरावरच्या सोलर पैनल मधून तयार होणारी अतिरिक्त वीज विकून पैसे कमावतात..
फोटो व्होल्टाइक पैनल द्वारे वीज निर्मिती मध्ये सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे आणि सौर उर्जा निर्मितीस प्रोत्साहन देण्याच्या शासनाच्या धोरणामुळे या यंत्रणांच्या किमती वेगाने कमी होत आहेत. तसेच पारंपारिक विजेच्या वाढत्या दरामुळे प्रत्येकाने सौर उर्जा निर्माण करून वीजमंडळाच्या ग्रीड ला जोडल्यास साधारणपणे पाच ते आठ वर्षातच केलेल्या खर्चाची परतफेड होऊ शकते. साधारणपणे नऊ ते दहा स्क्वे. मीटर आकाराच्या उघड्या जागेत एक किलो वॉट चा सौर उर्जा पैनल बसवत येतो. त्यामुळे घराचे पत्रे, कौले, गच्चीवर तसेच कारखान्यांच्या इमारतींवर असे रुफ टॉप सोलर पैनल बसवून आपली स्वतःची वीज निर्मिती करून देशाचा व आपला विकास करू शकतो.
- (नेट मीटरिंग बद्दलच्या सविस्तर
माहितीसाठी एम.इ.आर.सी.
(MERC) च्या वेब
साईट वर Net Metering for Roof-top Solar PV Systems
- Regulations, 2015 पहा.)
राजीव जतकर
मोबाईल
: ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com
इमेल : electroline4929@gmail.com